आपली गोष्ट - Best mom in the world

Submitted by sugandhi on 3 October, 2025 - 00:14
आपली गोष्ट

प्रस्तावना - https://www.maayboli.com/node/86676

तन्मय आणि आभा माझे दीर आणि जाऊ आमच्या घरापासून तासाभरावर राहतात. त्यांची मुलं - वाणी आणि प्रणव, अस्मि आणि अद्वय पेक्षा ४-५ वर्षांनी लहान आहेत. त्यामुळे सहज कधी कधी एकत्र फिरायला जायचा प्लॅन होतो. या वेळी खूप दिवसांनी चार दिवसांचा विकेंड आला होता आणि कधी नव्हे तो चारी मुलांचा काहीही दुसरा प्रोग्राम ठरलेला नव्हता, त्यामुळे आमचा सगळ्यांचा माउंट शास्ताला जायचा बेत ठरला.

माउंट शास्ता म्हणजे इकडचं कैलास आहे. उंच, सदा सर्वदा बर्फाने झाकलेलं शिखर, पायथ्याशी सरोवरात त्याचं पडलेलं सुंदर प्रतिबिंब, हवेतला गारवा इतकंच नव्हे, तर डोंगरावर असलेल्या 'sky people' विषयी असलेल्या लोकल आख्यायिका सुद्धा कैलास सारख्या आहेत.
आजू बाजूच्या Hill station पेक्षा इकडे कमी गर्दी असते. निवांत चालायला पायवाटा, खूप सारे धबधबे, बोटिंग करायला आणि पाण्यात हुंदडायला मोठ्या नद्या‌‌ आणि तळी असल्या मुळे सगळ्यांच्या आवडीच काही ना काही सापडतच करायला!

आता चारी मुलं मोठी झाली आहेत. पंधरा वर्षाची अस्मि ते पाच वर्षाचा प्रणव अशा wide range मध्ये असली, तरी छान जमतं त्यांचं! गाडी चालवता चालवता, मागे त्या चौघांच्या गप्पा टप्पा आणि खेळ ऐकण्यात वेळ छान जात होता. फुलांच्या रंगापासून ते शाळा, शिक्षक, त्यांच्या नकला ते periodic table पर्यंत काहीही विषय रंगत होते.
जाता जाता सगळ्या मोठ्या मुलांनी मिळून दुसऱ्या दिवशी सकाळी एक धबधबा पाहायला जायचा प्लॅन केला. ती वाट थोडी चढणीची होती. पूर्ण अंतर जाऊन यायला ७-८ किलोमीटर चालायला लागणार होतं. मोठ्या तिन्ही मुलांसाठी इतकं चाललं म्हणजे गंमत होती, पण प्रणव साठी ते जरा कठीणच पडणार होतं. पण कसला पठ्ठ्या जिद्दी, जाणारच म्हणाला मी पण!

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळे मक्लाऊड धबधब्याच्या पार्किंग लॉट मध्ये भेटलो. दोन छोट्या टेकड्या ओलांडून धबधबा पाहायला जायचं होतं. प्रणव अजूनही "मला जायचं आहे" वर ठाम होता. शेवटी आभा म्हणाली, मी आणि तन्मय परत फिरू त्याला घेऊन तो फार दमायला लागला तर!
मग पाण्याची बाटली आणि थोडासा खाऊ घेऊन आम्ही सगळे चालायला लागलो. खळखळणाऱ्या नदीच्या शेजारूनच छोटीशी वाट होती. रस्ता अरुंद आणि चढणीचा असला तरी खूप खाच खळगे असलेला नव्हता. पाण्याचे तुषार अंगावर येत होते. हलकं ऊन पडलं होतं पण हवेत गारवा होता. वर पोचे पर्यंत उन्हं चांगली वर आली होती. विशिष्ठ कोनातून पडणाऱ्या उन्हाच्या तिरिपीमुळे धबधब्यासमोर इतकं सुरेख इंद्रधनुष्य दिसलं!! डोळे भरून बघून घेतला तो धबधबा. त्याचा तो खळखणारा आवाज कान तृप्त करत होता. हवेचा ओला स्पर्श आणि ओल्या गवताचा वास सुखावत होता. आता फक्त जीभ मी मी म्हणायला लागली होती. सगळेच आता जरा दमायला लागलो होतो. सुदैवाने आता परतीला सगळा मस्त उतार होता. खाली पोचल्यावर सँडविच खाऊन visiter सेंटर मध्ये ice cream खायला किती मज्जा येईल यावर चर्चा करतच आम्ही खाली आलो.

सँडविच खात खात आम्ही visiter center च्या पार्किंगकडे आलो. प्रमोद आणि तन्मय पुढच्या पार्किंग लॉट कडे गेले. आम्हाला कुणालाच मोबाईल नेटवर्क नव्हतं, त्यामुळे १५ मिनिटात visiter center च्या पार्किंग लॉट मध्ये भेटायचं ठरवून आम्ही ice cream घ्यायला निघालो. दुकानाच्या दारात पोचलो, तर ice cream साठी ही भली मोठी रांग होती! दुकानदार म्हणे ३०-४० मिनिटं तरी लागतील!! मग काय! आभा ने announce करून टाकलं - "फारच गर्दी आहे, आता ice cream cancel!"
आता सगळेच दमले होते, त्यात प्रणवचा जीव तो केव्हढा, ice cream च्या मिषाने आलेलं बाळ ते, त्याला मग रागच आवरेना!! तो एकदम म्हणाला, "वाईट्ट आहेस तू! आपलं promise ठेवत नाहीस!!" इकडे आभा पण दमलेली!! शेवटी "जाऊ दे ग, थांबतील प्रमोद आणि तन्मय पाच मिनिटं.." वगैरे सांगून, घेतलं खरं ice cream, पण या सगळ्या गरमा गरम मामल्यामध्ये बाबूसाठी त्यातली मज्जा कधीच वितळून गेली होती..

संध्याकाळी परत बाहेर पडलो. हवेत चांगलाच गारवा होता. जरा तळ्याभोवती चक्कर मारून आम्ही एका भारतीय restaurant मध्ये जेवायला गेलो. आतमध्ये एका मोठ्या टेबल भोवती आम्हाला जागा मिळाली. आतमधल्या शेकोटीपाशी उबेत गप्पा टप्पा रंगल्या. एक एक खाऊ यायला लागला. दही टेबलवर आणल्या बरोबर आभाने दोन चमचे दही प्रणवच्या ताटलीत वाढलं. बाळकृष्णा सारख तोंड भर दही खात तो आपल्या दोन्ही खळ्या पाडून हसला आणि आईकडे बघून म्हणाला, "You are the best mom in the whole world!!" आभानेही त्याच्या माखलेल्या तोंडाचा पापा घेतला आणि तो तिला बिलगला.. दुपारचा राग केव्हाच उडून गेला होता. मला वाटलं हा क्षण असाच रहावा. लेकरं मोठी होतात पण आईकडे असे एक एक क्षण गोळा होत रहातात.. माझं लक्ष प्रमोदकडे गेलं, तो माझ्याशी हळुवार हसला, मला प्रणव मध्ये दिसलेला अद्वय त्याला सुद्धा दिसला होता!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults