पाककृती स्पर्धा १ - शिरा सजावट- अल्पना

Submitted by अल्पना on 4 September, 2025 - 04:05

नेहेमीच्या रव्याच्या शिर्‍या ऐवजी हा मुगडाळीचा शिरा

साहित्य - १ वाटी मुग डाळ, १ वाटी साखर, १ वाटी तुप , २ चमचे रवा, २ चमचे बेसन, २ वाट्या पाणी, १ वाटी दुध, अर्धी वाटी साय , १/२ वाटी केशर घातलेले दुध, वेलची पुड, आवडीप्रमाणे सुकामेवा
सजावटीसाठी थोडा आंब्याचा पल्प, केशराच्या काड्या, सुकामेवा (पिस्ते, काजू, बदाम), फुलं / पाकळ्या - झेंडू / गोकर्ण, तुळशीचे पान, वेलची पुड
कृती :
मुगाची डाळ १५-२० मिनिटे भिजवून नंतर वाळत ठेवली. वाळलेली मुग डाळ नंतर मंद आचेवर परतली. थंड झाल्यावर मिक्सरच्या पल्स सेटींग वर डाळीचा रवा काढला. हे सगळं शिरा बनवायच्या आदल्या दिवशी करून ठेवलं.

शिरा करण्यासाठी कढईत तुप गरम करून त्यात आधी रवा आणि बेसन गुलाबी रंग येईपर्यंत परतले. (एक वाटी तुप न वापरता आम्ही पाऊण वाटी पातळ केलेलं तुप वापरलं होतं. तेवढं पुरलं. ) नंतर त्यात डाळीचा रवा घालून मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत परतले. हे करत असताना पाणी आणि दुध गरम करायला ठेवलं होतं. डाळीचा रवा व्यवस्थित परतून झाल्यावर त्यात थोडे थोडे उकळलेलं पाणी घालून रवा फुलवून घेतला. यानंतर त्यात गरम केलेलं दुध, केसर खलून ठेवलेलं गरम दुध आणि साय घातली आणि शिरा व्यवस्थित शिजू दिला. शिरा शिजल्यावर त्यात साखर आणि वेलची पुड घालून व्यवस्थित तुप सुटेपर्यंत परतला. नंतर शिर्‍यामढ्ये थोडा तळलेला सुकामेवा घातला.

ही सजावटसुद्धा मी माझ्या मैत्रिणीसोबतच, तिच्या मदतीनेच केली आहे. आम्ही आधी आंब्याचा पल्प, पांढरे चॉकोचिप्स आणि पांढरे चॉकलेट वापरून सजावट करणार होतो. पण मग नंतर आम्हाला शिर्‍याला शिर्‍यासारखंच राहू द्यावे असं वाटलं. एका ऐवजी तिन प्रकारे सजावट करून बघितली होती आम्ही. त्यातली एक आम्हा दोघींना आवडली नाही आणि दुसर्‍या दोन पैकी एक एकीला आणि दुसरी एकीला आवडली.

पांढर्‍या प्लेटमध्ये सजावट करताना छोट्या वाटीने शिर्‍याची मुद पाडून प्लेटमध्ये ठेवली. त्याच्या बाजूला सिलिकॉन ब्रशने आंब्याच्या रसाची जाड रेष ओढली. त्या रेषेवर थोड्या झेंडूच्या पाकळ्या घातल्या. शिर्‍याच्या मुदेच्या दोन्ही बाजूंना चिरलेल्या पिस्ते आणि बदामांनी रेष ओढली. शिर्‍यावर तुपात तळलेले काजू, वेलचीआणि तुळशीचे पान ठेवलं. थोडं केसर घातलं.
shira_white.jpgshiraa _white1.jpg

वरणभाताची सजावट धाग्यावर सॉसच्या फराट्यांचा उल्लेख आल्याने आंब्याच्या रसाच्या फराट्याशिवाय सजावट करून बघुया असा आम्ही विचार केला. काळ्या बोलमध्ये कपकेक मोल्डने मुद पाडलेला शिरा ठेवला. त्यावर थोडं केसर पेरलं. स्जावटीसाठी त्याच्या बाजूला थोड्या झेंडुच्या पाकळ्या, चिरलेले ड्राय फ्रूट आणि वेलच्या घातल्या. थोडी वेलची पुड बोलमध्ये भुरभुरली. रंग उठून दिसावा म्हणून यात गोकर्णाची फुलं ठेवली.

shira_black bowl.jpgshira black.jpg

तुम्हाला कोणत्या प्लेटमधली सजावट जास्त आवडली. आमच्या घरी सध्या स्कोअर 3- 1 असा आहे. ( 3 कोणाला आणि 1 कोणाला हे नंतर सांगते)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
मला पिस्त्याची जास्त आवडली. शिर्‍याचा एक घास त्या जॅमला आणि एक पिस्त्यांना लावून खायला मजा येईल.

गोकर्ण आणि झेंडू एडिबल असली तरी मी काही ती शिर्‍याबरोबर खाणार नाही, म्हणून दुसरी दिसायला छान असली तरी माझं मत पहिल्याला. वेलची पण आख्खी आहे. आख्खी वेलची मसाला पानात चांगली लागत असली तरी शिर्‍याच्या एकाच घासात सगळी खायला कदाचित नाही आवडणार.

माझंही मत पहिलीला. Happy
दोन्ही सजावटी कल्पक आहेत. तो दुसर्‍या बोलमागचा खुर्चीवर बसून पुस्तक वाचणारा गणपती भारी आहे! Happy

मस्त!! मला ती पहिली सजावट खूप आवडली. आंब्याच्या पल्पची रेष खूपच सुंदर झालेली आहे. आणि ती अगदी complementary होईल शिऱ्याला

मस्त प्लेटिंग!

आमच्या घरी सध्या स्कोअर 3- 1 असा आहे. >>> म्हणजे तो १ वाला सदस्य हटके आहे. बाकी समान आवडीचे आम जनता आहेत Happy

दोन्ही सुरेख पण माझे मत #२ ला. फुलावर लट्टु, रंगावर लट्टु, सढळ हस्ते पेरलेल्या, केशरकाड्यां वर लट्टु.

आता ३ वि. १ मध्ये कोणाला कुठले आहेत ते सांग. मी दरवेळी ही रेसिपी वर आली की बघतोय निकाल लागला असेल तर. Lol