हा गंध जिवाला लावी पिसे ....

Submitted by अनिंद्य on 18 October, 2025 - 04:04

हा गंध जिवाला लावी पिसे ......

एक मिनिट. मूळ गाण्याचे बोल वेगळे आहेत हे माहिती आहे. पण ‘छंद जिवाला लावी पिसे’ ऐवजी ‘गंध जिवाला लावी पिसे’ लिहिले तरी फार काही बिघडते का? गंध सुद्धा जिवाला पिसे लावतो आणि तोच छंद असेल तर तुमच्या कुंडलीत कनकगन्ध नामक योग आहे असे खुशाल समजावे.

You enter the room twice; first with your fragrance, then with your presence असे म्हणतात. म्हणजे असे माबदौलत म्हणतात. कुणीतरी Jonathan Williamson म्हणून गेला आहे असे लिहिले असते तरी तुम्हाला पटलेच असते ना? खऱ्या खोट्या थोरामोठ्यांच्या नावाने खपवायला छान वाक्य आहे की नाही ते सांगा. हेच वाक्य थोडा बदल करून ढेरपोट्या व्यक्तींबद्दल म्हणता येते, पण तो आपला आजचा विषय नाही.

IMG_0056.jpeg

गंध-सुगंधाची नावड आहे असे लोक कमीच असतात. बहुतेकांना छान सुवास असलेले वातावरण, जागा, उत्तम सुगंध ल्यालेल्या व्यक्ती यांची भुरळ पडतेच पडते. गंध-सुगंध / वास घेणे आणि यासंबंधित क्रिया-कृतींसाठी इंग्रजी भाषेत वट्ट २६७ शब्द आहेत (कोणते ते मला विचारू नये, Merriam-Webster शब्दकोश बघावा) मराठीत किती आहेत ते माहित नाही, पण संस्कृत भाषेत मराठीपेक्षा जास्त असावेत. शरीराला उत्तम सुगंध (घामाचा नव्हे) येणारी व्यक्ती जाईल तिथले वातावरण प्रसन्न करते. उनसे पहले उनकी खुशबू ही महफिल लूट लेती है. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान तर खुलेआम म्हणतोच "I am the best smelling man in Indian movie industry." बरं तो म्हणतो तेच त्याचे सर्व को-स्टार्स सुद्धा म्हणतात, अगदी सुचित्रा कृष्णमूर्तीपासून ते आजचे.

1f9264ce-ca3d-4475-a5a6-4edae7f34293.jpeg

साबण-शँम्पू, सौंदर्य प्रसाधने, आफ्टर शेव, रूम फ्रेशनर असे अनेक सुगंध आपण हुंगत असलो तरी “Liquid Perfume” ची दुनिया न्यारीच. आज ४०-५० वय आणि सर्वसाधारण मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असलेल्या बहुतेकजणांचा सुगंधी द्रवाचा प्रथम परिचय हमखास कुठे लग्न वगैरे समारंभात अतिथी म्हणून गेल्यास दारातच झालेला गुलाबपाण्याचा शिडकाव, स्त्रियांच्या हळदीकुंकू टाइप कार्यक्रमात किंवा जावयाचा मानपान म्हणून मनगटाला लावलेले अत्तर किंवा कुण्या फॉरिनला जाऊन आलेल्या रसिक मित्र-नातेवाईकाने भेट दिलेली सुगंधाची बाटली असा झालेला असतो. थोड्या सुखवस्तू कुटुंबामध्ये वर्षातून एक-दोनदाच वापर होणाऱ्या चांदीच्या अत्तरदाण्या, गुलाबदाण्या असत, असायच्या, असतात.

7eb8f8d3-f8e3-4ddd-a848-4b99e6ad903b_0.jpeg

कुपिबद्ध अत्तर / सुगंध सर्वप्रथम तयार करण्याचे श्रेय इजिप्तच्या लोकांचे की भारतीयांचे की अन्य जुन्या मानवसमूहाचे याबद्दल अर्थातच वाद आहेत. त्यातल्या त्यात सुगंधाचे जाणकार ईजिप्शियन लोकांना झुकते माप देतात. त्यांच्या पुराणकथांमधे अत्तर म्हणजे “रा” (Ra-The Egyptian Sun God) या देवाचे घर्मबिंदू! सुगंध = देवाचा घाम ! घामावरून आठवले, स्री-पुरुषांच्या एकमेकांकडे आकर्षित होण्यामधे शरीराच्या वासाचा, मुख्यतः घामाच्या वासाचा वाटा असतो असे अभ्यासक सांगतात. (घामाचा वास मारणारा पार्टनर कुणाला आकर्षक वाटतो ते त्या अभ्यासकांनाच माहित)

