पूर्वा सायकल सर्कस

Submitted by ब्लू कोलंबसे on 3 July, 2025 - 03:11

मित्राचं घरचं ज्वारीचं दळण टाकायला शेजारच्या ‘कागनरी’ गावात गेलो होतो. गाव ४ किमी.अंतरावर! (शहरी लोकांनी हा फरक ध्यानात घ्यावा).संध्याकाळी कोरड्या माळरानावर गाडी पळू लागली. मी गार,बोचरं वारं अंगावर घ्यायला लागलो. १५ मिनटात गाडी गावात शिरली.

गावात सर्कशीच वातावरण होतं. एका ट्रकवर ‘पूर्व सायकल सर्कस’ असं फ्लेक्सवर छापलं होत.खाली पत्ता: ‘अनंतपुर,जि.धर्मावरम,आंध्र प्रदेश’! मंडळी बरीच लांबून आलेली होती. गाडी गावात पिठाच्या गिरणीसमोर थांबली. पोतं इतर पोत्यांबरोबर जाऊन पडलं, दळण्यासाठी! गावात पारावर,मुख्य रस्त्यावर त्या सर्कशीच्या आवाजाबरोबर गर्दी जमत होती. तरणी पोरं, शाळेत जाणारी चिल्लीपिल्ली आणि शेतावरनं परतलेले गडी-लोक त्या पोरांच्या तयारीकडे बघत, गप्पा मारत बसले होते. आम्हीसुद्धा एक कट्टा पकडून,शेजारच्या किरण दुकानातून आणलेला पापडी पुडा फस्त करत बसलो. माझा शहरात राहणारा मित्रही बरोबर आला होता. मीही बऱ्याच वर्षांनी एका खेडेगावचं रात्रीचं रुपडं पाहत होतो.गावाच्या मध्यातून जाणाऱ्या चुकत एका अन्टेनावर मोठे २-३ स्पीकर्स बसवले होते. खालीच खांबाभोवती टेप घेऊन एक पोरगेलासा जवान बसला होता.गाणं मोठ्या आवाजात चालू होतं.

खेळ सुरु झाला.सुरुवातीला गर्दी जमावी म्हणून त्या सर्कशीच्या मुख्य माणसाने एक मस्त फेमस ठेक्यातले तेलुगु गाणे लावले. पुढे मिश्र प्रकाशझोताची व्यवस्था करण्यात आली होती. त्या ट्रकच्या एका बाजूला लावलेल्या फ्लेक्ससमोर इतका वेळ त्या समोरच्या मुख्य मुलाच्या मांडीवर बसलेली ती चिमुरडी नाचू लागली. मला क्षणभर धक्काच बसला. जेमतेम ३-४ वर्षाची असेल ती! सर्व गावकरी मात्र हसत याचा आनंद घेत होते.

मग मला माझ्या गावकरी मित्राने सुरुवातीलाच हे वातावरण,कार्यक्रम पाहून सांगितले होते, ‘या सर्वच एका गावकऱ्याच्या नजरेतून आनंद घे!’ तरीही मन मानायला तयार नव्हतं. मी कट्ट्यावर बसून त्यांची पुढची तयारी पाहू लागलो. मनात येत होतं, त्या छोट्या मुलीचं आयुष्य पुढे यातच जाणार का अशा कितीतरी मुली आज देशभर मनोरंजन करत आपल्या काबिल्याबरोबर हिंडत असतील.पेपरला येणाऱ्या सर्व शिक्षण अभियानाच्या खोट्या वल्गना प्रशासनचं,सरकारचं अपयश समोर दाखवत होत्या. बालशिक्षण, त्यांचे हक्क, ते कायदे, ती पुस्तकं या सगळ्या अभ्यासावर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं करत होती ती चिमुकलीची आनंदी, निरागस कृती! या सगळ्यात मी इतका गुंतलो होतो,की तिचा नाच संपल्यावर टाळ्यांच्या आवाजाने मी भानावर आलो. 

