कालान्तर - अरुण टिकेकर
गेल्या 50-60 वर्षांत आपल्या समाजात झालेल्या पडझडीचे चित्रण करणारा 43 लेखांचा हा संग्रह. हे लेख मुळात लोकमत दैनिकाच्या मंथन पुरवणीसाठी लिहिलेले होते. स्वातंत्र्याच्या कालखंडात आपण काय कमावले आणि काय गमावले यांचा हा ताळेबंद. त्यातून लक्षात येते की, कमावण्याच्या बाजूला थोडेच असून गमावण्याच्या बाजूला मात्र भरपूर आढळले आहे. काही स्वागतार्ह बदलांपेक्षा पडझड मात्र कितीतरी अधिक व चिंताजनक आहे. याचे चित्रण करताना शिक्षण, व्यवसाय, समाजकारण, राजकारण, व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवन अशा विविध प्रांतांचा कानोसा घेतला आहे.
सुरुवातीच्या तब्बल 13 लेखांतून शिक्षण पद्धतीत झालेले बदल टिपले आहेत. त्यात पाठांतर, शुद्धलेखन, उच्चार आणि हस्ताक्षरापासून ते संस्कार, गुरु-शिष्य नाते आणि विद्यापीठातील शिक्षणापर्यंतचे मुद्दे हाताळले आहेत. एकेकाळी शिक्षक हे मुलांचे शाळेतील पालकच असत आणि त्यांना मुलांच्या वर्तणुकीनुसार त्यांना शिक्षा करण्याचा पूर्ण अधिकार होता. या गोष्टीला पालकांचा देखील पाठिंबा होता. परंतु आता या परिस्थितीत आमूलाग्र बदलला झालेला असून आता शाळेच्या वर्गात शिक्षकाला एखाद्या विद्यार्थ्याला शाब्दिक टोमणा देखील मारायची पंचाइत झालेली आहे. विद्यापीठ पातळीवर प्राध्यापकांनी इंटरनेटच्या राक्षसाची मदत घेऊन बेगडी संशोधनाचे कारखाने कसे उघडलेत यावरही टिप्पणी केली आहे.
आपल्यावरील दीर्घकालीन ब्रिटिश राजवटीमुळे पडलेला प्रभाव आणि जागतिकीकरणानंतर पडलेला अमेरिकी प्रभाव आणि त्यातून झालेला संस्कृतीसंगम यांचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे. ब्रिटिश आणि भारतीय संस्कृतींच्या नीतीसंहितेत बरीच साम्यस्थळे होती. त्यापैकी एक महत्त्वाचे तत्त्व म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरावेत. हेच तत्त्व ब्रिटिशांच्या ‘लिव्ह विदिन द मीन्स’मध्ये दिसून येते. या उलट अमेरिकी संस्कृती ‘ऋणं कृत्वा घृतं पिबेत’ या तत्वाला महत्त्व देणारी असून EMI हे तिचे दर्शनी रूप आहे आणि त्याचा आपल्यावर जबरदस्त परिणाम झालेला दिसतो. मात्र अमेरिकी संस्कृतीतील शारीरिक श्रमालाही प्रतिष्ठा देणारे तत्त्व मात्र आपल्यापासून अजून बरेच दूर आहे.
पुस्तकात सार्वजनिक शिष्टाचारासंबंधी तीन-चार प्रकरणे असून त्यामध्ये केलेली युरोपीय संस्कृती आणि आपली तुलना महत्त्वाची आहे. 16 व्या शतकात युरोपात प्रसिद्ध झालेल्या Galateo या सामाजिक शिष्टाचारासंबंधी पुस्तकाचा संपूर्ण युरोपवर चांगला प्रभाव पडला. या उलट भारतात त्यासंबंधी एकंदरीत उदासीनताच दिसून आली. महाराष्ट्रात श्रीधर शामराव हणमंते यांनी देखील ‘व्यवहार आणि शिष्टाचार’ हे पुस्तक लिहिले होते परंतु त्याचा प्रचार आणि प्रसार फारच अपुरा पडला. या संदर्भात अलीकडील काळातील काही प्रयत्न स्तुत्य आहेत. इतरांचा विचार करण्याची सवय सर्व समाजघटकांना लावता येण्याच्या दृष्टीने ‘मानव अभिमुखता शास्त्र’ या शाखेचा उगम झालेला आहे. त्या संदर्भात अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. शंकर मोडक हे चांगले काम करीत असून त्यांनी या विषयावरील छोटे पुस्तकही लिहिले आहे. दैनंदिन जीवनातील चिडचिड, गोंधळ आणि अपमान टाळण्याच्या दृष्टिकोनातून त्या पुस्तकात काही उपयुक्त सूचना केलेल्या आहेत. हे वाचल्यावर या पुस्तकाबद्दल उत्सुकता वाढली.
