रूपांतर (भाग २)

Submitted by Abuva on 27 October, 2025 - 08:24
Gemini generated image

आमच्यात लग्नं लवकर होतात. त्याप्रमाणे माझं लग्न झालं.  माझ्या बायकोकडे कधीही त्यानं वाईट नजरेनं बघितलं नाही. माझ्याच का, पण त्यानं जवळच्या कोणाकडेही लंपट नजरेनं पाहिलेलं मला ठाऊक नाही. पण ते सोडलं तर...

(भाग १ - https://www.maayboli.com/node/87377)

एक खाजगी गोष्ट सांगतो. 
मी नाईटला असलो की दिवसा मी घरी झोपायच्या ऐवजी महेशच्या रूममध्ये झोपायचो. तिथे कोणाची जा ये नसायची. मग संध्याकाळी चारच्या सुमारास माझी बायको मला उठवायला म्हणून वर यायची. आमच्या नव्या सहजीवनाचा सुखद अंक तिथे गुंफला गेला असं म्हणायला हरकत नाही! महेशला कल्पना होती. पण आम्ही कधी बोललो नव्हतो त्याविषयी.
असंच एकदा आमचं चाललं असताना, अचानक पुण्याला जायचं म्हणून लवकर परतला होता, तेंव्हा आमच्या गडबडीवरून त्याच्या लक्षात आलं. कानकोंडलं व्हायचाच तो प्रसंग होता. अर्थात ही मुंबै आहे. चाळीत गर्दीत र्‍हाणाऱ्यांना हे काय नवीन नाय. बायको लगबगीनं निघून गेली. मी मोरीत तोंड घालून पाण्याचा शिपका मारला. तो दिङ्मूढ उभा होता. मी खालची सतरंजी उचलून घडी घालायला सुरुवात केली. विचारलं, "आज पुण्याला काय काम निघालं?"
तो भानावर आला. "आईनं मुली बघितल्यात. एक बाहेरगावून येतेय. मग म्हणाली आज रात्रीच पोच."
"चला, स्टार्ट झाला तर"
"होय... राजू,.. तुमचं.." असं म्हणून तो थबकला.
"काय रे?"
"नाही, म्हंजे तुमचा,... म्हंजे मी लवकर ... म्हंजे घाई नाही झाली ना..?"
मी गडगडून हसलो, "छोड यार, आता तू नाहीस दोन दिवस तर  घेतो ना वाजवून"
तो मोकळा हसला, "सालं, लग्न करून टाकलं पायजे, जागा बरी शोधली पाहिजे..."

---

महेशचं मुली बघणं सुरू झालं. पुढचे चारएक म्हैने महेशला बडबडीला दुसरा विषयच नाही. बघितलेल्या प्रत्येक पोरीचं, तिच्या अंगाप्रत्यंगांचं रसभरीत (का रसगलित) वर्णन चालायचं. त्यात हा इंजिनेर पडला. शस्त्रकाट्याची कसोटी. रंगरूप, आकार ऊकार, जाडी, रुंदी, व्हॉल्यूम, डेन्सिटी, काही विचारू नका! या माणसाला काय असोशी होती! एकटा भेटायचा मुलीला तर तिचा गंध नाकात भरून घ्यायचा. या सगळ्या शारिरीक मोजमापांत मुलीच्या मनात काय आहे हे त्याला कळलंय असं मला तरी कधी वाटलं नाही. कधी त्याला विचारलं की मुलीनं काय विचारलं तुला, तर काही तरी थातुरमातुर उत्तर द्यायचा. याच्या धबधब्यासमोर त्या तरी काय बोलणार?

---

तो कधी स्पष्ट बोलला नाही, पण त्याला नकारही बरेच आले असावेत. याच काळात त्याची दारू वाढायला लागली. माझ्या घरी जरा आजारपणं वाढली होती. डॉक्टर, दवाखाने या चक्करीत मी चार-सहा महिने सलग नाईट मागून घेतली होती.
जग काही आपल्या प्लॅनिंग नुसार चालत नाही. आईला हॉस्पिटलमधे भरती करावं लागलं ते रात्रीच. शेजारीपाजारी होते, पण धावपळ केली महेशने. पुढचे आठ दिवस सकाळ संध्याकाळ हॉस्पिटलच्या वाऱ्या न चुकता केल्या त्यानं.

पण शेपूट वाकडं ते वाकडंच...
एकदोनदा बायको म्हणाली की महेशने दारू खाऊन वाडीत गोंधळ घातला म्हणून. एकदा वडील जाऊन त्याला वाजवून आले होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून की काय त्यानं पार्ट-टाईम डीबीएमला ॲडमिशन घेतली. या नादात त्याचं पुण्याला जाणं कमी झालं. संध्याकाळी आणि शनिवार-रविवार कॉलेज असायचं. त्यामुळे मुली बघणं कमी झालं. म्हणजे लग्नासाठी हं! कॉलेज बांद्र्याला होतं. आता त्याला या लाईनीवरच्या मुली दिसायला लागल्या होत्या. आणखी काय सांगायचं? दारूही चालूच होती.

---

खूप बदलला महेश या काळात. कंपनीत असिस्टंट परचेस मॅनेजर झाला. कानावर गोष्टी येत होत्या. परचेसवाल्यांवरती तसेही आम्ही प्रॉडक्शनवाले खार खाऊन‌ असतो! आम्हाला खायला‌ काही मिळत नाही ना! म्हणून मी एका कानाने ऐकून दुसऱ्यानं सोडून दिलं. पण त्यात तथ्य होतं. वर्षाभरात महेशनं जवळच्याच मिल उठवून झालेल्या डेवलपमेंटमधे भाड्याने जागा घेतली. त्याच्या पगारात पुण्यातलं घर, इथला खर्च - त्यात रोजची सिगरेट-दारू हां - शिक्षण आणि वर हे भाडं? नाही, जमत नव्हता हिशोब. वाईट वाटलं. बोललो मी त्याच्याशी. एकदा बसलो होतो.
शनिवार रात्र होती. काय टेंशन नव्हतं. 
तेव्हाची आमच्या एरियातली उंच अशी पहिली इमारत. एका खिडकीतून परळ-लालबागचे दिवे तर किचनमधून गोदीतल्या क्रेना दिसत होत्या. आकाशात चंद्रकोर अन् खाली मुंबैचे लाईट.
घरात अजून सामान काही फार नव्हतं. सतरंजी टाकून खालीच बैठक मारली होती.
"मस्त आहे रे फ्लॅट.. नव्याचा वास दिलखुष झकास! काय झक्की आली एकदम? आधी बोलला नाहीस काय ते?"
"आईला घेऊन यायचंय मुंबैला. मंग वाडीत कशाला? त्याच्यापेक्षा इथे आणावं म्हटलं. तिकडे घरीही काय वाडा वजा चाळंच आहे. तिनं तरी कधी बघावं बरं लाईफ?"
"बरोबर आहे, आईबापासाठी तं सगळं चाललंय ना! भाड्या, मुली‌ बघायच्यात सांग ना!"
महेश मोठ्यानं हसला. "गांडू, तुला काय? तुझं लग्न झालंय. पोरही झालंय. भेंचोत, खाज मला जास्त, अन् मी नुसता हलवत बसलोय इतके वर्षं. आता राहवत नाही रे!"
"त्यात प्रमोशन झालंय आता. मिळेल एखादी आयटेम..."
"तेच पायजेनं राव... म्हणून तर गांड घासतोय. संपव रे साल्या. बाटली खाली करायचीये आपल्याला."
"चाट मसाला आहे का घरात? काकडी वर टाकला असता..."
"छ्या असलं काय नाही. आई आली की भरेल सामान."
"आईला घेऊन यायचं म्हणतोस तर दारूचा हिशेब कसा जमणार?"
तो एक सेकंद थांबला. म्हणाला, "तेही एक कारण आहेच. खूप वाढली आहे दारू. आई आली तर जरा बूच बसेल."
"बराबर! आत्ता ठीक‌ आहे, पण बायको आली की घर छोटं पडेल की."
"आई म्हणलीय, तुमचा राजाराणीचा संसार चालू झाला की मी परत जाईन म्हणून."
दोघेही हसलो. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मी तीन डाऊन आणि तो चार-पाच डाऊन असताना कंपनीच्या गोष्टी निघाल्या. बॉसला शिवीगाळ हा नेहमीचा विषय. मी सुपरवायझर व्हायला धडपडत होतो. तो तर असिस्टंट मॅनेजर झालं होता. कुठे तरी माझ्याही मनात असूया होतीच. विचारलं "मॅनेजरच्या लै चाटल्या तू? इतकं लौकर प्रमोशन दिलं तुला?" तो पहिल्यांदा चपापला. "गांडू, चाट तू, मी नाय चाटत कुणाच्या. त्याच्या गोट्या आपल्या हातात हैत भो. दाबल्या की नाचतो बघ आपल्यासाठी."
"लै गल्ला करतो का मॅनेजर? कुठे गावला?"
महेश काही‌ बोलला नाही. इतकी पण शुद्ध गेली नव्हती त्याची की सगळे पत्ते खोलून दाखवेल. "ते सोड, तू का थंड पडलायस आज?" असं म्हणत त्यानं माझा ग्लास भरला, "बास ए, छोटा भर, छोटा"
"अबे हट, अपना कौनसा भी काम अब‌ छोटा नहीं होगा! ये घर देख, ही तर शुरुवात है.. आगे आगे देखो होता है क्या.."
स्वतःचाही भरला. मी चिअर्स करून ग्लास तोंडाला लावला. बोलण्यासारखं काय होतं?
"आपली बायको हिरॉईनसमान माल असेले, माल. ती.. ती प्रज्ञा काय झक मारेल. त्या.. त्या कोणत्यावाल्या शहाशी लग्न केलं ना? साल्याला एक दिवस कामावर ठेवीन आणि नंगा करीन. मग येईल ती चाटत... तू देख" असं म्हणून त्यानं  बॉटम्स अप केला. मग मी त्याचा ग्लास भरण्याचं पुण्यकर्म केलं. इतक्या वर्षांत हा मुद्दा कधी‌ आला नव्हता. प्रज्ञानं मारलेली थप्पड इतक्या गहिऱ्या जागी लागली होती, याचा मलाही पत्ता नव्हता.
"मॅनेजरचं सोड, तो कसला झाटभर इसम. हजारांत खेळतो. साल्याची औकात बघ. काही हजारांसाठी त्याच्या गोट्या, बॉल्स आपल्या हातात आहेत... हां हा... पण ही कंपनीच साली झाटूकभर. कोणाला रायचंय इथं? झालं माझं डीबीएम की चाललो मी. आपल्याला बडे मासे गळाला लावायचेत.. बडे - टाटा, बिर्ला, अंबानी... तू देख"
"बाबा रे, जपून! हजारपाश्शेचा खेळ जमून जायचा. पण लाखाकोटींची बात वेगळी"
"तू तसलाच साल्या. घासू, एकदम इमानदार घासू. पण घाबरट. कुछ होने का नै तेरेसे." त्याच्या चेहेऱ्यावर तुच्छता दिसत होती.
मी इतका वेळ ऐकून घेत होतो. पण आता उसळलो, "जे आहे ते आहे, पण बेईमानी नाही करत कधी. खाल्ल्या ताटात थुकत नाय. इज्जत बाळगून राहतो. आयुष्य चाळीत काढन, पण भायेल्ल्या पैशाचा माज दाखवणार नाय" त्या फ्लॅटकडे हात दाखवत मी म्हणालो.
त्याला आता वर्मी घाव बसला होता.‌ "आपण पण बेइमानी नाय करत. कोणाला बेईमान म्हणतोस?”
मी ग्लास संपवला अन् तडक उठलो.
"आपलं इमान आपल्याशी आहे. माझ्या बुद्धीचा पैसा आहे हा, कष्ट‌ केलेत, डोकं 
लावलंय..." तो उठायचा प्रयत्न करत होता. पण त्याला जास्त झाली होती.
"आपण म्हणजे सालं तेज पातं आहे."
मी पायात वहाणा सरकवल्या
"मालकही तसलाच बुळचट."
आणि तसाच बाहेर पडलो.
"टेंडर होतं. एका सालात डब्बल बिझनेस."
दरवाजा मागे धाडकन लावून घेतला.
"एक कोटी द्यायचे होते"
त्याचा आवाज येत होता.
"पण गांडीत दम नाय एकाच्या.."

(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults