१. "आमचंच रक्त महान आहे. आमचाच वंश शुद्ध आहे. त्यामुळे आम्हीच जगावर राज्य करणार. इतरांनी दुय्यम मनुष्य म्हणून जगावं, किंवा तुम्हाला ते मान्य नसेल तुम्हाला घाऊक प्रमाणात मारून टाकण्याची सोय करता येईल, ती आम्ही करू!'' असे शाश्वत सुंदर विचार श्री. हिटलर यांनी मांडले.
२. प्रत्येक युगाचा एक युगधर्म असतो. आणि त्या त्या युगात त्या त्या युगाला साजेसा ईश्वर जन्म घेतो. तसं आश्वासन दिलं गेलं आहे. संभवामि युगे युगे. पूर्वी कधीतरी सिद्धार्थ गौतम म्हणून एकजण होऊन गेला. करूणेनं त्याच्या पापण्या खाली झुकलेल्या असायच्या. तसल्या झुकल्या नजरेत अर्थ शोधणं आज काय परवडणारं नाही. तेवढी कुणाला सवडपण नाय.
आजचा युगधर्म 'मार्केट' आहे. आजच्या युगाला साजेसा एक नवीन गौतम अवतरलेला आहे. गुटगुटीत पुष्ट गौतमसेठच्या गालांवर खळी उमलते मोहक. यत्र तत्र सर्वत्र तोच व्यापून उरलेलाय, निर्गुण निराकार सगुण साकार. खाणी डोंगरं जंगलं नद्या समुद्र आकाश पाताळ सर्वत्र संचार अनादि अनंत. दिसतो रोजच, बघावंच लागतं. तर मग आता 'मुक्ती कौन पथे', म्हणत स्वतःच्या आणि इतरांच्या डोक्याचा पचडा करायची काहीच जरूर नाही. त्या खळीतच सर्वांची मुक्ती सामावली आहे. त्यातच डुबकी घ्यावी, परमानंदात स्थित व्हावं.
३. "काय मग? काय म्हनतंय राजकारान?"
-- काय आवगडंय सगळं. एक बायको सोडून पळालंय. आन् दुसरं आजूनबी बिनलग्नाचंच फिरतंय, दाढी-मिशा वाढवून. सौंसारी माणूस बगाय पायजेल आता एकांदं.
"नाय नाय. तसं नाय. मी तर म्हन्तो सद्याचं हाय तेच बरंय. पार डुगूडुगू म्हातारं होईपर्यंत ह्येच राह्यल्यालं बरं है. हेच्या जागी तिसरंच कुनी आलं तर त्ये लगीच त्येची लाईन मोटी कराय बगनार. आनी त्यासाटी पयल्यांदा त्ये अब्दुलवर घसरनार. अब्दुलला आजून टाईट कराय आजून काय काय हुडकून हुडकून उकरून काडावं लागंन काय की. कारन अब्दुलला टाईट केल्याबिगर तन्मयचिन्मयच्या मताला टवटवी येत नाय. आनी तेंच्या मतांन्ला उभारी आल्याबिगर बेगमी घट्ट होत नाय. पन ह्यात मधल्यामदी अब्दुल अजूनच टाईट हुनार. तेज्यामुळं हाय ह्ये बरं है म्हन्तो."
४. न्यूज चॅनल्सचे दारूचे गुत्ते झाले आहेत आणि ॲंकर्सचे ड्रग पेडलर्स. पूर्वी अंडरवर्ल्डच्या टोळ्या होत्या. आणि आता हे
लश्कर-ए-नोएडा आहे. एकरकमी ठोक उचल घेतेत आणि त्याबदल्यात रोज रात्री सुपाऱ्या वाजवतेत. टाय कोट घालून येतेत आणि सुपाऱ्या वाजवत बसतेत. बंदुका तलवारी बिलवारी परजवत गॅंगवॉर पण करून दाखवतील हे लोक. ह्यांना कोण आवरणार ना? पब्लिकला तर चटक लागलेलीचंय डेली डोपामाईनची. तात्काळ, तीव्र उत्तेजना. आनंदाची चिळकांडी. क्षणिक झिंग.. आणि दीर्घकाळचं बुद्धीमांद्य.
५. यशस्वी ऑनलाईन इंटरव्ह्यूचा राजमार्ग:
पिवळ्या बल्बच्या उदास उजेडात बसून इंटरव्ह्यू देणं. त्यात पाठीमागे कुणीतरी फक्त बनियनवर तंबाखू मळत फिरत असणं.
सुरूवातीची पाठ केलेली इंग्रजी वाक्यं फस्त झाली की मग वाक्यं जुळवता न येणं.. मग विश्वगुरू पॅटर्न वापरून 'आंss आंss', 'क्या सुनाई दे रहा है?' करत वेळ साजरी करून नेणं.. ह्या भानगडीत चेहऱ्यावरचा रंग हवाहवाई झाल्यामुळे मग सरळ कॅमेराच बंद करून टाकणं.. दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण आपला मूर्खपणा न सोडणं.. 'मला पुणेच पाहिजे' 'मला पुणेच पाहिजे' चा जप करत राहणं.