कौटुंबिक पातळीवरील महत्त्वाचे स्थित्यंतर म्हणजे आकाराने आक्रसत गेलेली कुटुंबे. मोठ्या अविभक्त कुटुंबापासून ते आता (निदान शहरी भागात) फक्त दोन व्यक्तींच्या कुटुंबापर्यंत समाजाने मजल मारलेली दिसते. त्याचे अधिकउणे परिणाम आपणा सर्वांसमोर आहेतच. दोन पिढ्यांमधील बदललेले नातेसंबंध, खंडित झालेली बौद्धिक आणि वैचारिक परंपरा आणि सचोटी-प्रामाणिकपणा-मेहनत या गुणांना आपण दिलेली तिलांजली आणि फोफावलेला भ्रष्टाचार यासंबंधीचे विवेचन चिंतनीय आहे.
शिक्षणाचा प्रसार होऊन देखील लोकांत धर्मभावना कमी होण्याऐवजी वाढीस लागली; धर्म रस्त्यावर आला आणि त्याला राजकारणाचे अधिष्ठानसुद्धा मिळाले. राहणीमान आणि पोशाखात आधुनिक असलेला समाज विचारात मात्र कालविसंगत राहिला. मग तो आधुनिक कसा, हा प्रश्न पुस्तकात उपस्थित केलेला आहे. औद्योगिक क्रांतीची फळे आपण जरूर चाखली, मात्र तिचा वैचारिक परिणाम आपल्यावर झालेला दिसत नाही. व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली अनेक बाबतीत कर्मठपणा मुरलेला दिसून येतो. समाजधुरिणांचे असे जबाबदारी विसरलेले व्यक्तीस्वातंत्र्य समाजाला आधुनिकतेच्या दिशेने नेत नाही.
सुदृढ समाज जीवनासाठी आपल्यासमोर काही आदर्शांची सतत गरज असते. स्वातंत्र्यपूर्व काळातील काही थोर लोक त्यांच्या मृत्यूनंतर देखील आख्यायिकेच्या रूपाने राहिले आहेत. त्यामध्ये लोकमान्य टिळक आणि न्यायमूर्ती रानडे यांची उदाहरणे दिली आहेत. परंतु या पुढच्या काळात कोणाचीही आख्यायिका बनणे असंभव वाटल्याचे लेखक लिहितात. त्याचे कारण म्हणजे आता आपला समाज जातीय, प्रादेशिक आणि धार्मिक अस्मितांच्या संघर्षात अडकून पडलेला दिसतो. सध्याच्या पुरस्कार संस्कृतीवरही पुस्तकात बोचरे भाष्य आहे. पुरस्कार सवंग आणि उदंड झाल्यामुळे समाज आता त्याकडे गांभीर्याने बघतही नाही. राज्यव्यवस्थेबद्दल तर काय बोलणार ? देशात कागदोपत्री लोकशाही असली तरी वास्तवात मात्र तिचे नव्या पद्धतीच्या राजेशाहीत रूपांतर झालेले दिसते.
समाजाची आर्थिक प्रगती आणि गरिबी श्रीमंती यावरही काही चिंतन केलेले आहे. एकंदरीत मध्यमवर्गाची आर्थिक उन्नती चांगली होऊन तो उच्च मध्यम आणि काही प्रमाणात श्रीमंत देखील झाला. लेखक श्रीमंतीचे दोन प्रकार सांगतात - मुरलेली आणि बटबटीत. मुरलेली श्रीमंती दिलदार असून दातृत्व हा तिचा स्थायीभाव असतो. या उलट बटबटीत श्रीमंतीत अभिरुचीचा दिखाऊ खोटेपणा असतो. सांस्कृतिक प्रगल्भता आणण्यासाठी समाजातील धनिकांनी दानशूर असायला हवे हा धडा अजून आपल्या नवपिढ्यांन शिकण्याची गरज आहे.
. . .
या वास्तव दर्शनानंतर महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे समाजातील हा सार्वत्रिक काळोख जाऊन नवी पहाट कधी उजाडणार? त्यासाठी प्रयत्नांचे पहिले पाऊल कोण टाकेल हा तर यक्षप्रश्न. लेखकाच्या मते ती सुरुवात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांकडूनच होईल. आज सर्वच व्यवसाय भ्रष्टाचारात अडकले असताना थोडाफार आदर्शवाद फक्त याच वर्गात शिल्लक असल्याचे ते म्हणतात. म्हणून या वर्गाला पाठबळ मिळावे अशी आशा व्यक्त केलेली आहे.
एकंदरीत विचारप्रवर्तक आणि आत्मपरीक्षण करायला लावणारे हे लेखन. दररोज दोन लेख या संथ गतीनेच ते वाचले आणि समजावून घेतले. काही लेखांचे पुनर्वाचन नक्कीच करावेसे वाटते. पुस्तकाचा पूर्वार्ध बराच वाचनीय आणि रोचक वाटला तर उत्तरार्धात केलेले चिंतन मात्र काही वेळा जरा जड झालेले आहे. अर्थात मूलगामी चिंतन या दिशेने जाणे स्वाभाविक असते. पुस्तकाच्या शीर्षकात अनुस्वार न वापरता ‘न्त’ असे जोडाक्षर वापरणे हे देखील उल्लेखनीय ! मुखपृष्ठ शेखर गोडबोले व राजू देशपांडे या द्वयीचे असून ते साधे, सरळ आणि लक्षवेधी आहे. सवंग मनोरंजन आणि ढासळत्या वाचनसंस्कृतीच्या काळात अशा वैचारिक पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघालेली पाहून समाधान वाटले.
************************************************************************************************
कालान्तर - अरुण टिकेकर
रोहन प्रकाशन
दुसरी आवृत्ती, 2017
अतिशय विचारप्रवर्तक झाला आहे
अतिशय विचारप्रवर्तक झाला आहे परिचय. काही काही वाक्ये तर सुविचारासारखी वाटली. आपल्या समाजात बऱ्याच साध्या गोष्टी ज्या खरेतर विवेकातूनच यायला हव्यात त्याचे सुद्धा प्रशिक्षण द्यायची वेळ आली आहे. शिवाय ज्यांना इतरांचा विचार मनात येतो, त्यांना बरीचशी 'वाढ' आपली आपल्याच करावी लागते.
सर, एव्हढी दीर्घ मालिका
सर, एव्हढी दीर्घ मालिका वाचून सुंदर परिचय करून दिलात त्याबद्दल आभार.
लेखमालिका म्हणून अशा लेखांचे वाचक वाट पाहतात. त्या त्या लेखमालिकेच्या काळात असे लेख वाचून होतात. पुस्तकरूपाने प्रकाशित झाल्यानंतर (माझं तरी) मुद्दामहून अशा लेखमालिकेचे वाचन होत नाही. पण एखाद्या टिव्ही मालिकेच्या निर्माता दिग्दर्शकाला, लेखकाला, पतकथा लेखकाला, सिनेमा किंवा कथा कादंबरी लिहीणार्यांसाठी हे महत्वाचे पुस्तक ठरेल यात शंका नाही.
चिकवाच्या धाग्यवर सिनेमातून त्या त्या काळात दिसणारी स्थळे, चालीरिती आणि अन्य तपशील हे महत्वाचे आहेत अशी चर्चा झाल्याचे आठवले. आत्ता तरी वाचण्याच्या मूड मधे नाही. पण नंतर लागेल तेव्हां नक्की आणून वाचीन.
सुंदर परिचय!
सुंदर परिचय!
वरील बरेच मुद्दे कित्येकदा टोचत असतात.
विचारप्रवर्तक आणि आत्मपरीक्षण करायला लावणार्या अशा एका पुस्तकाचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद!
छान! हा माझा सध्याचा अत्यंत
छान! हा माझा सध्याचा अत्यंत आवडीचा विषय आहे त्यामुळे ह्या पुस्तकाची नोंद करून ठेवली आहे. तुम्ही परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या समाजातील आणि संस्कृतीतील बदलत जाणाऱ्या बाबी समजण्यासाठी म्हणून निश्चितच उपयोगी होईल.
तुमच्या परिचयावरून लेखकाची काळानुसार समाजातील होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करण्याची पद्धत आदर्शवादाच्या तत्वांवर अवलंबून असल्याचे कळते, ज्याला माझ्या मते काही मूलभूत मर्यादा आहेत. अर्थात ह्या लेखमालिकेचा अभ्यास करण्याआधी त्यावर अधिक काही बोलणे योग्य होणार नाही.
