व्हायरल माइंड

Submitted by निमिष_सोनार on 23 October, 2025 - 08:20

एक मोठा जागतिक साथीचा रोग संपल्यानंतरचा 2021 सालचा तो नोव्हेंबर महिना होता. त्या महिन्यात, जगातील अनेक भागात अनाकलनीय घटना घडल्या होत्या.

असे म्हणतात की, त्या साथीच्या रोगाच्या विषाणूने काही परग्रहावरचे विचित्र विषाणू पृथ्वीवर आकर्षित केले होते आणि ते अजूनही पृथ्वीवरच आहेत. त्यातील काही चांगले तर काही घातक होते. पण ते इतके सूक्ष्म होते की खूप पावरफुल मायक्रोस्कोपने सुद्धा दिसत नव्हते. शास्त्रज्ञांना शंका होती की, त्या विषाणूंच्या डोक्यात माणसांपेक्षाही प्रगत मेंदू होता.

जमिनीतील धान्यातून (आणि त्याद्वारे बनणाऱ्या अन्नातून) आणि सगळीकडच्या पाण्यातून (त्याद्वारे तयार होणाऱ्या पिण्याच्या पाण्यातून) माणसाच्या मेंदूत जाऊन मेंदूची रचना आणि विचार करायच्या पद्धती हळूहळू ते बदलून टाकत होते.

अशीच एक छोटी घटना सांगतो.

तो एक महाबळेश्वरच्या टेकड्यांवरचा जुना ब्रिटिश-कालीन बंगला होता. रात्री साडेअकरा वाजता बंगल्याच्या खिडक्यांवर सतत पावसाचे थेंब टपकत होते.

बाहेर वीज चमकत होती, आणि आत एका जुन्या टेबलावर निळ्या प्रकाशाची एक मेणबत्ती लुकलुकत होती. त्या टेबलापाशी बसलेली होती ईशा ताम्हणे, एक शांत पण गूढ व्यक्ती.

तिची नजर नेहमी कुठेतरी दूर पाहत असायची, जिथे बाकी कुणालाही काही दिसत नसे.

ती भविष्य, भूतकाळ आणि अदृश्य सत्य पाहण्याची क्षमता असलेली व्यक्ती होती.

एका रात्री तीला फोन आला.

“मॅडम, माझा सातवीत शिकत असलेला मुलगा आकाश गेल्या आठ दिवसांपासून गायब आहे. पोलिसांनाही काही सापडलं नाही. शेवटी माझ्या नवऱ्याच्या नकळत तुमच्याकडे आले. त्याच्या जीवाला काही बरं वाईट तर झालं नसेल ना? तो केव्हा घरातून निघून गेला, ते कळले सुद्धा नाही. घरात काहीच असे घडले नाही, की ज्यामुळे तो घरातून निघून जाईल.” तो आवाज घाबरलेला होता.

ईशा थोडं शांत राहिली, आणि म्हणाली,

“त्याचा फोटो पाठवा आणि त्याच्या शेवटच्या दिवसाची म्हणजे नाहीसा होण्याआधी तो वापरत असलेली पण आता त्याच्याजवळ नसलेली एखादी वस्तू माझ्याकडे घेऊन या.”

दुसऱ्या दिवशी सकाळी, आकाशाची आई एक घड्याळ घेऊन आली. नाहीसा होण्याआधी ते आकाशने त्या दिवशी घातलेलं होतं.

ईशाने घड्याळ हातात घेतलं.

क्षणभरात तिच्या डोळ्यांत काहीतरी चमकलं.

ती कुजबुजली, “तो अजून जिवंत आहे. पण तो अंधारात आहे. पाणी, लोखंड, आणि बंद दरवाजे...”

आकाशची आई हादरली, “पाणी आणि लोखंड?”

ईशा उठली, तिच्या डोळ्यात विचित्र प्रकाश होता.

ती म्हणाली,
“महाबळेश्वरच्या जुन्या धरणाजवळ एक बंद केलेला पंपहाऊस आहे. तिथे आपण जाऊ.”

संध्याकाळी पोलिसांसह ते सगळे तिथे गेले.

जुने वापरात नसलेले पंपहाऊस अंधारात बुडालेले होते.

पोलिसांनी टॉर्च लावला आणि तिथे एका कोपऱ्यात एक लाकडी दरवाजा सापडला. तो उघडताच आत पाण्याने ओलसर झालेल्या खोलीत आकाश दोरखंडाने बांधलेला आणि तोंडावर जाड चिकट पट्टी बांधलेल्या अवस्थेत जिवंत सापडला!

त्याला तिथे कोणी नेले, याबद्दल शोध घेऊनही पोलिसांना कसलाच पुरावा आणि सुगावा लागला नाही. आकाशला पण काहीच आठवत नव्हते की, तो तिथे कसा आला? आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा नव्हते. फक्त काही दिवसांपूर्वी मेंदूमध्ये काहीतरी विचित्र हालचाली होत आहेत असे मात्र आकाशला जाणवत होते.

नंतर काही आठवड्यांनी एकदा आकाशची आई ईशाकडे गेली आणि तिने विचारलं,

“तुम्ही आकाश कुठे आहे, हे कसं ओळखलंत?”

ईशा फक्त हसली, खिडकीबाहेर धुक्याकडे पाहत म्हणाली,

“मला मागील वर्षाच्या साथीच्या रोगाच्या दरम्यान मेंदूत काही तरी बदल झाल्याचे जाणवले, बरेचदा मेंदू डोक्यात आपली जागा बदलत आहे असा भास झाला, तर कधी वाटायचे मेंदूचा आकार बदलतो आहे. मग नंतर मला काही गोष्टी डोळे बंद करून मनाच्या डोळ्यांनी दिसायला लागल्या. मला काही भविष्यातील घटना सुद्धा दिसतात!"

तेवढ्यात तिचा चेहरा बदलला. आक्रसला. जणू तिला प्रचंड डोकेदुखी होते आहे. ती ओरडली,
"बाई, आता तू घरी जा. तुझा पती घरातून कुणालाही न सांगता बाहेर जाण्याचा बेतात आहे”

आकाशाची आई घाबरून म्हणाली,
"मी घरी जाईपर्यंत माझा पती कदाचित घरातून बाहेर निघून जाईल. घरी कोणाला फोन करून सांगावे तर आकाश घरी नाही. पण तुम्हाला जर पुढे काय होणार हे कळत आहे तर माझा पती कुठे जाईल हे मला आधीच सांगा."

ईशाच्या डोक्यातील मेंदू अचानक जोरात आकुंचन आणि प्रसरण पावायला लागला. आकाशच्या आईला काही उत्तर देण्याआधी ती तिच्या खुर्चीवर बेशुद्ध पडली. तेवढ्यात त्या जुन्या ब्रिटिश-कालीन बंगल्याचा दरवाजा बाहेरून आकाशचे वडील जोरजोरात ठोठावू लागले होते.

अरे हो! सुरुवातीला तुम्हाला मी हे सांगायचे विसरलो की, शास्त्रज्ञांना त्या परग्रहावरच्या विषाणूंबद्दल आणखी एक शंका होती की, ते विषाणू इतके प्रगत आहेत की, विशिष्ट लहरींद्वारे ते एकमेकांशी संपर्क साधू शकतात. पुढे काय झाले? मला आठवत नाही. माझ्या मेंदूत उजव्या बाजूला आतमधून काहीतरी वळवळतंय आणि ते मला पुढे तुम्हाला काही सांगू देत नाही आहे, म्हणून मला थांबावे लागणार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users