ढसाळांची कविता २: एखाद्याने एखाद्याला

Submitted by चेराज on 12 June, 2025 - 08:30

[गोलपिठा पृ. क्र. ३ , लोकवाङ्मय गृह, सतरावी आवृत्ती २०२१. ]

एखाद्याने एखाद्याला सांडपाण्यावर जगवणे म्हणजे
दोघांनीही दोघांना अनबन बनवणे
वडाची साल पिंपळाला लावली नि पिंपळाची साल
वडाला लावली हे एक वेळ माणूस समजू शकतो
पण नीलेतून रोहिणीतून वाहतूकत राहणारे रक्तपक्षी
तद्वत डबल फास्ट ट्रेन यांचा सर्वसाधारण अर्थ
काढता येत नाही आपला म्हणून
असा कुठे सर्जन असेल का की जो पोपडे धरलेल्या
शरीराचे कलात्मक समीक्षण करतो
एकावर एक ११ एकावर दोन १२ चढेपर्यंत
अरबी समुद्र आटून जातो
विझवतीचा एकुलता एक खांब
निपुत्रिक होतो
समोर हडळींचा ताफा साम्राज्यासारखा तुंबळ
झाडाला झटं देतो

एखाद्याने एखाद्याला …. कलात्मक समीक्षण करतो: उच्चजातीयांच्या “सांडपाण्यावर” जगावे लागणे हेच अंतिम सत्य आहे आणि म्हणून जातीवादाच्या सामाजिक प्रश्नांवर कधीही एकमत होऊ शकत नाही, नेहमी अनबनच असणार असा साधारण विचार ढसाळ मांडतात. याचमुळे अभ्यासातून किंवा कलेतून सवर्णांनी, सवर्णांचा प्रभाव असेलेल्या सामाजिक संस्थानी, सामाजिक प्रश्नांचा केलेला उहापोह हा केवळ वरवरचा असतो. मूळ प्रश्नांवर (रक्ताभिसरण संस्थेतील विकार?) मूलभूत उपाय (सर्जरी) करण्याऐवजी वा तसा नाही करता येत असेल तर तसे कबूल करण्याऐवजी त्याचे केवळ कलेच्या माध्यमातून वरवर समीक्षण करणे हे ढसाळांना विशेष खटकते. याचप्रमाणे काहीसे “माणसं भादरून” (गो. पृ. क्र. २) मध्ये ढसाळ म्हणतात —

माझा दरोबस्त अवयव, सडलेला वाटतोय ना तर मंजूर, तुम्ही तो अवश्य आर्ट गॅलऱ्यांत ठेवा
वाटल्यास माझी आतडी काढून संगिनीला लटकवा.

या तथाकथित समाजसुधारकांचे/बुद्धिजीवींचे केवळ वरवरचे परिस्थितीचे आकलन या बाबतीत असाच उपरोधिक स्वर “आमच्या आळीतून जाताना… ” (गो. पृ. ७) मध्ये आणखी वेगळ्या पद्धतीने आहे —

हे महाग्यानी लोक हिंडताहेत मशाली पेटवून. गल्लीबोळांतून, आळीआळींतून. जेथे उंदीर उपाशी मरतात —
त्या आमच्या खोपटांतील काळोख, म्हणे, यांना कळतो.
पाणचट गवशीसारखे हेही एक थेर!
ज्यांना आपल्या गांडीखाललाच अंधार कळत नाही ….

सवर्णांचे दलितांच्या परिस्थितीचे आकलन, त्याचा उहापोह, त्यावर त्यांनी ठरवलेली उपाययोजना वा कलेच्या माध्यमातून दलितांच्या परिस्थितीचे केलेले सादरीकरण हे असे मूलभूतपणे चुकीचे आहे हे ढसाळ प्रामुख्याने “आपल्या” माणसांना सांगत आहेत असे वाटते. ढसाळांना आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची खूप तळमळ आहे आणि त्याच तळमळीतून ते म्हणतात (गो. पृ. १४):

प्रायोगिक थिएटरात चाललेले
आपल्या अवस्थांचे तमाम तमाशे
आपण इदीच्या बकऱ्यासारखे बळी जायचे का गुपचूप
आणि तरीसुद्धा आत्म्याचे उदात्तीकरण करायचे का?
जिवाचे नाव लवडा ठेवून जगणाऱ्यांनी
खुशाल जगावे …
मी तसा जगणार नाही