दोनेक वर्षांपूर्वी ह्याच संदर्भात एकूण जागतिक परिस्थितीचे पण द्वंद्वात्मक/ऐतिहासिक भौतिकवादी पद्धतीने विश्लेषण करणारी एक डॉक्युमेंटरी बघण्यात आली होती तिची लिंक देऊन ठेवतो https://youtu.be/-jLbq9VwOK8?si=tr6wlE_yDRpafUp2
उत्तम परिचय. धन्यवाद, कुमार
उत्तम परिचय. धन्यवाद, कुमार सर.
धन्यवाद वाचकहो !
धन्यवाद वाचकहो !
. .
* खरेतर विवेकातूनच यायला हव्यात त्याचे सुद्धा प्रशिक्षण >> अगदी.
. . .
* त्या त्या काळात दिसणारी स्थळे, चालीरिती आणि अन्य तपशील >>> +११
म्हणून नोंदणीचे महत्त्व आहे.
* बरेच मुद्दे कित्येकदा टोचत
* बरेच मुद्दे कित्येकदा टोचत असतात. >>> एकंदरीत नागरी जाणिवेचा अभाव सर्वत्र जाणवतो. पुस्तकात मोबाईल संस्कृतीवर पण एक लेख आहे. त्यात परदेश आणि आपण यातला फरक चांगला अधोरेखित केलेला आहे, जो आपण सगळे जाणतोच.
. .
* कळते, ज्याला माझ्या मते काही मूलभूत मर्यादा आहेत.>> +१
* डॉक्युमेंटरी बघण्यात आली होती तिची लिंक >> सवडीने पाहतो.
उत्तम परिचय! लेख खूप आवडला.
उत्तम परिचय!
लेख खूप आवडला.
पुस्तकाच्या शीर्षकात अनुस्वार न वापरता ‘न्त’ असे जोडाक्षर वापरणे हे देखील उल्लेखनीय >>>
आमच्या संपादकांकडून याचं एक कारण ऐकलं आहे- खिळे जुळवणी पद्धत वापरली जायची तेव्हा अनुस्वारांसाठी खूप खिळे लागायचे, कारण एकंदर पुस्तकाच्या इ. मजकुरात अनुस्वार जास्त असतातच. त्यामुळे मग जिथे शक्य असेल तिथे पर्यायी खिळा वापरला जायचा. त्यामुळे त्या काळातल्या बर्याच लेखकांना लिहितानाही तसे पर्याय वापरण्याची सवय होती.
(इथे टिकेकरांचा काही वेगळा उद्देश असेल तर कल्पना नाही.)
ल-प्रि,
ल-प्रि,
*‘न्त’ असे जोडाक्षर वापरणे >>
त्यांच्या हेतूबद्दल कल्पना नाही पण २ शक्यता मांडतो :
१. मागे मायबोलीवर अनुस्वार की अर्धा न या संदर्भातल्या काही नियमांची चर्चा झाली होती. तर शुद्धलेखनाच्या दृष्टिकोनातून कदाचित अर्धा 'न' हे अधिक योग्य असावे असा अंदाज.
२. दुसरी शक्यता : अंतरचे दोन अर्थ आहेत :
1 अंतःकरण, मन, हेतु.
2. फरक, फेर, स्थलावकाश, कालावकाश
(शुद्ध मराठी कोश (बापट पंडित)
त्यामुळे या पुस्तक-विषयाला अनुसरून वरचा फक्त दुसराच अर्थ प्रतीत होण्यासाठी तर अर्धा 'न' वापरलेला असावा ?
जाणकारांनी सांगावे.
उत्तम पुस्तक परिचय. धन्यवाद!
उत्तम पुस्तक परिचय. धन्यवाद!
लेख वाचल्यापासून कालान्तर
लेख वाचल्यापासून कालान्तर ऐवजी स्थित्यंन्तर / स्थित्यंतर शीर्षक असायला हवं असं वाटत होतं.
* स्थित्यंन्तर / स्थित्यंतर
* स्थित्यंन्तर / स्थित्यंतर
>>> लेखकाला स्वातंत्र्यपूर्व काळ, तेव्हाची पिढी आणि आताचा काळ, आताची पिढी यांची तुलना करायची असल्याने त्यांनी काल या शब्दाला महत्त्व दिले असावे. (व्यापकता).
स्थित्यंतर हे एखाद्या व्यक्ती किंवा पिढीपुरते देखील असू शकते; त्या अर्थाने ते मर्यादित असते.
अच्छा. समजलं.
