पाचोळा

Submitted by विमुक्त on 15 October, 2025 - 05:04

गारवा हवेत येता
रंगाचा पारा चढतो
निष्पर्ण होण्याआधी
वर्ण तरूचा खुलतो...

पाना पानांवर लावून
उबदार रंगाचे अस्तर
देण्या थंडीला उत्तर
प्रत्येक तरूवर तत्पर...

सुंदर नटल्या पानाला
अल्लड समीर छेडतो
वाहून सोबत पानाला
अलवार धरेवर सोडतो...

हळूहळू धरा मग सजते
लेवून सुवर्ण पर्णराशी
देवून दान, हसे झाड
जरी असे ते उपाशी

स्थितप्रज्ञ तो तरू
दिसे तेजस संन्याशी
प्रतीक्षेत वसंताच्या
सोबत पाचोळा पायाशी...

विमुक्त
१५/१०/२०२५

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults