माझ्या वाटून ठेवलेल्या दिवसाच्या उत्साहातून

Submitted by चेराज on 14 June, 2025 - 17:26

माझ्या वाटून ठेवलेल्या दिवसाच्या उत्साहातून
माझी कालची बुद्धासाठीची तळमळ —
ताज्या बसवलेल्या शावर्म्यातून गळणारी मसाल्याची
एकसारखी टपटप
सूर्योदयाचे सौन्दर्य पकडण्याचा पुन्हा फसलेला प्रयत्न
इथिओपियातील युद्धाने तडीपार झालेल्या टॅक्सी वाल्याची एक उदास कहाणी
उध्वस्त चायच्या टपरीत परतून येणारी अब्दुल्लाची एक आठवण
त्या शांत, निळ्या ग्लोव्हज वाल्या परीची सबवे व्यापून टाकणारी करुणयाचना
आणि प्रतिष्ठितांची गांडमात्र चाटणाऱ्यांची फौज अविरत घडवणारी
ही युनिव्हर्सिटी
चकचकीत गगनचुंबी काचेच्या इमारती ज्या
त्यांच्याच अश्रूंच्या प्रतिबिंबांनी झगमगत असतात सतत
युद्धानंतर सबकाच्या चहात वाढले आहे का पाण्याचे प्रमाण?
संध्याकाळच्या चायवर बांगलादेशी मजुरांच्या तरीही रंगतात गप्पा
बागेत मशिदीच्या सावलीत लुडोच्या एका डावात मिळते कामाच्या जाचातून
थोडावेळ सुटका
एका तळ्यात फक्त दोन दाण्यांसाठी उगाचच बदकांचा उत्साह होतो अति
आणि हमदान वर पैश्यांच्या शोधात असहाय्य आत्मे भटकतात
एक अशीच अर्धवट सोडून दिलेली रमची बाटली
इथल्या कडक उन्हाळ्यात मुंबईच्या पावसासाठीची माझी तीव्र इच्छा
हा संगीताचा म्हैसूर पाक विरघळतो कसा पटदिशी जिभेवर
आणि तुझे हास्य कायमसाठी होते तुझ्या खुर्चीत असे विराजमान
कितींदाच बघणार तुझ्या डोळ्यांकडे चोरून आणि अलगद झेलणार त्यांतला नूर —
माझी आजची बुद्धासाठीची तळमळ
एक अनंतकाळ व्यापून टाकणाऱ्या कुठल्याश्या जादूनगरीतील तुझ्या आठवणी
एक ताजं तरुण-रक्त भरभरून पुरवणारी अशी सिंचन-व्यवस्था
आणि वाढले भरघोस छप्पन्न व्हरायटीचे हे काच-पिकांचे मळे
एका नेपाळ्याच्या घरी रोज उकडलेल्या बटाटयांची न्याहरी
रोज उकडलेल्या बटाट्यांचाच लंच
आणि रोजच उकडलेल्या बटाट्यांचा डिनर
एका क्षणातच फुलून येते कशी अफगाणिस्तानी बेकरीतील ही नान
आणि खमंग
ही आई हर जुम्मेच्या प्रार्थनेनंतर वाट बघते अशी अल्लाची
त्या मशिदीबाहेर
एका बेरोजगाराचा दिवस ह्या सावलीतून त्या सावलीत होतो लाचार फक्त
माझ्या शेजारील ही दुकाने बनत जाताहेत अशी वाळवंटे
माझ्या शेजारील हे दुकानदार बनत जाताहेत असे वाळूचे कण
आणि बघा त्या पलीकडल्या स्वर्गात सवलतींचा रंगात आला आहे सण —
माझी उद्याची बुद्धासाठीची तळमळ
झोपडपट्टीतून चालताना जशा चुकवाव्या लागतात कुत्रांच्या लेंड्या
तशाच चुकवू पाहतो आहे त्यांनी सोडलेल्या पाऊलखुणा
दृष्टीसमोरच्या चेगेव्हाराचा कोरडा दक्ष
उसन्या घेतलेल्या भावना पुरतील कश्या आयुष्यभर?
कोरडेच अश्रू
बळजबरीने घातलेल्या संकराची एक नपुंसक पैदाईश
आणि वाचकाच्या डोळ्यातील निराशेचा परमोच्च अगदी याच क्षणी

(ऑगस्ट २०२२/जून २०२५)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults