फोर टु का वन

Submitted by अविनाश जोशी on 3 October, 2025 - 07:49

फोर टु का वन
पिंकर्टन एजेन्सी हे अमेरिकन इतिहासातली एक अजब रसायन आहे. 1850 साली ही प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी शिकागो मध्ये सुरु झाली. 1860 मध्ये झालेल्या सिव्हिल वॉर मध्ये त्यांनी अब्राहम लिंकन करिताही काम केले. वेगवेगळी संस्थाने एकत्र येऊन त्यांनी संयुंक्त राष्ट्र स्थापन केल्यावरही एजन्सी काम करतच राहिली. सरकार नव्यानेच येत असल्यामुळे बऱ्याच गोष्टी अनियंत्रित व अव्यवस्थित होत्या. त्यामुळे नंतरच्या काळात त्यांनी बरीच कामे केली. पिंकर्टन एजन्सी ही मुख्यत्वे मौल्यवान चोऱ्या , दरोडे, खोटी कागदपत्रे , रेलरोड संबंधी गुन्हे व त्या त्या गव्हर्नमेंटनी लादलेल्या प्रचलित कायद्यांचे उल्लंघन अश्या गोष्टींवर काम करत असे. विसाव्या शतकाच्या सुरवातीस 1908 मध्ये FBI स्थापन झाल्यावर एजन्सीचे काम कमी झाले. काहींचे असे म्हणणे आहे कि पिंकर्टन एजन्सी मधूनच FBI उदयास आली. अमेरिकेत प्रत्येक स्टेट चे कायदे आहेतच पण एखादा गुन्हा इंटरस्टेट असला तर FBI मध्ये येते.
पिंकर्टन एजन्सीचे बरेच मनोरंजक किस्से ऐकावयास मिळतात. त्यावेळी बहुतेक राज्यातून परवान्याशिवाय तंबाखू अथवा तत्सम पदार्थ विकणे हा मोठा गुन्हा होता. त्यात सर्व माल जप्त तर होईच परंतु विक्रेत्याला जबर दंड आणि तुरुंगाची वारी करावी लागत होती. हा परवाना व्यक्तिगत असे आणि त्यामुळे फिरत्या विक्रेत्यानंही तो असणे आवश्यक होते. हा परवाना बहुतेक एकाच राज्याकरिता असे आणि अर्थातच त्याचे कसोशीने पालन व्हावे असे सरकारला वाटत असे. जर एखाद्या माणसाने असा गुन्हा इलिनॉय स्टेट मध्ये केला आणि तो टेक्सास मध्ये पळून गेला तर माहित असूनही त्याला पकडणे शक्य नव्हते. इलिनॉयचे पोलीस त्याला टेक्सास मध्ये जाऊन अटक करू शकत नव्हते आणि टेक्सास मध्ये गुन्हा न घडल्याने टेक्सासचे पोलिसही त्याला हात लावू शकत नव्हते. अशा वेळेला पिंकर्टनचे लोक त्यांना मदत करू शकत असत.
एक अति चतुर तंबाखू होलसेल विक्रता होता आपण त्याला रिबेरो म्हणू. रिबेरो हा आपल्या व्हॅनसकट गावो गावी जाऊन होलसेल मध्ये तंबाखू विक्री करत. त्यामुळे त्याच्या व्हॅन मध्ये वीस - पंचवीस हजार डॉलरचा स्टॉक असायचा. हा गृहस्थ इलिनॉय मध्य तंबाखू विकायचा आणि थोडीशी कुण कुण लागताच टेक्सासला पळून जायचा. पिंकर्टन मधला एक डिटेक्टिव्ह त्याला आपण जॉनी म्हणू या . याने रिबेरोला रेड हॅन्डडेड पकडायचे ठरवले. त्याकरिता त्याच्या समोर रिबेरोने विक्री करणे आवश्यक होते. काही दिवसात रिबेरो शिकागो मध्ये आला आणि एका आठवड्यातच तो गावो-गाव फिरु लागला. जॉनी त्याच्या मागावर होताच. एका छोट्याश्या गावात रिबेरोनी एक रूम घेतली आणि आपले बस्तान तिथेच बांधले. दुसऱ्या दिवशी जॉनी त्याच गावात त्याच इन मध्ये उतरला. गावात फिरून त्याने रिबोरोच्या हालचालींचा अंदाज घेतला आणि रात्री त्याने मैत्री करून रिबेरोबरोबर जेवणही केले. जेवणानंतर जॉनी ने स्मोकिंग ची तल्लफ आल्याचे म्हंटले यावर रिबेरो म्हणाला मी कधीच स्मोकिंग करत नाही पण तुम्ही बाहेर पडला तर तुम्हाला एखादे दुकान मिळेल. दहा मिनिटाने जॉनी परत आला. त्याला एकही सिगरेट किंवा चिरूट मिळाले नव्हते. तो रिबेरोला म्हणाला बाय लक दुकान बंद झाली होती. पण एका दुकानदाराने दार लावता लावता सांगितले कि तुमच्याच हॉटेलमध्ये रिबेरो राहतो त्याच्याकडे भरपूर स्टॉक असतो.
रिबेरो म्हणाला ' होय ते खरे आहे' . यावर जॉनी म्हणाला मग मघाशी तुम्ही नाही का म्हणालात'. रिबेरो म्हणाला मी स्मोकिंग करत नाही असे म्हणालो. त्यातून मी किरकोळीचा धंदा करत नसल्यामुळे माझ्याकडे सुट्या सिगारेट्स नसतात. तुम्हाला हवी असल्यास आणि माझ्याकडे शिल्लक असल्यास तुम्हाला सिगारची बॉक्सचा घावी लागेल. जॉनीने त्याला होकार भरला. रिबेरो बाहेर गेला. व्हॅन मध्ये बघून तो परत आत आला आणि म्हणाला 'माझ्याकडील सर्व माल ऑर्डरप्रमाणेच आहे क्युबन शंभर सिगारचा फक्त एक बॉक्स माझ्याकडे आहे तो मी तुम्हाला देऊ शकतो पण त्याची किंमत तीनशे डॉलर आहे. हे ऐकून जॉनी हबकलाच. पण नंतर त्याने विचार केला की तीनशे डॉलर आपल्याला ऑफिस परत देईलच आणि आपण पैसे दिले तरच त्याला अटक करत येईल. बऱ्याच विचारा नंतर जॉनीने विचारपूर्वक होकार दिला. रिबेरो एक सिगरेट बॉक्स घेऊन आला व त्याने ती जॉनीला दिली. जॉनी ने त्याला तीनशे डॉलर दिले. जॉनीने मागितल्यावर रिबेरो ने तीनशे डॉलरचे सिगार बॉक्सचे बीलही दिले. एवढे झाल्यावर जॉनीला फारच आनंद झाला. त्याने आपले ओळखपत्र काढून रिबेरोला दाखवले तो रिबेरोला म्हणाला मिस्टर रिबेरो तुम्ही हा तंबाखूचा धंदा कुठल्याही परवानगीशिवाय करत आहात. या पूर्वी तुम्ही अनेक वेळेला असे केले आहे आणि आज तर प्रत्यक्ष विकतानाच तुम्ही आम्हाला सापडले आहेत .
रिबेरो म्हणाला ' तुमचे अगदी सत्य आहे. मी तुम्हाला आत्ता तीनशे डॉलरचे सिगार विकले आहे आणि अशा विक्रीकरीता या राज्यात परमिट लागते हे ही मला माहित आहे' असे म्हणून रिबेरोने खिश्यातुन शिकागोत काढलेले परमिट दाखवले ते एक आठवड्यापूर्वीच त्याला दिले गेले होते आणि संपूर्णतः कायदेशीर होते. कुठल्याही परिस्थितीत जॉनी रिबोरेला अटक करू शकत नव्हता.
जॉनी पुढे वेगळाच प्रश उभा राहिला. एवढी महागडी सिगार् का घेतल्या असा प्रश्न त्याला निश्चितच विचारला जाणार होता . व्यवहारापूर्वी रिबेरोकडे परमिट का पहिले नाही असेही विचारले गेले असते. थोडक्यात ऑफिस ने खर्च द्यायचे नाकारल्यास त्याला तीनशे डॉलरचा फटका बसणार होता. त्याकाळी ती रक्कम फार मोठी होती.
जॉनी ने रिबेरोला बॉक्स परत घेण्याच्या बऱ्याच विनंत्या केल्या पण त्याने विक्रीचे नियम जॉनीला दाखवले . त्यातल्या एका नियमात कुठल्याही परिस्थितीत विकलेला माल परत घेतला जाणार नाही असेही होते. जॉनी फारच रडवेला झाला ते पाहून रिबेरो त्याला म्हणाला 'तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर तुम्ही ती सिगार बॉक्स मला दोनशे डॉलरला विकू शकता, नाहीतर पुढचे शम्भर दिवस रोज एक सिगार एन्जॉय करू शकता. जॉनीपुढे काही इलाज उरला नाही. यावर रिबेरो पुढे म्हणाला तुम्ही शम्भर डॉलर घालवल्यामुळे तुमच्याकडे पैसे नसतील हे मला मान्य आहे . त्याकरिता मी एक उपाय सुचवितो. उद्या सकाळी मी येथून निघून पुढच्या काऊंटीला जाणार आहे त्या काऊंटीत एक दिवस मुक्काम करून मी तीन दिवसात शिकागोला पोहचेन. मी तुम्हाला माझ्याबरोबर नेऊ शकतो, तेवढाच तुमचा प्रवास खर्च कमी होईल. जॉनीने त्याला मान्यता दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी जॉनीने पाहिले की एक टेलिग्राम रिबेरो लॉजच्या मालकाकडे देत होता. दोघेही व्हॅन मधून निघाले पुढच्या काऊंटीत जाऊन पोहचले. तिथे एका लॉज मध्ये दोघे राहिले. जोंनीने आपल्या ऑफिसला एक टेलिग्राम पाठवला.
दुसऱ्या दिवशी दोघेही ब्रेकफास्ट करत असताना काऊंटीचा शेरीफ तिथे आला. त्याने त्या दोघांना विचारले जॉनी कोण आहे जॉनीने आपली ओळख पटवताच शेरीफ त्याला हातखड्या अडकवत म्हणाला मिस्टर जॉनी 'यु आर अंडर अरेस्ट' तुम्ही मिस्टर रिबेरोला परमिटशिवाय दोनशे डॉलरची सिगारेट विकल्याचा तुमच्यावर आरोप आहे. काल सकाळीच त्यांनी तारे द्वारा आम्हाला हा गुन्हा नोंदवायला सांगितले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>यावर रिबेरो पुढे म्हणाला तुम्ही शम्भर डॉलर घालवल्यामुळे तुमच्याकडे पैसे नसतील हे मला मान्य आहे .

