संकेत

Submitted by शेखर काळे on 7 September, 2025 - 02:41

सुकेतूचा हात मध्येच थांबला. त्याच्या स्क्रीनवर उजवीकडे खाली कोपऱ्या एक निळा गोलाकार ठिपका हळूहळू रंग बदलत होता. निळा रंगाचा ठिपका हळूहळू लाल होत होता सुके तुझे डोळे मोठे झाले. त्याने आपल्या माऊसचा फोकस त्या लाल होणाऱ्या ठिपक्यावर केला. त्याबरोबर एक विंडो उघडली.
त्या विंडोत वाक्य होते - मित्र संख्या २८ , वेळ उद्या सकाळी पहिली घटिका. सुकेतूने भराभर विंडो मधल्या इतर ओळी वाचायला सुरुवात केली. त्याचा श्वास वाढू लागला. त्याने कपाळावरचा घाम पुसला आणि म्हणाला, “ अरे या प्रोजेक्टची वेळ झालेली आहे”.
बाजूलाच अंबुज बसला होता. तो म्हणाला, “ कसली वेळ? हे कुठलं प्रोजेक्ट ?”.
सुकेतू म्हणाला, “ आपल्या चक्रपाणिंचे स्पेशल प्रोजेक्ट, त्यांनी जवळजवळ 55 पृथ्वी वर्षा पासून हे प्रोजेक्ट सुरू केले होते. त्यांनी मला या प्रोजेक्टवर जातीने लक्ष घालायला सांगितलेले होते. जवळजवळ १६ वर्षांपूर्वी, त्यांनी मला ताकीद देऊन सांगितले होते की या ठिपक्याकडे लक्ष ठेव. या निळ्या टपकाचा रंग लाल झाला की मला ताबडतोब संदेश पाठव.” सुकेतुने संदेश यंत्राकडे हात पुढे केला. अंबुज म्हणाला, “ अरे थांब थांब .. आता कुठे संदेश पाठवतोस? यावेळी तर त्यांना देवी ही डिस्टर्ब करू शकत नाहीत”.
सुकेतुने थोडा विचार केला आणि म्हणाला, “ नाही, मी आत्ता हा संदेश पाठवणारच. कारण त्यांनी मला सांगून ठेवले आहे - काहीही झाले तरी ठिपका रंग बदलायला लागल्याबरोबर मला ताबडतोब संदेश पाठवायचा. यात काही चूक झाली तरी मला इथून काढून दुसऱ्या लोकात पाठवतील. नको रे बाबा, मी संदेश आत्ताच पाठवणार”.
त्याने संदेश यंत्राचे बटन दाबले - “ चक्रपाणींना संदेश - तुम्ही म्हटल्याप्रमाणे रंग बदलल्यावर मी ताबडतोब संदेश पाठवत आहे. ठिपक्याचा रंग निळा पासून लाल होत आहे.”
सुकेतू आपल्या कामात गढून गेला. त्याला इतरांवर हे लक्षात ठेवायचे होते. काही मॉडेल्स पुन्हा ट्यून करायचं होते. काही पुढे पाठवायचे होते. त्याचे काम सुरू होते, तेवढ्यात मागून आवाज आला - “ कल्याणमस्तु सुकेतू. छान काम केलेस”. सुकेतुने मागे वळून पाहिले. चक्रपाणि विष्णू कधी त्याच्या मागे येऊन अवतीर्ण झाले ते त्याला कळले की नव्हते.
“ बघू मला काय झाले माझ्या शिव ठिपक्याचे ?”
“ कधीचा मुहूर्त आहे सकाळी प्रथम घटीका ? छान छान … बाकी सगळी प्रोजेक्टस् तू अंबुजला दे. मला वेळेच्या दोन घटका आधी सगळी तयारी हवी आहे”
“ देवीला सांगायला हवं”, विष्णू अंतर्धान पावले होते.
….
“ देवी वेळ झालेली आहे … उद्या सकाळी पहिली घटिका”.
“ काय सांगता? मला त्या सगळ्यांना बघायला मिळेल? “ - देवी.
