
तेलुगु पाककृतींच्या मालिकेत मागच्या वेळी किंचीत तामस गुणाची गरम-तिखट उग्गानी-बज्जी पाहिली होती. आजचा मेनू सात्विक गुणाचा दहीभात आहे.
मराठीत दहीभात, दध्योदन किंवा तेलुगुत पेरुगान्नम्, दध्योजनम्, दध्योजन, कर्डराइस हा पदार्थ, आंध्र-तेलंगाणातील देवळांत प्रसाद म्हणून देतात. नवरात्रात पंचमीला देवीला नैवेद्य दाखवतात, गणेशोत्सवात दहा दिवसांपैकी एकदा तरी असतोच. दहीभात हा श्रीकृष्णालाही आवडीचा आहे; म्हणूनच की काय, शाहीर होनाजी बाळांच्या घनश्याम सुंदरा श्रीधरा या अमर भूपाळीत दध्योदनाचा उल्लेख आहे!
चला तर मग, मुलायम, सात्विक, देवांना प्रिय असलेला दहीभात तेलुगु पद्धतीने कसा करायचा हे पाहूया.
साहित्य:
- तांदूळ एक वाटी
- दूध: एक वाटी
- दही: दोन वाट्या
- शेंदेलोण किंवा मीठ: एक चमचा / चवीनुसार
फोडणीसाठी:
- चणाडाळ:एक चमचा
- उडीदडाळ: एक चमचा
- मोहरी: अर्धा चमचा
- जिरे: अर्धा चमचा
- मिरे: अर्धा चमचा
- आलं: एक इंच, बारीक ठेचून
- हिरव्या मिरच्या: दोन, लांब चिरून
- वाळलेल्या लाल मिरच्या: दोन, तुकडे करून
- कढीपत्ता: एक काडी
- हिंग: पाव चमचा
सजावटीसाठी:
- डाळिंब दाणे: दोन-तीन चमचे
- (ऐच्छिक) कोथिंबीर: थोडीशी, बारीक चिरून
तांदूळ स्वच्छ धुवून, अडीच वाट्या पाणी घालून मऊ शिजवून घ्या. गरम असतानाच किंचित घोटून घ्या. दाणे किंचित मोडायला हवेत पण अगदी पिठलं व्हायला नको. त्यात एक वाटी गरम दूध घालून हलवून ठेवा. थंड झाल्यावर दोन वाट्या दही घाला. नीट एकत्र करून घ्या. एका भांड्यात काढून ठेवा.
फोडणीच्या कढईत एक-दीड चमचा तेल गरम करा. त्यात चणाडाळ, उडीदडाळ, मोहरी, जिरे व मिरे क्रमाने घाला. एका मिनिटाने आलं घाला. किंचित परतून हिरवी मिरची, लाल मिरची व कढीपत्ता घाला. परतल्यावर गॅस बंद करून हिंग घाला.
फोडणी थंड झाल्यावर दहिभातावर घाला. शेंदेलोण घालून नीट हलवून एकत्र करा. आवडत असल्यास कोथिंबीर व डाळिंब दाणे घालून वाढा. तोंडीलावणी म्हणून वाळकाचे लोणचे किंवा आंब्याचे लोणचे वाढा.
.
पाकृ आवडली तर नक्की करून पहा व इथे फोटो टाका. तुम्ही वेगळ्या पद्धतीने दहीभात करत असाल तर तेही लिहा.
- दही आंबट नको. ताजे, मधुर चवीचे, साजूक पण पूर्ण झालेले दही हवे.
- दूध हे फुल क्रीम / फुल फॅट हवे. टोन्ड मिल्क नको.
- मोहरी ही शक्यतो मोठी घ्यायला हवी. पांढऱ्या दहीभातात चांगली दिसते.
- ताजे डाळिंबाचे दाणे अवश्य घाला. चवीला आणि दिसायलाही छान असतात.
- ही आंध्र पद्धतीची पाकृ आहे; यात दूध घालतात.
- तेलंगाणा पद्धतीचीत दूध घालत नाहीत आणि दही घातल्यानंतर भात पुन्हा थोडासा शिजवतात.
- हा दहीभात जेवणात इतर पदार्थांबरोबर शेवटी थोडा घेता येतो. त्याचप्रमाणे, मर्यादित भूक असेल तर नुसता दहिभातही पूर्ण जेवण म्हणून घेता येतो. डब्यातही नेता येतो.
