
संध्याकाळ आणि कळ्या
संध्याकाळी हिरवी स्वप्ने (green dreams) या आमच्या बागेत मी फेरफटका मारायला गेले आणि माझं लक्ष वेधून घेतलं ते संध्याकाळी उमलण्यासाठी तयार असलेल्या टपोऱ्या, गुबगुबीत, सुंदर कळ्यांनी. अशा बऱ्याच सुगंधी कळ्या या संध्याकाळीच उमलतात — जसे की रातराणी, प्राजक्त, गुलबक्षी, जुई, मोगरा, अनंत इत्यादी.
या कळ्या हळूहळू फुलण्यासाठी सज्ज होतात तेव्हा त्यांच्या हालचालींनी असं वाटतं की त्या माझ्याशी बोलत आहेत. हिरव्या स्वप्नांध्ये अनेक सुगंधी स्वप्नं या कळ्यांनी आपल्या पाकळ्यांमध्ये जतन करून ठेवली आहेत. काही वेळातच या कळ्यांची उमलून सुगंधी, सुंदर स्वप्नपूर्ती होणार आहे.
संध्याकाळचं रूपांतर काळोख्या रात्रीत व्हायला लागतं, तसं आकाशात चंद्र-तारे उगवतात आणि जमिनीवर या कळ्या उमलू लागतात. काळोख्या रात्रीत आकाशात चंद्र-चांदण्या मंद प्रकाश देत लुकलुकतात, तर जमिनीवरची ही सुगंधी फुलं वातावरण सुगंधी व प्रसन्न करतात. निसर्गाची ही किती अद्भुत लीला आहे!
चांदण्यांच्या मंद प्रकाशात ही फुलं तेजाळतात, तर पावसाच्या धारांत किंवा दवात न्हाऊन निघतात आणि अधिकच तेजस्वी दिसू लागतात. रात्रभर या चांदण्यांचा प्रकाश आणि निसर्गाची थंडगार पाझर जणू या फुलांसाठी अमृतच आहे.
रात्रीच्या शांत वातावरणात ही फुलं नक्कीच एकमेकांशी कुजबुज करत असतील, खुश होऊन गाणीही गात असतील. वार्याची झुळूक, रातकिड्यांची किरकिर, पानांची सळसळ — या गाण्याला जणू वाद्याप्रमाणे साथ देत असतील.
फक्त एका रात्रीचं या कळीचं ते फुलाचं आयुष्य — ते मनसोक्त जगत असतील! सकाळ होताच पाहिलं की अर्ध्या प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला असतो, पण अर्धी फुलं अजून थोडा वेळ “राहूया या झाडाच्या संगतीत” म्हणून रेंगाळतात झाडावरच.
मोगरा, अनंत यांसारखी फुलं दिवसभर आपलं चैतन्यमय रूप आणि गंध मिरवत असतात, पण त्यांचं कळी ते फुल उमलणं हा खूप नयनरम्य, सुवासिक अनुभव असतो.
ही कोणती जादू आहे बघा ना निसर्गाची! रातराणीचा रात्रभर सुगंध दरवळतो, पण सकाळ होताच फुलं चांदण्यांसारखी फुललेली दिसतात, तरी सुगंध कुठे हरवतो?
(सौ. प्राजक्ता पराग म्हात्रे)
---- हिरवी स्वप्ने ----
(लेख शेयर करायचा असल्यास कृपया लेखिकेच्या नावासकट करा)
किती गोड लिहिले आहेस गं… आता
किती गोड लिहिले आहेस गं… आता अशीच येत रहा आणि लिहित राहा..
ही कोणती जादू आहे बघा ना निसर्गाची! रातराणीचा रात्रभर सुगंध दरवळतो, पण सकाळ होताच फुलं चांदण्यांसारखी फुललेली दिसतात, तरी सुगंध कुठे हरवतो>>>>> हो ना.. मलाही हा प्रश्न पडतो.
तो सुगंध रात्रीच्या किटकांसाठी असतो. दिवसाचे उन पडले की सुगंधाच्या ग्रंथी सुकत असाव्यात. अर्थात इतक्या भावुक लेखावर ही प्रतिक्रिया विसंगत आहे म्हणा
छान!
छान!
छान लिहिल आहे जागू ताई.
छान लिहिल आहे जागू ताई.
किती दिवसांनी आला तुमचा लेख.
किती गोड लिहिले आहेस गं… आता अशीच येत रहा आणि लिहित राहा..>>>>>>>+११
मला वाटतं दिवसा माण्सांचे,
मला वाटतं दिवसा माण्सांचे, वाहतूकीचे वगरे ओव्हर पॉवरींग वास येतात.
लेख छान.
धन्यवाद साधना, छन्दिफन्दि,
धन्यवाद साधना, छन्दिफन्दि, ऋतूराज आणि धनश्री
जागू किती गोड लिहिलं आहेस,
जागू किती गोड लिहिलं आहेस, फोटो ही सुंदर आलाय.
आता नेहमी लिहित जा , छान वाटतं तू लिहिलेलं वाचायला.
ममो धन्यवाद. मी तुमच्या
ममो धन्यवाद. मी तुमच्या लिखाणाची फॅन आहे.
खूप छान, नाजूक लिहिले आहेस..
खूप छान, नाजूक लिहिले आहेस..
लिहित रहा..
छान लिहिले आहे.. तो फोटो आणि
छान लिहिले आहे.. तो फोटो आणि शब्द.. फुलांचा सुगंध दरवळणाऱ्या बागेत उभे आहोत असा फिल आला वाचताना.