पॉपकॉर्न परत आले. -२

Submitted by केशवकूल on 2 August, 2025 - 01:26

पॉपकॉर्न परत आले. २

चहाची चव अप्रतिम होभाग १ ची लिंक
https://www.maayboli.com/node/87000
चहा पिताना डॉक्टर म्हणाले, "आता हा कप पाहा. लोक चहा प्याल्यावर तिथेच कुठेतरी कप फेकून देतात. त्यांना कसं समजावू? प्रभुदेसाई, हा कप असा चहाबरोबर खायचा असतो. निरनिराळ्या चवीचे बनवले आहेत. तुझा आणि माझा कप आहे ना हा, ह्याला संभाजी बागेतल्या भेळेची चव आहे. खाऊन तरी बघ. सध्या तीन चवीचे कप बनवले आहेत. दुसरी पाणीपुरीची चव आहे. तिसरी आपली नेहमीची डिफॉल्ट मसाला! खा खा." डॉक्टरांनी स्वतःचा कप बाजूबाजूने खायला सुरुवात केली. मी पण भीत भीत खायला लागलो. वा भेळेबरोबर चहा! किंवा चहाबरोबर भेळ!
डॉक्टर पुढे सांगू लागले, "प्रभुदेसाई, प्लास्टिकने आपल्या आयुष्यात केवढा धुमाकूळ घातला आहे? १८६२मध्ये अलेक्झांडर पार्क्सने सर्वप्रथम कृत्रिम प्लास्टिक बनवले. नंतर १९०७ साली प्लास्टिक-बाळ बेकेलाईटचा जन्म झाला. लहान बाळाचे जसे सगळेजण कौतुक करतात तसे प्लास्टिकचे पण कौतुक सुरू झाले. ह्याच गोजिरवाण्या बाळाचे रूपांतर राक्षसात झाले. त्याने पृथ्वीवर आक्रमण करायला सुरुवात केली. समुद्रातील असंख्य जिवांचा तो कर्दनकाळ बनला. एवरेस्ट ते पॅसिफिक महासागर! जगाच्या कानाकोपऱ्यांत प्लास्टिकने हातपाय पसरले. भस्मासुर मानवाच्या नियंत्रणाबाहेर गेला. जिथे पाहावे तिथे प्लास्टिक! पॅसिफिक महासागरात हेन्डरसन नावाचे निर्जन बेट आहे. ह्या बेटावर जगात कुठेही नसेल इतके प्लास्टिक आहे. समुद्रांतून वाहात आलेले!"
"पण हा डॉक्टर ननवरे असा हार मानणार नव्हता. मी काय केले? खाता येईल असे वेष्टन शोधून काढले. बिस्किटांचा पुडा बिस्किटाबरोबर खा. चहाचा कप चहा पिताना बरोबर खा. अरे, आपण आईस्क्रीम कोनसह खातो तसे. तुमच्या त्या मूर्ख लोकांना हे समजेल तर ना. चहा पिऊन झाला की दिला तो कप फेकून तिथेच कुठेतरी."
डॉक्टर सांगत असताना अचंब्याने मी तोंडात बोटे घालायच्या ऐवजी सगळा कपच घातला आणि केव्हा स्वाहा केला ते माझे मलाच समजले नाही.
"तू हे कुणाला सांगू नकोस हं. उगीच लोकांचा गैरसमज व्हायचा. आधीच लोकांना वाटते की मी 'अमानवी' आहे. त्यांत भर पडायला नको."
तर सांगायचा मुद्दा हा की असे आमचे डॉक्टर 'अमानवी' आहेत.
थोड्याच दिवसानंतर सगळ्या पुण्याची मति गुंग करणारी अभूतपूर्व घटना घडली. त्या अघटित घटनेचा मी एकमेव साक्षीदार आहे. म्हणजे डॉक्टरांच्या शिवाय बरं का.
एके दिवशी सकाळी सकाळी डॉक्टरांचा फोन आला, "प्रभुदेसाई, संध्याकाळी इकडेच चहा प्यायला ये. तुला गंमत दाखवायची आहे. माझा पॉपकॉर्न बनवण्याचा प्रयोग शेवटी यशस्वी होणार असं दिसतंय. तू ये आणि स्वतःच बघ."
म्हणजे डॉक्टरांना कोणीतरी साक्षीदार पाहिजे होता. मला बळीचा बकरा बनवायचे ठरवले होते एकूण. ठीक आहे. आपल्याला काय फरक पडतो? प्रयोग यशस्वी झाला तर फुकटात मक्याच्या लाह्या मिळत असतील तर सोडा कशाला? असा विचार करून मी संध्याकाळी डॉक्टरांच्या बंगल्यावर पोचलो. डॉक्टर माझी वाट बघत होते.
"अरे, किती वेळ लावलास? बरं, ते जाऊ दे, तू स्टार ट्रेक बघतोस की नाहीस?" डॉक्टरांनी प्रश्न केला.
"स्टार ट्रेक? ते काय असतं बुवा? मी पहिल्यांदाच ऐकतो आहे. हा, मी स्टारडस्ट वाचतो मिळाला तर. सलूनमध्ये नाही तर आमच्या फॅमिली डॉक्टरच्या रिसेप्शनमध्ये." माझे उत्तर ऐकून डॉक्टर नाराज झाले.
"तुम्ही कूपमंडूक कॉलनीकर! कधी कॉलनीच्या बाहेर पडता की नाही? स्टार ट्रेक ही विज्ञान कथेवर आधारलेली धारावाहिक आहे. तू बघ कधीतरी. त्यामध्ये रेप्लीकेटर नावाचे गॅजेट आहे. त्यामध्ये खायचा कुठलाही पदार्थ ताबडतोब तयार मिळतो. हे बिचारे स्टार ट्रेकवाले घरदार सोडून लाखो किलोमीटर दूर अवकाशात मानवजातीचे रक्षण करण्यासाठी चकरा मारत असतात. त्यांना वडापाव खावासा वाटला तर कोण करून देणार? खास त्यांच्यासाठी हे यंत्र बनवले गेले. अर्थात ह्या झाल्या भविष्यातल्या आणि विज्ञान कथेतल्या गोष्टी. मी प्रयोग करून आपल्या कॉलनीकरांसाठी असेच यंत्र बनवले. सध्या ह्यात फक्त पॉपकॉर्न आणि चहा बनवणार आहे. पुढे मागे मी वडापाव, डोसा, इडली, मॅगी बनवायचा विचार करतो आहे."
डॉक्टरांच्या कल्पनाशक्तीला काही अशक्यप्राय नाही.
"तुम्ही माझी उत्सुकता जास्त ताणू नका. चला येऊ द्या पॉपकॉर्न!"
"त्याआधी मला सांग. तू कॉलेजात फिजिक्स केमिस्ट्रीचा अभ्यास केला आहेस?"
"अकरावीपर्यंत जेवढे शिकलो तेवढेच. आर्कीमिडीज, न्यूटन, मादाम मेरी क्युरी ..."
बस्स, बस्स. इतके खूप झाले. हे बघ. सर्व सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय म्हणजे ऑरगॅनिक बरं का, पदार्थ मुख्यत: कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन ,थोडा नायट्रोजन, चवीपुरते मिनरल. पाणी, क्लोरोफिल आणि सूर्यप्रकाशाची ऊर्जा वापरून वनस्पती आपल्यासाठी अन्न बनवतात. ती प्रक्रिया वापरून मी मका बनवतो, नंतर त्याच्या लाह्या फोडतो. सिंपल आहे ना?"
"एकदम सिंपल आहे," माझे लक्ष पॉपकॉर्नकडे होते.
