नौसैनिकांची चलाखी

Submitted by सुबोध खरे on 17 October, 2025 - 03:33

नौदलात काम करत असताना अनेक हुशार आणि चलाख नौसैनिकांबरोबर काम करण्याचा प्रसंग आला. सैन्याची कोणतीही शाखा म्हटली की शौर्य, शिस्त, उत्तम निर्णयक्षमता इत्यादी गुणांचे अधिकारी व सैनिक सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यासमोर येतात. सैन्यातील कडक शिस्त तर सुपरिचित आहे,

पण सैन्यदलातही शेवटी तुमच्या-आमच्यातीलच व्यक्ती काम करतात ना? तर, अशा व्यक्तींकडून कधी कधी मजेशीर, चलाख किस्सेही घडतात. त्यातील काही निवडक किस्से -

१.
मी विक्रांतवर असताना एकदा किनाऱ्यावरील कार्यालयातून फोन आला. आमच्या शिक्षण विभागाच्या एका नौसैनिकाने तो उचलला. तिकडून आवाज आला, "रंधावा स्पीकिंग."
याने विचारले. "अबे, तू लिडिंग है या पेटी ऑफिसर (म्हणजे नाईक की हवालदार)?"
त्यावर तिकडून आवाज आला, "आय एम कमांडर रंधावा स्पीकिंग."
हा प्रसंगावधान राखून म्हणाला, "देन से सो (असं नीट सांग)" आणि त्याने फोन ठेवून दिला. पण त्यानंतर त्याला घाम फुटला. त्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला (लेफ्टनंट कमांडर बांगा यांना) हा प्रसंग सांगितला.
बांगा सर त्याला म्हणाले, "तू त्यांना आपले नाव सांगितले आहेस का?"
तो म्हणाला, "नाही."
त्यावर बांगा सर म्हणाले, "मग तू फोन उचललाच नाहीस. जा घरी."

२.
मी तटरक्षक दलातील वज्र या जहाजावर होतो. तेथे घडलेली ही कहाणी -
जहाजावर चढण्यासाठी एक जिना असतो, तेथे लोकांचे ओळखपत्र तपासायला आणि तपासणी करायला आणि सलाम करण्यासाठी तैनात असलेल्या नौसैनिकाला 'क्वार्टर मास्टर' म्हणतात.तेथे भंवर सिंग नावाचा एक नौसैनिक तैनात होता. त्याने एक मुलगी पटवली होती. तिला घेऊन तो जहाज दाखवायला आला होता. जहाजावर चढण्यासाठी जिना असतो, त्याच्या बाजूला मी उभा होतो. त्याने मला पाहिलेले नव्हते. तो आपल्या मैत्रिणीवर इम्प्रेशन मारण्यासाठी सांगत होता, "मला या नंबरवर कधीही फोन कर आणि क्वार्टर मास्टर बी सिंग ला बोलवा असे सांग. ते मला बोलावतील. सध्या मी क्वार्टर मास्टर आहे. पुढच्या वर्षी मी हाफ मास्टर होईन आणि आणखी दोन वर्षांनी मी फुल मास्टर होईन." हे ऎकून मी अवाकच झालो. जहाजाच्या आत येऊन मी ते इतर अधिकाऱ्यांना सांगितले आणि तेथे हास्यकल्लोळ झाला.

३.
विक्रांतवर असताना एक पद्धत होती - १२०० सैनिक असत, त्यामुळे तेथे तुमचा कोणीही पाहुणा जहाज पाहायला आला, तर त्या दिवशी असलेला गणवेश घालून त्यांना जहाज दाखवायला लागते.

इंजीन रूममध्ये असलेल्या एका नौसैनिकाने आपल्या मैत्रिणीला विक्रांत दाखवायला आणले होते. तेथे त्याने इंजीन रूमसाठी असलेला गणवेश घातलेला होता. **** नौसैनिकांना एकतर निळा किंवा खाकी गणवेश (डांगरी किंवा बॉयलर सूट म्हणतात तो) असे आणि अधिकार्‍यांना पांढरा बॉयलर सूट. (त्यामुळे अधिकारी कोण आणि सैनिक कोण, हे लगेच समजत असे.) यात गणवेशावर डावीकडे आपले नाव आणि हुद्दा (rank) लिहिलेला असे आणि उजवीकडे रक्तगट.

त्याची मैत्रीण एकंदर विक्रांतचा आकार आणि तेथील विमाने वगैरे पाहून भलतीच इम्प्रेस झालेली होती. तिला आता हा इंजीन रूम दाखवायला घेऊन गेला. इंजीन रूममध्ये माझा मित्र लेफ्टनंट पियुष शर्मा तैनात होता.

