पॉपकॉर्न परत आले. -१

Submitted by केशवकूल on 2 August, 2025 - 01:22

पॉपकॉर्न परत आले

पॉपकॉर्न परत आले -१

मी जेव्हा कॉलनीत राहायला आलो तेव्हा कॉलनीला पन्नास वर्षे पूर्ण झाली होती. कॉलनीत बहुतांशी हौसिंग सोसायट्या होत्या. मध्येच एखाददुसरे बंगले होते. बहुतेक सोसायट्यांची पुनर्बांधणी होऊन पाचसहा वर्षे झाली होती. त्यामुळे कॉलनी चकाचक दिसत होती. गावात असा गैरसमज होता की ह्या कॉलनीत फक्त उच्चभ्रू लोक राहातात. मी आधी गावात राहात होतो. रिटायर झाल्यावर फंड, ग्रॅच्युइटी इत्यादींची थोडी रक्कम हातांत आली होती. ती पकडून मी कॉलनीत एक सेकंड हँड फ्लॅट विकत घेतला. फ्लॅट तसा लहान आटोपशीर होता. माझे अनेक वर्षांचे कॉलनीत राहायचे स्वप्न होते ते आयुष्याच्या शेवटी का होईना पण अशा रीतीने साकार झाले. उगीचच स्टेटस वाढल्याची भावना झाली.
काही दिवसांत माझा भ्रमनिरास झाला. आणि गावातल्या लोकांत तसा काही खास फरक नव्हता. इकडे तिकडल्यासारखे लंब्या लंब्या बाता झोंकणारे पण वेळप्रसंगी लहानमोठे समाजकार्य करणारे जन्याभाऊ होते (तसे ते सगळीकडे असतातच म्हणा). राजकारणावर अधिकारवाणीने बोलणारे रावराणे होते. गावातल्या आम्ही जिथे राहात होतो त्या वाड्यातही अशी मंडळी होती. पण रावराणेंचा पल्ला खूप मोठा होता. म्हणजे आमच्या तिथे सेनाभवनात काय खलबते चालली आहेत ह्याची बित्तंबातमी बसल्या जागेवर मिळत असे. पण रावराणे चक्क व्हाईट हाउस आणि क्रेमलिनमधल्या गुप्त बातम्या आम्हाला ऐकवत असतात! सगळीकडे असतात तसे इथेही उसासे टाकणारे कवी होते. आयुष्यांत कधीतरी गुपचूप दारूकाम करणारे आव असा आणणार की रोज रात्री दोन पेग मारल्याशिवाय आपल्याला बाबा झोप येत नाही. असे तरुण इथेही होते जसे ते तिथेही होते. थोडक्यात सांगण्याचा मथितार्थ काय तर कॉलनीत असे काही खास नव्हते. फ्लॅटमध्ये राहाणे आणि वाड्यात राहाणे ह्यांत महत्त्वाचा फरक म्हणजे… जाऊ द्यात. तुम्हाला सर्व काही माहीत आहे.
हा, कॉलनीत अन् गावात एक फरक होता, कॉलनीत डॉक्टर ननवरे होते. गावात खूप डॉक्टर होते. पण ननवरेंसारखा कोणी नव्हता. महत्त्वाची गोष्ट अशी की डॉक्टर ननवरे हे तसले डॉक्टर नव्हते. कॉलेजमध्ये गेल्यावर मला कळले की डॉक्टर-डॉक्टरमध्ये फरक असतो. आमच्या कॉलेजमध्ये खूप डॉक्टर होते. आम्हाला मराठी नवकाव्य शिकवणारे किणीकर हे डॉक्टर होते. काही प्रोफेसर विज्ञानाचे तर काहीजण रसायनशास्त्राचे डॉक्टर होते. आमच्या कॉलनीच्या यायच्या रस्त्यावर एक डॉक्टर राहातात. ते गुरांचे डॉक्टर आहेत. संध्याकाळी तेथे कुत्री, मांजरे घेऊन बरेच लोक गर्दी करतात. माझी आपली कल्पना होती की कुत्रे, मांजरी कधी आजारी पडत नाहीत. मी आजारी कुत्रा अजून बघितला नाही. ऐकून होतो की एखाददुसऱ्या कुत्र्याला वेड लागते. मग म्युनसिपाल्टीचे कर्मचारी येऊन त्यांना पकडून घेऊन जातात. त्याचे पुढे काय करतात काय माहीत. कुत्र्यांचे मेंटल इस्पितळ असते काय? कुत्र्यांनाच माहीत.
माफ करा. गाडी भलत्याच रुळावर गेली. मी थोडा भरकटलो. माझ्या साहेबाची सवय मला लागली. माझा साहेब असाच भरकटत जायचा.
"आम्ही शेवटी चेन्नई स्टेशनला पोचलो कसेबसे," साहेब त्यांच्या तामिळनाडू टूरबद्दल सांगत होता, "आता आम्हाला मुंबईची ट्रेन पकडायची होती. गाडी कुठल्या फलाटाला लागणार ते माहीत नाही. विचारायची सोय नाही. ते तमिळ बोलणार, आपण हिंग्लिश! अशीच गंमत झाली जेव्हा मी स्वीडनला गेलो होतो तेव्हा..."
आम्हांला चेन्नईच्या प्लॅटफॉर्मवर सोडून चालले आमचे साहेब स्वीडनचे विमान पकडायला! आम्हाला पक्के ठाऊक होते की आता अराउंड द वर्ल्ड इन एट डॉलर्स! जाऊद्या ते. आता रिटायर झाल्यावर कशाला उगीच साहेबाचे कथाकथन.
तर मी कुठे होतो? कॉलनीत डॉक्टर ननवरे होते.
आमच्या कॉलनीतल्या बागेशेजारी एक कट्टा आहे. खास आमच्यासारख्या लोकांसाठी. त्याचे काय आहे आमच्या कॉलनीत दोन प्रकारचे लोक रहातात. एक म्हणजे आमच्यासारखे रिटायर्ड पेन्शनर्स. बहुतेकांची मुले अमेरिकेत नोकरदार किंवा शिकायला गेलेली. घरी काही व्यवधान नाही. वेळ कसा घालवायचा माहीत नाही. कट्ट्यावर बसलो की बरा वेळ जातो. दुसरे सॉफ्टवेअरमध्ये काम करणारी तरणी मुले. ती रेंटलवर रहातात. त्यांचे लक्ष दुसरीकडे. ते कशाला संध्याकाळी कट्ट्यावर येणार? ह्या कट्ट्यावरच मी अजब डॉक्टर ननवरेंच्या गजब गोष्टी ऐकल्या.
ननवरे ज्या वेळी कॉलनीत रहायला आले तेव्हा कॉलनीकरांना जरा बरे वाटले. कॉलनीच्या जवळपास गुरांचे डॉक्टर राहात होते. माणसांचा डॉक्टर कॉलनीत रहायला आल्यामुळे अडीअडचणीला आपला हक्काचा डॉक्टर हाताशी राहील ही कल्पना. सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांना निराश केले नाही. असेच एकदा नवऱ्याला घेऊन एक बाई डॉक्टरांकडे धावत पळत आली. रात्रीचे दोनअडीच वाजले असावेत. डॉक्टर पोळीपासून गहू बनवण्याच्या प्रयोगात मग्न होते. त्यावरून नजर न हलवता त्यांनी विचारले, "देशपांडेकाकू, काय प्रॉब्लेम झाला आहे?"
देशपांडेकाकूंना आश्चर्याचा धक्का बसला. ओळख नाही पाळख नाही. मागे वळून बघितले पण नाही कोण आले आहे ते. एकदम देशपांडेकाकू? कमाल झाली. डॉक्टर उत्तराची वाट न बघता बोलले, "प्रभाकरकाकांचे ब्लड प्रेशर वाढले आहे ना?"
डॉक्टरांना मागे वळून बघण्याची सवय नसावी.
"छातीत दुखतेय म्हणून तक्रार करताहेत. हार्ट अटॅकच्या भीतीने घाबरले आहेत," काकांच्या पेक्षा काकूच जास्त घाबरलेल्या दिसत होत्या.
"तुम्ही असं करा शेजारच्या खोलीत जाऊन झोपा. मला पुन्हा त्रास देऊ नका."
काकूंना वाटले आपण चूक केली. दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे होते. ह्याने ना तपासले ना औषध दिले. कसे होणार? शेजारच्या खोलीत गेल्यावर दोघांनाही क्षणार्धात झोप आली. सकाळी उठल्यावर काका भांबावले. कुठे आहोत आपण? काही कळेना. पलीकडच्या कॉटवर बायको घोरत होती. त्यांनी बायकोला हलवून हलवून जागे केले.