"चल तुला माझे मशीन दाखवतो," असे बोलून डॉक्टर मला आतल्या खोलीत घेऊन गेले. डॉक्टरांचे मशीन वॉशिंग मशीनच्या आकाराचे असावे आणि तसेच दिसत होते. डॉक्टर मला सांगत होते, "हे ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजनचे सिलिंडर इथे मशीनला जोडले आहेत. कार्बन म्हणजे आपण पूर्वी वापरायचो तो दगडी कोळसा ह्या फनेलमधून आत पडतो. खनिजांचा एकत्र लगदा करून ह्या भांड्यात इथे ठेवला आहे. सूर्यप्रकाशासाठी हा खास दिवा बसवला आहे. अजून काय राहिले? हा, ह्या भट्टीचे तापमान आणि आर्द्रता सुनियंत्रित करण्याची सोय आहे. आता आपल्याला पाहिजे त्या पदार्थाचे रासायनिक पृथक्करण घेऊन कॉम्प्युटरमध्ये लिहिले की हे मशीन तो पदार्थ आपल्याला देते. मी सध्या पॉपकॉर्न बनवण्याची कृती कॉम्प्युटरमध्ये भरली आहे. तुला पॉपकॉर्नचे रासायनिक पृथक्करण माहीत आहे? नाही ना, मी तुला सांगतो. पॉपकॉर्नमध्ये हायड्रोजन..."
"डॉक्टर त्याची काही गरज नाही," मी घाईघाईने बोललो, "माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. शिवाय हातच्या कांकणाला आरसा कशाला. आता आपण पॉपकॉर्न खाणार आहोतच की."
डॉक्टरांनी मान डोलावली, "अगदी बरोबर बोललास.चल आपण पॉपकॉर्न काढू.
डॉक्टर आता रंगात आले, "चीज पॉपकॉर्न खायचेत? आत्ता काढतो." आपल्याला काय, चीज तर चीज! डॉक्टरांनी खिशातला संगणक कढून मशीनला चीज पॉपकॉर्नची ऑर्डर दिली. बघता बघता मशीनमधून माल बाहेर येऊ लागला. आम्ही दोन भांडी भरून चीज पॉपकॉर्न घेतले. खरं तर आता मशीन बंद व्हायला पाहिजे होते. पण पॉपकॉर्न येतच होते. डॉक्टरांनी खिशातल्या संगणकाची एकूण एक सर्व बटणे दाबून पाहिली. काही उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी मशीनवरची बटणे दाबली. घरातल्या विजेच्या उपकरणांची बटणे दाबली. एवढेच नव्हे तर शर्टाची आणि पँटची बटणेदेखील दाबायची सोडली नाहीत.
मला वाटले की मशीन पॉपकॉर्न बनवण्यात रंगून गेले होते. पॉपकॉर्न बाहेर येत राहिले. सगळीकडे पॉपकॉर्नच पॉपकॉर्न! सगळी खोली पॉपकॉर्नने भरून गेली. पॉपकॉर्नची पातळी हळूहळू वाढू लागली. पॉपकॉर्न आमच्या कमरेपर्यंत आले. आता मात्र डॉक्टरांचा धीर खचला, "प्रभुदेसाई, हे मशीन "सैतानी पॉपकॉर्न मॉन्स्टर" झाले आहे. इथून पळून जाण्याशिवाय दुसरा मार्ग मला दिसत नाही. इथेच थांबलो तर 'पॉपकॉर्नमध्ये बुडून मरणारे पहिले आणि बहुधा शेवटचे मानव' अशी आपली नावे इतिहासात अजरामर होतील. पळ."
मी आणि डॉक्टर जे पळालो ते थेट बंगल्याच्या बाहेरच्या बागेत पोहोचलो. डॉक्टर पुढे, मी मागे. बंगल्याच्या उघड्या खिडकीतून पॉपकॉर्नचे लोट वाहात होते. ते भयावह दृश्य पाहून माझी पांचावर धारण बसली. थोड्याच वेळात पूर्ण कॉलनी पॉपकॉर्नच्या महापुरात बुडणार, नंतर पुणे, नंतर? पण आता लोट हळूहळू थांबायला लागला होता. डॉक्टरांच्या चेहऱ्याची कळी खुलली, "चला, थांबलं एकदाचं. कच्चा माल संपला असावा. काहीही असो माझा प्रयोग तर यशस्वी झाला!"
"डॉक्टर, चुलीत नाहीतर बंबात घाला तुमचे प्रयोग. मला आधी हे सांगा की हा पॉपकॉर्नचा कचरा कोण साफ करणार आणि कसा साफ होणार ह्याचा विचार आधी करा."