एकावर एक ११… झाडाला झटं देतो: या वर्णनावरून रात्रीच्या वेळी एका साधारण निर्जनश्या समुद्रकिनारी असले विचार कवीच्या मनात आल्याचा अंदाज बांधता येतो. या तीनही ओळींत स्वभावोक्ती आहे आणि प्रत्येकांत किती वेगळी आणि कमालीची आहे. ढसाळांच्या स्वभावोक्तीचा स्वतंत्र अभ्यास करता येईल. “एकावर एक ११ एकावर दोन १२ चढेपर्यंत अरबी समुद्र आटून जातो” येथे एकाच पदाच्या संज्ञाप्रवाहाला जोडून अरबी समुद्राचे आटून जाणे येते . “विझवतीचा एकुलता एक खांब निपुत्रिक होतो” विझवती म्हणजे रात्रीच्या दिव्याचा एक खांब की पश्चिम दिशा आणि चंद्राचे मावळणे? पण दोन्ही पैकी काहीही असले तरी भावार्थ एकच. “समोर हडळींचा ताफा साम्राज्यासारखा तुंबळ झाडाला झटं देतो” येथे हडळीची एक अतिवास्तववादी प्रतिमा, पण किती सहजपणे मूळ कवितेच्या आशयात मिसळून गेली आहे. घड्याळाचे वर चढणे आणि त्याच बरोबर समुद्राचे आटून जाणे; विजेच्या एकुलत्या एका खांबाचे निकामी होणे आणि काळाकुट्ट अंधार होणे; वादळाचे झाडाला प्रचंड वेगाने झट देणे — या सर्वांतून एक विलक्षण वातावरणनिर्मिती जी कवीची वर सांगितलेल्या विचारांमुळे झालेली उद्विग्न आणि संतप्त मन:स्थिती सांगून जाते.

या कवितेचाही अनुवाद करण्याचा प्रयत्न केला होता:

For someone to let someone else live only on their waste-water
Is making both of them fundamentally disagreeable to each other
Barking up the banyan tree instead of the peepal or barking up the peepal
instead of the banyan, can be sometimes understandable
But the general meaning of blood-birds and likewise a double-fast train that keep traveling within veins, arteries cannot be easily told
And for that reason, could there exist a surgeon who artistically inspects a body covered fully in scales?
One over one 11 and by the time one over two is 12, the Arabian sea completely shrinks
The lone standing pole of night-lights loses their only child
And here, in the front, an army of witches, fierce like an empire, gather and hammer a tree

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अतिवास्तववादाविषयी थोडेसे:
मी अतिवास्तववादाकडे वळण्याचे जिऑर्जिओ दि चिरिकोची चित्रे हे निमित्त झाले. एकदा न्यू यॉर्क सिटी मध्ये जाण्याचा योग आला होता तेव्हा “स्टारी नाईट” हे प्रसिद्ध चित्र पाहायचे म्हणून आवर्जून मोमाला जायचे ठरवले. ते चित्र तर पहिलेच पण त्यावेळी सर्वात जास्त वेळ मी चिरिकोच्या दालनात घालवला. चिरिको बद्दल आधी काहीच माहित नव्हते, पहिल्यांदाच त्याच्या पेन्टिंग्स बघत होतो. “नॉस्टॅल्जिया ऑफ द इन्फायनाईट” ह्या चित्राकडे मी किती तरी वेळ पाहत होतो. त्याची चित्रे खूप गूढ आणि वेगळी वाटली. चिरिको रूढ अर्थाने, म्हणजे दाली सारखा, अतिवास्तववादी नाही, त्याला आद्य-अतिवास्तववादी मानतात. त्याची ती पाहिलेली गूढ चित्रे माझ्याजवळ खूप काळ राहिली, अजूनही मध्ये मध्ये ती सर्च करून बघत असतो.

कविता जर प्रतिमाप्रधान असेल तर तिच्यातील अतिवास्तववाद हा चित्रकलेतील अतिवास्तववादासारखाच समजून घेता येऊ शकतो. परंतु कवितेतील प्रतिमांची जुन्या काळांपासून नवीन काळा पर्यंत स्वतःची अशी एक जर्नी आहे. बालकवींच्या कविता वाचताना इंग्रजी रोमँटिक कवींच्या (romanticism ही चळवळ या अर्थाने) कविताही वाचल्या होत्या. त्यात वर्डस्वर्थ आणि कीट्स च्या कविता बऱ्यापैकी वाचल्या होत्या. वर्डस्वर्थने कल्पनावाद (imagination) आणि स्वैर कल्पनावाद (fancy) यात मूलभूत फरक केला आहे आणि आपल्या कवितांत त्याने imagination चाच पुरस्कार केला. या दृष्टीने “Composed Upon An Evening of Extraordinary Splendour and Beauty” ही कविता मला नेहमीच विशेष वाटली आहे . वर्डस्वर्थ कवितेच्या सुरुवातीला म्हणतो:

Had this effulgence disappeared
With flying haste, I might have sent,
Among the speechless clouds, a look
Of blank astonishment;
But 'tis endued with power to stay,
And sanctify one closing day,
That frail Mortality may see,
What is? ah no, but what 'can' be!