“ फक्त बघायचं बाकी काहीही करायचं नाही”, विष्णू हसत म्हणाले.
“ हा प्रोजेक्ट मी गेल्या तीनशे नऊ पृथ्वीवरच्या पासून सुरू केलेला आहे. या टेकडीवर मी तेव्हा एक आपलं संयंत्र, आणि मॉडेल सक्रिय करून आलेलो होतो. मध्ये किती अडथळे आलेत, किती वळण आलीत आणि आता ही उद्याची वेळ आली आहे. यासाठी मी कित्येक पिढ्यांच्या जनुका थोडा थोडा बदल करत आलेलो आहे. त्यात हे संकेत टाकलेले आहेत आणि या सगळ्यांचे फलित उद्या सकाळी दिसणार आहे. उद्या या प्रदेशात एका नव्या युगाची सुरुवात होईल. उद्याचा हा प्रसंग लाखो करोडो लोकांच्या मनात, येणाऱ्या अनेक युगांपर्यंत कोरला जाईल.
कित्येक लोकांच्या जनुकात या संकेतासाठी वाट बघण्याची आज्ञावली पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेली आहे. या एका ट्रिगरमुळे एका संकेतामुळे अनेक लोकांच्या मेंदूत ही आज्ञावली सुरु होईल - त्यांचे मेंदू हा संकेत ग्रहण करायला तयार होतील आणि हे कार्य पुढे जाईल. या एका संकेतासाठी किती पिढ्या जगल्या, किती लोक मेले, पण आता या क्षणापासून कित्येक लोकांचे जीवन वेगळ्या दिशेने वाटचाल करायला लागेल. तेव्हा देवी तयार व्हा”.
—----
सुकेतुने आसन पुढे आणले. संगणक जोडून, प्रोग्राम सुरू केला.
“ सगळी तयारी झाली आहे देवाधिदेवा” - सुकेतू.
“ नीट काळजी घेतली आहेस ना? या प्रोग्राम मध्ये डिफेक्ट नको. पुढच्या कित्येक पिढ्यांचे, कोट्यवधी लोकांचे भविष्य या मुहूर्तावर अवलंबून आहे.” - विष्णू
“ नाही देवा. मी सगळे मॉडेल्स चेक केले आहेत. सगळे सिम्युलेशन्स चालवून पाहिले आहेत. रिकवरी पण घातली आहे. तुमच्या आदेशाची वाट आहे.”
“ त्या संयंत्रावर काही द्रवाचे थेंब पडतात तो सक्रिय होईल आणि जनुकांना संकेत मिळणे सुरु होईल.” - विष्णू
“ देवाधिदेवा, देवी …. “, सुकेतुने मॉनिटरकडे लक्ष वेधले. जवळजवळ २८ -३० ठिपके टेकडी चढत होते.
सगळे श्वास रोधून बघत होते.
“ देवा .. ! आता कसे? इथे द्रवाचे आवश्यकता आहे … “, सुकेतू चिंतीत होऊन म्हणाला.
“ काळजी करू नकोस … काहीतरी मार्ग निघेलच. सिम्युलेशन काय दाखवते आहे? “ - विष्णू.
“ देवा, हा व्हेरिएबल मी घातलाच नव्हता .. “ - सुकेतू.
“ बघा देवा तुम्ही केलेल्या कार्याचे फळ, ‘ त्या’ ने मार्ग शोधून काढलाच. आणि का काढणार नाही? महादेवाचा अंश आहे तो” - देवी
सर्वांनी एकच जल्लोष केला ..
—------------
त्याच वेळी, तरुण शिवाजीराजे भोसले, आपल्या कट्यारीने करंगळी चिरून, रक्ताची धार रायरेश्वराच्या शिवलिंगावर धरत होते.

Group content visibility: 
Use group defaults

निळा रंगाचा ठिपका हळूहळू लाल होत होता सुके तुझे डोळे मोठे झाले. >> हे वाक्य असे हवे होते, निळा रंगाचा ठिपका हळूहळू लाल होत होता, सुकेतूचे डोळे मोठे झाले.