"चुलीत कोणते इंधन वापरायचे त्याचे प्रयोग मी यथावकाश करणार आहेच," डॉक्टरांपर्यंत माझा वैताग पोचलाच नव्हता. "आणि ह्या चवदार पॉपकॉर्नचा आपणच फडशा पाडू."
ते पांढरेशुभ्र पॉपकॉर्न बघून माझे डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती. इकडे डॉक्टरांना जोक सुचत होते. किंवा ते दृश्य पाहून त्यांचे डोके फिरले असावे. ह्यातून बाहेर पडायचे असेल तर मलाच काहीतरी करायला पाहिजे.
जे काही करायचे ते लवकर करायला पाहिजे होते. सगळीकडे बोंबाबोंब व्हायच्या आधीच. नाहीतर सगळी कॉलनी जमा झाली की दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरांत डॉक्टरांच्या आणि माझ्या नावाने हेडलाईन्स झळकायच्या!
मी डॉक्टरांच्या विश्वातून त्यांना हलवून जागे केले. "डॉक्टर, तुम्ही तुमचा प्रोग्राम उलटा केला तर? म्हणजे कच्च्या मालापासून पक्का माल बनवण्याच्या ऐवजी पक्क्या मालापासून कच्चा माल बनवला तर? पाहा असे करता येईल काय? म्हणजे पॉपकॉर्नपासून तुमचे काय ते वायू इत्यादी बनतील. काय वाटते तुम्हाला?"
डॉक्टरांनी माझ्याकडे निरखून बघितले. मी काय बोलतो आहे हे त्याना समजले नसावे. मी त्यांना समजावण्यासाठी तोंड उघडणार तो ते म्हणाले, "चूप, चूप. मी विचार करतो आहे मला डिस्टर्ब करू नकोस."
डॉक्टरांनी खिशातून छोटा संगणक काढला आणि त्यात लिहायला सुरुवात केली. लिहून झाल्यावर बटण दाबून त्यांनी प्रोग्राम मशीनकडे पाठवला. आम्ही वाट बघत बसलो. आणि अहो आश्चर्यम्! महदाश्चर्यम्! मशीनने कामाला सुरुवात केली. हळूहळू पॉपकॉर्नचा ढीग ओसरायला लागला. त्याची लेवल कमी कमी होऊ लागली. काही वेळातच आम्ही बंगल्यांत प्रवेश केला. मशीनने सगळे पॉपकॉर्न फस्त केले. आम्ही दोघांनी सुटकेचा निश्वास टाकला. माझ्या लहानशा सजेशनने केवढा मोठा प्रॉब्लेम चुटकीसरसा सोडवला होता.
डॉक्टर भारावून गेले होते, "प्रभुदेसाई, तू महान शास्त्रज्ञ आहेस. तंदुरी चिकनपासून कोंबडी करण्याच्या प्रयोगांत मला कधी यश आले नाही. पण आज तू जे काय केले आहेस त्याला जगात तोड नाही. माझे केवढे मोठे स्वप्न आज साकार झाले. तुझी आयडिया, माझा प्रोग्राम आणि हा रेप्लीकेटर! आपण आज न्यूटन, आईन्स्टाइनपेक्षाही महान शोध लावला आहे. विश्वाचा असा सिद्धांत आहे की विश्वाचा नेहमी व्यवस्थितपणाकडून गोंधळाकडे प्रवास चालला आहे. आज इतिहासात प्रथमच त्याने उलटा प्रवास केला आहे. फ्रॉम डिसऑर्डर टू ऑर्डर!"
डॉक्टर काय बोलले त्यांतले एक अक्षरही मला उमगले नाही. पण ते वेड्यासारखे नाचत होते त्यांत मीही सामील झालो.
जवळच कुठेतरी मल्टीप्लेक्स सिनेमागृहात 'एंड गेम' पिक्चर भरात आला होता. प्रेक्षक पॉपकॉर्न खात खात पिक्चरची मजा लुटत होते. इतक्यात सगळ्यांचे पॉपकॉर्न पाहता पाहता भुरकन् उडून गेले. अगदी नाहीसे झाले. एक कणही शिल्लक राहिला नाही. राहुल आपल्या मित्राला म्हणाला, "बंटी, माझे पॉपकॉर्न कुठे गेले? आता हा टब भरलेला होता. आता ह्यात एक कण नाही. तू तर घेतले नाहीस ना."