कल्पनाविश्वात असा स्वैरपणे वावरण्याचा त्याला मोह होतो. तो पूर्ण कवितेत कल्पनेला आवरून धरतो आणि त्याचा ताण संपूर्ण कवितेतून दिसतो. कवितेच्या शेवटी तो तसेच स्पष्ट म्हणतो:

My soul, though yet confined to earth,
Rejoices in a second birth!

याउलट कीट्स च्या “Ode to a Nightingale” ह्या प्रसिद्ध कवितेतील खालील ओळी पहा:

Fade far away, dissolve, and quite forget
What thou among the leaves hast never known,
The weariness, the fever, and the fret
Here, where men sit and hear each other groan;
Where palsy shakes a few, sad, last gray hairs,
Where youth grows pale, and spectre-thin, and dies;
Where but to think is to be full of sorrow
And leaden-eyed despairs,
Where Beauty cannot keep her lustrous eyes,
Or new Love pine at them beyond to-morrow.

Away! away! for I will fly to thee,
Not charioted by Bacchus and his pards,
But on the viewless wings of Poesy,
Though the dull brain perplexes and retards:

कीट्स ला वर्डस्वर्थ सारखी विचारांशी, जमिनीशी बांधून राहण्याची काहीच गरज वाटत नाही कारण त्याला कल्पनेच्या नितांत सुंदर, सुरम्य आणि आशावादी विश्वाची ओढ लागली आहे. विसाव्या शतकात, महायुद्धांनी ग्रासलेल्या जगात, उदयास आलेला अतिवास्तववाद ही romanticism मधल्या fancy चीच उत्क्रांती आहे असे मला वाटत राहते.

वसंत पाटणकर यांनी ढसाळांच्या कवितेवर लिहिलेल्या पुस्तकात म्हटले आहे की, त्यांच्या कवितेतील अतिवास्तववाद हा little magazine च्या चित्रे आणि कोलटकर यांच्या प्रभावामुळे आला आणि हा ढसाळांच्या कवितेचा मूळ गुण नाही. मला मात्र असे वाटत नाही. चित्र्यांची कविता मी थोडी वाचली आहे, वाचतो आहे. त्यांची कविता बऱ्यापैकी सांकेतिक आहे आणि अतिवास्तववादी प्रतिमा ह्या “चिन्हांच्या” स्वरूपात (चंद्रकोरीचा कोयता) आल्या आहेत असे मी बघितले. कोलटकरांची कविता मी जास्त वाचली नाही. परंतु ढसाळांच्या कवितेतील अतिवास्तववादी प्रतिमा बघता त्यांची अभिव्यक्ती खूप original आहे असेच वाटते. एखाद्याने एखाद्याला ह्या कवितेत हडळीची एक प्रतिमा आहे आणि ती स्वभावोक्तीने गतिमान झाली आहे. गोलपिठातील “मंदाकिनी पाटील .. “ (गो. पृ. ५६) ह्या कवितेत अशीच कवीची मनःस्तिथी सांगणारी पण वेगळी (स्वप्नवत) प्रतिमा आहे:

आता हॉटेलात मला फर्निचर नाचताना दिसत आहेत
खुर्च्याटेब्लंग्लासंवेटरगिऱ्हाइकब्रूनमालकअमूल
खोल कोमट स्तब्धतेत
अंग आखडून बसलेली तू
पहात मांजरीच्या डोळ्यातलं
आणि ग्लासातलं तेजस्वीपण
हिर्व्या लाटांतून हात घालून
खनिजाऐवजी कारुण्य मिळवणारी पृष्ठभागातून…

“मंदाकिनी पाटील …” ह्या कवितेवर पुढे एका लेखात थोड्या विस्ताराने लिहीन.

“मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे” (खेळ, प्रास प्रकाशन, पृ. ५६) ह्या कवितेतील स्वभावोक्तीने गतिमान झालेली पण वेगळी भावस्थिती सांगणारी ही ओळ पहा:

चंद्रकिरणांचं नृत्य
चंद्रकोरीवरली धूळ चोच मारून एक चिमणी झटकते आहे

बाकी स्वभावोक्तीवर ढसाळांचा गजब हातखंडा आहे आणि त्याचा गजब वापर ते कवितेत एक लय निर्माण करण्यासाठीही करतात.