हाचि नेम आता न फिरे माघारी

Submitted by पुरंदरे शशांक on 29 September, 2025 - 07:22

हाचि नेम आता न फिरे माघारी

हाचि नेम आतां न फिरें माघारी | बैसलें शेजारी गोविंदाचे ||१||

घररिघी झाले पट्टराणी बळें | वरिलें सांवळें परब्रह्म ||२||

बळियाचा अंगसंग झाला आतां | नाहीं भय चिंता तुका म्हणे ||३||
.....................................................................................

श्री तुकाराम महाराजांचा हा अभंग वरवर पहाता सामान्य माणसाला गोंधळात टाकणाराच आहे. कारण यात जे रुपक वापरले आहे ते सर्वसामान्यांना न पटणारे, नीतिनियमांच्या चौकटीत न बसणारे असे आहे. --- हे व्यभिचारी स्त्रीचे रुपक श्रीतुकाराम महाराजांनी वापरले आहे.

" गोविंदावाचून दुसऱ्याशी रत व्हावयाचे नाही." -- हाच माझा निश्चय आहे. आणि त्या निश्चयापासून आता माघारी फिरणे शक्य नाही. मी गोविंदाचे शेजारी बसले आहे.||१|| मी परपुरूषाच्या घरात बळेच प्रवेश केला असून, सावळ्या परब्रह्माला वरले आहे ; आणि त्याची पट्टराणी झाले आहे.||२|| तुकाराम महाराज म्हणतात, सर्वात बलवान असलेल्या अनंताशी माझा शरीरसंबंध झाला आहे. त्यामुळे मला आता कोणाचेही भय आणि कशाचीही चिंता राहिली नाहीये. --- असा या अभंगाचा शब्दार्थ सांगता येईल.

आणि जर आपल्याला संतांना अभिप्रेत अर्थ पहायचा असेल तर मग आपल्याला शास्त्रसंमत नवविधा भक्तीपासून सुरुवात करावी लागेल.

जर कुणा भाग्यवान भक्ताला देवाकडे जायचे असेल/देवत्व प्राप्त करुन घ्यायचे असेल तर नवविधा भक्तीची मोठीच सोय शास्त्रांनी तसेच संतांनी करुन ठेवलेली आहे.
श्रवणं कीर्तनं विष्णोस्मरणं पादसेवनं ।
अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं ।।
१) भगवंताविषयी संतांकडून सर्व काही ऐकणे - श्रवण.
२) संतांबरोबर भगवतांचे गुणसंकीर्तनात सहभागी होणे - किर्तन
३) संतांसमवेत भगवंताच्या नामाबद्दल जाणून घेणे व तशी नामस्मरणाची उपासना करणे - विष्णोस्मरण.
४) भगवंताची/सद्गुरुंची/संतांची सेवा करणे - पादसेवन
५) देवाची/सद्गुरुंची/संतांची पूजा करणे - अर्चन
६), ७)देवाला/सद्गुरुंना/संतांना सर्वभावे वंदन करणे व पुढे समर्पित होणे - वंदन व दास्य
८)अशा वरील पायर्‍यांनी भक्त जसजसा देवाच्या/संतांच्या निकट जाऊ लागतो तसतसा देव/संत आपणहून भक्ताशी सख्यत्व साधतात. --- सख्य
९) या वरील सर्व पायर्‍या खरं तर सगुण भक्तीत येतात. पण जसजशी या सर्वच भक्तींमधे अंतरंगता/सूक्ष्मता येऊ लागते तसतसे देवाचे/संतांचे/सद्गुरुंचे निर्गुणत्व भक्ताच्या लक्षात येऊ लागते व देव भक्त असे वरवर असलेले द्वैत आता अद्वैतपणे एकत्व पावते. --- आत्मनिवेदन
निर्गुणी जे अनन्यता । तेचि मुक्ती सायोज्यता ।। दासबोध
--- अशा प्रकारे सगुणाचेनि आधारे । निर्गुण पाविजे निर्धारे। सारासार विचारे । संतसंगे ।। अशा अंतिम बोधापर्यंत साधक भक्त येतो. व आता तो सिद्ध/पूर्ण झालेला असतो. आणि तरीही "बाह्य साधकाचे परी । आणि स्वरूपाकार अंतरी । सिद्ध लक्षण चतुरी । वोळखी ऐसे ।।" -- असे त्याचे आश्चर्यकारक व विलक्षण वर्णन श्रीसमर्थांनी करुन ठेवलेले आहे.

या नवविधा भक्तीत पूर्णपणे रममाण झालेले तुकोबा आता अशा बोधात आहेत की मी आता या हरिशी/हरितत्त्वाशी संपूर्णतः एकरुप झालेले आहे --- आणि म्हणूनच *न फिरे माघारी* -- असे निश्चयपूर्वक म्हणत आहेत.
घररिघी हा शब्द मोठा सूक्ष्म अर्थ दाखवणारा आहे.
घररिघी म्हणजे आपण होऊन घरात घुसणारी स्त्री असा आहे. साधरणतः एखाद्या स्त्रीचे विधिवत लग्न झाले की ती त्या घरात/सासरी गृहलक्ष्मी म्हणून प्रवेश करते. हा प्रवेश त्या घराला व त्या स्त्रीला - दोन्हीकडे सन्मानाचा भाग असतो. इथे मात्र घररिघीचा अर्थ एखाद्या घरात/तिर्‍हाईत घरात आपणहून बळजबरीने घुसणारी स्त्री असा आहे.

सर्वसामान्य माणसाला अथवा भक्ताला देवाविषयी फारच कमी माहिती असते अथवा पूर्णतः अज्ञानच असते म्हटले तर योग्यच होईल. देव हा एखाद्या मूर्तितच आहे अथवा एखाद्या तत्सम प्रतिकातच आहे -- एवढ्यापुरती मर्यादित जाणीव सर्वसामान्यांना असते. आणि देवाचे निर्गुणत्व जाणणे व पुढे त्याच्याशी एकरुपत्व साधणे हे सर्वसामान्यांकरता बळजबरी किंवा आततायीपणाचे किंवा अनाकलनीयच वाटते. व त्याकरताच बुवा घररिघी शब्द वापरतात. ते म्हणतात देव थोडाच कोणाला आपणहून अशी जवळिक देणारे ! तो तर कमालीचा कंजूष, कमालीचा व्यवहारी आहे. आणि मला तर त्याची पट्टराणीच व्हायचा ध्यास होता... मग काय ! -- सरळ घुसखोरीच केली, बळजबरीनेच त्याच्या अंतरंगात शिरले मी...
ही भक्तीची केवळ कमाल आहे.

आपण फक्त सगुणापुरतेच ईश्वराला भजणारे हे जाणूच शकत नाही, आपली भक्ती अगदीच मर्यादित आहे.
आणि बुवांनी तर देवावरुन आपले सर्वस्व ओवाळून टाकले आहे -- आणि त्यामुळेच ही घुसखोरी करायचे असामान्य सामर्थ्य त्यांनी मिळवले आहे. अशी या घररिघी शब्दाची मधुरता आहे, मौज आहे, विशेषता आहे. हा शब्द फक्त तुकोबाच वापरु शकतात. आपण तर कल्पनाही करु शकत नाही.

एकदा का हे सर्वस्व समर्पण करणे/ निर्गुणी अनन्यता हा भाग बुद्धीने जरी आपल्या लक्षात आला तरी मग बाकीचा अभंग हा शब्दार्थाने समजायला मग सोपा जातो.
बळियाचा अंगसंग झाल्यावर काय होते हे एका ओळीत बुवा सांगतात. -- नाही भय चिंता. भय, चिंता, उद्वेग या गोष्टी नावालाही भक्ताच्या ठिकाणी रहात नाहीत. प्रत्यक्ष हरि तत्त्वाशीच एकरुपता साधल्यावर कसली आलीये चिंता नि भय !

यातील बळियाचा अंगसंग, वरिले सावळे परब्रह्म -- या सार्‍या विलक्षण शब्दांनी हा अभंग खरोखर अशा उंचीवर पोहोचलाय की तो वाचताना, ऐकतानाही आपण भावविभोर होऊन जातो. भले आपल्या लक्षात हे काही आले नसेल -- तरी काय ही भक्ताची विलक्षण अवस्था, कधी आपल्याला अशी आस लागणार !! -- अशा जाणिवेने जरी आपला कंठ दाटून आला तरी बुवा मातेच्या ममतेने आपल्याला जवळ करतीलच...

आणि अशा मातृह्रदयी बुवांचे आशीर्वाद, त्यांची कृपा, त्यांचे प्रेम -- हेच तर आपल्याकरता सारसर्वस्व आहे.
बाकी तो हरि, त्याचे स्वरूप हे तर कायम अनाकलनीयच रहाणार आहे --- आणि रहावोहि ते तसेच !!

इति ।।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>बुवा
बुवा म्हणजे कोण पुरंदरे जी.
लेख आवडला.
------------
कळलं कळलं तुकारामबुवा