( सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा ! या सणासुदीच्या दिवसात एव्हढे चांगले उपक्रम असताना कथा प्रकाशित करण्याची आगळिक घडली आहे याबद्दल क्षमा असावी. मजबुरी है ! काही गडबड नाही, आधी सण होऊन जाऊ द्या. मग निवांत वाचायला घ्या . )
१
सणासुदीला किंवा कोणत्याही सुटीला आजीकडे ( आईच्या आईकडे) जायचं म्हणजे आम्हा सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असायचा.
आजोळी मुलीच्या मुलांचे थोडं जास्तच कोडकौतुक होत असतं, नाही का ?
आजीची तर गोष्टच निराळी. तिच्याकडे आईच्या तक्रारी करता येतात आणि तरीही आई रागवत नाही. आईपेक्षा थोडं जास्तच लाडात येता येतं. एकदम स्पेशल असल्यासारखी ट्रीटमेंट मिळत असल्याने आजोळी एकदम कलेक्टर असल्यासारखं वाटत असतं.
आणि आजीला तर काय करू आणि काय नको असं झालेलं असतं !
बरं उत्साह इतका दांडगा कि तिने कधीही आमच्या चुलत भावंडांच्यात आणि आमच्यात दुजाभाव केला नाही. आम्ही सगळे सख्ख्या भाऊ बहीणीसारखेच होतो. एकत्र वाढल्याने चुलत वगैरे काय असतं हे माहितीच नव्हतं.
ते कळतं ते बाहेरच्यांकडून. आमच्या आजोबांनी म्हणजे वडलांच्या वडलांनी माझ्या वडलांना बाबा, धाकट्या काकांना अण्णा आणि पप्पा म्हणायला शिकवलं होती. तर माझ्या आईला आई आणि दोही काकूंना माई आणि मम्मा म्हणायला लावलं होतं. आजूबाजूच्या कुटुंबात एकाच वेळी त्याबद्दल कौतुकही व्हायचं तर काही जण हसंही करत. पण आम्हाला त्याचं सोयरसुतक नसायचं. घरातच एव्हढी माणसं असल्याने बाहेरच्यांची तशी गरजच पडायची नाही.
आजोळी अजून मोठा गोतावळा असायचा.
माझ्या चुलतभावंडांना सुद्धा माझ्या आजोळी यायला आवडायचं. त्याचं कारण म्हणजे कुठल्याही सणाला आजी बनवत असलेल्या किंवा विकत आणत असलेल्या बंगाली मिठाया. दिवाळीला ती आपला मराठी फराळ ती बनवायचीच पण अनेक जिन्नस खास बंगाली बनवायची. तिला उरक एव्हढा असायचा कि हे सगळं खायला घालून संपलं कि पुन्हा बनवायला बसायची. नातवांना खायला घालण्यात तिला कोण आनंद मिळायचा.
या वयातही ती एव्हढी सुंदर दिसायची कि बस्सं. व्यक्तिमत्वही प्रसन्न असल्याने मुलं तिच्याभोवतीच असत.
मामा मंडळी फारशी घरात नसायची. पण आले कि मग आजी त्यांना कांमाला लावायची. गावात फेरफटका, नदीत पोहणं आणि तालुक्याला जाऊन तरकारी किराणा घेऊन येता येता आमच्यासाठी जी फळं असतील ती विकत घेऊन शेतातून ऊस, काकडी तोडून आणायचा कार्यक्रम व्हायचा.
सकाळी सकाळी मावशी उठवायची आणि शेळीचं धारोष्ण दूध प्यायला लावायची. ते कडू दूध , ते ही न तापवता, न साखर घालता पिववत नसे. मग मोठा मामा ओरडायचा.
" या शहरी पोरांना ना, चांगलं काय असतं, काय खायचं याची माहितीच नाही"
तो आरडा ओरडा झाला कि आजी बाहेर यायची. ती आम्हाला कधीच ओरडायची नाही.
ती रागवायची ती आमच्या आईला, म्हणजे तिच्या लेकीला..
"काय गं, पोरं लहान आहेत, तुला नव्हतं कळत का ? लक्ष नाही द्यायचं का लेकरांना आपण काय खायला घालतो, काय नाही त्याचं "
आई मग एकदम काकुळतीला येऊन स्पष्टीकरणं द्यायची " अग आई ! तू मलाच कशी बोलतेस गं ? तुला काय वाटतं मी यांना देत नाही ? अगं ही पोरं अजिबात कशाला तोंड लावतील ना तर शपथ "
आणि इकडे आम्हीते दूध आजी आल्यावर पिऊन टाकलेलं अस्सायचं.
त्यावर आजी लगेच बोलायची "बघ बरं आता कसं पिलेत ते ? तुलाच बरं जमत नाही "
आई मग अजून काकुळतीला यायची, त्याच वेळी हसायलाही यायचं तिला.
" आई ! ही पोरं ना, अगं कुणी आलं आणि मुलांना खायला काही आणलं असेल ना, जे ही मुलं खात नाहीत, तर आपण त्यांना तसं सांगावं कि कशाला आणलं ? आमची मुलं खात नाहीत, कि नेमकं तेव्हांच यांना मुद्दाम तो खाऊ हवा असतो. काय विचार करत असतील आलेले पाहुणे ?"
मग आजी गोड हसून म्हणायची " तुम्ही सुद्धा असंच वागायचा ना माझ्याशी ? त्याचा बदला घेतात मुलं "
हा क्रम ठरलेला असायचा.
आम्ही मोठे झाल्यावर सुद्धा ते चालूच राहीलं. फक्त गप्पांचे विषय बदलले.
आता तारूण्याच्या उंबरठ्यावर गप्पा अलगद फुलपाखरासारख्या तरंगत्या असायच्या .
जणू काही आजूबाजूला क्षितिजाने काळी साडी नेसलीये, आणि त्या प्रचंड मोठ्या घुमटात प्रखर दिव्यांच्या प्रकाशात प्राजक्तफुलांचा सडा माराने शिंपलाय आणि सुखाच्या झुळुकीने मनःपटलांवर गुदगुल्यांची जाणीव होतेय असे भास होत.
बसं, याच विषयावर गप्पा ऐकाव्यात आणि आपणही बोलत रहावं असं वाटे.
पण कुठेतरी भवतालभान जागृत ठेवणार्या जाणिवा मनपाखराची उड्डाणं खूप वर उडू देत नसत.
***************************************************
असंच एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी आजी कामं संपवून आली होती.
मग मी विषय काढला " ए आजी तू खूप सुंदर असशील ना गं तरूणपणी "
खरं तर तिचे तरूणपणीचे खूप कमी फोटो होते. ते ही कृष्णधवल. रंगीत फोटो त्या वेळी जास्त काढले जात नसत
त्या फोटोवरूनही तिचं रूपडं समजून यायचं.
माशासारखे डोळे, बंगाली ठेवणीची जिवणी, ओठ, दाट केस आणि प्रसन्नगौर वर्ण . सिनेमात गेली असती तर नाव कमावलं असतं.
मी फक्त विषय काढायचा अवकाश. मावशी लगेच येऊन बसली.
"अगं आई काय देखणी होती तरूणपणी"
"हो ? अगं मावशी मग पोरं तर गोंडा घालत असतील ना तिच्या मागे ?"
आजी चक्क लाजली.
"काय बाई आजकालच्या मुली या "
मावशी मोठमोठ्याने हसायला लागली.
" अगं आमची आजी सांगायची कि हिचं लग्न लावून दिलं म्हणजे आम्ही सुटलो असं वाटायचं "
" ए अगं म्हणजे, आजीचं लग्न तिच्या आईवडिलांनी लावून दिलं ?"
"कसलं गं ! तसं असतं तर मग तुझे आजोबा कसे आले असते तिच्या आयुष्यात ? तो एक किस्साच आहे. " मग आजीकडे वळून मावशी म्हणाली " ए आई सांग ना गं तुझ्या शैलीत"
आजी हसून टाळायला बघत होती. पण या वेळी सर्वांनी पिच्छाच पुरवला होता.
"काय गं बाई पोरं तरी " म्हणत तिने तोंडाला पदर लावला.
पण या वेळी तिच्या दोन्ही लेकींनी तिला पळवाट काढू द्यायची नाही हा निश्चयच केलेला होता.
मग आजीचा नाईलाज झाला.
" बरं सांगायचा प्रयत्न करीन हं "
"प्रयत्न नाही सांगच "
आजी हसू दाबत म्हणाली
" एका अटीवर, रात्री सर्वांनी मेथीची पालेभाजी खायची. चालेल ना ?"
आम्हाला न चालायला काय होतं ? मेथीची भाजी आई आणि आजीसुद्धा उत्कृष्ट बनवायच्या.
आम्ही सगळे मग द्राक्षाच्या मळ्यात द्राक्षं खायला गेलो. संध्याकाळ अशीच जाणार होती.
***************************************************************
जेवंणं वगैरे झाल्यावर घराच्या चौकात आम्ही सगळे बसलो. मधल्या झोपाळ्यावर आजीला बसवलं
धाकट्या भावाने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं. त्याच्या केसात बोटं फिरवत आजी सांगू लागली.
" झाली असतील पस्तीस चाळीस वर्षे ... नाही जास्तच कि . नलूच चाळीशीपार झाली. है ना गं ?"
आईने मान डोलावली.
" बरं आजी असू दे,पंचेचाळीस पन्नास वर्ष पकड "
" तसं नाही रे, म्हणजे तुम्हाला समजाव म्हणून हिशेब केला. त्या वेळी ना मोबाईल होते, ना लॅण्डलाईन सर्रास होते. इंटरनेट, फेसबुक , व्हॉटस अॅप काही काही नव्हतं."
" ए आजी, मग तुम्ही कसं रहायचा ?" धाकट्याने विचारलं.
आजीला हसू आलं " रहायचो ना. उलट खूप सुंदर दिवस होते ते. कुणाला काही सांगायचं तर घरी जाऊन निरोप द्यावा लागायचा. ज्या व्यक्तीला निरोप द्यायचा ती व्यक्ती घरी नसेल तर शेजारी निरोप ठेवला तरी तिला बरोब्बर मिळायचा. आमच्या मैत्रीणींच्या भेटायच्या जागा ठरलेल्या असायच्या.या वेळेला इथे भेटायचं असा निरोप न देताही आम्ही मनात आलो कि भेटायचो"
"कसं काय गं आजी ?"
"अगं म्हणजे संध्याकाळी चंदनेश्वरच्या देवळात गावकरी जायचे, तर कालीमातेच्या मंदीरात मुली जात. मग त्या वेळी बरोब्बर भेट व्हायची. "
"चंदनेश्वरचं मंदीर म्हणजे गं आजी ?"
"ए अरे किती प्रश्न विचारता मधे मधे, ती सांगतेय ना ? लिंक तुटली कि मग ते पण नाही सांगायची "
मावशीने टोकलं.
"अरे चंदनेश्वर म्हणजे माझ्या माहेरचा महादेव. खूप सुंदर देऊळ आहे. भव्य परीसर , मोठी झाडं . मागच्या बाजूला वेळूचं बन आहे. त्याच्या मागे नदी. आणि नदीच्या बाजूने चालत थोडं पुढे गेलं कि समुद्र दिसायचा. इतका सुंदर परीसर होता कि काय सांगू ? "
"आजी मग तुम्ही मुली मुली त्या देवळात नाही जायचा का ?"
"जायचो ना ! नवरात्रं होऊन गेलेली असायची. त्यानंतर चंदनेश्वरच महोत्सव चांगला महीनाभर चालायचा. पहाटेपासून परीसराला जाग असायची. त्या महिनाभरात सेवेची संधी गावातल्या काही घरांना मिळायची. माझ्या वडलांना गावात खूप मान. त्यामुळं आपल्या घराला नेहमी संधी मिळायचीच. मग वडील आलटून पालटून मला किंवा तिलोत्तमेला पाठवायचे. पण तिला काही ते आवडायचं नाही, मग महिनाभर संध्या़काळी माझा वावर चंदनेश्वरलाच असायचा.
घरापासून कालीमातेचं मंदीर पाच मैलावर होतं. तिथे गावाची शीव संपायची. मग दाट झाडी लागायची. अगदी जंगलात गेल्यासारखं वाटायचं. थोडं चालून गेलं कि मग पांढरं शुभ्र चंदनेश्वराचं मंदीर दिसायचं. ते दिसलं कि चालून चालून आलेला थकवा कुठल्या कुठे पळायचा. "
आजी आता त्या काळाच्या आठवणीत रमली होती.
तिचं मन बंगालच्या मातीत जाऊन पोहोचलं होतं . चंदनपूरची ओळखीची हवा तिच्या जाणिवांना स्पर्शून जात होती.
कोजागिरी असल्याने आम्ही सगळे मघाशीच चौकातून अंगणातल्या बाजेवर येऊन सुस्तावलो होतो.
पारावर काही जण बसलेले , काही खुर्च्या टाकून बसलेले. बाहेर चुलीवर मोठ्या हंड्यात दूध तापायला ठेवलेलं होतं. ते चांगलं खरपूस भाजल्याचा वास आला कि मग त्यात मसाला टाकायचा होता.
आजीची गोष्ट ऐकायला आभाळ वाकलं होतं.
कोजागिरीचा उत्सव सोडून चांदण्या थबकल्या होत्या आणि ढगांआडून डोकावत चंदामामाही आजीकडे डोळे लावून बसला होता.
दिवसभर सूर्याच्या काहिलीने तापलेल्या धरेला त्याच्या शीतल प्रकाशाने मलम लावल्याप्रमाणे सुखद अनुभूती मिळत होती. नदीवरचं गार वारं गोष्ट ऐकायच्या उत्सुकतेने आजीकडे झेपावत होतं आणि तिच्या गालाला, केसाला स्पर्शून "सांग ना पुढे" म्हणून आग्रह करत होता.
वार्याच्या स्पर्शाने आजीच्या अंगावर शहारा उमलत होता....
दिवेलागणीची वेळ झाली होती. जरबेश्वराच्या मंदीरातल्या घंटांचा आवाज शांत वातावरणात घुमत होता.
ती पुढे सांगू लागली.
क्रमश:
मस्त सुरुवात. छान आहे कुटुंब
मस्त सुरुवात. छान आहे कुटुंब वत्सल कथाबीज. पुलेशु.
मस्त सुरवात… शेवटच्या ओळीत
मस्त सुरवात… शेवटच्या ओळीत चंदनेश्वराच्या घंटा की जरबेश्वराच्या???
अनि, साधना आभार.
अनि, साधना आभार.
शेवटच्या ओळीत चंदनेश्वराच्या घंटा की जरबेश्वराच्या??? >> जरबेश्वर आताच्या आजीच्या सासरी आहे, आणि चंदनेश्वर माहेरी, प.बंगाल मधे.