काश्मीर सफरनामा - चष्मेशाही, परिमहल, बुर्झाहोम, हजरतबल आणि निगीन सरोवर

Submitted by pratidnya on 19 September, 2025 - 06:44

भाग पहिला: https://www.maayboli.com/node/87035
भाग दुसरा: https://www.maayboli.com/node/87043
भाग तिसरा: https://www.maayboli.com/node/87056
भाग चौथा: https://www.maayboli.com/node/87065
भाग पाचवा: https://www.maayboli.com/node/87106
भाग सहावा: https://www.maayboli.com/node/87196

आज कॉन्फरन्सचा शेवटचा दिवस होता. प्रसादला पेपर सादर करायचा होता म्हणून आज अर्धा दिवस आम्ही उरलेले लोक राहिलेले मुघल गार्डन्स पाहून घेणार होतो. रात्रीचा मुक्काम हाऊसबोटीत होता म्हणून सामान आवरून ठेवलं होतं. नाश्ता झाल्यावर ते गाडीत टाकलं आणि चष्मेशाही उद्यानाकडे निघालो.

श्रीनगरपासून चष्मेशाही ९ किलोमीटर अंतरावर एका टेकडीच्या पायथ्याशी दल सरोवराजवळ आहे. उद्यानात शिरतानाच ' हँगिंग गार्डन' सारखे उंचावर लावलेले बगीचे लक्ष वेधून घेतात. येथील झऱ्यांच्या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत असा स्थानिकांचा विश्वास आहे. इथले पाणी नेहरूंसाठी विमानाने दिल्लीला नेले जात असे, असेही सांगितले जाते. शाहजहानच्या आज्ञेवरून १६४२ मध्ये त्याचा सरदार अली मर्दन खान याने हे उद्यान उभारले असे म्हणतात.
20250412-IMG_0090.jpg चष्मेशाही उद्यान

इथून परिमहलकडे जाताना रस्त्यात भयानक ट्राफिक होते. ट्युलिपच्या हंगामात काश्मीर पर्यटकांनी ओसंडून वाहते. बशीरने गाडी दुसऱ्या बाजूने बाहेर काढली. हा रस्ता कुठल्यातरी सरकारी संस्थेच्या बाजूने जात होता आणि तिथे एक्सरे स्कॅनिंग मशिनमधून पर्यटकांच्या गाडीतल्या सामानाची तपासणी चालली होती. नेमकं आज सगळं सामान गाडीत होतं. आमच्याबरोबर अजून काही पर्यटकांच्या गाड्या थांबल्या होत्या. मी एकटीने सर्व सामान तपासणीसाठी नेलं असतं पण खूप वेळ लागला असता. बशीर लगेच गाडीतून उतरला, त्याने सासूबाई आणि मावशीला गाडीतच थांबायला सांगितलं. मला म्हणाला, " में सामान मशीन मे डाल दूंगा. आप दुसरी साईडसे उठा लेना." बशीरमुळे ते चेकिंग लवकर आटोपलं. मला एकटीला करायला खूप धावपळ झाली असती.

चष्मेशाही उद्यानाच्या जवळच सुमारे दीड किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर परिमहल आहे. फार पूर्वी म्हणे इथे एक बौद्ध मठ होता. शाहजहानचा थोरला मुलगा शिकोह याने या मठाचे रूपांतर एका शैक्षणिक संस्थेत केले. इथे सुफी तत्वज्ञानाची शाळा, ज्योतिषी केंद्र, खगोलशास्त्र अभ्यास केंद्र व वेधशाळा सुरु केली होती. या ठिकाणी इमारतींचे जुने अवशेष पाहायला मिळतात. मी ऐकलं होतं की परिमहलच्या पायथ्याशी कुठेतरी सम्राट अशोकाच्या काळातला एक जुना अवशेष आहे. मी शोधायचा प्रयत्न केला पण मला कुठेही तसा माहितीचा फलक वगैरे दिसला नाही.
20250412-IMG_0109.jpg परीमहल बाग

20250412-IMG_0119.jpg इमारतीचे जुने अवशेष

20250412-IMG_0124.jpg ......