सिनेमागृहातल्या सगळ्यांचे पॉपकॉर्न गायब झाले होते. बाहेर पॉपकॉर्न विकणाऱ्याच्या शो-केसमधले पॉपकॉर्नही नाहीसे झाले होते. एकाच थेटरमध्ये नाही तर पुण्याच्या झाडून सर्व थेटरमधले पॉपकॉर्न नाहीसे झाले होते किंवा होत होते. केवळ पुण्यातच नाही तर भारतात सगळीकडे. केवळ भारतात नाहीतर जगात सर्व ठिकाणी. नंतर मी ऐकले की मंगळावर, ग्यानिमिडवर आणि युरोपावर, जेथे जेथे मानवी वसाहती होत्या, जेथे जेथे पॉपकॉर्न संस्कृती पोचली होती तेथे तेथे पॉपकॉर्न नाहीसे होत होते!
ह्याचा सर्वात मोठा फटका सिनेमा उद्योगाला बसला. रसिक प्रेक्षकांना डोक्यात एकदम प्रकाश पडला. आपण इतके दिवस पिक्चर बघायला जात होतो ते खरं म्हणजे एसी मल्टीप्लेक्समध्ये पॉपकॉर्न एन्जॉय करायला जात होतो. पॉपकॉर्न नाहीत मग पिक्चर कशाशी खायचा? हे कटू सत्य लक्षात येताच थिएटरे ओस पडू लागली. सरकारला पण त्याची दखल घ्यावी लागली. त्यांनी झाल्या प्रकारची जबाबदारी शत्रूराष्ट्रावर टाकली आणि खबरदारीचा उपाय म्हणून अठरा औक्षहिणी सैन्य सीमेवर धाडले. पण जेव्हा शत्रूराष्ट्रानेदेखील अशीच तक्रार युनोकडे केली तेव्हा ही एक अख्ख्या विश्वावर आलेली आपत्ती आहे ह्याची जाणीव सगळ्यांना झाली. शेवटी सगळ्यांच्या मते एकोणीसाव्या शतकातल्या श्री पी जे एल नेहरू नावाच्या एका इसमावर टाकण्यात आली. त्या खुंटीवर आधीच कितीतरी लक्तरे वाळत टाकण्यात आली होती त्यांत हे अजून एक! एवढे करून झाल्यावर अखेर अमेरिका ह्यावर काय उपाय शोधून काढते यावर साऱ्यांचे लक्ष केंद्रित झाले.
मला आणि डॉक्टरांना ह्याची काहीच कल्पना नव्हती. आम्ही दोघेही मजेत घरी झोपलो होतो. दुसऱ्या दिवशी टीव्ही लावला. मुख्य ब्रेकिंग न्यूज हीच होती. पॉपकॉर्नचे नाव ऐकताच मी दचकलोच. कालच झालेला पॉपकॉर्नचा कहर अजून माझ्या मनात ताजा होता. माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. ओहो म्हणजे मशीन काम करायचे थांबले नव्हते. ते आता विश्वातले सर्व पॉपकॉर्न फस्त करत होते. अरे बापरे, ह्याचे तर पॉपकॉर्न मॉन्स्टरमध्ये रूपांतर झाले होते. डॉक्टर काय करायला गेले आणि काय झाले.
मी तडक उठलो नि डॉक्टरांच्या बंगल्यावर दाखल झालो. डॉक्टर व्यायाम करत होते. मला बोलण्याची संधी न देताच त्यांनी प्रवचन झाडायला सुरुवात केली, "प्रभुदेसाई, या सूर्यनमस्कारांत केवढी ताकद आहे..."
"ते सर्व सोडून द्या हो. ह्या बातम्या पाहा," मी त्यांना पेपरमधल्या ताज्या बातम्या दाखवल्या. डॉक्टरांनी त्या लक्षपूर्वक वाचल्या. युरोपा आणि ग्यानिमिडचे उल्लेख वाचून ते जरा चरकले असावेत असे मला वाटले.
