देव भक्तीचा भुकेला

Submitted by तुषार विष्णू खांबल on 2 September, 2025 - 15:27

विषय - देव भक्तीचा भुकेला
शब्दांकन - तुषार खांबल

रात्रीचे ११.०० - ११.३० वाजले असतील. घरी गौरी-गणपती असल्याने आज खूपच पाहुणे मित्रमंडळी आले होते. दिवसभर पाहुण्यांची ऊठबस करून मनवा अक्षरशः दमून गेली होती..... मंथन बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर बसून टीव्ही टीव्ही पाहत होता.. त्यालादेखील दिवसभरातून आता थोडीशी उसंत मिळाली होती. किचनमध्ये कामे आवरून ती त्याच्या बाजूला येऊन बसली. त्याच्या हातातील टीव्हीचा रिमोट तिने आपल्या हातात घेतला आणि त्याचा आवाज बंद करून तिने त्याच्या खांद्यावर डोके ठेवले.

तो - आज खूपच दमछाक झाली ना

ती - हो ना... ऐक ना... मला ना तुला काही सांगायचं आहे. आपल्या बाप्पाचे विसर्जन झाले ना की आपण राजाच्या दर्शनाला जाऊया. मला एक नवस फेडायचा आहे."

तो - त्यासाठी तिकडे जायची काय गरज. आपल्या घरातपण तर आहे ना बाप्पा. इकडेच काय ते कर

ती - नाही. मी नवसच तसा म्हणाले होते की माझी इच्छा पूर्ण झाली तर मी राजाच्या दरबारात येऊन नवस पूर्ण करेन म्हणून

तो - ठीक आहे. बघू तेव्हाच तेव्हा. आता झोपूया खूप रात्र झाली आहे. (थोडीशी नाखुश होऊन ते दोघे झोपायला बेडरूम मध्ये निघून गेले. साधारणपणे पहाटे ३.००-३.३० च्या सुमारास तिला नकळतपणे जाग आली. फ्रीज मधून पाण्याची बाटली घेऊन आळस देत ती बाहेर आली. इतक्यात तिचे लक्ष गेले..... तिने पाहिलं की एक व्यक्ती बाप्पाच्या समोरील साहित्य एका कापडामध्ये जमा करत आहे. ती जाऊन त्याला विचारते.

ती - कोण आहेस तू. आणि इकडे सर्व सामान कशाला जमा करतोय.

तो - निघायची वेळ झाली आणि आता थांबायची इच्छा पण नाही.

ती - अरे पण तू आहेस तरी कोण.आणि आत कसा आलास

तो - मी कुठे आत आलो. तूच तर मला वाजत गाजत घेऊन आलीस ४- ५ दिवसांपूर्वी.

ती - वेडा झालाय का तू. ओळख ना पाळख डायरेक्ट कोणाच्यापण घरात शिरतो

तो - मी नाही शिरत घरात. लोक आनंदाने मला घेऊन येतात. माझं नाव विचारशील तर अशी असंख्य नावे आहेत. पण तुला सांगून काही उपयोग नाही. तू झोप जा. मला माझं काम करू दे.

(तीने त्याच्या खांद्याला धरून त्याला स्वतःकडे वळवले इतक्यात एक लख्ख प्रकाश तिच्या डोळ्यांवर पडला आणि तो तिथून गायब होतो तो डायरेक्ट त्यांच्या हॉल मधील सोफ्यावर रुबाबात बसलेला तिला दिसला.)

ती - कुठे गेला हा

तो - हा काय इथे सोफ्यावर बसलोय. कसं आहे ना बाळा. मी इथे चार दिवसांचा पाहुणा म्हणून येतो. तुमच्या सोबत घालवलेले क्षण मला संपूर्ण वर्षभर आनंदी ठेवतात. तुम्ही जेव्हा मला पुढच्या वर्षी लवकर या म्हणून माझी पाठवणी करता तेव्हा तुमच्या इतकचं दुःख मलाही होत. फक्त तुम्हाला ते दिसत नाही. पण आज मला जे दुःख झालं ते त्याहून कैकपटीने जास्त आहे.

ती (आश्चर्याने) - म्हणजे बाप्पा तू......

तो - हो मीच. अरे तू माझ्यासमोर तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा व्यक्त करते. नवस बोलते. मी तो नवस पूर्ण करावा अशी तुझी जिद्द असते. आणि तो पूर्ण झाल्यावर नवस फेडायला राजाच्या दरबारात जातेस. का माझ्यावर विश्वास नाही तुझा? तसा तो काय आणि मी काय आम्ही एकच आहोत ग.... पण एकाच वेळी अनेकाना भेटता यावं म्हणून आम्ही वेगवेगळ्या रूपात आणि वेगवेगळ्या आकारात संपूर्ण जगात तुमच्या भेटीला येतो.

तुझ्या ऑफिसमध्ये तू केलेल्या कामाच क्रेडिट जेव्हा दुसऱ्या कोणाला मिळतं तेव्हा तुला कस वाटतं....????? त्रास होतो ना तुला पण.....????

नाही म्हणजे माझी काही इच्छा नाही की तू मला सोन्या-चांदीने मढवाव. माझ्या साठी दागदागिने करावे. हे सर्व तर खूप आहे माझ्याकडे. आणि तुझ्याकडे जे आहे ते पण माझ्याच कृपेने आहे. त्यातून तू मला परत काय देणार. मला फक्त तुमचं प्रेम हवं असत. संतानी त्यांच्या अभंगात सांगून ठेवलंय की देव हा भक्ती- भावाचा भुकेला असतो. मला फक्त त्याचीच अपेक्षा असते. पण तुम्हाला ते कळत नाही. तुमचे नवस पूर्ण करायला मी जे कष्ट घेतो त्याचे माझ्या समोर उभे राहून आभार जरी मानलेस ना तरी मला खूप काही मिळून जात. पण तुम्हाला मात्र त्या दरबारात जायचं असत. दोन मिनिट धड उभ तरी राहू देतात का तुम्हाला तिकडे...…???? जाऊ दे तुला सांगून तरी काय उपयोग म्हणा.....

ती - बाप्पा मला माफ कर माझं चुकलं.... मी पुन्हा असं नाही वागणार.... पण तू असा रागावून जाऊ नकोस..... प्लिज मला माफ कर

तो - अरे अशी रडू नकोस. मी माझ्या भक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला येतो. त्यांच्या डोळ्यात अश्रू बघायला नाही. तुला तुझी चूक समजली यात मला माझा नवस पावन झाला. आयुष्यात एक फक्त कर. माझ्यावरचा विश्वास कधी ढळू देऊ नकोस.

ती - नक्की बाप्पा (असे म्हणून ती डोळे पुसून उभी राहते. पाहते तर घरात कोणीच नसत. बाप्पाच्या समोर त्या कापडात साहित्य जमा केलेलं तिच्या नजरेस पडत.. ती पुन्हा ते साहित्य परत आपापल्या जागेवर ठेवते आणि नतमस्तक होऊन बाप्पासमोर उभी राहते आणि स्वतःशीच म्हणते..... "बोला गणपती बाप्पा मोरया*)

विशेष सूचना - सदर कथा ही संपूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी त्याचा कोणताही संबंध नाही. तसेच ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहिली असून कोणाच्याही भावना दुखावण्याचा लेखकाचा हेतू नाही.

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे, आवडली.
याची शतशब्द कथा करून शशक स्पर्धेत टाकता आली तर पहा.