वालचंद कॉलेज सांगलीला असतानाची गोष्ट..
कसलेसे सेमीनार होते. विषय आठवत नाही. याचा अर्थ नक्कीच बोरींग असणार. तसे मला माझे फायनल ईयर प्रोजेक्ट सुद्धा आठवत नाही. ते ही बोरींगच होते म्हणा. पण हे सेमीनार संपल्यावर चहापानाचा ईंटरेस्टींग कार्यक्रम होता. त्यामुळे आम्ही सर्व हॉस्टेलाईट्सनी "फुकट तिथे प्रकट" या तत्वाला अनुसरून हजेरी लावली होती. चहासोबत पोहे असणार अशी आतली आणि पक्की खबर एकाने काढली होती. तर दुसरीकडे सेमीनार चालू असताना कोणाच्या तरी तीक्ष्ण नजरेने पावाच्या लाद्या ईथून तिथे नेताना टिपल्या होत्या. त्यामुळे आमच्या चाणाक्ष बुद्धीने त्याचा योग्य तो अर्थ काढून वडापाव ते मिसळपाव सगळ्या चवी आळीपाळीने तोंडावर आणून झाल्या होता.
प्रत्यक्षात मात्र ग्लुकोजची बिस्किटे निघाली आणि सार्यांचाच हिरमोड झाला. तरीही मी जिद्द न हरता या झालेल्या पोपटाचा बदला घेण्यास एकापाठोपाठ एक असे पाच-सहा गरम चहाचे प्याले रिचवत माझा आत्मा थंड केला. माझ्या मित्राने माझा हा पराक्रम जगजाहीर करायचा अवकाश, पलीकडून एक आवाज आला. ईलेक्ट्रीकलच्या विकासने सात ग्लास ढोसले होते.
कॉलेजमध्ये एक गोल्डन पिरीअड असतो जेव्हा आपल्यातील अहंकार आणि मस्ती शिखरावर असते. माझा तोच चालू होता! त्यामुळे आपल्यापेक्षा जास्त चहा कोणी पिऊच कसा शकतो या अहंकाराने चूरचूर मी अजून दोन-तीन ग्लास चहा पित त्या विकासला स्पर्धेचे अघोषित आव्हान दिले. त्यानेही अजून एक दोन ग्लास ढोसून ते आव्हान स्विकारले. आणि बघता बघता स्पर्धेचे रुपांतर ईंटर-डिपार्टमेंट युद्धात झाले.
बारा-तेरा पर्यंत पोहोचल्यावर विकास त्याच्या नावाला जागत थांबला. त्याक्षणी मला पंधराची राऊंड फिगर करून युद्धविराम देणे सहज शक्य होते. पण आमच्यातील एकाला किडा चावला आणि त्याने मला २५ चा आवाज दिला.
एव्हाना चहा माझ्या रक्तात भिनला होता तर अहंकार डोक्यात. जीभेला चटक लागली होती. तिच्यावरून घसरत चहा पाण्यासारखा आत जात होता. मी कधी १५ वरून २५ पर्यत गेलो ते माझे मलाही समजले नाही. आज होऊन जाऊ दे आरपारची लढाई असा आवाज पुन्हा कोणीतरी दिला आणि मी देखील असा दिवस रोज रोज येत नाही म्हणत २६ वा ग्लास उचलला...
आता मैदानात कोणीही नव्हते. ना कोणी प्रतिस्पर्धी, ना कसले टारगेट होते. स्पर्धा स्वत:शीच होती. २६, २७, २८.. मी व्यसन करावे तसे घटाघटा चहा पित होतो. हे अगदीच मोनोटोनस होतेय असे वाटत होते तेव्हा एखाद दुसरे ग्लूकोजचे बिस्कीट उचलत होतो. २९, ३०, ३१, ..
आणि ३२ व्या ग्लासाला सुदैवाने चहाची टाकी रिकामी झाली. पण माझे पोट मात्र किटलीसारखे टम्म फुगले. थोडक्यात ऊधर का माल ईधर झाले.
टाळ्यांचा कडकडाट झाला की नाही हे आता आठवत नाही. पण ३२ चहा आणि सोबत १६ ते १८ ग्लुकोजची बिस्किटे या रेकॉर्डची वालचंद कॉलेजच्या इतिहासात नोंद मात्र झाली...!!!
दुसर्या दिवशी मी किती वेळा डब्बा धरून पळालो या विक्रमाचे आकडे अद्यापही गुलदस्त्यात आहेत. पण खरेच ती वेळ आली होती म्हणून असा पराक्रम आयुष्यात पुन्हा कधी केला नाही.'
चहाचे वेड मात्र कायम राहिले !
ते तसे लहानपणापासूनच होते म्हणा.. म्हणजे ज्या वयात मुलांना घरी चहा दिला जात नाही तेव्हापासून होते. त्यामुळे मी तो पाहुण्यांकडे मिळवायचो. कसलीही भीड न बाळगता मागून घ्यायचो. त्यांनाही एवढ्या लहान मुलाला चहा कसा आवडतो याचे कौतुक वाटायचे. तिथे मला घरचे सुद्धा अडवायचे नाहीत. थोडासाच द्या असे म्हणून का होईना मन तृप्त होईल ईतका मिळायचा. आणि याचसाठी मी आईचे शेपूट बनून तिच्यासोबत कुठेही जायला तयार असायचो.
अरेंज मॅरेजमध्ये विचारला जाणारा एक कॉमन प्रश्न असतो - मद्यपान करता का?
आणि उत्तर हो असल्यास पुढचा प्रश्न - रोज रोज की ओकेजनली??
कोण कितपत खरी उत्तरे देतात कल्पना नाही. पण ओकेजनली वर मांडवली केली जात असावी.
