१. मन जाय तो जाने दे, मत जाने दे सरीर.
मन शरीराला भविष्यातील किंवा भूतकाळातील कुठल्याशा आभासी परिस्थितीत घेऊन गेलंय की शरीर अजुनही आपल्याजवळच आहे, हे चेक करत रहायला पाहिजे वारंवार.
कारण शरीर मूर्ख असल्यामुळे ते आभासी परिस्थित्यांनाही खऱ्याखुऱ्या रिॲक्शन्स देत बसतं. त्याला काय खऱ्याखोट्यातला फरक करता येत नाही.
बाकी, मन तर कधीच शरीराचा मान ठेवत नाही. शरीराला बेवारस सोडून स्वतः उंडारायला जातं. शरीरात थांबायचं म्हटलं की त्याला धाड भरते. अशा मनावर भरोसा ठेवण्यात काही अर्थ नाही. अशा मनाला चुचकारायला, कोसळंवायला ज्यांनी कुणी हे श्वासांचं खेळणं शोधून काढलेलं आहे, ते वस्ताद लोक असणार.
२. डोक्यातल्या आवाजासोबत इनट्यून राहता आलं पाहिजे सर्ववेळ. त्या आवाजाच्या किंचित मागं किंवा पुढं नाही, तर सोबत! डोक्यातला आवाज लाईव्ह दिसला पाहिजे. होश राहिला पाहिजे सतत की असे असे दगडगोटे डोक्यात खडबड खडबड करत आहेत.
३. केवळ असणं, फक्त असणं, शक्यच नाही का? असं काय घडतं वारंवार की ज्यामुळे आपण केवळ असण्याची अवस्था सोडून विचारांच्या गळ्यात जाऊन पडतो? विचारांना उगम पावल्या पावल्या क्षणी मुळापाशीच ट्रॅप केलं पाहिजे. याउलट आपण काय करतो की नकळत त्यांना जाऊन चिटकतो. आणि विचार तर इलेक्ट्रीक करंट सारखे. चिटकलो की खेळ खलास. लांबूनच निरखत राहिलेलं परवडतं.
४. डोक्यात एक वेगळंच समांतर विश्व चाललेलं आहे, ज्याला काही धरबंध नाही. आणि आपण ज्या बाहेरच्या जगात वावरतोय ते ऑलटुगेदर वेगळं जग आहे. परिणामी आपलं मन आणि बाहेरचं जग यात मिस-मॅच घटित होतं. बाहेरच्या जगातील परिस्थितीला आपण ज्या रिॲक्शन्स देतो, त्या रिॲक्शन्स त्या त्या वेळच्या आपल्या मनाच्या अवस्थेवर आधारलेल्या असतात. आणि समोरच्या व्यक्तीचंही तसंच होत असणार. त्यामुळे आपला संवाद साफ गंडलेला असतो, यात काहीच नवल नाही.
५. मोटामोटी दोन प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. एखाद्या वेळी एकच विचार/घटना/व्यक्ती/भावना/आठवण मनाच्या प्रतलाला तासनतास घासत राहते. त्यापासून स्वतःला अलग करायचा जेवढा प्रयत्न करू तेवढं ते घर्षण जास्तच वाढत जातं. कटरनं स्टीलची प्लेट कापल्यासारखा कर्कश आवाज. ठिणग्या बिणग्या उडतात, ते वेगळंच.
आणि दुसऱ्या एखाद्या वेळी वेगवेगळ्या विचारांचा/घटनांचा/भावनांचा तुटकतुटक प्रवाह चालू असतो. ही दुसरी केस डील करायला सोपी आहे. यामध्ये मन एका विचारावरून दुसऱ्या विचारावर उडी मारण्याच्या क्षणी जो गॅप असतो, तो थोड्याबहुत प्रयत्नानंतर ओळखता तरी येतो. आणि त्या गॅपमधून सुटका करून घेता येते.
पहिल्या केसमध्ये एकच एक विचार धुमश्चक्री निर्माण करतो. त्या धुरळ्यात दुसरं काहीच दिसत नाही. एकाच जागी पिन अडकून बसते. ह्याच्यावर काही इलाज नाही. इलाज करायला जाऊही नये. होतंय ते होऊ द्यावं.
