बुद्धिबळातील साप

Submitted by निमिष_सोनार on 19 October, 2025 - 02:10

प्रकरण 1

(अनेक वर्षांपूर्वी)

संध्याकाळी भोरवाडी गावात पाऊस रिपरिपत होता, गार वारं खिडक्यांतून आत येत होतं. एका लहानशा घरात राघव आणि माधव नेहमीप्रमाणे चटईवर बसले होते, त्यांच्या समोर सापशिडीचा रंगीत फड पसरलेला होता. लहानशा घड्याळ्याच्या टिकटिक आवाजात आई त्यांच्या बाजूला बसलेली होती.

तिच्या हातात गरम वाफाळता चहा होता.

“चल माधव, माझा नंबर,” राघवने रंगीत सोंगटी पुढे सरकवली.

“अरेरे! पुन्हा सापावरून खाली आलो,” राघवने नाराज होत तोंड वाकडं केलं.

आईने हसत विचारलं, “काय झालं रे राघव?”

“आई, मी इतक्या वर पोचलो होतो, आणि हा साप कडमडला! पुन्हा सुरुवातीला यावं लागलं.”

आई हसली आणि म्हणाली, “अरे, हेच तर जीवन आहे. सापशिडी म्हणजे आपलं आयुष्य आहे. कधी शिडी मिळून पटकन वर जातो, तर कधी साप आपल्याला खाली आपटतो.”

माधवने नजरेतून प्रश्न विचारला, “आई, पण हा तर फक्त खेळ आहे.”
“हो बाळ, पण खेळातूनच जीवन शिकता येतं. शिडी म्हणजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या संधी. चांगली माणसं, चांगले अनुभव, चांगल्या सवयी! या सगळ्या आपल्या प्रगतीच्या शिड्या आहेत आणि साप म्हणजे अडचणी, चुकीचे निर्णय, वाईट संगत.”

राघवच्या चेहऱ्यावर विचारमग्न भाव आले.

“म्हणजे शिड्या शोधायला हव्यात आणि सापांपासून सावध राहायला हवं! बरोबर?”

“अगदी बरोबर. आणि सापानं खाली खेचलं म्हणून रडायचं नाही. पुन्हा खेळत राहायचं!”

मग कुतुहलाने माधवने विचारलं, “आई, मग बुद्धिबळ काय शिकवतं?”

आईने दोघांकडे पाहिलं.

“बुद्धिबळ आपल्याला असं शिकवतं की, जीवनातील प्रत्येक चाल म्हणजे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. सोंगट्या म्हणजे तुमच्या आयुष्यातले निर्णय आहेत. प्यादं म्हणजे साध्या सवयी, घोडा म्हणजे धाडस, उंट म्हणजे लवचिकता, हत्ती म्हणजे स्थैर्य, आणि राजा म्हणजे तुमचं ध्येय. संदर्भ बदलला की उपमा बदलत जाते.”

“आई, पण एवढा मोठा असूनही राजा फार कमजोर असतो ना? एक पाऊलच पुढे जाऊ शकतो,” राघवने तोंड वाकडं केलं.
“एकाच घर चालतो म्हणून त्याला कमजोर म्हणजे योग्य होणार नाही. राजा म्हणजे तुमचं स्वप्न. ते फार नाजूक असतं. त्याची काळजी घ्यावी लागते. त्याच्या संरक्षणासाठी तुमच्याकडे तुमचं कौशल्य असलं पाहिजे. त्यासाठी प्यादं म्हणजे छोटे छोटे प्रयत्न, घोडा म्हणजे धाडस, हत्ती म्हणजे मेहनत, आणि राणी म्हणजे तुमचं ज्ञान! हे सगळं वापरायचं.”

“राणी इतकी ताकदवान का?” माधवने विचारलं.

“कारण ज्ञान हेच तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे. जसं जसं तुम्ही शिकाल, तसं तसं आयुष्यात यश मिळेल. पण ते फक्त राजासाठीच वापरायचं – म्हणजे तुमच्या ध्येयासाठी.”

राघव आणि माधव आईकडे मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.

“आणि लक्षात ठेवा – बुद्धिबळात जिंकण्यासाठी संयम लागतो. तुम्ही एक चूक केलीत, आणि तुमचं स्वप्न गमावाल. आयुष्यातही तसंच आहे. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या.”

“आई, तुला हे सगळं कुठून कळतं?” राघवने कुतूहलाने विचारलं.

आईने हसत त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला.

“बाळांनो, मी खूप शिकले नाही. पण आयुष्याची शाळा शिकवते, फक्त नीट निरीक्षण करायला शिकलं पाहिजे.”

पाऊस अजूनही रिपरिपत होता. विजेची चमक अधूनमधून खोलीत प्रकाश टाकत होती.

राघव आणि माधव आता बुद्धिबळाच्या फडावर रंगले होते, पण त्यांच्या मनात आईच्या शब्दांचे पडसाद उमटत होते.

प्रत्येक सोंगटी हलताना ते तिच्या शिकवणीला आठवत होते.

अचानक माधवने विचारले, "आई, जर समजा बुद्धिबळात साप शिरला तर?"

राघव हसला, “माधव, साप बुद्धिबळात येईलच कसा? हा तर फक्त चौकटींचा खेळ आहे.”

पण आई हसली आणि तिच्या चेहऱ्यावर विचारमग्नता दिसली.

ती त्यांच्या समोर खुर्चीत नीट बसली आणि म्हणाली, “खरं सांगू का? आयुष्य हे नेहमी बुद्धिबळासारखं फक्त ठराविक चौकटीत कधीच बसत नसतं. कधी कधी चौकटीबाहेरच्या अनपेक्षित वाईट घटना घडतात. त्याला हा माधव म्हणतो त्याप्रमाणे आपण साप म्हणू. कधी कधी हा साप तुमच्या विचारांच्या चौकटीतही शिरतो.”

“विचारांच्या चौकटीत?” माधवचे डोळे विस्फारले.

आईने हळूच एका उदाहरणाने सुरुवात केली. “बाळांनो, कल्पना करा, तुम्ही दोघं बुद्धिबळ खेळत आहात. तुमचं प्रत्येक पाऊल अगदी योजनाबद्ध आहे. राजा सुरक्षित आहे, राणी प्रभावी आहे, आणि तुम्ही विजयाच्या जवळ आहात. पण अचानक तुमच्यात अहंकार येतो.”
“अहंकार?” राघवने विचारलं.

“हो. ‘मी जिंकणारच’ हा विचार. आणि तोच साप आहे. तो तुमच्या बुद्धिमत्तेला विषारी बनवतो. तुम्ही विचार न करता चाल खेळता आणि सापळ्यात अडकता.”

“म्हणजे चुकीचा निर्णय घेणं?” माधवने विचारलं.

“अगदी तसंच. कधी कधी तुमचा विश्वासघात करणारी माणसं साप बनून तुमच्या आयुष्यात येतात. कधी चुकीच्या सवयी, तर कधी अति आत्मविश्वास.”

राघव विचारमग्न झाला. “म्हणजे फक्त शत्रूच नाहीत, कधी कधी आपलेच विचार सुद्धा साप होतात, बरोबर?”

आईने हसत मान डोलावली. “बरोबर. आयुष्यात फक्त बाहेरचे नाही, आतले सापही धोकादायक असतात. तुमच्या मनातले लोभ, राग, अहंकार! हे साप बुद्धिबळाच्या फडावर शिरले, तर तुमचा राजा सुरक्षित राहणार नाही.”

“मग त्यावर उपाय काय, आई?” माधवने कुतूहलाने विचारलं.

आईने हातातला रिकामा चहाचा कप बाजूला ठेवला आणि म्हणाली,

“उपाय म्हणजे संयम आणि सजगता. बुद्धिबळात कधीही तुम्हाला वाटेल की, तुम्ही जिंकणार, तेव्हा एक पाऊल मागे घ्या आणि स्वतःला विचारा की ‘माझी चाल योग्य आहे का? इथे एखादा साप तर नाही ना?’”

“पण आई, हे फक्त खेळात करता येतं. आयुष्यात कसं करणार?” राघवने विचारले.

“आयुष्यातही करता येतं. प्रत्येक निर्णय घेताना विचार करा की ‘ही माझी शिडी आहे का साप?’ तुमचं अहंकार, वाईट सवयी, चुकीची संगत, हे सगळे साप आहेत. आणि प्रामाणिकपणा, जिद्द, संयम, या तुमच्या शिड्या आहेत.”

“आणि आई, राजा म्हणजे आपलं ध्येय, ते सुरक्षित ठेवलं पाहिजे, बरोबर?” माधवने विचारलं.

“अगदी बरोबर, माधव. आयुष्याचा राजा म्हणजे तुमचं स्वप्न, तुमचं ध्येय. त्याला सांभाळणं तुमचं कर्तव्य आहे.”

राघव हसला, “म्हणजे आयुष्याचं बुद्धिबळ हे सापशिडीने भरलेलं असतं?”

आईने दोघांकडे प्रेमाने पाहिलं.

“हो, पण तुम्ही सावध राहिलात तर साप तुम्हाला चावू शकणार नाहीत. आणि शिड्या नेहमी तुमच्या परिश्रमांतूनच मिळतात.”

पाऊस थांबला होता. विजेचा आवाज आता शांत झाला होता. राघव आणि माधव पुन्हा खेळात गुंतले, पण आता त्यांचं लक्ष फक्त सोंगट्यांवर नव्हतं. ते आपल्या निर्णयांवर, आपल्या विचारांवर अधिक सजग झाले होते.

आईने त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिची नजर भिंतीवर लावलेल्या फोटोकडे गेली. तिला अपघातात अकाली निघून गेलेल्या आपल्या पतीची म्हणजे राघव आणि माधवच्या वडिलांची आठवण झाली.

प्रकरण 2

(आजचा काळ)

मुंबई जिल्ह्यातील छोटे शहर घारपुर. शाळेतील सकाळी दहा वाजेची वेळ. सहावी ‘ब’ मधली मुलं-मुली मधली सुट्टी संपल्यानंतर डबे खाऊन झाल्यावर वर्गात आपापसात खेळत होती. पुढचा तास सुरू व्हायचा होता, त्याच वेळी एक गडबड सुरु झाली.

"साक्षी, तू माझं फॅन्सी पेन कुठे ठेवलंस?", कंपास बॉक्स उघडून पूजा चिडून म्हणाली.

"मी नाही घेतलं तुझं पेन!" साक्षी दूरवरून ओरडली.

"खोटं बोलू नकोस! काल तुझ्या बॅगेजवळ पेन दिसलं होतं मला!" पूजा अजून चिडली.

"मग कालच का नाही विचारलं मला? आज का विचारतेस?", साक्षी चिडली.

अशा वादामुळे सगळा वर्ग त्यांच्या आजूबाजूला जमू लागला. काहीजण पूजा बरोबर आहे, असं म्हणत होते, तर काही साक्षीची बाजू घेत होते.
गोंधळ वाढत चालला होता. तेवढ्यात मागच्या बाकावरून कोमल उठली. ती अगदी बिनधास्त पावलं टाकत दोघींसमोर आली.

"मुलींनो, थांबा जरा!" ती म्हणाली, तिचा आवाज जरा मोठा होता पण शांतही होता.

"आरडा ओरड करून काहीच फायदा होत नाही. चला, थोडं शांतपणे बोलूया." असे म्हणून कोमलने दोघींना बाजूला नेलं.

"पूजा, खरंच साक्षीने तुझं पेन घेतलंय असं तुला वाटतंय?"

"हो. काल बहुतेक तिच्या बाजूला दिसलं होतं असं मला आज जाणवलं. कारण कालनंतर मी आजच कंपास बॉक्स उघडून पहिली"

पूजा थोडी चिडलेली होती, पण कोमलचा आवाज ऐकून तिचा रोष थोडा कमी झाला.

कोमलने साक्षीकडे पाहिलं, "साक्षी, तू घेतलं होतंस का?"

"नाही गं. मी फक्त हातात घेऊन पाहिलं होतं. नंतर मी ते पुढच्या बेंचवर पूजा जवळ ठेऊन दिलं. मला वाटलं तिने उचललं असेल. आय एम सॉरी." साक्षीचा आवाज गहिवरलेला होता.

"बरं, असं करूया... चला आपण दोघी मिळून वर्गात शोधूया. कदाचित ते कुठेतरी ते पडलेलं असेल." कोमलने सुचवलं.

त्या दोघींनी आणि कोमलने अनेक बाकं खालून वरून तपासून पाहिली, आणि शेवटी पेन एका बाकाच्या पायाखाली सापडलं, जिथून ते दूरवरून सहजासहजी दिसणार नाही. कोमलने ते पेन उचलून पूजा आणि साक्षीकडे पाहिलं.

"पेन इथे सापडलं. दोघींनाही चूक झाली. पूजाने खात्री न करता पटकन साक्षीवर आरोप केला, आणि साक्षीने ठाम न सांगता चिडून उत्तर दिलं. पण आता पेन मिळालं आहे, आणि साक्षीने माफीही मागितली आहे. आता पूजा तू ही तिची माफी माग. मग आपण आता पुन्हा एकत्र जेवायला बसूया का?"

पूजाने सॉरी म्हटले, दोघी हसल्या आणि समाधानाने मान डोलावली. वर्गातले बाकीचेही समाधानाने हसले. पुढच्या तासाच्या मॅडम काही वेळापूर्वी वर्गात आल्या होत्या, त्यांनी हा सर्व प्रकार कौतुकाने पाहिला. त्यांनी जाहीर केले, "कोमल आजपासून वर्गाची मॉनिटर!" सर्वांनी टाळ्या वाजवून संमती दर्शवली. कोमल लाजून एकदम आपल्या जागी बसली. तिच्या चेहऱ्यावर एक समाधान आणि आत्मविश्वास झळकत होता. मुख्याध्यापिका मालदीवे मॅडमकडे कोमलची ही बातमी गेली. त्यांनी तिला ऑफिसमध्ये बोलावून कौतुक भरल्या नजरेने शाबासकी दिली.

दिवस भराभर जात होते. दहावीचे वर्ष उजाडले.

कोमल आता हजरजबाबी आणि जिद्दी मुलगी झाली होती. घरी ती आई वडिलांकडून आपल्याला हवे ते युक्तीने मिळवण्यात वाकबगार होती. तिला स्मार्टफोन हवा होता. खरे तर तिच्याकडे एक फोन होता परंतु त्यात व्यवस्थित व्हिडिओ शूटिंग होत नसे आणि कॅमेरा चांगला नव्हता. तिला सोशल मीडियावर स्वतःचे रिल्स बनवायचे होते. हे कारण सांगितले तर आई-वडिलांकडून परवानगी मिळणार नव्हती हे तिला माहीत होते.

तो रविवारचा दिवस होता. आई स्वयंपाकघरात सकाळच्या चहासाठी दूध तापवत होती आणि बाबांचे लक्ष वर्तमानपत्रात होते. कोमलला दोघांच्याही स्वभावाचे बारीक निरीक्षण करून चांगलेच आकलन झालेले होते. आईला थोडं गोड बोललं की तिचं मन वितळतं, आणि बाबांना आईद्वारे थोडं इमोशनल केलं की ते "ठीक आहे" म्हणतात.

"आई..." कोमल आवाजात थोडा गोडवा आणत म्हणाली, "माझी सगळी मित्रमंडळी नवीन मोबाईलवरच असाइनमेंट आणि क्लासचे नोट्स शेअर करतात. माझा मोबाईल इतका स्लो आहे की मी मागेच पडतेय."

आईने थोडं दुर्लक्ष करत विचारलं, "पुन्हा मोबाईलचं चालू केलंस? मागच्यावेळी घेतलाय तो दोन वर्षं सुद्धा झाले नाहीत."

तेवढ्यात कोमलने गालावर हात ठेवून थोडंसं खोटं खोटं उदास होऊन म्हटलं, "तुमचं आणि बाबांचं प्रेम फक्त माझ्या भावासाठी असतं. त्याच्यासाठी नवीन बाईक, नवीन गेम… पण माझ्या गरजा नेहमी मागेच पडतात."

हे ऐकताच आईचं मन थोडं हेलावलं. ती काही बोलणार इतक्यात कोमलने जास्तीची शाब्दिक ताकद वापरली.

"ठीक आहे, नका घेऊन देऊ. मीच मागे राहीन. परीक्षेत कमी मार्क पडले तर म्हणू नका 'तू मेहनत केली नाहीस.' मला सगळं जुनेच चालेल…"

तेव्हा आई म्हणाली, " अहो, ऐकलत का? आपली कोमल म्हणतेय की...!"

हे ऐकून बाबांनी पेपर खाली ठेवला आणि थोडा विचार करत म्हणाले, "ठीक आहे, पाहूया एखादा परवडणारा मोबाईल. पण कोमल, तू मात्र अभ्यास कमी नाही करायचा."

कोमलचा चेहरा लगेच खुलला. तिची 'शक्कल' यशस्वी झाली होती. आई-बाबांचे स्वभाव तिला पाठ होते. एक गोड बोलून वश, आणि दुसरा एकाकडून थोडा भावनिक ब्लॅकमेलला शरण.

तिची एक जीवलग मैत्रिणी होती रेणुका. कोमलला प्रत्येक गोष्टीत ती साथ देत असे. जिथे कोमलचे नुकसान होत आहे असे वाटेल तिथे ती आपण होऊन मार्गातून बाजूला होऊन जात असे. तिची आर्थिक परिस्थिती थोडी खराब होती त्यामुळे कोमलने तिला स्वतःच्या पॉकेटमनी मधून घरी आई-वडिलांना न सांगता नेहेमी खूप मदत केली होती. त्यासाठी तिने स्वतःचा खर्च बरेचदा कमी केला. पण तो भरून काढण्यासाठी वर्गातल्या इतर मुलींची छुपी प्रेम प्रकरणं ती रेणुकेच्या मदतीने गुप्तपणे जाणून घेत असे आणि त्यांचे बींग फोडू नये म्हणून त्यांच्याकडून अनेक गोष्टी जसे वह्या, पुस्तके, पैसे, नाश्ता, जेवण असे वसूल करत असे. अगदी नाहीच काही तर त्यांच्याकडून ती आणि रेणुका आपले होमवर्क आणि इतर छोटी मोठी करून घेत असत.

कोमल अभ्यासात बऱ्यापैकी हुशार होती. तसेच ती विविध खेळांमध्ये सुद्धा पुढे होती. अगदीच पहिली येत नसली तरी तिसरी चौथी तर ती नक्कीच येत होती. बॅडमिंटन, टेनिस, क्रिकेट, खो खो, रनिंग, सायकल रेस, स्विमिंग असे तिचे आवडते खेळ होते. विनोद हा कोमल वर एकतर्फी प्रेम करत होता. अर्थात त्या वयात खरे प्रेम काय याची जाणीव नसते तरीही त्याला कोमल आवडायची. मग ते शारीरिक आकर्षण म्हणा किंवा इतर काही. बोलताना तिची केस मागे झटकायची सवय, डोळे मोठे करून आत्मविश्वासाने कमरेवर कधी एक तर कधी दोन्ही हात ठेवून बोलण्याची तिची सवय, याकडे बघतच राहावे ती त्याला वाटायचे. कोमल जोशी मोठी होत गेली तसे शारीरिक दृष्ट्या ती जास्त तंदुरुस्त होत गेली आणि लवकर वयात आली. कोमलला विनोदची नजर जाणवत होती. त्याच्या नजरेतले प्रेम तिने ओळखले परंतु तिने जाणून-बुजून त्याला कधी प्रतिसाद दिला नाही. एक दोनदा एकमेकांची नजरानजर होऊन स्माईलचे आदान प्रदान व्हायचे पण त्या पलीकडे काही नाही. खरे तर आपल्या बोल्ड स्वभावाच्या विरुद्ध विनोद सारखा शांत आज्ञाधारक मनमिळाऊ मुलगा जोडीदार म्हणून चांगला आहे असे तिला मनातून थोडे थोडे वाटत होते कारण तो नेहेमी आपले ऐकेल असे ती वाटत होते. तिच्या मनात विनोदबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार झालेला होता परंतु एवढ्या लवकर त्याच्या प्रेमाचा स्वीकार करणं म्हणजे स्वतःची किंमत कमी करून घेणं असे तिला वाटले.

वर्गातील काही गुंड प्रवृत्तीची, वयाआधीच वयात आलेली आणि धीट मुलं कोमलच्या सौंदर्यावर नेहेमी नजर ठेवून होते. एके दिवशी शाळेच्या बिल्डिंगच्या पाठीमागे थोडा एकांत साधून संध्याकाळी जगदीश नावाच्या मुलाने ती बेसावध असताना तिचा हात धरला, तेव्हा दुसऱ्या हाताने तिने त्याच्या जोरदार थोबाडीत लगावून दिली. पुन्हा त्याने तिच्याकडे वाकड्या तर सोडा, सरळ नजरेने सुद्धा बघण्याची हिंमत केली नाही. दूरवर आडोशाला लपलेली जगदीशाची काही मित्रमंडळी हे बघून पळून गेले. बहुतेक पुरुष हे स्त्रियांच्या सौंदर्याचे चाहते असतात आणि ते मिळवण्यासाठी ते काहीही करू शकतात हे स्त्रियांच्या अंगी असणाऱ्या उपजत शक्तीमुळे तसेच इंटरनेट आणि सोशल मीडिया वरील स्त्रोताद्वारे आणि मित्र मैत्रिणींमध्ये होणाऱ्या गप्पांद्वारें कोमलला आता चांगलेच कळून चुकले होते.

आता शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचा दिवस उजाडला होता. मैदान रंगीबेरंगी झेंडूंच्या फुलांनी सजले होते. मुला-मुलींच्या विविध शर्यती सुरू होत्या. त्यातच सर्वात जास्त लक्ष वेधणारी स्पर्धा होती: मुलींची सायकल रेस! मुलींबरोबरच वर्गातील काही मुलंही ही मुलींची रेस बघायला अति उत्साही बनली होती. सायकल रेसमध्ये शाळेतील दोन नामांकित स्पर्धक मुली, पल्लवी आणि जान्हवी, एकमेकींना चांगली टक्कर देणार होत्या. पण स्पर्धा सुरू होण्याआधीच दोघींचं काहीतरी कारणावरून वाद झाला. पल्लवीने जान्हवीवर तिची सायकल प्रॅक्टीस सुरू होण्याआधी ढकलून देऊन खराब करण्याचा आरोप केला, तर जान्हवीने पल्लवीवर एकदा प्रॅक्टीसच्या वेळेस तिचा वेग कमी करण्यासाठी तिला पायाने धक्का दिल्याचं सांगितलं. मात्र या दोघींच्या नेहमीच्या वादाचा फायदा घेऊन यावेळेस दोघींमध्ये वाद पेटवणारी त्रिशा ही तिसरीच मुलगी होती याचे कोमलने निरीक्षण केले होते. शिक्षकही गोंधळात पडले. अशा वेळी पुन्हा दोघींसमोर आली कोमल. ती सुद्धा या रेस मधली एक स्पर्धक होती. मात्र तिचं लक्ष नेहमी न्याय व सौहार्द टिकवण्यात असायचं.

त्रिशाकडे तिरपा कटाक्ष टाकत कोमल त्या दोघींना म्हणाली, "आपण इथे एकमेकींशी भांडायला नाही, तर आपली क्षमता दाखवायला आलो आहोत. आपण जिंकलो किंवा हरलो तरी एकत्र राहिलो आणि हसलो खेळलो पाहिजे. सायकल रेस ही केवळ एक शर्यत नाही, तर आपल्यातील एकोपा, सहकार्य आणि सहिष्णुतेची कसोटी आहे. आपण खेळाडू आहोत आणि खेळ खेळायला आला होता सर्व काही खेळाडू वृत्तीने घ्यायला हवे. आपली शाळा सुद्धा आपल्याकडून याचीच अपेक्षा करते. शिक्षण संपल्यानंतर या जगात वावरताना सुद्धा आपल्याला या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे!"

कोमलच्या शब्दांत इतकी जादू होती की पल्लवी आणि जान्हवी शांत झाल्या. दोघींनी एकमेकींची सायकल तपासली, समजून घेतलं आणि पुन्हा एकत्रपणे रेससाठी सज्ज झाल्या. नंतर त्रिशाला एकटीला गाठून तिने सांगितले, "हे बघ. या दोघींच्या भांडणामध्ये तू आहेस हे मला माहित आहे. त्या दोन्ही चांगल्या रेस खेळतात. मागच्या वेळेस तू तिसरी आली होतीस. यावेळेस दोघींमध्ये भांडणं लावून आपले दोन स्पर्धक बाजूला काढायचे म्हणजे तुझा जिंकण्याचा चान्स वाढेल असा तुझा प्लॅन होता. पण ऐक. असे करून जिंकून काहीच फायदा नाही. यात तू स्वतःला फसवते आहेस. बाकी काही नाही. परंतु मी सर्वांसमोर तुझे नाव घेतले नाही. आता माझे ऐक. असे वागणे सोडून दे. असे वागून आयुष्यात काहीच साध्य होणार नाही हे लक्षात ठेव."

रेस झाली. तिघींनी कृतज्ञता म्हणून कोमलसाठी वाट मोकळी करून दिली आणि कोमल रेस जिंकली. कोण जिंकलं, हे महत्त्वाचं नव्हतं. महत्त्वाचं होतं कोमलचं नेतृत्व, तिचं शांत, पण प्रभावी बोलणं, ज्यामुळे एक मोठा वाद मिटला. कोमलला ट्रॉफी मिळाली. तिने ती उंचावून तिघींकडे नजर टाकली. गॅदरिंगमध्ये भाषण देताना कोमलला स्टेजवर बोलावून तिचा विशेष उल्लेख करतांना मुख्याध्यापिका मालदीवे मॅडम म्हणाल्या, "ही कोमल एक दिवस नक्कीच एक चांगली मोठी लीडर, मॅनेजर, पीपल मॅनेजर अथवा एक चांगली एचआर किंवा राजकारणी नक्की बनेल. ती लोकांना समजून घेईल, वाद मिटवेल, आणि एक चांगलं वातावरण निर्माण करेल."

शिक्षकांच्या स्तुतीने कोमल आता पूर्वीसारखी लाजली नव्हती कारण ती जास्त बोल्ड झालेली होती. ती म्हणजे एक मनस्वी, मनासारखे वागणारी आणि स्वच्छंदी प्रकारची मुलगी झाली होती.

प्रकरण 3

मालदीवे मॅडमने सांगितल्यानुसार कोमलने पुढे नवी मुंबई येथील रमणलाल बजाज युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट, मॅनेजमेंट एंड इंजिनियरिंग (RBUAME) या भव्य आणि प्रसिद्ध कॉलेजात BBA (HR) ला ऍडमिशन घेतली. तिला क्लासमध्ये सगळे "स्मार्ट लिडर" म्हणून ओळखायचे. तिची एक ठाम शैली होती – कोणावरही ओरडायचं नाही, पण योग्य वेळी योग्य शब्द वापरून सगळ्यांचं लक्ष आपल्या विचारांकडे खेचायचं.

सर्व शाखेचे कॉलेजेस, ऑडिटोरियम, क्रीडांगण, हॉटेल्स हे एकच प्रांगणात भव्य रीतीने उभारलेले होते. कोमल लेडीज हॉस्टेलवर रहात होती. त्याच कॉलेजात मेकॅनिकल इंजिनियरिंग शाखेत विनोदने ऍडमिशन घेतली होती, त्यामागे कोमल हे एक कारण होतेच. विनोदला मेकॅनिकल क्षेत्राची मनापासून आवड होती. कॅम्पसमध्ये अधूनमधून त्याची नजरानजर, हाय, हॅलो व्हायचे. तो रोज घरून बाईकवर अपडाऊन करायचा. विनोदला समाजसेवेची सुद्धा आवड होती. कॉलेजतर्फे होणाऱ्या सोशल रिस्पॉन्सिबीलिटी प्रोजेक्ट्समध्ये तो आवर्जून भाग घ्यायचा. रेणुकाने सुद्धा त्याच कॉलेजमध्ये आर्ट शाखेत ऍडमिशन घेतली. ती हॉटेलमध्ये कोमलची रूम मेट होती. पल्लवी आणि जान्हवी या दोघींनी सुद्धा त्याच कॉलेज मध्ये आर्टला ऍडमिशन घेतली.

त्याच कॉलेजात कॉम्प्युटर इंजिनियरिंगला ऋषभ आणि कौस्तुभ ही दोन मुलं शिकत होती. मुलांचा सर्वांनी विकास होण्यासाठी त्यांच्यातील खिलाडू वृत्ती विकसित होऊन आयुष्यातील पुढील आव्हानांसाठी ती तशीच टिकवण्यासाठी सर्व शाखेच्या मिळून विविध क्रीडा स्पर्धा व्हायच्या. कोमल असल्यामुळे विनोद त्या स्पर्धांना आवर्जून बघायला प्रेक्षक म्हणून जायचा. ऋषभ आणि कौस्तुभ हे सुद्धा या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे.

कॉलेजमध्ये मुलं-मुलींची एकत्रित बॅडमिंटन डबल स्पर्धा रंगात आली होती. प्रेक्षकांच्या जल्लोषात, एका बाजूला कौस्तुभ आणि ऋषभ तर दुसऱ्या बाजूला कोमल आणि मधुरा उतरले होते. सामना सुरू होण्याआधीच खेळाडूंमध्ये थोडंसं खोडकर हास्य, आणि एकमेकांची चोरटी निरीक्षणं सुरु झाली होती.

कोमलची खेळातील नजाकत, तिचा आत्मविश्वास आणि प्रत्येक चुकलेल्या शॉटनंतरही चेहऱ्यावर उमटणारं हलकंसं हास्य ऋषभ आणि कौस्तुभला नकळत भुरळ घालत होतं.

एक प्रसंग लक्षात घेण्याजोगा होता – मधुराचा एक शॉट नेटवर अडला आणि कोमलने क्षणाचाही विलंब न करता मागून पुढे सरकत तो शॉट सांभाळला. त्या क्षणी ऋषभला तिचा वेग, चपळाई आणि समोरच्या संकटाला तोंड देण्याची तयारी आवडली. त्याने नकळत कौस्तुभकडे पाहून हसत म्हटलं, “ती खरंच कमाल आहे, नाही का?”

कौस्तुभही गप्प बसला नाही. थोड्यावेळाने कोमलने त्याच्यावर एक स्मॅश मारला, आणि तो चुकवता चुकवता नेटवर कोसळला. प्रेक्षक हसले, पण कोमल धावत त्याच्याकडे आली आणि म्हणाली, “सॉरी, फार जोरात मारला गेला… ओके आहेस ना?” तिचा काळजीचा सूर, डोळ्यांतली खंत पाहून कौस्तुभ क्षणभर हरवून गेला. तो फक्त हसून ‘हो हो, तूच जिंकणार आहेस बहुतेक’ इतकंच म्हणाला.

सामना पुढे सरकत गेला, पण ऋषभ आणि कौस्तुभच्या मनात कोमलची एक वेगळीच प्रतिमा तयार होत गेली. एक अशी मुलगी जी खेळात निपुण आहे, पण त्याहूनही अधिक, समंजस, मनमिळावू आणि दिलखुलास!

मॅच संपली, दोन्ही बाजूंनी हातमिळवणी झाली. ऋषभने सहज विचारलं, “कोमल, कधी एकत्र प्रॅक्टिस केली तर चालेल का?”
कोमलने गोड हसून संमतीदर्शक मान हलवली. त्या हसण्यामध्ये ऋषभला काही तरी वेगळंच दिसलं, कदाचित, प्रेमाची पहिली चाहूल?

कॉलेजतर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाली होती. सकाळची वेळ होती आणि, हवेत उत्साह आणि गर्दीत चैतन्य ओसंडून वाहत होतं. सर्व धावपटू आपापल्या क्षमतेनुसार पावलं टाकत होते. कोमलही त्यातलीच एक, आत्मविश्वासाने भरलेली, जिद्दीने धावत होती. रेणुकाने पण कोमलसाठी त्यात भाग घेतला होता. ती मात्र बरीच माग पडली होती.

पण स्पर्धा सुरू होऊन काही वेळातच, एका वळणावर तिचा पाय चुकला, मुरगळला आणि ती जोरात जमिनीवर आपटली. तिच्या गुडघ्याला ठेच लागली होती, हातावर ओरखडे उठले होते. ती जमिनीवर बसून वेदनेने डोळे मिटून तडफडत होती. तिच्या डोळ्यात वेदनेने अश्रू आले. तिचा श्वासोच्छ्वासही वेगाने चालू होता ते पाहिले तर कोमल खूप धीट मुलगी होती परंतु आता मात्र तिला रडू येत होते.

हे सगळं काही जवळच उभा असलेला विनोद, जो स्वयंसेवक म्हणून त्या स्पर्धेत मदतकार्य करत होता, त्याने पाहिलं. तो क्षणाचाही विलंब न करता तात्काळ तिच्या जवळ धावला.

"कोमल, शांत हो... मी इथे आहे," असं म्हणत त्याने तिच्या गुडघ्याची अवस्था पाहिली. त्याने स्वतःच्या मदतीच्या किटमधून प्रथमोपचाराची वस्तू काढली. तो अतिशय काळजीपूर्वकपणे तिच्या गुडघ्यावर अँटीसेप्टिक लावू लागला, आणि कापडाने जखम स्वच्छ करत बँडेज बांधलं. तो तिच्याकडे हळूच एक चोरटी नजर टाकत होता. कोमलला जाणवले की तो नजर तिच्या शरीराच्या सौंदर्याला भाळून तिच्याकडे रोखली गेली नव्हती तर त्या नजरेत काळजी, प्रेम, माया आणि आपुलकी होती.

"पाणी पितेस का?" असं विचारून त्याने तिच्या ओठांना पाण्याची बाटली धरली. कोमलचं डोळ्यांतून अश्रू वाहणं थांबलेलं नव्हतं, पण तिच्या चेहऱ्यावर थोडं हसू फुटलं.

विनोदने पुढे स्पर्धेच्या आयोजकांना सूचना दिली आणि कोमलला सावकाश उठवून विश्रांतीसाठी बाजूला नेलं. तिच्या चेहऱ्यावर असलेली काळजी आता थोडी निवळली होती, कारण त्या क्षणी तिच्यासाठी विनोद कोणी तरी खास होता.

कॉलेजचे बॅडमिंटन सामने कधीच संपले होते, पण त्या स्पर्धेने निर्माण केलेल्या आठवणी अजूनही ताज्या होत्या. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने कोमल आणि ऋषभ पुन्हा भेटले. त्या छोट्या-छोट्या गप्पा, हास्यविनोद, आणि एकत्र घालवलेला वेळ! या साऱ्यांनी कोमलच्या मनात ऋषभसाठी एक खास जागा निर्माण केली होती.

ती ऋषभच्या संयमी स्वभावाने, त्याच्या समजूतदार वागणुकीने आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीत असलेल्या निखळ रसग्रहण करण्याच्या वृत्तीने प्रभावित होत होती. ऋषभ फारसा बोलत नसे, पण जेव्हा बोलायचा, तेव्हा ती लक्षपूर्वक ऐकत असे. तिचं मन सांगू लागलं होतं, "हाच आहे तो… ज्याच्यासोबत मला वेळ घालवावा वाटतो."

पण दुसरीकडे तिला विनोदबद्दलही आत्मीयता वाटायला लागली होती. मॅरेथॉनच्या दिवशीआपली एवढी काळजी घेऊन सुद्धा त्याने नंतर कधी बोलून दाखवलं नाही किंवा त्याचा फायदा घेऊन आपल्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला नाही. मला कसा जीवनसाथी हवा आहे? रात्री झोपताना ती विचार करत बसायची. रेणुकाला तिने याबद्दल थोडीफार कल्पना दिली होती परंतु अजून तिचे मत विचारले नव्हते.

मात्र हे सगळं मनात सुरू असतानाच, एक दिवस एक वेगळाच प्रसंग घडला.

कोमल एका सायंकाळी लायब्ररीतून बाहेर पडत होती. तेव्हाच कौस्तुभने तिला थांबवले. तो थोडासा घाईघाईत दिसला, पण त्याच्या डोळ्यांत एक ठाम निश्चय दिसत होता.

"कोमल, मला तुझ्याशी थोडं खास बोलायचं आहे," असं म्हणत त्याने थेट विषयाला हात घातला.

"मी थेट सांगतो… मला तू खूप आवडतेस. त्या बॅडमिंटनच्या दिवशीपासून माझं लक्ष तुझ्यावरच आहे. तू वेगळी आहेस. खूप वेगळी. इतर मुलींपेक्षा! तुझं हसणं, तुझं वागणं, सगळं… मी खरंच तुला पसंत करतो. मी तुला आयुष्यभर सुखात ठेवीन. नवी मुंबईत आमचा एक फ्लॅट आहे. माझ्या वडिलांचा मूळ गावी मोठा बिझनेस आहे!"

त्याच वेळेस नेमका ऋषभ तिथे आला परंतु या दोघांना आडोशाला गेलेले बघून एका झाडामागे लपून दोघांचे बोलणे ऐकू लागला.

कौस्तुभचे बोलणे ऐकून कोमल स्तब्ध झाली. ती क्षणभर काहीच बोलू शकली नाही. तिच्या मनात ऋषभसाठी सध्या निर्माण होत असलेल्या भावना तिला आठवल्या आणि ती गोंधळून गेली. कौस्तुभचा हा धीटपण, स्पष्ट बोलणं हे तिच्यासाठी खुप अनपेक्षित आणि अचानक होतं.

"कौस्तुभ… मी तुला खरंच खूप मानते, तू चांगला मित्र आहेस… पण मला वेळ हवा आहे. माझं मन अजून या बाबतीत तयार झालेलं नाही." असं ती हळू आवाजात म्हणाली आणि तिने कटाक्षाने आणि शिताफीने ऋषभचा उल्लेख टाळला.

त्या क्षणी तिच्या डोळ्यांसमोर मात्र ऋषभचा शांत चेहरा आणि त्याचं प्रत्येक वेळेला दिलेली हळुवार, पण भावनिक साथ आठवू लागली. तसेच मनाच्या एका कोपऱ्यात बसलेला विनोद आठवला. त्या उलट कौस्तुभ हा थोडा धीट, बोल्ड आणि मुलींमध्ये जास्त वावरणारा आणि बेफिकीर वृत्तीचा होता. नियमित जिम मध्ये जाऊन त्याने बॉडी कमावलेली होती.

कोमल आता एका भावनिक वळणावर उभी होती. जिथे एक बाजूने धीटपणाने व्यक्त झालेलं प्रेम होतं, आणि दुसऱ्या बाजूला हळूहळू मनात खोलवर रुजत चाललेली नजरेआडची भावना.

"मला वेळ हवा आहे!" एवढेच बोलून ती निघून गेली. कौस्तुभ सुद्धा पुन्हा लायब्ररीत निघून गेला.

ऋषभ आश्चर्याने तिथेच झाडाच्या बाजूला उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते.

काही दिवस तिघेही एकमेकांना टाळू लागले. एकमेकांना मेसेजही करणे बंद केले. ऋषभने कौस्तुभ सोबतचे आपले बोलणे ऐकले हे कोमलला माहिती नव्हते. त्यामुळे ऋषभ आपल्याला का टाळतो आहे हे तिला समजत नव्हते. आणि कौस्तुभचे प्रपोज अजून स्वीकारले नसल्याने तोही कोमल सोबत तुटक वागत होता. पण म्हणून त्याने फारसे टेन्शन घेतले नाही आणि तो इतर मुलींच्या घोळक्यात नेहमीप्रमाणे रमत गेला. त्याला विविध मैत्रिणी मिळत गेल्या आणि त्यांच्याशी तो आरामात हसत खिदळत राहिला. ऋषभने मात्र 'कौस्तुभचे कोमलला प्रपोज' गोष्ट फार मनावर घेतली होती. तो विचार करत बसायचा पण कोमलला याबद्दल काही विचारण्याची त्याची हिंमत होत नव्हती.

अधून मधून फक्त विनोदशी कोमल बोलत होती. पण मग नंतर आपापल्या परीक्षांमध्ये सगळेजण बिझी झाले. शेवटी आयुष्यात फक्त प्रेम हेच सर्व काही नाही. आयुष्यात प्रत्येकाला आपले करिअर घडवायचे होते कारण प्रेम काही त्यांना पुढे आयुष्यभर खायला प्यायला घालणार नव्हते.

एकदा ऋषभ त्याच्या कोमलबद्दलच्या प्रेमभावना त्याच्या एका मित्राकडे म्हणजे निखिलकडे व्यक्त करत असतांना ते रेणुकाने ऐकले आणि कोमलला जाऊन सांगितले. मग कोमलने रेणुकाशी एकूणच सर्व प्रेम प्रकरणाबद्दल चर्चा केली.

पूर्वीसुद्धा ज्या प्रकारे कोमलने शाळेत आणि कॉलेजमध्ये अनेक प्रसंगात लीडरशिप घेऊन विविध व्यक्तींमध्ये समेट घडवून आणला होता आणि विविध व्यक्तींसंदर्भात अनेक निर्णय घेतले होते, त्या प्रकारे आता तिला तिच्या स्वतःच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींमध्ये निवड करण्याचे आव्हान होते. त्यासाठी तिने एक तटस्थ व्यक्ती म्हणून या सर्व प्रकाराकडे बघायचे ठरवले.

मग कोमलने नीट विचार करून एक निर्णय मनाशी पक्का करून टाकला होता. फक्त तो निर्णय सांगण्यासाठी ती योग्य संधीची वाट बघत होती.

शेवटी ती संधी आली.

आपापल्या परीक्षा झाल्यानंतर पदवीदान समारंभात कॉलेजतर्फे लंच बुफे साठी सगळे एकत्र जमले. टेबलांवर चटपटीत पदार्थ मांडलेले होते. स्टाफ आणि विद्यार्थी गर्दीत गप्पा मारत जेवत होते. पल्लवी आणि जान्हवी, तसेच रेणुका सुद्धा तिथे आनंदाने जेवण करत होत्या. कोमल, ऋषभ, आणि कौस्तुभ जेवण आपापल्या प्लेट मध्ये वाढून घेत होते.

विनोदने मात्र त्याची नेहमीची सेवाभाव वृत्ती जपत तिथे सर्वांना मदत करण्याची भूमिका घेतली होती. तो अजून नंतर जेवणार होता. आता यापुढे आयुष्यात लवकर भेट होणार की नाही या अनिश्चिततेमुळे एकमेकांशी आता बोलणे भाग होते.

या जेवण समारंभात पारंपरिक पोशाख ही थीम होती. कोमलने घातलेल्या ठिपकेदार निळ्या साडीत, आणि स्लिव्हलेस ब्लॅक सिल्की ब्लाऊजमध्ये ती एकदम सुंदर आणि आकर्षक दिसत होती. कौस्तुभ आणि ऋषभ काहीही असले तरी तिच्याकडे आकर्षले जात होते आणि तिचा सहवास आज थोडा का होईना, त्यांना हवा होता.

कौस्तुभ थोडे अवघडल्यासारखे तोंड करून हसत म्हणाला, "हे बघ, हे बारबेक्यू पनीर खूप छान आहे! कोमल, तुला नाही आवडत का?"

कोमल शांत आणि जमिनीकडे नजर करत म्हणाली, "नको मला! आज फार काही खाण्याची इच्छा नाहीय!

ऋषभ काळजीने म्हणाला, "सगळं ठीक आहे ना? मला वाटतंय की तू नाराज दिसतेस!"