माझा लहान वयातच प्रेमविवाह झाल्याने ठरवून लग्न करण्यातली गंमत अनुभवता आली नाही. अन्यथा मी मुलीला एक प्रश्न नक्कीच विचारला असता - चहापान करता का? आणि दिवसातून वरचेवर की सर्वसामान्यांसारखे दोन वेळा?
चहा आवडतच नाही किंवा सर्वसामान्यांसारखे उत्तर आले असते तर लागलीच फुल्ली मारली असती.
आणि दिवसातून किमान चार वेळा वाली मुलगी ताबडतोब पास केली असती.
पण योगायोगाने म्हणा, आमचा हा गुण जुळून आला. म्हणजे एकाला दिवसाच्या कुठल्याही वेळी चहाची तल्लफ यावी आणि दुसऱ्याने त्याला सोबत द्यावी. एकाने चहाचे आधण ठेवावे, तर दुसऱ्याने त्यात दूध मिसळून कपात ओतून घ्यावे. चहाला आमच्यात आजवर कोणी नाही म्हटले नाही. ना प्यायला, ना करायला!
इतर घरकामाच्या वाटणीवरून आमच्यात आजवर सतराशे साठ भांडणे झाली असतील, पण चहावरून कधी एकही चकमक उडाली नाही. किंबहुना प्रत्येक युद्धानंतर जेव्हा मनमिलाप करायची वेळ येते तेव्हा एकाने म्हणावे मी चहा घेतोय, तुला घेऊ का? की तह झालाच म्हणून समजा. ज्या दिवशी चहाचा प्रस्ताव समोरून नाकारला जाईल तेव्हा भांडण विकोपाला गेले आहे आणि आता घटस्फोटाशिवाय पर्याय नाही असे खुशाल समजावे. पण या सामाईक आवडीमुळे आमच्यातील कित्येक मोठमोठी भांडणे चहाच्या पेल्यातील वादळे ठरली आहेत. आमच्या कित्येक रात्री निव्वळ गप्पांनी रोमांटीक झाल्या आहेत. त्यामुळे चहासोबत तुला काय आवडते? बिस्कीट, खारी, कि टोस्ट? असे कोणी विचारल्यास माझे उत्तर ठरलेले असते... आवडीच्या जोडीदारासोबत गप्पा
रात्रींवरून आठवले,
व्हिजेटीआय कॉलेजला असताना जितके दिवस कॉलेजला गेलो नसेल त्यापेक्षा जास्त रात्री हॉस्टेलमध्ये गेल्या आहेत. मी हॉस्टेलमध्ये राहत नसूनही, तिथे अभ्यासाच्या नावावर अभ्यासाव्यतिरीक्त ईतर सारे काही करायला पडीक असायचो. पण परीक्षेच्या काळात जेव्हा अभ्यास करण्यावाचून पर्याय नसायचा, तेव्हा रात्र जागवायला चहाला देखील पर्याय नसायचा.
अभ्यासाला गाव जमलेले असायचे. अपवाद वगळता सारेच चहाचे चहाते होते. पण त्यातही आमचा चारपाच जणांचा एक दर्दी ग्रूप होता. मध्यरात्री दोन तीन वाजता चहा प्यायला म्हणून अर्धा पाऊण तास पायपीट करत आम्ही दादर स्टेशन (पश्चिम) गाठायचो आणि तितकीच तंगडतोड करत परत यायचो. हातात शोभेला म्हणून अभ्यासाचे पुस्तक असायचे.
नंतर जवळचे अजून एक दोन पर्याय सापडले. तरी बरेचदा आम्हाला तिथेच जायचे असायचे कारण जीभेला तिथल्या चहाच्या चवीची चटक लागली होती. आणि आम्हाला तिथे जाताना रस्त्यात होणार्या गप्पांची आवड लागली होती.
म्हटले तर चार घोटात संपला जाणारा कटींग चहा, पण त्यासाठी ईतका त्रास हसत हसत उचलला जायचा. पण का?, तर तो चहा मिळवायला असे हातपाय झाडण्याची एक वेगळीच मजा असते. त्याने या अमृततुल्य पेयाचे मूल्य आणखी अमूल्य होते.
चहासाठी हातपाय झाडण्यावरून आठवले,
कोरोनात लागलेला लॉकडाऊन ऊठला आणि आम्ही भाड्याचे घर सोडून हक्काच्या घरात शिफ्ट झालो. ती आमच्या संसाराच्या नवीन सुरुवातीची पहिलीच रात्र होती. पसारा शून्य आवरून झाला आहे असे दोन-तीन तास पसारा आवरल्यानंतरही वाटत होते. रात्रीचे तीन वाजले होते. पण मुले झोपली असल्याने हिच खरी कामाची वेळ आहे हे देखील समजत होते. अश्यावेळी अजून दोन-तीन तास त्या सामानाच्या ढिगार्यात स्वत:ला गाढून घेण्यास जे मानसिक बळ लागणार होते ते चहातूनच येणार याची कल्पना होती. पण समोर पडलेल्या पसार्यातून चहाची निर्मिती करण्यापेक्षा कोरोनाची लस बनवायला घेतली असती तर ती आधी होण्याची शक्यता जास्त वाटत होती. पण तरीही, जिथे शून्य पुर्णांक शून्य शून्य एक टक्के जरी शक्यता असते तिथे चहाचा प्रयत्न सोडू नये असे गुणीजन म्हणतात. म्हणून मग घेतली चहासामानाची शोधाशोध करायला.