7efc5f26-2379-4f03-9175-600a5fa89eb2.jpeg

आपल्याकडे देवादिकांना कस्तुरी, चंदन, सुगंधी पुष्पहार वगैरे अर्पण करण्याच्या परंपरा आणि भारतीय उपखंडात 'ताज्या' फुलांना आणि सुगंधी तेलांना असलेले महत्व बघता सुगंध-अत्तरे निर्माण करण्यात आपलाही नंबर वरचाच आहे यात शंका नाही.

हिंदू देवतांमध्ये 'सुगन्धप्रिय' देवता तीन. श्रीकृष्ण, लक्ष्मी आणि दत्त. श्रीकृष्णाला अवगत असलेल्या ६४ कलांच्या सूचीत "फळाफुलांपासून सुगंधी द्रव्ये आणि त्यांचे उपप्रकार, विविध सुवासिक तेलांची निर्मिती आणि त्यांचा योग्य ऋतूत योग्य वापर वगैरे करणे" या कलेचा उल्लेख आहे. वृंदावनात असलेल्या अनेकानेक कृष्णमंदिरांमध्ये आजही कृष्णमूर्तीला पुजाऱ्यांनी आणि गाभाऱ्याच्या उंबरठ्याला भक्तांनी करावयाचे सुगंधी अत्तराचे लेपन हा महत्वाचा पूजन उपचार असतो, म्हणजे तो सुगंधनिर्माण कलेचा ज्ञाता आणि सुगंधाचा वापरकर्ता दोन्ही आहे. गन्धप्रिया श्रीलक्ष्मीचे दिवाळीतले लक्ष्मीपूजन अत्तराशिवाय पूर्ण होत नाही आणि दत्तसंप्रदायात दत्तमूर्तीच्या चरणांवर अत्तर वाहणे मस्ट. काही दत्त मंदिरात तर अत्तराचा 'प्रसाद' असतो, विशेषतः यतिपूजनाच्या प्रसंगी. पौराणिक कथांमधल्या यक्षमंडळींमधे एक 'गंधयक्ष' दिसतो, तो तळ्याकाठी राहतो आणि सुगंधी वनस्पती ओळखण्यासाठी गंधकार-सुगंधनिर्मात्यांना मदत करतो वगैरे कथाही आहेत.

खूप पूर्वीपासून भारतीय मंडळी हौसेने सुगंध निर्माण करत आणि वापरत होती हे निश्चित. सम्राट कृष्णदेवरायाच्या सरकारात एक मंत्रालय फक्त सुगंध आणि त्यापासूनच्या सौन्दर्यप्रसाधनांच्या निर्मिती आणि व्यवस्थापनासाठी होते म्हणे. सतराव्या शतकाअखेरीस लिहिलेल्या एका संस्कृत ग्रंथातल्या 'गंधशास्त्र' विभागात उत्तम परफ्यूम तयार करायला वापरायच्या वस्तूंची (मराठीत भाषांतरित) यादी बघा:

श्रीखंड, अगर/अगरू, जायपत्री, शैलजा-सैलजा, वाळा, येळा/येळ, लवंग, तूप, श्रीगंध, शेवंती, मख, दवण, ब्राम्ही, चंपाकळी, हळद, गेरू, कापूर, तगर, गहुला(?), जायफळ, गुग्गुळ, केतकी, जवादी, शतपत्र, चुना, चंपक, दालचिनी, हिंगुळ, तमालपत्र, कोष्ट/ कोष्ठ, व्याघ्रनखी, केसर, पद्मान्क, कुंकुम, नागचंपा, चंदन तुळशीची पाने, मोगरा, काळे मिरे, मिऱ्याची फुले, वेलची आणि वेलचीची फुले आणि साल, कापूरवृक्षाचे खोड/ साल, चंदनवृक्षाचे खोड, साल आणि मुळे, सुगंधबाला/बलरक्षीची मुळे, कापूर वृक्षाचा डिंक/ स्त्राव, कस्तुरी, मध वगैरे वगैरे. हा कच्चा माल वेगवेगळ्या प्रमाणात मिसळून तऱ्हेतऱ्हेचे सुगंध तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती !

1e0b45b0-335a-432f-a6ec-fa5031cac171.jpeg

पहिल्या पावसानंतर दरवळणाऱ्या मृदगंधाचे असो की गुलाब, मोगरा, मजमुआ, चमेली, रातराणी नाहीतर ४२ विशिष्ट फुलांच्या प्रमाणबद्ध अर्कसंयोजनातून जन्मलेले शमामा ... खाश्या ‘भारतीय’ सुगंधांची - अत्तराची एक निराळीच जादुई दुनिया आहे. त्यांची राजधानी आहे उत्तरेत कन्नौज तर दक्षिणेत मदुरै. लखनऊ नजिकचे कन्नौज ६ व्या शतकापासून सम्राट हर्षवर्धनाच्या कालापासूनच प्रसिद्ध होतेच. विलासी मुगलांच्या आणि शौकीन अवधी नवाबांच्या उदार आश्रयाने गेली ४००+ वर्ष आशियातील सुगंधाची पंढरी म्हणून नाव कमवून आहे ते आजतायगत. त्यामानाने युरोपची सुगंधपेटी म्हणून फ्रांसचे Grasse साधारण २००-२२५ वर्षाआधी उदयाला आले. कन्नौजचे अत्तर, तिथले अतर-साज, जगभरातले शौकीन ग्राहक, सुगंधाच्या घाऊक- किरकोळ व्यापाऱ्यांनी गजबजलेला अत्तर बजार हे एक मोहक जग आहे, त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

एकीकडे हे तर दुसरीकडे फ्रेंचांनी लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर नेलेले पाश्चात्य परफ्यूम्स. कडाक्याच्या थंडीमुळे आणि स्नान करण्याच्या एकूणच आळसामुळे फ्रेंच सम्राट आणि उमराव शरीराची दुर्गंधी लपवण्यासाठी परफ्यूम्सचा भरमसाठ वापर करत. प्रचंड महाग असल्यामुळे हे सुगंध सर्वसामान्यांना दुष्प्राप्य होते आणि लवकरच परफ्यूम्स वापरणे म्हणजे वैभवाचे, सुसंकृत, उच्चभ्रू असण्याचे मुख्य लक्षण म्हणून आधी फ्रांस आणि मग पूर्ण पाश्चात्य जगतात मान्यता पावले. त्याची मोहिनी अशी की आजघडीला द्रव- बाटलीबंद पाश्चात्य परफ्यूम्सचा जागतिक व्यापार साधारण $ ६० बिलियनचा आहे आणि सर्वात मोठा वापरकर्ता देश अमेरिका.

IMG_0050.jpeg

द्रवसुगंध तयार करण्याची आणि ते वापरण्याची पारंपरिक भारतीय (Indian / Oriental) पद्धत आणि पाश्चिमात्य जगाची पद्धत यात एक मूलभूत फरक म्हणजे आपली परंपरा सुगंधी तेलांची आहे, म्हणजे Oil based perfumery आणि पाश्चात्य, modern परंपरा ही Alcohol based perfumery ची आहे. अंगाला सुगंधी तेलांनी मसाज करणे, सुगंधी तेलमिश्रित उटण्यांनी आंघोळ करणे, अंघोळीच्या पाण्यात सुगंधी द्रव्ये घालून त्या पाण्यानी स्नान करणे, कानात सुगंधी द्रव्य लावलेला कापसाचा बोळा ठेवणे, स्तनाग्रांना-मनगटाला सुगंधी अत्तर लावणे, कस्तुरी, केवडा, खस-वाळा, गुलाबपाण्याचा शिडकाव करणे या सर्व भारतीय गंधयोजनात 'सुगंधाचा शरीराला प्रत्यक्ष स्पर्श' हा सामान दुवा आहे, कम्प्लसरीच असतं ते. याउलट पाश्चात्य पद्धतीची सुगंधी द्रव्ये बहुतांशी अल्कोहोलचा बेस वापरून बनवलेली असतात आणि शरीरावर, कपड्यांवर शिडकावा करण्यासाठी वापरली जातात. फवारे उडवून, स्प्रे करून. अल्कोहोलयुक्त असल्याने त्यांचे शेल्फ लाईफ कमी असते, शिंपडण्याच्या थोड्याच कालावधीत ते सुगंध उडून जाणे अपेक्षित असते.

निसर्गातील फुला-फळांचे सुवास हे तर आपले लहानपणपासूनचे सोबती, त्यामुळे त्यांचा वापर परफ्यूम बनवण्यासाठी होतो हे ओघाने आले (शुद्ध मराठीत natural progression हो) त्याव्यतिरिक्त सर्वात जास्त वापरला जाणारा कच्चा माल म्हणजे मसाले (शुद्ध मराठीत spices) लवंग, केशर, केवडा, तेजपान, जायफळ, वेलदोडा, जायपत्री, हळद एक ना दोन मसाले याकामी वापरण्यात येतात. वॅनिला, गवती चहा, संत्री, लिंबू आणि चॉकलेट-कोको यांचा वापर तर प्रचंड प्रमाणात होतो. जगभरात असलेल्या शेकडो फुले-फळादी नैसर्गिक सुगंधी वस्तू, त्यांची शेकडो-हजारो कॉम्बिनेशन्स आणि त्यात भर कृत्रिम (केमिकल) सुगंधाची ... दरवर्षी नवनवीन परफ्यूम्स तयार होतात. ज्यांना वर्षानुवर्षे ग्राहकपसंती लाभते ते लिजण्डस म्हणून नाव कमावतात, बाकी कालौघात गुडुप होतात.

कृत्रिम सुगंधांची निर्मिती करण्याचे सुगंधनिर्माणशास्त्र / सुगंधनिर्माणकला (क्रिएटिव्ह परफ्यूमरी) मध्ये खूप प्रगती केल्याने आणि फक्त नैसर्गिक सुगंधांपुरतेच मर्यादित न राहिल्याने alchohol based perfumes मध्ये अपार वैविध्य दिसून येते. स्त्रियांसाठीचे, पुरुषांचे, युनिसेक्स प्रकारचे, सकाळचे, संध्याकाळचे, खेळाडूंसाठीचे, प्रेमिकांसाठीचे, floral, woodsy, fruity, sweet, fresh, oceanic, leafy, musky, smoky, grassy वगैरे. त्यात पुन्हा warm (as in cloves, cardamom, saffron notes) आणि cooling (as in jasmine, vetiver, marigold notes) clean, phthalates and parabens free असे उप-प्रकार. एक ना हजारो तऱ्हा, truly spoilt for choice. हजारो सुगंधी फुलांनी बहरलेली दैवी बागच जणू.

45eefed9-92aa-4b1f-91c6-196f940eea60.jpeg

उत्तम परफ्यूमची बांधणी साधारणतः तीन 'नोट्स' वर केलेली असते - बेस नोट, मिडल नोट व टॉप नोट. (प्रकारान्तराने सोल नोट, हार्ट नोट व हेड नोट) पूर्वी घेतला नसेल तर कधी लक्षपूर्वक हा गंधानुभव घ्याच. परफ्यूम बाटलीतून बाहेर फवारल्याबरोबर आपल्या नाकापर्यंत पोहचतो तो Top Note. हा वास सहसा तीव्र असतो. आपल्याला क्षणात आकर्षित करण्याचे, त्या गंधाशी बांधून ठेवण्याचे काम टॉप नोटचे. पुढचे काही मिनिटे वेगवेगळ्या मिडल नोट्सचे विभ्रम अनुभवायला मिळतात आणि नंतर उशिराने जो मंद दरवळ येतो तो स्वर्गीय सुगंध म्हणजे बेस नोट ; परफ्यूमचा आत्मा, धनंजय !

म्हणूनच खरा सुगंध समजून परफ्यूम विकत घ्यायचे असेल तर अजिबात घाई करू नये आणि दोन सुगंध परीक्षणामध्ये ब्रेक म्हणून palette cleaning साठी विक्रेत्याकडे ठेवलेल्या कॉफीचे / कॉफीबीयांचे पात्र हुंगावे हे बेस्ट. त्याच्याकडे palette cleaner नसेल तर त्या perfumery वर कायमची फुली मारावी.

मला सुगंधाएवढेच, किंबहुना काकणभर जास्तच आकर्षण सुगंधाच्या बाटल्यांचे आहे. त्यांचे नानाविध दिलखेचक आकार, रंग, डिझाइन्स मोहिनी घालतात, नजरबंदी करतात, भुरळ पाडतात. एक अद्भुत जग. आधी सुगंधाचे कंटेनर म्हणून मातीच्या, काचेच्या आणि चांदी-सोन्याच्या कुप्या वापरात होत्या. अत्तरदाण्या, गुलाबदाण्या, गळ्यात घालायच्या दागिन्यांमध्ये अत्तरकुपी असे नानाविध प्रकार जुन्या काळी होते, काही आताही आहेत, नवा थाट लेवून.

3f2d3c94-d5f0-45df-8176-3fd0b390f334.jpeg

काचेच्या कट ग्लास / क्रिस्टलच्या बाटल्या म्हणाल तर देखणे, डोळ्यांचे पारणे फिटवणारे अक्षरश: शेकडो प्रकार आहेत आणि त्यात दर महिन्यात आणखी नवनवीन भर पडतच आहे. Taking design creativity to skyscraping heights.

IMG_0051.jpeg

एक मात्र आहे - नैसर्गिक असोत की मानवनिर्मित, सुगंध कधीच एकटे येत-भेटत नाहीत. ते नेहेमी कुणातरी सोबत येतात, आठवणीत अलगद जाऊन बसतात. आपल्या तान्ह्या बाळाचा गंध डोळे मिटूनही ओळखता येतो, वृद्धांचा एक विशिष्ट गंध ते निवर्तले तरी अनेक दिवस आपल्याला त्यांची आठवण करून देतो (BTW या गंधाला जापानी लोक केरिशो म्हणतात). क्रश, प्रियकर-प्रेयसी च्या आवडीचा सुगंध नकळत आपल्याही आवडीचा होऊन बसतो. प्रेमात पडल्यावर 'मै सांस लेता हूँ, 'तेरी खुशबू आती है' असे होते. उत्कट प्रेमात तर 'जब भी खयालों में तू आए, मेरे बदन से ख़ुशबू आए; महके बदन में रहा नहीं जाए’ असेही होते. वर्षानुवर्षे एकच परफ्यूम वापरणारे मित्र-मैत्रिणी- प्रियजन त्यांच्या signature smell मुळे कुठेही पटकन स्पॉट होतात, सुगंध त्यांची ओळख होऊन मिरवतो… अशी गंधस्मृतीची ताकद.

IMG_0044.jpeg

तुमचे सुगंध परिचयाचे किस्से, गंधानुभव, सुगंधाच्या सुगंधी आठवणी, आवडी-निवडी, तुमच्याकडे असलेल्या सुगंध साठ्याचे फोटो, त्याबद्दलची माहिती या सर्वांबद्दल प्रतिसादात शेयर केलेत तर धाग्याचे सार्थक होईल. सुगंधचर्चेसाठी धागा खुला आहे.

सर्वांना दीपावलीच्या सुगंधमय शुभेच्छा.

(काही चित्रे जालावरून साभार)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ शिर्षक

हा छंद जिवाला लावी पिसे

गीत : वंदना विटणकर
गायक : मोहम्मद रफी
संगीतकार : श्रीकांत ठाकरे
(पिताश्रींचे आवडते गीत)

सुंदर लिहिलंय. ती बगळ्याची (?) अत्तरदाणी मस्त आहे!

सुगंधाचं वेड मलाही आहे. फुलं/फुलझाडंही रंगा-आकारापेक्षा गंधाने लक्ष वेधतात आणि प्रामुख्याने त्यासाठी घेतली जातात. फुलाचं चित्र/फोटो पाहिल्यावर त्यचा वास नुसता आठवत नाही, अक्षरशः नाकाला जाणवतो!

तीच अत्तरं/परफ्यूम्स निरनिराळ्या शरीरांवर (pheromonesनुसार) निरनिराळी गंधाळतात. स्त्रिया आणि पुरुषांसाठीचे सुगंध निराळे असतात ते त्यामुळेच. तसंच निरनिराळ्या प्रसंगी (उदाहरणार्थ संप्रेरकांच्या पातळीनुसार) निराळे सुगंध अधिक आकर्षक वाटतात.
सुगंध सहसा ‘पल्स पॉइंट्स’वर लावले की अधिक दीर्घकाळ रेंगाळतात.
(स्तनाग्रांनाही अत्तर लावतात ही माहिती नवीन होती माझ्यासाठी.)