खास मायबोलीकरांसाठी दध्योदन -
---
मऊसुत शिजलेला भात -
शिजलेल्या भातात दूध घातले -
फोडणी करताना -
थंड झालेल्या दूध-भातात दही घातले -
दध्योजन तयार आहे -
यापूर्वी एकदा केलेले दध्योजन -
गच्चीबावलीतल्या एका कॉर्पोरेट रेस्टोमधले हे दध्योजन -
मागच्या वर्षी विजयवाड्याला जाताना एका रेस्टॉरंटात खाल्लेले दध्योदन -
.
काही सूचना, सल्ला, प्रश्न असतील तर प्रतिसादांत अवश्य लिहा.
अहाहा तोंडाला पाणी सुटलं.
अहाहा तोंडाला पाणी सुटलं. हिरवी मिरची नाही घालणार पण करणार नक्की.
बाय द वे वाळकं म्हणजे काय? कोल्हापूर साईडला मिळतात ती काकडीसारखी असतात चवीला आणि लांब, नाजूक असतात. कच्चीच खातात. लोणचं नाही करत.
सुंदर सादरीकरण. किती तपशीलवार
सुंदर सादरीकरण. किती तपशीलवार लिहिले आहे!!
तुम्ही अगदी रसिक.खवय्ये आहात !
दध्योदन की दध्योजन ?
सुरेख पाककृती आणि लेखन. मीही
छान. हा आवडतो.
छान. हा आवडतो.

दध्योदन की दध्योजन> ते तेलगू, मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा कुठेतरी म्हणत असतील दध्योजन. तिकडचे लोक... जाऊद्या! आपण वाद घालू नये.
संस्कृतात ओदन म्हणजे शिजवलेला भात.
>>> दध्योदन की दध्योजन> ते
>>> दध्योदन की दध्योजन> ते तेलगू, मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा कुठेतरी म्हणत असतील दध्योजन. तिकडचे लोक... जाऊद्या! आपण वाद घालू नये.
तेच म्हणणार होते.
फोटो आणि वर्णन बाकी भारी असतं तुमचं!
मला दहीभातात कच्चा कांदा आणि बुंदीही आवडते कधीकधी.

कधी सांडगी मिरची तळून घालते, तर कधी फोडणीची मिरची घालते.
कधी (विशेषतः आधी काही तिखटजाळ/मसालेदार खाणं झालं असेल तर) नुसती तुपातली हिंगजिर्याची फोडणी आणि मीठ!
मात्र सगळ्या व्हरायटीजमध्ये कोथिंबीर मस्ट!! माझी एक कंपूभगिनी म्हणते त्यानुसार आम्ही कोथिंबीरकुलोत्पन्न आहोत.
नेत्रसुखद.
नेत्रसुखद. 😍
अगदी बारिकसारिक स्टेप्ससह लिहिता तुम्ही रेसिपी which is so good.
.. मोहरी ही शक्यतो मोठी.. हे मात्र नाही करणार.
मी “ दध्योदन” असाच वाचलाय हा शब्द. पण जौद्या रेसिपी धाग्यावर शब्दचर्चा नाही करत
धन्स् माझेमन, स्वानंदी१,
धन्स् माझेमन, स्वानंदी१, अस्मिता., अमितव, स्वाती_आंबोळे, अनिंद्य
बाय द वे वाळकं म्हणजे काय?
>>>
यावर वाळकाचे लोणचे व इतर तोंडीलावणी इथे घनघोर चर्चा झाली होती व त्यातून कशाला काय म्हणायचं? हा धागा निघाला होता. इथे वाळकं म्हणजे काय याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
दध्योदन की दध्योजन ?
>>>
आंध्रातील तेलगू लोक्स दध्योजन किंवा दध्योजनम् खरंतर दद्धोजनम् असं म्हणतात. ते लोक ज्ञान (dnyan) ला ज्ञान (jnan) असे म्हणतात!
ते तेलगू, मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा कुठेतरी म्हणत असतील दध्योजन.
>>>
मराठवाड्यात आपलं दही भात म्हणतात! मराठी -> दध्योदन, तेलगू -> दद्धोजनम्
संस्कृतात ओदन म्हणजे शिजवलेला भात.
>>>
अरे वा! हे माहीत नव्हतं!
जौद्या रेसिपी धाग्यावर शब्दचर्चा नाही करत.
>>>
शब्द चर्चेसाठी वर सांगितल्याप्रमाणे कशाला काय म्हणायचं? हा धागा आहेच! तिथे चर्चा करू या.
मला दध्योदन हा शब्द वापरात
मला दध्योदन हा शब्द वापरात आहे याचेच आश्चर्य वाटले!
बा मस्त रेसिपी आणि दिसतोय ही
बा मस्त रेसिपी आणि दिसतोय ही छान.
कोणता तांदूळ वापरता? मी बरीच वर्ष या रेसिपीने भात करते आणि मला खूप आवडतो.
जास्मिन राईस शिजवून घेते. तेलाच्या फोडणीत जिरं, हिंग, कढिपत्ता. उडदाची डाळ हवीतर. ह्यात गरम भात. चांगला परतून दही घालून चवीपुरतं लाल तिखट, मीठ. अजिबात ऑथेंटिक रेसिपी नाही पण आमच्याकडे आवडतो असा.
मायबोलीकर कंपूभगिनी मैत्रेयी पण मस्त दहीभात करते.
धन्स् maitreyee, सायो
धन्स् maitreyee, सायो
आम्ही कोथिंबीरकुलोत्पन्न आहोत
>>> Same pinch!
मला दध्योदन हा शब्द वापरात आहे याचेच आश्चर्य वाटले!
>>> उपनयनम् (मुंज), यज्ञोपवीतम् (जानवं), चित्रान्नम्, (एक प्रकारचा फोडणीचा भात) परमान्नम् (अजून एक प्रकारचा भात) असेही शब्द (विशेषतः आंध्र किनारपट्टीच्या) तेलुगु भाषकांत वापरात आहेत!
कोणता तांदूळ वापरता?
>>> कर्नुल सोना मसुरी हा तांदूळ वापरतो. कोणताही जुना व असट शिजणारा तांदूळ चालेल.
मस्त लिहिले आहे.
मस्त लिहिले आहे.
दही भात हे एकदम कम्फर्ट फूड आहे.
फोटो नेहमीप्रमाणे अप्रतिम. किल्लेदार यांचा पण एक दहीभात धागा आहे. तो आठवला.
ओके. सोना मसुरी वापरुन पाहीन
ओके. सोना मसुरी वापरुन पाहीन आणि ह्या रेसिपीने करुन बघेन.
उन्हाळ्यात मी दुपारच्या
उन्हाळ्यात मी दुपारच्या जेवणात कायम दहीभात करते. खुप
खुप आवडतो. वर शिवरायला डाळिंब दाणे असतील तर क्या बहार…
मागे मुंबै स्वैपाकघर का कुठेतरी एका ताईंनी पाकृ दिलेली. त्यांना ती दक्षिणी मित्रमंडळीतुनच मिळालेली. भात दुधातच शिजवुन नंतर दही घालुन मुरवायचा वगैरे. थोडी वेळखाऊ होती पण तसा केलेला दहिभात छान लागला होता. दहिभात हे माझ्यासाठी आयत्या वेळेचे अन्न असल्याने वेळखाऊ पाकृ मी तरी वापरणार नाही
आज केला
आज केला
फोटो आणि वर्णन बाकी भारी असतं
फोटो आणि वर्णन बाकी भारी असतं तुमचं!

अगदी बारिकसारिक स्टेप्ससह लिहिता तुम्ही रेसिपी which is so good. +1
मिरे ऍडीशन आहेत या रेसिपीत आणि शेंदेलोण मीठ . या सेम रेसिपी ने ट्राय करेन आता.
हा तुमच्या आणि मंजुताई च्या दहिभाताच्या फोटो ला झब्बू
माझं बऱ्याचदा जेवण असा दहीभात असतो वरच्या फोटोत डाळींबाचे दाणे नाहीयेत घातले तर मस्त लागतात. मी जे अवेलेबल असेल तसा करते .साधना म्हणतायेत त्याप्रमाणे कधीही पटकन खायचं असेल तर करण्याचा पदार्थ आहे माझ्यासाठीही.
पहिला फोटो पाहून तोंडाला पाणी
पहिला फोटो पाहून तोंडाला पाणी सुटलं. नेहमीप्रमाणे पद्धतशीर आणि नेटकेपणाने कृती लिहिली आहे.