किंवा मग पार कॅमेऱ्याच्या आत घुसून बोलणं. त्यामाध्यमातून आपलं नाक, भिवया, दाढीमिशांचे हिरवे खुंट, हिरड्या वगैरेंचं दर्शन समोरच्याला घडवणं. त्याला चकीत करणं, सदमा देणं.
मध्येच आपला फोन वाजणं. अनंत काळ वाजतच राहणं. रिंगटोनपण अत्यंत हुबलाक स्वरूपाची असणं...ले ले ले ले ले ले मजा ले …प्यार का जमके मजा ले.. वगैरे.
६. व्याकुळतेचा रोग लागला असता मिथुनच्या 'लोहा' या सिनेमातले डायलॉग्ज पौष्टिक आहेत. वानगीदाखल
सुरूवातीचाच एक सीन. लुक्काभाई आणि तांड्याभाई हे दोन आजी-माजी डॉन संघर्षाच्या पवित्र्यात एकमेकांपुढे उभे ठाकलेले आहेत.
तांड्याभाई : भूल गया क्या वो दिन? जब तू दिन में बूट पॉलिश और रात में तेल मालिश किया करता था? और मवाली लोग 'चिकना चिकना' बोल के तेरे पे हाथ फेरते थे. इसके पहले के उनका हाथ गलत जगह पहुंचे, मैंने तेरा हाथ पकडा. दादागिरी की चालचोपडी पढाई. और तूने मेरे साथ गद्दारी की.
लुक्काभाई : फकीरों का चेहरा लेके जुर्म के शहेनशहा से लडने की कोशिश मत कर. वरना तेरी हालत उस खटमल जैसी होगी जो खून पीने के लिये खटिया के खांचे से दिन में बाहर निकलता है.
तांड्याभाई : तू बकरी का दूध पीके अपने मूंछ के बाल उखाडते रह. मैं चला तेरी गोलबस्ती पे कब्जा करने.
७. कार्पोरेशनच्या पुलावर सकाळी सातपासून अनेक जोडपी नटूनथटून आलेली दिसतात रोज.
एकमेकांकडे प्रेमाने बघताना, हातात हात गुंफून रस्ता क्रॉस करताना, कठड्याला स्टाईलमध्ये रेलून वेगवेगळ्या पोजमध्ये उभी असतात. आणि पुढं तीन-चार फॉटोग्राफर्सचा लखलखाट सुरू असतो.
हे दोघे जण स्लो-मोशन मध्ये पळत येत असतात आणि मग त्यांच्या तशा पळत येण्यामुळे पारवे आकाशात उडतात. तर त्या पार्श्वभूमीवर चित्रीकरण. पद्धत आहे तशी. ते मनासारखं जमलं नाय तर दोन-तीन वेळा रिटेक. पारव्यांना काय काम नसतं. ते उडून दाखवतात किती पण वेळा.
ऊन्हानं मेकअप वितळायला लागलेला असतो, तशा अवस्थेतही हे चालू असतं. आणि सर्ववेळ चेहऱ्यावर एक कृत्रिम हसू धारण केलेलं. सतत हसणारी व्यक्तीच सुंदर दिसते, ही सौंदर्याची अत्यंत बनावट अशी व्याख्या, याला कारणीभूत.
याचं हे नंतर काय करत असतील? बहुदा रील्सच. मग त्याखाली "हाऊ क्यूट!" "छान बॉंडींग!" "मेड फॉर इच अदर!" वगैरे कमेंट्स. शंभरेक लाईक्स आणि पन्नासेक लव्हज्.
त्यामुळे दोघांच्याही मनात समजा एकमेकांबद्दल थोडाफार डाऊट वगैरे असेल की आपली जोडीदाराची निवड ठीकाय ना? तर ते मळभ अशा कमेंट्समुळे, शे-दोनशे लाईक्समुळे हटत असेल. एक जो नर्व्हसनेस, एक जी बाकबुक, एक जी मांजरीच्या गुवाच्या रंगाच्या संध्याकाळसारखी कातरता उदयास आलेली असते लग्नाआधी, ती कदाचित दूर होत असावी या सगळ्या प्रोसेसमधून. नायतर उगाचंच कोण कशाला करेल असं?
दिवाळीचा फराळ आवडला आहे.
दिवाळीचा फराळ आवडला आहे.
क्या बात है!!!
क्या बात है!!!
नायतर उगाचंच कोण कशाला करेल
नायतर उगाचंच कोण कशाला करेल असं?
>>>
सांगवीकर डोकावतो वाटतं अधून मधून.
सर्वच नोंदी “कामाच्या”
सर्वच नोंदी “कामाच्या” वाटल्या.
तांड्याभाई - लुख्खाभाई संवाद इतके लक्षपूर्वक ऐकून त्यांचे चिंतन-मनन करणारा दुसरा माणूस या जगात आहे हे समजून परमसंतोष जाहला असे.
बशीर भाई बब्बर जिंदाबाद!
तांड्याभाई - लुख्खाभाई संवाद इतके लक्षपूर्वक ऐकून त्यांचे चिंतन-मनन करणारा दुसरा माणूस या जगात आहे हे समजून परमसंतोष जाहला असे.
>>
बशीर भाई बब्बर जिंदाबाद!
अजरामर संवाद लिहिलेत.