कोमल थोडा श्वास घेत म्हणाली, "हो… खरं तर मला तुम्हा दोघांशी बोलायचं होतंच… पण कधी आणि कसं सांगू समजत नव्हतं"

क्षणभर शांतता पसरली. दोघंही तिच्याकडे बघू लागले. आता ही नेमका कोणता विषय काढते?

कोमल हळू आवाजात बोलू लागली, "ऋषभ… तुझ्यासोबत वेळ घालवताना मला खूप आपलेपणा वाटला. तुला माझ्या मनातलं सगळं समजतं, तू समजून घेतोस… पण हे प्रेम नाहीय, हे मला उशिरा का होईना, समजलं!"

ऋषभने स्तब्ध होऊन विचारले, " म्ह... म्हणजे? मी समजलो नाही!"

कारण त्याने डायरेक्ट त्याची प्रेमभावना तिच्याकडे कधी व्यक्त तर केली नव्हती, मग ही असे का म्हणते आहे?

पण, तिचे बोलणे ऐकून त्याच्या मनात कुठेतरी पुन्हा आशा निर्माण झाली.

कोमल पुढे म्हणाली, "मला माहित आहे तू ही माझ्यावर प्रेम करतोस!"

ऋषभ खोटेपणाचा आव आणत म्हणाला, " मी ही म्हणजे? मी तर तुला तसे स्पष्ट कधीही बोललो नाही. आणि माझ्या व्यतिरिक्त तो दु... दुसरा कोण?"

आतापर्यंत कौस्तुभ फक्त हातात ताट घेऊन हे संभाषण ऐकत होता.

कोमलने सांगितले, "हे बघ ऋषभ. तू तुझ्या माझ्याबद्दलचे प्रेम भावना निखिलकडे व्यक्त केली आहे ते मला माहिती आहे!"

थोडा वेळ शांतता पसरली. निखिल आणि कोमल यांचा जास्त कॉन्टॅक्ट नाही तरीही हिला कसे कळले? जाऊ दे. शेवटी ती कुणी साधीसुधी मुलगी नाही, ती कोमल आहे, कोमल!

कोमल पुढे म्हणाली, "हे बघ ऋषभ, तुझा सहवास आपुलकीचा होता, पण प्रेमाचा नव्हता. निदान माझ्या दृष्टीने तरी! आणि तुझ्या माहितीसाठी सांगते की तो दुसरा म्हणजे हा कौस्तुभ आहे, ज्याने मला पूर्वी प्रपोज केले होते पण मी त्याला अजून हो म्हणाले नव्हते…"

खरे तर ही गोष्ट ऋषभला माहिती होती परंतु त्याने चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव मुद्दाम आणले. कौस्तुभच्या ही चेहऱ्यावर आश्चर्याचे आणि उत्सुकतेचे भाव होते की, कदाचित ही आपल्या प्रपोजचे आज उत्तर देईल आणि मला हो म्हणेल? मला चालेल की! हिच्या बदल्यात इतर सर्व फटाकड्या मुली सोडाव्या लागल्या तरी काही पश्र्चाताप नाही! शेवटी मला कुणी साधी पोरगी नाही, कोमल मिळेल! कोमल! त्याच्या मनात उकळ्या फुटू लागल्या.

काही वेळ तिथे शांतता पसरली. पुढे कोमल म्हणाली, "पण मी ठरवले आहे की कौस्तुभ पण माझ्यासाठी योग्य नाही. मला कळतंय की मला ज्याच्याबद्दल खरं प्रेम आहे. तो जसा आहे, तसा बोलतो, तसा मला समजून घेतो… मला वाटतं, तोच माझा जीवनसाथी असावा. आणि तो म्हणजे... विनोद!"

कौस्तुभच्या चेहऱ्यावरची उत्सुकता नाराजीत बदलली, "अरे वा! छान जीवनसाथी निवडला. म्हणजे आपल्याला अन्न वाढतोय तो विनोद? चांगला नंबर लागलेला दिसतो त्याचा. काय जादू केली त्याने तुझ्यावर काय माहित?"

आतापर्यंत कौस्तुभसाठी मनात जळफाट असणारा ऋषभ, कौस्तुभलाही कोमल न मिळाल्यामुळे थोडा सुखावला, परंतु ती स्वतःला न मिळाल्यामुळे दुखावला सुद्धा!

कोमल म्हणाली ,"हे बघ विनोदला उलट सुलट बोलण्याची गरज नाही. मी त्याला निवडले आहे हे लक्षात ठेव!"

कौस्तुभ चिडून म्हणाला, "तुला हे सांगण्यासाठी आजचा दिवस मिळाला? इतक्या चांगल्या दिवसाचा आणि जेवणाचा कचरा केला? काय पाहिले तू त्या ते विनोदमध्ये? बुजगावणे आहे नुसता. तुला तुझ्या बोटाच्या इशाऱ्यावर नाचणारा बाहुला हवा असेल, म्हणून बहुतेक तू अशा येड्याला निवडलं!"

ऋषभ कोमलच्या तोंडावर स्पष्ट बोलून गेला.

कोमल रागाने म्हणाली, "स्टॉप इट कौस्तुभ. यापुढे एकही शब्द बोलू नकोस! गेट अवे फ्रॉम हिअर!"

हा चढा आवाज ऐकून रेणुका दुरून तिघांकडे बघू लागली परंतु तिला कल्पना आली की तिथे नेमके काय चालले असेल आणि कोमल हे सर्व हॅण्डल करायला नक्की समर्थ आहे याची तिला खात्री होती.

कौस्तुभ तिथून पाय आपटत निघून गेल्यानंतर ऋषभ म्हणाला, "ठीक आहे कोमल शेवटी निर्णय तुझा होता तो तू घेतलास. बेस्ट ऑफ लक!"

ऋषभने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, परंतु तो कौस्तुभ पेक्षा तो जास्त मनातून दुखावला गेला होता. तोही तिथून हळूच निघून गेला परंतु त्याच्या गालावर अश्रू ओघळत होते.

त्यानंतर विनोद तिच्या जवळ आला कारण विनोदला तिने दोन दिवसापूर्वीच तिचा हा निर्णय सांगितला होता.

शेवटी संध्याकाळी सर्वजण एकमेकांचे निरोप घेत असताना कौस्तुभ थोड्या वेळासाठी कोमल जवळ आला आणि त्याने तिच्याकडे चिडून रागात बोललेल्या शब्दांबद्दल माफी मागितली.

ती माफी मनापासून होती की नाही हे मात्र कोमलला समजले नाही.
आता सर्वजण खऱ्या जगात, आपापल्या आयुष्यात आपल्या करिअरला आकार देणार होते.

तिघांनी एकमेकांना फ्रेंड म्हणून पुढेही टच मध्ये राहा असे सांगितले खरे, पण मनातून तिघांनी ठरवले की, भविष्यात आता एकमेकांना भेटायचे नाही. कधीही नाही!

पण त्या तिघांनाही हे कुठे माहिती होते की, नियती त्यांना आयुष्याच्या एका वळणावर पुन्हा एकत्र आणणार आहे?

प्रकरण 4

ऋषभला अंधेरी येथील सनराइज् सॉफ्टवेअर कंपनीत प्रोग्रामर म्हणून नोकरी मिळाली. त्याचे चांगले काम पाहून एका वर्षानंतर त्याला टीम लीडर बनवण्यात आले.

नवीन प्रोजेक्ट संदर्भात मोठ्या कॉन्फरन्स रूममध्ये प्रेझेंटेशन सुरू होते. टीम मधील एक मेंबर गौतमी तिच्या मागील प्रोजेक्टबद्दल बोलत होती. तिला इतर टीम मेंबर्स पेक्षा जास्त अनुभव होता.

गौतमी त्या दिवशी नेव्ही ब्लू फॉर्मल शर्ट आणि पेस्टल ग्रे पेन्सिल फिट ट्राउझर्स मध्ये अगदी प्रोफेशनल दिसत होती. शर्टचा कॉलर नीट प्रेस केलेला, बाह्या अर्धवट फोल्ड केलेल्या! जणू “मी कामावर संपूर्ण विश्वास ठेवते” हेच त्यातून दिसत होते. कानात छोटे स्टड्स घातलेले होते. तिची एकूण फिगर अगदी उठावदार आणि आकर्षक दिसत होती.

ती प्रोजेक्टर समोर उभी होती. एक हात टेबलावर टेकलेला, दुसऱ्या हाताने पॉइंटर हलवत ती सॉफ्टवेअर प्रोग्रॅमचा फ्लो समजावत होती. ती बोलताना नजर थेट समोरच्या व्यक्तीकडे ठेवत होती आणि तिचं बोलणं स्पष्ट, संयत आणि मुद्देसूद होतं.

“तर अशी ही एपीआय मी डिझाईन केली आहे. तुम्हाला काही शंका असतील तर विचारा!"

ऋषभने तिची परीक्षा घेण्यासाठी तिला मुद्दाम विचारले, “पण या एपीआयचा रिस्पॉन्स स्ट्रक्चर थोडा कॉम्प्लेक्स वाटतोय... हे आणखी सोप्या पद्धतीने लिहिता आले असते."

गौतमी आत्मविश्वासाने पण आदराने स्मितहास्य करून म्हणाली, “सर, कधी कधी कॉम्प्लेक्स गोष्टीही खूप आल्हाददायी असतात. फ्युचर एक्स्पानशनचा विचार केल्याने ते कॉम्प्लेक्स झाले आहे. पूर्वीच्या अनुभवानुसार ह्या कस्टमरच्या अपेक्षा सतत बदलत असतात. म्हणून आधीच त्याची सोय मी त्यात करून ठेवली आहे. वाटल्यास मी तुम्हाला डिटेल समजावून सांगते, सर!"

ऋषभला या उत्तरातून जाणवले की या कामासाठी ही अगदी योग्य मेंबर आहे.

ऋषभ म्हणाला, "ठीक आहे गौतमी. तुम्ही ते आता नाही एक्सप्लेन केला तरी चालेल. मला ईमेलवर सविस्तर रिपोर्ट पाठवा! मला फक्त एपीआय कॉम्प्लेक्स करण्यामागचे कारण जाणून घ्यायचे होते, ते तुम्ही सांगितले!"

दुसऱ्या आठवड्यात, ब्रेकमध्ये ऋषभ कँटीनमध्ये गेला तेव्हा गौतमी वाफाळत्या चहाचा मग हातात घेऊन एकटीच उभी होती. ती नेहेमीप्रमाणे अधिक आत्मविश्वासाने भरलेली दिसत होती. तिने हलकासा चारकोल ग्रे कुर्ता घातला होता. पुढे बारीक बटणे होती ज्यातून तिचे सौंदर्य आणखी उठावदारपणे दिसत होतं आणि तिच्या मनगटावर होता इस्पिक आकाराचा टॅटू! खाली तिने निळसर रंगाची प्लाझो पँट घातली होती, जी मंदपणे हेलकावत होती. केस अर्धवट मोकळे, अर्धवट अंबाड्यात गुंतवले होते. तो तिच्या व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वासाने खूप भारावून गेला होता. तिच्या चेहऱ्यावर एक खास चमक होती.

ऋषभला बघतच ती म्हणाली, "या ना सर! जॉईन मी फॉर टी!"

ऋषभने मशीनमधून कॉफी घेतली आणि तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला,"सर वगैरे नको. आपल्या वयात जास्त अंतर नाही. नाहीतरी आज काल आपल्या क्षेत्रात सर वगैरे म्हणत नाहीत. नावाने हाक मारतात. मला नुसतं ऋषभ म्हटलं तरी चालेल!"

तिने लगेच त्या गोष्टीचा पालन केलं आणि म्हणाली, "ठीक आहे. ऋषभ! मला तुम्ही सांगा की आणखी मला माझ्या कामात आणखी काय सुधारणा करता येईल?"

ऋषभ मिश्कीलपणे म्हणाला, “आधी तुम्ही पण चहा घ्या. थंड होतोय. गरमागरम घेतल्यास अजून चांगल्या कोडिंग आयडिया डोक्यात येतील तुमच्या.”

गौतमी मान थोडी खाली नेऊन खळाळून हसली आणि म्हणाली,“हो का? मी खरं तर जेव्हा सॉफ्टवेअर डीबग करायचे असते, त्याआधी चहा पिते.”

ऋषभ हसून म्हणाला, “हो ना? मग मी तुम्हाला दरवेळी कंपनी देईन, तुम्ही चहा प्या. मी कॉफी पीत जाईन. कॉफी पिली की मला तुमचे बनवलेले सॉफ्टवेअरचे टेस्टिंग आणि क्वालिटी कंट्रोल करायला उत्साह येईल, नाही का?”

दोघेही खळाळून हसले.

त्या दिवशी दोघं बराच वेळ बोलत बसले. आपापली आवडती प्रोग्रामिंग लँग्वेज, कामाची पद्धत, आणि थोडं थोडं स्वतःबद्दल!

हळूहळू कामाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या व्यक्तिगत जवळीक निर्माण होत होती. दोघांनाही ते जाणवत होते. फक्त दोघे सोबत असताना ते एकमेकांना एकेरी संबोधन करू लागले.

जून महिन्याच्या सुरुवातीला एकदा ऋषभच्या मॅनेजरने सर्व टीमला बेंगलोरला क्लाएंट लोकेशनवर महत्त्वाच्या रिक्वायरमेंट ॲनालिसिस साठी दोन आठवड्यांकरता पाठवले. क्लाएंट ऑफिसपासून साधारण सात किलोमीटर अंतरावर एका हॉटेलमध्ये सर्वांची राहण्याची व्यवस्था केली होती. एक आठवडा संपल्यानंतर शुक्रवारी कंपनीच्या वेबसाईटवर गौतमीचा वाढदिवस असल्याची सूचना आली.

त्यानुसार आठवणीने ऋषभ गौतमीला वाढदिवसासाठी रात्री बाहेर जेवायला घेऊन गेला.

नंतर ती तिच्या रूमवर गेल्यानंतर त्याने तिला इमेल पाठवून एका प्रोग्राम मध्ये एरर आहे का हे शोधायला सांगितले. तिने तो प्रोग्राम जेव्हा कॉम्पाइल करून रन केला तेव्हा त्या प्रोग्रामचे आउटपुट खालील प्रमाणे होते:

"You are the programming language of my life. Will you want to debug my life with your programming skills, forever?

(तू माझ्या जीवनाची प्रोग्रामिंग लँग्वेज आहेस. तुझ्या प्रोग्रामिंगच्या प्रतिभेचा वापर करून जीवनभर माझे आयुष्य त्रुटीरहित करत राहण्याची तुझी इच्छा आहे का?)

अशा अनोख्या क्रिएटिव्ह तरीही टेक्निकल पद्धतीने केलेले प्रपोज बघून गौतमीला हसू आवरले जात नव्हते. तिने आपले केस बोटांनी बाजूला सारून गालावर हात ठेवून मान तिरपी केली आणि कौतुकभरल्या नजरेने उत्तरादाखल एक नवीन प्रोग्राम लिहून पाठवला आणि इमेल मध्ये लिहिले, "या प्रोग्राम मधल्या त्रुटी दुरुस्त करून प्रोग्राम रन कर. त्यातच माझे उत्तर दडलेले आहे!"

त्याने काळजीपूर्वक प्रोग्राम मधील त्रुटी शोधली आणि प्रोग्राम रन केला. त्या प्रोग्रामच्या आउटपुट मध्ये लिहिले होते:

"I am ready to give you the quality control of my life!"

(माझ्या जीवनाचे गुणवत्ता व्यवस्थापन करण्याची मी तुला परवानगी देते)

अर्थात तिने चाट जीपीटीला विचारून हा रिप्लाय दिला होता, हे त्याला माहिती नव्हते. काहीही असले तरी महत्त्वाची होती ती, त्यामागची भावना!
शब्दबद्ध कोणी केले ते फारसे महत्वाचे नव्हते !

आता दोन्हीकडून स्वीकृती आली होती.

अधून मधून कोमलची आठवण आल्यावर ऋषभने तिची गौतमीशी मनातल्या मनात अनेक वेळा तुलना करून बघितली आणि सौंदर्याच्या बाबतीत नाही पण इतर अनेक बाबतीत गौतमी ही कोमलपेक्षा जोडीदार म्हणून त्याला सरस वाटली. समजते काय ती कोमल स्वतःला? की मला तिच्यापेक्षा चांगला जोडीदार मिळणार नाही? नॉन्सेन्स! फालतू पोरगी कुठली!

दोन आठवडे संपले. सर्व काम अपेक्षेप्रमाणे टीमने मिळून पार पाडले होते. शुक्रवारची संध्याकाळ उगवली. शनिवारी रात्री फ्लाईट होती आणि सर्वांना परत मुंबईला जायचे होते. काम संपल्यावर जोरात पाऊस सुरू झाला. इतरजण घाईघाईने निघून गेले. गौतमीने सोबत छत्री आणली नव्हती. त्या दिवशी पावसाने जरा जास्तच रौद्ररूप धारण केले. क्लाएंट ऑफिसमधून हॉटेलवर निघताना गौतमीने हेयर बँड काढला तेव्हा तिने मोकळ्या सोडलेल्या ओल्या केसांत ती खूपच वेगळी आणि आकर्षक दिसत होती.

गौतमी ओले केस झटकत म्हणाली, “काय नशीब बघ! आजच नेमकी छत्री रूमवर विसरले.”

ऋषभ तिच्या डोक्यावर छत्री धरत म्हणाला, “फार चांगले झाले, तू छत्री विसरलीस. नाहीतर आपल्या दोघांना एका छत्रीत येण्याचा चान्स कधी मिळाला असता?

दोघं रस्त्यावरून चालायला लागले. छत्रीतून गालांवर थेंब पडत होते. तिचे ओले केस त्याच्या शरीराला चिटकत होते.

ऋषभ म्हणाला, “बाय द वे, आपण एकत्र मिळून जास्त चांगले निर्णय घेतो? व्यक्तिगत आणि कार्यालयात सुद्धा.”

गौतमी हसून म्हणाली, “हो. आपण दोघं म्हणजे एक डेटाबेस आणि डेटा यांच्यातील संबंधासारखे आहोत!"

ऋषभ म्हणाला, "व्वा! मग आता मला माझ्या लाडक्या डेटाला ओले होण्यापासून वाचायला हवे. नाहीतर डेटा करप्ट होईल!"

असे म्हणून त्याने चालतांना त्याच्या एका हाताने, तिच्या टॉप आणि पँट यातील उघड्या असलेल्या शरीराच्या कमरेच्या भागाला हळुवार वेटोळे घातले. त्या स्पर्शाने तिने आधी अंग चोरले आणि मग तिला तो स्पर्श हवा हवासा वाटायला लागला आणि मग तिनेच त्याचा हात धरुन आणखी आपल्या हाताने दाब देऊन तिच्या कमरेभोवती घट्ट आवळायला लावला. ऋषभला सुद्धा तो स्पर्श वेगळीच रोमांचक अनुभूती देणारा ठरला. पावसाळ्याच्या थंड शिडकाव्यात आणि गार वाऱ्यात, त्या दोघांची शरीरे मात्र स्पर्शाच्या अनुभूतीमुळे तापत होती. एकमेकांकडे बघत ते नि:शब्द चालत होते. दोघांचे ओठ एकमेकांना भेटण्यास खूप उत्सुक दिसत होते. एकमेकांच्या ओठांच्या हालचालीवरून ते स्पष्ट जाणवत होते. शेवटी असह्य होऊन ते दोघे एका गल्लीत आडोशाला गेले, छत्री समोर धरली, कुणी बघणार नाही याची खात्री केली आणि तिच्या ओठांचे त्याने खूप आवेगाने अगदी थोड्या वेळासाठी चुंबन घेतले. तिनेही त्याला अगदी मनापासून साथ दिली. त्यामुळे दोघांच्याही शरीरात रक्त सळसळू लागले.

पुढे ते मुख्य रस्त्याला आले. चालताना ती हसून म्हणाली, "काय, एकदम आशिकी टू स्टाईल किस केलेस!"

तोही हसायला लागला, "ते काय मी ठरवून केले नाही. आपोआप झाले. त्यावेळेस मला कोणता सिनेमा नाही आठवला. समोर फक्त तू दिसलीस!"

"हो ना. आशिकी वन असो की टू, तुलना नकोच कारण दोन्ही फिल्म्समध्ये हीरो हीरोइन एकमेकांना दुरावतात! आता हे किस घेतलं तिथपर्यंतच लिमिट! याचा पुढचा भाग लग्नानंतर! असंही आपण दोघांनी आपल्या घरच्यांना कल्पना दिली आहे आणि त्यांनाही मंजूर आहे म्हटल्यावर आता पुढील ऍक्शन लग्नाच्या रात्री!"

परत आल्यानंतर त्यांचा साखरपुडा झाला. कंपनीमध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय जाहीर केला. कंपनीच्या एचआर विभागाकडून एक नोटिस आली, ज्यामध्ये एकाच रक्ताच्या नात्यातले लोक हे एकच टीममध्ये किंवा एका प्रोजेक्टमध्ये काम करू शकत नाहीत. म्हणून ऋषभची बदली दुसऱ्या वेगळ्या डिपार्टमेंट मधल्या नव्या प्रोजेक्टमध्ये करण्याचा कंपनीने निर्णय घेतला. नाहीतर तो Conflict of interest निर्माण होतो, ज्याद्वारे वैयक्तिक संबंध व्यावसायिक हिताच्या आड येतात. बहुतेक कंपन्यांमध्ये एचआर पॉलिसीमध्ये Conflict of Interest च्या व्याख्येत जवळचे व्यक्तिगत नातेसंबंध, रक्ताचे नाते आणि "व्यावसायिक कर्तव्यांमध्ये व्यत्यय आणू शकणारे इतर कोणतेही वैयक्तिक हितसंबंध" असा शब्दप्रयोग असतो. त्यामुळे हे केवळ रक्ताच्या नात्यांपुरते मर्यादित नसून, मैत्री, रोमान्स, किंवा अगदी काही गुंतवणुकीच्या बाबतीत सुद्धा लागू होतो.

गौतमी ही ऐकून म्हणाली, “हे अनपेक्षित होतं. मला वाटलं होतं की आपण नेहेमी एकत्र राहू.”

ऋषभ हसून म्हणाला, “आपण एकत्र काम करणारच, पण वेगवेगळ्या आव्हानांवर. हे आपले नाते अजून मजबूत करेल.”

गौतमी थोडं भावुक होऊन म्हणाली, “दिवसभर तुला न पाहता माझा दिवस कसा जाईल? तुझ्यापासून एक क्षण दूर राहण्याची कल्पना मला सहन होत नाही."

ऋषभ हात धरत म्हणाला, “अगं, उलट हे बरं झालं ना. अन्यथा ऑफिसच्या कामावरून आपल्यात वाद झाले असते! माझ्या प्रोजेक्टचं ठिकाण कंपनीच्या वेगळ्या लोकेशनवर जरी असलं तरीही आपण घरी तर भेटणारच आहोत ना! जमेल तसं मी तुला सकाळी सोडायला आणि संध्याकाळी घ्यायला येत जाईल!"

गौतमी लाडाने म्हणाली, “ऋषी! तुझं प्रेम म्हणजे माझ्यासाठी secure code आहे ज्याला breach करणं अशक्य आहे.”
त्यांचे लग्न यथावकाश पार पडले.

प्रकरण 5

दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये ऋषभने जॉईन केले तेव्हा पहिल्यापेक्षा हा प्रोजेक्ट थोडा मोठा असल्याचे त्याला जाणवले. चार एप्लीकेशन लीडर होते आणि त्या प्रत्येक लीडरच्या हाताखाली चार किंवा पाच टीम मेंबर्स होती. संपूर्ण चार एप्लीकेशन डेव्हलपमेंटची जबाबदारी ऋषभवर देण्यात आली. चारही एप्लीकेशनची टेक्नॉलॉजी आणि प्रोग्रामिंग लँग्वेज ही ऋषभने आतापर्यंत हॅण्डल केलेल्या टेक्नॉलॉजीपेक्षा पूर्ण वेगळी होती.

ऋषभला जरी त्यांचे वरवर नॉलेज होते तरी संपूर्ण टेक्निकल नॉलेजसाठी त्याला या चारही जणांवर अवलंबून राहावे लागत होते. तिकडे पूर्वीच्या प्रोजेक्टमध्ये गौतमीला ऋषभ ऐवजी गौतमीला लीडर बनवण्यात आले होते, ही एक आनंदाची गोष्ट होती.

ऋषभच्या पूर्वीच्या प्रोजेक्ट प्रमुखाने नव्या प्रोजेक्टच्या प्रमुखाला ऋषभबद्दल पूर्ण खात्री दिली होती की, जरी टेक्नॉलॉजी वेगळी असेल तरी ऋषभ या मोठ्या प्रोजेक्टला चांगल्या पद्धतीने हँडल करू शकेल. कारण सध्या ऋषभच्या पूर्वीच्या प्रोजेक्ट मधील टेक्नॉलॉजी असलेले कोणतेच प्रोजेक्ट सुरू नव्हते. आणि जे होते, त्यात आधीच लीडर नियुक्त केलेले होते.

त्याच्या हाताखाली जे चार अनुभवी एप्लिकेशन लीड्स होते त्यांची नावे होती - सचिन, प्रिया, आलोक, आणि दीपक.

ऋषभने नीट ओळख व्हावी म्हणून त्या चौघांसोबत अनेक वेळा नाष्टा आणि दोन वेळा हॉटेलमध्ये लंच स्वखर्चाने आयोजित केले. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. पण चौघे नीटपणे त्याच्याशी खुलत नव्हते, असे त्याला जाणवले. एखाद्या वेळेस प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो म्हणून ऋषभने ते फारसे मनावर घेतले नाही. शेवटी त्यांनी आपापली कामं नीट केली म्हणजे झालं. पर्सनल गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या किंवा नाही केला तरी फारसं बिघडत नव्हतं.

एके दिवशी, टीम मीटिंगमध्ये ऋषभने उत्साही मनाने विचारले, "टीम, या आठवड्यातले सर्व टास्क कुठपर्यंत आले आहेत? आपल्याला प्रोजेक्ट हेडला आपली प्रगती दाखवायची आहे!"

सचिन थोडा टाळत म्हणाला, "हो, माझे टास्क जवळपास पूर्ण आहेत. काही लहान समस्या होत्या, पण मी त्या सोडवून टाकल्या!"

ऋषभ थोडा सावध होऊन म्हणाला, "कोणत्या समस्या होत्या? मला त्याची माहिती का दिली नाही? माझी काही मदत हवी आहे का?"

सचिन थंडपणे म्हणाला, "काही नाही, फक्त कोडिंग इश्यूज होते!"

प्रियाने फार भडक मेकअप केलेला होता. अतिशय डार्क लिपस्टिक लावलेली आल्याने ती पुसू नये म्हणून अगदी कमीत कमी ओठांची हालचाल करत ती म्हणाली, "माझा मॉड्यूलही जवळपास पूर्ण आहे. पण काही ऑप्टिमायझेशन राहिलंय, ते मी बघते!"

ऋषभ गंभीर होऊन म्हणाला, "ऑप्टिमायझेशन कसं? म्हणजे कशाकरता? काही परफॉर्मन्स इश्यूज आहेत का?

प्रिया थोडं टाळत म्हणाली, "फार नाही, मी माझं मॅनेज करेन, ऋषभ!"

आलोक मिटिंगमध्ये नेहमी कमी बोलायचा. तो एवढेच म्हणाला, माझे डिबगिंग सुरू आहे, पण ते मी लवकरच पूर्ण करतोय!"
दीपक म्हणाला, "माझ्या टास्क्समध्ये काही ब्लॉकर्स आहेत, पण मी त्यावर काम करतोय!"

ऋषभ आता गोंधळलेला दिसला, "ठीक आहे, पण मला वेळेवर अपडेट्स हवेत. काहीही झालं तरी तुम्ही मला सांगा! हे सगळे अपडेट मला फक्त मीटिंगच्या वेळेस कळले. वेळोवेळी याबाबत माहिती का नाही दिली?"

प्रियाने दीपककडे अर्थपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हणाली, " सर तशी काही गरज वाटली नाही आम्हाला. कशाला थोड्या थोड्या गोष्टींसाठी तुम्हाला त्रास द्यायचा ना? आम्ही मॅनेज करू ना आमचं!"

ऋषभ थोडा आवाज चढवून म्हणाला, "अरे, पण मला काय घडतंय ते माहिती तर असायला हवा ना? मला सगळे अपडेट्स वेळच्यावेळी देत चला, काय?"

सर्वांनी आज्ञाधारकपणे मला डोलावल्या, "होय सर!"

मीटिंगनंतर, कॉफी पितांना ऋषभ विचार करत होता, "कुठेतरी नक्की पाणी मुरतंय!"

काही दिवसांनी प्रोजेक्ट हेड कुणालसोबतच्या मिटींगमध्ये -

कुणाल, "ऋषभ, मला सांग, तुमच्या मॉड्यूलमध्ये सचिनने काल कोणते बदल केले?"

ऋषभ गोंधळून म्हणाला, "सर, कोणते बदल?"

कारण ऋषभला कालच्या बदलांबाबत माहितीच देण्यात आली नव्हती.

सचिन, "मी सांगतो सर, काही कोड ऑप्टिमायझेशन केले होते. मला शेवटच्या क्षणी लक्षात आलं म्हणून मी वेळ वाचवण्यासाठी त्यावर अर्जंट काम केले!"

प्रिया म्हणाली, "आणि माझ्या मॉड्यूलचा परफॉर्मन्स इश्यू मी सोडवला आणि थेट इम्प्लिमेंट सुद्धा केलं!"

ऋषभ चिडला, " काय? इम्प्लिमेंट सुद्धा केलं? मला का नाही सांगितलं? या संदर्भातील इमेल मध्ये मला ठेवायला हवं होतं ना!"
प्रिया, "ऋषभ, थोडी घाई झाली त्यामुळे...!"

कुणाल प्रियाला थांबवून म्हणाला, "ऋषभ, हे सगळं तुला माहित नसावं? तू टीम लीडर आहेस ना?"

ऋषभ निराश होऊन म्हणाला, "सर, मला यातल्या कोणत्याच अपडेट्सची माहिती नव्हती... पण मागच्या एका मिटिंगमध्ये मी या सर्वांना सूचना..."

कुणाल, "शट अप! असं चालणार नाही. तुमच्या टीममध्ये एकमेकांशी संवादच नाही का? कुठेतरी कोऑर्डिनेशन मिसिंग आहे असं दिसतंय!"

तेवढ्यात प्रिया बोलली, "कुणाल सर, ऐका ना! ऍक्च्युली ना, ऋषभ सरांचे नवीनच लग्न झाले आहे म्हणून आम्ही त्यांना उगाच जास्त त्रास देत नाही.. म्हणजे तेच आम्हाला एक दोन वेळा तसे म्हणाले होते!"

ऋषभच्या भुवया उंचावल्या, "अरे बाबांनो, खेळीमेळीच्या आणि ऑफिशियल नसलेल्या चर्चेत जेवतांना मी तुम्हाला तसे सहज बोललो होतो आणि..."

कुणाल कुत्सितपणे टाळ्या वाजवत म्हणाला, "व्वा! म्हणजे कमाल झाली. तिकडे प्रोजेक्टची डेडलाईन जवळ येत चालली आहे, चौघेजण ओव्हर टाईम काम करत आहेत, आणि इथे ऋषभला नवीन लग्न झाले म्हणून इतर कुणी फोन करायला नको आहे, काम करायला नको आहे. मी सुद्धा एकदा रात्री नऊ वाजता तुला फोन केला होता ऋषभ तू उचलला नाहीस!"

प्रियाने मुद्दामून ऋषभची बाजू घेण्याचा खोटा आव आणला आणि म्हणाली, "नाही, म्हणजे ऋषभ तसे आम्हाला गमतीतच बोलले होते पण आम्ही विचार केला, की कशाला ना उगाच प्रत्येक गोष्टीत त्यांना त्रास द्यायचा, नाही का?"

कुणाल रागाने हात आपटून मीटिंग रूम मधून बाहेर पडला आणि जाण्यापूर्वी एकच वाक्य म्हणाला, "यापुढे मला टीममध्ये मिस कम्युनिकेशन नको आहे!"

त्यानंतर ऋषभने सर्वांना थांबवून घेतले.

ऋषभ गंभीर पणे प्रियाकडे तिरपा कटाक्ष टाकत म्हणाला, "टीम, मी थेट विचारतो. माझ्याकडून काही चुकतंय का? तुम्ही मला अपडेट का देत नाही?"

सचिनने उत्तर दिले, "ऋषभ, मी हे सांगायला नको पण, तुमच्या टेक्निकल नॉलेजपेक्षा आमचं नॉलेज जास्त आहे. त्यामुळे काही गोष्टी आम्ही थेट हॅंडल करतो. सिंपल. तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही त्यात सोलुशन देणार आहात का?"

ऋषभला पुढे काही बोलून न देताच प्रिया मध्येच म्हणाली, "आणि प्रत्येक वेळेस सगळं सांगण्याची काही गरज नाही असं आम्हाला वाटतं तुम्ही तुमचा हनिमून साजरा करत जा, सर. आम्ही पाहून घेऊ इकडचं! काय?"

असे म्हणून तिने दिपकला तिरक्या नजरेने डोळा मारला.

ऋषभ यामुळे दु:खी झाला पण ठामपणे म्हणाला, "पण तुम्ही लक्षात ठेवा, मी लीडर आहे. मला सगळ्या गोष्टींची माहिती असली पाहिजे! तसा नियम आहे ना!"

नंतर टीम मात्र त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून लॅपटॉपवर आपापल्या कामात मग्न झाली. ऋषभला जाणवत होतं की त्याची टीमवरची पकड सैल होत चाल आहे. ऋषभ कामात चूक होतं आणि त्याची काही चूक तर नव्हती मग ह्यांना नक्की काय झालंय?

असे वारंवार घडू लागले. ऋषभचे प्रोजेक्टमधून जवळपास लक्ष उडत चालले होते. काय करावे हे त्याला सुचत नव्हते.

ऋषभने हे घरी गौतमीला सांगितले परंतु तिने यातून काहीतरी मार्ग निघेल असे सांगून टेन्शन घेऊ नकोस असे त्याला समजावले. नंतर थोड्या वेळाने तिने छानसा आकर्षक ड्रेस घातला आणि त्याच्या समोर आली, "आपण बेंगलोरला पावसात छत्रीच्या आड जसा कीस घेतला होता, तसा किस मी तुला आता देते!" असे म्हणून तिने त्याचा चेहरा आपल्या छातीच्या दोन्ही उभारांच्या मध्यभागी धरला.

तिने त्याला किस देण्याची वाट बघण्याआधीच, त्याने तिच्या छातीत आपला चेहरा घुसळत वर नेला आणि आधी तिच्या हनुवटीचा किस घेतला आणि मग तिचे दोन्ही गुलाबी ओठ आपल्या ओठात घेतले. पण त्यावेळेस त्याला ऑफिसमधले ते चौघेजण दिसू लागले आणि तो बाजूला झाला आणि विचार करू लागला.

गौतमी म्हणाली, "काय झाले ऋषभ? अरे, एवढे टेन्शन नको घेऊ! परिस्थिती सुधारेल! काहीतरी मार्ग निघेल!'

असे म्हणून तिने पुन्हा वेळ न दवडता त्याचा चेहरा दोन्ही हातात धरून त्याला जवळ ओढले आणि त्याच्या ओठांवर एक छोटा किस दिला. मग त्याच्या चेहऱ्यावर इतर सर्व ठिकाणी, कानावर, नाकावर, कपाळावर ती किस करत राहिली. नंतर तिने त्याच्या शर्टाची बटणे काढली आणि त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी प्रेमाचा वर्षाव करत खाली सरकू लागली.

तेव्हा मात्र ऋषभ सगळे विसरून आनंदाने आणि वेगाने तिच्यात पूर्णपणे सामावला.

काही दिवसांनी डिपार्टमेंटच्या डिलिव्हरी हेडला प्रेझेंटेशन देण्याची पाळी आली तेव्हा, ऋषभकडे फारसे बोलण्यासाठी काही नव्हते परंतु दीपक आणि कुणाल हेच प्रोजेक्टबद्दल बोलत राहिले. डिपार्टमेंटच्या डिलिव्हरी हेडला वाटत होते की कुणाल आणि दीपक व इतर टीम मेंबर यांनीच यावर जास्त काम केलेले आहे ऋषभचे तिथे कुठे इन्व्हॉलमेंट दिसतच नव्हते.

काही दिवसांनी ऋषभला राधिका या एचआर कडून एक ईमेल आला ज्यामध्ये डिपार्टमेंटच्या डिलिव्हरी हेडनी ऋषभबद्दल निगेटिव्ह रीमार्क दिले होते आणि चर्चेसाठी तिने ऋषभला बोलावले होते.

डिपार्टमेंटच्या त्या एचआर सोबत झालेल्या चर्चेतून फार काही निष्पन्न निघाले नाही. कारण ती डिपार्टमेंटच्या डिलिव्हरी हेडला ओळखत होती. ऋषभचे म्हणणे तिने ऐकून घेतले. त्याच्याबद्दल सहानुभूती.दाखवली. पण शेवटी तिने ऋषभला दोष दिला. त्याच्याकडे टीमला बांधून ठेवण्याची क्षमता नाही, तसेच लीडरशिप स्किल्स आणि प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या टेल्क्नॉलॉजीचे नॉलेज त्याच्याकडे नाही हा त्याचा वीक पॉईंट असल्यामुळे टीम मेंबर त्याचे ऐकत नव्हते, असे म्हणून दोष त्याच्यावर देण्यात आला. त्याला ज्या टेक्नॉलॉजी येतात, त्यावर कंपनीत इतर दुसरीकडे कुठे प्रोजेक्ट असतील तर त्याने शोधावे आणि सध्याच्या प्रोजेक्टमधून आता बाहेर निघावे असा सल्ला त्याला एचआर कडून मिळाला.

पाच दिवसानंतर त्याची प्रोजेक्टमधून हाकालपट्टी करण्यात आली. एचआरकडे या प्रोजेक्टबद्दल त्याच्या परफॉर्मन्सबद्दल निगेटिव्ह फीडबॅक लिहिण्यात आला.

त्याच कंपनीतच चार-पाच ठिकाणी त्याने इतर प्रोजेक्टसाठी इंटरव्यू दिले पण प्रत्येक वेळेस पूर्वीच्या प्रोजेक्टमधून सोडण्याची कारणे आणि एचआर फीडबॅक गृहीत धरून तसेच टेक्नॉलॉजीमध्ये तो एक्सपर्ट नसल्याची करणे देत, त्याला कोणताच प्रोजेक्ट मिळाला नाही. त्याने प्रोजेक्टसाठी लागणारी टेक्नॉलॉजी शिकण्याची तयारी दाखवली, परंतु तेवढा वेळ जा त्या प्रोजेक्टकडे उपलब्ध नव्हता कारण कस्टमरला लवकरात लवकर एप्लीकेशन तयार करून पाहिजे होते.

आता तो दोन महिन्यांसाठी बेंचवर आला होता. कंपनीत इतर प्रोजेक्ट मिळत नाही म्हणून त्याने इतर कंपन्यांमध्ये ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात केली. गौतमीची नोकरी शाबूत असल्यामुळे तेवढा आर्थिक आधार होता. कारण नुकतेच दोघांनी घरासाठी कर्ज घेतलेले होते आणि त्याचे हप्ते फेडावे लागत होते.

इकडे कुणालने दिपकला बढती देऊन त्याला ऋषभच्या जागी नेमले. ऋषभसोबत हे सगळे राजकारण होण्यामागचे नेमके कारण सचिनच्या टीममधल्या एका जूनियर मेंबरने (ज्याचे नाव राहुल होते) ऋषभला सांगितले. कारण ऋषभबद्दल त्याला आधीपासून आपुलकी वाटत होती, ऋषभ निर्दोष आहे हे ते पहात होता आणि काही दिवसांपूर्वी राहुलला काही टीम मेंबरच्या चर्चेतून एक सत्य समजले होते. ते असे की, दीपक हा कुणालच्या राज्यातील त्याच्याच गावातला असून, कुणाल त्याला आधीपासून ओळखत होता. दीपकला लवकर लीडरशिपच्या शिडीवर चढायचे होते आणि ऋषभची जागा त्याला हवी होती, म्हणून त्याने कुणालशी त्याने जवळीक साधली. त्याला मस्का लावत गेला. त्याची पर्सनल कामेसुद्धा केली. कुणाल आणि तो एकाच गावातले असल्याचा फायदा दिपकने घेतला. कुणालचा पाठिंबा असल्यामुळे शिरजोर होऊन इतर तिघांना सुद्धा दिपकने फितवले की, पुढे मीच तुमचा लीडर होणार आहे. त्यामुळे मी म्हणतो तसे ऐका, ऋषभचे ऐकू नका! प्रिया तर दीपकची आधीपासून चमची होती.

हे सगळे राहुलने ऋषभला ऑफिसच्या बाहेर पर्सनली रविवारी एक रेस्टॉरंटमध्ये नाश्त्यासाठी बोलावून सांगितले. ऋषभला अजून अशी माहिती मिळाली की, ती एचआर राधिकासुद्धा कुणालच्या ओळखीने या कंपनीत जॉईन झाली होती. त्यामुळे ऋषभचे म्हणणे कितीही खरे असले तरी ती ऋषभची बाजू का घेईल?

खरे तर असे काही झाल्यावर एचआरचे काम असते की, दोन्ही पक्षांना समोरासमोर बोलून दोन्हीकडचे म्हणणे ऐकायचे असते आणि योग्य न्याय करायचा, जसे कोर्टात असते. परंतु हे मूळ कामच ती करत नव्हती.

एका क्षणी ऋषभला वाटले की, राधिकाच्या मॅनेजरकडे म्हणजे एचआरच्या प्रमुखाला भेटायला जावे आणि हे सगळे सांगावे कारण इथे conflict of interest तयार होत होता. स्वतः ती एचआरच conflict of interest चा नियम मोडत होती. आणि लग्न झाल्यावर रक्ताच्या नात्याचे कारण देऊन मात्र गौतमी आणि ऋषभ यांना मात्र वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये टाकले गेले. पण, प्रकरण आणखी चिघळेल आणि आपण नको त्या गोष्टीत विनाकारण अडकू म्हणून त्याने तो विचार रद्द केला.

बेंचवरचे दोन महिने उलटून गेले.

पुढील करिअरचे नुकसान होऊ नये म्हणून त्याला टर्मिनेशन लेटर न देता कंपनीने स्वतःहून राजीनामा देण्यास सांगितले. वैयक्तिक कारणास्तव मी राजीनामा देत आहे, असे सांगून शेवटी त्याने कंपनी सोडली. मग घरून त्याने युद्धपातळीवर दुसरीकडे नोकरी शोधण्यास सुरुवात केली.

राहुलचा मोबाईल नंबर मात्र त्याने आवर्जून आपल्याकडे सेव्ह करून ठेवला होता.

प्रकरण 6

लहानपणी शाळेच्या फेअरवेल पार्टीत एकदा कौस्तुभने स्टेज होस्ट करण्यासाठी आग्रह धरला. शिक्षकांनी त्याची तयारी पाहून संधी दिली. कौस्तुभच्या हटके विनोदांनी आणि प्रगल्भ भाषणशैलीने सगळे भारावून गेले. कार्यक्रम संपल्यावर त्याला खूप कौतुक मिळाले. कार्यक्रम संपल्यावर अनेक मुलींनी त्याला येऊन "तू खूप छान होस्टिंग केलंस" असं म्हणत कौतुक केलं. काही मुलींनी तर त्याच्यासोबत फोटो घेतले. त्यातली एक, स्वाती, विशेष लक्ष वेधून घेत होती. तिने कौस्तुभला इंस्टाग्रामवर मेसेज केला, आणि हळूहळू त्यांच्यात गोड मैत्री जमली.

