पाककृती स्पर्धा २ - मँगो डिलाईट - मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 3 September, 2025 - 13:56

ह्या स्पर्धेसाठी खूप प्रवेशिका आल्या नाहीयेत म्हणून माझ्याकडून ही एक .

साहित्य
१) डेसिकेटेड कोकोनट
२) दूध पावडर
३)आंब्याचा आटवलेला रस
४) साखर
५) थोडंसं दूध

स्टफिंग साठी
पिस्ता बदाम काजू चे बारीक तुकडे, थोडा डेसीकेटेड कोकोनट आणि थोडी दूध पावडर आणि लागेल तसं दूध

कृती

साहित्य क्रमांक १ ,२, ३ आणि चार एकत्र करावे. ह्याचे फार प्रमाण ठरलेले नाही तरी डिसिकेटेड कोकोनट एक वाटी, अर्धी वाटी दूध पावडर आणि पाव वाटी आंब्याचा रस हे सगळ मिक्सरमध्ये बारीक करावे. साखर नीट बारीक झाली पाहिजे किंवा मग पिठीसाखरच घ्या.

एका ताटलीत हे मिश्रण काढून घेऊन त्यात अगदी थोडे थोडे दूध घालून घट्टसर गोळा बनवावा. आणि बटर पेपरवर तो जाडसर लाटावा. स्टफिंग साठी दिलेले साहित्य एकत्र करून लागेल तसं दूध घालून त्याचा रोल करावा. हा रोल लाटलेल्या मिश्रणावर ठेवून तो गुंडाळून त्याचा घट्ट रोल करावा.

हा रोल फ्रीज मध्ये दहा पंधरा मिनिटं सेट होण्यासाठी ठेवावा नंतर त्याचे अर्धा इंच जाडीचे तुकडे करावेत आणि खावेत.

अधिक टिपा

१) प्रसादासाठी हा पदार्थ करायला छान आहे. पटकन होणारा आणि चवीला ही छान लागतो.
२) दूध फारच बेता बेताने घालावे. साखरेमुळे फार पटकन सैल होत. तसं झालं तर मग घाला पुन्हा सगळ वाढीव त्यात.
३) आंब्याचा रस नसेल तर स्ट्रॉबेरी क्रश वगैरे घालू शकता. ते ही छान दिसेल.
४) साखर ही कमीच लागते कारण आंबा आणि दूध पावडर दोन्ही गोड असत.
५) चांदीचा वर्ख किंवा पिस्त्याचा चुरा दोन्हीपैकी काही ही वरून लावलं तर जास्त छान दिसतं.

20250828_114221.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी दिसतायत मँगो डिलाइट्स! Happy

अवांतरः
आंब्याच्या आटीव रसाचे तुम्ही इतके छान छान प्रकार करता की तुमचा आयडी बदलून आंबेमोहोर करायला हवा. Lol Light 1

मस्त! अगदी ऑथेंटिक असतात तुमचे सारेच पदार्थ.
मला पाकृ मधील काही कळत नाही किंवा त्या कधी वाचत सुद्धा नाही तरी फोटो बघूनच हे कळते..

मस्त दिसताहेत हे डिलाईट. चांगलेच लागणार.

आंब्याच्या आटिव रसाचा गोळा वाडीत साधले मेसमध्ये विकायला पाहिला होता. पण साखर घातली असेल कदाचित म्हणुन घेतला नाही. आटिव गोळ्याशिबाय हे प्रकरण होणार नाही.

आमरस घेऊन तो आटवुन करता येईल. स्पर्धा संपल्यावर Happy

थँक्यु सर्वांना.
अगदी ऑथेंटिक असतात तुमचे सारेच पदार्थ. >>ऋन्मेष धन्यवाद
आंबा नसेल तर केशर, स्ट्रॉबेरी क्रश किंवा कोणता कृत्रिम रंग वगैरे ही घालू शकता किंवा प्लेन पांढर ही छानच दिसेल. आंब्याचा किंवा दुसऱ्या कशाचा लिक्वीड रस घातला तर त्या अंदाजाने दूध कमी घाला . तो रस आणि दूध दोन्ही घातलं तर मिश्रण सैल होईल . साखरेमुळे दूध खपत नाही जास्त एरवी ही. किंवा दूध नाही घातलं तरी चालेल.
मला ड्रायफ्रुट ची फार कचकच चांगली लागणार नाही असं वाटत होतं म्हणून ड्रायफ्रुट चा रोल मी जाड केला नव्हता पण तो रोल जाड केला तर दिसायला नक्कीच जास्त छान दिसेल. आपल्या आवडीप्रमाणे करावे.

काय दिसतंय !!!!!!
तोंडाला पाणी सुटलंय

आंबेमोहोर Lol
पण मग तो तांदूळ होईल ना

छान दिसत आहेत वड्या. डेसिकेटेड पेक्षा ताजा चव वापरला तर कसे लागेल? अगदी टेंडर कोकोनट असेल तर अजून चांगले लागेल असे वाटते पण स्ट्रक्चर नीट राहील की नाही ते कळत नाही.

आशिका, शर्मिला, मॅगी, झकासराव, सामो, प्राचीन, माधव, rmd धनि धन्यवाद .
@ धनि , ताजा नारळ घेतला तर साखर घातल्यावर त्याला खूप पाणी सुटेल आपण मोदकाचं सारण करतो तेव्हा सुटत तसं. मग ते गॅसवर ठेवूनच आटवावं लागेल आणि गॅस वर ठेवायचं नसेल तर त्यात दूध पावडर खूप म्हणजे खूपच घालावी लागेल घट्टपणासाठी.
अर्थात हे सगळे अंदाजच आहेत, एकदा करून पाहायला हवं कसं वर्क होतं ते.

देखणा जिन्नस. 👌

मात्र खोबरे न वापरता करून बघेन. 😀

Pages