"ओ माय गॉड!" त्यांच्या तोंडून उद्गार निघाले, "आता आपल्यालाच हे निस्तारायला पाहिजे."
त्यांनी तत्काळ आपला संगणक सुरू केला. त्यात ते काहीतरी बघत होते. ते बघितल्यावर त्यांनी कपाळावर हात मारला, "अगदी नवशिके प्रोग्रामरदेखील करणार नाहीत अशी चूक मी केली. कित्येक पायऱ्यांवरून पुन्हा पुन्हा फिरणाऱ्या ह्या प्रोग्रामला इन्फायनायइट लूपमधून बाहेर पडण्यासाठी वाटच ठेवली नाही. त्यामुळे हा सांगितलेले काम अथक अनंत काळापर्यंत मनोभावे करत राहिला. माय मिस्टेक! आता सुधारतो."
त्यानंतर आम्ही दोनही प्रोग्रामच्या ट्रायल घेतल्या. प्रथम थोडे पॉपकॉर्न बाहेर काढले. जेवढे मागितले तेवढे पॉपकॉर्न मशीनने बाहेर काढले आणि मशीन तात्काळ बंद झाले. आता ते मशीन काढलेले पॉपकॉर्न खात नव्हते. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. ताबडतोब डॉक्टरांनी चॅनेलवाल्यांना फोन करून सांगितले की मला अदृश्य होणाऱ्या पॉपकॉर्नवर इलाज सापडला आहे. मग काय विचारता? चॅनेलवाल्यांची धावपळ उडाली.
मुलाखतीत मात्र डॉक्टरांनी चलाखी केली. त्यांनी सगळा दोष मानवजातीवर टाकला. मानवांनी अगणित पापे केल्यामुळे देवांनी शिक्षा म्हणून त्यांचे पॉपकॉर्न काढून घेतले. त्यांनी जर प्रमाणिकपणाने आपल्या पापांचा झाडा दिला, आणि देवांनी क्षमा करावी अशी प्रार्थना केली तर पॉपकॉर्न परत येतील.
कुठल्या तरी मल्टीप्लेक्समध्ये 'एंड गेम'चे मध्यंतर झाले होते. पॉपकॉर्नच्या स्टालवर लोकांची गर्दी झाली होती. पॉपकॉर्नच्या स्टालवाल्याने देवाच्या फोटोला हार घातला आणि कान पकडून त्याने क्षमा याचना केली, "देवा महाराजा, मी कालपर्यंत पन्नास रुपयांचे पॉपकॉर्न दोनशे रुपयांना विकून मोठे पाप करत होतो. क्षमा करा. आजपासून मी पन्नास रुपयांचे पॉपकॉर्न पन्नास रुपयांनाच विकेन. हा एकदम कट टू कट भाव आहे, माझ्यासाठी फक्त पाच रुपये सुटतात. तेव्हा देवा पॉपकॉर्न परत आणा."
एवढे बोलून त्याने मशीन चालू केले. धडाधडा पॉपकॉर्न बाहेर पडू लागले. सर्व प्रेक्षकांनी एकच आरोळी ठोकली, "आले, आले. पॉपकॉर्न परत आले!"
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे Lol Lol

पहिल्या भागात दुसऱ्या भागाची लिंक द्या
लोकांची पहिल्या भागातून दुसऱ्या भागात आणि दुसऱ्या भागातून पहिल्या भागात जायची सोय करा..

बाकी मी तुमच्या सर्व कथा वाचतोच...

वाह
वाचले दोन्ही भाग
आता मला पॉपकॉर्न हवे आहेत Happy

मला पण पॉपकॉर्न Lol
ती चहा सोबत कपपण खाण्याची आयडीया आवडली आहे. भविष्यात अमलात आली तर बरेच आहे पण पैसे फक्त चहाचेच घ्यावे Lol

कसली भन्नाट कल्पनाशक्ती....
Rofl
हास्याचं इनफनाईट लूप झालंय... आणि हो त्यातून मला बाहेर यायचं नाही. तेव्हा वैधानिक इशारा... असंच लिहित राहा.