जाताना डॉक्टरांचे आभार मानायला त्यांच्या लॅबमध्ये डोकावले.
डॉक्टर त्यांच्या प्रयोगांत मग्न होते.
"थँक्यू डॉक्टर."
"हा, जा आता घरी," आतादेखील डॉक्टरांनी मागे वळून बघितले नाही.
हा पण किस्सा कट्ट्यावर भरपूर चर्वित झाला. दस्तुरखुद्द देशपांडे तिथे होतेच. ते सांगू लागले, "आता तुमचा विश्वास बसेल की नाही मला माहीत नाही. मी जेव्हा बेडवर आडवा पडलो तेव्हा माझी आई बाजूला येऊन बसली. माझ्या केसातून हात फिरवत अंगाई गीत गाऊ लागली."
"निंबोणीच्या झाडामागे
चंद्र झोपला ग बाई
आज माझ्या पाडसाला
झोप का ग येत नाही.
ऐकता ऐकता केव्हा झोपलो, कळलेच नाही."
कट्ट्यावरच्या मेंबरांची डॉक्टरांविषयी निरानिराळी मते होती. काही लोकांच्या मते डॉक्टर अमानवी होते, ऐक, अवगत, अलवंत, आसरा, कालकायक, गानगूड, गिर्हाी, बायांगी, चिंद, जखीण, झोटिंग, तलखांब, दाव, देवाचार, ब्रह्मसमंध, ब्रह्मग्रह, मुंजा, राणगा, लावसट, शाखिणी, सैतान, खविस, पिशाच्च आणि वीर भूत, समंध, ब्रह्मराक्षस, मुंज्या, झोटिंग, वेताळ, चेडा, जिंद, जवरा, कुष्मांड, खवीस ह्यापैकी काही होते का अजून काही ह्याबद्दल त्यांचे एकमत नव्हते. मग कोणी एक गोवा-कोकणाकडचे होते, त्यांनी कोकणच्या भुतांचे आख्यान लावले. बरेच जण भुताखेतांवर विश्वास न ठेवणारे होते. ते म्हणायाचे छ्या, भूत वगैरे थोतांड आहे. डॉक्टर परग्रहावरून किंवा भविष्यकाळातून आलेले असणार. अजून त्या प्रश्नाचा तिढा सुटलेला नाही.
मग ते नवल घडले.
आमच्या कॉलनीच्या मध्यवर्ती जागी एक सर्कल आहे. चांगले मोठे आहे. त्या सर्कलमध्ये बाग आहे. काही मोठी झाडे आहेत, काही फुलझाडे आहेत. अगदी मध्याला ग्रॅनाईटचा मोठा दगड आहे. त्याला शिळा म्हणतात! एका बाजूला लहान मुलांसाठी खेळायची साधने आहेत. म्हणजे झोका, घसरगुंडी, सी-सॉ. सुरुवातीला ही बाग 'कुलीन स्त्रिया व सहा वर्षांच्या आतील मुला-मुलींसाठी संध्याकाळी पाच ते सात' खुली होती. हा प्रश्न एके दिवशी ऐरणीवर आला. कॉलनी कमिटीच्या सभांमध्ये खूप चर्चिला गेला. सरतेशेवटी ती बाग कॉलनीतील आबालवृद्धांसाठी खुली झाली. मग मात्र तेथे कोणी चिटपाखरूदेखील फिरेनासे झाले. टॅक्सीच्या पाठीमागे धावणाऱ्या कुत्र्याप्रमाणे गत झाली. टॅक्सीला ओव्हरटेक केल्यावर कुत्र्याला काय करावे ते सुचत नाही. अगदी तसेच. गंमत तर पुढे आहे.
एके दिवशी नवल घडले. तर त्या शिळेला एक तोटी लावलेली दिसली. बाजूला प्लास्टिकचे कप ठेवले होते. जनुभाऊंना आश्चर्य वाटले. काल परवापर्यंत अशी तोटी नव्हती आज कुठून आली? त्यांनी तडक थेट सावंतांना फोन लावला. "सावंत, ह्या पुरातन शिळेला तुम्ही तोटी लावलीत आणि शिळेच्या सौंदर्याचा, पावित्र्याचा भंग केलात, ह्याचा अर्थ काय?"
सावंतांना आधी प्रकरण काय आहे ते समजले नाही, समजल्यावर ते म्हणाले, "जन्याभाऊ, तो नळ मी लावलेला नाही."
