आपण अनपेक्षित परिस्थितीसाठी तयार आहोत का!

Submitted by मार्गी on 14 June, 2025 - 12:00

✪ Too much comfort ultimately leads to much discomfort
✪ तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक
✪ कठिण परिस्थितीला सामोरं जाण्याबद्दल मुलांची तयारी होते का?
✪ समजा पाच दिवस इंटरनेट बंद पडलं तर आपण काय करू?
✪ पेट्रोल तर संपणार आहे. ते उद्या झालं तर?
✪ आपत्ती येणारच आहेत
✪ आणीबाणीमध्ये आपण स्वत:ला व इतरांना मदत कशी करू शकतो?

डॉ. जयंत नारळीकरांची एक विज्ञानकथा होती. पृथ्वीवर सर्व कामे यंत्रे करत जातात. ह्या यंत्रांचं नियंत्रण काही कंप्युटर्स करतात. आणि हे कंप्युटर्सही नंतर इतके वाढतात की, त्यांचं नियंत्रण एक सुपर कंप्युटर करतो. आणि जेव्हा हा सुपर कंप्युटर मानवाला मदत करेनासा होतो, तेव्हा बिकट स्थिती होते. आपण ह्याचीच अनेक उदाहरणं खूप बघत आहोत. अशा घटना घडत आहेत. सगळ्या गोष्टी आपण यंत्रांकडून करून घेत आहोत. गूगल मॅपवर ठिकाण बघतो. पत्ता तर मिळतो, पण वाटेतल्या रस्त्याचं व परिसराचं आकलन होत नाही. मोबाईलवर माहिती शोधल्यामुळे माणसांसोबतचा संवाद खुंटतो. आणि "कुठेच न चुकता"‌ गेल्यामुळे हरवण्यातली मजाही जाते. आणि जी गोष्ट आपण यंत्रांकडून करायला लागतो, तिची आपली क्षमता गमवत जातो. आणि त्यातून हळु हळु आपल्या क्षमतेचाच र्‍हास होतो. दुचाकी सहज उपलब्ध झाली की, चालणं कमी होत जातं. इंटरनेटवर सतत लगेच उत्तर मिळालं की, शोधण्यातली मजा, जिद्द आणि शिकणं कमी होत जातं.

आज सगळीकडे अति तंत्रज्ञान झालंय. आणि अति कशाचाच बरा नसतो. अगदी तंत्रज्ञानाचाही व कम्फर्टचाही. थोडे धक्के हवेत. थोडे पाय जमिनीवर हवेत. आणि सतत "आणखी पुढे, अधिक उत्तम" ही हावसुद्धा बरी नाही. परवाचा भयावह विमान अपघात! त्याचं विश्लेषण त्यातले जाणकार मंडळी करत आहेत. उच्च तंत्रज्ञानाची भिती वाटावी अशी स्थिती आहे. तंत्रज्ञान कितीही उच्च होवो, त्यासोबतचा माणूस तितका घट्ट पाळंमुळं रोवून उभा आहे का हा प्रश्न पडतो. शिवाय तंत्रज्ञानातली प्रतिस्पर्धा, त्यामधील सतत नवीन येणार्‍या प्रणाल्या. त्यातूनही अनपेक्षित गुंते होऊ शकतात.

(हा लेख इथे इंग्रजीत वाचता येईल: आणि इथे वेगवेगळे विज्ञान प्रयोग व गमतीही वाचता येतील.)

नुसतं उच्च तंत्रज्ञान मिळून चालत नाही. समज विकसित व्हावी लागते. आणि नवीन बदल किंवा सुधारणा ह्यांचं प्रतिबिंब माणसाच्या कामातही उमटावं लागतं. एम- एटीच्या ऐवजी अपाचे येते, पण चालवणारा पुढे समजदार होतो का, हा प्रश्न उरतो. तंत्रज्ञान आलं, पण बाकी सामाजिक व व्यक्तिगत समज पुढे गेली का हा प्रश्न राहतो. तितकी समजबुद्धी व परिपक्वता येते का, हा प्रश्न राहतो. सतत पुढे पुढे जाण्याच्या हव्यासामुळे आज खूप वेगवेगळे तणाव होत आहेत. शहरांची‌ अवस्था अतिशय नाजुक झाली आहे. कुठे कुठे अत्याधुनिक सुविधा, पॉश वसाहती, सुखसोयी. पण अर्धा तासाचा पाऊस सगळं विस्कळीत करतो. आणि आज तंत्रज्ञानाने आपल्याला कमालीचं ग्रासलेलं आहे. सगळं काही तंत्रज्ञानाने व इंटरनेटने होतंय. उद्या समजा ५ दिवस इंटरनेट ठप्प झालं तर काय होईल? पेट्रोल तर जाणारच आहे. त्यावर आपल्याला विचार करून ठेवावा लागेल.

वेगवेगळ्या आपत्ती‌ येतच राहणार आहेत. सगळीकडेच येणार आहेत. सगळीकडच्या बातम्या बघता आपण अस्थिरतेकडेच जातोय असं म्हणावं लागेल. अनपेक्षित तेच होईल अशी अपेक्षा इथून पुढे करावी लागेल. आपल्याला सज्ज राहावं लागेल, पुढच्या पिढीलाही सज्ज करावं लागेल. अनेक प्रकारे- अनेक संदर्भात हे करावं लागेल. मुलींच्या संदर्भात तर काही धोका झाला तर तू काय करशील हे बोलावं लागेल. अशा स्थितीचे ड्रिल्स द्यावे लागतील. तू एकटीने जात आहेस आणि अचानक कोणी मध्ये आला, तर काय करशील? किंवा स्कूलबसला आग लागली, तर तुला काय काय करता येऊ शकतं? असे सिम्युलेशन्स करावे लागतील. आपल्याला पैसे देणारे स्रोत जर उपलब्ध राहिले नाहीत तर आपल्याकडे दुसरी कुठली कौशल्य आहेत ज्यांचा आपण उपयोग करू शकतो, हेसुद्धा बघून ठेवावं लागेल. आणि जर पूर्वकल्पना असेल- पूर्व तयारी असेल तर त्या स्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता निश्चितच प्रत्येकात असते. पण त्यासाठी तयारी हवी. सज्जता हवी. आणि म्हणतात ना- the more you sweat in peace, the less you bleed in war! तशी आपली तयारी जितकी जास्त, तितकी आपल्याला कमी झळ बसेल.

(वाचल्याबद्दल धन्यवाद. लेख जवळच्यांसोबत अवश्य शेअर करावा. -निरंजन वेलणकर 09422108376. आकाश दर्शन, ध्यान, फन- लर्न व फिटनेस सत्र. लेख लिहीण्याचा दिनांक: 14 जून 2025)

ब्लॉगवरचे गेल्या काही दिवसांमधले प्रयोग व गमती:

त्रिकोणी आकाराचा जादुई परिणाम
इंद्रधनुष्य बनवा!
प्रकाशाचे अपवर्तन (refraction)
पवनचक्की तयार करा!
पॉवरफुल फुगा!
भाताच्या शीताचा डिंक
आवाजाचे परावर्तन (रिफ्लेक्शन)!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users