एकदा कॉलेजात असताना निवडणुकीसाठी त्याच्या मित्राने उमेदवारी भरली होती. मित्राच्या बाजूने प्रचार करण्यासाठी कौस्तुभ पुढे सरसावला. त्याच्या उग्र भाषणांनी आणि जोरदार प्रचारामुळे मित्राने निवडणूक जिंकली. कौस्तुभला समजले की, तो लोकांना प्रभावित करू शकतो आणि त्यांचा निर्णय बदलू शकतो. तसेच लोकांसमोर बोलण्याचा आणि त्यांना गुंतवून ठेवण्याचा जन्मजात गुण आपल्यात आहे. एकदा सांस्कृतिक महोत्सवासाठी नृत्यगटाची निवड सुरू होती. कौस्तुभने सहजगत्या मुलींना प्रेरित करून एक टीम तयार केली आणि त्यांना नृत्य शिकवले. त्याच्या प्रेरणादायी बोलण्यामुळे मुली त्याच्याकडे सतत सल्ला मागत.

त्यातली एक, नेहा, नेहमी त्याला विचारायची, "कौस्तुभ, माझी ही डान्स स्टेप कशी आहे?"

तिच्या डोळ्यात कौस्तुभबद्दलचा आदर स्पष्ट दिसत होता. कॉलेजच्या ट्रिपवर कौस्तुभ नेहमीच मुलींच्या ग्रुपमध्ये असायचा. त्याचा हास्यविनोद, किस्से सांगण्याची कला आणि प्रत्येकाची काळजी घेण्याचा स्वभाव यामुळे सगळ्याजणीना तो आवडायचा. एकदा ट्रेक दरम्यान, रिया नावाची मुलगी घसरून पडली, तेव्हा कौस्तुभने तिला सावरले. तिने कौस्तुभच्या हाताला घट्ट धरून ठेवले आणि ट्रिप संपेपर्यंत त्याच्याभोवती ती घोटाळत राहिली.

एकदा मित्रांसोबत त्याला एका चहा टपरीवर थांबावे लागले. तिथे ग्राहक कमी असल्याचे पाहून कौस्तुभने मालकाला विचारले की, त्याला ग्राहक वाढवून देऊ का. मालक हसला. कौस्तुभने रस्त्यावरून जाणाऱ्यांना आकर्षक पद्धतीने बोलावून त्यांच्या हातात चहा दिला आणि काही मिनिटांत टपरी गर्दीने फुलली. मालक आश्चर्यचकित झाला आणि कौस्तुभला मोफत चहा दिला. कौस्तुभच्या मित्राचा वाढदिवस होता आणि त्याने सर्वांसाठी गिफ्ट खरेदी करण्याची जबाबदारी घेतली. दुकानात त्याने प्रचंड बार्गेनिंग करून गिफ्टच्या किंमती कमी केल्या.

दुकानदाराला त्याच्या वागण्याचा त्रास झाला, पण कौस्तुभच्या प्रभावी बोलण्यामुळे शेवटी त्याने सवलत दिली. मित्रांनी त्याला "डिल मेकर" म्हणायला सुरुवात केली.

एकदा कौस्तुभने ऑनलाइन काही गोष्टी ऑर्डर केल्या, पण दुसऱ्याच वस्तू मिळाल्या. कस्टमर केअरला कॉल करून त्याने इतक्या ठामपणे आणि हुशारीने संवाद साधला की, त्याला केवळ पैशांचा रिफंडच नाही, तर पुढील ऑर्डर साठी एक वस्तू फ्री आणि इतर वस्तूंवर डिस्काउंट देखील मिळाले.

या सगळ्या प्रसंगांमधून कौस्तुभच्या मनात हळूहळू एक स्पष्ट विचार आकार घेत होता आणि त्याला जाणवत होतं की "मी लोकांशी संवाद साधताना खूप आनंदी आणि आत्मविश्वासू असतो. तांत्रिक कामे माझ्या स्वभावाशी जुळत नाहीत. लोकांना पटवून त्यांचा विचार बदलण्याची माझी क्षमता आहे. नियमित नवीन लोकांशी भेटण्याची, संवाद साधण्यात आणि त्यांना पटवण्यामध्ये मला जास्त मजा येते"

कौस्तुभला जाणवलं की, हा तो प्लॅटफॉर्म आहे जिथे त्याचा स्वभाव आणि कौशल्ये उठून दिसतील. त्याने मनाशी ठरवले, "तांत्रिक ज्ञान हे एका चौकटीत बंदिस्त आहे. पण सेल्स म्हणजे मोकळे आकाश! इथे मी माझा आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि हट्टीपणा वापरून मी काहीही साध्य करू शकतो."

कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंट सुरू होती. टेक्निकल डिपार्टमेंटसाठी मुलाखती होत होत्या. कौस्तुभ त्या मुलाखतींमध्ये सहभागी झाला, पण प्रश्नांचे उत्तर देताना तो कंटाळला. त्याला तांत्रिक गोष्टींमध्ये रस वाटला नाही. मात्र, त्याच वेळी सेल्स आणि मार्केटिंगच्या मुलाखती सुरू होत्या. तिथे त्याने आत्मविश्वासाने संवाद साधत साधला, त्याच्या बोलण्याचा मुलाखत घेणाऱ्यांवर चांगला प्रभाव पडत होता.

चार कंपन्यांनी जेव्हा त्याला जॉबची ऑफर दिली तेव्हा त्याने आपल्या संवाद आणि वाटाघाटी करण्याच्या कौशल्यावर भर दिला आणि अशा कंपनीची निवड केली की जी त्याला सर्वात जास्त पगार देईल आणि जिथे त्याला काम करण्याची जास्त मोकळीक आणि लवचिकता मिळेल.

एकदा त्याचा मित्र नवीन स्टार्टअप कंपनी सुरू करत होता, पण गुंतवणूकदार समजून घेत नव्हते. कौस्तुभने पुढाकार घेतला आणि आपल्या उत्साही बोलण्याने गुंतवणूकदारांना प्रभावित केले. त्याच्या बोलण्यामुळे मित्राला गुंतवणूक मिळाली.

कोमलने कौस्तुभचे प्रपोज नाकारले होते याची सल मात्र त्याच्या मनात कुठेतरी होतीच. पण नंतर त्याच्या मनातून तो विचार निघून गेला. तिला प्रपोज करताना सुद्धा त्याने एखाद्या सेल्समन सारखे शब्द वापरले होते.

पण प्रपोज करणे म्हणजे काही प्रॉडक्ट विकणे नव्हे हे त्याला कळून चुकले!

प्रकरण 7

कौस्तुभ आपल्या फेसबुक अकाऊंटवर स्क्रोल करत होता. एका ट्रॅव्हल ग्रुपमध्ये त्याच्या विनोदी कमेंट्समुळे त्याला अनेक लाईक्स मिळाले होते. त्याच पोस्टवर नेदरलँड्स देशातील रॉटरडॅम इथे राहणाऱ्या मॅगी म्हणजे मार्गारेट नावाच्या युरोपियन मुलीने कमेंट केली.

"हाहा! तुझा सेन्स ऑफ ह्युमर कमाल आहे. तू स्टँड-अप कॉमेडियन आहेस का?"

"अजून नाही, पण कदाचित विचार करायला हवा. तसे पाहता, तू भरपूर प्रवास करणारी दिसतेस. भारतात फिरायला येण्याचा विचार आहे का?"

"होय, तर! मी आणि माझ्या मैत्रिणी पुढील महिन्यात मुंबईला येणार होतो."

"छान आहे! मी मुंबईत राहतो. तुम्हाला स्थानिक मार्गदर्शकाची गरज असती तर मला सांगा."

"तू खूप चांगला आहेस! आपण संपर्कात राहूया. मी आल्यावर कॉल करते"

महिना उलटला. मॅगी तिच्या दोन मैत्रिणींसोबत म्हणजे जेनिफर आणि इसाबेला सोबत मुंबईत आली. कौस्तुभने त्यांची ओळख करून देण्यासाठी वांद्रे सी लिंकजवळ भेटण्याचे ठरवले होते. कौस्तुभ गेटवे ऑफ इंडिया समोर त्यांची वाट पाहत होता.

त्या तिघी त्याला दिसल्या.

मॅगी एक सुंदर आणि सुदृढ युरोपियन तरुणी होती, तिचे गोरेपान, नितळ आणि कोमल त्वचेचे तेज, चेहऱ्यावर झळकत होते. तिचे सोनेरी रंगाचे केस खांद्यावर मोकळे पसरलेले होते, आणि तिच्या निळसर-हिरव्या डोळ्यांमध्ये एक अद्भुत चमक होती. तिच्या चेहऱ्यावर हलका गुलाबी रंग होता.

तिने हलक्या पिवळसर रंगाचा फुलांचा सुंदर प्रिंट असलेला गाऊन होता, जो तिच्या गुडघ्यापर्यंत जेमतेम पोहोचत होता आणि कमरेला टाईट बेल्ट बांधलेला होता ज्यामुळे तिची फिगर स्पष्ट उठून दिसत होती आणि तिच्या हातात एक साधी लेदरची स्लिंग बॅग होती.

बघताक्षणी ती त्याच्या मनात भरली.

तिने कौस्तुभला घट्ट मिठी मारली आणि मग मिठीतून दूर होत म्हणाली, "कौस्तुभ! प्रत्यक्ष भेटून खूप आनंद झाला!"

कौस्तुभ हसत म्हणाला,"मुंबईत तुमचे स्वागत आहे, स्वप्नांच्या शहरात! तुम्ही वेड्या साहसासाठी तयार आहात ना?"
मॅगी म्हणाली, "नक्कीच! ह्या माझ्या मैत्रिणी जेनिफर आणि इसाबेला."

कौस्तुभ, "हॅलो, स्वागत आहे! मी वचन देतो, तुम्हाला मुंबईचा अनोखा अनुभव मिळेल."

संध्याकाळी ते मरीन ड्राइव्हला गेले. समुद्राच्या लाटांचा आवाज आणि थंड वारा त्यांना प्रसन्न करत होता.

मॅगी, "वाह, हे ठिकाण खूप सुंदर आहे."

कौस्तुभ, "याला 'क्वीन'स नेकलेस' म्हणतात, कारण रात्री दिव्यांच्या प्रकाशामुळे ते नेकलेस सारखे दिसते."

इसाबेला: "तुला तुझ्या शहराबद्दल किती माहिती आहे, नाही?"

कौस्तुभ, "मला माझं शहर खूप आवडतं. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे नवीन मैत्रिणींसोबत या शहराची जादू अनुभवणं जास्त आवडतं!"

कौस्तुभ त्यांना मुंबईचे प्रसिद्ध स्ट्रीट फूड जसे की, वडापाव, पाणीपुरी, भेळ, पावभाजी हे प्रकार थोडे थोडे चाखायला दिले.

मॅगी, "अरे देवा! हे खूप तिखट आहे, पण मस्त आहे."
कौस्तुभ, "मुंबईचा स्वाद तुम्ही आता अनुभवता आहात आणि ही तर फक्त सुरुवात आहे."

जेनिफर, "कौस्तुभ, तू खूप उत्तम मार्गदर्शक आणि मित्र आहेस."

संध्याकाळची वेळ होती. जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर सूर्य मावळतीला जात होता, त्याची केशरी किरणं लाटांवर सोनेरी झळाळी देत होती. समुद्राचा मस्त वारा आणि लाटांची गाज, या वातावरणाने मॅगीच्या मनावर गारुड केलं होतं. तिने कौस्तुभकडे पाहिलं, त्याच्या डोळ्यांत तीव्रता आणि निरागसता होती, ज्याने तिचं मन जिंकून घेतलं.

मॅगी, "तुला माहितीये, एका साध्या फेसबुक कमेंटमुळे मला कधीच वाटलं नव्हतं की मला मुंबईत एक चांगला मित्र मिळेल!"

कौस्तुभ, "जग अनपेक्षित गोष्टींनी भरलेलं आहे. कधी कधी, सर्वोत्तम गोष्टी योगायोगाने घडतात, ठरवून नाही."

मॅगी: "मान्य आहे. तुझी सकारात्मकता खूप प्रेरणादायी आहे."

थोड्या वेळानंतर ती म्हणाली,"कौस्तुभ... मी तुझ्या प्रेमात पडले आहे"

मॅगीच्या आवाजात एक वेगळीच भावना होती. ती एक क्षण थांबली आणि पुढे म्हणाली, "मी इथे केवळ पर्यटनासाठी आले होते, पण आता माझं मन इथेच अडकलंय... तुझ्यात."

कौस्तुभ अचंबित झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं.

"मॅगी, आपली भेट फक्त काही तासांपूर्वी झाली, आणि इतक्या लवकर...?" त्याने विचारलं.

"प्रेमासाठी वेळ लागत नाही, कौस्तुभ. तू माझ्या मनाचा आरसा आहेस. मी माझ्या आयुष्याची सगळी गोष्ट तुला सांगू इच्छिते. मला नेहमीच साधेपणा, निखळ प्रेम आणि सत्य आवडतं आणि ते मला तुझ्यात सापडलंय."

कौस्तुभ तिच्या डोळ्यांत पाहत राहिला. तो शब्दांशिवाय तिच्या भावनांना प्रतिसाद देत होता.

अचानक त्याने तिच्या चेहऱ्यावर अलगद हात ठेवला आणि तिच्या ओठांवर हलकेसे चुंबन घेतले. त्या क्षणाने त्यांची हृदये अधिक जवळ आली. त्यांचा किस हळूहळू तीव्र होत गेला. त्यामुळे त्या पुढची दोघांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया थांबवण्यासाठी मॅगीने तिचा ओठ त्याच्यापासून अलग केला आणि त्याचा हात धरुन त्याला तिघीजणी थांबले असलेल्या जवळच्याच हॉटेलच्या तिच्या रूमकडे नेले.

रूमचा दरवाजा बंद होताच, त्यांच्या नजरा पुन्हा जुळल्या. उत्कटतेने त्यांनी एकमेकांना आलिंगन दिलं. कपडे हळूहळू गळून पडू लागले, स्पर्श अधिक संवेदनशील होत गेले. त्यांच्या ओठांचा स्पर्श प्रत्येकवेळी अधिक गहन होत होता. मॅगीच्या रेशमी त्वचेवर कौस्तुभची कोमल बोटं फिरू लागली, तिच्या शरीरावर त्याचा श्वास जाणवू लागला. त्या रात्री, त्यांनी एकमेकांमध्ये पूर्णतः विलीन होत, प्रेमाचा सर्वोच्च क्षण अनुभवला. त्या रात्रीचा चंद्र समुद्रावर प्रकाश पसरवत होता, आणि त्याच्या प्रकाशात मॅगी आणि कौस्तुभच्या प्रेमाचा अमूल्य क्षण उजळून निघाला होता.

प्रकरण 8

कौस्तुभने सेल्समन म्हणून "एक्सलंट ब्रेन सोल्युशन्स" या कंपनीत जॉईन केल्यानंतर आपल्या प्रभावी संवाद कौशल्यामुळे कमी वेळातच सेल्स क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली. तो नेहमी हसतमुख राहायचा, सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध ठेवायचा, मात्र त्याच्या नेहमीच्या सवयीनुसार महिला सहकाऱ्यांशी तो थोडा चेष्टेने वागायचा. आधुनिक काळात असल्याने बऱ्याचशा मोकळ्या मनाच्या महिलांना त्याबद्दल विशेष काही वाटत नसे. उलट त्याच्या या मोकळ्या स्वभावामुळे स्त्री सहकारी त्याच्याशी आरामात बोलत.

काहीजणी त्याच्याकडून सेल्स टिप्स घ्यायच्या, तर काहीजणी वैयक्तिक समस्याही सांगायच्या. हेच कारण होते की, त्याची लोकप्रियता वाढली आणि त्याला लवकरच एरियाचा सेल्स मॅनेजर बनवण्यात आले..

विशाखा, त्याच्या डिपार्टमेंटमधील एक स्त्री कर्मचारी, सुरुवातीला कौस्तुभला तिच्या कामाबद्दल सल्ला विचारत असे. कौस्तुभने तिला मदत केली, तिच्या सेल्स स्किल्स सुधारण्यासाठी मार्गदर्शन केले. विशाखाला कौस्तुभ सोबत जवळीक वाढवून लवकरात लवकर प्रमोशन पाहिजे होते. तसे तिने अप्रत्यक्षरीत्या त्याला एक दोनदा बोलून दाखवले होते. पण त्याने सहजतेने तिला सांगितले की, अजून ती प्रमोशनसाठी योग्य नाही कारण तिने काही गोष्टीत आपला परफॉर्मन्स सुधारला पाहिजे. तसे झाले की मग नक्की तो तिचा प्रमोशनसाठी विचार करेल. याचा तिने उलट अर्थ घेतला. तिला वाटले त्याला माझे शरीर हवे असेल पण तो तसे प्रत्यक्ष सांगत नसेल. इतर स्त्रियांची तो खूप गमतीने आणि मोकळा वागतो. मी सर्वांपेक्षा जास्त त्याच्या जवळ जाऊन त्याला आपलंसं करून वश करेन असा निर्धार तिने केला. त्याशिवाय मला प्रमोशन मिळणार नाही. तिची ही समजूत चूक होती, पण कुणाची विचार करण्याची पद्धती कशी असावी यावर इतरांचा कंट्रोल थोडेच असतो?

हळूहळू विशाखाचे वागणे बदलू लागले. ती कौस्तुभकडे जास्त लक्ष देऊ लागली, त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारू लागली, त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी कारणं शोधू लागली. कौस्तुभला हे लक्षात आलं, पण त्याने तिला कधीच चुकीचा संकेत दिला नाही. कारण आता नुकतेच त्याचे मॅगी सोबत सूत जुळलेले होते. आणि अर्थातच तो मॅगीशी एकनिष्ठ राहणार होता. जरी इतक्यात नाही परंतु ते दोघे लग्न करणार, हे नक्की होते.

कौस्तुभच्या आई-वडिलांना त्याचे युरोपियन मुलीशी लग्न होणार हे मान्य करावे लागले कारण तसंही तो त्यांचा नकार ऐकणार नव्हता. राहिला प्रश्न मॅगीच्या आई-वडिलांचा! तर तेही तयार होते, परंतु मॅगीने त्याला युरोपमध्ये त्याच्या आई-वडिलांना भेटायला आणि तिथे आठ-दहा दिवस राहायला बोलावले होते. मग त्यानंतर यथावकाश लग्न पार पडणार होते. विशाखा सोबतच्या कौस्तुभच्या बोलण्यात त्याच्या मॅगी सोबतच्या संबंधांचा उल्लेख एक दोन वेळा आला होता. त्यामुळे तिलाही ही गोष्ट माहीत होती.

एकदा कंपनीच्या वार्षिक पार्टीत विशाखाने कौस्तुभबरोबर डान्स करण्याचा आग्रह धरला. कौस्तुभ नेहमीप्रमाणे मोकळेपणाने तीच्यासोबत डान्स करत होता. पण विशाखा अधिक जास्त जवळ येऊ लागली. कौस्तुभला अस्वस्थ वाटले आणि तो विनम्रतेने तिला दूर करून इतर सहकाऱ्यांशी गप्पा मारू लागला.

त्या रात्री नंतर विशाखा जास्त नाराज दिसू लागली आणि तिच्या वागण्यात अचानक बदल झाला. ती मुद्दाम कौस्तुभच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करू लागली. कौस्तुभनी दिलेली काम मुद्दाम उशिरा करू लागली. कौस्तुभला पार्टीच्या रात्री नंतर तिच्या वागणुकीत झालेला बदल जाणवत होता. पण काय करावे हे त्याला समजत नव्हते. डायरेक्ट तिच्याशी या विषयावर बोलून मोकळे व्हायचे का? पण नेमके काय बोलणार? कारण डान्स च्या मुद्द्यावरून काही निष्कर्ष निघत नव्हता.

एक दिवशी सहज चहा पिताना विशाखा अचानक मनमोकळी बोलायला लागली. बोलता बोलता तिने एक नॉनव्हेज जोक कौस्तुभला सांगितला. त्याला सुरुवातीला थोडे आश्चर्य वाटले कारण मुलगी असूनही इतक्या हाय लेव्हलचा नॉन व्हेज जोक मला ही सांगू शकते? पण स्त्रीचा आदर राखत त्याने तेही स्वीकारले. मग बोलता बोलता तिने कौस्तुभला बहकावले. तिने सांगितलेल्या जोकच्या संदर्भात तशाच आणखी एका जोकचा अश्लील व्हिडिओ त्याने तिला त्याच्या मोबाईल मध्ये दाखवला, तेव्हा तिला खूप आवडला आणि ती त्यावर खूप खेळाळून हसू लागली. त्याने विचार केला की हिला जर माझ्याशी मैत्री अशा प्रकारच्या गप्पा करण्यासाठी हवी असेल तर ठीक आहे. मी हिच्याशी या सगळ्या गोष्टी बोलत जाईन. शेवटी ही खुश राहिली पाहिजे, जेणेकरून ही माझ्या हाताखाली नीट काम करू शकेल आणि मला तेच हवे आहे.

आणि मग तिने त्याला आग्रह केला, "तो जोक व्हिडिओ मला व्हाट्सअप वर पाठव"

सुरुवातीला कौस्तुभ नाही म्हणाला.

परंतु तिने आग्रह केला.

ती म्हणाली, " मला माझ्या मैत्रिणींना हा जोक फॉरवर्ड करायचा आहे. कारण त्या पण खूप आगाऊ आणि फॉरवर्ड आहेत. त्यांना हा व्हिडिओ बघून मजा येईल! ए. पाठव ना. प्लीज!"

असे म्हणून कौस्तुभने तिच्या व्हाट्सअपवर तो व्हिडिओ पाठवला. मग दोघांनी त्यानंतर त्या व्हिडिओबद्दल काही गमतीशीर चॅटिंगसुद्धा केली. त्यात त्याने तिच्या दिसण्याबद्दल चॅटमध्ये कमेंट केली, जी त्याने आधी तिच्यासोबत सहज बोलताना एक दोन वेळा केली होती.

काही दिवसांनी अचानक विशाखाने एचआरकडे लेखी तक्रार दिली की, कौस्तुभ तिच्याशी गैरवर्तन करतो, तिच्यावर वैयक्तिक टीका करतो आणि तिला असभ्य मेसेज पाठवतो. कौस्तुभला हे ऐकून धक्का बसला. एचआरने त्याला चौकशीसाठी बोलावले. कंपनीच्या कॉन्फरन्स रूममध्ये एचआर हेड, चौकशी समितीतील दोन सदस्य, विशाखा आणि कौस्तुभ उपस्थित झाले.

एचआर हेड: कौस्तुभ, आजची बैठक तक्रारीवर आधारित आहे जी विशाखा यांनी दाखल केली आहे. त्यांनी सांगितले की तुम्ही त्यांच्याशी गैरवर्तन केले, त्यांना असभ्य संदेश पाठवले. आपण यावर आपली बाजू मांडू शकता.

कौस्तुभ: धन्यवाद. सर्वप्रथम, मला हे स्पष्ट करायचे आहे की माझे आणि विशाखाचे संभाषण परस्पर संमतीने आणि मैत्रीपूर्ण होते. माझ्या कडून कधीही गैरवर्तन झालेले नाही.

विशाखा (चिडलेल्या स्वरात): गैरवर्तन नाही? मग तुम्ही मला त्या अश्लील व्हिडिओबद्दल काय सांगाल? तुम्हीच तो मला व्हाट्सअ‍ॅपवर पाठवला होता.

कौस्तुभ: होय, पण तो तुम्हीच मागितला होता. तुम्ही तो विनंतीपूर्वक मागितला आणि म्हणालात की मैत्रिणींना फॉरवर्ड करणार आहात.

एचआर सदस्य 1: कौस्तुभ, तुम्ही मान्य करता की तुम्ही अश्लील व्हिडिओ विशाखाला पाठवला?

कौस्तुभ: होय, पण ते तिच्या आग्रहावरून आणि तिच्या संमतीनेच.
विशाखा: मी तो व्हिडिओ माझ्या मैत्रिणींना दाखवणार आहे असं मी केवळ गंमतीत म्हटलं होतं. तुमच्या सारख्या वरिष्ठ सहकाऱ्याने ते गांभीर्याने घ्यायला नको होतं.

एचआर सदस्य 2: पण कौस्तुभ, तुम्ही एक वरिष्ठ सहकारी म्हणून तुमची जबाबदारी ओळखायला हवी होती. तुम्हाला असा व्हिडिओ पाठवणे टाळायला हवे होते.

कौस्तुभ: मला हे मान्य आहे, पण मी ती गोष्ट मैत्रीपूर्ण संभाषणात केली. तिला जोक सांगायला आणि अश्लील चर्चा करायला काहीच हरकत नव्हती, मग मी पाठवलेला व्हिडिओ अचानक गैरवर्तन कसा?

विशाखा: कारण ते तुमचे खरे रूप दाखवते. तुम्ही मला नेहमी असे व्हिडिओ पाठवायला सुरुवात केली असती.

कौस्तुभ: हे खोटं आहे! मी फक्त तिच्या विनंतीवर एकदाच पाठवला.

एचआर हेड: चॅटचे स्क्रीनशॉट आमच्यासमोर आहेत, जे दर्शवतात की तुम्ही असभ्य भाषा वापरलीत आणि तिच्यावर, तिच्या खासगी अवयवांवर वैयक्तिक टिप्पणी केलीत. एका महिलेचा मानभंग केला.

कौस्तुभ: मानभंग? तिनेच स्वतः बोलता बोलता तिच्या खासगी अवयवांबद्दल त्या गोष्टी माझ्या लक्षात आणून दिल्या, ज्या मी फक्त पुन्हा चॅटमध्ये लिहिला आणि आता ती पलटली. ते स्क्रीनशॉट्स अपूर्ण आहेत. संपूर्ण संभाषण बघा!

विशाखा: तुम्ही आता खोटं बोलताय, आणि तुम्ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करताय.

एचआर सदस्य 1: कौस्तुभ, ती बोलता बोलता तुम्हाला असं म्हणाली याबद्दल तुमच्याकडे यावर काही पुरावा आहे का? स्क्रीनशॉट्स हे स्पष्ट दाखवत आहेत की तुम्ही असभ्य वर्तन केले.

कौस्तुभ: माझ्याकडे तिचेही मेसेज आहेत. पण तुम्ही फक्त तिचा पक्ष बघत आहात.

एचआर हेड: आम्ही योग्य चौकशी करत आहोत, कौस्तुभ. पण तुम्हाला तुमची जबाबदारी कळायला हवी होती. कंपनीच्या आचारसंहितेचे उल्लंघन गंभीर आहे.

कौस्तुभ: मग माझी बाजू तुम्ही ऐकणारच नाही का?
एचआर सदस्य 2: तुम्ही आपली बाजू मांडली आहे, पण पुरावे तुमच्याविरुद्ध आहेत.

एचआर हेड: कौस्तुभ, आम्ही तुम्हाला दोन पर्याय देत आहोत. एकतर तुम्ही त्वरित राजीनामा द्या आणि आम्ही हे प्रकरण शांततेत संपवू. अन्यथा, कंपनी तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करेल.

कौस्तुभ (धक्का बसलेला आणि संतप्त): म्हणजे माझं बोलणं काहीच महत्त्वाचं नाही? माझी बाजू कुणी ऐकणार नाही?

एचआर हेड: निर्णय तुमच्यावर आहे. तुम्हाला एक आठवडा वेळ देतो. त्यानंतर तुमचा निर्णय सांगा. आरोप मान्य करून शिक्षा भोगा अन्यथा राजीनामा द्या.

सर्वजण कॉन्फरन्स रूम मधून निघून गेले आणि कौस्तुभ निराशपणे तिथेच बसलेला राहिला. ज्या खुर्चीवर विशाखा बसली होती त्या खुर्चीकडे तो एकसारखा टक लावून पाहू लागला.

हे सर्व विशाखाने नेमके का केले? कुणी तिच्याकडून करवून घेतले का? तसे असेल तर तो कोण? तिला माझ्याकडून नेमके काय पाहिजे होते? प्रमोशन हवे असते तर काही महिन्यांनी मी दिले असते परंतु त्यासाठी असा खेळ खेळण्याची काय आवश्यकता होती?

हे सगळे प्रश्न अनुत्तरीतच राहणार असे एकंदरीत दिसत होते. विशाखाच्या तक्रारीनंतर ऑफिसमध्ये अफवा पसरल्या. काहींनी कौस्तुभला पाठिंबा दिला, तर काहींनी त्याच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली.

"तो स्त्री सहकाऱ्यांसोबत वाजवीपेक्षा जास्त मोकळेपणाने बोलतो, यातूनच प्रॉब्लेम झाला असावा." असेही काही जण म्हणू लागले.

कौस्तुभला ऑफिसमध्ये एकटेपण जाणवू लागले. त्याच्या नियमित मित्रमंडळींपैकी काहींनी त्याला टाळले. एचआरने त्याला सेल्स एरिया मॅनेजर पदावरून बाजूला केले.

विशाखाला खाजगीत भेटून तिला तोंडावर चांगले खडे बोल सुनवावे असे त्याला वाटले परंतु त्यामुळे गोष्टी आणखी चिघळतील असे म्हणून त्याने तो विचार रद्द केला. आता त्या विशाखाचे तोंड बघणे नको. शेवटी त्यांनी राजीनामा दिला. विचार व्यवस्थित खूपच त्याला असवेदनशील वाटली. थोडीफार चूक त्याच्याकडेही होती परंतु त्याचे स्त्रियांशी मोकळेपणाने बोलणे त्याच्या अंगलट आले.

घरी सर्व प्रकार प्रमाणिकपणे त्याने आई-वडिलांना सांगितला. त्याच्या बहिणीला सांगितला.

सर्वांना त्याचा स्वभाव माहिती होता की, तो जरी मुलींशी मोकळा वागतो आणि बोलतो परंतु ऑफिसमधल्या महिलेशी तो असे काही वागणार नाही की, जेणेकरून उगाच लिखित पुरावे देऊन स्वतःच फसेल आणि नोकरीवर पाणी सोडावे लागेल!

राजीनामा दिल्यानंतर काही दिवस तो घरी थांबला. इतर ठिकाणी छोटे मोठे काम करून आपला खर्च भागवू लागला आणि त्याच्या नेहमीच्या क्षेत्रातील नोकरी शोधू लागला.

त्यानंतर त्याने थोडा बदल म्हणून युरोपमध्ये मॅगीकडे जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा मॅगीने त्याला थोडी आर्थिक मदत केली!

प्रकरण 9

भोरवाडीच्या माळरानावर उभा असलेला तो मठ, जुन्या काळातल्या शिल्पकलेने सजलेला, जणू इतिहासाचा साक्षीदार होता. मोठ्या कमानी, काळ्या दगडांच्या भिंती, आणि त्यावर कोरलेली सुंदर नक्षी. राघवच्या पूर्वजांनी हा मठ आणि त्याच्यासोबतचा आश्रम बांधला होता. काळाच्या ओघात मठाची शोभा थोडी फिकट झाली होती, पण त्याची पवित्रता कायम होती. राघवची आई, पांढऱ्या रंगाची साधी साडी परिधान केलेली, डोक्यावरून पदर घेतलेली, मठाच्या परिसरात चालत होती. तिच्या हातात स्टीलची मोठी पातेली होती, त्यात गरम गरम वरण-भात आणि भाज्या भरल्या होत्या. ती स्वयंपाकघरातील बायकांना हसतमुखाने सूचना देत होती.

“आई, अजून दोन वाडग्या आणा. काही जण उशिरा आलेत,” एका सेवकाने सांगितले.

“हो, हो, देवाचं अन्न आहे. कमी पडणार नाही. कुणीही उपाशी जाऊ नये,” तिने हसत उत्तर दिलं.

अन्नदान पूर्ण झालं. सेवकांनी जागा आवरायला घेतली.

आता ती मठाच्या मोठ्या दगडी पायऱ्यांवर बसली. हलका वारं तिच्या केसांच्या पांढऱ्या बटा हलवत होतं. तिने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या चेहऱ्यावर समाधान तर होतं, पण डोळ्यांत काळजीही दडलेली होती.

“देवा, माझ्या मुलांना कायम तुझं संरक्षण असू दे. त्यांनी संघर्ष केला, यश मिळवलं, पण त्यांच्यात अहंकार येऊ नये,” तिने मनोमन प्रार्थना केली.

घरी आल्यानंतर ती नेहमीच्या आरामखुर्चीत बसली. दोघांच्या लाहानपणीची खेळणी तिने जपून ठेवली होती. समोरच काचेच्या कपाटातून ती खेळणी नेहमी दिसायची. त्यात बुद्धिबळ, सापशिडी, पत्ते असे अनेक खेळ होते. तिचे दोन्ही मुलं राघव आणि माधव हे जेव्हा ते खेळ खेळायचे तेव्हा त्यांच्या बाजूला ती बसायची आणि त्यांना त्या खेळांमधून जीवनाचे तत्वज्ञान सांगायची. तिला आता तिच्या भूतकाळाच्या आठवणींनी गाठलं!

साल 1999 चा काळ. भोरवाडी गावात प्राथमिक आणि नंतर जवळच्या शहरात जाऊन राघव आणि माधव या दोन भावंडांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते. राघव इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होता, तर माधवने बी. कॉम. पूर्ण केले होते. त्यांच्या वडिलांचा लहानपणीच अपघाती मृत्यू झाला आणि घरात काळोख पसरला.

ती तरुण विधवा, दोन लहान मुलं आणि डोक्यावर कर्ज. गावकऱ्यांनी मदत केली, पण कुटुंबाच्या जबाबदाऱ्या तिच्यावर आल्या.

“आई, मला इंजिनियर व्हायचंय आणि व्यवसाय करायचा आहे,” लहान राघवचा तेजस्वी चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला.

“आणि मला कॉमर्स लाइन मध्ये जाऊन नंतर मोठा व्यापारी बनायचंय,” माधवचा निर्धार ओसंडून वाहणारा होता.

तिने त्यांच्या डोळ्यातली स्वप्नं पाहिली आणि मनोमन ठरवलं, ती त्यांना शिकवेल, त्यांची स्वप्नं पूर्ण करायला मदत करेल. कष्ट करून तिने त्यांना शिकवले. मग तिने दागिने मोडले, थोडे पैसे जमा केले आणि त्यांना मुंबईत पाठवलं.

"राघव, स्वप्नं मोठी असली पाहिजेत ही जरी खरे असले तरी, ती पूर्ण करायला खूप हिंमत, मेहनत आणि जिद्द लागते. तुम्हाला जे काय करायचे ते एकत्र करा. एकीत ताकद असते. तुम्ही एकमेकांत कधीही अंतर पडू देऊ नका! मला वचन द्या! " आईने राघवला सांगितले होते.

तिचे शब्द त्याच्या मनात कायमचे कोरले गेले.

राघव आणि माधव, आईच्या आशिर्वादाने, थोडे पैसे आणि अपार आत्मविश्वास घेऊन मुंबईत दाखल झाले. मुंबईत त्यांनी घाटकोपरच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एक लहानसा गाळा भाड्याने घेतला. ती एक छोटीशी जागा होती, जिथे त्यांच्या भवितव्याचा पाया रचला जाणार होता. त्यांनी डिजिटल आणि एनालॉग इलेक्ट्रॉनिक मोजमाप यंत्रे जसे मल्टीमीटर, ऑसिलोस्कोप, फ्रिक्वेन्सी मीटर, रिक्शा मीटर, सिग्नल जनरेटर यासारखी अनेक उपकरणे तयार करण्याचा लहानसा उद्योग सुरू केला.

सुरुवातीला त्यांची अवस्था हलाखीची होती. राघवचे तांत्रिक ज्ञान आणि माधवची व्यापारी बुद्धिमत्ता हीच त्यांची खरी संपत्ती होती. कोपऱ्यावर जुनाट कमी किमतीत मिळणाऱ्या Electronics For You मासिकातून त्यांनी अनेक सर्किट आयडिया मिळवल्या आणि डिझाइन्स शिकले. मात्र, असे असले तरीही त्यासाठी लागणारे विविध आवश्यक इलेक्ट्रॉनिक्स सुटे भाग खूप महाग मिळायचे. ते स्वस्तात मिळवण्यासाठी त्यांनी एका स्थानिक बुद्रुक नावाच्या माणसाची मदत घेतली. बुद्रुक फक्त दहावी पास होता, पण त्याचा व्यावसायिक दृष्टिकोन जबरदस्त होता. त्याने त्यांना कस्टम मधून चोरून आणलेल्या स्वस्त आयसी आणि इतर पार्ट मिळवून दिले.

"राघव दादा, तुम्ही आता फक्त कामावर लक्ष केंद्रित करा. बाकी गोष्टी मी बघतो," बुद्रुक म्हणाला.

राघवने त्याच्यावर विश्वास ठेवला. बुद्रुकच्या मदतीने त्यांनी हळूहळू बाजारात नाव कमावायला सुरुवात केली. ग्राहकांनी त्यांच्या उत्पादनांची विश्वासार्हता ओळखली. आणि त्या लहानशा गाळ्यातील छोटा उद्योग वाढायला सुरुवात झाली.

भोरवाडीपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या तिरकिटवाडी या गावात बुद्रुकचा जन्म झाला होता. गरीब कुटुंब, जमिनीचा तुकडा अगदी थोडा! त्याच्या वडिलांचा शेतमजुरीवरच उदरनिर्वाह चालायचा. वडिलांचे दारिद्र्याने वाकून गेलेले आयुष्य पाहून लहान बुद्रुकने ठरवले, त्याला यापेक्षा वेगळं जीवन जगायचं आहे!

शाळेत त्याला अभ्यासात रस नव्हता, पण माणसांना समजून घेण्याची कला त्याच्याकडे लहानपणापासून होती. बाजारात फिरणारे व्यापारी, गावातील सावकार, आणि त्यांची व्यावसायिक भाषा याचा तो बारकाईने अभ्यास करायचा. दहावीपर्यंत त्याने शिक्षण घेतले, पण पुढे शिकण्याची आर्थिक स्थिती नव्हती. वडील आजारी पडले आणि कुटुंबावर जबाबदारी आली. बुद्रुकने गावातील किराणा दुकानात काम सुरू केले. तिथेच त्याला व्यवहाराचे बाळकडू मिळाले.

“व्यवसायात ग्राहकांना केवळ वस्तू नाही, तर विश्वास विकायचा असतो,” त्याच्या मालकाने एकदा त्याला सांगितले होते, आणि हे वाक्य बुद्रुकच्या मनात खोलवर जाऊन बसले. पण त्याची महत्त्वाकांक्षा इथे थांबणारी नव्हती.

मुंबईच्या बाजारपेठेची चमक त्याला नेहमीच आकर्षित करत होती. वयाच्या अठराव्या वर्षी, दोन कपड्यांच्या जोड्या आणि आईच्या हाताने बांधलेली छोटीशी गाठोडी घेऊन तो मुंबईत आला.

सुरुवातीला तो भाऊचा धक्का येथे हमालीचे काम करायचा. पण त्याची तीक्ष्ण बुद्धी, माणसांशी बोलण्याचे कौशल्य आणि सतत शिकण्याची इच्छा हळूहळू त्याला वेगवेगळी ओळख मिळवून देऊ लागली. काही महीने त्याने रेडियो, टीव्ही अशा एलेक्ट्रॉनिक्स आणि इतर काही इलेक्ट्रिकल वस्तूंच्या रीपेयरींगची कामे करु लागला. स्वत: वस्तू उघडून त्यातील पार्टचे निरीक्षण करु लागला. एलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगशी त्याचा काही एक संबंध नसला तरीही त्याला त्यातील बऱ्याच गोष्टी जसे कपॅसिटर, ट्रान्झिस्टर, रेजिस्टर, करंट, व्होल्टेज या सर्व गोष्टी माहीत झाल्या होत्या.

एकदा घाटकोपरच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एका छोट्या इलेक्ट्रिकल दुकानात काम करत असतांना त्याची ओळख राघव आणि माधव या दोन भावांशी झाली. सुरुवातीला त्याने त्यांच्याकडे फक्त माल पोचवण्याचे काम केले. पण लवकरच त्यांना त्याच्या व्यवसायिक दृष्टिकोनाची कल्पना आली. तो फक्त दहावी पास असला तरी त्याची व्यावहारिक बुद्धी आणि तडजोडीची कला त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवायची. काहीतरी जुगाड करून तो समस्या सोडवू शकतो ही त्यांच्या लक्षात आले आणि एकदा राघवने त्याला विचारले, “बुद्रुक, आपल्याला काही इलेक्ट्रॉनिक पार्ट स्वस्तात मिळू शकतील का?”

“साहेब, मिळतील. पण त्यासाठी थोडे धाडस करावं लागेल. मी बघतो,” बुद्रुकने आत्मविश्वासाने उत्तर दिले.

मग तो चोर बाजार, छुपे मार्केट किंवा कस्टम चुकवून आणलेला इलेक्ट्रॉनिक्सचा माल दोघा भावांना आणून द्यायला लागला.

कालांतराने बुद्रुकचे वडील वारले आणि त्यानंतर एकाच वर्षात त्याची आई वारली. त्याच्या मोठ्या बहिणीच्या लग्नाची आणि लहान बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी त्याच्यावर आली. एकदा राघव एका सर्किटवर काम करत होता. जवळच बुद्रुक उभा होता. त्याने आपल्या अनुभवातून त्या सर्किटमध्ये किती मायक्रोफॅरड युनिटचे कपॅसिटर योग्य राहील हे चुटकीसरशी सांगितले. राघवला प्रचंड आश्चर्य वाटले. आणि खरेच ते कपॅसिटर त्यात बसवल्यावर सर्किट अपेक्षेप्रमाणे चालायला लागले.

त्याच दिवशी राघवने सांगितले, "बुद्रुक! तुझ्या सगळ्या नोकऱ्या सोड. आजपासून तू फक्त आमच्यासाठी काम करणार!"

बुद्रुकने तो प्रस्ताव आनंदाने स्वीकारला. तो अतिशय प्रामाणिक होता. हळूहळू त्यांची इतर अनेक कामे तो करु लागला आणि त्याने दोघांचा विश्वास संपादन केला.
वर्षानुवर्षे मेहनत घेत, ते दोघेही त्यांच्या व्यवसायात प्रगती करत गेले. व्यवसाय वाढला. त्यांनी दोन नवीन गाळे विकत घेतले.

आता मायक्रोकंट्रोलर आयसी वापरून प्रोग्रामेबल इलेक्ट्रॉनिक उपकरणे ते तयार करू लागले. कंपनीचे नाव ठरले आणि ऑफिशियली रेजिस्टर झाले:

'Calibra Accurate Measurements Pvt Limited'.

बुद्रुक कंपनीच्या यशामध्ये मुख्य भूमिकेत होता. दहावी पास पण व्यावसायिक चातुर्याने भरलेली बुद्धी, यामुळे वस्तू विकणे आणि दुरुस्त करणे यात त्याने प्राविण्य मिळवले.

आईचे शब्द अजूनही राघवच्या आणि माधवच्या मनात होते..

"स्वप्नं मोठी असली पाहिजेत, पण ती पूर्ण करायला हिंमत आणि जिद्द लागते."

"खेळातूनच जीवन शिकता येतं. शिडी म्हणजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या संधी. चांगली माणसं, चांगले अनुभव, चांगल्या सवयी या सगळ्या आपल्या प्रगतीच्या शिड्या आहेत!"

शिडीच्या रूपाने बुद्रुक भेटला.

"कधी कधी आपण कुठल्या घोड्यावर चाललोय हे महत्वाचं नसतं मुलांनो! गरज असते ती पायाखालचा बुद्धिबळाचा पट समजण्याची!"

काळ पुढे सरकला. व्यवसायाची प्रगती होत असताना, त्यांनी मोठा फ्लॅट भाड्याने घेतला आणि तिथे दोघे भाऊ राहू लागले. कुटुंबालाही मुंबईत आणले. आई अधूनमधून काही दिवस त्यांच्याकडे राहायला येत होती. जास्त शिकलेली नसली तरी ती दोघांना उपयुक्त व्यावसायिक सल्ले द्यायची.

तिच्या मार्गदर्शनामुळे कठीण निर्णयही सोपे होत. दोघांना त्यांच्या बायकासुद्धा समजूतदार मिळाल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये प्रोग्रामिंग करणाऱ्या मायक्रोकंट्रोलर आयसीचा वापर सुरू झाला. जागतिक पातळीवर सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात झाली.

कंपनीचा खप वाढू लागला. अधिक नफा मिळू लागला. वाढत्या मागणीमुळे त्यांनी दोन मोठे गाळे विकत घेतले आणि आयसी प्रोग्रामिंगसाठी सॉफ्टवेअर इंजिनियर्सची भरती केली!

कंपनीने विस्ताराचे ध्येय ठेवले. त्यांना छोटे मोठे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मिळू लागले.

पण, मोठमोठे सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स मिळवायचे असतील तर ते प्रोजेक्ट्स कंपनीला देणारे कस्टमरसुद्धा मोठे आणि स्टँडर्ड असतील, आणि ते कस्टमर आपल्याला मिळवायचे तर त्यांच्या आपल्या कंपनीकडून ज्या क्वालिटीच्या अपेक्षा असतील त्यानुसार कंपनीत बदल करण्यासाठी भांडवल करोडो रुपयांत लागणार होते. त्यासाठी कंपनीला गुंतवणूकदार शोधावे लागणार होते, हे सर्व दोघा भावांच्या लक्षात येत होते!
कंपनीच्या प्रत्येक महत्वाच्या निर्णयाच्या वेळेस दोघे भाऊ आईला सल्ला विचारत. ती शक्यतो ऑफिसमध्ये यायची नाही पण सल्ला मात्र जरूर द्यायची.

यावेळेस आई म्हणाली होती..

"प्रत्येक बुद्धिबळाचा मोहरा वेगळ्या पद्धतीने चालतो, पण सर्वांचा उद्देश राजाला सुरक्षित ठेवणे हा आहे. कंपनी विस्तारताना, काही जणांकडून तुमच्यावर हल्ला होईल (प्रतिस्पर्धी), काही संधी खुणावतील (नवे मार्केट). तुमच्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम तुमच्या 'राजावर' म्हणजेच कंपनीच्या गाभ्यावर होईल. तुम्हाला केवळ 'शिड्या' मिळवायच्या नाहीत, तर सापांच्या हल्ल्यातूनही कंपनी सुरक्षित ठेवायची आहे."

त्या संदर्भात राघव, माधव आणि बुद्रुक मीटिंग रूममध्ये बसले होती आणि त्यांच्यात महत्वाची चर्चा चालली होती.

"राघव, आपण स्वतंत्र मोठे सॉफ्टवेअर युनिट सुरू करण्याचा निर्णय पक्का करूया. भविष्यात त्याला खूप मागणी असेल," माधवने सुचवले.

बुद्रुकही या कल्पनेला समर्थन देत म्हणाला, "हो, साहेब. सॉफ्टवेअरमध्ये मोठी क्षमता आहे. आपल्याला आता फक्त योग्य लोकांची गरज आहे."

माधव पुढे म्हणला, "आपल्या कंपनीची योग्य मार्केटिंग करणारा, गुंतवणूकदार शोधून देणारा सक्षम व्यक्ती आपल्याला शोधावा लागेल. आपल्या नात्यात तसा कुणी योग्य व्यक्ती नाही. जाहिरात देऊन आपल्याला असा व्यक्ती शोधावा लागेल!"

राघव म्हणाला, "आपला बुद्रुक काय वाईट आहे? तोही सहज करु शकतो. त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत!"

माधव म्हणाला, "पण, बुद्रुक सध्या जी कामे करत आहे त्यातून त्याला मार्केटिंग, सेल्स आणि गुंतवणूकदार जमा करण्यासाठी फिरण्यास वेळ मिळणार नाही. त्याच्यावर कामाचा जास्त दबाव पडेल. बुद्रुकची सध्याची कामे इतर कुणीही करूच शकत नाही. त्याला कंपनीच्या सर्व गोपनीय गोष्टी माहिती आहेत.

एखाद्या फॅमिली मेंबरपेक्षा बुद्रुक आपल्यला जास्त जवळचा आहे. सेल्स आणि मार्केटिंगची कामे आपण कुणी योग्य व्यक्ती अपॉइंट करून त्याच्याकडून करवून घेऊ शकतो.

लागल्यास बुद्रुक त्याला मार्गदर्शन करेल आणि बुद्रुकला आपण त्याचा इंटरव्ह्यू घ्यायला सांगू! काय बुद्रुक?"

बुद्रुक म्हणला, "जशी आज्ञा छोटे साहेब!"

प्रकरण 10

कॉन्फरन्स रूममध्ये इंटरव्ह्यू पॅनेलमध्ये राघव, माधव, बुद्रुक उपस्थित होते. त्यांच्यासोबत दोन अनुभवी गुंतवणूक एक्स्पर्ट देखील होते, सुहास आणि नेहा, जे बाहेरून बोलावले गेले होते. इंटरव्ह्यू सुरू झाला.

सुहास: (हसत) तर कौस्तुभ, तुमचा बायोडेटा आम्ही बघितला. प्रभावी आहे. तुम्ही एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम केले आहे. पण इथे या पदासाठी थोडी जास्त जबाबदारी असणार आहे. आता मी थेट प्रश्न विचारतो की, आमच्या कंपनीत गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही कोणत्या ठोस उपाययोजना सुचवाल?

कौस्तुभ: सर, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मी तंत्रज्ञान, विश्वास आणि स्पष्टता या तीन गोष्टींवर भर देईन.

नेहा: मिस्टर कौस्तुभ. कृपया जरा तुमचे म्हणणे विस्ताराने सांगा का?

कौस्तुभ: नक्कीच. प्रथम, तंत्रज्ञान. ही कंपनी तंत्रज्ञानावर आधारित कंपनी आहे. आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनांची गुणवत्ता वाढवू शकतो. यामुळे गुंतवणूकदारांना आपली उत्पादने अधिक आकर्षक वाटतील!

सुहास: उत्तम. आणि विश्वास?

कौस्तुभ: विश्वास हा कोणत्याही व्यवसायाचा पाया आहे. गुंतवणूकदारांना आपण आपल्या आर्थिक स्थितीची आणि व्यवसाय प्रक्रियेची पारदर्शक माहिती देऊ. वार्षिक अहवाल, वेळोवेळी होणाऱ्या बैठका, तसेच गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवरच्या परताव्याची स्पष्ट माहिती दिली जाईल.

राघव: (समाधानीपणे माधवकडे बघत) हे खूप महत्त्वाचे आहे.

माधव: होय. खरे आहे.

कौस्तुभने वापरलेल्या "आपण", "आपल्या" अशा शब्दांनी सर्वजण प्रभावित झाले होते.

नेहा: आणि स्पष्टता या तिसऱ्या मुद्द्याबद्दल काय सांगाल?

कौस्तुभ: आम्ही गुंतवणूकदारांसोबत नेहमी स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद ठेवू. कोणत्याही जोखमींविषयी माहिती लपवणार नाही. काही वेळेस त्यांच्या सल्ल्यानुसार व्यवसाय धोरणात बदल करू. यामुळे गुंतवणूकदारांना आपल्या कंपनीवर विश्वास बसेल.

राघव आणि माधव एकमेकांकडे बघून हसले.

सुहास: (माधव यांच्याकडे बघत आणि गंभीर होत) कौस्तुभ, या पद्धतीने गुंतवणूकदारांचा हस्तक्षेप वाढेल. ते कंपनीच्या कामकाजात अति हस्तक्षेप करतील, हे कंपनीसाठी चांगले असेल का?

कौस्तुभ: (शांत आणि आत्मविश्वासाने) सर, हे खरे आहे की गुंतवणूकदारांचा सल्ला घेतल्याने त्यांच्या अपेक्षा वाढू शकतात. पण मी येथे "सल्ला" म्हणत आहे, "निर्णय" नव्हे. गुंतवणूकदारांचे सल्ले त्यांचे अनुभव आणि दृष्टिकोन दर्शवतात. आपण त्यांचा आदर करू, परंतु अंतिम निर्णय व्यवस्थापनाचाच असेल. त्यांच्या सल्ल्याचा अभ्यास करून, आम्ही योग्य त्या बदलांची अंमलबजावणी करू. त्यामुळे गुंतवणूकदारांचा आदर राखला जाईल, आणि कंपनीच्या मुख्य धोरणांवरसुद्धा कोणताही अनावश्यक दबाव येणार नाही.

सुहास: (हसत) छान, याचा अर्थ तुमचा दृष्टिकोन समतोल आहे - गुंतवणूकदारांचा आदर ठेवून त्यांचा हस्तक्षेप मर्यादित ठेवणे.

कौस्तुभ: अगदी बरोबर, सर. कारण गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आणि कंपनीचे स्वातंत्र्य या दोन्हींचा समतोल राखणे आवश्यक आहे.

सुहास: छान विचार आहे. आणखी काही?

कौस्तुभ: होय, सर. नेटवर्किंग इव्हेंट्स, वेबिनार्स आणि इन्व्हेस्टर मीट्स आयोजित करून आम्ही गुंतवणूकदारांशी सतत संपर्कात राहू. तसेच, गुंतवणूकदारांसाठी स्वतंत्र टीम असेल जी त्यांच्या समस्यांचे निराकरण करेल.

राघव: (आश्वासक हसत) छान आहे, कौस्तुभ. तुमच्या उत्तरांमधून तुमचा दृष्टिकोन आणि प्रामाणिकता स्पष्ट दिसते.

माधव: नक्कीच. आम्हाला असाच उमेदवार हवा आहे जो गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकेल.

नेहा: कौस्तुभ, तुमच्या विचारधारेने आम्ही प्रभावित झालो आहोत.

कौस्तुभ: धन्यवाद, मॅडम. माझे एकच ध्येय असेल - कंपनीला प्रगतीच्या शिखरावर नेणे.

सर्व पॅनेलिस्ट समाधानाने एकमेकांकडे बघू लागले. हे बघून आपण जवळपास अर्धी लढाई जिंकली आहे हे लक्षात आले असले त्यामुळे होणारा आनंद कौस्तुभने आपल्या चेहऱ्यावर येऊ दिला नाही. अन्यथा पुढे अती आत्मविश्वास जागृत होऊन त्याच्याकडून बोलतांना चूक होण्याची शक्यता होती.

सुहास: कौस्तुभ, आता एक महत्त्वाचा प्रश्न. समजा, कंपनीला अचानक आर्थिक संकट आले आणि गुंतवणूकदारांनी परतावा मागितला, तर तुम्ही कसे व्यवस्थापित कराल?

कौस्तुभ: (क्षणभर विचार करून) सर, प्रथम, गुंतवणूकदारांना परिस्थितीची प्रामाणिक माहिती देईन. तात्पुरती समस्या आणि दीर्घकालीन दृष्टीकोन यातील फरक स्पष्ट करेन. दुसरे म्हणजे, नफा नसतानाही ठोस डेटा दाखवून त्यांना मी आपल्या भविष्यातील योजनेवर विश्वास बसेल असे पटवून सांगेल आणि परतावे उशिरा पण खात्रीने मिळतील हे स्पष्ट करेन. तसेच, खर्चात कपात आणि अतिरिक्त महसूल निर्माण करण्याचे मार्ग शोधेन!

नेहा: एक्सलंट! तुमची ध्येय धोरणे आणि स्पष्ट संवादाची शैली प्रशंसनीय आहे.

बराच वेळ शांत असलेला राघव हा माधवकडे कटाक्ष टाकून म्हणाला.

राघव: कौस्तुभ, तुमच्या करिअरमध्ये एक गॅप दिसतोय. त्याबद्दल सांगाल का?

या प्रश्नाने कौस्तुभ थोडा मनातून गोंधळला आणि त्याला विशाखा आठवू लागली. तिने केलेले खोटे आरोप आठवले. त्याचे मन खूप तीव्रतेने व्याकुळ झाले, त्यावेळेस विशाखा तिच्या कंपनीत नाश्ता करत होती तेव्हा तिला जबरदस्त ठसका लागला. पटकन टेबलावरून उठून ती पाणी प्यायला पळाली. बराच वेळ ठसका थांबला नाही. तिच्या डोळ्यातून ठसक्यांमुळे पाणी येऊ लागले. यावेळेस अचानकच काही कारण नसतांना तिला तिने कौस्तुभसोबत केलेल्या खोट्या आरोपांची आठवण झाली. ती खूप अस्वस्थ झाली.

इकडे भूतकाळाचे मळभ चेहऱ्यावर न येऊ देता कौस्तुभ उत्तर देऊ लागला.

कौस्तुभ: नक्कीच सांगतो सर. काही व्यक्तिगत कारणाने मी आधीची नोकरी सोडली, पण त्या नंतरच्या गॅपच्या काळात मी स्वतःला अपस्किल करण्यावर भर दिला. नवीन तंत्रज्ञान शिकलो, काही फ्रीलान्स प्रोजेक्ट्स घेतले आणि उद्योगातील तज्ञांबद्दल माहिती मिळवली. त्यामुळे माझी ज्ञान क्षमता वाढली. मॅनेजमेंटवरील अनेक सेमिनार मी प्रत्यक्ष अटेंड केली, ऑनलाइन कोर्स पाहिले आणि त्यामुळे मी अधिक आत्मविश्वासाने या भूमिकेसाठी सज्ज झालो आहे, असे मला ठामपणे वाटते.

राघव: (हसत) कौस्तुभ, तुमची प्रामाणिकता आणि तयारी दोन्ही दिसून येत आहेत. एकंदरीत तुमच्या उत्तराने माझे समाधान झाले आहे.

बराच वेळ शांत असलेला बुद्रुक, राघव आणि माधवकडे बघून गंभीरतेने कौस्तुभकडे वळला आणि विचारू लागला.

बुद्रुक: कौस्तुभ, तुमच्या मते कंपनीशी कर्मचाऱ्यांची निष्ठा म्हणजे नेमके काय?

कौस्तुभ: (शांत, पण ठाम) सर, माझ्या मते कंपनीशी कर्मचाऱ्यांची निष्ठा म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्रात पूर्ण प्रामाणिकता, ताणतणावातही सकारात्मकता आणि कंपनीच्या यशासाठी स्वतःला जबाबदार समजणे. याचा अर्थ अंध निष्ठा नाही, तर बुद्धिमत्तेने, जबाबदारीने आणि विश्वासाने केलेले कार्य.

कर्मचारी केवळ पगारासाठी नाही तर कंपनीच्या उद्दिष्टांसाठी मेहनत घेतात, हे त्यांच्या कामातून दिसले पाहिजे. आणि हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा कंपनी देखील त्यांच्या विकासाची, सन्मानाची आणि कल्याणाची काळजी घेते. निष्ठा एकतर्फी नसते, ती परस्पर विश्वासाने निर्माण होते. कंपनीनेही कर्मचाऱ्यांशी तेवढेच निष्ठावान असले पाहिजे.

बुद्रुक: (आश्वासक हसत) उत्तम. तुमचा दृष्टिकोन चांगला आहे.

सुहास आणि नेहा: ठीक आहे. इंटरव्यूसाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही राघव आणि माधव यांना आमचा फीडबॅक देऊ आणि कंपनी लवकरच तुम्हाला निर्णय कळवेल.
कौस्तुभ समाधानाने हसला आणि इंटरव्ह्यू संपला. दोनच दिवसांनी एच आर राऊंड झाला आणि काही दिवसांनी ऑफर लेटर आले.

ते स्वीकारुन झाल्यानंतर अपॉईंटमेंट लेटर आले.

त्याने ही बातमी घरी आणि मॅगीला कळवली. मॅगी आणि तिचे वडील भारतात कौस्तुभच्या घरी भारतात आले. आठ दिवस राहिले.

कौस्तुभ कंपनीत जॉईन झाला. काही ठराविक नातेवाईकांच्या साक्षीने त्यांचा साखरपुडा झाला.

मग कालांतराने लग्नही झाले.

प्रकरण 11

ऋषभला अनेक इंटरव्ह्यू कॉल येत असत. पण एचआर नेहमीच त्याला एकच प्रश्न विचारायचे, "तुम्ही पूर्वीची कंपनी का सोडली?"

ऋषभ सांगायचा, "कंपनीच्या धोरणांशी मतभेद झाले. मला माझ्या नैतिकतेशी तडजोड करता येत नव्हती!"

एचआर संशयाने म्हणत, "म्हणजे कंपनीत काही गैरप्रकार घडत होते का?"

ऋषभ पुढे म्हणायचा, "सर, मी केवळ माझ्या तत्त्वांशी प्रामाणिक राहायचं ठरवलं. कोणत्याही चुकीच्या गोष्टीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला!"

पण त्यानंतर तो पुढील फेरीसाठी शॉर्टलिस्ट होत नसे.

एकदा लॅपटॉपसमोर बसून, निराश चेहऱ्याने त्याच्या मेल इनबॉक्सवर नजर ठेवून होता. अजून एक नकाराचे मेल आले.

ऋषभ म्हणाला, "बापरे, अजून एक नकार... किती अर्ज केले, किती इंटरव्ह्यूज दिले... तरी काहीच झाले नाही! मी निमिष सोनार यांचे “इंटरव्ह्यू तुमचा आमचा” हे ईबुक वाचले. छान आहे, त्यामुळे बायोडेटा तयार करतांना आणि इंटरव्ह्यू देतांना बराच फायदा झाला!"

गौतमी किचनमधून आली, ती ऋषभच्या मागे येऊन त्याच्या खांद्यावर हलके हात ठेवून म्हणाली," डियर, ते पुस्तक छानच आहे. मी पण वाचले आहे. पण, एक नकार म्हणजे तुझ्या क्षमतेचा नकार नाही. त्यावरून एवढेच मानायचे की ती संधी तुझ्यासाठी नव्हती. अजून चांगले काहीतरी तुझी वाट पाहतेय!"

निराशपणे ऋषभ म्हणाला, "पण गौतमी, प्रत्येक वेळी हेच होतंय. मी माझा बायोडाटा पाठवतो, इंटरव्ह्यू देतो... आणि नंतर शांतता! त्या जुन्या कंपनीत ज्युनियरने माझ्या आयडिया चोरली आणि सीनियरने क्रेडिट घेतलं. मी विरोध केला तर त्यांनी मला चुकीचे ठरवले! सगळे मिळाले होते एकमेकांना. सत्ता महत्वाची आहे, गौतमी! सत्ता!! आणि सत्तेसाठी कुणीतरी एक किंवा दोन चार जण नेहेमी आपल्या पाठीशी असणे आवश्यक आहे. टोळीवाद किंवा ग्रुपिझम. किंवा मग अगदी वरच्या पदावर बसलेला कुणीतरी आपला ओळखीचा गॉडफादर पाहिजे!"

गौतमी त्याला धीर देत म्हणाली, "प्रत्येक अपयश ही एक शिकवण असते. आणि तू म्हणतोस तसे काही नसते. आपल्या मेहनतीला योग्य न्याय मिळतो. नेहेमी कुणाच्या पाठिंब्याची किंवा आधाराची गरज शोधणारा व्यक्ती, तो आधार कमकुवत झाला किंवा तुटला किंवा नाहीसा झाला तेव्हा काय करेल?"

"गौतमी, एवढं सोपं नाही ते. तुझ्याकडे जॉब आहे म्हणून तुला त्याची तीव्रता कळणार नाही!"

"हे असं तुझं माझं कधीपासून वाटायला लागलं ऋषभ तुला? तुला जॉब मिळेलच कधी ना कधी. जसे चांगले दिवस टिकून राहत नाही तसे वाढदिवस तरी कसे टिकून राहतील?"

"म्हणायला सोपं आहे गौतमी. मला खूप निराशा आल्यासारखं वाटतंय!"

"मी सुट्टी काढून चार-पाच दिवस आपण कुठे फिरायला जाऊन यायचं का? तेवढं तुला थोडासा बदल होईल!"

"आपण फिरायला गेलो तरी माझे मन काही तिथे नीट लागणार नाही. आता जोपर्यंत मला जॉब मिळत नाही तोपर्यंत मनी मन कशातच लागणार नाही!"

"डियर! आठव, या काळात तू किती टेक्निकल कोर्स केलेत. नवीन तंत्रज्ञान शिकलास. हीच तुझी ताकद आहे!"

थोडा सकारात्मक होत ऋषभ म्हणाला, "हो, नवीन टेक्नॉलॉजी शिकतोय... पण त्या टेक्नोलॉजी वर अनुभव विचारतात सगळीकडे. त्या जुन्या अनुभवाचा विचार केला की सगळं व्यर्थ वाटतं!"

गौतमीने सुचवले, "मग अनुभव घ्या. फ्रीलान्स प्रोजेक्ट्स करा. ओपन सोर्स प्रोजेक्ट्समध्ये योगदान द्या. अनुभव कागदावर नाही, कामात दिसतो!"

ऋषभ म्हणाला, "पण गौतमी, कधीकधी वाटतं... सगळं संपलं. त्या ज्युनियर आणि सीनियरच्या खेळामुळे विनाकारण मीच दोषी ठरलो आणि बळी पडलो. या कलियुगात आपल्यासारख्या सरळ लोकांचे काही स्थानच नाही असे वाटते!"

गौतमी त्याच्या समोर आली आणि त्याच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून त्याच्या डोळ्यांत बघून म्हणाली, "ऋषभ, खरा योद्धा तोच जो लढाईत सुरुवातील हरला तरी कधीही शरण जात नाही. आज अपयश आहे, पण उद्या यश असेल. तू फक्त धीर सोडायचा नाही. ते मागच्या कंपनीतील लोक तुझे शत्रू नव्हते, तर तुला जीवनात महत्त्वाचा धडा शिकवणारे गुरु होते असे समज!"

ऋषभच्या डोळ्यांत थोडा आत्मविश्वास परत आला आणि लॅपटॉप बंद करून तो उठला आणि म्हणाला, "ठरलं. अजून एक कोर्स करतो आणि अजून काही जणांना संपर्क करतो. नवीन टेक्नॉलॉजीजवर अधिक सराव करतो!"

गौतमी त्याला हळूच गालांवर किस देऊन म्हणाली, "आणि हो, ध्यानधारणा सुद्धा चालू ठेव. मन शांत असेल तर निर्णय नेहमी चांगले घेतले जातात!"

असे म्हणून ती किचनकडे जाऊ लागली तेव्हा त्याने तिचा हात पकडला आणि म्हणाला, "माझे ध्यान भरकटवले आणि वरून म्हणते ध्यानधारणा करा. आता मला फक्त गालावर नको. मला ओठांवर सुद्धा किस पाहिजे!"

आणि त्याने तिच्या हाताला धरून तिला बाजूच्या मोठ्या सोफ्यावर ढकलले, तिचा टॉप ओढून काढला आणि तिच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी चुंबन घेऊ लागला आणि ओठांकडे येऊ लागला.
लाडाने ती खोटा विरोध करत म्हणाली, "अरे काय करतोस? गुदगुल्या होताहेत!"

सोफ्यावरची शीट विस्कटली. उश्या तिरप्या झाल्या आणि एक खाली पडली. त्याने तिचे हात आपल्या दोन्ही हातांनी दाबून धरले.

"गौतमी, तुझ्या डोळ्यांत हरवायला खूप आवडतं मला!"

"आणि मला तुझ्या घट्ट मिठीत हरवायला!"

तेवढ्यात बेल वाजली. दोघं दचकले.

"कोण आलंय बरं? तुझी कोणी मैत्रीण?"

"छे शक्य नाही! तुझे तर कुणी ओळखीचे नाही ना?", तिने बाजूला पडलेला टॉप घाईने पुन्हा अंगावर चढवला.

"नाही गं! माझे कुणी कशाला येईल? तेही अशा वेळेस? आपण प्रेमाच्या सागरात उडी मारायच्या बेतात असताना??", स्वतःची बर्मुडा पुन्हा पायातून वर चढवताना तो म्हणाला.

"मी उघडते दरवाजा!"

भराभर कपडे चढवतांना त्याची भंबेरी उडाली होती. ते पाहून गौतमी हसू लागली. त्याला वाकोल्या दाखवत ती दरवाजाकडे जात म्हणाली, "एका पोराची कशी फट फजिती झाली!"
" ए. गप गं!"

गौतमीने दरवाजा उघडला. समोर गोकुळ उभा होता, चेहऱ्यावर हसरा भाव होता. तो ऋषभचा शाळेतला जिगरी दोस्त होता.

"अरे ऋषभ! काय मित्रा, कसा आहेस?"

"गोकुळ! तू इथे? काय ग्रेट सरप्राइज आहे!"

गौतमी म्हणाली, "या या, आत या ना. गोकुळ भाऊजी!"

गोकुळ आत येत इकडे तिकडे बघत म्हणाला, "वहिनी? या सोफ्यावर खूपच व्यायाम केलेला दिसतोय! काय रे ऋष्या? लेका, तुम्हा दोघांना मी डिस्टर्ब तर केलं नाही ना?"

गौतमी हसू लपवत लाजत म्हणाली, "नाही, काही नाही! ते आपलं असंच...! थांबा मी पाणी आणि चहा आणते"

आणि किचनकडे पळाली.

गोकुळ बाजूच्या खुर्चीवर बसत म्हणाला, "तुम्ही दोघांनी मिळून फार वाट लावली रे त्या सोफ्याची!"

"गप्प बस रे! सांग, कसा आहेस? आणि अचानक आलास!"

"मित्रा, तुला माहीत आहेच की मी सध्या मुंबईत एका केमिकल कंपनीत काम करतो. LinkedIn वर बघितलं की तू जॉब शोधतोयस, मग तुला भेटावसं वाटलं! माझ्याकडे एक संधी आहे!"

"तुझ्याकडे? म्हणजे कुठे? एक्चुअली ते असं झालं की माझ्या मागच्या कंपनीत एकदा...!"

गोकुळने त्याला थांबवलं, "जे झालं असेल ते झालं असेल मित्रा. सांगण्याची गरज नाही. मला तुझ्यावर विश्वास आहे त्यात तुझी काही चूक नसणार. माझे बुद्रुक नावाचे एक काका आहेत. त्यांच्या कंपनीत सध्या एक सॉफ्टवेअर इंजिनियर हवा आहे. आणि नात्यातल्या नाही पण एका जवळच्या आणि ओळखीच्या व्यक्तीला ते संधी देणार आहेत."

"खरं सांगतोस? काय रोल आहे?"

"सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, पण कंपनीत एकदम स्ट्रेटेजिक पोजिशन आहे. तुझा अनुभव त्यांना नक्की कामी येईल! आणि बुद्रुक काका म्हणजे एकदम डॉन आहेत, त्या कंपनीतले!"

हे ऐकून किचनमध्ये गौतमीला ऋषभचे थोड्या वेळापूर्वीचे शब्द आठवू लागले. तो म्हणाला होता," कुणीतरी गॉडफादर पाहिजे!"

ऋषभ गौतमीकडे पाहत विचारू लागला, "गौतमी तुला काय वाटतं गं ?"

गौतमी उत्साहाने म्हणाली, "अरे मला काय विचारतोस? ही संधी सोडू नकोस. तुमच्या जिगरी मित्राने आणलेले आहे ही संधी. आणि तुला कोणीतरी गॉडफादर सारखा माणूस हवा होता ना?"

ऋषभने होकार दिला.

गोकुळ म्हणाला, "मग ठरलं. मी काकांना सांगतो. ते तुला फोन करतील. इंटरव्ह्यू म्हणजे फक्त एक फॉर्मॅलिटी असेल! त्यांनी मला जेव्हा विचारलं होतं तेव्हा मला फक्त प्रथम तुझा चेहरा समोर आला आणि मी त्यांना सांगूनही टाकले!"

ऋषभ गोकुळचा हात हातात घेत म्हणाला, "धन्यवाद रे, मित्रा. तू येऊन इतकी चांगली बातमी दिलीस!"

"काही धन्यवाद नको. मित्रासाठी एवढं तर करणारच! तू नाही का रे मला शाळेत अनेक गोष्टींमध्ये मदत केली होतीस! मित्रा मित्रांमध्ये कसलं सॉरी, कसलं थँक्यू?"

"ओके सॉरी!"

"हे सॉरी कशाबद्दल?"

"तुला थँक्यू म्हटल्याबद्दल!"

हे ऐकल्यावर गोकुळ चहाचा कप हातात घेऊन येणाऱ्या गौतमीला म्हणाला, "ओ वाहिनी, जरा सुधरवा याला. असं काही बाही बोलत असतो!"

त्या दोघांना चहा देत दिलखुलास हसत गौतमी म्हणाली, "यांच्यात सुधारणा करणेच तर सुरू होते सोफ्यावर, तुम्ही येण्यापूर्वी!"

तिघे या गोष्टीवर खळाळून हसले.

गौतमी हसत म्हणाली, "गोकुळ भाऊजी, एवढे लांबून आले आहात, तर जेवण करूनच जा.

"नाही हो, तुम्हाला त्रास नको!"

"त्रास कसला? आज खास तुमच्यासाठी माझ्या हातचे डाळ भात, कढी, पापड, शिरा, भरले मसाले वांगे आणि चपाती बनवते!"

काही तासानंतर टेबलावर स्वयंपाक आला. तिघे जेवण करू लागले.

गोकुळ म्हणाला, "गौतमी वहिनी, तुम्ही भन्नाट स्वयंपाकी आहात!"

गौतमी, "असं म्हणालात, मग आणखी चपाती घ्या. आणि पुन्हा पुन्हा जेवायला या!"

सर्वांच्या चेहऱ्यावर हसू होतं, आणि ऋषभच्या चेहऱ्यावर नव्या संधीचा आत्मविश्वास झळकत होता.

प्रकरण 12

रात्रीचे आठ वाजले होते. ऋषभ हॉटेलच्या दारातून आत आला. मंद प्रकाश, मंद संगीत आणि टेबलावरच्या मेणबत्त्यांच्या उजेडात त्याने बुद्रुकला पाहिले. हॉटेल एकंदरीत छान प्रशस्त होते.

बुद्रुक हसत म्हणाला , "ये, ऋषभ. तुझीच वाट पाहत होतो!"

ऋषभ समोर येऊन बसला, "सर, मला तुम्ही कंपनीत संधी देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!"

काही कोल्ड ड्रिंक्स आणि स्टार्टरची ऑर्डर दिल्यानंतर ते पुन्हा बोलू लागले.

बुद्रुक म्हणाला, "अरे, त्यात काय एवढं? गोकुळ मला तुझ्याबद्दल सांगतच असतो. तुझ्याबरोबर काहीतरी घडले आणि मग तू तुझी मागची कंपनी सोडली होतीस बरोबर?"

गोकुळने बुद्रुकला नेमके माझ्याबद्दल आणखी काय काय सांगितले असेल याचा विचार करून ऋषभ थोडा साशंक झाला. पण ते चेहऱ्यावर तसे दिसू न देता तो फक्त होकारार्थी हसला.

मग बुद्रुक बोलायला लागला.

"तुझ्याबरोबर मागच्या कंपनीत नेमकं काय घडलं हे मी मात्र माहिती करून घेतलाय बर का! माझे कॉन्टॅक्टस वापरून!"
"तू तू तुम्ही... म्हणजे कसं?"

"ते सोड रे! त्याच्याशी तुला काय करायचंय? तो भूतकाळ होता आता आपण तुझ्या भविष्यकाळाबद्दल बोलू!"

उगाचच ही अशी मोठी माणसं कंपनीत वेगवेगळ्या पदांवर पोहोचत नाहीत? पोहोचलेली असतात ही सगळी. यांच्याशी सावधपणे बोललेले बरे!, असा विचार करून फक्त "हो सर! चालेल!" असे ऋषभ म्हणाला.

मग बुद्रुक बोलू लागला.

"आधी तुला थोडं कंपनीबद्दल समजावतो. आपली कंपनी 'Calibra Accurate Measurements' ही एक मोठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. तिची स्थापना राघव आणि माधव यांनी केली, जे दोन हुशार, दूरदर्शी आणि धाडसी उद्योजक आहेत!"

"होय, सर. त्यांची यशोगाथा सर्वश्रुत आहे. मी काही उद्योजक मासिकांमध्ये आणि युट्युब वर त्यांचे व्हिडिओ बघितले आहेत!"

"पण प्रत्येक यशाच्या सावलीत काही संघर्ष लपलेले असतात. सुरुवातीला मी त्यांना सहाय्यक म्हणून जॉइन झालो, आणि माझ्या मेहनतीमुळे मी हळूहळू व्यवस्थापनात स्थिरावलो. पण आता... आता मला जाणवतंय की काही गोष्टी माझ्याशिवाय घडू लागल्या आहेत"

"म्हणजे?"

"म्हणजे, काही निर्णय माझ्याशिवाय घेतले जात आहेत. मला विश्वासात घेतलं जात नाही. मला असं वाटतं की माझी भूमिका कमी केली जात आहे!"

"पण सर, राघव आणि माधव सर तुमच्यावर विश्वास ठेवतात ना?"

"हो, पण रक्ताच्या नात्यापेक्षा कंपनीत बाहेरच्यांचा प्रभाव जास्त असतो का? तूच सांग! विशेषतः जेव्हा त्या बाहेरच्यांना "विश्वासू" म्हटलं जातं, तेव्हा काही घरचे त्यात आडकाठी आणतात! मग समजा दोन बाहेरचे एकमेकांवर विश्वास ठेवून एकत्र झाले तर काय बिघडलं?"

आवंढा गिळून ऋषभ विचारू लागला, "मला नक्की काय करायचं आहे, सर?"

"अरे वा! पटकन मुद्द्यावर आलास. तुला माझा विश्वासू व्हायचं आहे. कंपनीत काय चाललंय, कोण काय बोलतंय, कोण काय ठरवतंय... सगळं मला कळलं पाहिजे. तू माझा डोळा आणि कान असशील! मीच का असे विचारू नकोस कारण, याचे उत्तर मी तुला आधी दिलेले आहे! मला गोकुळवर पूर्ण विश्वास आहे आणि गोकुळचा तुझ्यावर!"

"पण सर, आपण जे काही करत आहोत किंवा करणार आहोत हे योग्य असेल का?"

"योग्य-अयोग्य परिस्थिती ठरवते, ऋषभ! तुला तुझं कर्ज फेडायचंय ना? तुझ्या भविष्याचा विचार कर. इतके महिने झाले तुला दुसरीकडे जॉब मिळतो आहे का?"
"खरं आहे सर! नाही मिळत आहे!"

स्टार्टर संपून आता डिनरची ऑर्डर त्यांनी दिली.

"आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा इंटरव्ह्यू मी पास करून देईन आणि तुला नक्की जॉबवर घेतलं जाईल. कारण तुझा इंटरव्यू घेणारा सुद्धा माझा विश्वासू माणूस असेल! आतासाठी फक्त एवढेच. बाकी डिटेल तू कंपनी जॉईन झाल्यानंतर मी सांगेल!"

ऋषभने मान डोलावली.

बुद्रुक पुढे म्हणाला, "आणि हो, तुझे नेहमीचे सॉफ्टवेअरचे काम तर तुला करावे लागणारच आहे. त्यामुळे तसे तुझे काही नुकसान होणार नाही. पण माझ्यासाठी तू काम केल्यानंतर तुला मी भरपूर पैसे आणि इतर फायदे करून देईल. अजूनही शंका असेल तर तुला मी दोन दिवसांची मुदत देतो. विचार कर आणि डायरेक्ट मला कॉल करून हो किंवा नाही ते सांग! आणि हो बायकोला किंवा घरातील कुणालाही यातील काही सांगू नकोस! आज नाहीतर उद्या ते मला कळेलच बरं का!"

यामुळे ऋषभ थोडं कचरला. पण म्हणाला, "ठीक आहे, सर. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही! मी तुम्हाला दोन दिवसात माझा फायनल निर्णय कळवतो!"

त्यांचे डिनर टेबलवर आले होते.

"शाब्बास. आता डिनर करूया. पण लक्षात ठेव, ऋषभ, हे सगळे सिक्रेट आहे. तू जॉईन झाला नाहीस तरीही याची कुठे वाच्यता करायची नाही आणि जॉईन झाला तरीही आपल्यातली ही युती कुणाला कळता कामा नये!"

"समजलो, सर!"

दोघेही डिनर करत असताना, ऋषभच्या मनात असंख्य विचार चालू होते. तो एका खेळाचा प्यादा बनत होता, हे त्याला जाणवत होतं. पण परिस्थितीने त्याला दुसरा मार्ग ठेवला नव्हता.

दुसऱ्या दिवशी त्याने गोकुळ सोबत याची सविस्तर चर्चा केली आणि गोकुळने त्याला बजावले की बुद्रुकने जर सांगितले की बायकोला सांगायचे नाही तर तू बायकोला सांगू नकोस.

खरंच ऋषभने गौतमीला याबाबत काही सांगितले नाही. शेवटी त्याने हा जॉब स्वीकारायचा ठरवला.

बुद्रुकला रात्री जेवायला भेटायला जेव्हा ऋषभ गेला होता तेव्हा गोकुळने त्याला सांगितले होते की गोकुळ सोबत पार्टी म्हणून जेवायला चाललो आहे असे गौतमीला सांग. त्याने तसेच केले होते.

यथावकाश इंटरव्यू पार पडला, ऋषभ त्यात पास झाला आणि कंपनीत जॉईन झाला!

प्रकरण 13

सकाळचे सात वाजले होते. कोमलच्या डोळ्यांवर अजूनही झोपेचा अंमल होता, पण तिच्या तीन वर्षांच्या मुलीने, सानवीने, तिला हलवून जागं केलं.

"आई, भूक लागली!" सानवीचा तो गोड आवाज कोमलच्या थकलेल्या मनाला थोडं बळ देऊन गेला. कोमल उठली, स्वतःला सावरलं आणि स्वयंपाकघरात शिरली.

तिथे तिला विनोदची चिठ्ठी दिसली: "कोमल, आज दुपारी समाजसेवा संस्थेची मीटिंग आहे. रात्री उशिरा येईन. सानवीला सांभाळ – विनोद."

कोमलने ती चिठ्ठी वाचली आणि एक उसासा टाकला.

"हा माणूस कधी बदलणार नाही," ती स्वतःशीच पुटपुटली.

तिला आठवलं, काही वर्षांपूर्वी तिने विनोदला का निवडलं होतं. ऋषभ आणि कौस्तुभ, तिचे कॉलेजमधले मित्र, दोघेही तिच्यावर फिदा होते. पण विनोदच्या साधेपणाने, त्याच्या समाजसेवेच्या तळमळीने आणि त्याच्या प्रेमळ स्वभावाने तिला आकर्षित केलं होतं. त्याचं हसणं, तिच्याशी बोलताना त्याच्या डोळ्यांतली आपुलकी, आणि त्याचं तिला नेहमी आधार देण्याचं वचन – याने ती भारावून गेली होती.

पण आता, लग्नाच्या पाच वर्षांनंतर, त्या वचनांचं काय झालं होतं?

कोमलने सानवीला तयार केलं, तिला डे-केअरमध्ये सोडलं आणि स्वतः ऑफिसला निघाली. ती कॅलिब्रा लिमिटेड या कंपनीत पुणे ब्रँचची एचआर मॅनेजर होती. कॅलिब्रा आता इलेक्ट्रॉनिक्स सोबत सॉफ्टवेअरमध्ये उतरल्याने आणि पब्लिक लिमिटेड बनल्याने नाव बदलून कॅलिब्रा लिमिटेड असे करण्यात आले होते.

कोमलने तिच्या डेस्कवर बसताच तिच्या बॉसने तिला बोलावलं.

"कोमल, तुझं काम उत्तम आहे. पण मला तुझ्याकडून अजून अपेक्षा आहेत. येत्या काही महिन्यांत तू डिपार्टमेंट हेड बनू शकतेस, पण त्यासाठी तुला जास्त वेळ द्यावा लागेल आणि हो मुंबईला शिफ्ट व्हावं लागेल. हेड ऑफिसमध्ये!" बॉस म्हणाले.

कोमलच्या चेहऱ्यावर हसू आलं, पण मनात विचारांचं काहूर माजलं. तिला करिअरमध्ये पुढे जायचं होतं, पण सानवी आणि घराची जबाबदारी तिच्यावरच होती. विनोदला ती याबाबत बोलली होती, पण त्याचं उत्तर नेहमी एकच:

"तुझं करिअर महत्त्वाचं आहे, कोमल. मी पाहतो सानवीला."

पण प्रत्यक्षात, विनोदचं लक्ष त्याच्या समाजसेवेच्या कामातच जास्त असायचं. तो गावोगाव फिरायचा, गरजूंना मदत करायचा, आणि त्यातून त्याला समाधान मिळायचं. पण कोमलला वाटायचं, "माझ्या आणि सानवीच्या गरजांकडेही त्याने लक्ष द्यावं."

विनोद त्या दिवशी एका गावात होता, जिथे त्याच्या स्वयंसेवी संस्थेने शाळेसाठी पाण्याची व्यवस्था केली होती. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून त्याला आनंद झाला.

"हेच माझं खरं ध्येय आहे," तो स्वतःशी म्हणाला. त्याला कोमलची सुंदरता, तिची हुशारी आणि तिची मेहनत याचा अभिमान होता. पण त्याच्या मनात एक गोष्ट सतत खटकायची – कोमलला वाटायचं की तो तिच्या आणि सानवीच्या गरजा दुर्लक्षित करतो.

विनोदला त्याच्या आई-वडिलांनी नेहमी शिकवलं होतं, "कुटुंबापेक्षा समाज मोठा आहे."

त्याच्यावर त्यांच्या विचारांचा खूप प्रभाव होता. जेव्हा कोमलने लग्नानंतर लवकर मुलं नको असं सांगितलं, तेव्हा त्याने तिचं ऐकलं होतं.

पण एकदा, त्याच्या आईने त्याला सुनावलं, "विनोद, तुझं घर पाहिलंस का? नेहेमी तुम्ही दोघेच? वंश कधी वाढवणार? याचा विचार कर!"

झालं. त्याचं ठरलं. त्या रात्री, विनोदने कोमलला प्रणयाच्या बेधुंदीत इतकं वाहवत नेलं की कोमलच्या नकळत त्याने स्वतः प्रोटेक्शन वापरलं नाही, आणि तिलाही नंतर प्रोटेक्शन वापरण्याची आठवण राहिली नाही.

कोमल प्रेग्नेंट राहिली!

जेव्हा कोमलला हे कळलं, तेव्हा ती संतापली. "विनोद, माझा विश्वासघात का केलास?" तिने विचारलं.

विनोदला काय बोलावं हे कळलं नाही. तो फक्त म्हणाला, "मला वाटलं, आपल्याला मुलं हवीच आहेत. माझ्या आई-वडिलांना..."

"तुझ्या आई-वडिलांना?" कोमलने त्याला मध्येच तोडलं. "विनोद, हा माझा निर्णय आहे, माझ्या शरीराचा! तुला काय वाटतं, मला करिअर नको आहे? मला स्वप्नं नाहीत?"