20250412-IMG_0130.jpg ......

दोन्ही बागा अगदी आरामात फिरून झाल्या, तोपर्यंत दुपार झाली होती. प्रसादचे पेपर प्रेझेंटेशन आटोपले होते. श्रीनगरच्या ट्रॅफिकमधून वाट काढत काढत तोही कसाबसा परिमहलपर्यंत पोहोचला. दोन दिवस ढाब्यांमध्ये गर्दीत जेवल्यामुळे यावेळी बशीरला म्हटलं आता जरा चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन चल. तो आम्हाला एका उच्चभ्रू परिसरातल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. या भागात अगदी राजवाडे भासावे एवढे प्रशस्त बंगले होते.

जेवण झाल्यावर आम्ही बुर्झाहोमकडे निघालो. श्रीनगरच्या वायव्येला १६ किलोमीटर अंतरावर बुर्झाहोम हे एक पुरातत्वीय उत्खनन स्थळ आहे. १९३० च्या दरम्यान इथे उत्खनन केल्यावर खूपच महत्वाच्या गोष्टी हाती लागल्या. या ठिकाणचे ऐतिहासिक महत्व असे आहे की काश्मीर खोऱ्यातील मानवाचा पहिला रहिवास इथे सुरु झाला. इथल्या उत्खननात त्या मानवांच्या राहण्याच्या गुहा, दफनविधी केल्यावरचे खड्डे, हाडे, मातीची भांडी आढळले आहे. इथल्या बऱ्याच वस्तू या आता संग्रहालयात हलवल्या आहेत.
WhatsApp Image 2025-09-19 at 3.16.47 PM.jpeg

ही एकच गुहा तिथे दिसत होती. पण ती चारही बाजूने बंद केली होती. त्यामुळे इथे नीट काही पाहता आले नाही. प्रतापसिंह वस्तुसंग्रहालयात या गुहेचे मॉडेल पाहिले होते त्यामुळे प्रत्यक्षात हे ठिकाण पाहायची खूप इच्छा होती. पण इथे माहितीचा फलक वगैरे काहीही नव्हते. तिथे असणाऱ्या माणसाला विचारलं तर त्यानेही काही सांगितलं नाही. हे इथे असलेले स्टोनहेंज पहा, एवढंच बोलून तो निघून गेला.
WhatsApp Image 2025-09-19 at 3.16.51 PM.jpeg बुर्झाहोम स्टोनहेंज

WhatsApp Image 2025-09-19 at 3.53.32 PM_0.jpeg वाटेत दिसलेला गुराखी

हाऊसबोटीत जायच्या आधी आम्हाला हरी पर्वतावरचा किल्ला पाहायचा होता पण अचानक कळलं की तो आज बंद आहे. मग बशीरला गाडी हजरतबल दर्ग्याकडे न्यायला सांगितली. तेवढ्यात यासिनचा फोन आला. उद्या पहलगामला निघायचं होतं, त्यासंबंधी बोलून झाल्यावर त्याने हजरतबलच्या जवळ असणाऱ्या मूनलाईट बेकरीमधून वॉलनट फज आठवणीने घ्यायला सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही ते घेतलं आणि खरंच काय चव होती त्याची!