दूध नशीबाने फ्रिजमध्ये होते तिथे अर्धी बाजी मारली असे झाले. चहापावडर आणि साखरेचे डबे शोधायचे थोडे व्यर्थ प्रयत्न केल्यावर आठवले की सामानाच्या ड्रममध्ये एक्स्ट्रा स्टॉक पडला आहे. मग नवीन पुडके फोडले. कप कुठेच सापडले नाहीत तेव्हा मुलांच्या बड्डेला रिटर्न गिफ्ट म्हणून वाटलेले कार्टून कॅरेक्टरने सजवलेले मग आठवले. साधी गाळणी सापडली नाही तर ज्यूसची गाळणी वापरली. चमच्या ऐवजी कश्यासोबत तरी फ्री मिळालेले भातुकलीच्या खेळातील वाटावेत असे प्लास्टीकचे काटे सापडले त्यात धन्यता मानली. सुदैवाने खाऊचा डब्बा लवकर हाताला लागला. त्यातून फरसाण आणि गुड्डे बिस्कीटची सोय झाली. चहापावडर आणि साखरेची मापे डब्यासोबतच हरवली होती. तिथे आपलाच अनुभवी हात वापरला. सिलेंडर जोडला गेला नसल्याने नवीन गॅसच्या स्टोव्हचे उद्घाटन केले. आणि बायकोने आपल्यात आता ताकद उरली नाही म्हणत हात वर केल्याने मीच स्वहस्ते नव्या घरातील पहिल्या रात्रीचा जुगाडू चहा बनवला.
ज्यांनी असा अनुभव घेतला त्यांनाच ठाऊक, असा चहा एक वेगळेच चैतन्य एक वेगळीच उर्जा देऊन जातो.
आणि कदाचित म्हणूनच बुद्धीचे असो किंवा अंगमेहनतीचे काम करणारा असो, सहा आकडी पगार घेणारा असो वा एखाद्याचे हातावर पोट का असेना, पण ते भरायला दहाबारा रुपये खर्चून वडापाव खाण्यापेक्षा प्रत्येकजण चहाला प्राधान्य देतो. पुन्हा परत जाऊन कामाला लागायची आणि आयुष्य पुढे जगायची उर्जा सर्वांना चहाच्या एका प्यालातूनच मिळते. त्यामुळे चहा हे एक वरदानच वाटते.
वरदानावरून आठवले,
चहाबाबत मला एक दैवी देणगी मिळाली आहे. माझ्या जीभेला चहाचा चटका बसत नाही.म्हणजे कितीही गरम चहा का असेना, मी पाण्यासारखे घटाघटा पितो. किंबहुना चहा मला उकळताच लागतो. एकदा का चहा कपात ओतला की तो संपवेपर्यंत माझे जग थांबते. याची माझ्या घरीही कल्पना आहे. त्यामुळे मला चहाच्या पेल्यावरून कोणी उठवत नाही. ईतकेच नाही तर विज्ञानाच्या नियमाप्रमाणे गरम द्रव पदार्थ हलका होऊन वरच्या बाजूला जातो म्हणून टोपातील उकळता चहा पहिला माझ्याच कपात ओतला जातो
कॉलेज कँटीनमध्ये मित्रांसोबत चहा मागवला जायचा तेव्हा अर्थातच पहिला माझाच संपायचा. ज्याला माझी ही किर्ती ठाऊक नाही असा कोणी भेटला की माझा एक आवडीचा प्रॅन्क ठरलेला होता. त्याने एक घोट घेऊन आपल्या हातातला चहाचा ग्लास खाली ठेवला रे ठेवला की त्याची जरा नजर हटताच मी तो पटकन ऊचलायचो. एका घोटात रिकामा करून पुन्हा होता त्या जागी ठेवायचो. त्याने पुढचा घोट घ्यायला म्हणून चहाचा ग्लास ऊचलावे आणि तो रिकामा झालेला बघून गोंधळून जावे
काळ, काम, वेग आणि माझे चहाप्रेम आजमवायला एकदा कॉलेजच्या मित्रांनी मला एक आव्हान दिले होते. दोन मिनिटांमध्ये तब्बल दहा चहा संपवायचे.
हि डिप्लोमाची गोष्ट. वरचा ३२ चहाचा किस्सा घडायच्या आधीची गोष्ट. आव्हान अर्थातच जिंकले. म्हणूनच ईथे उल्लेख करत आहे.
सुरुवातीला मिनिटभर सर्व ग्लास एकत्र ठेऊन मी त्यावर फक्त फुंकर मारायचे काम करत होतो.
किंचित कमी गरम झाले. माझ्या जीभेला चटका सोसवेल असे झाले. आणि दुसर्याच मिनिटाला...
प्रत्येक ग्लास... दोन दोन घोटांत... घटाघटा
पण या सगळ्या चक्रम विक्रमांपलीकडेही चहासोबत आणि चहामुळे ईतरांसोबत जे एक भावनिक नाते जोडले जाते ते मला फार भावते.
कभी खुशी कभी गम चित्रपटात हेलिकॉप्टरमधून उतरलेला शाहरुख खान घरी धावत येतो हे त्याची आई झालेल्या जया बच्चनला आधीच समजते आणि ती त्याला ओवाळायला आरतीचे ताट तयार ठेवते. भले मी ट्रेनमधून घरी येतो, पण आल्यावर कपडे बदलायच्या आधी माझ्यासाठी गरमागरम चहा तयार असतो. मग मी आईच्या राज्यात असो वा बायकोच्या राज्यात, चहाबाबतचे माझे सारे लाड नेहमीच पुरवले जातात.
चहासोबत काय आवडते तर गप्पा असे वर म्हटले असले तरी गप्पांनी पोट भरत नाही याचेही भान मी कायम ठेवतो आणि भरपूर हादडतो.
चहासोबत खायला काय आवडते हे सांगायला वेगळा लेख लिहावा लागेल. त्यापेक्षा चहासोबत काय आवडत नाही हे सांगणे जास्त सोपे राहील. आणि यात पहिलेच नाव बिस्कीटांचे येईल. माझ्यासाठी तो शेवटचा पर्याय असतो. समाजाने चहा बिस्कीट हे कॉम्बिनेशन कुठल्या विचारांनी बनवले आहे समजत नाही. जो चहा आपण तरतरी यावी म्हणून पितो त्यासोबत किंचित गोडूस चवीची बिस्कीटे खाणे पटतच नाही. तिथे तिखट शेव, फरसाण, चकलीच हवी. गोडूसपणाचा लवलेश नसलेले खारी, बटर, टोस्ट हवेत. गोडाचा शिरा नाही तर तिखटाचा उपमा हवा.