"ही बघ, मुलं वेळच्यावेळी झालेली बरी असतात."

"हो का? पण हे तुला आधी माहित नव्हतं? आजच कशी तुला उपरती झाली बरं! आणि मी ऑफिस सांभाळून बाळाला सांभाळणार आणि तू? तुझं घरात लक्ष कुठे असतं?"

"आईने सांगितलंय, की माझी दूरची विभूती आत्या तुला बाळाला सांभाळायला मदत करायला येईल!"

"अरे? आत्या... पण मी कुठे तुला तशी विनंती केली की आत्यांना बोलाव. आई नाही का येऊ शकत? मला एक शब्दाने तू विचारले नाही?"

"आई नाही येऊ शकत. म्हणून आत्याला तिने सांगितले. आत्या आईच्या शब्दाबाहेर नाही!"

असे म्हणून तो चप्पल घालून घराबाहेर पडला.
त्या दिवसापासून कोमल आणि विनोद यांच्यात दुरावा निर्माण झाला.

विनोदची आत्या, विभूती, सतत त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची. ती कोमलला म्हणायची, "कोमल, तू जरा शांत राहायला हवंस.

विनोदला तुझ्या मागे मागे गोंडा घोळायला लावू नकोस. त्याचं समाजसेवेचं काम महत्त्वाचं आहे." कोमलला हे ऐकून राग यायचा, पण ती काही बोलायची नाही, कारण विनोदला तिने कधी गोंडा घोळ असे सांगितले नव्हते.

एकदा विभूती आत्या म्हणाली, "कोमल, तू सानवीला नीट सांभाळत नाहीस. ऑफिसला जाण्यापेक्षा घरी राहा. विनोदला तुझ्याकडून जास्त अपेक्षा नाहीत."

कोमलचा संयम सुटला. ती म्हणाली, "आत्या, माझं आयुष्य मी ठरवेन. विनोदला माझ्या करिअरबद्दल काही तक्रार नाही, मग तुम्हाला का त्रास होतो?"

विभूती आत्या चिडली आणि विनोदला म्हणाली, "हिला जरा आवर, विनोद. नाहीतर ही तुझ्या डोक्यावर बसेल."

विनोद, नेहमीप्रमाणे, गप्प राहिला. कोमलला त्याचं हे मौन असह्य झालं. ती म्हणाली, "विनोद, तुला काही बोलायचं आहे का? की तू नेहमीप्रमाणे माझ्या बाजूने बोलणारच नाहीस?"

विनोदने डोकं खाजवलं आणि म्हणाला, "कोमल, मी काय बोलू? आत्या मोठ्या आहेत. त्यांचा आदर करायला हवा."

कोमलच्या डोळ्यात पाणी आलं. तिला वाटलं, "हा माणूस कधी माझी बाजू घेणार?"

सानवी आता तीन वर्षांची झाली होती, आणि कोमलला ऑफिस आणि घर यांच्यात ताळमेळ साधणं कठीण होत होतं. तिच्या बॉसने तिला एक मोठी जबाबदारी दिली होती – एक नवीन प्रोजेक्ट, तोही मुंबईतील hed ऑफिसमध्ये, ज्यामुळे तिची डिपार्टमेंट हेड होण्याची शक्यता वाढली होती. पण त्यासाठी तिला रात्री उशिरापर्यंत काम करावं लागणार होतं.

एकदा, कोमलने विनोदला सांगितलं, "विनोद, मला तुझी मदत हवी. सानवीला तू आणि आत्या सांभाळा. मला प्रमोशन मिळाले आहे. पण मुंबई हेड ऑफिस मध्ये. ते स्वीकारुन मी जायचं ठरवलं आहे. सुट्टी असली की मी येत जाईन पुण्यात! याबाबतीत तुझं तर नाहीच नाही मी त्या आत्याचं सुद्धा ऐकणार नाही!"

विनोद हो किंवा नाही न सांगता मौन राहिला.

कोमल आणि विनोद यांचा संसार एका वळणावर आला होता. कोमलला तिचं करिअर आणि सानवी यांच्यात निवड करावी लागणार होती. विनोदला त्याच्या समाजसेवेच्या कामापेक्षा कुटुंबाला प्राधान्य द्यावं लागणार होतं. आणि त्यांच्या नात्यातला दुरावा कमी करण्यासाठी दोघांनाही एकमेकांशी मनमोकळं बोलावं लागणार होतं.

एक संध्याकाळ, कोमल आणि विनोद घरी एकत्र बसले. सानवी झोपली होती. कोमलने शांतपणे विचारलं, "विनोद, तुला खरंच माझ्या स्वप्नांची कदर आहे का? की तुला फक्त तुझ्या आई-वडिलांचं आणि समाजाचं ऐकायचं आहे?"

विनोदने पहिल्यांदाच कोमलच्या डोळ्यांत पाहिलं आणि म्हणाला, "कोमल, मला तुझा अभिमान आहे. पण मला कसं सांगावं हे कळत नाही. मला वाटतं, मी तुझ्यासाठी पुरेसं करत नाही."

कोमलने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, "विनोद, मला तुझ्याकडून फक्त साथ हवी आहे. तुझ्या आत्या किंवा आई-वडिलांना नाही, तुला माझी बाजू घ्यायला हवी."

विनोदने होकार दिला. "मी प्रयत्न करेन, कोमल. पण तूही मला सांग, मी काय करावं."

त्या रात्री, दोघांनी खूप दिवसांनी मनमोकळं बोलणं केलं. कोमलने ठरवलं की ती तिचं करिअर आणि कुटुंब दोन्ही सांभाळेल, पण विनोदनेही जबाबदारी उचलावी.

विनोदने ठरवलं की तो त्याच्या आत्या आणि आई-वडिलांना थोडा कमी हस्तक्षेप करायला सांगेल आणि सानवीसाठी जास्त वेळ देईल.

(काही काळानंतर)

आभाळात संथ फिरणाऱ्या ढगांनी संध्याकाळी नवी मुंबईवर हलकेच छाया टाकली होती. कॅलिब्रा लिमिटेड कंपनीच्या हेड ऑफिसच्या जवळ असलेल्या गजबजलेल्या परिसरात, कोमलने अखेर एक वन बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला. या निर्णयाने तिच्या आयुष्यातील एक नवीन पर्व सुरू केले होते. फ्लॅट छोटासा पण सुटसुटीत होता—बघताच तिच्या मनात एक सहजता आणि शांततेची भावना निर्माण झाली.

मोठ्या खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या रस्त्यावर वाहनांची रेलचेल, कार्यालयातून घरी परतणाऱ्या लोकांचे असंख्य चेहरे आणि निळसर संध्याकाळी टपोऱ्या दिव्यांनी न्हालेली शहराची रेखीव रचना!

घरात प्रवेश करताच, कोमलने एका हळूवार श्वासासोबत तिच्या निर्णयाचे मोल जाणले. भिंतींना स्पर्श करताच तिला जाणवला एका नव्या सुरुवातीचा आनंद. त्या रात्री ती पहिल्यांदा तिच्या छोट्याशा खिडकीतून शहराचे दृश्य पहात बसली, स्वतःशी बोलत, नव्या स्वप्नांची वीण बांधत.

या एका जागेत, जिथे आता तिच्या नव्या आठवणी जन्म घेणार होत्या, कोमलने स्वतःला एक नवी ओळख दिली होती—स्वतंत्र, मजबूत आणि स्वप्नांचा पाठलाग करणारी अशी एक करारी स्त्री!

तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर "रेणू" असं नाव दिसलं. रेणुका तिची कॉलेजमधली जिवलग मैत्रीण.

कोमलने फोन उचलला आणि थोडंसं हसत म्हणाली, "हाय रेणू, काय चाललंय?"

"अगं कोमल! कशी आहेस? अचानक असा निर्णय घेतलास आणि तू मुंबईला आलीस, काहीच कळालं नाही मला!" रेणुका उत्सुकतेने म्हणाली.

कोमलने दीर्घ श्वास घेतला, एका क्षणात आतल्या भावना उफाळून आल्या. "काय सांगू गं रेणुका? मला प्रमोशन मिळालं आणि विनोद आई-वडिलांच्या म्हणण्या बाहेर नाही. तुला तर माहीत आहे सानवी कशी झाली ते. आणि मग तेच त्याचं नेहमीचं नाटक आत्या वगैरे. त्याला आणि सानवीला घरीच ठेवलं आणि मी त्याला म्हटलं, आता तू आणि आत्या मिळून सानवीला बसा सांभाळत! मी चालले."

"अरे बापरे! म्हणजे अजूनही तो त्याच्या आत्याचं आणि आई-वडिलांचंच ऐकतो? तुला विचारत नाही नीट?" रेणुका आश्चर्यचकित होत म्हणाली.

"नाही गं", कोमलच्या आवाजात एक हलकीशी वेदना उमटली.

"कोमल, नवरे मंडळी किती स्वार्थी असतात ना! विनोदने स्वतःचा विचार केला, पण तुझं काय?" रेणुका संतापाने म्हणाली.

कोमलच्या मनात एक हलकासा गोंधळ होता, पण तिला ठाऊक होतं की हा निर्णय तिचा होता.

"हो रेणुका, मला वाटतं की आयुष्याचा वेगळा टप्पा सुरू करायचा आहे. माझ्या निर्णयाने मला नव्याने उभं राहता येईल, हेही महत्वाचं आहे."

रेणुका शांत झाली आणि हसत म्हणाली,

"अगं बाई, तू खरी मजबूत झाली आहेस! आता स्वतःसाठी काहीतरी मोठं कर. मुंबई म्हणजे संधींचं शहर आहे. आता तुझ्या निर्णयाचं स्वागत कर!"

"अग रेणुका ऐक ना. अधून मधून माझ्या घरी जात राहा. सानवीची खबर घेत रहा!"

"मग कोमल मॅडम. आपका हुकुम सर आखों पर!"

कोमल हसली, फोनवरच्या त्या संवादाने तिच्या मनात असणारा गोंधळ थोडा निवळला होता.

आता ती नव्या उर्जेने स्वतःच्या आयुष्याचा प्रवास सुरू करणार होती!

प्रकरण 14

कॅलिब्रा कंपनीत कोमलने आपल्या बुद्धिमत्तेचा आणि लोकांना हाताळण्याच्या कौशल्याचा पुरेपूर उपयोग केला. ती कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करायची, व्यवस्थापनाशी सुसंवाद साधायची आणि नवीन उपक्रम राबवायची. तिच्या नेतृत्वाखाली मानव संसाधन विभागाने अनेक यश मिळवले. तिच्या या कामामुळे ती कंपनीत लोकप्रिय झाली, आणि तिची सत्ता वाढत गेली. पण याच यशामुळे तिच्या मनात सत्तेचा हव्यास वाढत गेला.

तिला आता फक्त लोकप्रियता आणि नियंत्रण हवं होतं. ज्या प्रमाणात वैयक्तिक आयुष्यावरचं तिचं नियंत्रण सुटत चाललं होतं त्यापेक्षा जास्त ती व्यावसायिक आयुष्यात इतरांवर प्रभाव टाकण्यात आणि नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हायला लागली.

कोमलचे वैयक्तिक आयुष्य मात्र ढासळत चालले होते. विनोद आणि सानवी पुण्यात होते. विनोद तिला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, पण कोमलच्या मनात एक असंतोष खदखदत होता. तिला वाटायचं की, पुरुष लग्नानंतर बदलतात आणि त्यांना नेहमी दबावात ठेवावं लागतं. तिच्या मैत्रिणींच्या अनुभवांनी या विचारांना अधिक बळ दिलं.

एकदा तिची एक मैत्रीण शीतल तिला भेटली तेव्हा तिने आपली व्यथा मांडली, "कोमल, माझा नवरा लग्नाच्या आधी किती प्रेमळ होता. पण आता त्याला फक्त त्याचं काम आणि मित्र दिसतात. मला वाटतं, पुरुषांना आपण आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे, नाहीतर ते आपल्याला गृहीत धरतात."
कोमलच्या डोळ्यात चमक आली आणि ती म्हणाली, "अगदी बरोबर, शीतल. मलाही तेच वाटतं. विनोद पण आता मला तेवढं महत्त्व देत नाही. आपण पुरुषांना आपल्या बोटावर नाचवायला हवं. त्यांना दाखवायला हवं की, आपण त्यांच्यापेक्षा किती पुढे आहोत."

कोमलच्या मनातील पुरुषांबद्दलचा द्वेष अधिकच वाढला. तिने ठरवलं की, ती पुरुषांना आपल्या नियंत्रणात ठेवेल, आणि यासाठी तिला कंपनीत अमर्याद सत्ता हवी आहे. तिच्या मनात आता एकच ध्यास होता— सर्व काही आपल्या हातात असावं. पुरुषांना येनकेन प्रकारे आपल्या ताब्यात ठेवावं.

ती अधून मधून पुण्यात जायची तेव्हा विनोदची इच्छा असेल तेव्हा नाही तर फक्त तिची इच्छा असेल तेव्हाच त्याच्यासोबत प्रेम करायची किंवा त्याने इच्छा व्यक्त केल्यावर काहीतरी कारण काढून नाही म्हणायची आणि मग त्याचा मूड ऑफ झाला की मग लगेच मुद्दाम त्याच्यासोबत प्रणय सुरू करायची.

आपल्या ध्येयासाठी तिने प्रत्येक संधीचा उपयोग केला. तिने कर्मचाऱ्यांशी जवळीक साधली, त्यांच्या समस्या ऐकल्या आणि त्यांना आपलंसं केलं. तिने व्यवस्थापनाला आपल्या काबूत ठेवलं आणि कंपनीच्या धोरणांवर आपला प्रभाव वाढवला.

तिच्या या खेळामुळे ती कंपनीत एक अशी व्यक्ती बनली, ज्याच्याशी कोणीही पंगा घ्यायला धजत नव्हतं. तिच्या सत्तेची हवस इतकी वाढली की, ती आता आपल्या सहकाऱ्यांना आणि अधीनस्थांना दबावाखाली ठेवायची. तिच्या या वागण्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तिच्याबद्दल भीती आणि आदर यांचं मिश्रण निर्माण झालं.

कोमलच्या सत्तेच्या खेळामुळे तिचं वैयक्तिक आयुष्य अधिकच बिकट होत गेलं.

विनोदशी तिचे संवाद जवळजवळ बंद झाले होते. व्हायचे ते फक्त जुजबी.बोलणे. सानवी तिला फोन करायची, पण कोमल नेहमीच कामाचं कारण सांगून टाळाटाळ करायची.

एकदा सानवीने तिला फोनवर विचारलं, "आई, तू कधी घरी येणार? मला तुझी खूप आठवण येते."

चिडून कोमल म्हणाली ,"सानवी, मी खूप व्यस्त आहे. तुला समजत नाही का? मी तुझ्यासाठी आणि बाबांसाठीच हे सगळं करतेय."

सानवी रडवेल्या आवाजात म्हणाली,"पण आई, मला तुझी गरज आहे! तू कधी येणार?'

सानवीच्या या शब्दांनी कोमलला चटका बसला, पण तिने आपल्या भावना दाबल्या. तिला वाटलं की, सानवी अजून लहान आहे, तिला कसं कळणार? तिने आपलं सगळं लक्ष कंपनीवर आणि सत्तेच्या खेळावर केंद्रित केलं.

कोमलच्या मनातील पुरुषांबद्दलचा द्वेष तिच्या कामातही दिसायला लागला. ती पुरुष कर्मचाऱ्यांच्या कामात सतत चूक काढायची, त्यांच्यावर अनावश्यक दबाव टाकायची आणि त्यांच्या प्रगतीला अडथळा आणायची. दुसरीकडे, स्त्री कर्मचाऱ्यांना ती विशेष सवलती, बढत्या आणि संधी द्यायची, मग त्यांच्या कामाची गुणवत्ता कशीही असो. एकदा कंपनीच्या तिमाही बैठकीत नवीन प्रोजेक्टच्या जबाबदाऱ्या वाटप करण्यासाठी इतर मॅनेजर्स ला सोबत घेऊन सोबत कर्मचाऱ्यांशी चर्चा सुरू होती. कोमलने यात आपला प्रभाव दाखवला. "या प्रोजेक्टसाठी मी प्रिया आणि नेहा यांना लीडर म्हणून निवडतेय. त्यांच्याकडे नेतृत्वाची क्षमता आहे."

रोहन नावाचा कर्मचारी म्हणाला, "मॅडम, मला वाटतं की मीही हा प्रोजेक्ट हाताळू शकतो. माझा गेल्या प्रोजेक्टमधील रेकॉर्ड तुम्ही पाहू शकता."

कोमल थंडपणे म्हणाला, "रोहन, तुझं काम ठीक आहे, पण मला वाटतं की प्रिया आणि नेहा यांना ही संधी द्यायला हवी. त्यांच्याकडे जास्त उत्साह आहे."

रोहनला कोमलचा हा निर्णय पटला नाही, कारण त्याचा अनुभव आणि कामाची गुणवत्ता प्रिया आणि नेहापेक्षा जास्त होती.

बैठकीनंतर रोहन आणि इतर पुरुष कर्मचारी आपसात बोलायला लागले.

रोहन म्हणाला, "कोमल मॅडम नेहमी असंच करतात. पुरुषांना कधीच संधी मिळत नाही. प्रिया तर गेल्या प्रोजेक्टमध्ये अपयशी ठरली होती, तरी तिला लीडर बनवलं."

दुसरा कर्मचारी अजय म्हणाला, "हो, मला तर वाटतं त्या फक्त स्त्री कर्मचाऱ्यांना पुढे करतात. आपण कितीही मेहनत केली, तरी त्यांना फरक पडत नाही."

हा असंतोष कंपनीत पसरायला लागला, पण कोमलला याची पर्वा नव्हती. तिला वाटायचं की, ती पुरुषांना त्यांची जागा दाखवत आहे.

काही महिन्यांनंतर कंपनीत बढतीच्या संधी जाहीर झाल्या. कोमलने यातही आपला प्रभाव टाकला. तिने एका नवीन स्त्री कर्मचाऱ्याला, स्वातीला, मॅनेजर पदावर बढती दिली, तर अनुभवी पुरुष कर्मचारी, संजय, याला दुर्लक्षित केले.

संजय कोमलच्या ऑफिसात तावातावाने आला, "मॅडम, मी गेली पाच वर्षे कंपनीत काम करतोय. माझ्या कामाची प्रशंसा सगळीकडे झाली आहे. मला वाटलं, मला ही बढती मिळेल."

कोमल उदासीनपणे म्हणाली, "संजय, तुझं काम चांगलं आहे, पण स्वातीमध्ये मला जास्त पोटेंशियल दिसलं. तिला ही संधी देणं कंपनीसाठी फायदेशीर आहे."

संजय चिडून म्हणाला, "पण मॅडम, स्वातीला फक्त दोन वर्षांचा अनुभव आहे. तिच्या कामात अजूनही सुधारणेची गरज आहे. तुम्ही माझ्याशी प्रामाणिकपणे बोलणार आहात का?"

कोमल रागाने ओरडली, "संजय, माझ्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करू नकोस. मी एचआर हेड आहे, मला काय योग्य आहे ते माहिती आहे."
संजय निराश होऊन बाहेर पडला. त्याने आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना हा अनुभव सांगितला, आणि कंपनीत कोमलच्या भेदभावाबद्दल चर्चा सुरू झाली. कोमलच्या भेदभावामुळे कंपनीत असंतोष वाढत होता. पुरुष कर्मचारी तिच्याविरुद्ध तक्रारी करायला लागले, आणि काही स्त्री कर्मचाऱ्यांनाही तिच्या या वागण्याचा त्रास होऊ लागला.

एकदा एका स्त्री कर्मचाऱ्याने, राधिका, तिला स्पष्टपणे विचारलं,"मॅडम, तुम्ही नेहमी आम्हा स्त्री कर्मचाऱ्यांना पुढे करता, पण यामुळे पुरुष कर्मचारी नाराज होत आहेत. याचा कंपनीच्या वातावरणावर परिणाम होतोय."

"राधिका, मी जे करते ते कंपनीच्या हितासाठी आहे. पुरुष कर्मचारी जर नाराज असतील, तर त्यांनी जास्त मेहनत करावी."

राधिकाला कोमलचं उत्तर पटलं नाही, आणि तिने इतर कर्मचाऱ्यांसोबत याबद्दल चर्चा केली. हळूहळू कोमलच्या विरोधात एक गट तयार होऊ लागला. काही महिन्यांनंतर कॅलिब्राने एक मोठी कॉन्फरन्स आयोजित केली, जिथे सर्व शाखांमधील कर्मचारी एकत्र येणार होते. कोमल ही कॉन्फरन्स यशस्वी करण्यासाठी झटत होती, कारण तिला वाटायचं की, यामुळे तिची सत्ता आणखी मजबूत होईल. कॉन्फरन्सच्या पहिल्या दिवशी ती स्टेजवर बोलत असताना तिला खाली बसलेल्या लोकांमध्ये ऋषभ आणि कौस्तुभ दिसले. तिचं हृदय धडधडलं, आणि ती अस्वस्थ झाली. तिच्या पूर्वीचे प्रेमभावना उचंबळून आल्या. पण तिने स्वतःला सावरलं आणि भाषण पूर्ण केलं.

प्रकरण 15

कॅलिब्रा कंपनीच्या वार्षिक कॉन्फरन्सच्या दुसऱ्या दिवशी कोमल एका कॉफी लाउंज टेबलवर बसून कॉन्फरन्सच्या दुसऱ्या सत्राची तयारी करत होती. तिथेच तिची भेट एका दुसऱ्या कंपनीच्या सीईओ, मेघना कपूर, यांच्याशी झाली. मेघना एक यशस्वी आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होत्या, ज्यांनी आपल्या कंपनीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावून दिले होते. त्या कोमलच्या कामाने प्रभावित होऊन तिच्याशी बोलायला आल्या. कॉन्फरन्सच्या गोंगाटातून थोडं बाजूला येऊन दोघी एका शांत कॉर्नरमध्ये बसल्या.

"कोमल, मी तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे. कॅलिब्राच्या एचआर विभागाने गेल्या काही वर्षांत जे यश मिळवलं आहे, त्याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं. तुम्ही खरंच अप्रतिम काम करताय. आम्ही तुमच्या कंपनीत गुंतवणूक करतांना हा मुद्दा. पण विचारात घेतला होता"

"खूप खूप धन्यवाद, मेघना मॅडम. तुमच्यासारख्या यशस्वी व्यक्तीकडून हे ऐकणं खरंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी फक्त माझं काम प्रामाणिकपणे करतेय, आणि मला माझ्या टीमचा खूप पाठिंबा आहे."

"अरे, इतकी विनम्र असण्याची गरज नाही! मी तुमच्या उपक्रमांबद्दल वाचलं आहे—कर्मचारी कल्याण योजना, महिला सशक्तीकरण कार्यक्रम, आणि तुम्ही कंपनीच्या धोरणांवर टाकलेला प्रभाव. हे सगळं साधं नाहीये. तुमच्यात नेतृत्वाची खरी ज्योत आहे, कोमल."
"खरंच? तुम्हाला असं वाटतं? मला नेहमी वाटायचं की, मी फक्त माझ्या भूमिकेत चांगलं काम करतेय. पण तुम्ही म्हणता तसं... नेतृत्व वगैरे"

"कोमल, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. तुम्ही सध्या जिथे आहात, तिथे तुम्ही खूप चांगलं काम करताय, पण तुमच्यात त्यापेक्षा कितीतरी जास्त क्षमता आहे. तुम्ही फक्त एचआर हेड नाही, तुम्ही कंपनीला दिशा देऊ शकता. तुम्ही कधी सीईओ पदाचा विचार केलाय का?"

"सीईओ? मेघना मॅडम, तुम्ही आता विषय काढलाच आहे म्हणून तुम्हाला एक सांगते, की मी नेहमीच मोठी स्वप्नं पाहते. पण कॅलिब्रामध्ये राघव सर स्वतः सीईओ आहेत. ते कंपनीचे संस्थापक आहेत, आणि त्यांनी कंपनीला इथपर्यंत आणलं आहे. मला नाही वाटत ते कुणाला ती जागा देतील."

"कोमल, मी पण माझ्या कंपनीत असंच विचार करायचे. माझ्या कंपनीचे संस्थापक मला खूप प्रेरणा देत होते, पण मी एक गोष्ट शिकले—प्रत्येक नेत्याला एक दिवस आपली जागा.दुसऱ्याला द्यावी लागतेच. राघव यांनी ती इतर कुणाला. देण्यापेक्षा तुम्ही.त्यासाठी प्रयत्न केले तर काय वाईट? जर तुम्ही स्वतःला सिद्ध केलंत, तर तुम्ही त्यांना दाखवू शकता की, तुमच्या नेतृत्वाखाली कंपनी आणखी पुढे जाऊ शकते. आणि यात माझा सुद्धा स्वार्थ आहे कारण तुम्ही सीईओ झालात तर तुमच्या कंपनीशी आमचे संबंध आणखी दृढ होतील, नाही का?"

या दोघींच्या बोलण्यावर जवळच्या दुसऱ्या एका टेबलवर बसलेलं कुणीतरी गुप्तपणे लक्ष आणि नजर ठेऊन होतं.

"पण... मेघना मॅडम, हे साध्य करायचं कसं? म्हणजे, मी एचआर हेड आहे, पण सीईओ पदासाठी मला काय काय करावं लागेल? आणि राघव सरांना दुखावल्याशिवाय हे कसं करता येईल?"

"चांगला प्रश्न आहे, कोमल. पहिली गोष्ट, तुम्हाला स्वतःला कंपनीच्या प्रत्येक पैलूसाठी तयार करावं लागेल. एचआर हेड म्हणून तुम्हाला कर्मचारी आणि संस्कृती माहिती आहे, पण तुम्हाला आर्थिक धोरणं, मार्केटिंग, ऑपरेशन्स—या सगळ्यांचीही समज हवी. तुम्ही या क्षेत्रांत स्वतःला प्रशिक्षित करा. दुसरं, तुम्हाला बोर्ड आणि व्यवस्थापनाचा विश्वास जिंकावा लागेल. त्यांच्यासमोर तुम्ही असा प्रस्ताव ठेवा, जो कंपनीच्या भविष्यासाठी धाडसी आणि फायदेशीर असेल."

"हम्म, म्हणजे मला माझी भूमिका वाढवावी लागेल. पण राघव सरांचं काय? त्यांना असं कसं पटवणार की, त्यांनी सीईओ पद सोडावं?"

"राघव यांना थेट आव्हान देण्याची गरज नाही. त्याऐवजी, तुम्ही त्यांच्याशी एक विश्वासाचं नातं निर्माण करा. त्यांना दाखवा की, तुम्ही त्यांच्या दृष्टीकोनाला पुढे नेऊ शकता. तुम्ही त्यांच्याशी अशा गोष्टी बोलू शकता की, ‘राघव सर, तुम्ही कंपनीला इथपर्यंत आणलंत, आता तुम्ही संस्थापक म्हणून नवीन दृष्टीकोनावर लक्ष केंद्रित करा, आणि सीईओ म्हणून कुणाला तरी नवीन व्यक्तीला संधी द्या.’ त्यांना असं वाटलं पाहिजे की, हा त्यांचाच निर्णय आहे."

"हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण मला बोर्डात आणि कर्मचाऱ्यांमध्येही पाठिंबा हवा असेल, नाही का? आणि मला खात्री आहे की, काही लोक मला विरोध करतील, विशेषतः काही पुरुष कर्मचारी."

"हो, विरोध होईल. पण कोमल, तुम्ही विरोधाला घाबरता कामा नये. तुम्ही कर्मचाऱ्यांमध्ये आपलं स्थान मजबूत करा. तुम्ही जे महिला सशक्तीकरणाचे उपक्रम राबवता, ते आणखी वाढवा. कर्मचाऱ्यांना तुमच्यावर विश्वास वाटला पाहिजे. आणि बोर्डात तुम्हाला एक विश्वासू सहकारी हवा. तुम्ही तुमच्या CFO, माधव यांच्याशी बोललात का? त्यांचा पाठिंबा तुम्हाला खूप उपयोगी पडेल."

"माधव सर? हो, मी त्यांच्याशी थोडं बोलते, पण त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी मला आणखी प्रयत्न करावे लागतील. तुम्ही काय सल्ला द्याल?"

"माधव यांच्याशी तुम्ही त्यांच्या भाषेत बोलायला शिका. ते आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रित करतात, म्हणून तुम्ही त्यांच्यासमोर असे प्रस्ताव घेऊन जा, जे कंपनीच्या आर्थिक वाढीला चालना देतील. त्यांना तुमच्यावर विश्वास वाटला पाहिजे की, तुम्ही कंपनीच्या हितासाठी विचार करता. आणि हो, कोमल, एक गोष्ट लक्षात ठेवा—सीईओ होण्यासाठी तुम्हाला थोडा धोका पत्करावा लागेल. काही निर्णय तुम्हाला कठोर घ्यावे लागतील, आणि काही लोकांना दुखावलं जाईल. पण जर तुम्ही तुमचं ध्येय ठाम ठेवलंत, तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल."

"मेघना मॅडम, तुमच्याशी बोलून मला खरंच खूप प्रेरणा मिळाली आहे. मला आता समजतंय की, मला काय करायचं आहे. मी स्वतःला तयार करेन, आणि माझ्या डावपेचांवर काम करेन. पण मला एक भीती वाटते... जर मी अपयशी ठरले तर?"

"कोमल, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. मी पण माझ्या करिअरमध्ये अनेकदा अयशस्वी झाले, पण प्रत्येक अपयशाने मला काहीतरी शिकवलं. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यात सीईओ होण्याची लायकी आहे, आणि मी तुम्हाला खात्री देते, जर तुम्ही मेहनत आणि चिकाटी ठेवली, तर तुम्ही ते साध्य कराल."

"खूप खूप धन्यवाद, मेघना मॅडम. तुम्ही मला आज एक नवी दिशा दिलीत. मी तुम्हाला निराश करणार नाही. आणि कधी तुम्हाला माझी गरज भासली, तर मी नक्कीच तुमच्यासाठी असेन."

"कोमल, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि हो, मला मॅडम म्हणणं बंद करा. मेघना बोलायचं. आपण आता मैत्रिणी आहोत, नाही का? आणि आजचे जग स्त्रियांचे आहे. आज सगळीकडे स्त्रियांचे प्राबल्य आहे."

"हो, मेघना. खरंच, आज मला एक नवी मैत्रीण मिळाली."

"बरोबर. आणि आता जा, आणि तुमचं स्वप्न साकार करा. मी तुमच्या यशाची बातमी ऐकण्यासाठी उत्सुक आहे."

दोघी हसत उठल्या आणि कॉन्फरन्सच्या गोंगाटात परत मिसळल्या. कोमलच्या मनात एक नवीन आग पेटली होती. ती आता फक्त एचआर हेड नव्हती; तिच्या डोळ्यांसमोर कॅलिब्राच्या सीईओ पदाचं स्वप्न स्पष्ट दिसत होतं. मेघनाच्या शब्दांनी तिला नवीन दिशा आणि आत्मविश्वास दिला होता, आणि ती आता त्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणार होती.

या संवादाने कोमलच्या मनात सीईओ पदासाठी एक ठाम महत्वाकांक्षा जागृत झाली. तिने मेघनाच्या सल्ल्याचं पालन करायचं ठरवलं—स्वतःला सर्व पैलूंनी तयार करायचं, माधव यांचा विश्वास जिंकायचा, कर्मचाऱ्यांमध्ये प्रभाव वाढवायचा आणि राघव यांना सौम्यपणे बाजूला करण्याचा डाव आखायचा. हा संवाद तिच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरला, ज्याने तिच्या सत्तेच्या खेळाला नवीन वळण दिलं. कोमलने आपल्या नवीन ध्येयासाठी डावपेच आखायला सुरुवात केली. ती एचआर हेड म्हणून आधीच प्रभावशाली होती, पण सीईओ पदासाठी तिला व्यवस्थापनाचा विश्वास, कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आणि राघव यांच्यावर प्रभाव टाकणारी रणनीती हवी होती. तिने विविध डावपेचांचा विचार केला.

कोमलने आपला पहिला डाव खेळला—माधव यांच्याशी जवळीक साधणे. एकदा ती माधव यांच्या ऑफिसात गेली, जिथे ती एक नवीन कर्मचारी कल्याण योजना सादर करण्याच्या बहाण्याने बोलायला गेली.

"माधव सर, मी एक नवीन कर्मचारी कल्याण योजना आणली आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचं समाधान वाढेल आणि कंपनीची उत्पादकता सुधारेल. तुम्ही यावर तुमचं मत द्याल का?"

"कोमल, तुमचं काम नेहमीच प्रशंसनीय असतं. ही योजना खूप चांगली आहे. पण यासाठी बजेटची गरज आहे. मी राघव यांच्याशी बोलतो."

"धन्यवाद, सर. पण मला वाटतं, राघव सर खूप व्यस्त असतात. त्यांना सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणं अवघड होत असेल, नाही का? कदाचित त्यांनी काही जबाबदाऱ्या दुसऱ्यांना द्याव्यात."

"हम्म, राघव खूप मेहनती आहेत, पण तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते कदाचित जास्त ताण घेत असतील."

काही आठवड्यांनंतर कंपनीच्या बोर्ड बैठकीत एक नवीन प्रोजेक्टवर चर्चा सुरू होती. राघव यांनी एक धाडसी निर्णय घेतला, ज्यामुळे कंपनीला मोठी गुंतवणूक करावी लागणार होती. कोमलने याची संधी घेतली आणि पहिल्यांदा राघव यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला.

"राघव सर, आपला हा निर्णय खूप धाडसी आहे, पण मला वाटतं की, यामुळे कंपनीवर आर्थिक ताण येऊ शकतो. माझ्या एचआर विभागाने कर्मचाऱ्यांचा अभिप्राय घेतला आहे, आणि त्यांना वाटतं की, आपण थोडं सावध पवित्रा घ्यावा."

"कोमल, मी हा निर्णय कंपनीच्या भविष्यासाठी घेतला आहे. मला विश्वास आहे की, हे यशस्वी होईल."

"नक्कीच, सर. तुमच्या दृष्टीकोनामुळे कंपनी इथपर्यंत पोहोचली आहे. पण कदाचित आपण इतरांचेही मत विचारात घेतले, तर यशाची खात्री वाढेल."

कोमलच्या या बोलण्याने बोर्डातील काही सदस्यांच्या मनात शंका निर्माण झाली. तिने राघव यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला, पण त्यांना दुखावणार नाही याचीही काळजी घेतली. असे अनेक प्रसंग घडत गेले.

रात्री शहरातील फारशा वर्दळ नसलेल्या एका रेस्टॉरंट मधला एक कोपरा, दुपारचे जेवणानंतरची वेळ. ऋषभ आणि बुद्रुक एका टेबलावर बसलेले होते आणि, त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते.

ऋषभ म्हणाला, "गुरुजी, कळलं ना मेघना मॅडम आणि कोमल मॅडमचं बोलणं? मला विश्वास बसत नाहीये.

बुद्रुक डोळे मिटून उघडत म्हणाला, "हो ऋषभ. माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मेघना, जी स्वतः दुसऱ्या कंपनीची सीईओ आहे, ती कोमलला या पदासाठी तयार करत आहे? आणि कोमल... जिने तुला कॉलेजमध्ये... जाऊ दे ते. पण आता तिची महत्त्वाकांक्षा पाहून आश्चर्य वाटलं!"

ऋषभ म्हणाला, "म्हणूनच तर मला राग येतोय. तिने मला तेव्हा नाकारलं आणि आता इथे तिची आशा स्थितीत भेट झाली. ती थेट राघव सरांची जागा घेण्याचं स्वप्न बघतेय? आणि मेघना मॅडम तिला मदत करत आहेत? काहीतरी गडबड आहे!"

"बरोबर आहे तुझं म्हणणं. पण आपण लगेच कोणतीही प्रतिक्रिया देऊन चालणार नाही. आपल्याला शांतपणे विचार करावा लागेल!"

"पण काय विचार करायचा आहे? त्या दोघी मिळून काहीतरी डाव खेळत आहेत आणि राघव सर... आपल्याला अजून त्याचा काहीच अंदाज नाहीये!"

बुद्रुक टेबलावर हलकेच थाप मारत म्हणाला, "नाही ऋषभ. राघव आणि माधव दोघेही हुशार आहेत. पण कदाचित त्यांना या गोष्टीचा अंदाज आला असेलही. आणि म्हणूनच आपल्याला एक संधी आहे."

"संधी? कसली संधी गुरुजी?"

बुद्रुक आजूबाजूला पाहून, आवाज आणखी हळू करत म्हणाला, "ऋषभ, तू मला विचारलंस ना की मी सीईओ बनण्याच्या लायकीचा आहे की नाही? मेघना आणि कोमलच्या बोलण्याने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे - या कंपनीत नेतृत्व बदलण्याची शक्यता आहे. आणि जर बदल होणारच असेल, तर तो आपल्या फायद्याचा का नसावा?

"म्हणजे तुम्ही... तुम्ही खरंच सीईओ बनण्याचा विचार करत आहात?"
"मी या कंपनीसाठी सुरुवातीपासून काम केलं आहे. राघव आणि माधवच्या खांद्याला खांदा लावून मी प्रत्येक चढ-उतारात साथ दिली आहे. पण नंतर असे निर्णय झाले आहेत ज्यात मला बाजूला ठेवण्यात आले. आता मला असं वाटतंय की माझी क्षमता दाखवण्याची वेळ आली आहे!"

ऋषभ शांत होता.

बुद्रुक पुढे बोलला, "म्हणूनच तर आपल्याला सावधगिरी बाळगायची आहे. थेट कोमलला विरोध करून काहीही साधणार नाही. उलट, आपण राघव काय करत आहेत, कोमलच्या सांगण्यावरून ते खरोखरच पायउतार होणार आहेत का, यावर लक्ष ठेवूया!"

"म्हणजे आपण कोमलला विरोध न करता तिच्या हालचालींवर लक्ष ठेवायचं?"

"अगदी बरोबर. आणि त्याचसोबत, आपण राघवच्या जवळच्या लोकांमध्ये आपली चांगली प्रतिमा तयार करायची. त्यांना हे दाखवायचं की कंपनीसाठी कोण जास्त निष्ठावान आहे आणि कोणाला कंपनीची खरी काळजी आहे!"

ऋषभला शंका आली, "आणि जर राघव सरांनी कोमलच्या सांगण्यावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला, तर?"

बुद्रुक एक थंड स्मित करत म्हणाला, "तर मग कोमलला मार्गातून हटवण्यासाठी आपल्याला प्लॅन करावा लागेल. मेघना तिला मदत करत असली तरी, अंतिम निर्णय संचालक मंडळाचा असेल. आणि तिथे माझे काही हितचिंतक आहेत. आपण त्यांना वेळीच योग्य माहिती दे!"

"म्हणजे आपण दुहेरी चाल खेळायची आहे? एकीकडे राघवला सावध करायचं आणि दुसरीकडे कोमलला शह द्यायचा?"

"जवळपास तसंच. पण जास्त गडबड करायची नाही. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचलायचं आहे. कोमल आणि मेघना काय योजना आखतात, याची आपल्याला खबर ठेवावी लागेल. तुझ्या ओळखीतील लोक किंवा कंपनीतील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी काहीतरी व्यवस्था कर?"

"हो गुरुजी. माझ्या काही मित्रांना मी या कामाला लावू शकतो. आपल्याला प्रत्येक लहान-मोठी माहिती मिळत राहील! मी माझी गुप्तचर यंत्रणा कामाला लावतो"

"उत्तम! लक्षात ठेव ऋषभ, कोण कधी काय चाल खेळेल याचा नेम नाही. आपल्याला प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहायचं आहे. आणि आपला मुख्य उद्देश काय आहे, हे विसरता कामा नये - या कंपनीच्या नेतृत्वाची धुरा आपल्या हातात यायला हवी! मी त्यानंतर तुलाही महत्त्वाचे पद देईल. ऐश करशील मग!"

"हो गुरुजी. मी तुमच्यासोबत आहे. आपण मिळून या सगळ्यांना हरवू आणि तुम्हाला या कंपनीचे सीईओ बनवून दाखवू!"

"माझ्याकडे अजूनही काही उपाययोजना आहेत. पण त्या सगळ्यात शेवटी वापरावे लागतील. काही पत्ते अगदी शेवटी उघड करावे लागतात."

"कोणते आहे गुरुजी ते?"

"वेळ आल्यानंतर तुला सांगेल. आता नाही."

• • •

कोमलने कर्मचाऱ्यांमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू केला—‘महिला सशक्तीकरण कार्यक्रम’. या कार्यक्रमात तिने स्त्री कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण, नेतृत्वाच्या संधी आणि बक्षिसे दिली. पुरुष कर्मचाऱ्यांना यात सामील करून घेतलं, पण त्यांना दुय्यम भूमिका देण्यात आल्या. एकदा या कार्यक्रमाच्या उद्घाटनात ती बोलत होती.

"कॅलिब्रा ही एक अशी कंपनी आहे, जी समानतेवर विश्वास ठेवते. पण आपण स्त्रियांना पुढे आणलं, तर कंपनीचा विकास अधिक वेगाने होईल. मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की, या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि बदल घडवून आणा."

स्त्री कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाचं स्वागत केलं, पण पुरुष कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढायला लागला.

काही स्त्रिया सुद्धा या धोरणाचा विरोध करत होत्या. त्यांना वाटायचं की, कोमल फक्त स्त्रियांना पुढे करत आहे, यामुळे स्त्री पुरुष असा संघर्ष उफाळून येईल. हा असंतोष कोमलच्या कानावर आला, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. तिला फक्त आपलं ध्येय साध्य करायचं होतं.

कोमलने माधव यांच्याशी आपली जवळीक आणखी वाढवली. एकदा ती त्यांना एका नवीन धोरणाबद्दल सांगण्याच्या बहाण्याने भेटायला गेली.

"माधव सर, मला वाटतं की, कंपनीला आता नव्या नेतृत्वाची गरज आहे. राघव सर यांनी कंपनीला खूप काही दिलं आहे, पण त्यांना आता थोडं मोकळं व्हायला हवं. ते संस्थापक म्हणून राहू शकतात, आणि सीईओ पदासाठी नवीन व्यक्ती निवडली जाऊ शकते."

"कोमल, तुमचं म्हणणं काहीसं बरोबर आहे. राघव खूप ताण घेतात. पण त्यांना हे पटवणं सोपं नसेल."

"सर, जर आपण बोर्डात हा मुद्दा मांडला, तर कदाचित ते समजून घेतील. मी एक प्रस्ताव तयार करते, ज्यात मी दाखवेन की, नवीन सीईओमुळे कंपनीला कसा फायदा होईल."

माधव यांनी कोमलच्या या सूचनेला मान्यता दिली. कोमलने एक प्रस्ताव तयार केला, ज्यात तिने राघव यांच्या योगदानाची प्रशंसा केली, पण नवीन नेतृत्वाची गरज अधोरेखित केली. तिने स्वतःला अप्रत्यक्षपणे या पदासाठी योग्य उमेदवार म्हणून सादर केले.

कोमलच्या या डावपेचांमुळे कंपनीत तिचा प्रभाव वाढत होता, पण तिच्या भेदभावामुळे आणि सत्तेच्या हव्यासामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषही वाढत होता. पुरुष कर्मचाऱ्यांनी तिच्याविरुद्ध तक्रारी दाखल केल्या, आणि काही स्त्री कर्मचाऱ्यांनाही तिच्या या वागण्याचा त्रास होऊ लागला. बोर्डाने तिच्या प्रस्तावावर चर्चा केली, पण राघव यांनी आपलं सीईओ पद सोडण्यास नकार दिला आणि म्हणाले, "कोमल, तुम्ही खूप मेहनती आहात, पण मला वाटतं की, तुम्ही तुमच्या महत्वाकांक्षेमुळे कंपनीचं नुकसान करत आहात. कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे, आणि तुमच्या भेदभावाच्या तक्रारी माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत."