मी असाच करते दहीभात , फक्त
मी असाच करते दहीभात , फक्त फोडणी तूप आणि सांडगी मिरची ची !!
फोटो सुरेख आलेत .
>>>>>>मी असाच करते दहीभात ,
>>>>>>मी असाच करते दहीभात , फक्त फोडणी तूप आणि सांडगी मिरची ची !!
फॉर अ मोमेन्ट मी अश्विनी च्या जागी अश्विनी मामी असे वाचले आणि माझे काळीज थरकापले
आज मेंदू फार फास्ट चालतोय. आय मस्ट कर्ब मायसेल्फ.
फोटो मस्तच!!! निगुतीने इतके
फोटो मस्तच!!! निगुतीने इतके करणार्याचे कौतुक करावे तितके कमीच.
दध्योदन हा शब्द याआधी घनःश्याम सुंदरामध्येच ऐकला होता. अर्थ माहित नव्हता पण भल्या पहाटे दह्याचे काहीतरी खाऊन मुकुंदा यमुनेला गेला एवढे कळले होते
फोटो जुना आहे, पण झब्बू दिलाच
फोटो जुना आहे, पण झब्बू दिलाच पाहिजे अध्यक्ष महोदय.
मस्त रेसिपी, आणि सगळे फोटो पण
मस्त रेसिपी, आणि सगळे फोटो पण मस्त.
दध्योदन की दध्योजन correct शब्द काय आहे ? त्या प्रसिद्ध गाण्यामुळे दध्योदन बरोबर वाटतो , की आंध्र मराठीत दध्योजन म्हणतात ?
मला ह्याचा एकच drawback वाटतो तो म्हणजे करून ठेवला तर खूप फुगत जातो, मग दूध घाला बाकीच सगळ घाला वाढीव होतं जातं सगळ.
ह्या भातात काकडी घालून बघा मस्त लागते आणि एक क्रंच ही मिळतो काकडीमुळे.
मस्तच रेसिपी आणि फोटोज.
मस्तच रेसिपी आणि फोटोज.
उत्तम पाककला.
उत्तम पाककला.
दक्षिणेत फिरायला गेलो की वडेडोसेइडलीबरोबर खूप चटणी खाल्ली जाते. पोटात आग पडते. मग हा दहीभात खावाच लागतो. थंडावा.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
मंजूताई, सिमरन, अनिंद्य, दहीभात फोटोंचा झब्बू सुरू केलात हे आवडलं.
धाग्याचे शीर्षक वाचल्याबरोबर
धाग्याचे शीर्षक वाचल्याबरोबर खालच्या ओळी लगेच आठवल्या
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योधन भक्षी
तेव्हा आणि आता दोनदाच हा शब्द वाचनात आला
फोटो एकदम टेम्पटिंग . माझे हि आवडते कम्फर्ट फूड
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योधन भक्षी>>>>
माझी वरची कमेंट चुकलीय. गोपी घरातले केरवारे करुन दध्योदन खाउन यमुनातीरी पाणी भरायलासुद्धा गेल्यात रे मुकुंदा…… आता तरी अंथरुण सोड हा अर्थ बरोबर आहे.
किती तो आळशी मुकुंदा…
हा अर्थही बरोबरच.
हा अर्थही बरोबरच.
पण माझी एक शंका आहे,
पण माझी एक शंका आहे, दद्ध्योदन हा (गोपींनी किंवा कृष्णाने किंवा इतर कुणीही) अगदी सकाळी न्याहारीला खाण्याचा पदार्थ आहे का?
तेच मलाही वाटलं!
तेच मलाही वाटतं !
नाश्त्याला दहीभात नाही आवडणार.
तो मुख्यतः मध्यान्ही , गरम होत असताना खाण्याचा पदार्थ आहे.
मला त्यात डाळिंबाचे दाणे आवडत नाहीत.
मधे मधे येतात!
वाह
वाह
मस्त रेसिपी आणि फोटो
दध्योधन असे चांदोबा मध्ये एका कथेत वाचलेले.
तो कथेतील नायक फार उत्कृष्ट दहीभात करत असे म्हणून त्याला गावकरी दध्योधन म्हणत असत.
कधीही काहीही आठवू शकते मला.
बहुतेक खाण्याच्या संदर्भात असल्यानेच इतके वर्षे लक्षात असेल ते
Pages