पुढे त्या कार्यक्रमाच्या म्होरक्याने एक साथीदार बोलावला, विनोदी पात्र बनवून गावकऱ्यांची,छोट्या मुलांची हसवून करमणूक केली. आता पुन्हा सुरु झाला खेळ! तो मुलगा आता समोरच्या आवारात ब्रेक नसलेली सायकल गोल गोल फिरवू लागला! त्यावर कडी म्हणून दोन्ही पाय पुढे करून सायकलच्या आऱ्याशेजारी त्याने पक्के बसवले, सहकाऱ्याने दिलेली पाण्याने भरलेली घागर दोरीच्या सहाय्याने दातात पकडून फिरू लागला. त्याच्या कष्टाला,मेहनतीला आणि कौशल्याला सलाम! पुढे दोन हातात घागर धरून,गावातल्या २-३ मुलांना डोक्यावर,खांद्यावर बसवून त्याने हाच फेरी मारण्याचा प्रयोग केला.हे सर्व तो त्या ब्रेक्रहित सायकलवरून न उतरता पेलत होतं हे विशेष! लोकांनी भरभरून दाद दिली. काहींनी उत्स्फूर्त बक्षीस म्हणून १०,२०,१००च्या नोटा दिल्या. पैसे आम्ही शेवटच्या दिवशी घेऊ असं ते म्हणत होते. अजून २ रात्री बाकी होत्या.त्यात होणाऱ्या अशाच काही भन्नाट गोष्टींची आगाऊ जाहिरात करत कार्यक्रम संपला. त्यामध्ये तो जमिनीखाली ३ तास स्वतःला पुरूनही घेणार होता. कार्यक्रम संपला.मंडळी पांगली. आम्हीही आता दळण घ्यायला निघणार तोच त्यातला त्याचा साथीदार आमच्याकडे आला. त्यांना ते मोठे गाण्याचे स्पीकर एक जवळच्या घरात ठेवायला आम्ही मदत केली. त्यानंतर आम्ही दळण घेऊन घरी गेलो.

हे लोक कदाचित ३ दिवसात भरपूर पैसे मिळवतील,२-४ हजारापर्यंत कदाचित! त्यांची टोळी असावी,कारण येताना S.T.तून मी हाच कार्यक्रम शेजारच्या गावांत पाहिला होता. पण हे भटकं आयुष्य त्यांनी अजून किती वर्ष जगायचं ? ?

समजा,काही करणं अपघात झाला तर कोण आहे वाली त्या निरागस मुलीला? अशी किती आयुष्यं आपली पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज जीवाशी खेळत असतील? हे असचं चालू राहणार का? प्रधानमंत्र्यांच्या रोजगार निर्माण कार्यक्रमात यांना जागा नाही का? प्रश्न अनेक आहेत मनात, उत्तर अजून आहे अंधारात!

आसंगी- मोटेवाडी गावाच्या मध्यभागी शेतावर वस्ती असलेले मित्राचे घर, तालुका जत, जिला सांगली. (महाराष्ट्र),
जुलै २०१५.

ता.क.( १७ मार्च २०२१) - २०१८ साली सामाजिक व्यवस्थापन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी मिळाल्यानंतर सामाजिक प्रश्न सोडवण्याची एक नवी दिशा मिळाली. उत्तर मिळालंय.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक रिल हल्लीच पाहिले. श्रेया घोषाल आणि अजुन दोन परिक्षक बसले होते आणि एक पाचसहासात वर्षांची मुलगी समोर आली, सारेगामापा ऑडिशनला. गा म्हटल्यावर मुलीने तारस्वरात एक आयटेम साँग सुरु केले. तिला थांबवुन दुसरे गायला सांगितले, तर तिने तसलेच दुसरे आयटेम सॉंग सुरु केले. तिच्या वयाला ती गाणी खुप विसंगत होती. तिची आई सोबत होती, तिला बोलावले. श्रेयाने विचारले ही असली गाणी ती कुठे शिकली? आई चाचरत म्हणाली ती स्टेज प्रोग्राममध्ये गाते, तिथे असलीच गाणी गावी लागतात पण तुम्हाला हवे ते गाणे सांगा, ती तेही गाईल. परिक्षक थक्क तर झालेच पण मीही थक्क झाले. तुम्ही लिहिलेत तेच विचार डोक्यात आले. ही मुलगी मोठी झाल्यावर काय? मुळात ती मोठी होईपर्यंत धीर धरवणार आहे का कोणाला? काय भविष्य असेल हिचे?

ता.क.( १७ मार्च २०२१) - २०१८ साली सामाजिक व्यवस्थापन अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी मिळाल्यानंतर सामाजिक प्रश्न सोडवण्याची एक नवी दिशा मिळाली. उत्तर मिळालंय>>>

अभिनंदन व धन्यवाद.

बाप रे!! एका ५-६ वर्षिय नेपाळी लहान मुलीचे बरेच रील्स मी पाहीले आणि शेवटी प्रत्येक रीळवरती कमेन्ट देऊ लागले - शेम ऑन यु. तिचं बालपण तुम्ही हिरावुन घेताय.