कोमलला राघव यांच्या या शब्दांनी धक्का बसला. तिला जाणवायला लागलं की, ती आपल्या काही हट्टांमुळे स्वतःच्याच महत्वाकांक्षेला अडचणीत आणत आहे. याचवेळी विनोदने तिला फोन करून सांगितलं की, सानवी आजारी आहे आणि तिला तिच्या आईची गरज आहे.

प्रकरण 16

संध्याकाळची वेळ होती. मुंबईतील राघव आणि माधव यांच्या आलिशान बंगल्यातील लिव्हिंग रूममध्ये मंद प्रकाशात सावित्रीबाई, त्यांची आई, आपल्या दोन्ही मुलांशी बोलत बसल्या होत्या. सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी शांतता होती, पण त्या राघव आणि माधव यांच्या चिंताग्रस्त चेहऱ्यांकडे बारकाईने पाहत होत्या. कंपनीच्या वाढत्या व्यापामुळे, कोमलच्या डावपेचांमुळे दोघे भाऊ तणावात होते.

त्यातच त्यांचा जिवाभावाचा माणूस, बुद्रुक, जो कंपनीच्या उभारणीत महत्त्वाचा आधार होता, त्याच्या बदललेल्या वागण्याने त्यांना चिंता सतावत होती. सावित्रीबाईंनी राघव आणि माधव यांना बोलते केले.

सावित्रीबाई हलकेच हसत, चहाचा कप हातात घेत म्हणाल्या ,"काय रे राघव, माधव, आज तुम्हा दोघांचे चेहरे काही तरी सांगतायत. कॅलिब्रा लिमिटेडच्या नव्या प्रोजेक्टमध्ये काही अडचण आहे की कोमलच्या डावपेचांनी तुम्हाला हैराण केलंय?"

राघव सोफ्यावर पाठ टेकवत, गंभीर होत म्हणाला, "आई, कोमलचे डावपेच तर रोजचेच आहेत. खरी काळजी आहे ती बुद्रुकची."

माधव मध्येच बोलत, लॅपटॉप बंद करत म्हणाला, "हो, आई. बुद्रुक कधीपासून आमच्याशी जरा जपूनच वागतोय. आधी तो आमच्याशी मनमोकळं बोलायचा, कंपनीच्या प्रत्येक टेक्निकल आणि स्ट्रॅटेजिक निर्णयात त्याचा सल्ला असायचा. पण आता तो काही तरी लपवतोय असं वाटतं. कालच मी त्याला नव्या स्मार्ट होम डिव्हाइसच्या प्रोजेक्टबद्दल विचारलं, तर त्याने नजर चोरली आणि म्हणाला, ‘माधव, मला जरा कॉल अटेंड करायचा आहे.’ आणि तिथून निघून गेला"

सावित्रीकाही क्षण विचार करत, चहाचा घोट घेत म्हणाल्या "हम्म... बुद्रुक हा तुमचा विश्वासू साथीदार आहे. कॅलिब्रा लिमिटेडची पहिली स्मार्ट डिव्हाइस लाइन तयार करताना आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या सुरुवातीच्या काळात त्याने तुम्हाला खूप साथ दिली. त्याचं वागणं बदललं असेल, तर त्यामागे काही कारण असणार. तुम्ही त्याला थेट विचारलं का?"

राघव हाताने मानेला स्पर्श करत म्हणाला, "विचारलं, आई. पण तो काही तरी खोटं कारण सांगतो. ‘राघव, मी ठीक आहे, फक्त थोडं व्यस्त आहे,’ असं म्हणतो आणि विषय टाळतो. पण मला वाटतं, त्याचं वेगळं काहीतरी बिनसलंय!"

सावित्रीबाई हसत, शांतपणे म्हणाल्या, "राघव, माधव, आयुष्य म्हणजे बुद्धिबळाचा डावच आहे. कधी कधी आपला विश्वासू हत्ती किंवा घोडा जागेवरून हलत नाही, पण त्याचा अर्थ तो आपला नाही असा होत नाही. कधी कधी त्याला फक्त योग्य दिशा दाखवावी लागते. आणि कधी कधी सापशिडीच्या खेळात, साप आपल्याला खाली खेचतो, पण शिडीवर चढण्याची संधीही असतेच. बुद्रुकला तुम्ही गैरसमजाच्या सापापासून वाचवायचं आहे!"

माधव हसत, डोकं खाजवत म्हणाला, "आई, तुझी ही बुद्धिबळ आणि सापशिडीची उदाहरणं कधी संपणार नाहीत! पण सांग, काय करायचं आम्ही? बुद्रुकला हाताबाहेर जाऊ द्यायचं नाही, हे आम्हालाही मान्य आहे. पण त्याचं वागणं का बदललं, हे आम्हाला कळायला हवं."

सावित्रीबाई गंभीर होत, कप टेबलवर ठेवत म्हणाल्या, "ठीक आहे. मग मला सांगा, राघव, नेमकं काय घडलं? बुद्रुकला परकं परकं वाटायला लागलं, कशामुळे? आणि तुम्ही म्हणता त्याचं वागणं बदललंय, तर तुमच्याकडूनही काही चूक झाली असेल का? सविस्तर सांगा. कारण जोपर्यंत मूळ कारण कळत नाही, तोपर्यंत उपाय सापडणार नाही."

राघव आणि माधव यांनी एकमेकांकडे पाहिलं.

राघवने एक दीर्घ श्वास घेतला आणि बुद्रुकच्या बदललेल्या वागण्यामागील प्रसंग सांगायला सुरुवात केली, तसेच त्यांच्याकडून झालेल्या चुकेचाही उलगडा केला.

"आई, सांगतो. आम्ही मागे एक मोठी मीटिंग घेतली होती जेव्हा आम्ही एक नवं स्मार्ट होम डिव्हाइस लॉन्च करत होतो, ज्याचं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दोन्ही आपल्या कंपनीने डेव्हलप केलं आहे. या प्रोजेक्टसाठी आम्ही एका आंतरराष्ट्रीय इन्व्हेस्टर ग्रुपशी बोलत होतो. कौस्तुभने इन्व्हेस्टर्स साठी फायदेशीर सौदा सांगितला, तेव्हा त्याने आमच्या प्रोजेक्टची विश्वासार्हता, सिक्युरिटी फीचर्स आणि दीर्घकालीन फायदे सिद्ध केले. इन्व्हेस्टर्स आमच्या बाजूने झाले. कोमलने पण मनुष्यबळ विभागाबद्दल बोलून, विविध बाजूंनी फायदे पटवून दिले!"

अशा प्रत्येक मिटिंग्जमध्ये खरे तर एचआर हेडची गरज नसते पण ती स्वतःहून विनंती करून उपस्थित राहायची. सोबत तिच्या मर्जीतल्या दोन तीन लेडीज एच आर पण असायच्या.

राघव पुढे सांगू लागला, "पण त्या मीटिंगमध्ये बुद्रुक खूपच शांत होता. आम्ही पण मीटिंगमध्ये त्याला त्याचे मीटिंग मत विचारले नाही. कदाचित ही आमची चूक होती!"

माधव पुढे म्हणाला, "मी त्याला मीटिंगनंतर विचारलं, ‘बुद्रुक, काय झालं? तू एवढा शांत का होतास?’ तर तो म्हणाला, ‘काही नाही, राघव. मी थोडा थकलोय.’ पण त्याच्या डोळ्यात काही तरी वेगळं दिसत होतं!"

आई म्हणाली, "असे एकदा नाही, अनेकदा तुमच्याकडून घडले असेल!"

राघव पुढे गंभीर होत म्हणाला, "मी सकाळी बुद्रुकच्या घरी गेलो. पण तो घरी नव्हता. त्याची बायको, लक्ष्मी, म्हणाली, ‘ते आजकाल खूप अस्वस्थ असतात.’ मला आश्चर्य वाटलं. मग पुन्हा कंपनीत आलो. त्याला शोधायला गेलो. तो कंपनीच्या टेरेसवर एकटाच बसला होता, मी त्याला विचारलं, ‘बुद्रुक, काय झालंय? तू मला खरं सांग.’"

सावित्रीबाई उत्सुकतेने, पुढे सरकत म्हणाल्या, "मग? त्याने काय सांगितलं?"

"आई, त्याने मला सांगितलं की तो ठीक आहे! बस! काही जास्त पुढे बोलला नाही."

सावित्रीबाई काही क्षण शांत राहून, डोळे मिटून घेत म्हणाल्या,

"हम्म... जे काही झाले असेल ते झालं, पण तुम्ही त्याचा विश्वास पुन्हा संपादन करा. हे खरे तर तुम्हाला मी सांगायला नको. बुद्धिबळातील एक सोंगटी जरी नसली तरी खेळ अपूर्ण राहतो, हे लक्षात ठेवा"

राघव आणि माधव यांनी एकमेकांकडे पाहिलं.

दोघांच्याही चेहऱ्यावर अपराधी भाव उमटले.

प्रकरण 17

कॅलिब्रा लिमिटेडच्या वार्षिक कॉन्फरन्सचे जेव्हा आयोजन करण्यात आले होते तेव्हा हॉलच्या मागील बाजूस ऋषभ बसला होता. सॉफ्टवेअर स्ट्रॅटेजिक हेड असलेला ऋषभ बाहेरून शांत आणि व्यावसायिक दिसत असला, तरी त्याच्या मनात विचारांचे वादळ चालले होते.

भाषण देताना कोमलला बघितल्यावर तो आश्चर्यचकित झाला होता. अचानक काही वर्षानंतर कोमलची भेट होईल आणि ती अशी होईल अशी त्याला वाटले नव्हते.

हॉलच्या दुसऱ्या टोकाला, सेल्स डिपार्टमेंटचा स्टार परफॉर्मर कौस्तुभ बसला होता. त्याच्या हातात नोटपॅड आणि पेन होते, पण त्याचे लक्ष कोमलच्या भाषणावर नव्हते. कॉलेजच्या दिवसांतील त्या क्षणाची आठवण त्याला सतावत होती, जेव्हा कोमलने त्याचे प्रपोजल नाकारले होते. त्यानंतर कॉन्फरन्स संपल्यानंतर, कॉफी ब्रेकसाठी सर्वजण लॉबीत जमले. कोमल तिच्या सहकाऱ्यांशी बोलत होती, तेव्हा कौस्तुभचे आणि तिचे बोलणे झाले होते.

"हाय, कोमल. तुझे भाषण खूप छान होते. तुझी प्रेझेंटेशन स्टाईल नेहमीच प्रभावी होती. मला वाटलं नव्हतं आपण या पद्धतीने पुन्हा भेटू."
"थँक्स, कौस्तुभ. काही वेळा मार्ग वेगळे झाले तरी ते कुठेतरी एका वळणावर येऊन मिळतात. ते असो. तुझ्या सेल्स टीमनेही आपल्या नव्या प्रॉडक्टसाठी खूप मेहनत घेतली आहे. मी ऐकले आहे, तू इन्व्हेस्टर्सना खूप इम्प्रेस केलेस."
"हो, मी माझी कौशल्य वापरून तसा प्रयत्न करतो. पण तुझ्यासारखा स्टेजवरचा करिष्मा माझ्याकडे नाही."

"अरे, तुझी फिल्ड वेगळी आहे. तू लोकांना विश्वासाने जिंकतोस, मी शब्दांनी."

दोघेही हसले, पण त्यांच्यातील संवादात एक अदृश्य भिंत होती. कॉलेजच्या आठवणी दोघांच्या मनात होत्या, पण त्यांनी त्या व्यक्त केल्या नाहीत. त्याचवेळी, ऋषभ लांबून त्यांच्याकडे पाहत होता. त्याच्या हातात कॉफीचा मग होता, पण त्याचे डोळे कोमल आणि कौस्तुभच्या संवादावर खिळले होते.

ऋषभ मनात म्हणाला, "कौस्तुभ? हा इथे काय करतोय? हा सुद्धा याच कंपनीत काम करतोय? सॉफ्टवेअर सोडून त्याने सेल्समध्ये उडी मारली. कोमल त्याच्याशी इतक्या मोकळेपणाने का बोलतेय? ते असो. कॉलेजमधला मॅटर तिथेच संपलाय. पण कोमल पूर्वीपेक्षाही जास्त सुंदर आणि तरुण दिसायला लागली आहे हे मात्र मानावे लागेल!"

त्यानंतर काही दिवसांनी, कौस्तुभ आणि ऋषभ यांची ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये अनपेक्षित भेट झाली होती.

"अरे, ऋषभ! किती दिवसांनी भेटलो. तू इथे सॉफ्टवेअर स्ट्रॅटेजी हेड आहेस, ऐकलंय. छान चाललंय ना?"

"हो, ठीक चाललंय. तू सेल्समध्ये चांगलं नाव कमावलंय, कौस्तुभ. बरं, कोमलशी तुझी भेट झाली का कॉन्फरन्समध्ये?"

"हो, भेटलो. ती खूप प्रोफेशनल आहे. अगदी थोडक्यात बोलणे झाले तिच्याशी. चल, मी आता निघतो. भरपूर कामं पडली आहेत. कधी तरी कॉफी प्यायला जाऊ. कॉलेजच्या आठवणी ताज्या करू."

ऋषभ बनावट हसत म्हणाला, "नक्की, नक्की! जाऊ कधीतरी."

दोघेही आपापल्या कामाला निघून गेले, पण त्यांच्या मनात एकमेकांबद्दल शंका निर्माण झाली होती. त्यानंतरही त्या तिघांनी कामाव्यतिरिक्त एकमेकांशी भेटणे टाळले.

कॅलिब्रा लिमिटेडमध्ये एक कॉर्पोरेट सापशिडी आणि बुद्धिबळाचा खेळ सुरू झाला होता.

खरे तर हे बुद्धीचे क्षेत्र आहे, बुद्धिबळाचा सगळा खेळ आहे. पण तिथे काहींच्या मनात सत्तेच्या स्पर्धेचा साप शिरला होता.

सगळ्यांना सत्तेच्या खुर्चीकडे जाणाऱ्या शिड्या दिसत होत्या आणि त्यासाठी इतरांना सापाच्या तोंडांत ढकलण्याची धडपड सुरू होती.

सगळ्यांना बुद्धिबळाच्या राजासाठी काम करायचे नव्हते, तर स्वतः राजा बनायचे होते.

एक मात्र होते की कौस्तुभ असो की ऋषभ, दोघांनी पूर्वीच्या कंपनीत जे राजकारण अनुभवले होते त्यावरून त्यांनी मनाशी हे पक्के ठरवले होते की काहीही झाले तरी ह्या कंपनीत टिकायचे.
आजूबाजूच्या राजकारणावर बारीक लक्ष ठेवायचे. काहीही झाले तरी कोणत्याच राजकारणाला बळी पडायचे नाही. उलट आपणच इतरांशी राजकारण खेळत पुढे जायचे.

कौस्तुभच्या मनात कंपनीचा चीफ फायनान्शिअल ऑफिसर (सीएफओ) होण्याची इच्छा होती. सध्या ती पोझिशन माधव सांभाळत होते आणि कोमलच्या मनात कंपनीचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (सीईओ) होण्याची महत्वकांक्षा होती आणि सध्या ती पोझिशन राघव सांभाळत होते.

कोमल आपल्या महत्वाकांक्षेला मूर्त रूप देण्यासाठी रणनीती आखत होती…

तिकडे बुद्रुकला कंपनीचा सर्वेसर्वा मालक व्हायला हवे होते कारण त्याला असे वाटत होते की कंपनीच्या उभारणीत राघव माधव यांच्यापेक्षा सुद्धा त्याचे योगदान आणि त्याची मेहनत जास्त आहे. बुद्रुक आपले स्थान टिकवण्यासाठी ऋषभच्या मदतीने कोमल आणि कौस्तुभ यांना रोखण्याचा प्रयत्न करत होता आणि ऋषभ सध्या बुद्रुकच्या दबावाखाली, नोकरी टिकवणे, पैसे कमावणे आणि कोमलच्या जुन्या आठवणींमध्ये अडकला होता.

जेव्हा कॅलिब्रा कंपनी आपल्या प्राथमिक अवस्थेत होती तेव्हाचा एक प्रसंग बुद्रुकला आठवला.

बुद्रुकने छोट्याशा कार्यालयात प्रवेश केला. त्याच्या हातात एक जुनी पिशवी होती, आणि कपडे धुळीने माखलेले होते. राघव आणि माधव टेबलवर काही कागदपत्रे पाहत बसलेले होते. बुद्रुकला पाहताच राघव यांनी डोके वर केले.

राघव म्हणाले, "अरे बुद्रुक, परत आलास? कसं काय झालं? त्या इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी मिळाल्या का?"

"हो, साहेब. सगळं मिळालं. यादीप्रमाणे सगळ्या वस्तू या पिशवीत आहेत!"

"छान! बुद्रुक, तू नेहमीच विश्वासू आहेस. ही सामग्री आमच्या पुढच्या डीलसाठी खूप महत्त्वाची होती. तुला किती त्रास झाला असेल, नाही?"

"त्रास... हो, साहेब, त्रास तर झालाच. पण काम झालं, एवढं पुरे!"

"ठीक आहे, तू आता घरी जा. थोडा आराम कर. उद्या परत कामाला लागू!"

"साहेब... मला तुम्हाला काही सांगायचं होतं!"

माधव यांनी विचारलं , "काय? काय झालं, बुद्रुक? काही अडचण आहे का?"

राघव पण लक्ष देऊन ऐकू लागले

बुद्रुकचा गळा दाटून आला आणि तो म्हणाला, "माझी... माझी मुलगी मोनी... ती... ती आता नाही राहिली!"

राघव आणि माधव दोघेही स्तब्ध झाले.

"काय? कधी झालं हे? तू तर सांगितलं होतंस की ती आजारी आहे, पण... हे इतकं गंभीर होतं?"

बुद्रुक डोळे पुसत म्हणाला, "हो, साहेब. मी तुम्हाला सांगितलं होतं की ती आजारी आहे. जवळच्या हॉस्पिटलमध्ये ती ऍडमिट होती. पण मला इथून जावं लागलं... त्या वस्तू आणण्यासाठी. घरी कोणीच नव्हतं तिच्याजवळ. लक्ष्मी दुसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. उपचारासाठी पुरेसे पैसे नव्हते... आणि... ती गेली!"

राघव म्हणाले, "बुद्रुक, आम्हाला खरंच माहिती नव्हतं की तिची तब्येत इतकी खराब आहे. तू आम्हाला सांगितलं असतंस तर!"

बुद्रुक म्हणाला, "मी सांगितलं होतं, साहेब. तुम्ही खूप टेन्शनमध्ये होता आणि रागावले होतात. मी तुम्हाला आणि राघव साहेबांना सांगितलं होतं की माझी मुलगी आजारी आहे. पण तुम्ही म्हणालात की हे काम खूप महत्त्वाचं आहे. मी नकार देऊ शकलो नाही कारण हे काम तुमच्या दोघांपैकी कोणीही करण्यासारखं नव्हतं ते मलाच करावं लागणार होतं. नाहीतर पुढे कंपनीचं खूप नुकसान झालं असतं. कस्टमचा चोरीचा माल आणायचा होता..."

"बुद्रुक, तू असं म्हणू नकोस. आम्ही तुला कधीच जाण्यासाठी जबरदस्ती केली नाही. आणि तू स्वतःच म्हणालास की ती लवकर बरी होईल!"

"हो, साहेब, मी म्हणालो होतो. कारण मला आशा होती. पण माझ्याकडे पैसे नव्हते, आणि मी इथून दूर होतो. माझ्या मुलीला कोणीच नव्हतं तिच्यासोबत!"

"बुद्रुक, शांत हो. आम्हाला खरंच वाईट वाटतंय. आम्ही काही करू शकलो असतो तर नक्की केलं असतं. पण आम्हीही त्या वेळी आर्थिक संकटात होतो. तुला माहिती आहे, आपली कंपनीआता प्राथमिक अवस्थेत आहे!"

"हो, साहेब. मला माहिती आहे. तुम्ही तुमचं काम केलंत, मी माझं काम केलं. पण माझी मुलगी... ती परत येणार नाही. मी तुम्हाला दोष देत नाही. हे माझं नशीब होतं!"

"बुद्रुक, तुला काही हवं असेल... म्हणजे, आम्ही काही मदत करू शकतो का?"

"आता काही नको, साहेब. आता काही फायदा नाही. मी फक्त सांगायला आलो. उद्या परत कामाला येईन"

बुद्रुक तिथून ओल्या डोळ्यांनी आणि जड पावलांनी जायला निघाला पण अचानक थांबून मागे वळून म्हणाला, "साहेब आज नाही पण नंतर मी तुम्हाला माझ्यासाठी जरूर काहीतरी मागेल तेव्हा ते तुम्ही जरूर द्या!"

दोघीही भाऊ म्हणाले, "नक्की बुद्रुक. तू केव्हाही माग. आम्ही तुला नक्की देणार! वचन आहे आमचे."

वरचा प्रसंग बुद्रुकला आठवला आणि त्याची डोळे पाणावले.

"कंपनीसाठी इतका सगळा मी त्याग केला. त्यानंतरही मी माझं सर्वस्व कंपनीसाठी अर्पण केलं. एवढं सगळं मी कंपनीसाठी करून पण सध्या माझी किंमत कंपनीत कमी झाली आहे. हे काही बरोबर नाही. मी आता बदल जरूर घेईन. ऋषभच्या मदतीने माझी बरीच कामे होत आहेत. आता वेळ आली आहे, विनीताची मदत घेण्याची!"

विनिता ही बुद्रुकची दुसरी मुलगी. तिने नुकतेच सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पूर्ण केले. वि

निता बुद्रुकचे आज्ञेबाहेर नव्हती. बुद्रुकने तिला नोकरीची हमी दिली होती. त्याने तिला सॉफ्टवेअर हॅकिंगमध्ये विशेष लक्ष द्यायला सांगितले. ती ही हुशार निघाली.

तिने हॅकिंग विषयातले सगळे कौशल्य आत्मसात केले.

आपली आई सावित्रीबाईच्या सांगण्यानुसार राघव आणि माधव यांनी बुद्रुकला खास बोलावून घेतले.

"बुद्रुक तू नाराज दिसतोस. अनेक दिवस झाले आमच्याशी बोलत नाहीस?"

"नाही तसे काही नाही. मी व्यक्तिगत अडचणीमुळे थोडा त्रासलेलो होतो!"

"आमच्याकडून नकळत काही चूक झाली असेल तर तसे आम्हाला सांग!"

"नाही. फक्त एक गोष्ट सांगायची होती!"

"अरे बुद्रुक? तू एखादी गोष्ट आम्हाला सांगण्यासाठी तू आमची परमिशन केव्हापासून घ्यायला लागला?"

"तसं नाही साहेब. माझी मुलगी विनिता सॉफ्टवेअर इंजिनियर झाली आहे. तिला हॅकिंग आणि सिक्युरिटीची फार आवड आहे त्यामुळे तिने त्यानंतर स्पेशल त्या विषयात सर्टिफिकेशन केले. तिला आपल्या कंपनीत सिक्युरिटी सेक्शन मध्ये एथिकल हॅकर या पदावर नियुक्त करावे अशी माझी इच्छा आहे! तुमच्या लक्षात आहे मागे माझ्या पहिल्या मुलीच्या दुर्दैवी मृत्यूच्या वेळेस तुम्ही मला वचन दिले होते!"

राघव आणि माधव यांचा जीव भांड्यात पडला. राघव म्हणाले, "अच्छा असे आहे तर! तुझ्या नाराजीमागे हे कारण होते तर! हे तर खूप सोपे झाले. तू सांग ती केव्हा तयार आहे? उद्याच तिला अपॉइंटमेंट लेटर देऊन टाकतो!"

"नक्की नक्की साहेब धन्यवाद! मी तिचा बायोडाटा तुम्हाला पाठवतो! चला तर आता मी निघतो बरीच काम पडले आहेत!"

असे म्हणून बुद्रुक तिथून तिथून निघायला लागला. केबिनमधून बाहेर पडताना त्याच्या चेहऱ्यावर कुत्सित हसू होते, "आता ही माझी दुसरी पोरगी मला माझी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मदत करेल!"

इकडे दोघांना हायसे वाटले. आता आईला सांगायला त्यांच्याकडे एक पॉझिटिव्ह मुद्दा होता. त्यांना आठवले की एकदा त्यांच्या आईने त्यांना सांगितले होते की बुद्रुकला आपल्या सोबत घेण्यापूर्वी त्याचे बॅकग्राऊंड चेक करा. आई त्यांना म्हणाली होती, "बघा मुलांनो. एखादा खेळ आपण खेळतो तेव्हा सोंगट्या ओळखीच्या निवडतो. समजा बुद्धिबळाचा खेळ आहे. त्यात हत्ती घोडा उंट असतो. दुसरा कुठला प्राणी असतो का??"

पण राघव आणि माधव यांना तशी गरज वाटली नाही. त्यांनी तशी जुजबी चौकशी केली होती पण ती वरवरची होती.

बुद्रुकचा भूतकाळ हा खूप वेगळा होता.

काही काळ तो गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये राहिला होता.

हे राघव आणि माधव यापैकी कोणालाही माहिती नव्हते…

प्रकरण 18

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलच्या भव्य बॉलरूममध्ये कॅलिब्रा लिमिटेडच्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीने नुकतेच एक मोठे प्रॉडक्ट लॉन्च यशस्वीपणे पूर्ण केले होते. बॉलरूम चमचमणाऱ्या लायटिंग, मंद संगीत आणि वेटर्सच्या गजबजाटाने भरलेला होता. राघव आणि माधव, कंपनीचे मालक, त्यांच्या आईसोबत मध्यवर्ती टेबलावर बसले होते.

कोमल एका गॉर्जियस ब्लॅक गाउनमध्ये उपस्थित होती, आणि तिच्या बोलण्यातून तिचा आत्मविश्वास झळकत होता. ती सहकाऱ्यांशी हसत-खेळत बोलत होती, तर कौस्तुभ, सूटमध्ये सजलेला, काही इन्व्हेस्टर्सशी चर्चा करत होता. ऋषभ, एका कोपऱ्यात उभा होता, त्याच्या हातात ड्रिंक्सचा ग्लास आणि डोळ्यांत एक गूढ भाव.

पार्टीच्या मध्यावर, बुद्रुक आणि ऋषभ हॉटेलच्या एका शांत कॉरिडॉरमध्ये गेले. बुद्रुकच्या हातात सिगार होता, आणि त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य.

"ऋषभ, तुला माहिती आहे का, कोमल ही आपल्या कंपनीसाठी किती धोकादायक आहे? ती राघव आणि माधव यांना हटवून स्वतः सीईओ बनायच्या तयारीत आहे."

ऋषभला हे माहीत होते. पण काही दिवस झाले ऋषभ ला कोमल बद्दल पुन्हा प्रेम वाटू लागले होते त्यामुळे तो थोडा अस्वस्थ वाटत होता. तू फक्त बुद्रुकच्या बडबडीला हो ला हो लावत होता.
"ऋषभ, तुझ्या मनात कोमल बद्दल पुन्हा प्रेम तर व्हायला नाही ना? गेले काही दिवस मला तसे जाणवते आहे खरे. आणि या खेळात तू माझ्यासोबत नक्की आहेस की नाही, हे ठरवलं पाहिजे. तुझी नोकरी, तुझी प्रगती... सगळं माझ्या हातात आहे!"

"तसं काही नाही गुरुजी पण..."

"हा पण जो आहे तो फार खतरनाक असतो बरं! लक्षात ठेव. घरी गौतमी सारखी बायको आहे. तुला गोकुळ सारखा मित्र आहे जो माझ्या सांगण्यावरून गौतमीला सगळं सांगेल!"

बुद्रुकने त्याचे मन बरोबर ओळखून घेतले होते. सगळीकडून कोंडी झाल्याचे ऋषभच्या लक्षात येत होते. बुद्रुकचे ऐकण्या वाचून पर्याय नव्हता.

ऋषभ मनातून चरफडत पण ते चेहऱ्यावर दाखवू न देता बुद्रुकला म्हणाला, "ठीक आहे, गुरुजी. तुम्ही करेक्ट आहात. सांगा, काय करायचं?"

"याला म्हणतात गुड बॉय. आता ऐक. आपण कोमलला थोड्या काळासाठी बाजूला करायचं. तिचा अपघात होईल. फार मोठा नाही, पण तिला काही आठवडे घरी बसावं लागेल. मी एका बस ड्रायव्हरला पैसे दिले आहेत. आज रात्री, जेव्हा कोमल तिच्या कारने घरी जाईल, तेव्हा तिच्या कारला धक्का लागेल. तिला मारायचं नाही आहे, फक्त जखमी करायचं आहे आपल्याला!"

सावधपणे इकडे तिकडे बघत ऋषभ घाबरून म्हणाला, "पण गुरुजी, जर कुणाला कळलं तर?"

"कुणाला कळणार? तू फक्त माझ्यासोबत राहा. आणि हो, ही गोष्ट तुझ्या आणि माझ्यापुरतीच राहील. अरे उलट तू खुश व्हायला पाहिजे कारण कोमलने कॉलेजमध्ये तुझ्या प्रेम भावना दुखावल्या होत्या त्याची तिला ही शिक्षा मिळेल असं समज!"

ऋषभने मान डोलावली, पण त्याच्या मनात भीती आणि अपराधीपणाची भावना होती. तरीही, त्याला आपली नोकरी प्यारी होती आणि बुद्रुकच्या दबावापासून सुटकेचा मार्ग त्याला सापडत नव्हता.

पार्टी रात्री उशिरापर्यंत चालली. कोमलने सगळ्यांशी हसत-खेळत संवाद साधला. रात्री ११:३० वाजता, तिने आपली पर्स उचलली आणि आपल्या सहकाऱ्यांना निरोप दिला.

कोमलने हसून मान डोलावली आणि हॉटेलच्या पार्किंग लॉटकडे निघाली. तिची काळी सेडान कार तिथे उभी होती. ती कारमध्ये बसली, सीटबेल्ट लावला आणि गाडी स्टार्ट केली. लांबून, ऋषभ तिला पाहत होता. त्याच्या हातात फोन होता, आणि त्याने बुद्रुकला मेसेज केला:
"ती निघाली."

बुद्रुकने आपल्या फोनवरून आणखी एक फोन केला…

• • •

नवी मुंबईच्या रात्रीच्या रस्त्यावर, कोमल आपल्या चकचकीत सेडान कारमधून घरी निघाली होती. रात्रीचा वेळ, रस्त्यावरची रहदारी कमी झाली होती, आणि वाशी ब्रिजच्या दिशेने तिची कार वेगाने धावत होती. तिच्या मनात पार्टीच्या गमतीजमती आणि हसण्याविनोदाच्या आठवणी ताज्या होत्या.

कोमलची कार वाशी ब्रिजच्या दिशेने पुढे सरकत होती, तेव्हा तिच्या मागून एक मोठी बस वेगाने जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. बसचा ड्रायव्हर, बुद्रुकच्या सूचनांनुसार, कोमलच्या कारवर नजर ठेवून होता.

रस्त्यावर इतर वाहने कमी असल्याने त्याला कोमलची कार सहज दिसत होती. कोमलला सुरुवातीला काहीच संशय आला नाही. ती तिच्या आवडत्या गाण्यांच्या तालावर ड्रायव्हिंगचा आनंद घेत होती. पण काही किलोमीटर पाठलाग केल्यानंतर तिला जाणवले की, तिच्या मागची बस असामान्यपणे जवळ येत आहे. तिच्या मनात शंका निर्माण झाली की, काहीतरी गडबड आहे.

वाशी ब्रिजवर पोहोचताच कोमलने आपली गाडी अधिक सावधपणे चालवायला सुरुवात केली. ब्रिजच्या दोन्ही बाजूंना खोल पाणी आणि कठडे होते, त्यामुळे तिथे कोणतीही चूक परवडणारी नव्हती.

बसने आता आपला वेग वाढवला आणि कोमलच्या कारच्या अगदी जवळ येऊन धडकण्याचा प्रयत्न केला. कोमलच्या तीक्ष्ण नजरेने आणि तिच्या ड्रायव्हिंग कौशल्याने ती बसला आपल्यापासून दूर ठेवण्यात यशस्वी होत होती. ती रस्त्याच्या डाव्या बाजूला सरकली, तर बस उजवीकडे; ती वेग वाढवताच बसही वेग वाढवत होती. हा पाठलाग आता एका धोकादायक खेळात बदलला होता. कोमलच्या हृदयाचे ठोके वाढले होते, पण ती स्वतःला शांत ठेवत होती. तिच्या डोक्यात एकच विचार होता—बसला आपल्या कारला स्पर्श करू द्यायचा नाही. क्षणभर तिला विनोद आणि आपली मुलगी आठवली.

जेव्हा कोमल आणि बस यांच्यातील हा पाठलाग शिगेला पोहोचला, तेव्हा अचानक ब्रिजच्या मागील बाजूने एक तगडी बुलेट बाईक, जी आतापर्यंत कोणाच्या नजरेस पडली नव्हती, प्रचंड वेगाने आवाज करत या खेळात सामील झाली. त्या बाईकचा आवाज—गडगडाटासारखा—रात्रीच्या ब्रिजवरच्या शांततेत घुमला.

बाईकस्वाराने, जो पूर्णपणे काळ्या रंगाच्या हेल्मेटने झाकलेला होता, अवघ्या काही सेकंदात बसला ओव्हरटेक केले. कोमलने आपल्या रीअर-व्ह्यू मिररमधून हे दृश्य पाहिले. तिला काही कळण्यापूर्वीच, बुलेट बाईकने एक धक्कादायक कृती केली—ती थेट बसच्या पुढे येऊन, रस्त्याच्या मधोमध उभी राहिली. बस ड्रायव्हरसाठी हा प्रसंग पूर्णपणे अनपेक्षित होता. त्याच्या डोक्यात फक्त एकच उद्दिष्ट होते—कोमलच्या कारला धडक मारणे. पण आता त्याच्या समोर ही बुलेट बाईक अचानक प्रकट झाली होती.

बाईकस्वाराने आपली गाडी रस्त्याच्या मध्यभागी उभी केल्याने बस ड्रायव्हरला काही कळेचना. त्याच्या मनात गोंधळ उडाला. तो कोमलच्या कारला धडक मारू की बाईकला चुकवू? त्याने घाईघाईत निर्णय घेतला आणि बसचा स्टिअरिंग हवेतून उजवीकडे जोरात फिरवला. पण हा निर्णय त्याच्यासाठी घातक ठरला. बसचा वेग इतका जास्त होता की, ती नियंत्रणाबाहेर गेली.
तिने ब्रिजच्या कठड्याला जोरदार धडक दिली. कठडा तुटला, आणि काही क्षणांतच बस खोल पाण्यात कोसळली. पाण्याचा प्रचंड आवाज आणि बसच्या धातूचा पुलाच्या खांबांना आपटून झालेला कर्कश आवाज रात्रीच्या शांततेत घुमला.

कोमलने हे सगळे आपल्या रीअर-व्ह्यू मिररमधून पाहिले. तिच्या हृदयाचा ठोका एका क्षणासाठी थांबला.

तिने तात्काळ आपली कार रस्त्याच्या कडेला थांबवली आणि मागे वळून पाहिले…

बस आता पाण्यात बुडाली होती, आणि त्या बुलेट बाईकस्वाराचा काहीच पत्ता नव्हता. तो कधी आला, कुठून आला, आणि का आला—हे कोमलच्या डोक्यात घोळणारे प्रश्न होते. तिने आपला फोन काढला आणि पोलिसांना कॉल केला.

तिच्या हातांना कंप सुटला होता, पण ती स्वतःला सावरत होती.

एक मात्र नक्की होते की त्या बुलेट बाईकस्वाराने वेळेवर येऊन तिचा जीव वाचवला होता अन्यथा आज पाण्यात तिच्यासाहित तिची कार बुडून गेली असती.

प्रकरण 19

सावित्रीबाई कंपनीच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवत होत्या. त्यांना बुद्रुकच्या वाढत्या नाराजीची आणि कोमलच्या महत्वाकांक्षेची जाणीव होती.

एका रात्री, जेव्हा राघव आणि माधव यांना सावित्रीबाईंनी बुद्रुकच्या नाराजीचे कारण शोधण्यास सांगितले, तेव्हाच त्यांनी एक गुप्त पाऊल उचलले.

त्यांनी आपल्या विश्वासू संपर्कांद्वारे एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हला भाड्याने घेतले, ज्याचे टोपणनाव होते "फिल्टर".

फिल्टर हा अनुभवी, हुशार आणि गुप्तपणे काम करणारा डिटेक्टिव्ह होता, जो कधीही आपले खरे ओळख उघड करत नसे. त्याचा साथीदार होता या शॅडो. त्याची सावलीसारखी सोबत करणारा.

सावित्रीबाईंसोबत झालेल्या गुप्त बैठकीत त्यांनी फिल्टरला कडक आवाजात स्पष्ट सूचना दिल्या.

"फिल्टर, मला कॅलिब्रामधील प्रत्येक संशयास्पद हालचालीवर नजर हवी. कोमल, कौस्तुभ आणि बुद्रुक यांच्यावर विशेष लक्ष ठेव. मला त्यांच्या प्रत्येक पावलाची माहिती हवी.

कोमल ही कंपनीच्या सीईओपदाच्या मागे आहे, आणि बुद्रुक माझ्या मुलांना मूर्ख बनवत आहे. मला सत्य जाणून घ्यायचे आहे."

फिल्टर शांतपणे म्हणाला, "मॅडम, काळजी नका करू. मी माझ्या पद्धतीने सगळं शोधून काढेन. तुम्हाला प्रत्येक तपशील मिळेल, पण माझ्या कामात कोणी हस्तक्षेप करायचा नाही."

सावित्रीबाई हसत म्हणाल्या, "तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, फिल्टर. पण लक्षात ठेव, ही कंपनी माझ्या मुलांची आहे, आणि मी ती कुणाच्या हातात जाऊ देणार नाही. आणि याबाबतीत गुप्ततेच्या अटी अर्थात तुला पाळायच्या आहेत. त्यात चूक होता काम नये."

फिल्टरने मान डोलावली आणि आपले काम सुरू केले. त्याने कोमल, कौस्तुभ आणि बुद्रुक यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

त्याला लवकरच कळले की, कोमल कंपनीच्या एचआर डिपार्टमेंटमध्ये आपल्या प्रभावाने आणि स्त्रियांना झुकते माप देण्याच्या धोरणाने बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला प्रभावित करत आहे.

त्याचवेळी, बुद्रुकने ऋषभ नावाच्या सॉफ्टवेअर स्ट्रॅटेजिक हेडला आपल्या हातात घेतले आहे, आणि त्याच्यामार्फत कोमलवर नजर ठेवत आहे.

फिल्टरने आपल्या गुप्तचर नेटवर्कचा वापर करून बुद्रुक आणि ऋषभ यांच्या संभाषणांवर लक्ष ठेवले आणि त्यांचे कोमलला एक्सीडेंटमध्ये जखमी करण्याबाबतचे संभाषण रेकॉर्ड केले.

"ऋषभ, सक्सेस पार्टी ही आपली संधी आहे. कोमल रात्री घरी एकटी जाईल. मी एका बस ड्रायव्हरला पैसे दिले आहेत. तो तिच्या कारला धक्का देईल. तिला मारायचं नाही, फक्त जखमी करायचं, जेणेकरून ती काही आठवडे ऑफिसपासून दूर राहील."

"पण गुरुजी, जर कुणाला कळलं तर?"

"कुणाला काय कळणार? तू फक्त माझ्यासोबत राहा. आणि हो, ही गोष्ट आपल्यापुरतीच राहील."

फिल्टरने हे रेकॉर्डिंग तातडीने सावित्रीबाईंना पाठवले. सावित्रीबाईंनी ते ऐकले आणि त्यांचा राग अनावर झाला.

त्या विचार करू लागल्या, "बुद्रुक, तू माझ्या मुलांना फसवण्यासाठी तुझ्या मार्गात येणाऱ्या कोमलला जखमी करायचा कट करतोस? पुढे जाऊन तू माझ्या मुलांनासुद्धा इजा करायला मागे पुढे बघणार नाहीस. आता तुझी खैर नाही."

सावित्रीबाईंनी फिल्टरला तातडीने बाहेर कुणी बघणार नाही अशा ठिकाणी बोलावले आणि सांगितले, "रात्री कोमलच्या मागे जा. तिचे रक्षण कर. जर तिला काही झाले, तर मी तुला सोडणार नाही."

"मॅडम, मी माझे काम करेन. कोमलला काही होणार नाही. पण मी स्वतः हे फील्ड वर हाताळणार नाही. पोलिसांत प्रकरण गेल्यावर विनाकारण माझे नाव जगजाहीर होईल... त्यामुळे तुम्ही यात सामील आहात हे सुद्धा सगळ्यांना कळेल. म्हणून मी माझ्या टीममधील मजबूत बांध्याच्या एका माणसाला या कामाला लावतो!"

"ठीक आहे. आणि काही घाबरू नकोस. माझ्या मैत्रिणीची मुलगी नवी मुंबई पोलिस दलात आहे. तुझ्या माणसाला काही झाले तर मी तिला सगळे सांभाळायला सांगेन. माझ्या मैत्रिणीला मी अनेकदा मदत केली आहे. तिच्या मुलीच्या शिक्षणाला मी मदत केली आहे!"
सावित्रीबाईंनी आता हे प्रकरण स्वतः पूर्णपणे हाताळायचे ठरवले.

इतक्यात बुद्रुकबद्दल जाधव आणि माधव यांना सांगितले तर गोष्टी बिघडण्याची शक्यता होती.

ठरल्याप्रमाणे फिल्टरच्या टीममधील माणसाने कोमलला वाचवले पण ड्रायव्हरला बसमध्ये चढून पकडण्या आधीच बस पुलाखाली पाण्यात कोसळली. त्यामुळे आता पोलिस चौकशी होणार होती.

फिल्टरने फोनवर सांगितल्यानुसार ते बाईकवर तिथून वेगाने निघून गेला होता.

नंतर कोमल सुद्धा आपल्या घरी पोहोचली.

प्रकरण 20

रात्रीचे साडेदहा वाजले होते. नवी मुंबईच्या रस्त्यांवर मंद प्रकाशात रस्ते चमकत होते, आणि पाम बीच रोडवरून येणारी कौस्तुभ आणि मॅगीची कार हळूहळू पुढे सरकत होती. मल्टिप्लेक्समधून नुकताच सिनेमा पाहून परतणाऱ्या या जोडप्याच्या चेहऱ्यावर हलकासा आनंद होता. मॅगी, जिने नेदरलँड्समधील रॉटरडॅमच्या गजबजलेल्या रस्त्यांवरून नवी मुंबईच्या या वेगळ्याच वातावरणात येऊन कौस्तुभसोबत नवे आयुष्य सुरू केले होते, खिडकीतून बाहेर पाहत होती.

तिच्या डोळ्यांत समुद्राच्या लाटांचा आवाज आणि रस्त्यावरच्या मंद प्रकाशात न्हाऊन निघालेल्या रात्रीचे सौंदर्य सामावले होते.

कौस्तुभ, जो गाडी चालवत होता, त्याच्या चेहऱ्यावर एक शांतता होती. त्याने मॅगीकडे पाहून हलकेच हसत विचारले, "सिनेमा कसा वाटला?"

मॅगीने हसत उत्तर दिले, "खूप छान! पण तुला माहीत आहे, मला अजूनही तुझ्या इथल्या रस्त्यांवरच्या ट्रॅफिकची सवय होत नाहीये. रॉटरडॅममध्ये सायकल चालवणं सुद्धा किती सोपं होतं!" तिच्या डच उच्चारातून येणारी मराठीची थोडीशी तोतरी बोली कौस्तुभला नेहमीच हसवायची. त्याने हसत हसत तिच्या हातावर हलकेच थाप मारली आणि म्हणाला, "हळूहळू सवय होईल. आणि नाहीच झाली, तर मी तुला सायकलवरून फिरवेन!"

दोघेही हसत असताना, रस्त्याच्या कडेला एक आकृती कौस्तुभच्या नजरेस पडली. ती एकटीच चालत होती, तिच्या पावलांमध्ये एक प्रकारची घाई आणि भीती दिसत होती. तिच्या मागे दोन माणसे संशयास्पदरीत्या चालत होते. कौस्तुभने गाडीचा वेग कमी केला आणि मॅगीला म्हणाला, "मॅगी, ती बघ... ती विशाखा आहे."

मॅगीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. "विशाखा? ती विशाखा? जिच्यामुळे तुला तुझी जॉब सोडावा लागला?"

कौस्तुभने होकारार्थी मान हलवली. त्याच्या चेहऱ्यावर एक क्षणासाठी जुने दुःख दिसले, पण लगेचच त्याने स्वतःला सावरले. विशाखा ही त्याच्या मागील कंपनीतली सहकारी होती. तिने कौस्तुभवर खोटा लैंगिक छळाचा आरोप केला होता, ज्यामुळे त्याला नोकरी गमवावी लागली होती. त्या प्रसंगाने त्याच्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळाले होते. पण आता, रस्त्यावर तिला एकट्याने आणि असुरक्षित पाहून, त्याच्या मनात माणुसकी जागी झाली.

त्याने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि मॅगीला म्हणाला, "मॅगी, ती अडचणीत दिसतेय. त्या दोघांचा हेतू चांगला दिसत नाही. आपण तिला मदत करायला हवी."

मॅगीने काही क्षण विचार केला. तिला कौस्तुभच्या भूतकाळातील त्या कटू आठवणी माहीत होत्या. पण तिच्या डच संस्कृतीतून आलेली माणुसकी आणि कौस्तुभच्या चांगुलपणावरचा विश्वास यामुळे ती लगेच म्हणाली, "ठीक आहे, कौस्तुभ. तू बरोबर आहे. आपण तिला वाचवायला हवं."

कौस्तुभने गाडी थांबवली आणि बाहेर पडला. विशाखा आता जवळजवळ धावत होती, आणि त्या दोन माणसांनी तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला.

ती ओरडत होती, "सोडा मला! जा इथून!"

कौस्तुभने आपली सारी ताकद एकवटली आणि त्या दोघांवर धावून गेला. "ए, थांबा! काय करताय तुम्ही?" त्याचा आवाज इतका दणकट होता की त्या दोघांनी क्षणभर थबकले.

पण त्यापैकी एकाने चाकू काढला आणि कौस्तुभकडे धावला.

कौस्तुभने आपल्या कॉलेजच्या काळातल्या बॉक्सिंगच्या प्रशिक्षणाचा उपयोग केला आणि एका झटक्यात त्याचा हात पकडून चाकू खाली पाडला. दुसऱ्या माणसाने कौस्तुभवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण कौस्तुभने त्याला एक जोरदार ठोसा मारला. मॅगी गाडीतून बाहेर आली आणि तिने आपल्या मोबाइलवरून पोलिसांना कॉल केला.

काही मिनिटांच्या धुमश्चक्रीनंतर, ते दोन्ही हल्लेखोर पळून गेले. विशाखा रस्त्यावर बसून रडत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि लज्जा यांचे मिश्रण दिसत होते. कौस्तुभ तिच्याजवळ गेला आणि शांतपणे म्हणाला, "विशाखा, तू ठीक आहेस ना?"

विशाखाने डोळे पुसत त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यांत पश्चाताप स्पष्ट दिसत होता. "कौस्तुभ... मला... मला माफ कर," ती अडखळत म्हणाली. "मी तुझ्यावर खोटा आरोप केला होता. माझ्यामुळे तुझी नोकरी गेली. मला खरंच खूप पश्चाताप होतोय."
मॅगी, जी आता कौस्तुभच्या शेजारी उभी होती, तिने विशाखाकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर सहानुभूती होती.

"विशाखा, जे झालं ते झालं. पण आता तू सेफ आहेस. चल, आम्ही तुला तुझ्या घरी सोडतो," मॅगीने मऊ आवाजात सांगितले.

विशाखाने डोके खाली घालून होकार दिला. तिघेही गाडीत बसले. रस्त्यावर शांतता होती, फक्त गाडीच्या इंजिनाचा आवाज आणि समुद्राच्या लाटांचा मंद आवाज यांचा मेळ ऐकू येत होता.

गाडीत बसल्यावर विशाखाने सांगायला सुरुवात केली. "कौस्तुभ, त्या कंपनीतून मला काढून टाकलं. माझ्यावरही खोटे आरोप झाले. आता मला काहीच सुचत नाही. मी तुझ्याशी खूप वाईट केलं. पण मी आता HR ला ई-मेल करणार आहे. मी त्यांना सांगणार आहे की तुझ्यावरचा आरोप खोटा होता. तू निर्दोष आहेस." तिचा आवाज कातर आणि प्रामाणिक होता.

मॅगीने कौस्तुभकडे पाहिले, आणि त्याच्या डोळ्यांत तिला एक सौम्य समाधान दिसले.

कौस्तुभने शांतपणे विचार केला आणि म्हणाला, "विशाखा, जे झालं ते विसर. पण तू खरंच पश्चाताप करत असशील, तर तुझ्या चुकीचं प्रायश्चित कर. HR ला खरं सांग. आणि हो, तू जॉबबद्दल विचारलंस... मी माझ्या काही ओळखींच्या लोकांना विचारून बघतो. पण तुला स्वतःला पुन्हा उभं राहावं लागेल."

विशाखाने डोके हलवले. "हो, कौस्तुभ. मी प्रयत्न करेन. आणि खरंच, तुम्हा दोघांचे खूप आभार. तुम्ही मला वाचवलंत."

गाडी विशाखाच्या इमारतीसमोर थांबली. ती उतरली, आणि शेवटचा निरोप घेताना तिच्या डोळ्यांत कृतज्ञता आणि पश्चाताप यांचे मिश्रण होते.

कौस्तुभ आणि मॅगीने तिला इमारतीच्या गेटपर्यंत पोहोचताना पाहिले, आणि मग ते घरी निघाले. घरी पोहोचल्यावर मॅगीने कौस्तुभला मिठी मारली.

"तू खरंच खूप चांगला माणूस आहेस, कौस्तुभ. त्या सगळ्या गोष्टींनंतरही तू तिला वाचवलंस."

कौस्तुभने हसत तिच्या कपाळावर चुंबन घेतले आणि म्हणाला, "मॅगी, आयुष्यात कधी कधी माणुसकीला प्राधान्य द्यावं लागतं. आणि तुझ्यासारखी साथीदार असेल, तर सगळं सोपं होतं."

रात्र शांत होती, आणि त्या रात्रीच्या प्रसंगाने कौस्तुभ आणि मॅगीच्या नात्यात एक नवीन विश्वास आणि प्रेमाचा रंग भरला होता.

प्रकरण 21

बुद्रुक आपल्या फ्लॅटमधून रात्री 10 वाजता सहज बाहेर पडला आणि आपल्या छोट्या वॅगन आर गाडीकडे जाऊ लागला.

त्याच्या आजूबाजूला रात्रीचा सन्नाटा होता, फक्त रस्त्यावरील मंद पिवळ्या दिव्यांचा प्रकाश पडत होता. त्याला अजूनही कळत नव्हते की आपला प्लॅन फेल कसा झाला? ऋषभला पण त्याने विचारले की त्याने प्लॅनबद्दल कोणाला सांगितले तर नाही? पण ऋषभने शपथेवर सांगितले की, त्याने त्याबद्दल कोणालाच सांगितले नव्हते.

न्यूजमध्ये फक्त एवढेच आले होते की, एका कारचा पाठलाग करताना बस पुलाखाली पाण्यात पडली. पण बुद्रुकला यात काहीतरी गडबड वाटत होती.

आता तो बस ड्रायव्हरच्या नातेवाईकांकडे जाणार होता, जे एक टोळीचे सदस्य असून गुंड प्रवृत्तीचे होते.

अचानक बुद्रुकला काही कळायच्या आत, एक पांढरी व्हॅन त्याच्या गाडीजवळ थांबली. व्हॅनमधून अजय आणि त्याचा जीन्स आणि टी-शर्ट घातलेला एक सहकारी, बाहेर पडले.

"काय म्हणता, बुद्रुक साहेब?" अजयने हसतमुखाने विचारले, जणू तो त्याचा जुना मित्र आहे.

बुद्रुकने संशयाने त्याच्याकडे पाहिले. "हो, मी बुद्रुक, पण तुम्ही कोण?"

"साहेब, तुम्ही तिथे चालला आहात, तिथे मी घेऊन चलतो तुम्हाला, आमच्या खास स्पेशल गाडीत. बॉसच्या ऑर्डर आहेत, काय करणार?" अजयने सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर विश्वासार्ह स्मितहास्य होते.

बुद्रुकला काही शंका आली, पण त्याच्या अहंकाराने त्याला विचार करण्यापासून रोखले. "ठीक आहे, पण माझी गाडी…"

"साहेब, तुमची गाडी आम्ही सांभाळू. तुम्ही फक्त या आमच्या व्हॅनमध्ये बसा," अजयने खिशातून हळूच कोट बाजूला करून लपवलेल्या बंदुकीचा काही भाग दाखवला.

"कोण आहात तुम्ही?"

बुद्रुकला बळजबरीने अजयच्या सहकाऱ्याने व्हॅनमध्ये बसवले. दार बंद होताच, अजय गाडी चालवू लागला आणि मागच्या बाजूला अजयच्या सहकाऱ्याने बुद्रुकच्या हातावर हातकडी लावली. बुद्रुकने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण अजयने त्याच्या डोक्यावर बंदूक टेकवली, ज्यामुळे तो शांत झाला.

व्हॅन वेगाने नवी मुंबईच्या बाहेरील निर्जन जागेवरील एका गोदामाकडे निघाली.

त्याच वेळी, ऋषभ आपल्या ऑफिसमधून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत काम करणे त्याची सवय होती. तो आपल्या स्कूटरवर बसण्यासाठी पार्किंग लॉटमध्ये गेला.

रात्रीचा सन्नाटा आणि मंद प्रकाश यामुळे त्याला आजूबाजूला कोणीही दिसत नव्हते. अचानक, एक साधी काळी सेडान त्याच्या जवळ थांबली. सलवार-कमीज घातलेली रोहिणी, गाडीतून उतरली.
"ऋषभ सर?" तिने मधुर आवाजात विचारले, जणू ती त्याची जुनी सहकारी आहे.

"तुम्ही कोण?" ऋषभने गोंधळून विचारले.

"मी HR डिपार्टमेंटमधून आहे. कोमल मॅडमनी तुम्हाला तातडीने बोलावले आहे. काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर तुमची सही हवी आहे," रोहिणीने सांगितले.

ऋषभला शंका आली, आणि तो म्हणाला, "पण एवढ्या रात्री?"

"हो, सर. मॅडम म्हणाल्या, ते खूपच महत्त्वाचे आहे. तुम्ही माझ्यासोबत गाडीत या," रोहिणीने गाडीचे दार उघडले.

ऋषभ गोंधळून गाडीत बसला. गाडी सुरू होताच, रोहिणीच्या सहकाऱ्याने, जो ड्रायव्हरच्या सीटवर होता गाडी वेगाने पळवली, आणि रोहिणीने ऋषभच्या हातावर हातकडी लावली.

ऋषभने धडपडण्याचा प्रयत्न केला, पण रोहिणीने शांतपणे त्याला समजावले, "ऋषभ सर, शांत राहा. तुम्हाला काही होणार नाही. मॅडमच्या ऑर्डर आहेत, आम्हाला फॉलो कराव्या लागणार."

सेडान वेगाने गोदामाच्या दिशेने निघाली.

नवी मुंबईच्या बाहेरील सुनसान गोदामात सावित्रीबाई उभ्या होत्या. गोदामाचा मंद प्रकाश आणि थंड वातावरण यामुळे वातावरणात तणाव जाणवत होता.

फिल्टर आणि शॅडो मागे उभे होते, त्यांचे चेहरे अंधारात लपलेले. थोड्या वेळाने, पांढरी व्हॅन आणि काळी सेडान एकाच वेळी गोदामात पोहोचल्या.

अजय आणि रोहिणी यांनी बुद्रुक आणि ऋषभ यांना खाली उतरवले आणि त्यांना गोदामाच्या मध्यभागी असलेल्या टेबलापर्यंत आणले. बुद्रुकचा चेहरा रागाने लाल झाला होता, तर ऋषभ घाबरलेला आणि गोंधळलेला दिसत होता.

त्यांना खुर्च्यांवर बसवण्यात आले. सावित्रीबाईंनी त्यांच्याकडे थंड नजरेने पाहिले आणि बोलायला सुरुवात केली.

"बुद्रुक, ऋषभ," त्या म्हणाल्या,

"तुम्हाला वाटलं, तुम्ही माझ्या कंपनीवर ताबा मिळवू शकाल? कोमलला जखमी करायचा कट रचला? आता तुम्ही माझ्या हातात सापडला आहात."

बुद्रुकने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण सावित्रीबाईंनी त्याला थांबवले.
"एक शब्दही बोलू नका. मी तुमचे रेकॉर्डिंग ऐकले आहे. तुम्ही दोघांनी माझ्या मुलांना आणि कंपनीला धोका दिला. आता तुम्ही माझ्या अटी मान्य करा, नाहीतर..."

त्यांनी फिल्टरकडे पाहिले, ज्याने रेकॉर्डिंग डिव्हाइस हातात घेतले. बुद्रुक आणि ऋषभ यांचे चेहरे पांढरे पडले. त्यांना समजले की त्यांचा खेळ संपला आहे.

पण अंगात हिंमत आणून बुद्रुकने डोळे वटारले. "सावित्रीबाई, तुम्ही चुकीच्या गोष्टी ऐकताय. मला कोमलला जखमीसुद्धा करायचं नव्हतं. ती तर माझ्या मुलीसारखी आहे. हा सगळा गैरसमज—"

"गप्प बस!" सावित्रीबाईंनी टेबलावर जोरात हात आपटला. त्यांनी रेकॉर्डिंग डिव्हाइस उचलले आणि प्ले केले.

बुद्रुक आणि ऋषभ यांचे संभाषण गोदामात घुमले.

"ऋषभ, सक्सेस पार्टी ही आपली संधी आहे... तिला मारायचं नाही, फक्त जखमी करायचं..."

ऋषभचा चेहरा पांढरा पडला. तो घाबरून पुटपुटला, "मॅडम, मला माफ करा. मी फक्त बुद्रुकच्या सांगण्यावरून—"

"ऋषभ, तू गप्प बस," बुद्रुकने त्याला मध्येच थांबवले. त्याने सावित्रीबाईंकडे पाहिले.

"ठीक आहे, सावित्रीबाई. तुम्ही जिंकलात. पण तुम्हाला काय हवंय? जर हे प्रकरण बाहेर गेलं, तर तुमच्या कंपनीचीच बदनामी होईल."

सावित्रीबाई हसल्या, पण त्यांचे हसणे थंड आणि धोकादायक होते. "बुद्रुक, तुला वाटतंय मी तुझ्यासारखी मूर्ख आहे? मी हे प्रकरण मीडियात जाऊ देणार नाही!"

त्यांनी फिल्टरकडे पाहिले. "फिल्टर, यांचे रेकॉर्डिंग आणि पुरावे तू सांभाळ. जर यांनी पुन्हा काही कट रचायचा प्रयत्न केला, तर हे रेकॉर्डिंग थेट पोलिसांकडे आणि मीडियाकडे जाईल."

फिल्टरने शांतपणे मान डोलावली. सावित्रीबाईंनी बुद्रुककडे पाहिले.

"आता तू आणि ऋषभ कंपनीतून बाहेर पडाल. तुम्ही तुमचे राजीनामे द्याल, आणि माझ्या मुलांना किंवा कोमलला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्हाला पोलिसांच्या हवाली केलं जाईल. आणि हो, विभाणी,"

त्यांनी विभाणीकडे पाहिले, "तू याची खात्री करशील की हे प्रकरण गुप्त राहील."

विभाणीने होकार दिला. "मावशी, काळजी नका करू. मी सगळं सांभाळेन. आणि यांच्यावर मी स्वतः लक्ष ठेवेन."

बुद्रुकने काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण सावित्रीबाईंच्या डोळ्यांतील राग पाहून तो गप्प बसला. ऋषभ तर पूर्णपणे खचला होता. सावित्रीबाईंनी शेवटचा इशारा दिला,

"माझ्या कंपनीला आणि माझ्या मुलांना हात लावण्याची चूक पुन्हा करू नका. लक्षात ठेवा ही विभाणी पोलिस ऑफिसर आहे! मला मावशी म्हणते ती. कळलं का काही?"

ऋषभ विनाकारण दुसऱ्यांदा कंपनीच्या राजकारणात फसला होता. इकडे दोन-तीन वेळा त्याच्या मोबाईलवर गौतमीची मिस कॉल आले होते. आपले करिअर आणि जीवन बरबाद होईल यासाठी तो सावित्रीबाईंची विनवणी करू लागला, "सावित्रीबाई मला माफ करा मी साधा कंपनीतला कर्मचारी आहे मला एक संधी द्या लागल्यास बुद्रुकला पकडून न्या!"

नाहीतरी ऋषभला एकदाची बुद्रुक पासून सुटका हवी होती. ऋषभची सगळी कुंडली आणि बॅकग्राऊंड सावित्रीबाईंनी चेक केले होते. ऋषभबद्दल त्यांना सहानुभूती होती.

"ठीक आहे तुला मी एक संधी देते! घडलेला प्रकार कोणाला सांगू नकोस. तू बुद्रुकला साथ देत होतास याबद्दल पण कुठे वाच्यता करू नकोस. यापुढे आपल्या कामाशी काम ठेव. विभाणी, मीडियामध्ये आता जाहीर करण्यास हरकत नाही. प्रेस कॉन्फरन्स घे आणि सगळ्यांना सांग. बुद्रुकची बदनामी झाली तर होऊ दे. बुद्रुकने कट केला होता कोमलला मारण्याचा, हे सगळीकडे जाहीर होऊ दे!"

"होय मावशी. ट्रक ड्रायव्हरच्या नातेवाईकांना आणि मित्रांची चौकशी करून, तसेच सीसीटिव्हीच्या आधारे काही पुरावे हाती लागले आहेत. या सर्वांच्या आधारे स्ट्रॉंग केस बनवून बुद्रुकला कोर्टात शिक्षा होईल एवढे नक्की!"

राघव आणि माधव यांना हे कळले तेव्हा ते खूप आश्चर्यचिकित झाले. तुरुंगात जाताना जेव्हा आपल्या मुलीला म्हणजे विनिताला बुद्रुक भेटला तेव्हा तिचे रडणे थांबत नव्हते पण त्याने तिला डोळ्यांनी विशिष्ट एक इशारा केला तेव्हा तिच्या डोळ्यात थोडी सुखद चमक दिसली. डोळे पुसून ती निघून गेली.

कोमलसुद्धा हे ऐकून धक्क्यातून सावरू शकत नव्हती.

सावित्रीबाईंनी आपल्या पद्धतीने तिलाही दम दिला.

तिकडे कौस्तुभसुद्धा ही बातमी बघून आश्चर्य व्यक्त करत होता.

कंपनीची बदनामी होऊ नये म्हणून या घटनेला सावित्रीबाई, राघव आणि माधव यांनी व्यवस्थितपणे विविध भाषणासून तसेच प्रेस कॉन्फरन्स घेऊन गुंतवणूकदारांवर नकारात्मक परिणाम होणार नाही अशा पद्धतीनें सांगितले.

प्रकरण 22

ऋषभने पूर्वीची सनराइज् सॉफ्टवेअर कंपनी सोडल्यानंतर दीपकला त्याच्या जागी प्रोजेक्ट लीडर म्हणून नियुक्त केले गेले होते. दीपकच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होते. त्याला वाटत होते की, कुणालच्या पाठिंब्यामुळे आणि त्याच्या स्वतःच्या चतुराईने त्याने आपले ध्येय गाठले आहे.

सचिन, प्रिया आणि आलोक यांनीही दीपकला अभिनंदन केले, परंतु त्यांच्यामध्ये एक अस्वस्थता होती. दीपक आता त्यांच्यावरही बॉसगिरी करू लागला होता. त्याने प्रत्येकाच्या कामात जास्त ढवळाढवळ सुरू केली आणि कुणालशी जवळीक दाखवताना तो त्यांच्याशीही आता गर्वाने वागू लागला.

एके दिवशी, ऑफिसमधील एका मिटिंगमध्ये दीपकने सचिनच्या एका मॉड्यूलवर खूप टीका केली. “सचिन, तुझा कोड ऑप्टिमाइझेशनचा प्रयत्न चांगला आहे, पण यात अजून बरंच काही करता येईल. मी कुणाल सरांना सांगितलंय की, मी स्वतः यावर काम करेन,” दीपकने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले.

सचिन चिडून म्हणाला, “दीपक, माझ्या मॉड्यूलमध्ये काय प्रॉब्लेम आहे, ते तू मला स्पष्ट सांग. आणि तू कुणाल सरांना का सांगितलंस? मला विचारायचं नाही का?”

दीपकने हसत हसत टाळले, “अरे, तू टेन्शन घेऊ नकोस. मी फक्त प्रोजेक्टला स्पीड अप करायचा प्रयत्न करतोय. कुणाल सरांनी मला सांगितलंय की, मला सगळं हँडल करायचं आहे.”

प्रियाने यावेळी दीपकला पाठिंबा दिला, “सचिन, दीपक बरोबर आहे. आपण सगळ्यांनी मिळून काम केलं तरच डेडलाइन पूर्ण होईल.” पण तिच्या आवाजातही एक अस्वस्थता होती. दीपकच्या या नव्या वागण्याने तिलाही त्रास होत होता.

आलोक नेहमीप्रमाणे शांत राहिला, पण त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. दीपकने मात्र याकडे दुर्लक्ष केले आणि कुणालशी आपली जवळीक दाखवत राहिला.

तो कुणालच्या केबिनमध्ये वारंवार जाऊ लागला, त्याच्यासोबत कॉफी ब्रेक घेताना दिसू लागला आणि कुणालच्या प्रत्येक निर्णयाला ‘होय सर’ म्हणत मान डोलवत राहिला.

काही आठवड्यांनंतर, डिपार्टमेंटच्या डिलिव्हरी हेडने एक मोठी मीटिंग बोलावली. या मिटिंगमध्ये प्रोजेक्टच्या प्रगतीवर चर्चा होणार होती. दीपकने खूप तयारी केली होती. त्याने स्वतःच्या नावाने सगळे क्रेडिट घेण्याचा प्लॅन आखला होता. त्याने सचिन, प्रिया आणि आलोक यांना सांगितले की, “मी सगळं प्रेझेंट करणार आहे. तुम्ही फक्त माझ्या बाजूने बोलायचं, ठीक आहे?”

मिटिंग सुरू झाली. दीपकने अतिशय आत्मविश्वासाने प्रोजेक्टच्या प्रगतीबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याने स्वतःच्या नावाने अनेक गोष्टींचे क्रेडिट घेतले, ज्यामध्ये सचिन आणि प्रियाच्या मॉड्यूल्सचाही समावेश होता. पण कुणाल शांतपणे ऐकत होता. मिटिंग संपल्यानंतर डिलिव्हरी हेडने कुणालला विचारले, “कुणाल, तुझ्या मते प्रोजेक्टचं यश कोणामुळे आहे?”

कुणालने दीपककडे पाहत हसत सांगितले, “सर, दीपकने खूप मेहनत केली आहे, पण मला वाटतं की, सचिन आणि प्रियानेही खूप योगदान दिलं आहे. दीपक फक्त लीडर म्हणून समन्वय साधतोय.” हे ऐकून दीपकचा चेहरा पडला. त्याला अपेक्षित होतं की कुणाल त्याचं नाव पुढे करेल, पण कुणालने त्याला क्रेडिट देण्याऐवजी इतरांना पुढे केले.

मिटिंगनंतर दीपक कुणालच्या केबिनमध्ये गेला आणि म्हणाला, “सर, मी सगळं हँडल केलं, तरी तुम्ही माझं नाव का नाही घेतलं?”

कुणालने थंडपणे उत्तर दिले, “दीपक, तू चांगलं काम करतोस, पण तुझी थोडी घाई होतेय. तू लीडर आहेस, पण याचा अर्थ तू सगळं क्रेडिट घेशील असं नाही. आणि तुझ्या मॉड्यूलमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत, त्यावर काम कर.”

दीपकला धक्का बसला. त्याने विचारले, “कोणत्या त्रुटी, सर?”

कुणालने एक फाईल त्याच्यासमोर ठेवली आणि म्हणाला, “हे बघ, डिलिव्हरी हेडला तुझ्या मॉड्यूलमधील परफॉर्मन्स इश्यूज सापडले आहेत. आणि तू मला याबद्दल काहीच सांगितलं नाहीस. तुला वाटलं का की मी हे कव्हर अप करेन?”

दीपकला काय बोलावे सुचेना. त्याला जाणवले की, कुणालने त्याला जाणीवपूर्वक डावलले आहे. खरे तर, कुणालला दीपकच्या वाढत्या महत्वाकांक्षेची भीती वाटू लागली होती. दीपक आता त्याच्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता, आणि कुणालला हे अजिबात आवडले नव्हते. काही आठवड्यांनंतर, प्रोजेक्टच्या एका मोठ्या डिलिव्हरीदरम्यान दीपकच्या मॉड्यूलमध्ये मोठा बग सापडला. हा बग इतका गंभीर होता की, क्लायंटने कंपनीला दंड ठोठावला. कुणालने ही संधी साधली आणि डिलिव्हरी हेडसमोर दीपकला जबाबदार ठरवलं.

“दीपक, तू लीडर होतास, तुझ्या मॉड्यूलची जबाबदारी तुझी होती. तू मला याबद्दल काहीच सांगितलं नाहीस,” कुणालने रागाने सांगितले.

दीपकने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, “सर, मी सगळं चेक केलं होतं. हा बग माझ्या हातातला नव्हता. सचिनच्या कोडमुळे…”

पण कुणालने त्याला थांबवले, “आता सचिन मध्ये कुठून आला? तू तर लीड आहेस ना? मग टीम मेंबरच्या चुकांची जबाबदारी तुझी! बस! आता याला अर्थ नाही. तुझ्याकडून मला अपेक्षा होत्या, पण तू अपयशी ठरलास.”

काही दिवसांतच दीपकला प्रोजेक्टमधून काढण्यात आले. त्याला दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले, जिथे त्याला एका छोट्या प्रोजेक्टवर काम देण्यात आले.

त्याची बढती रद्द झाली आणि त्याला जाणवले की, कुणालने त्याच्यासोबतही तेच राजकारण खेळले आहे जे त्याने ऋषभसोबत खेळले होते.

एके रात्री, दीपक घरी एकटाच बसला होता. त्याला आठवण झाली की, त्याने ऋषभसोबत काय केले होते.

त्याने कुणालच्या पाठिंब्यावर अवलंबून राहून ऋषभला डावलले, त्याला अपडेट्स दिले नाहीत आणि त्याला प्रोजेक्टमधून बाहेर काढण्यासाठी सगळ्यांना फितवले. आता त्याच्याच बाबतीत तेच घडत होते. कुणालने त्याला वापरले आणि नंतर बाजूला काढले.

दीपकला खूप अपराधी वाटू लागले. त्याने आपला फोन काढला आणि राहुलला मेसेज केला, “राहुल, तुला ऋषभचा नंबर मिळेल का? मला त्याच्याशी बोलायचं आहे.”

राहुलने थोडा संकोच करत ऋषभचा नंबर दिला. दीपकने ऋषभला कॉल केला. “ऋषभ, मी दीपक बोलतोय. तुला भेटायचं आहे. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे.”

ते दोघे एका कॉफी शॉपमध्ये भेटले. दीपकने थेट बोलायला सुरुवात केली, “ऋषभ, मला माफ कर. मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो. कुणालच्या मागे लागून मी तुझी जागा घेतली. मला वाटलं की मी त्याच्याशी जवळीक साधली तर माझी प्रगती होईल. पण आता त्यानेच मला बाजूला केलं. मला खूप पश्चाताप होतोय.”

ऋषभ शांतपणे ऐकत होता. त्याने दीपकला म्हणाला, “दीपक, जे झालं ते झालं. मी आता नव्या कंपनीत सेटल झालो आहे. पण तुझ्या या चुकीमुळे माझं करिअर धोक्यात आलं होतं. तरीही, मी तुला माफ करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ऑफिसमधलं राजकारण तात्पुरतं यश देऊ शकतं, पण पायाखालची जमीन कधी खेचली जाईल, हे सांगता येत नाही.”

दीपकने डोके खाली घातले. त्याला आपली चूक पूर्णपणे कळली होती. त्याने ऋषभला पुन्हा माफी मागितली आणि तिथून निघून गेला. बुद्रुक प्रकरण थंड झाल्यानंतर ऋषभने कॅलिब्रा कंपनीत आपली मेहनत आणि प्रामाणिकपणा यामुळे लवकरच स्वतःची जागा निर्माण केली. त्याला एका नव्या प्रोजेक्टचं नेतृत्व मिळालं, जिथे त्याच्या टेक्नॉलॉजी स्किल्सचा उपयोग होत होता.

एके दिवशी, गौतमीने त्याला हसत हसत विचारलं, “आता तुझ्या ऑफिसमधलं टेन्शन गेलं ना? आता पुन्हा पावसात किस घ्यायचा का?”

ऋषभने हसत तिला जवळ ओढलं आणि म्हणाला, “आता पावसाची गरज नाही, तुझ्या प्रेमात मी घरातच रोज बुडतोय!”

असे म्हणून ऋषभने एका हाताने गौतमीची वेणी पकडून तिचा चेहरा मागे थोडा मागे झुकवला आणि तिच्या अधीर थरथरणाऱ्या ओठांकडे बघत, आपल्या दोन्ही ओठांमध्ये गौतमीचा खालचा ओठ हळुवार पकडला आणि तिच्या कमरेवर एका हाताने घट्ट वेटोळे घालून तिचा तीव्रतेने किस घ्यायला सुरुवात केली.

प्रकरण 23

ऑफिसची कॅन्टीन त्या दुपारी नेहमीप्रमाणे गजबजलेली होती. काहीजण आपल्या गप्पांत रमले होते, तर काही जण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवलेले. पण एका कोपऱ्यात, खिडकीजवळच्या टेबलावर विनिता एकटीच बसली होती. तिच्या समोर थंडावलेला कॉफीचा कप आणि अर्धवट खाल्लेला सॅंडविच ठेवलेला होता. बाहेर ऊन असलं तरी तिच्या चेहऱ्यावर एक विरक्त सावली उमटली होती.

ती खिडकीबाहेर पाहत होती, पण नजरा मात्र काहीतरी हरवलेल्या आठवणींमध्ये अडकल्या होत्या. तिचे डोळे ओले दिसत होते — जणू मनातील भावना शब्दांच्या पलीकडे जाऊन डोळ्यात साठल्या होत्या.

तो सावकाश तिच्याजवळ गेला. पावलांचा आवाजही न व्हावा म्हणून हळू चालत, जणू तिच्या भावनांच्या जगात पाय टाकत होता. तिच्या टेबलाजवळ थांबून तो हलक्या स्वरात म्हणाला,

"विनिता... मी थोडं तुझ्याशी बोलू शकतो का? इथे बसू?"

विनिताने त्याच्याकडे संशयाने पाहिलं आणि म्हणाली, "काय हवंय तुला, ऋषभ? तुझ्यामुळे माझे वडील तुरुंगात आहेत. मला तुझ्याशी बोलायचं नाही."

ऋषभ तिच्यासमोर बसला आणि खेद व्यक्त करत म्हणाला, "मला माहित आहे, विनिता. मी त्यांच्याविरुद्ध साक्ष दिली. मला त्याची खंत आहे. मी तुझी काही मदत करू शकतो का?"

विनिताने त्याच्याकडे रागाने पाहत म्हटलं, "मदत? तू माझी काय मदत करणार? तुझ्यावर विश्वास ठेवायचं कारणच नाही मला."

ऋषभने शांतपणे उत्तर दिलं, "मी समजू शकतो तुझा राग. पण मला खरंच तुझी मदत करायची आहे!"

विनिता क्षणभर गप्प राहिली, मग हळूच म्हणाली, "मी का म्हणून तूझी मदत घेऊ, चालता हो!"

काही दिवसांनी, ऋषभने विनिताला ऑफिसच्या एका शांत कॉन्फरन्स रूममध्ये भेटायला बोलावलं. त्याने एक फाइल तिच्यासमोर ठेवली आणि म्हणाला, "विनिता, मला तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. हे बघ, तुझ्या वडिलांनी कंपनीच्या सुरुवातीच्या काळात एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये खूप मेहनत घेतली होती. ही कागदपत्रं त्याचं कौतुक दर्शवतात."

विनिताने फाइल उघडली आणि आश्चर्याने विचारलं, "खरंच? पण मग त्यांना तुरुंगात का पाठवलं?"

ऋषभने हळूच उत्तर दिलं, "तुझ्या वडिलांनी काही चुका केल्या होत्या, तुला तर माहिती आहेच. पण त्यांच्यावर खूप अन्यायही झाला होता. मी ही माहिती शोधून काढली कारण मला तुझ्या वडिलांचं योगदान सगळ्यांना समजावं असं वाटतं. तू एकटी नाहीस, विनिता. मी तुझ्यासोबत आहे."

विनिताच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, "तुला खरंच माझी काळजी आहे का, ऋषभ? की हे सगळं फक्त दिखावा आहे? माझी आई पण घरी काळजी करत रडत बसते."

ऋषभने तिच्याकडे पाहत ठामपणे म्हटलं, "नाही, विनिता. हा दिखावा नाही. मी माझ्या चुकीचं परिमार्जन करू इच्छितो. तुझ्या वडिलांना न्याय मिळावा, यासाठी मी तुला मदत करेन. त्यांची शिक्षा कमी व्हावी यासाठी आपण काहीतरी करू!"

"पण मी तुझ्यावर का विश्वास ठेऊ?"

"बघ, विनिता. तुझ्या वडिलामुळेच आज मी नोकरीत आहे. अन्यथा मी अनेक महिने घरी बसून होतो. त्याच्या स्वार्थासाठी का असेना, त्यांनी मला नोकरी दिली हे महत्वाचे. मी त्यांचा ऋणी आहे. मी मुद्दाम साक्ष देऊन त्यांच्या विरोधात गेलो आहे असे दाखवले आणि माफी मागून माझी कंपनीत नोकरी टिकवली! त्यांचा पुतण्या माझा मित्र गोकुळ याला मी वचन दिलंय की मी बुद्रुकच्या कुटुंबासाठी काहीतरी करेन. तुला मदत करेल."

"हे खरे बोलतोय ना तू?

"अगदी खरे!"

एके दिवशी ऋषभने सावधपणे विनिताला विचारले, "तुझ्या वडिलांनी तुला काही सांगितलं होतं का, जेव्हा त्यांना तुरुंगात घेऊन जात होते? मला वाटलं, त्यांनी तुला काहीतरी सूचना दिली असावी."

विनिताच्या डोळ्यात चमक आली. ती क्षणभर गप्प राहिली, मग हळूच म्हणाली, "हो, त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की जर काही झालं, तर मी त्यांचे काही डॉक्युमेंट्स वापरावेत. ते कंपनीच्या सुरुवातीच्या काळात कस्टम डिपार्टमेंट चुकवून कंपनीसाठी आयात केलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे पुरावे आहेत. त्यामुळे तुरुंगात जातांना त्यांनी फक्त मला खूण केली. आमच्या आधीच ठरलेल्या त्या गोष्टींबद्दल!"

ऋषभने आश्चर्य दाखवत विचारले, "कसले पुरावे?"

"माझ्या वडिलांनी एक यूएसबी ड्राइव्ह सांभाळून ठेवली होती. त्यात सगळे कागदपत्र स्कॅन केलेले आहेत," विनिता म्हणाली.

"आणि तू त्या काय करणार आहेस?" ऋषभने गंभीरपणे विचारले.

विनिताच्या आवाजात ठामपणा आला. "मी हॅकिंग करून ते कंपनीच्या वेबसाइटवर टाकणार आहे. सगळ्यांना सत्य समजलं पाहिजे. तशी मी डायरेक्ट मिडिया मध्ये जाऊ शकले असते पण त्यामुळे मी सुद्धा सर्वांसमोर येईल. ते मला नको आहे. मी सेफ राहीन आणि लोकांना कागदपत्रं पण दिसतील, कारण मी असे हॅकिंग करेन की कुणालाही समजणार नाही!"

ऋषभने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, "पण तसं करणं खूप धोकादायक आहे, विनिता. तुला अटक होऊ शकते."

"मला काही फरक पडत नाही. माझ्या वडिलांसाठी मी हे करणार," ती म्हणाली.

ऋषभ म्हणाला, "ठीक आहे, मी तुला मदत करू शकतो. पण आपल्याला सावध राहावं लागेल."

विनिताने संशयाने पाहिलं, पण नंतर म्हणाली, "ठीक आहे, तू एवढंच कर की तू ही कोणाला सांगणार नाहीस, हे मला वचन दे."

"मी वचन देतो, पण मला सांग तू हे काम केव्हा करणार आहेस?" ऋषभ म्हणाला.

विनीताने सांगितले, "मी ते काम उद्या रात्री ऑफिसमध्ये उशीरा बसून करणार. ऑफिसच्या डेस्कटॉपवर बसून!"

"ठीक आहे! आपण दोघे शक्यतो जास्त भेटणे बंद करू. कारण आपण बुद्रुकसाठी कंपनी विरोधात काहीतरी कट करतोय अशी कुणालाही शंका येऊ शकते! तू उद्या तुझे काम कर.", ऋषभ म्हणाला.

प्रकरण 24

काही महिन्यांपूर्वी, कोमल अपघात प्रकरण घडल्यानंतर सावित्रीबाईंच्या डोक्यात कंपनीच्या भविष्याची चिंता घर करून होती. त्यांनी आपल्या मुलांना, राघव आणि माधव यांना, त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले. ऑफिसच्या खिडकीतून बाहेर पडणारा सूर्यास्ताचा मंद प्रकाश आत येत होता, आणि टेबलावर कागदपत्रांचा ढीग पडला होता.

"राघव, माधव," सावित्रीबाईंनी गंभीर स्वरात सुरुवात केली, "बुद्रुक आणि ऋषभ यांनी जे केलं, ते आपल्या कंपनीसाठी धोक्याची घंटा आहे. तुम्ही दोघांनी आता डोळे उघडे ठेवायचे आहेत. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, याची काळजी घ्या."

राघवने मान डोलावली. "हो, आई. आम्ही यापुढे सावध राहू. पण विनिताचं काय करायचं? ती बुद्रुकची मुलगी आहे, पण तिचा या कटात हात नव्हता."

माधवनेही विचार मांडला, "हो, तिला कंपनीतून काढणं योग्य वाटत नाही. ती चांगली कर्मचारी आहे."

सावित्रीबाईंनी क्षणभर विचार केला आणि म्हणाल्या, "ठीक आहे, तिला कंपनीत ठेवा. पण तिच्यावर लक्ष ठेवा. बुद्रुकने तिला तुरुंगात जाताना डोळ्यांनी काहीतरी इशारा केला होता. तो नेमका काय होता, आणि ती त्यानंतर काय करणार आहे, हे शोधून काढायचं आहे."

सावित्रीबाईंनी ऋषभला आपल्या ऑफिसमध्ये बोलावले. त्याचा चेहरा पडलेला होता, तो आपल्या चुकीबद्दल अपराधी भावनेत जगत होता.

सावित्रीबाईंनी त्याच्याकडे थंड नजरेने पाहत म्हटले, "ऋषभ, तुझी चूक मोठी होती, पण मी तुला एक संधी दिली आहे. आता ती सिद्ध करायची वेळ आली आहे. विनिताशी मैत्री कर, तिचा विश्वास संपादन कर, आणि ती काय करणार आहे ते शोधून काढ. तरच तुझ्या चुकीचं परिमार्जन होईल."

ऋषभने डोके खाली घालून होकार दिला. "ठीक आहे, मॅडम. मी प्रयत्न करेन."

मग त्याने तिचा विश्वास संपादन केला.
• • •

रात्रीचे 10 वाजलेले. संपूर्ण ऑफिस शांत होतं. दिवसभराचा गोंगाट आता फक्त विनिताच्या कीबोर्डच्या टकटकाटात रूपांतरित झाला होता. तिच्या डोळ्यात झोप नव्हती, फक्त एक ध्येय – कंपनीला गुडघे टेकायला लावणं.

डेस्कटॉपसमोर बसलेली विनिता कंपनीच्या वेबसाईटचा सोर्स कोड स्कॅन करत होती.

विनिता मनात म्हणत होती, "एसएसएल सर्टिफिकेट बायपास केलं, आता एडमिन पॅनलचं लॉगिन गेटवे एक्सप्लोइट करायचंय..."

तिने तीन विंडोज उघडली – एकात प्रॉक्सी सर्वर चालू होता, दुसऱ्यात लिनक्स टर्मिनल आणि तिसऱ्यात कंपनीची वेबसाईट – जी आता तिच्या नजरेतून एक उघडं मैदान होती.

बराच वेळ ती काही कमांड टाईप करत होती. त्यानंतर टर्मिनलवर कंपनीच्या डेटाबेस संदर्भात एक संदेश झळकला.

विनिता हसत मनाशी म्हणाली, "कॅलिब्राचा गेम ओव्हर! आता हे सगळं जनतेसमोर येणार!"

तिने डेटाबेसमधील पाथ शोधून एफटीपीद्वारे डॉक्युमेंट्स अपलोड करायला सुरुवात केली.

दरम्यान – पुण्यातील एका गुप्त सायबर सेलमध्ये, ऋषभ एका मोठ्या स्क्रीनसमोर बसला होता, कानात वायरलेस इअरफोन, आणि बाजूला बसले होते – राघव, माधव, सायबर इंजिनिअर सायली, आणि सायबर पोलिस अधिकारी इन्स्पेक्टर गोखले.

सायली म्हणाली, "सर, ती आपल्या हनीपॉट वेबसाईटवरच काम करतेय!"

राघव थोडं हसत म्हणाले, "सापाचं विष त्यालाच प्यायला लावतो आहे आपण."

ऋषभने दोन स्क्रीनमध्ये तुलना दाखवली – एक होती खरी वेबसाईट, दुसरी होती क्लोन वेबसाईट, जी खास विनितासाठी तयार करण्यात आली होती.

ऋषभ म्हणाला, "ही वेबसाईट बरोबर त्या आयपी ऍड्रेसला रीडायरेक्ट होते जिथून विनिता लॉगिन करते. सगळीची सगळी फसवी, पण दिसायला ओरिजनल."