हा सैनिक हुद्द्याप्रमाणे ME १ - म्हणजे मेकॅनिक- इंजीन रूम प्रथम वर्ग ( लान्स नाइक हुद्द्याच्या समकक्ष ) होता. त्याने खाकी बॉयलर सूटचा गणवेश घातला होता. त्याच्या मैत्रिणीने हे छातीवर लिहिलेले ME १ वाचून विचारले की "हे ME १ म्हणजे काय?"

त्याने टेचात सांगितले की "मेकॅनिकल इंजीनियर फर्स्ट क्लास." त्यानंतर ME -२ ( सिपाही) खाकी बॉयलर सूटच्या गणवेशामध्ये असलेला एक आणखी कनिष्ठ नौसैनिक आला. तिने विचारले, "हा कोण आहे?" याने सांगितले, "हा आणखी कनिष्ठ (YOUNGSTER) आहे. मेकॅनिकल इंजीनियर सेकंड क्लास."

इंजीन रूम पाहत असताना एक तिसरा नौसैनिक आला. LME (LEADING MECHANIC -ENGINEROOM) (नाइक च्या समकक्ष) . याने मैत्रिणीला सांगितले, "हे आमचे वरिष्ठ आहेत, लिडिंग मेकॅनिकल इंजीनियर."

तिथे फिरत फिरत ही मुलगी पियुष शर्माच्या कन्सोलजवळ आली आणि तिने याला पांढऱ्या बॉयलर सूटमध्ये पाहिले.

पुढे जाता जात तिने याला विचारले, "हे पांढऱ्या सूटमध्ये का आहेत?"
त्यावर हे महाशय हजरजबाबीपणे उद्गारले, "आज तो आजारी आहे, म्हणून पांढऱ्या बॉयलर सूटमध्ये आहे."

पियुष शर्मा अवाक झाला. वर वार्डरूममध्ये येऊन मला सांगत होता, "डॉक्टर, बघ आपले नौसैनिक कसे आहेत. मैत्रिणीवर इम्प्रेशन पाडायला मला आजारी पाडले त्याने."

मी हसत पियुषला म्हणालो, "प्रेमात आणि युद्धात सगळे क्षम्य असते."

४)

विक्रांत या अवाढव्य विमानवाहू जहाजावर मी एकटाच वैद्यकीय अधिकारी होतो. जवळजवळ १००० नौसैनिकांच्या एकंदर आरोग्याची जबाबदारी माझ्यावर होती.

हे सर्व सैनिक जेव्हा जेव्हा सुटीवर जात, तेव्हा त्यांना कोणता संसर्गजन्य लैंगिक आजार नाही/ तो पूर्ण बरा झाला आहे याची खातरी करूनच पाठवले जाते. त्यामुळे यांच्या सुटीच्या अर्जावर वैद्यकीय अधिकाऱ्याची सही आवश्यक असते.

१९९०-९१ या काळात भ्रमणध्वनीच काय, साधे दूरध्वनीसुद्धा दुर्मीळ होते. त्यामुळे सैनिकांच्या ख्यालीखुशालीसाठी पत्र हा एक मोठा दुवा होता आणि त्वरेने संपर्कासाठी तार करणे हा उपाय होता. घरी कोणी आजारी, अत्यवस्थ असले, तर तेव्हा तार पाठवत. अशी तार आली की सैनिक तातडीने सुटीवर जात/पाठवले जात असत.

राजस्थानातील झुंझुनू गावचा असाच एक सैनिक बिजेंदर सिंह माझ्याकडे तातडीने सुटीसाठी सही करण्यासाठी अर्ज घेऊन आला होता. त्याला मी तातडीचे कारण विचारले, तर त्याने "MOTHER SERIOUS" अशी तार दाखवली. मी काही न बोलता अर्जावर सही केली आणि तो सुटी वर गेला.
साधारण एक महिन्याने मी फ्लाइट डेक वर फिरत असताना बिजेंदर सिंह दिसला. मी त्याच्याकडे पहिले तर मला आठवले की हा तर MOTHER SERIOUS म्हणून तातडीने सुटीवर गेला होता.

मी त्याला विचारले, "तुझी आई कशी आहे?"

त्यावर तो म्हणाला, "ती ठणठणीत आहे. तिला काय झालंय?"

मग मी विचारले, "तू सुटीवर कशाला गेला होतास?"

त्यावर तो म्हणाला, "सर, लग्न करायला गेलो होतो."

मी त्याला म्हणालो, "तू तर MOTHER SERIOUS अशी तार घेऊन आला होतास ना?"

त्यावर तो ओशाळवाणे हसून म्हणाला, "सर, वो तो MOTHER SERIOUS ABOUT MARRIAGE होतं."
मी हसलो आणि परत फिरलो.

आहे त्या परिस्थितीत आपला कार्यभाग साधण्यासाठी नौसैनिक चलाखी करतात, हे मी अनेक वेळेस पाहिलेले होते. बहुतेक वेळेस तुम्ही त्यांच्या चलाखीचे कौतुक केले, तर तेसुद्धा तुमच्या खिलाडू वृत्तीचा आदर ठेवतात, असे मी पाहिले आहे.

शेवटी तीसुद्धा आपल्यासारखीच बऱ्या-वाईट भावना असणारी माणसे असतात. केवळ काळे किंवा पांढरे असे असून चालत नाही. प्रेमात पडलेले सैनिक आपल्या मैत्रिणींना अचाट आणि अफाट थापा मारताना दिसत असत, परंतु एक तर खाजगी आयुष्यात किती पडायचे हा एक मुद्दा आहे आणि शेवटी प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य आहे. आणि इथे तर रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असताना त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रेमाच्या हिरवळीवर का उगाच आग पाखडा?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हल्ली काही बोटीवरचे विडिओ बघतो. त्यात एक आहे
दत्ता जाधव .
https://youtube.com/@dattajadhavvlogs365?si=LLCGTsGlb9d-woDg

मर्चंट नेव्ही कैसे जॉइन करे, याचबरोबर don't join merchant Navy असेही काही आहेत.

mother serious about marriage हे मस्तच आहे. Happy

गम्मतीदार अनुभव. अजुन लिहिलेत तर वाचायला आवडतील.

हे सर्व सैनिक जेव्हा जेव्हा सुटीवर जात, तेव्हा त्यांना कोणता संसर्गजन्य लैंगिक आजार नाही/ तो पूर्ण बरा झाला आहे याची खातरी करूनच पाठवले जाते. <<
"A sailor has a wife in every port" हे खरंच म्हणायचं तर..

"अजुन लिहिलेत तर वाचायला आवडतील." + १

छान आहेत तुमचे अनुभव. आधीचे लेख सुद्धा इथे आणि मिपा वर वाचले आहेत. शक्य असल्यास, नक्की शेअर करा अजून.

मस्त Happy

छान किस्से!

जवळजवळ १००० नौसैनिकांच्या एकंदर आरोग्याची जबाबदारी माझ्यावर होती.>>>> भारी!

>> प्रेमात आणि युद्धात सगळे क्षम्य असते. <<

हा डायलॉग कधी एकदा मारू असे झाले असेल नव्हं तुम्हाला तुमच्या करियर मधे?

खुसखुशीत किस्से आहेत. क्वार्टर मास्टर विशेष आवडला.

विक्रांत (किंवा इतर नौदलाची जहाजे) वर रविवारी किंवा सुटीच्या दिवशी आपले मित्र किंवा नातेवाईक याना घेऊन यायची परवानगी होती. त्या साठी लायन गेट वर त्या अधिकारी किंवा नौसैनिकाला पूर्ण गणवेशात जाऊन आपल्या मित्र/ नातेवाईकांची नोंद करून विक्रांत दाखवण्यासाठी आणता येत असे.

पाणबुडी दाखवण्यासाठी भागीदार परवानगी काढावी लागे. आणि त्यावेळेस अणुपाणबुडीसाठी (चक्र) तर तुम्ही स्वतः नौदल अधिकारी असलात तरी नौदल मुख्यालयातून खास परवानगी घ्यावी लागत असे. यामुळे अणुपाणबुडी आतून पाहण्याची इच्छा राहून गेली. नंतर माझे काही मित्र त्यावर प्रत्यक्ष तैनात होते पण ते राहूनच गेले.

हि १९९०-९१ ची गोष्ट आहे. सध्या काय स्थिती आहे माहिती नाही.

तेव्हा त्यांना कोणता संसर्गजन्य लैंगिक आजार नाही/ तो पूर्ण बरा झाला आहे याची खातरी करूनच पाठवले जाते.
हो त्यावेळेस सिफिलिस किंवा गनोरिया सारखे लैंगिक आजार असतील तर त्याचे FTC (फायनल टेस्ट फॉर क्युअर) झाल्याशिवाय नैसैनिकाला सुटीवर पाठवले जात नसे. जेणेकरून हे रोग सैनिकांच्या बायकांना होऊ नयेत म्हणून.

नंतर एडस पण आला होता परंतु तेंव्हा त्याबद्दल पूर्ण माहिती नव्हती त्यामुळे सुरुवातीला सहा महिने घरी पाठवत नसत. आणि त्यानंतर त्या सैनिकाला संपूर्णपणे समुपदेशन करूनच पाठवले जात असे.

सद्य स्थिती माहिती नाही