कोकणातले असाल तर छान पांढरेशुभ्र जाळीदार अन लुसलुशीत घावणे हवेत. त्याचा एक तुकडा तोडून, त्याला खोबरे मिरचीची चटणी लावून, तो तुकडा चहात बुडवून खावा. म्हणजे ती चटणी मस्त ओघळून चहात मिसळते आणि त्यामुळे चहाला जो तिखट फ्लेवर येतो त्याने चहा अजून पैसा वसूल होतो. तेच चपाती असेल तर ती तव्यावरून गरमागरम थेट ताटात यायला हवी. त्याच अवस्थेत तिच्यावर तूप किंवा अमूल बटर सोडावे आणि त्याला विरघळताना बघावे. तिचा एक तुकडा तोडून त्याचा द्रोण करावा आणि त्यात चहा भरून.. आहा.. आहाहा.. हे लिहितानाच तल्लफ आली, म्हणून आता ईथेच थांबतो
पुन्हा भेटुया,
टी ब्रेक नंतर...
- तुमचा अभिषेक
खूप मस्त लिहीलेले आहे.
खूप मस्त लिहीलेले आहे.
चहा मला ठीक वाटतो. पण बिनसाखरेचा देतात तो आवडत नाही. कारण वरुन साखर घातली की ती चव येतच नाही जी करताना घातली की येते. आम्ही लहानपणी चहा बरोबर अमूल लावलेल्या पोळ्या किती हादडल्यात. तोच ब्रेकफास्ट असे. आई बिचारी गरम पोळ्या तव्यावरुन देत असे.
मस्त लिहिलंयस ऋन्मेष!
मस्त लिहिलंयस ऋन्मेष!
चहाबरोबर कित्येक आठवणी जोडलेल्या आहेत. लहानपणी आम्हाला 'दूधचहा' मिळायचा. म्हणजे कपभर दुधात नावापुरता आणि रंगापुरता चहा. त्यात बुडवून खाल्लेली खारी बिस्किटे (म्हणजे खारी. 50-50 वगैरे नाही) किंवा बटर किंवा टोस्ट. थोडं मोठं झाल्यावर मोठ्या माणसांच्या बरोबर बसून गप्पा ऐकत घेतलेला चहा. मे महिन्याच्या सुट्टीत किंवा एरवी काही कारणाने नातेवाईक आलेले असताना या सकाळी लवकरच्या चहाबरोबर होणाऱ्या निवांत गप्पांचं इतकं आकर्षण असायचं/ अजूनही आहे की त्यासाठी सुट्टी असूनही लवकर उठावंसं वाटायचं.
कॉलेजच्या दिवसांत होस्टेलवर चहा करायचो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की उत्तर भारतीयांची चहा करण्याची पद्धत वेगळी असते. तोही चहा छानच लागतो.
आमच्या होस्टेलजवळ हिंदुस्थान बेकरी उघडली आणि आमची जोशी वडेवाल्यांसमोर मिळणाऱ्या चहाबरोबर काही तरी (बऱ्याचदा अर्थात पॅटीस) खाण्याची मोठीच सोय झाली. कारण जोशी वडेवाल्यांची ती विशिष्ट शाखा तरी होपलेस होती. फक्त चहा चांगला मिळायचा. तोही त्यांचा नसणार. जागा फक्त त्यांची. असो.
सीओईपीच्या बोटक्लबवर निवांत बसून चहा पिण्याची मजा आणखीनच वेगळी. सोबत समोसा किंवा गुडडे.
बंगलोरला आल्यापासून बाहेरचा चहा रद्द करून फिल्टर कॉफीवर आले. तंदूर चहा मिळायला लागल्यावर एकदोनदा घेतला, पण फार काही आवडला नाही. सध्या जिथे काम करते तिथले स्टुडंट लोक संध्याकाळी हौशीने चहा करतात. मी उशिरापर्यंत थांबणार असेन तर मीही घेते. मजा येते.
चहासोबत असणारी कंपनी खूप महत्त्वाची. आवडत नसणाऱ्या लोकांबरोबर चहा प्यायची मजा नाही. त्यापेक्षा एकटीने प्यावा. तसा जास्त आवडतो. औपचारिक सेटिंगमधेही प्यावा लागतो. तेव्हाही फार मजा नाही.
चहांबाज, मस्त लिहिलंय !
चहांबाज,
मस्त लिहिलंय !
^^^सीओईपीच्या बोटक्लबवर
^^^सीओईपीच्या बोटक्लबवर निवांत बसून चहा पिण्याची मजा आणखीनच वेगळी. सोबत समोसा किंवा गुडडे^^
काय आठवण करून दिलीस ग विशाखा...
मी महिन्याभरापूर्वी तिथेच तसाच लागणारा चहा पिले आणि खूप भारी वाटले... जागा तशीच आहे, कॅन्टीन ची कळकट अवस्था तशीच आहे, बाकडी आणि चिंचेच्या झाडाच्या पार तसाच आहे, उपडी टाकलेली होडकी पण तशीच..
फरक माझ्यातच पडलाय, चहा स्टूडेंट म्हणून नाही तर या वेळी पालक म्हणून प्यायला.
लेख चहासारखाच kadak झालाय हे
लेख चहासारखाच kadak झालाय हे वर लिहायचे राहिले...