इन्स्पेक्टर गोखले, "ती जे अपलोड करतेय, ते सगळं आमच्याकडे लाईव्ह येतंय. पुरावा गोळा होतोय. तिच्याविरुद्ध!"

तिकडे विनिताने 48 हून अधिक पिडीएफ फाइल्स त्या वेबसाईटवर टाकल्या.

विनिता स्वतःशी हसत म्हणाली, "हेच पुरावे सर्वजण बघतील आणि ते जगजाहीर होतील. गुड बाय कॅलिब्रा!"

ती उठायला लागली, इतक्यात तिच्या जवळचा दरवाजा जोरात उघडला गेला.

"विनिता, यू आर अंडर अरेस्ट!"

सायबर पोलिस आत धडकले. मागे ऋषभ आणि इन्स्पेक्टर गोखले होते.

विनिता चकित झाली, "तुम्ही... इथे? पण मी तर..."

ऋषभ हसत म्हणाला, "तू पोचलीस, पण मूळ वेबसाईटवर नाही. तुझ्या समोरची वेबसाईट आमची कलाकृती होती – एक 'डमी'."

इन्स्पेक्टर गोखले पुढे म्हणाले, "तू स्वतःसाठीच फास बनवला विनिता. तू अपलोड केलेले सर्व फाईल्स, तुझे आयपी लॉग, टाइम स्टॅम्प, आणि एफटीपी लॉग– हे सगळं पुरावा म्हणून आमच्याकडे आहेत."

विनिता, "इम्पॉसिबल... हे कसं शक्य आहे?"

सायली थोडं मिश्किलपणे म्हणाली, "तुम्ही जेव्हा एसक्यूएल द्वारे डेटाबेस कमांड वापरत होतात, तेव्हा आम्ही रिव्हर्स प्रॉक्सी आणि डीएनएस स्पुफिंग वापरत होतो. आम्हीही हॅकर आहोत, विनिता – पण चांगल्या कामासाठी."

विनिता ऋषभकडे जळजळीत तिखट नजरेने पहात होती.

"धोका दिलास तू मला. सोडणार नाही मी तुला. नालायक माणसा!"

विनिताला पोलिस व्हॅनमध्ये बसवण्यात आलं. कॅलिब्राने सायबर हॅकिंग विरुद्धचा एक मोठा विजय मिळवला. राघव आणि ऋषभ एकमेकांकडे पाहून शांतपणे हसले.

राघव म्हणाले, "खोटं कितीही स्मार्ट असलं, तरी सत्य नेहमीच ओव्हरस्मार्ट बनून शांतपणे तो स्मार्टनेस ओळखतं!"

प्रकरण 25

पुण्यातील एका रम्य संध्याकाळी, कोमल आपल्या ऑफिसमधून बाहेर पडली. तिच्या डोक्यात विचारांचे वादळ घोंघावत होते. कंपनीत CEO बनण्याची तिची महत्वाकांक्षा तिच्या जीवावर उठली होती. बुद्रुकने तिला जखमी करण्याचा कट रचला होता, त्याचा मनसुबा कंपनीचे संस्थापक राघव आणि माधव यांच्या आई सावित्रीबाईंनी डिटेक्टिव्ह फिल्टर आणि त्याचा साथीदार शॅडो यांच्या मदतीने हाणून पाडला होता.

कोमलला पुन्हा पुण्यात ट्रान्सफर करण्यात आली होती, जेणेकरून ती आणखी काही कुरघोड्या करू नये.

कोमलच्या मनात संमिश्र भावना होत्या. एकीकडे ती आपल्या महत्वाकांक्षेच्या पराभवाने खचली होती, तर दुसरीकडे तिला पुण्यात परतल्यामुळे आपल्या कुटुंबाशी पुन्हा जवळीक साधण्याची संधी मिळाली होती.

तिचा पती विनोद, ज्याच्याशी तिचे संबंध काही काळापासून ताणले गेले होते, त्याने समाजसेवेनंतर आता राजकारणात प्रवेश केला होता. स्थानिक निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी जाहीर केली होती. कोमल घरी परतली तेव्हा तिची मुलगी सानवी तिला भेटली.

सानवीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कोमलच्या मनात काही काळासाठी शांतता निर्माण झाली. त्या मायलेकींच्या भेटीने कोमल आणि विनोद यांच्यातील दुरावा कमी झाला. हे बघून आत्याचा जळफळाट झाला आणि ती आपल्या घरी निघून गेली होती. सानवी झोपल्यावर रात्रीच्यावेळी दोघांनी एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

"विनोद, तुझी ही राजकारणातली सुरुवात खरंच कौतुकास्पद आहे," कोमल म्हणाली, पण तिच्या स्वरात थोडी कणखरता होती. मी तुझ्याशी थोडी चुकीची वागले. पण चूक तुझ्याकडे होतीच!"

विनोद हसला आणि म्हणाला, "कोमल, मी पण प्रयत्न करतोय, माझी चूक सुधारण्याचा. पण तुझ्या स्वभावापुढे मला कधी कधी गप्प बसावं लागतं. पण काही दोष माझ्याही स्वभावात आहेत! पण कोमल, तू दिवसेंदिवस जास्त सुंदर होत चालली आहेस. मुंबईची हवा मानवली तुला!"

कोमल लाडाने हसली आणि तिने यावर काहीच उत्तर दिले नाही पण तिला पुढे वाटले की विनोद आता आपल्याला मिठीत घेईल, आपल्यावर प्रेमाचा वर्ष भरायला सुरुवात करेल. कारण बऱ्याच कालावधीनंतर ते एकत्र आले होते. अशा वेळेस कोणतेही नवरा बायको एकमेकांवर प्रेमाने झडप घालून एकमकांवर तुटून पडल्याशिवाय राहणार नाहीत. पण विनोद थोडा कचरत होता.

समाजसेवा आणि राजकारणानिमित्त तो अनेक ठिकाणी फिरस्ती करतो. मी सुद्धा दुरावले होते. त्या दरम्यान विनोदाचे एखाद्या मुलीशी प्रेम संबंध तर जुळले नाही ना? माझ्या आक्रमक वागण्यामुळे विनोदने माझ्या स्वभावापेक्षा मृदु आणि नाजूक मुलीशी तर प्रेमसंबंध निर्माण केले नाही ना? रेणुकेला विचारावे लागेल. अशा प्रकारे कोमलच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. तिला विनोदबरोबरचे नाते पुन्हा रुळावर येत आहेत असे दिसत असले तरी काहीतरी कमतरता नक्की आहे असे वाटत होते.

पण तिने पुन्हा यावेळेस सुद्धा पुढाकार घेतला आणि त्याच्याकडे प्रेमाचा कटाक्ष टाकला, स्वतःचा टीशर्ट काढून फेकला आणि त्याच्या जवळ जाऊन त्याच्या शर्टचे वरचे बटण काढून तिचा हात त्याच्या छातीवर हळुवार फिरवत नेला.

एवढे झाल्यावर विनोद उत्तेजीत झाला आणि त्याने तिला बेडवर लोटले आणि तिच्यावर हळुवार स्वार झाला.

मात्र त्यावेळेस कोमलच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक वेगळाच विचार घोळत होता – कौस्तुभ!

तो कॉलेजमध्ये मुलींमध्ये लोकप्रिय होता. समजा मी त्याचे प्रपोज स्वीकारले असते आणि माझ्यावर प्रेम करतांना तो कसा वागला असता? प्रत्येक वेळेस बेडवर त्यानेच पुढाकार घेतला असता. त्याच्या स्वभावावरून तर तसेच वाटते आहे.

अरे बापरे, हे काय? मी माझ्या नवऱ्याशी प्रेमात रममाण असताना अचानक माझ्या मनात कौस्तुभ बद्दल का विचार येत आहेत? नाही, हे चांगले नाही. पण... मनात आपोआप जमणाऱ्या भावनांना मी कसे रोखू? जितक्या मी रोखणार तेवढ्या त्या तीव्र होणार! नाही, पण हे योग्य नाही...

तिची मनस्थिती द्विधा झाली. मला कौस्तुभ आठवला, कारण तो त्याच्या कर्तृत्वावर कंपनीत उच्च पदावर आहे म्हणून? माझीही तशीच महत्त्वाकांक्षा असल्याने कदाचित मला त्याच्याबद्दल आकर्षण तर वाटत नाही ना?

त्या रात्री विनोदने आपल्या प्रेमाच्या वर्षावात तिला आनंदाच्या कधी नव्हे एवढ्या उंच शिखरावर आणून सोडले, पण तो आनंद अतिशय मुक्तपणे समर्पित भावनेने उपभोगत असतानासुद्धा तिला तिच्या मिटलेल्या डोळ्यात चेहरा मात्र कौस्तुचा दिसत होता...

"नाही...! नाही...!! असे व्हायला नको!" तिचे एक मन विरोध करत होते.

हो! हो! मला कौस्तुभ सोबत तीव्रतेने बोलावेसे वाटते आहे, असे काही दिवस तिला तिचं दुसरं मन सांगू लागलं आणि एके दिवशी कोमलने कौस्तुभशी चॅटिंग सुरू केले.

सुरुवातीला ती कामासंबंधी गप्पा मारायची, पण हळूहळू तिने वैयक्तिक विषयांवर बोलायला सुरुवात केली.

एके दिवशी ती चॅटिंगमध्ये म्हणाली, "कौस्तुभ, तुला आठवतं का, कॉलेजमध्ये आपण किती मजा करायचो? त्या गप्पा, ती रात्री उशिरापर्यंत कॅम्पस मध्ये चालणाऱ्या गप्पा..."

कौस्तुभ हसला आणि म्हणाला, "हो, कोमल, त्या आठवणी कशा विसरू? पण तू तर मला तेव्हा फारसं भाव देत नव्हतीस!" त्याच्या स्वरात खट्याळपणा होता. त्याची मुलींची मोकळेपणाने बोलण्याची मूळ वृत्ती उफाळून आली.

कोमलने त्याला भेटण्याचा प्रस्ताव ठेवला. "कामानिमित्त तू पुण्यात आल्यावर आपण भेटायचं का? गुडलक कॅफे मध्ये भेटून गप्पा मारू. कंपनीत असताना फक्त कामानिमित्त भेट व्हायची. पर्सनल भेटूया. मला तुझ्याशी बोलावसं वाटतं आहे!"

त्यानंतर तिने लगेच तिचा कालच काढलेला मेकअप केलेला सुंदर कपड्यातला एक सेल्फी त्याला पाठवला आणि लिहिले, " कशी दिसते मी?"

कौस्तुभसाठी हे थोडं अनपेक्षित होतं. सुरुवातीला त्याला कळलं नाही की काय रिप्लाय द्यायचा. कारण तसं तो नेहमीच तिला नवी मुंबईत असताना कंपनीत बघायचा. तेव्हा तिने त्याला असे काही विचारले नव्हते.

त्याने सावध पवित्रा घेतला. कारण मागच्या कंपनीचा अनुभव त्याच्या गाठीशी होता.

यावेळेस कशातच फसायचे नाही आणि कोणती रिस्क घ्यायची नाही असे त्यांनी ठरवले…

आता सोन्यासारखी जोडीदार मॅगी त्याच्या आयुष्यात होती.

भिरभिरणाऱ्या लालसर केसांची मॅगी.

निखळ, निरागस तरी मादक सौंदर्य असलेली मॅगी.

नवी मुंबईच्या पावसांत छत्री फेकून मनसोक्त भिजणारी मॅगी!

त्याला हर प्रकारे साथ देणारी मॅगी!

कुठेही बाहेर जायचे असल्यास "दोन मिनिटात" तयार होणारी मॅगी!

कौस्तुभने फक्त एक सिंपल तीन शब्द लिहिले: "छान फोटो आहे!"

कोमलला आपल्या सौंदर्याचा खूप अभिमान होता. तिला अपेक्षा होती की तो लाल रंगाचे लव्ह चिन्ह पाठवेल, पण तसे झाले नाही त्यामुळे तिचा मूड ऑफ झाला. तरीही नंतर अनेक दिवस तिने त्याचा पाठपुरावा केला.

शेवटी एकदा तो तिला भेटायला तयार झाला. पण त्याने ठरवले होते की कोमल जर आपल्याशी ऑफिसच्या सहकाऱ्या व्यतिरिक्त प्रेम सबंध ठेऊ इच्छित असेल तर तिला थांबवायला हवे.

एका शनिवारी दुपारी ते पुण्यातील गुडलक कॅफेत भेटले. कोमलने जाणीवपूर्वक आपला आवाज मऊ ठेवला आणि कौस्तुभला आपल्या बोलण्याने प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. "कौस्तुभ, तू खरंच खूप पुढे गेलास. तुझी ही प्रगती पाहून मला खूप आनंद होतो. पण सांग, तुझ्या यशाचं रहस्य काय?"

कौस्तुभने हसत हसत उत्तर दिले, "कोमल, यशाचं रहस्य म्हणजे मेहनत आणि थोडीशी नशीबाची साथ. पण तू पण कमी नाहीस. मला माहीत आहे, तू कंपनीत मोठी जागा मिळवण्यासाठी किती मेहनत करतेस. पण तू राजकारणाला बळी पडलीस. पण बरे झाले त्यातून वाचलीस. पण तू काही बाबतीत चुकलीस जसं नियमाबाहेर जाऊन फक्त लेडीज एम्प्लॉइजला सपोर्ट केलास. ते चूक होतं!"

"हो. मी मान्य करते. त्यामागे माझी काही वैयक्तिक कारणे होती. आणि माझ्या नवऱ्याशी माझे तितकेसे पटत नाही!"

हे वाक्य आल्यानंतर कौस्तुभ सावध झाला. पण ते चेहऱ्यावर न दाखवता तो खोडकरपणाने म्हणाला, "विनोद कॉलेजपासूनच चांगला मुलगा होता. आधी मला त्याच्याबद्दल द्वेष वाटला पण तो तुझ्यासाठी चांगला आहे. परफेक्ट चॉईस. मला तर वाटते तूच त्याला त्रास देत असशील!"

तिने त्याच्या खांद्याला चापट मारली, "हट रे. मी काय तुला अशी मुलगी वाटली?"

"मुलगी? पुन्हा कॉलेज जीवनात परत गेलीस की काय? तू आता एका मुलीची आईं आहेस. एक जबाबदार संसारी स्त्री!"

"हो का?", स्वरात लडिवाळपणा आणून ती पुढे म्हणाली, "माझ्याकडे बघून वाटतं का मी एका मुलीची आई आहे?"

"नाही, बिलकुल नाही. तुला आजही तरुण ठेवणाऱ्या संतूर साबणाची जाहिरात सहज ऑफर होईल इतकी तू तरुण आणि सुंदर आहेस! पण मला वाटते आपण दोघे असे बोलायला नको. आपल्या दोघांना आपापले संसार आहेत. कुटुंब आहे. इतरांचा उगाच गैरसमज व्हायचा?"

"कोण इतर कौस्तुभ? कोण आहे इथे आपल्याला ओळखणारं?"

"कोमल, गर्दीला फक्त अनेक डोळेच नाही तर गर्दीचे कानही मोठे असू शकतात!"

कोमल हसू लागली, "कम ऑन, कौस्तुभ! कोणत्या जमान्याचा गोष्टी करतोयस? कॉलेजमध्ये कोण होतास तू आणि आता काय झालास तू?"
"कोमल आता मला निघायला हवं. पुन्हा कधीतरी भेटू!"

"एवढी घाई? ठीक आहे. पण या कॉलेजच्या जुन्या मैत्रिणीला विसरू नकोस. तू अजून किती दिवस पुण्यात आहेस?"

"आज रात्री निघणार मुंबईसाठी!"

"पुन्हा पुण्यात आल्यावर नक्की भेट. तू नाही सांगितलंस तरी मी कुठूनही माहिती मिळवेल की तू पुण्यात जेव्हा येणार आहेस! त्यापेक्षा मला स्वतः माहिती दे!"

"ठीक आहे मॅडम. नक्की. आता मला जाऊ दे. प्लीज!"

कोमलच्या मनात कौस्तुभबद्दल आकर्षण वाढत होते. तिला त्याचा आत्मविश्वास, त्याची बुद्धिमत्ता आणि त्याचा शांत स्वभाव आवडायला लागला. पण तिच्या मनात एक गोष्ट स्पष्ट होती – ती केवळ प्रेमासाठी नव्हे, तर आपल्या महत्वाकांक्षेसाठीही कौस्तुभच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. कारण कौस्तुभला शिडी बनवून तिला पुन्हा सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोचायचे होते.

दरम्यान, विनोद आपल्या निवडणूक प्रचारात व्यस्त होता. त्याने कधीही कोमल व्यतिरिक्त इतर स्त्रियांशी सलगी वाढवण्याचा प्रयत्न केला नव्हता. कोमल इतके महिने दूर राहिली होती, तरीही नाही.

तो मनापासून फक्त कोमलचा होता. इतर कोणत्या स्त्रीचा त्याने काहीही विचार केला नाही. कधीतरी कोमलला तिच्या चुकीची जाणीव होईल आणि ती परत येईल आणि बदलेल असे त्याला नेहमी वाटायचे.

आणि आता तर कोमल परत आली होती यातच त्याला आनंद होता. त्याच्या निवडणुकीसाठी आपली प्रतिमा स्वच्छ ठेवायची तर त्याला आपल्या कुटुंबात बेबनाव आहे.अशी स्थिती नको होती.

कोमलसाठी आता तो त्यांच्या संसारात लुडबुड करणाऱ्या नातेवाईकांशी ठाम भूमिका घ्यायला लागला.

तिला अंधारात ठेऊन पूर्वी अपत्य जन्माचा निर्णय घेतला त्याबद्दल त्याने माफी मागितली.

कोमल त्याला म्हणाली, "असू दे इतकी गोड मुलगी सानवी तू मला दिलीस. मी खुश आहे!"

पण दुसरीकडे तिचे मन, का कोण जाणे, कौस्तुभकडेच धावत होते. तिला कौस्तुभ सुद्धा हवा होता. स्वतःसाठी, आणि तिच्या महत्त्वाकांक्षेसाठी सुद्धा! एकदा आपल्या कार्यालयात विनोद बसला होता तेव्हा साडी आणि पक्षाचा बिल्ला घातलेली एक महिला कार्यकर्ता त्याच्याकडे आली आणि खुर्चीवर बसली.

"बोला, सुषमा ताई! कसा चाललाय माझ्या नावाचा प्रचार?"

"तुमचे नाव सगळीकडे दुमदुमते ठेवले आहे आम्ही. तुमच्या नावाला नाव ठेवण्याएवढी सुद्धा जागा नाही आहे. तुमची आजपर्यंतची समाजसेवा लोकांना माहिती आहे!"

"धन्यवाद ताई. अशाच बातम्या आणत रहा!"

"हो पण साहेब, एक छोटासा प्रोब्लेम आहे. म्हणजे, म्हणाल तर छोटा नाहीतर मोठा!"

"ताई, कोड्यात बोलू नका. स्पष्ट सांगा!"

"तुम्ही माझ्यासोबत ऑफिसच्या छोट्या मीटिंग रूममध्ये या. सांगते!"

प्रकरण 26

गुडलक कॅफेतील भेटीनंतर कोमलच्या मनात कौस्तुभबद्दलचं आकर्षण आणखी तीव्र झालं.

तिला त्याचा शांत स्वभाव, आत्मविश्वास आणि बुद्धिमत्ता यांनी भुरळ घातली होती. ती त्याला पुन्हा भेटण्यासाठी आतुर झाली होती.

तिने ठरवलं की यावेळी ती त्याला आपल्या सौंदर्याच्या आणि बोलण्याच्या जाळ्यात पूर्णपणे ओढेल.

तिने कौस्तुभला मेसेज पाठवायला सुरुवात केली, आणि जाणीवपूर्वक तिचा बोलण्याचा टोन आकर्षक ठेवला.

एका रात्री, कोमलने कौस्तुभला मेसेज केला, “कौस्तुभ, तू पुण्यात कधी येतोयस? मला तुला पुन्हा भेटायचं आहे. गुडलक कॅफे मस्त होतं, पण यावेळी कुठेतरी खास जागी भेटूया. काय म्हणतोस?”

कौस्तुभने विचार केला आणि उत्तर दिलं, “कोमल, मी पुढच्या आठवड्यात पुण्यात येणार आहे, पण फक्त कामासाठी. भेटायला वेळ मिळाला तर नक्की कळवतो.”

कोमलला त्याचं थंड उत्तर खटकलं, पण तिने हार मानली नाही. तिने लगेच दुसरा मेसेज टाकला, “काम तर ठीक आहे, पण थोडा वेळ माझ्यासाठी काढ ना. मी तुझ्यासाठी खास तयारी करेन. तुला माझ्यासोबत वेळ घालवायला नक्की आवडेल.”

तिने शेवटी एक विंक म्हणजे डोळा मारणारा इमोजी टाकला आणि तिचा एक फोटो पाठवला – ती एका काळ्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये, मंद प्रकाशात, हलकं हसत उभी होती. तिने लिहिलं, “कशी दिसते मी? तुझ्यासाठीच हा लूक!”

कौस्तुभने फोटो पाहिला आणि त्याला थोडं अस्वस्थ वाटलं. त्याला कोमलचा हा आग्रह चुकीचा वाटत होता, पण त्याने सौजन्याने उत्तर दिलं, “कोमल, तू खूपच छान दिसतेस. पण मी खूप बिझी आहे. भेटायचं नंतर पाहू.”

कोमलने त्याचं उत्तर वाचलं आणि तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. ती मनातल्या मनात म्हणाली, “कौस्तुभ, तू कितीही टाळाटाळ कर, मी तुला भेटायला भाग पाडेनच.”

काही दिवसांनंतर, कोमलला कळलं की कौस्तुभ पुण्यात एका कॉन्फरन्ससाठी येत आहे. तिने त्याला मेसेज केला, “कौस्तुभ, मला माहिती आहे तू उद्या कोथरूडमधील हॉटेल रॉयल येथे कॉन्फरन्ससाठी येतोयस. तुझं काम संपलं की आपण तिथेच जवळच्या रेस्टॉरंटमध्ये भेटूया. मी तुझी वाट पाहीन. कृपया नाही म्हणू नकोस!”

कौस्तुभला तिचा हा आग्रह टाळणं कठीण झालं. त्याने विचार केला की कोमलला थेट समजावणं गरजेचं आहे, म्हणून त्याने होकार दिला, “ठीक आहे, कोमल. कॉन्फरन्स संपल्यावर मी तुला भेटतो. पण फक्त थोड्या वेळासाठी.”

कोमल उत्साहाने तयारीला लागली. तिने एक निळ्या रंगाची सिल्क साडी निवडली, जी तिच्या गोऱ्या रंगावर खुलून दिसत होती. तिने हलका मेकअप केला, गडद लाल लिपस्टिक लावली आणि केस मोकळे सोडले.

तिच्या गळ्यात एक चमकदार हिऱ्याचा नेकलेस आणि हातात नाजूक बांगड्या होत्या. ती स्वतःला आरशात पाहत म्हणाली, “आज तू माझ्यापासून लांब जाऊ शकणार नाहीस, कौस्तुभ.”

कोथरूडमधील ‘मूनलाईट,’ हे पुण्यातील एक आलिशान ठिकाण होतं, जिथे मंद प्रकाश, मऊ संगीत आणि खिडकीबाहेर दिसणारी कोथरूडची हिरवीगार झाडं यामुळे वातावरण रोमँटिक होतं.

कोमलने एक खास टेबल बुक केलं होतं, जिथे ती आणि कौस्तुभ एकांतात गप्पा मारू शकतील. ती रेस्टॉरंटमध्ये पोहोचली आणि कौस्तुभची वाट पाहू लागली.

कौस्तुभ कॉन्फरन्स संपवून रेस्टॉरंटमध्ये आला. तो साध्या पण आकर्षक सूटमध्ये होता, आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकी थकवा आणि सावध भावना दिसत होती. कोमलने त्याचं स्वागत केलं, “कौस्तुभ, ये ना! किती दिवसांनी भेटतोय आपण. आज फक्त आपण दोघं आहोत, कोणताही व्यत्यय नाही.”

कौस्तुभने हलकं हसत तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, “कोमल, तू खूपच तयारी केली आहे. पण सांग, तुझ्या मनात काय चाललंय?”

कोमलने जाणीवपूर्वक आपला आवाज मऊ ठेवला आणि म्हणाली, “कौस्तुभ, मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. तू आठवतोस मला. कॉलेजच्या त्या दिवसांत, जेव्हा आपण कॅम्पसमध्ये तासन् तास गप्पा मारायचो. तुझं खट्याळ हसणं, तुझी ती बुद्धिमत्ता... मला तुझ्यासोबत पुन्हा त्या क्षणांना जागवायचं आहे.” तिने त्याच्याकडे प्रेमळ नजरेने पाहिलं आणि तिचा हात हलकेच त्याच्या हाताजवळ नेला.

कौस्तुभने तिचा हात पाहिला आणि सावधपणे म्हणाला, “कोमल, त्या आठवणी खूप छान होत्या, पण आता आपली आयुष्यं वेगळी आहेत. माझ्या आयुष्यात मॅगी आहे, आणि तुझ्या आयुष्यात विनोद आणि सानवी आहे. वाटल्यास आपण फक्त मित्र म्हणून भेटू शकतो. पण त्यापलीकडे नाही!"

कोमलने हसत त्याला मध्येच थांबवलं, “कौस्तुभ, इतका गंभीर का होतोस? मी फक्त म्हणतेय की आपण थोडा वेळ एकमेकांसोबत घालवूया. तुला माझ्यासोबत मजा येईल.”

तिने आपले केस मागे सरकवले आणि त्याच्याकडे मादक नजरेने पाहिलं. तिने वेटरला बोलावलं आणि काही खाद्य पदार्थांची ऑर्डर केली.

खाऊन झाल्यावर काही वेळानंतर कोमलने हलकं हसत त्याला निरोप दिला, पण तिच्या मनात एकच विचार होता – “कौस्तुभ, तू कितीही टाळाटाळ कर, मी तुला माझ्या जवळ आणेनच. तुझ्या यशाची शिडी मला माझ्या महत्वाकांक्षेपर्यंत घेऊन जाईल.”

या भेटीनंतर कोमलने ठरवलं की ती कौस्तुभला आणखी जवळ आणण्यासाठी प्रयत्न करेल. त्याच्या हृदयात स्थान मिळवेल. तिने एकसारखे मेसेज करून कौस्तुभला भंडावून सोडलं.

तिने त्याला एका रात्री पुण्यापासून खंडाळ्याला असलेल्या एका आलिशान हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं आणि मेसेजमध्ये सांगितलं, “कौस्तुभ, फक्त एक रात्र माझ्यासोबत घालव. मला खात्री आहे, तू माझ्या प्रेमात पडशील. माझ्या सौंदर्याने आणि माझ्या बोलण्याने तू वेडा होशील.”

कौस्तुभला हा मेसेज पाहून धक्काच बसला. त्याच्या मनात मॅगी होती, आणि त्याला कोमलच्या या प्रस्तावाने अस्वस्थ वाटलं. पण त्याने नकार देण्याऐवजी तिला भेटायचं ठरवलं, कारण त्याला कोमलला फायनल समजवायचं होतं की ती चुकीच्या मार्गावर आहे.

कोमलने त्या रात्रीसाठी खास तयारी केली होती. तिने लाल रंगाची साडी निवडली, जी तिच्या गोऱ्या रंगावर उठून दिसत होती. साडीची किनार चमकदार सोनेरी होती, आणि ती तिच्या शरीरावर अशी पडली होती की तिची सौंदर्यपूर्ण आकृती अधिकच खुलून दिसत होती.

तिने खोल गळ्याचा काळसर रंगाचा ब्लाऊज घातला होता. तिने आपले केस मोकळे सोडले, आणि हलक्या कुरळ्या लाटांनी ते तिच्या खांद्यावर पसरवले. तिने हलक्या मेकअपसह गडद लाल लिपस्टिक लावली, ज्यामुळे तिचे ओठ आणखी जास्त आकर्षण झाले.

तिच्या गळ्यात एक नाजूक हिऱ्याचा नेकलेस आणि हातात चमकणाऱ्या बांगड्या होत्या. तिने स्वतःला आरशात पाहिलं आणि स्वतःशीच हसत म्हणाली, “कौस्तुभ, आज तू माझ्या प्रेमात वेडा झाल्याशिवाय राहणार नाहीस.”

कोमलने विनोदला सांगितलं, “मी आज माझ्या मैत्रिणींसोबत पार्टीला जाते. सानवीला सांभाळायला मावशी आहेतच.”

विनोदने शांतपणे होकार दिला.

कोमल तिच्या कारने डेक्कन जिमखाना परिसरातून खंडाळ्याकडे निघाली. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता. तिला वाटत होतं की आज रात्री ती कौस्तुभला पूर्णपणे आपलंसं करेल.

कोमलने कार चालवताना कौस्तुभला मेसेज पाठवायला सुरुवात केली. “कौस्तुभ, मी निघाले आहे. तू खंडाळ्याला पोहोचलास का? आज रात्री फक्त तुझ्यासाठी खास आहे.”

कौस्तुभने सावधपणे उत्तर दिलं: “हो, कोमल, मी हॉटेलवर पोहोचलो आहे!"

कोमल खंडाळ्याच्या त्या आलिशान हॉटेलमध्ये पोहोचली. हॉटेलच्या लॉबीत तिने चेक-इन केलं आणि तिच्या रूमकडे निघाली. तिने एक सुपीरियर सुइट बुक केलं होतं, ज्याच्या खिडकीतून खंडाळ्याच्या हिरव्या डोंगरांचा आणि खोल दरीचा नजारा दिसत होता. रूममध्ये मंद प्रकाश, आरामदायी बेड, आणि एक छोटी बाल्कनी होती. तिने रूममध्ये प्रवेश करताच तिथल्या वातावरणाला आपलंसं करण्यासाठी काही काळजी घेतली. तिने टेबलवर दोन वाइन ग्लासेस ठेवले, आणि एक महागडी रेड वाइनची बाटली ऑर्डर केली. रूममध्ये मंद सुगंधी उदबत्ती पेटवली, ज्यामुळे वातावरण अधिकच रोमँटिक झालं.

तिने कौस्तुभला मेसेज केला: “मी रूमवर पोहोचले आहे. रूम नंबर 305. ये लवकर, तुझी वाट पाहतेय.” तिने शेवटी एक लाल हार्ट इमोजी टाकला.

कौस्तुभ हॉटेलच्या लॉबीत पोहोचला तेव्हा त्याच्या मनात संमिश्र भावना होत्या. तो लिफ्टमधून तिसऱ्या मजल्यावर गेला आणि रूम नंबर 305 च्या दारापाशी थांबला. त्याने बेल वाजवली.

कोमलने दार उघडलं. ती लाल साडीत, मंद हसत, त्याच्याकडे पाहत उभी होती. तिच्या डोळ्यांत एक खट्याळ आणि आत्मविश्वासपूर्ण चमक होती. “ये ना, कौस्तुभ. एवढा लाजतोस काय?” ती हसत म्हणाली आणि त्याला आत घेतलं.

कौस्तुभ रूममध्ये आला आणि त्याने आजूबाजूला पाहिलं. मंद प्रकाश, सुगंधी उदबत्ती, आणि टेबलवर ठेवलेली वाइनची बाटली पाहून त्याला कोमलचा इरादा स्पष्ट झाला. तो थोडा अस्वस्थ झाला, पण त्याने स्वतःला सावरलं आणि म्हणाला, “कोमल, हे सगळं खूपच छान आहे. पण तू इतकं का प्रयत्न करतेस? आपण फक्त मित्र आहोत, आणि मला वाटतं आपण त्या पलीकडे जायला नको.”

कोमलने त्याच्याकडे प्रेमळ नजरेने पाहिलं आणि जवळ येत म्हणाली, “कौस्तुभ, तू इतका गंभीर का होतोस? आज रात्री फक्त आपण दोघं आहोत. मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. तू मला कॉलेजमध्ये किती आवडायचास, माहिती आहे? आणि आता तू इतका यशस्वी झालास, मला तुझा अभिमान वाटतो.” तिने त्याच्या हाताला हलकेच स्पर्श केला आणि त्याला बाल्कनीकडे घेऊन गेली.

बाल्कनीतून खंडाळ्याच्या डोंगरांचा आणि रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या ताऱ्यांचा नजारा दिसत होता.

कोमलने वाइनचा ग्लास त्याच्या हातात दिला आणि म्हणाली, “कौस्तुभ, फक्त एक रात्र. मला तुझ्यासोबत हा क्षण जगायचा आहे. तू माझ्याकडे बघ, मी तुझ्यासाठी किती तयारी केली आहे. तुला माझ्या सौंदर्याची जादू दिसत नाही?” तिने आपले केस एका बाजूला सरकवले आणि त्याच्याकडे मादक नजरेने पाहिलं.

कौस्तुभने ग्लास टेबलवर ठेवला आणि गंभीरपणे म्हणाला, “कोमल, तू खूप सुंदर आहेस, यात शंका नाही. पण माझ्या आयुष्यात मॅगी आहे, आणि मी तिच्याशी प्रामाणिक आहे. तू मला मित्र म्हणून खूप आवडतेस, पण यापेक्षा जास्त काही होऊ शकत नाही. आणि तुझ्या आयुष्यात विनोद आहे, सानवी आहे. तू त्यांच्याबद्दल विचार केलाय का?”

कोमलच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणभर लुप्त झालं. तिला कौस्तुभचा नकार अपेक्षित नव्हता. पण तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, “कौस्तुभ, मी फक्त तुझ्यासोबत थोडा वेळ घालवू इच्छिते. तू इतका विचार का करतोस? आपण फक्त दोन मित्र आहोत, जे कॉलेजच्या आठवणी शेअर करताहेत.”

पण तिच्या स्वरातली लडिवाळपणा आणि तिच्या डोळ्यांतली तीव्र इच्छा लपत नव्हती.

कौस्तुभने तिला थांबवलं आणि म्हणाला, “कोमल, मला माफ कर, पण मला आता निघायला हवं. तू स्वतःचा आणि तुझ्या कुटुंबाचा विचार कर. आपण पुन्हा कधीतरी मित्र म्हणून भेटू.”

तो रूममधून बाहेर पडला, आणि कोमल एकटीच बाल्कनीत उभी राहिली, तिच्या हातात वाइनचा ग्लास आणि मनात निराशा!

कोमलला कौस्तुभचा नकार सहन झाला नाही. तिने वाइनचा ग्लास टेबलवर ठेवला आणि रागाने तिची बॅग उचलली. ती स्वतःशीच म्हणाली, “ठीक आहे, कौस्तुभ. तू मला नाकारलंस, पण मी हार मानणार नाही.”

ती हॉटेलमधून बाहेर पडली. निराश मनाने आणि रागात, तिच्या कारने पुण्याकडे परत निघाली.

ती खंडाळा घाटातून जात होती. रात्रीचे दहा वाजले होते, आणि घाटाचा रस्ता डोंगराळ, वळणांचा, आणि धोकादायक होता. रस्त्याच्या डाव्या बाजूला खोल दरी होती, आणि उजव्या बाजूला सह्याद्रीच्या डोंगरांची खडबडीत कड होती.

रात्रीच्या अंधारात फक्त तिच्या कारचे हेडलाइट्स आणि रस्त्याच्या कडेला असलेले रिफ्लेक्टर्स दिसत होते…

खंडाळा घाटातील रस्ता हा सह्याद्रीच्या डोंगरातून खाली उतरतो, आणि त्याची वळणं अत्यंत तीव्र आणि धोकादायक आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी रेलिंग्ज आणि ठिकठिकाणी लावलेले चेतावणीचे फलक रात्रीच्या अंधारात हेडलाइट्सच्या प्रकाशात चमकत होते.

कोमलने कारचा वेग वाढवला, कारण तिला लवकर घरी पोहोचायचं होतं.

तिच्या मनात कौस्तुभचा नकार आणि विनोदबद्दलचा अपराधीपणा यांचं मिश्रण होतं!

विचार करता करता कोमल एका तीव्र वळणावर पोहोचली, जिथे रस्ता डावीकडे खोल दरीकडे वळत होता.

तिने कारचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक दाबला, पण ब्रेक पेडलवर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आपल्या तंद्रीतून ती बाहेर आली. तिच्या हृदयाचे ठोके वाढले.

“हे काय झालं?” ती स्वतःशीच ओरडली आणि पुन्हा जोरात ब्रेकवर पाय मारला.

पण फ्ल्युइड लीक झाल्यामुळे ब्रेक सिस्टम पूर्णपणे फेल झालं होतं. गाडीचा वेग कमी होण्याऐवजी वाढतच चालला होता.

कोमलने स्टीअरिंग घट्ट पकडलं आणि गाडी रस्त्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण ती आता अनियंत्रित झाली होती.

रस्त्याचं वळण अधिक तीव्र झालं, आणि गाडी डाव्या बाजूला दरीकडे घसरायला लागली.

तिने स्टीअरिंग उजव्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला, पण गाडीचा वेग इतका जास्त होता की ती रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी रेलिंगच्या दिशेने धावली.

रस्त्यावर असलेल्या एका छोट्या खड्ड्यामुळे गाडी उचलली गेली, आणि ती थेट रेलिंगवर आदळली.

“धडाम!” एक प्रचंड आवाज झाला. गाडीचा पुढचा भाग रेलिंगवर जोरात आदळला, आणि काचेच्या तुकड्यांचा वर्षाव झाला. कोमलचं डोकं डॅशबोर्डवर आपटलं, आणि तिच्या कपाळावरून रक्त वाहू लागलं.

तिच्या छातीवर स्टीअरिंगचं चाक जोरात दाबलं गेलं, आणि तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली होती.

हेडलाइट्स फुटले, बोनेट वाकलं, आणि इंजिनमधून धूर निघत होता.

कोमल बेशुद्ध झाली, आणि तिच्या मिटलेल्या डोळ्यांसमोर कौस्तुभ आणि विनोद यांचे चेहरे एकामागून एक येऊ लागले.

शेवटी सानवीचा हसरा चेहरा तिला दिसला आणि तिने प्राण सोडले.

रस्त्यावरून जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकच्या ड्रायव्हरने हा अपघात पाहिला.

त्याने तात्काळ गाडी थांबवली आणि कोमलच्या कारजवळ धावत गेला. लाल साडी नेसलेली, रक्ताने माखलेली कोमल पाहून तो घाबरला.

त्याने 100 नंबर डायल केला आणि पोलिसांना माहिती दिली:

“खंडाळा घाटात, पुणे-मुंबई हायवेवर एक मोठा अपघात झालाय. एक बाई मृत्युमुखी पडली आहे, लवकर या!”

पोलिस आणि एम्ब्युलेन्स 15 मिनिटांत घटनास्थळी पोहोचली. कोमलला सावधपणे गाडीतून बाहेर काढण्यात आलं.

पोलिसांनी तिच्या पर्स मधून सापडलेल्या ओळखपत्रावरून विनोदला कॉल केला.

प्रकरण 27 (शेवट)

विनोदला जेव्हा अपघाताची बातमी कळली, तेव्हा त्याला मागचे प्रसंग आठवले:

सुषमाताई आणि विनोद ऑफिसच्या छोट्या मीटिंग रूममध्ये गेले. सुषमाताईंनी दरवाजा बंद केला आणि गंभीर चेहरा करत विनोदकडे पाहिलं.

“साहेब, मला सांगायचंय की मी काल गुडलक कॅफेमध्ये कोमलला आणि एका पुरुषाला एकत्र पाहिलं! मी गुप्तपणे याचा व्हिडिओ बनवला."

त्यांनी व्हिडिओ दाखवला.

"हा तर कौस्तुभ, कोमल आणि माझा कॉलेजचा मित्र!"

सुषमाताई पुढे म्हणाल्या, "त्यांच्यातलं संभाषण ऐकून मला धक्काच बसला, साहेब!”

विनोदच्या कपाळावर आठ्या पडल्या.

"साहेब, मला वाटतंय, ही गोष्ट तुमच्या निवडणुकीसाठी धोक्याची ठरू शकते. जर ही गोष्ट पसरली, तर तुमची प्रतिमा डागाळेल.”

विनोदच्या चेहऱ्यावर संताप आणि दुःख एकाच वेळी उमटलं. सुषमा ताई म्हणतात ते खरे होतेच पण त्यापलीकडे जाऊन, कोमलवर इतका विश्वास ठेऊन, तिच्या इतक्या चुका पोटात घेऊन, तिने धोका दिला होता. याची किंमत तिला चुकवावी लागणार होती.

तो शांतपणे म्हणाला, “ताई, ही गोष्ट कुणाला सांगू नका. व्हिडिओ मला पाठवा आणि तुमच्या मोबाईल मधून डिलीट करा. मी बघतो काय करायचे.”

मग विनोद कोमलचा मोबाईल न चुकता ती नसताना रोज चेक करू लागला. तिचा पासवर्ड त्याने एकदा चोरून पाहिला होता. पण कोमल बेसावध होती कारण विनोदला आपल्या कौस्तुभ सोबतच्या भेटींबद्दल माहिती आहे याची पुसट कल्पना सुद्धा तिला नव्हती. नंतर एकदा विनोदने कौस्तुभला फोन केला. आवाज थंड, पण धमकीच्या स्वरात होता.

“कौस्तुभ, मला माहिती आहे की कोमल तुला खंडाळ्याला भेटायला बोलावतेय. तू तिथे जाणार आहेस, आणि तुझ्या ड्रायव्हरच्या मदतीने तिच्या कारचं ब्रेक सिस्टम नादुरुस्त करायचं आहे. जर तू हे केलं नाहीस, तर माझ्या ओळखीच्या गुंडांना तुझ्यामागे लावेन. तुला आणि तुझ्या मॅगीला कायमचं संपवेन. विचार कर.”

कौस्तुभला ही धमकी ऐकून धक्का बसला. त्याच्या मनात मॅगीची आणि त्याच्या स्वतःच्या सुरक्षेची चिंता निर्माण झाली. तो कोमलला थांबवायला तयार होता, पण विनोदची धमकी त्याला टाळता येणार नव्हती. त्याने नाइलाजाने होकार दिला आणि त्याच्या ड्रायव्हरला, संतोषला, कोमल जेव्हा खंडाळ्यात त्याच्यासोबत बिझी असेल तेव्हा कारच्या ब्रेक लाईनमध्ये छेडछाड करण्याची सूचना दिली. संतोषने हॉटेलच्या पार्किंगमध्ये कोमलच्या कारच्या ब्रेक फ्ल्युइड लाईनला हलकेच कट केला, ज्यामुळे ब्रेक हळूहळू फेल होईल, पण कोणालाही शंका येणार नाही.
• • •

त्याने कौस्तुभला फोन केला आणि रागाने विचारलं, “कुठला पुरावा मागे सोडला नाही ना तुम्ही लोकांनी?"

कौस्तुभ, स्वतः तणावात, म्हणाला, “विनोद, मी फक्त तुझ्या सांगण्यावरून सगळं केलं. कोणताच पुरावा मागं ठेवला नाही. तुम्ही सांगितले तसे मी केलं पण आता मला काही होणार नाही याची आम्ही तुम्हाला दिली पाहिजे”

त्याला स्वतःचा पश्चाताप होत होता, पण विनोदच्या धमकीमुळे तो गप्प बसला होता. विनोद अपघात स्थळी पोहोचला. कोमलच्या बॉडीकडे बघत मनात अपराधीपणा आणि भीती यांचं मिश्रण विनोदाच्या मनात निर्माण झालं.

कोमलच्या कारसोबत तिच्या महत्वाकांक्षेचाही चक्काचूर झाला होता…

(समाप्त)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users