नकळत काही असे घडावे

Submitted by पुरंदरे शशांक on 26 June, 2025 - 02:09

नकळत काही असे घडावे

शब्द संपुनी ओढ उरावी
मूक प्रार्थना उमलत जावी
अंतरातुनी आर्त स्फुरावे
नकळत काही असे घडावे

श्वासामधले क्षणही खुणावी
तुझीच जाणीव नित्य कळावी
मी - तूपण ते विसरावे
नकळत काही असे घडावे

भाव ह्रदीचे सहज फुलोनी
उमलून जाता तेही विरोनी
दिक्कालाचे भान सुटावे
नकळत काही असे घडावे

जाणीव नेणीव द्वैत नुरोनी
जीवा शिवाच्या सत्य मिलनी
तूच एकला सहज असावे
विश्वाभासा स्थान नसावे

नकळत काही असे घडावे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users