"नसेल तुम्ही लावलेला, पण कुणी लावला ते तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे ना!"
"अहो, मी अध्यक्ष जरूर आहे. याचा अर्थ असा नाही की कॉलनीत कोण कुठे तोट्या लावतो ते शोधत बसू. पुढच्या मिटिंगमध्ये तुम्ही हा विषय जरूर आणा. आपण विस्ताराने चर्चा करू," इतके बोलून सावंतांनी फोन बंद केला.
मी बागेच्या बाहेर बाकड्यावर बसून मोबाइलवर भक्तिगीते ऐकत बसलो होतो. आतून जन्याभाऊंनी आवाज दिला, "अहो प्रभुदेसाई, जरा आत येऊन बघा."
जन्याभाऊंनी नळ दाखवला. ज्याने कुणी लावला त्याची कमाल होती. दगडात नळ कसा घुसवला असेल? आणि कशासाठी? निखळ गंमत म्हणून?
"जन्याभाऊ, हा नळ वरून दगडाला डकवला आहे. फेविकॉल वापरून. गंमत करण्यासाठी. जरा जोर लावला की उखडून येईल."
"आणि हे प्लास्टिकचे कप कशासाठी?
मी पुढे होऊन नळाला जोर लावून बघितलं. नळ जाम हलायला तयार नाही. म्हणले, बघू पाण्याचे कनेक्शन दिले आहे का आतून. म्हणून नळ उघडला तर काय नळातून गढूळ गरम पाण्याची धार लागली होती. "जन्याभाऊ, हे पाहा उकळत्या पाण्याची धार."
जन्याभाऊंना काहीतरी संशय आला असावा. त्यांनी बाजूचा एक कप उचलून कपात धार पकडली. नळ बंद केला आणि पाण्याचा घोट घेतला.
"अरे प्रभुदेसाई, हा चहा आहे,चहा, अमृततुल्य! अहाहा, देवाची करणी आणि दगडंत चहापाणी. प्या तुम्ही पण एक कप." मी घाबरत घाबरत एक कप चहा घेतला. काय छान चव होती. पुण्याच्या भाषेत बोलायचे तर 'अप्रतिम!' फुकट एक स्पेशल!
फुकट स्पेशल चहाची वार्ता सगळीकडे वणव्यासारखी पसरली. राजापूरला गंगा आली त्याप्रमाणे. बायाबापड्या येऊन शिळेची पूजा करू लागले. प्रसाद म्हणून जाताना किटलीभर चहा घेऊन जाऊ लागले. बघता बघता शिळेची शीलादेवी झाली. कॉलानीतल्या एका नवोदित कवीने शीलादेवीची आरती रचली. कुणी स्तोत्रं रचली. एक सीडी भरून मटेरीअल जमा झाले. देवीचे पुराणातले दाखले शोधून काढण्यात आले. पांडव वनवासात असताना कॉलनीत आले होते आणि त्यांनी देवीची पूजा करून महायुद्धात विजय मिळावा म्हणून देवीची प्रार्थना केली होती.
हे सगळे ठीक होते पण बागेची आणि कॉलनीची पार रया गेली. स्वच्छ कॉलनी म्हणून आमच्या कॉलनीची पुण्यात प्रसिद्धी होती ती लयास गेली.
एका रात्री देवीचे दर्शन आणि प्रसाद घेऊन मी घरी आलो. थोडा टीव्ही बघितला आणि जेवायला बसणार इतक्यात डॉक्टरांचा फोन आला, "अरे प्रभुदेसाई, हे मी काय ऐकतो आहे. बागेत म्हणे शीलादेवी अवतीर्ण झाली आहे?"
"कमाल आहे, एवढे रामायण झाले पण तुम्हाला त्याची अजिबात कुणकुण नाही?" मीच डॉक्टरांना उलट प्रश्न केला.
"मी तुमच्या कॉलनीच्या भानगडीत पडत नाही. तसे म्हणजे मी माझ्या मठीतून क्वचितच बाहेर पडतो. आमच्या इथून कॉलनीच्या बाहेर पडायला रस्ता आहे. मग तुमच्या सर्कलकडे जायची गरज काय?"
मी डॉक्टरांना काय झाले नि काय होत आहे ह्याची कल्पना दिली, "सगळेजण चहा पिऊन कप तिथेच कुठेतरी फेकून देतात. बागेत सगळीकडे उंदीर झाले आहेत."
