पाककृती स्पर्धा ३- अननसाचा गोज्जू - कविन

Submitted by कविन on 5 September, 2025 - 14:28

अननसाचा आमटी सदृश्य वापर आपल्याला अजिबात नवीन नाही. पाठारे प्रभूंचे अननसाचे सांबार असो अथवा कोकणी/ गोवन लोकांचे सासव असो किंवा असो कर्नाटक प्रांताची खासियत असलेला गोज्जू नावाचा पदार्थ, अननसाच्या आंबट गोडपणाला सौम्य मसाल्यांची जोड दऊन बनणारा हा पदार्थ त्या त्या ठिकाणी थोडेफार बदल होत केला जात असला आणि प्रत्येक ठिकाणचा त्याला खास टच असला तरी त्यातले समान सूत्र हे "आंबट गोड तिखट' या तीन चवींचा समतोल साधणे हेच आहे.

मी आज केलाय तो कर्नाटक स्टाईल अननसाचा गोज्जू. ज्याला मेनस्काई/मेनास्काई असेही नाव मी नेटवर वाचलेय.

मी पहिल्यांदा याची रेसिपी मायबोलीकर मितानने एका फेसबुक गृपवर लिहिली होती तिथे वाचली होती. इंटरेस्टिंग वाटली आणि मुख्य म्हणजे मला जमू शकेल इतकी सोपी सुटसुटीत रेसिपी वाटली. मग त्या पदार्था बद्दल अजून माहिती शोधत असताना इतर प्रांतातल्या याच्या आत्ते मामे भावंड रेसिपी वाचायला मिळाल्या. "मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा' हे गाणे बहुतेक रेसिपी फॉलो करताना अंगात भिनले असावे म्हणून किंवा "दहा रेस्प्या बघशील पण करशील आपल्याच मनाचे" या घरच्या आहेराची लाज राखणे शास्त्र असते म्हणून असेल मी बेसिक रेसिपी मितानची घेऊन त्यात या इतर प्रांतातल्या रेसिपींमधल एखाद जे आवडल आणि ॲड केले तरी चव कमअस्सल होणार नाही वाटले ते बदल बेधडक करुन घरात "ये ऐसेईच बनती है" म्हणत पेश केले. आणि काय सांगू राव तुम्हाला, घरात हिट्ट झाली एकदम ही रेसिपी. तेव्हापासून जशा ॲडीशन घेतल्या तशाच दरवेळी न चुकता घ्यावा लागतात आता Lol

घडाभर तेल संपवून झाले आहे आता पटकन रेसिपी लिहीते Wink

साहित्य - अननसाच्या फोडी, हळद, तिखट, हिंग, मीठ, गूळ (optional), मोहरी, कढीलिंब, नारळ दूध आणि गोज्जू मसाला

गोज्जू मसाला - चणा डाळ आणि उडीद डाळ प्रत्येकी १ मोठा चमचा, मेथी दाणे पाव ते अर्धा चमचा, अर्धा वाटी सुके खोबरे कीस / कोकोनट पावडर (भुरा), कढीलिंब, १ चमचा धणे/धणेपूड

IMG_20250905_235131.jpgकृती:
१)प्रथम गोज्जू मसाला करुन घ्या. त्यासाठी मसाल्याचे जिन्नस कोरडे भाजून घ्या आणि गार झाल्यावर पाणी न घालता कोरडी पूड करा.
२) कढईत फोडणीसाठी तेल घ्या. नारळ तेल वापरलेत तर उत्तम. ते नसेल तर नेहमी जे वापरता तेच तेल वापरा. तेल तापले की मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा त्यात अननसाच्या फोडी परता. त्यातच लाल तिखट, गोज्जू मसाला आणि मीठ घालून अगदी थोडावेळ परतून मग पाणी घालून झाकण ठेवून शिजू द्या
३) अननस शिजला की थोडा गूळ घाला. गूळ घालण्यापुर्वी गोज्जूच्या रसाची चव बघा. अननसाच्या गोडीवर गूळ घालायचा तर किती हे ठरवा. एक उकळी काढा
४) नारळ दूध घालून अगदी एखाद मिनिट ढवळून गॅस बंद करा

झाले आपले गोज्जू तयार. कृती ४ स्टेप्स इतकी छोटी आहे म्हणून तर नमनालाही तेल घातलेय मी Lol

IMG_20250905_235114.jpgIMG_20250905_235050.jpg

मी काढलेल्या फोटोवर जाऊ नका. असते एखाद्याचे स्कील फोटोजेनीक देखण्या पदार्थालाही नॉन फोटोजेनीक करायचे. चव मात्र बोटं चाटत रहाल अशी आहे. खात्री पटत नसेल तर शेवट वाचा Wink

नेहमीप्रमाणे व्हेरिएशन देना तो बनता है म्हणून देतेय:

१) नारळ दूध रेडीमेड वापरलेत तरी चालेल. मी आज डाबरचे वापरलेय
२) हा गोज्जू मसाला कोरडा असल्याने जास्त करुन स्टोअर करता येतो. मी एक दोन वेळचा एक्स्ट्रा करुन ठेवते. तो इतर वेळी उसळींना/ रस भाज्यांना दाटपणा यायला वापरता येतो
३) अननसा ऐवजी सफरचंदाचेही चांगले लागेल असे मितानच्या पोस्टमधे वाचले होते. फक्त फळं आंबट नसतील त्यावेळी चिंचेचा कोळ वापरावा लागेल म्हणजे ती आंबट गोड तिखट चवीचा समतोल साधल जाईल.
५) मितानच्या मूळ रेसिपीत नारळ दूध नव्हते आणि गोज्जू मसाल्यात कढीलिंब नव्हता
६) नेटवर वाचले की जास्तीचा मसाला न करता लगेच संपवणार असाल तर ओला मसालाही चालेल - सुक्या खोबऱ्या ऐवजी ओला नारळ भाजून किंवा तसाच वाटून वगैरे केलेला ओला मसाला - बाकी डाळी वगैरे सेमच. एवीतेवी नारळ दुधाने क्रिमीनेस येणारच आहे म्हणून मी ओला नारळ भाजून वगैरे वापरला नाहीये.

चला तर मग ही पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी समाप्त म्हणते आणि लेकीने आज गोज्जूच पातेल चाटून पुटून बाजूला ठेवलय ते चुकून तिचा बाबा घासलय समजून मांडणीत ठेवायच्या आधी जाऊन घासून येते Wink

धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रेसिपी! मला पिझावर, सॅलड मधे सुद्धा आवडते अननस, मुलं हसतात मला त्यावरून. पण आता ही भाजी पण करुन बघावी वाटत आहे! सोबत पनीर/ चिकन असे काहीतरी प्रोटीन घालेन असा विचार करते आहे.

मस्त रेसिपी! मला पिझावर, सॅलड मधे सुद्धा आवडते अननस, मुलं हसतात मला त्यावरून. पण आता ही भाजी पण करुन बघावी वाटत आहे! सोबत पनीर/ चिकन असे काहीतरी प्रोटीन घालेन असा विचार करते आहे.

सोबत पनीर/ चिकन असे काहीतरी प्रोटीन घालेन असा विचार करते आहे.>> मला सांग हे घालून कसे लागतेय, मी पण ट्राय करेन. प्रॉन्स चांगले लागतील असे वाटतेय मला

हे भारी आहे. तो मसाला घालून आंबट गोड मस्त भाजी होईल.

लिहिलेही भन्नाट. आमच्या घरी पण मला असेच म्हटले जाते. आज केलेली रेसीपी उद्या सांगता येणार नाही Lol

धन्यवाद मैत्रेयी, धनि आणि सामो

धनि, सामो नक्की करुन बघा आणि सांगा आवडतेय का

आज केलेली रेसीपी उद्या सांगता येणार नाही Lol>>:D आपण युनिक कॅटेगरीतलेच रे. तसही, "ब्रह्मदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडे वेगळे असते. आंब्याचे एक पान नसते दुसऱ्या सारखे" तिथे रेसिपीची गोष्ट काय घेऊन बसलास Wink