>>>>>>हे ऐकून जॉनी हबकलाच. पण नंतर त्याने विचार केला की तीनशे डॉलर आपल्याला ऑफिस परत देईलच आणि आपण पैसे दिले तरच त्याला अटक करत येईल. बऱ्याच विचारा नंतर जॉनीने विचारपूर्वक होकार दिला.

१०० ला त्याने विकत घेतली ना?
३०० चुकून लिहीलेले आहे.
------------
कथा चोरावर मोर आहे. तेच शीर्षक द्या.

Lol धमाल

सामो,
३०० ला विकत घेऊन २०० ला रिटर्न केली म्हणून १०० चे नुकसान असे आहे ते.

छान कथा! चोर तो चोर, वर शिरजोर

छान !
( सहज सुचलं - विकत घेतलेला माल त्याच विक्रेत्याला लगेच परत करणं, ही विक्री होते ? जॉनीकडे जर विकत घेतल्याची पावती आहे, तर तो त्याच विक्रेत्याला विक्री केल्याचा आरोप सहज नाकारू शकतो. शिवाय, जॉनीने विक्रीची पावती दिली असण्याची शक्यता नाही, कारण तो विक्रेता नाहीच आहे. त्यामुळे, विक्रीचा व्यवहारही सिद्ध होणार नाही . )

उत्तम खंडन भाऊ.
+७८६

फक्त आपल्याकडे हे कोर्टात सिद्ध व्हायला काही वर्षे लागू शकतात Wink

*फक्त आपल्याकडे हे कोर्टात सिद्ध ....* -- पण आपल्याकडे कुणी फोनवर कोणाबद्दल कांहीं सांगितलं म्हणून शेरीफ येवून बेड्याही नाही घालू शकत. Wink