७. डोक्यात ह्या मायक्रोक्लिप्स अतृप्त आत्म्यासारख्या भटकत आहेत. त्यांना त्यांचं त्यांचं औटघटकेचं आयुष्य आहे. क्षणभर जाणीवेपुढं फ्लॅश होतात आणि नंतर अनंतात हरवून जातात. मनाची मायक्रोक्लिप्स पैदा करण्याची क्षमता असाधारण आहे. चोवीस तास कारखाना चालूच. पण त्यातून घंटा काय ओरिजनल, फ्रेश उत्पन्न होत नाही. तरीही हा खेळ बघत बसण्यासारखा दुसरा टाईमपास नाही.
८. येता श्वास, थंड, नाकपुडीच्या आत वरच्या भागाला स्पर्शून जातो. जाता श्वास, उष्ण, तिथंच जरा खालच्या बाजूला जाणवतो. या दोन क्षणबिंदूंच्या मधोमध कुठेतरी आपण असणार.! म्हणजे ह्या दोन क्षणबिंदूंच्या मधोमध कुठेतरी आपलं अस्तित्त्व असणार.!
म्हणजे आपल्याला सध्या हे एवढं कळलंय की नाकपुडीच्या अमुक अमुक अशा दोन बिंदूंवर दोन वेगवेगळ्या वेळेस श्वास जाणवतो आहे. पण त्या दोन घटनांच्या दरम्यान जो अतिसूक्ष्म मायक्रोसेकंदाचा गॅप असतो, त्यावेळी आपण नक्की कुठं असतो? ते काही कळलं नाही. त्यावेळी कितीही मेहसूस करायचं म्हटलं तरी आपलं अस्तित्त्व जाणवत नाही. म्हणजे साला त्यादरम्यान आपण अस्तित्वात असतो तरी की नाही? की विरूनच गेलेलो असतो? ह्याच्यावर जरा नीट विचार केला पायजे.
९. मांडी घालून बसण्याच्या या नवीन पोजचा नकळतच शोध लागला. या पोजमध्ये न अवघडता, न रग लागता, कितीही वेळ बसता येतंय. एका पॉईंट ऑफ टाईमनंतर शरीर दगडासारखं कठीण होतं. जसं की मांडी घालून बसलेल्या एखाद्या दगडी मूर्तीत आपण पॅकबंद होऊन बसलोय कडेकोट. सगळं धारण करून स्थिर. भवतालाच्या कोलाहलयुक्त जलाशयात शांततेचा खडा पडतो आणि मऊसूत मौन पसरतं. आणि विस्तार एवढा मोठा की मला माझा एंड सापडत नाही. सगळा भवताल माझ्या आत सामावल्यासारखा भासतो. भासतो कसला, खरंच आहे हे. पण प्रॉब्लेम असाय की आता या मूर्तीतून बाहेर कसं पडायचं?
वा. सुरेख लिहिलेय.
वा. सुरेख लिहिलेय.
९ व्या क्रमांकावर विचार करतेय. असे बसुन श्वास निरखत राहायला पाहिजे पण हे मन......... मेलं ते दुसर्या क्षणाला पसार होते.
मस्त लिहिले आहे. पोचले.
मस्त लिहिले आहे. पोचले.
एंड कसा सापडणार, अनंताकडे झेप आहे ही ! नवा खेळ सुरू होईल आता.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
यामधील अनेक गोष्टी अनुभवतो आहे.
त्यावर विचार करतो आहे.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
9 नंबरची पोज कळाली नाही.
मन कश्या उड्या मारतं हे चांगलंच माहीत आहे.
वाह !!
वाह !!
छान लिहिले आहे. अद्भुत आहे.
छान लिहिले आहे. अद्भुत आहे.
येता श्वास, थंड, नाकपुडीच्या आत वरच्या भागाला स्पर्शून जातो. जाता श्वास, उष्ण, तिथंच जरा खालच्या बाजूला जाणवतो....... हे बिलकुल जमत नाही.तशीही नियमितता नाहीच. काही वेळ मांडी घालून बसायचे इतकेच. पण तरीही शांत वाटते. त्या वाटण्यासाठी डोळे बंद करून बसावेसे वाटते.
पण प्रॉब्लेम असाय की आता या मूर्तीतून बाहेर कसं पडायचं?...... ग्रेट!