अन्नाच्या आस्वादातही सुगंधाचा वाटा मोठा असतो!

बाकी वर अनेकांनी लिहिल्याप्रमाणे अमांच्या आठवणीने एक कळ आली वाचताना!

नेहमीप्रमाणे छान लेख.. आणि दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे समायोचित सुद्धा म्हणू शकतो..

"I am the best smelling man in the Indian movie industry.. शाहरुख स्मेल्स गूड हे ऐकून आहे. पण ते तो परफ्यूमबाबत चोखंदळ आहे म्हणून की त्याचा बॉडीस्मेलच कमाल आहे याची कल्पना नव्हती.
आणि मला स्वतःला कुठल्याही सुवासाची शून्य आवड असल्याने कधी शोधायला सुद्धा गेलो नाही. मला फक्त खाद्यपदार्थांचे सुवास आवडतात Happy बाकीच्या कुठल्याही सुगंधापेक्षा पाण्याला जसे कुठली रंग, चव, फ्लेवर नसतो तसे कुठलाही गंध नसलेले स्मेललेस वातावरण कंफर्टेबल वाटते. थोडक्यात मी येथील चर्चेतून बाद आहे Happy

… परफ्यूमच्या बाटल्यांत फार विविधता आहे.….
एका सुगंधी धाग्याचा विषय दडलाय इथे…

या धाग्याचा उगम ऋतुराज यांच्या क्रोकरी धाग्यावर गेल्या फेब्रुवारीत झालेल्या चर्चेत आहे. तिथल्या महारथींमुळे या लेखाची बुंदी पाडण्यात आली आहे 😜

@ स्वाती,

बगळ्याच्या अत्तरदाणीचे design मलाही फार आवडले आहे. त्याच्या पंखांखाली अत्तराचा फाया (plural काय? फाये ?) ठेवायची कुपी आणि पायातल्या साखळीत अत्तर भरण्यासाठी पिटुकला चमचा, फाया पिळण्यासाठी चिमटा- काटा असे सुरेख detailing आहे. ( All attachments are not visible in this particular picture) सुगंधाला चांदीचे घर 😍

>>>>>>>हेच वाक्य थोडा बदल करून ढेरपोट्या व्यक्तींबद्दल म्हणता येते, पण तो आपला आजचा विषय नाही.
Lol Lol
लेख म्हणजे दिवाळीची उत्तम मेजवानी झालेला आहे.
अतिशय सुगंधी, दिलखेचक लेख.
सुगंधाची आवड पर्सनल असते म्हणतात. तरीही आपण सुगंधित साबण मैत्रीणींना भेट देतोच की. गेल्या एका गटगत वानवळा म्हणुन, पुस्तके नेली होती, एकदा ईयररिंगज. मला मात्र मस्त साबण मिळाले होते. नंतर वाटले असे आपल्याला कसे सुचले नाही.

क्लिनिकचा 'अ‍ॅरोमॅटिक एलिक्झर' आणि एलिझाबेथ टेलरचा 'व्हायलेट आईज' माझे आवडते पर्फ्युम्स. पैकी व्हायलेट आईज फक्त टेक्सासमध्ये वापरलेला त्यामुळे टेक्सासची आठवण करुन देतो. बाकी हे दोनच आवडतात कारण दोनच वापरलेले आहेत. रेड डोअर ठीक वाटलेला.
इथे $२५-$२७ ला वर्सॅची, गुची वगैरे उंच अत्तरांचे मस्त लहान चिंचोळे स्प्रेज मिळतात. ते फार सोयीचे पडतात. लहानश्या पर्समध्ये मावतात. बसमध्ये, ट्रेनमध्ये, इतरांच्या नकळत, क्वचित किंचित शिडकाव करता येतो. पण अगदी क्वचित. अति नाही. अगदीच हलकेच दरवळ बस्स. एलिझाबेथ आर्डनची पावडर - मानेवर फिरवुन झोपायला गेले की काय मस्त वाटते. कारण डोकेदुखी व्हावी इतका स्ट्रॉन्ग वास नाही तिला. फार उंची पण हलका वास आहे. मला पावडर फार आवडतात. म्हणजे अत्तरां पेक्षा काकणभर जास्तच. 'बाथ अँड बॉडी' दुकानांची चेन आहे जित मेणबत्त्या, अत्तरांचे स्प्रेज, हॅन्ड सॅनिटायझर्स, विविध सुवासिक तेले, साबण या सार्‍यांची रेलचे अक्षरक्षः लयलूट असते आणि तेही उत्तम दर्जा - अ‍ॅफोर्डेबल प्राईस. कारण लहान लहान ३-४ गोष्टी $२० ला वगैरे डिल्स.
क्युबन सिगारचा, सध्याच्या सुगंधी ई-सिगरेटसचा वास खूप छान असतो कधी कधी. पण फार वाईट सवय. तिच्याबद्दल बोलायलाच नको.
----------------------------
लोक हो अमांची आठवण काढू नका Sad भयंकर वाईट वाटते आणि हॅन्ग ओव्हर रहातो.

.. लहान चिंचोळे स्प्रेज….

बरोबर, महागड्या perfumes चे १०-२०-३० ml चे decants फार practical वाटतात मला. महागाची हौस भागवून होते कमी पैश्यात. त्या MiniSet बाटल्या खरचं work of art म्हणाव्यात इतक्या सुंदर. Especially those of Doir and Burberry. पत्नीला आधी भेट देत असे. आता ते सर्व सोडून तिला माझेच (masculine smelling) परफ़्यूम्स जास्त आवडतात आणि तेच वापरते - कधी लपून कधी उघड 😀

काही बोललं तर त्या आलिया भटचे उदाहरण दिले जाते - तीसुद्धा पुरुषांचे परफ्यूम्स वापरते म्हणून !

छान लेख!

'अत्तराचा फाया ' Happy कित्येक वर्षांनीं परत ऐकला (ले) शब्द .

लेख सुरेख जमला आहे. टेक्निकल आणि ललित अशा दोन्ही आघाड्यांवर अगदी परिपूर्ण उतरला आहे. आता सध्या त्यावर पोच लिहून मनातले येतील ते विचार येऊ देऊन त्याचा आनंद घेण्यातच मजा आहे. आणखी प्रतिक्रिया सध्यातरी नकोच.

मनोहर आणि सुगंधी लेख Happy

गंधाशी स्मृती निगडित असतात याचा अनेकदा प्रत्यय येतो. आंघोळीचे पाणी (लाकूड/कोळसा असलेल्या) चुलीवर तापलेले असेल तर त्याचा वास लहानपणच्या बंबातल्या पाण्याच्या आंघोळीची आठवण करून देतो. तोच वास सज्जनगडावर केलेल्या आंघोळीची पण आठवण करून देतो. बदकाची अत्तरदाणी नुसती बघून आजूबाजूला लग्नकार्य किंवा कमीत कमी मंगळागौर, त्यातल्या बायकांनी केसात माळलेल्या गजरे आणि गुलाबांच्या वासाची आठवण होते.

मध्यपूर्वेत अत्तराच्या कंपनीत काम करणाऱ्या एका मित्राने एक अत्यंत महागडे अत्तर मला पाठवून दिले होते. साधारण पाच थेंब अत्तर असलेल्या त्या कुपीला ते अत्तर उडू नये म्हणून एका अर्ध्या फूट उंचीच्या बॉक्समध्ये ठेवावे लागते. त्या पाच थेंबांची किंमत हजारांमध्ये असल्याने (अर्थात माझे ममवपण सार्थ करीत) आणि शिवाय वासच फार उग्र असल्याने ते उघडून वापरून टाकायची हिंमत होत नाही. त्या बंद बॉक्समधून बाहेर येणाऱ्या सुवासाचा दरवळ कपाटातल्या ज्या कपड्यांना लागला आहे, तो वास रयवारातून हार्डवेअर दुकानांमध्ये मारलेल्या चकरांची आठवण करून देतो.

छान वाटले लेख वाचून. जुन्या बर्याच आठवणी मनात दरवळून गेल्या.
मायबोलीवर पूर्वी म्रृद्गंधाचे अत्तर संबंधित एक कथा वाचली होती. नायिका तिच्या घराण्यातील खासियत असलेले मृद्गंधाचे अत्तर बनवून पुन्हा त्या वारशाशी नाळ जोडते. (शब्द रचना चुकली असल्यास क्षमस्व.)
तेव्हा ती कथा आवडली होती. कनौज ची परंपरा, वातावरण इ. चांगले रंगवले होते असे आठवते आहे.