अच्छा. समजलं.
डॉक्टर, छान परिचय. पुस्तक
डॉक्टर, छान परिचय. पुस्तक वाचायलाच पाहिजे.
>>*‘न्त’ असे जोडाक्षर वापरणे
>>*‘न्त’ असे जोडाक्षर वापरणे >>
अनुस्वार किंवा जोडाक्षर ह्यासंबंधी आधी वाचले होते.
बाराखडीतील कचटतप ह्या वर्णमालेतील प्रत्येक वर्गातील शेवटचे अक्षर हे अनुनासिक आहे.
जसे क ख ग घ ड़ च छ ज झ ण वगैरे.
त्यामुळे अनुस्वाराचा उच्चार नंतर येण्यार्या अक्षरानुसार बदलतो.
उदा. अंबर मध्ये अनुस्वाराचा उच्चार पुढे येणार्या ब मुळे म असा होतो म्हणजे अम्बर.
तोच अंतर मध्ये अन्तर असा होतो
अंगठी मध्ये अड़्गठी असा होतो. वगैरे.
कदाचित हा गोंधळ दूर करण्यासाठी योग्य जोडाक्षर वापरणे जास्त सयुक्तीक असावे.
धन्यवाद, समजलं !
धन्यवाद, समजलं !
धन्यवाद, समजलं !
.
काय सुरेख ओळख करुन दिलीत
काय सुरेख ओळख करुन दिलीत डॉक्टर.
सुंदर परिचय !
सुंदर परिचय !
पुस्तकाची नोंद करून ठेवली आहे.
छान पुस्तकपरिचय. बदललेल्या
छान पुस्तकपरिचय. बदललेल्या जीवनमूल्यांमुळे समाजापासून तुटलेपण जाणवते. आता 'लाईफ स्किल्स' हा अभ्यासक्रम बहुतेक सगळ्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. 'इन्टरनॅशनल ह्यूमन व्हॅल्यूज' हा त्यातला एक मुद्दा वा विषय आहे. तो शिकून तरी जीवनमूल्ये सुधारतील?
तरी मी आशावादी आहे. जशी काही पिढ्यात जीवनमूल्ये घसरली तशीच ती पुढील काही पिढ्यात उन्नत पण होतील.
धन्यवाद !
धन्यवाद !
* अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. 'इन्टरनॅशनल ह्यूमन व्हॅल्यूज
>>>> चांगला आणि गरजेचा उपक्रम.
आता 'लाईफ स्किल्स' हा
आता 'लाईफ स्किल्स' हा अभ्यासक्रम बहुतेक सगळ्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. 'इन्टरनॅशनल ह्यूमन व्हॅल्यूज' हा त्यातला एक मुद्दा वा विषय आहे. तो शिकून तरी जीवनमूल्ये सुधारतील? >>> महत्वाचे.
या अमेरिकन तरूणीचे म्हणणे व्हायरल होतंय.
https://www.youtube.com/watch?v=0NOHftRposw
* अमेरिकन तरूणीचे म्हणणे >>
* अमेरिकन तरूणीचे म्हणणे >> ऐकले.
प्रत्येक ठिकाणच्या समाजजीवनात वेगवेगळी सुखदुःखे आहेत हे खरे !
खूप छान परिचय कुमारजी! मूळ
खूप छान परिचय कुमारजी! मूळ पुस्तकाच्या विषयाइतकेच हा परिचयही मुद्देसुद वाटला! वाचायला हवे पुस्तक.
आवडली ओळख! छान लिहीले आहे.
आवडली ओळख! छान लिहीले आहे. पुस्तक वाचायची उत्सुकता आहे.
नावावरून "पडझडी"चे चित्रण आहे हे स्पष्ट आहे. पण काही चांगल्या बदलांचीही दखल घेतली आहे का?
‘मानव अभिमुखता शास्त्र’ या शाखेचा उगम झालेला आहे. >>> हे फार इंटरेस्टिंग आहे. इन जनरल आपल्याकडे हे फार गरजेचे आहे.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
. . .
* चांगल्या बदलांचीही दखल>>> चांगला प्रश्न.
चांगले बदल थोडेच आहेत व त्यातले उल्लेखलेले हे काही :
* * चांगल्या बदलांचीही दखल? >
* * चांगल्या बदलांचीही दखल? >>>
या प्रश्नामुळे एक जुनी चांगली आठवण जागी झाली. सन 2002मध्ये दैनिक पुणे लोकसत्ताने हिरवळ नावाचा एक उपक्रम राबवला होता. त्याचे आशयसूत्र सांगतो.
एरवी मध्यमवर्गीय पारावरच्या गप्पांमध्ये सातत्याने समाजातील बजबजपुरी आणि वाईट गोष्टींबद्दलच बोलले जाते. एकत्र जमलेली माणसे मनापासून चांगल्या विषयांवर बोलताना पाहणे हे दृश्य एकंदरीत दुर्मिळ असते. तर समाजात सगळंच काही वाईट चाललेलं ( वाळवंट झालेलं) नाही, काही गोष्टी निश्चितच चांगल्या/विधायक प्रकारातील आहेत. अशा चांगल्या गोष्टी टिपून वाचकांनी त्यासंबंधी या सदरातून लिहायचे होते.
मी देखील त्या सदरासाठी एका समाजसेवी व्यक्ती आणि उपक्रमाबद्दल एक स्फुट लिहिले होते.
धन्यवाद डॉ कुमार!
धन्यवाद डॉ कुमार!
बाय द वे, आर्थिक उदारीकरणामुळे ममव (मराठी मध्यमवर्गीय - पांढरपेशे लोक - बहुतांश उच्चवर्णीय समजले गेलेले) लोकांचा विकास झाला असे जे अनेकदा सांगितले जाते ते अर्धसत्य आहे. विकास "फक्त" ममव लोकांचा झाला नाही. समाजातील सर्व स्तरातील ज्या लोकांनी उदारीकरणामुळे समोर आलेल्या संधी ओळखल्या व त्यांचा फायदा करून घेतला - त्या सर्वांचा विकास झाला.
- सत्ताधारी वर्ग, मोठे उद्योगपती यांच्या संपत्तीची लेव्हल अनेकपट वर गेली. यातील अनेकांनी ९०ज मधे काळाची पावले ओळखून गुंतवणूक केली. यात परदेशी कंपन्यांशी भागीदारी इथपासून ते आगामी सरकारी/खाजगी गुंतवणुकीची कुणकुण लागून जनतेला माहीत होण्याआधीच जमिनी खरेदी करणे वगैरे हे सगळे आले.
- ममव लोकांपैकी ज्यांनी इलेक्ट्रॉनिक्स व सॉफ्टवेअर क्षेत्रात शिक्षण घेतले ते. यात मूळचेच अॅकेडमिक शिक्षण घेतलेले - जे लगेच चांगल्या पगाराच्या व संधीच्या नोकर्यांमधे गेले ते तर आलेच. पण कित्येक लाखांत असेही लोक आहेत की जे मूळचे यात नव्हते. पण मूळ फील्ड वेगळे असले, तरी कॉलेज शिक्षण झाल्यावर काही कोर्सेस करून यात शिरले व यशस्वी झाले.
- या नवीन उद्योगांना लागणारा कामगार वर्ग, त्याकरता लागणारे पूरक व्यवसाय (जेवणाचे कंत्राट, सिक्युरिटी, साफसफाई कामगार, ड्रायवर्स ई - यात काम करणारे व यांचे कंत्राटदार दोन्ही) यातून प्रचंड संख्येने मूळच्या गरीब वर्गातूनही खूप लोक मध्यमवर्गीय ते श्रीमंत कॅटेगरीत आले.
यात वरून खाली जाउ तसे लोक संख्येने जास्तच असतील. फक्त एक आहे - हे सगळे नेहमी स्थानिकांना आपोआप मिळाले नाही. ज्यांनी संधी ओळखल्या त्यांना व त्यांच्याशी ज्यांचे कनेक्शन होते त्यांना याचा फायदा झाला. नाहीतर जवळच मोठी इण्डस्ट्रियल इस्टेट येउन सुद्धा स्थानिकांच्या आर्थिक परिस्थितीत काहीच फरक नाही -असेही झाले आहे. हिंजवडीतील "विकासा"बद्दल मधे एक लेख वाचला होता - त्या विकासातून स्थानिकांना फारसे काही मिळाले नाही वगैरे. समकालीन प्रकाशन हे नाव आठवते पण त्यांचा होता की त्यांच्याशी संबंधित वेबसाइटचा, ते लक्षात नाही. लिंक सापडली तर देतो.
फा ए
फा ए
चांगले विवेचन.
* ज्यांनी संधी ओळखल्या त्यांना व त्यांच्याशी ज्यांचे कनेक्शन होते त्यांना >>> +११
उत्तम परिचय! लेख आवडला.
उत्तम परिचय!
लेख आवडला.