"अरेरे काय मूर्ख आहेत लोक. तू असे कर, उद्या सकाळी इकडे चहा प्यायला ये माझ्याकडे," आमंत्रण देऊन डॉक्टरांनी फोन बंद केला.
दुसऱ्या दिवशी बघतो तर काय बागेत प्रचंड उलथापालथ झालेली! चहाची तोटी गायब! तोटीबरोबर चहाही गेला आणि देवीही गेली. बाजार गेला. दुकाने गेली. हार-तुरे कोमेजून गेले. लाईनी गेल्या. लोक निराश होऊन परतू लागले. जाणते लोक सांगू लागले की देवीचा कोप झाला. कुणीतरी भाकीत केले. आता कॉलनीवर संकट कोसळणार. संध्याकाळ झाल्यावर मी तडक डॉक्टरांच्या बंगलीकडे गेलो. झालेला प्रकार त्यांना निवेदन केला, "अशा प्रकारे देवी स्वगृही परत गेली."
"मी तुम्हा लोकांसाठी म्हणून नळ ठेवला. विचार केला होता. तुम्हा कट्टेकर मंडळींना बसल्या जागी चहा मिळेल. तुमच्यासाठी खास एटीटी – एनी टाईम टी - तर पाहा काय करायला गेलो नि काय झाले." डॉक्टरांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली. म्हणजे एकूण हे कर्तृत्व डॉक्टरचे होते. आता मात्र मला डॉक्टरांची भीती वाटू लागली.
"त्याचे काय आहे. सर्व हॉटेलवाल्यांचे एक अंडरग्राउंड जाळे आहे. सगळ्यांचा चहा एका मोठ्या टाकीत बनवला जातो. प्रत्येक हॉटेलवाला त्याचा मेंबर आहे. मेंबर झाला की त्याला ह्या "चहा नेटवर्क"मध्ये टॅप मारून देतात. उडपी चहाचा वेगळा हौद आहे तसा इराणी चहाचा पण वेगळा हौद आहे. ते जाळे हॅक करून मी एक कनेक्शन आपल्यासाठी काढले. काल तू सांगितल्यावर बंद करून टाकले," डॉक्टरांनी मला सफाई दिली.
"डॉक्टर एवढे प्लंबिंगचे काम तुम्ही चुपचाप कसे उरकले?"
"मी कोण करणार?" डॉक्टरांनी वर बोट दाखवले, "तो महान प्लंबर आहे. त्यानेच हे घडवून आणले. आपण निमित्तमात्र!"
"बरं ते जाऊ दे. तू चहा घेणार ना?" डॉक्टरांनी मला विचारले.
"तोच चहा का? टॅप मारलेला. मग नको." काल परवापर्यंत जो चहा मी आवडीने पीत होतो त्याची आता घृणा आली.
"नाही. नाही. हा माझ्या घरच्या मशीनमध्ये बनवलेला चहा आहे. त्याचे काय आहे, कोणाला सांगू नकोस बरं का, मी सध्या एटीएफ मशीन म्हणजे एनी टाईम मशीन फूड बनवण्याच्या प्रयोगांत गुंतलो आहे; आतापर्यंत चहाचे मशीन बनवण्यात मला यश मिळाले आहे. त्या मशीनमध्ये पॉपकॉर्न बनवण्याचे माझे स्वप्न आहे. ते साकार झाले की पहिले पॉपकॉर्न खायला तुलाच बोलावीन," एवढे बोलून डॉक्टरांनी मला चहा देऊ केला.
zzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
भाग २ ची लिंक
https://www.maayboli.com/node/87001

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही लोकांच्या मते डॉक्टर अमानवी होते, ऐक, अवगत, अलवंत, आसरा, कालकायक, गानगूड, गिर्हाी, बायांगी, चिंद, जखीण, झोटिंग, तलखांब, दाव, देवाचार, ब्रह्मसमंध, ब्रह्मग्रह, मुंजा, राणगा, लावसट, शाखिणी, सैतान, खविस, पिशाच्च आणि वीर भूत, समंध, ब्रह्मराक्षस, मुंज्या, झोटिंग, वेताळ, चेडा, जिंद, जवरा, कुष्मांड, खवीस

जबरा अभ्यास, भूत योनीचा एन्साय्क्लोपीडियाचं जणू