सुंदर लेख! एक पर्फ्युम मला वाटतं टाटांनी आणला होता ९० च्या दशकात. तो मी प्रचंड मिस करते. त्याचा बॉक्सही आत्ता डोळ्यासमोर आहे पण नाव आठवत नाही. सुंदर चिंचोळी उभट बॉटल होती. बहुतेक लता मंगेशकरांशी संबंधित प्रॉड्क्ट होते असं पुसट आठवतंय..

^^^^एक पर्फ्युम मला वाटतं टाटांनी आणला होता ९० च्या दशकात. तो मी प्रचंड मिस करते. त्याचा बॉक्सही आत्ता डोळ्यासमोर आहे पण नाव आठवत नाही^^^
वर्षा, Eu D'colon का?
माझ्या बालपणीची आवडती आठवण .... सुगंधाची माझी व्याख्या ....

खूप छान लेख... दिवाळीत आला लेख आणि दिवाळीत तर सुगंधाची मेजवानीच असते. फराळ ,फटाके , उटण, मोती साबण नवीन कपडे , अत्तर किती म्हणून सांगू
ऋ ने शाहरुख स्मेल्स गुड लिहिलं आहे त्या वरून द्रौपदी ची आठवण आली. तिच्या ही अंगाला म्हणे कमळाचा वास येत असे. असो.
वास म्हटलं की महालक्ष्मीच नल्लीज आणि फोर्ट मधल्या पी एम रोड वरच बॉम्बे स्टोअर्स ही दुकानं आठवतात मला. दुकानात शिरल्या शिरल्याच एक मस्त वास यायचा जो अजून ही मनात आहे. नल्लीज लांब पडायचं पण त्या वासासाठी पी एम रोड वरच्या बॉम्बे स्टोअर्स मध्ये लंच टाईम मध्ये अनेक वेळा चक्कर मारून येत असे.

अहाहा. लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद, अनिंद्य:)
काय सुगंधी लेख. अतिशय सुंदर.
दोनदा वाचला. अतिशय अभ्यासपूर्ण.
निवडक दहात नोंदवला.
या दिवाळीची खरी सुगंधी सुरुवात.
गंध, सुगंधाशी अनेक आठवणी आहेत.
लिहितो सविस्तर.

>>> सुगंधाला चांदीचे घर
Happy

साजिर्‍याचा एक लेख होता ना 'गंध' याच नावाने? मला इथे लिंक द्यायची होती पण सापडत नाहीये समहाऊ!

वा! अप्रतिम लेख!
Oudh माझा सध्याचा आवडता fragrance.
मलाही खूप आवड आहे सुगंधांची.
.
एक reel viral झाली होती, तुम्ही smell good असाल तर शुक्र (पत्रिकेतला ग्रह)चांगला राहतो म्हणे

छान लेख.
Oud perfume चे चांगले ब्रँड्स कोणते? सुवास Long lasting असणारे

छान लेख.
Oud perfume चे चांगले ब्रँड्स कोणते? सुवास Long lasting असणारे

छान सुगंधी लेख!
वाचताना अमांची आठवण आली! आणि माझ्या बाबांची पण. त्यांच्यामुळे या perfumes ची आवड निर्माण झाली.
बरीच वर्षे ह्या वेडाचा पाठपुरावा केला आहे. आता थोडा कमी झालाय हा छंद.
यात रस असणाऱ्यांसाठी Fragrantica ही website म्हणजे मोठा खजिना आहे! जगातल्या सर्व perfumes ची कुंडली इथे उपलब्ध आहे. यावर अनेक बेस्ट noses लिहीतात! एवढंच काय तुमचे perfume horoscope देखील वाचायला मिळेल!

छान लेख
मलाही आवड आहे फार
पण त्यातले तांत्रिक ज्ञान अजिबात नाही
Notes कळत नाहीत पण काय आवडते ते घेतो
ब्रँड्स देखील कळत नाहीत
थोडक्यात राग लक्षात येत नाही मात्र हे गाणं आवडलं हे कळतं तसे काहीतरी.

Bellavita चा mini pack आहे माझ्याकडे सध्या ,
चांगला आहे. दुसरी bottle संपत आलीये. Happy
Solid perfume किंवा oil based अत्तर Long lasting असतात स्प्रे पेक्षा

Pages