व्हिजेटीआयवाल्याच्या धाग्यावर
व्हिजेटीआयवाल्याच्या धाग्यावर सीओपीअन्सचा बोटक्लब कट्टा आणि मधुशेठ, बाबुच्या हातचा चहाची आठवण
बाकी चहाबद्दलचे वेगवेगळे किस्से आहेत, वेगवेगळ्या आठवणी आहेत, त्यामुळे लेखाला अनुमोदन... "चहाला वेळ लागत नाही, पण वेळेला चहा लागतो" यातला मी पण एक!
मस्त लिहीले आहे! आवडले
मस्त लिहीले आहे! आवडले
विशेषतः नवीन घरात केलेल्या जुगाडू चहाची हकीकत
जिभेला चटका न बसणे ही तुझी सुपरपॉवर धमाल आहे.
आमच्याकडे अगदी लहानपणी चहा देत नसावेत पण शाळेत जाऊ लागल्यापासून चहा घेत असल्याच्या आठवणी आहेत. पण इतरांसारखे नॉर्मल एक दोन वेळा चहा घेण्यापासून ते चहाचे वेड लागण्यापर्यंत प्रवास कधी झाला ते लक्षात नाही. पण मला प्यायला जितका आवडतो तितकाच करायलाही आवडतो. एक दोन जवळच्या नातेवाईकांत पब्लिक जमले की त्यांच्या घरी सुद्धा मलाच चहा करायची फर्माईश होते.
चहासोबत असणारी कंपनी खूप महत्त्वाची >>> टोटली!
उत्तर भारतीयांची चहा करण्याची पद्धत वेगळी असते >>> वावे- म्हणजे काय वेगळे? मला स्पेसिफिकली आठवत नाही. मात्र दक्षिणेकडे इन जनरल चहा चांगला मिळत नाही असा माझा अनुभव आहे.
फारएण्ड- ते दूध जास्त आणि
फारएण्ड- ते दूध जास्त आणि पाणी एकदम कमी घेतात. आधीच दूध, पाणी, साखर, चहा पावडर सगळं एकत्र करून भरपूर वेळ उकळतात. ढवळत राहिलं की उतू जात नाही.
बाहेर टपरीवर असाच मिळतो आपल्याकडेही. पण घरी जनरली आपण साखर घालून पाणी उकळतो आणि मग चहा पावडर घालून थोडं उकळून बंद करतो. दूध वेगळं गरम करून मग कपात चहा-दूध एकत्र करतो.
दक्षिणेकडे चहा जनरली नाही चांगला मिळत हे बरोबर आहे. पण गंमत अशी होते की आमच्या ऑफिसमध्ये जे दक्षिण भारतीय आहेत ते ऑफिस कँटीनमधे चहा घेतात, कॉफी घेत नाहीत कारण ती त्यांच्या घरच्या स्टँडर्डची नसते आणि उत्तर भारतीय (त्यात मराठीही आले) कॉफी घेतात कारण तो चहा आपल्या स्टँडर्डचा नसतो
धनवन्ती- अरे वा! मस्तच.
खूपच मस्त लिहिले आहेस ऋ.
खूपच मस्त लिहिले आहेस ऋ. चहासोबत गप्पा, रोमान्स, स्पर्धा, खाऊ, कोरोनातील जुगाडू चहा - लेख अतिशय प्रसन्न आणि ताजातवाना करणारा झाला आहे.

चहाबाज नाही/ चहाच घेत नाही पण प्यावासा वाटावा इतके आवडले लेखन.
अस्मिता तू टीटोटलर आहेस की.
अस्मिता तू टीटोटलर आहेस की.
माझा नवराही जहाजावर कित्येक वर्षे काढुनही टीटोटलर आहे.
चहापुराण आवडले. नव्या घरातील
चहापुराण आवडले. नव्या घरातील पहिल्या चहाचा क़िस्सा खास.
चहा “लागतोच” असे नाही पण प्यायचाच तर थोडा जास्त दुधाचा, कमी साखरेचा (नसली तरी ओके) milky texture चा चहा पाहिजेल. Disposable cups, काचेचे ग्लास यात नक्को. कप-बशीत(च). पूर्ण भरून.
Actually, चहा आणि कॉफी याबाबतीत थोडे bisexuality सारखे होते माझे 😄 दोनू पसंद आते मेरेकू, कभी कॉफी कभी चाय.
@ वावे,
@ वावे,
… दक्षिण भारतीय कॉफी घेत नाहीत कारण ती त्यांच्या घरच्या स्टँडर्डची नसते आणि इतर सर्व कॉफी घेतात कारण चहा त्यांच्या स्टँडर्डचा नसतो… 👍
What an astute observation!
मस्त लिहिलं आहे. नवीन
मस्त लिहिलं आहे. नवीन घरातल्या चहाचा प्रसंग मस्त रंगवलाय . जुगाडू चहा.नवीन घरात पहिला चहा ,असाच असतो, शोधाशोध वाला चहा.
मलापण चहाबरोबर गोड किंवा बिस्किटं आवडत नाहीत .चकली खाऱ्या शंकरपाळ्या ,तिखट शेव ,थेपला अगदी राहिलेले शिळे धपाटेही खाते चहाबरोबर ,मस्त लागतात . तेल लावलेली गरम चहाचपाती तर सकाळच्या शाळेचा नाश्ता असायचा.अजूनही घरी जास्त तोच नाश्ता होतो.
चहासोबत असणारी कंपनी खूप महत्त्वाची >+1हे मात्र खरंय
फारएण्ड- ते दूध जास्त आणि
फारएण्ड- ते दूध जास्त आणि पाणी एकदम कमी घेतात. आधीच दूध, पाणी, साखर, चहा पावडर सगळं एकत्र करून भरपूर वेळ उकळतात. ढवळत राहिलं की उतू जात नाही. >>> हो आले लक्षात
दक्षिण भारतीय आहेत ते ऑफिस कँटीनमधे चहा घेतात, कॉफी घेत नाहीत कारण ती त्यांच्या घरच्या स्टँडर्डची नसते आणि उत्तर भारतीय (त्यात मराठीही आले) कॉफी घेतात कारण तो चहा आपल्या स्टँडर्डचा नसतो >>>
मस्त जमलाय लेख . चहाशी निगडित
मस्त जमलाय लेख . चहाशी निगडित अगणित आठवणी आहेत . दिवसातून ४-५ कप ते आता १ कप असा कमी केलाय चहा , आणि गेली ९-१० वर्षे बिनसाखरेचा चहा घेतेय , गोड चहा जातच नाही . बाकी चहा आणि आईच्या हाताची चकली हे माझ्यासाठी स्वर्गसुख .
मस्तच जमला आहे लेख. पहिला
मस्तच जमला आहे लेख. पहिला पैजेचा प्रसंग आणि जुगाडू चहा दोन्ही आवडले.
बाकी चहा बरोबर बिस्कीट ह्याला बिग नो हे फारच पटले. बिस्किटे चहाची चव पूर्ण बिघडवतात ह्याच्याशी सहमत. त्यापेक्षा चहा बरोबर चिवडा अधिक चांगला लागतो.
बिस्किटा वरून आठवले, आमच्या ऑफिस मध्ये एक टी लेडी चहा अप्रतिम करायची आणि म्हणे तिच्या चहाच सीक्रेट इंग्रेडियंट होतं ग्लुकोज बिस्कीट. चहा करताना आपण आलं घालतो तसं ती ग्लुकोज बिस्कीट चुरुन घालते असं सांगायची ती . मी मात्र स्वतः कधी घालून बघितल नाहीये.
बाकी चहा चांगला व्हायला देवाची कृपा , नशीब वगैरे असाव लागतं असं मला वाटत. प्रत्येक वेळी मी केलेल्या चहाची चव वेगळी असते. चांगला झालेला चहा कसा केला होता हे नीट लक्षात ठेवून परत तसाच केला तरी तसाच होईल ही गॅरंटी नाही अजिबातच.
चहाचं व्यसन बाबांमुळे लागलं.
चहाचं व्यसन बाबांमुळे लागलं.
अगदी लहानपणी घरचे चहा देत नसत मग बाबा चहाबाज आणि मी सतत त्यांच्या आजुबाजुला. मग ते पितात तर मी का नाही?
मला तेच पाहिजे ह्या हट्टाने मागायचे. मग आधी दुधाळ चहा देत.
बाबांच्या चहाच्या रंगाशी मॅच नाही म्हणून रडरड ते आजीचा धपाटा, कसली डँबरट मुलगी रे तुझी( बाबाला म्हणत) आजी एक चमचा चहा पाजायची. ही मी ३-४ वर्षाची असतानाची गोष्ट आजीने बर्याच वेळा सांगितली नंतर.
मग कळायला लागल्यावर एक कप सकाळचा प्यायला मागायचे ते ही ८-९ वर्षात आणि तसाच जरासा गडद रंग, अगदी बाबांना आवडायचा तसा.
लहान वयात अॅसीडीटी जडायचे कारण तेच होतं.
मग डोक्टरची भिती घालुन नाश्ता केल्यावरच चहा मिळायचा. मग बाबा कसे पितात सकाळी सकाळी असा हट्ट असायचा. आणि रंग सुद्धा तोच हवा असायचा. पण हट्ट तो हट्ट. आणि बाबा माझ्या बाजुने आईशी वाद घालत, दे काही नाही होत. माझासाठी केला तोच दे. आई हरून शेवटी द्यायची मला.
त्यामुळे दुधाळ चहा टोटल नो नो.
खुप उकळलेला चहा टोटल नो नो. मस्त केसरी चहा पण खुप उकळायचा नाही.
चहा दोन प्रकारे बनतात आमच्याकडे. नुसते पाणी , आलं आणि चहापत्ती. मग गरम दूध वेगळे घालून चहा कपात ओतायचा.
दुसरी पद्धत पाणी ,आलं उकळवून दूध घालून मग चहापत्ती. दोन्ही ज्यास्त उकळवत बसायचे नाही. चहापूड टाकली की गॅस बंद करायचा. मग गाळून प्यायचा.
आमच्याकडे सगळेच चहाबाज. आणि आईची विशिष्ट चहाची पद्धत आहे तीच मी शिकले कारण तोच चहा पिवुन वाढले.
आजही नाश्ता करुनच चहा पिते. लहानपणी नाशता झाला की गूड डे नाहीतर हत्तीचे कान चहा असे आवडायचे खायला. गरम घावणे आणि आंबोळी, शिळे कोंबडी वडे वगैरे.
चहा-चपाती टोटल नो फोर एसीडीटी. आधी पुरी खायची पण तोच अॅसीडीटी सो ते सुद्धा बंद.
मग मोठेपणी चकली किंवा बेसनाचा लाडू आधी संपवून त्यावर गरम चहा.
चहाचे सुखद क्षण आणि बाबांच्या आठवणी असा एक कोपरा आहे घरात. चहाला मस्त कंपनी हवी हे अगदी खरं.
बाबा खुप काही गोष्टी शिकवायचे सांगायचे, हसवायचे. त्यांच्यबरोबर चहा पिण्यातली मज्जा काही औरच.
दुर्दैवाने उतारवयात त्यांची आजाराने गिळायची क्षमता गेली आणि पोटाला फूड पाईप बसवला. आता ते हट्ट करत. जरासाच दे चहा, काही नाही होत.
घश्याने काहीही देणं त्यांना परवानगी न्हवती.
ते अगदी रडत, कधी न्हवे ते माझ्यावर रागवत.
मग मी भीतभीत त्यांना चहा द्यायची. मग सगळा गोंधळ व्हायचा ( श्वास लागणे वगैरे)
मी तर आईचा इतरा ओरडा खाल्ला ना त्या दिवसात. तुच दिलास ना चहा त्यांना??
त्यांच्याइतका चहाबाज मी तरी कोणी पाहिलाच नाही. अगदी कधीही, कितीही वेळा चहा हवा असलेला. एक कायम वीक पाँइट.
मी सध्या चहाच कमी केलाय.
ह्या लेखाने त्या आठवणींने रडवलस.
असो.
ऋ, धन्यवाद.
झंपी तुमची पोस्ट वाचून माझेही
झंपी तुमची पोस्ट वाचून माझेही डोळे पाणावले..
पण बाबांच्या चहाच्या वेडाला सलाम!
माझ्या चहाचा रंग अगदी बाबांच्या चहासारखा पाहिजे यावर मात्र हसायला आले आणि सेम पिंच झाले
इतर सर्व प्रतिसादांचे आभार.. बाकी उद्या लिहितो..
सर्व प्रतिसादांचे मनापासून
सर्व प्रतिसादांचे मनापासून आभार
पहिला 32 चहा किस्सा आधीही एके ठिकाणी लिहिला होता. त्यातलेच आकडे कॉपी पेस्ट केले. उगाच पुन्हा ती घटना आठवण्यात आकडे थोडेफार बदलले तर त्यावरून बवाल नको. कारण तो 32 आकडा सुद्धा दोनचार पुढे मागे असेलच. पण आकडा नाही तर किस्सा महत्वाचा
नवीन घरातील चहाचा किस्सा मी तेव्हाच ताजा ताजा फेसबुक वर टाकला होता. त्यामुळे तो सुद्धा जसाच्या तसा कॉपी-पेस्ट केला. त्यामुळे त्यातले डिटेल आठवावे न लागल्याने तंतोतंत खरे आहेत
चहाचा चटका बसत नाही हे चांगले कमी आणि वाईट जास्त आहे. म्हणजे घरी उकळता चहा मिळतोच. आईने चुकून आधी ओतला आणि मी अर्ध्या एक मिनिटाने काम आटोपून आलो तर ती मी न सांगताच लगेच पुन्हा गरम करून देते. म्हणून आई स्पेशल असते
पण बाहेर सगळीकडे उकळत्या चहाची खात्री नसते. ऑफिसमध्ये जागेवर आणून देतात ती तर मी कधी घेतच नाही. तरीही नशिबात कोमट चहा आलाच आणि पुन्हा गरम करायचा पर्याय नसेल तर नाईलाजाने मला अन्नाची माफी मागून ती ओतून द्यावी लागते. कोमट चहा मी नाही पिऊ शकत.
गोड चहा सुद्धा असेच विष वाटते. गोड दूध, लस्सी, खीर बाकी काही चालेल. पण गोड चहाचा एक घोट घेतला तरी पुन्हा अन्नाची माफी मागावी लागते.
कॉलेज काळातील चहाचे बरेच किस्से आहेत. ते देखील वेगवेगळ्या कॉलेजचे, ऑफिसचे, ग्रूपचे आहेत. हा लेख फेसबुकवर देखील टाकला आहे. तो वाचून मला काही मित्रांनी मेसेज केला की आपल्या अमुकतमुक चहाचा उल्लेख तू लेखात केलास नाही. त्यांना म्हटले बाबांनो मग ग्रंथ झाला असता आणि कोणीच वाचला नसता
अजून इतर प्रतिसाद वाचून जिथे जिथे सेम पिंच झाले त्यावर नंतर लिहितो...
मस्त लिहिलंयस, ऋ! लेख आवडला.
मस्त लिहिलंयस, ऋ! लेख आवडला. मी पण तुझ्यासारखीच चहाबाज. चहा इतका आवडतो की रिसेन्टली मी आणि माझ्या नवर्याने चहाचे चित्र असलेले टीशर्टस घेतले आहेत
हे पहा
बाकी ते हल्ली बाहेर कागदी कपात चहा देतात तो मात्र मला आवडत नाही. चहाच्या नावाखाली तोंडाला पानं पुसतात. चहा हवा तो ग्लासातलाच.
हे चहाचे टी शर्ट मस्त आहे रमड
हे चहाचे टी शर्ट मस्त आहे रमड
मलाही यातले दोन तीन प्रकारचे टी शर्ट घ्यावेसे वाटतात. एक चहावरचे तर दुसरे कोकणात जन्म घ्यायला भाग्य लागते आशयाचे, तसेच एखादे मी आळशी आहे आणि मला आराम करायला आवडतो हे दर्शविणारे... त्यातही चहा आणि आराम एकत्र आला तर क्या बात
चहा आणि आईच्या हाताची चकली हे
चहा आणि आईच्या हाताची चकली हे माझ्यासाठी स्वर्गसुख..
>>>>>
+७८६
माझ्या आईला आता जमत नाही म्हणून चकली करणे सोडले आहे पण तिच्या हातची चकली माझ्या मित्रांमध्ये सुद्धा फेमस होती. दिवाळीला सर्व प्रकारचा फराळ म्हणजे शेव, चकली, चिवडा, शंकरपाळी, करंजी आळीपाळीने तोंडात टाकत, आणि तोंडात त्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन होईल हे बघत, घोट घोट चहा पित राहणे हेच या सणाचे खरे सुख
थोडक्यात जेव्हा दिवाळीचे फराळ भाव खाऊन इतर खाद्यपदार्थांचे मार्केट डाऊन करत असतात तेव्हा देखील चहा आपले नाणे खणखणीत वाजवून फराळाचीच मजा दुप्पट करत असतो.
चहात बुडवून खायला चकली आणि
चहात बुडवून खायला चकली आणि शंकरपाळे बेस्ट लागतात. खारी, बटर, क्रीमरोल, टोस्ट, पोळी, थोड्या तुपावर/बटरवर भाजलेला ब्रेड हेही छान लागतात.
माझ्या एका दिराकडे आहे.
ऋन्मेष, 'कष्टटाळू' असं लिहिलेला टीशर्ट असतो
मस्तच झाला आहे चहा लेख. आधी
मस्तच झाला आहे चहा लेख. आधी बिलकुल चहा न पिणारी मी नोकरी सुरू झाल्यावर चहा प्यायला लागलें. कारण कॉम्प्युटर रूम मध्ये किंवा जनरल ऑफिस मधे चहा बसल्या जागी यायचा तशी कॉफी नाही मिळायची. आणि थंडगार रूम मध्ये काहीतरी गरम हे हवंच असायचं.
मग मात्र दिवसातून चार वेळा चहा सुरू झाला. आता तो बिनसाखरेचा प्यायला जातो. आणि आता साखर वाला घेतला तर फारच विचित्र चव लागते.
हो वावे, कष्टटाळू माहीत आहे
हो वावे, कष्टटाळू माहीत आहे
actually ऑनलाइन साईट वर चेक केले की तेच ते सगळीकडे दिसतात त्यामुळे अतिशय युनिक अतिशय आगळेवेगळे फॅक्टर त्यात राहात नाही असे वाटते. म्हणून मग घ्यायचा विचार टाळतो. आपल्या आवडीचे वाक्य आणि डिझाइन कस्टमाईज्ड करून मिळते का बघायला हवे..
तरी दोन्ही मुलांना घेतली आहेत यातली काही टीशर्ट
खूपच मस्त लिहीलेले आहे.
खूपच मस्त लिहीलेले आहे.
सीओईपीच्या बोटक्लबवर निवांत
सीओईपीच्या बोटक्लबवर निवांत बसून चहा पिण्याची मजा आणखीनच वेगळी. सोबत समोसा किंवा गुडडे. >> वावे, आप भी!! सहीच.
त्या बोटक्लब आणि चहाचा जुना ऋणानुबंध आहे. इतका की मी तिथे असताना यावर कॉलेजच्या मॅगझिनमध्ये लेख पण लिहिला होता.
मस्त लिहिले आहे ऋन्मेष!! चहा
मस्त लिहिले आहे ऋन्मेष!! चहा पिताना कंपनी महत्वाची ही मात्र खरे !! लेख वाचल्या वाचल्या मला रूपा ची आठवण झाली . तुमचे हे टीशर्ट गटग ला पाहिले होते.
खूप छान लेख लिहिलास ॠन्मेष!
खूप छान लेख लिहिलास ॠन्मेष! माझ्यासारख्या एका चहाबाजाला अगदी रिलेट होईल असाच आहे. सगळ्या छान आठवणी आहेत तुझ्या. पण खासकरून नवीन घर लावताना घडणारा रोमान्स असतो हा पहिला चहा बनवणे!
ओट्याशीच उभं राहायचं चहा पिताना, हा गाळला आणि भुरूक भुरूक करत दुसर्या मिनिटाला संपला.
वेळकाळ कोणतीही, बरं वाटत असेल नसेल, कोणी सोबत असेल तर उत्तम नसेल तरी उत्तम, पाऊस, थंडी, उन्हाळा तिन्ही ॠतूत बेस्ट असा आपला जिव्हाळ्याचा चहा! माझी भाची मला सायकोपॅथ म्हणते कारण मी भारतात अगदी भर उन्हाळ्यात गेले तरी पहिली चहाची फर्माईश करते. म्हटलं कोणत्याही कोल्ड्रींक ने जीवाला थंडावा मिळणार नाहीये, चहाच पाहिजे.
तुला जसा अगदी उकळता चहा लागतो, माझी आई अगदी तश्शीच आहे. पातेल्यातून डायरेक्ट तोंडात गाळला तरी म्हणेल अगं मधे जरा हवा लागली आणि गार झाला
चहामय जीवन आहे माझंही. परफेक्ट रंगाचाच चहा लागतो हे सगळ्या अट्टल चहाबाजांचं कॉमन लक्षण दिसतंय. उगा पांढरा फट्टक पडलेला, जास्त चहा पावडर घालू नये, काळा चहा पिऊ नये सांगणारी लोकं मला अजिबात आवडत नाहीत.
हल्ली अॅसिडीटीच्या त्रासामुळे चहाप्रेमाला मुकावं लागणार की काय असं वाटत असताना एका तज्ञाचा विडीओ पाहिला ज्यात त्याने अर्ध दुध, अर्ध पाणी एकत्र उकळून मग चहा पावडर वगैरे असं करून प्यायलेल्या चहाने अॅसिडीटी होत नाही सांगितलं आणि एवढा आनंद झाला.
असो, खूप मस्त विषय ! मन एकदम तरतरीत झाले.
अर्ध दुध, अर्ध पाणी फंडा चहात
अर्ध दुध, अर्ध पाणी फंडा चहात कसे काम करतो माहीत नाही पण ऍसिडिटी वरच उपाय म्हणून मी अर्धा कप थंड दूध आणि अर्धा कप साधे पाणी मिसळून पितो. लगेच छान वाटते. फरक जाणवतो.
..
नवीन घर लावताना घडणारा रोमान्स असतो हा पहिला चहा बनवणे!
>>>>
अगदी..
तसेच नवीन घराचे इंटेरियर काम करताना तिथे दोघांनीच जाणे आणि पांढरी झालेली फारशी पुसून तिथे फतकल मारून बसणे. मग सोबत घेऊन आलेल्या वडापाववर ताव मारत पुढच्या कामाची प्लॅनिंग करणे हा देखील छान रोमँटिक अनुभव असतो. पुढच्यावेळी येऊ तेव्हा चहा बनवायला एक छोटी शेगडी आणून ठेवू अशी त्यावेळी केलेली प्लॅनिंग सुद्धा चाय के साथ रोमान्सचाच एक भाग असतो
Pages