हजरतबलची मशीद शाहजहानने बांधली आहे. याचे विशेष महत्त्व असे की इथे मुस्लिम धर्मसंस्थापक मोहंमद पैगंबर यांचा एक केस जपून ठेवला आहे. पैगंबरांच्या जन्मदिनी व इतर विशेष प्रसंगी तो केस भाविकांना दर्शनासाठी प्रदर्शित केला जातो. त्यावेळेस मुस्लिम भाविकांची इथे गर्दी उसळते. २७ डिसेंबर १९६३ ला काश्मीर हादरवून टाकणारी घटना घडली. मशिदीतील पवित्र केस गायब झाल्याचे आढळले आणि काश्मीरमध्ये दंगलीचा आगडोंब उसळला. सुदैवाने तो केस परत सापडला आणि मग सारे शांत झाले. आम्ही गेलो होतो तेव्हा हजरतबल दर्ग्याच्या आजूबाजूला आपल्या मंदिरांकडे असते तशीच गर्दी होती. चपला, बूट काढून आत गेलो. इथेही डोकं झाकून घ्यायचं होतं आणि आतल्या भागात स्त्रियांना प्रवेश नव्हता. थोडा वेळ बाहेरच्या गालिच्यावर बसून सर्वजण बाहेर आलो.
WhatsApp Image 2025-09-19 at 3.17.15 PM.jpeg हजरतबल मशीद

इथून पुढे गाडी निगीन सरोवराकडे वळवली. आम्ही गोल्डन फ्लॉवर हाऊसबोटीत राहणार होतो. दलपेक्षा निगीन अधिक शांत आणि रम्य आहे म्हणून आम्ही तिथे राहायचे ठरवले होते. हाऊसबोटीच्या मालकाला फोन केला, त्याने सरोवराच्या गेटजवळ यायला सांगितले. आम्ही तिथे पोहोचलो तर शिकारेवाला आमची वाट पाहत होता. सर्व सामान शिकाऱ्यात भरून आम्ही हाऊसबोटीकडे निघालो. एकास एक लागून डुनु कुटूंबियांच्या तीन हाऊसबोटी होत्या. त्यांना हाऊसबोटींच्या व्यवसायात शंभरपेक्षा जास्त वर्षे झाली आहेत.

20250413-DSC_8557.jpg निगीन सरोवर

20250413-DSC_8547.jpg .......

गौहर नावाचा तरुण इथली सर्व व्यवस्था सांभाळत होता. आम्ही रूम्समध्ये सामान वगैरे ठेवून बाहेर येईपर्यंत प्रसादने गौहरशी गप्पा मारायला सुरुवात केली होती. इथलं काम सांभाळून गौहर काश्मीरच्या विविध भागात ट्रेक्सचे आयोजनही करतो. तो कामानिमित्त गोव्यात राहून गेला होता. एकंदरीत हे लोक भारताच्या दुसऱ्या भागात कायमस्वरूपी वास्तव्य करत नाहीत असं वाटलं. शांभवी लगेच गौहरबरोबर खेळायला लागली. तिने त्याचं 'गोलल' असं बारसं करून टाकलं. तो दिसला नाही की लगेच त्याला 'गोलल गोलल' अशा हाका मारत सुटायची. सासूबाई आणि मावशी दोघीही इथला थाट पाहून खुश झाल्या. आमच्या रूमच्या खिडकीमधून निळ्या पाकोळ्या आत बाहेर उडत होत्या. सकाळ झाली की बाहेर स्थलांतरित बदकंही पोहोताना दिसतील असं गौहर म्हणाला.

20250413-DSC_8609.jpg हाऊसबोटीचा सज्जा

20250413-DSC_8630.jpg .....

20250413-DSC_8632.jpg ......

20250413-IMG_0133.jpg .......

सरोवराच्या अगदी आत राहिलात तरी विक्रेते काही तुमची पाठ सोडत नाहीत. निशात बागेत जसे काश्मिरी ड्रेसवर फोटो काढून घेतले तसे इथे शिकाऱ्यात बसून फोटो काढून देणारे येतात. गौहरने एका फोटोग्राफर काकांना बोलावले होते. मला वाटलं की सासूबाई म्हणतील बागेत काढले ना फोटो! आता पुन्हा कशाला? पण त्या तर भयानक उत्साही. जीवाचं काश्मीर करायचं त्यांनी ठरवलं होतं. लगेच तयार झाल्या आणि मलाही फोटो काढायला त्यांनी शिकाऱ्यात ढकललं. हे काका पण मस्तच होते. बंगलोरला फोटोग्राफी शिकले होते आणि त्यांनी काढलेले आमचे फोटो निशात बागेत काढलेल्या फोटोंपेक्षा कितीतरी भारी आलेत. फोटो काढता काढता छान गप्पा मारत होते. त्यांच्याकडचे ड्रेसही खूप जास्त सुंदर होते. "आता इथल्या स्त्रिया घालतात का असे कपडे?" असं विचारल्यावर आपल्याकडचे एखादे काका आजोबा म्हणतात ना आमच्या आईचा पदर कधी डोक्यावरून खाली घसरला नाही तशाच टोनमध्ये काका सांगू लागले," मेरी दादी पेहनती थी ऐसे कपडे और गेहने. आजकालकी लडकीया उन्हे तो बस जीन्स पेहनना अच्छा लगता हैं." फोटोसेशन आटपल्यावर प्रसाद आणि मी काकांसोबत हाऊसबोटीच्या पायऱ्यांवर बसून मस्त गप्पा मारत बसलो. गप्पांच्या नादात लक्ष नव्हतं मग अचानक मागे पाहिलं तर काकांचा शिकारा एकटाच सफारीला निघाला होता. काका ओरडले आणि गौहर एक लांब काठी घेऊन आला. काठीने शिकारा जवळ ओढून काका शिकाऱ्यात बसून आम्हाला टाटा करून निघाले. तो गेल्यावर गौहर म्हणाला की आता सगळ्यांकडे कॅमेरा असल्याने यांना रोज काम मिळेलच असं नसतं. पहिल्यापेक्षा त्यांचं उत्पन्न बरंच कमी झालं आहे.
नंतर एक फुलांच्या बिया विकणारा शिकारेवाला आला. त्याच्याकडून मी काही कंद घेतले. ते कंद घरी परत आल्यावर मी कुंडीत लावले तर तीन महिने तसेच होते. आताच त्याला हिरवी पालवी फुटली आहे. कुठली फुलं येतात त्याची वाट पाहायची.

20250413-DSC_8617.jpg ......

संध्याकाळ झाल्यावर एक जयपूरचं नवविवाहित जोडपं आमच्या हाऊसबोटीत राहायला आलं. बरे होते लोक तसे. पण आल्यापासून सारखी तक्रार तक्रार करत होते. फिरायला शिकारा असाच हवा तसाच हवा. पूर्ण संध्याकाळ ते रात्र त्या जोडप्यातली मुलगी त्यांच्या टूर कंपनीला कॉल करून ड्रायव्हरची तक्रार करत होती. ज्यावेळी तक्रार करत नसत तेव्हा तारक मेहता का उलटा चष्माचे एपिसोड मोठ्या आवाजात मोबाईलवर पाहत असत.

रात्री थंडी फार वाढली होती. हाऊसबोटीच्या सज्ज्यात बसून निगीन सरोवराचा रात्रीचा नजारा काही औरच दिसत होता. कपडे, दागिने आणि कागदी लगद्यापासून तयार केलेल्या वस्तू घेऊन अजून काही विक्रेते बोटीवर आले. नातेवाईकांना द्यायला आम्ही काही भेटवस्तू घेतल्या. गौहरने तयार केलेले अप्रतिम जेवण जेवलो. हाऊसबोटीवर अजून एक दिवस मुक्काम वाढवायला हवा होता असं वाटत होतं.

20250413-DSC_8640.jpg निगिनची नाईटलाईफ

20250413-DSC_8675.jpg .....

20250413-DSC_8687.jpg......

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह काश्मिरी लेक चे फोटो अप्रतिम...
मधले काही भाग वाचले नाहीत.. चेक करतो आता.. लिहित राहा

निगीनमधले फोटो अप्रतिम आलेत. हाऊसबोटही छान आहे.
आम्हालाही अजून एक दिवस निगीनमध्ये हवा होता असं वाटलं.

आमचं बरंच काही pending आहे काश्मिरमध्ये. परत जाणार.