एक सेल्फी कॅमेरा असाही

Submitted by शिवानी बलकुंदी on 23 May, 2025 - 04:19

“सगळे तय्यार ?,”
“ ए थांब थांब मी पण आलेच “
“ए आता पटकन कर न क्लिक, सगळे येतात आहे न फोटोत?”
खरं तर लग्न मैत्रिणीच्या मुलीचं होतं, पण सगळ्या संख्यांना विविध पोझ मध्ये फोटो काढण्याचा मोह आवरत नव्हता. हसणारे, खिदळणारे, गप्पांमधले असंख्य सेल्फी काढले जात होते. कारणच तसं होतं, कितीतरी मैत्रिणी बऱ्याच वर्षांनी भेटल्या होत्या. शिवाय लग्न मैत्रिणिकडे असल्यामुळे नातेवाईकांना भेटा, बोला अशी काही सक्ती पण नव्हती. त्यामुळे दिवसभर गप्पा, खादाडी आणि सेल्फी यांना अगदी उत आला होता. शेवटी आपण सगळ्यांनी, मैत्रिणीला मुलीला सासरी पाठवताना, रडताना नाही बघायच यावर एकमत होऊन सगळ्याजणी आपापल्या दिशेने चालू लागल्या.
दिवस भर नुसते बसून आणि खिदळून झाले होते आणि लग्न घरच्या जेवणा मुळे जरा सुस्तावून घरी आल्यावर जरा आडवी झाले. दिवसभरातील सगळे प्रसंग डोळ्यासामोरून जात होते, सेल्फी घेताना च्या गमती जमती आठवून मध्येच हसू येत होते.
अचानक सेल्फी घेत घेता एका मैत्रिणीवर कॅमेरा स्थिरावला आणि कॅमेरा मधून तिच्या मनातले विचार स्पष्टपणे दिसू लागले, सगळ्यांसोबत चेहऱ्यावर हसू ठेऊन फोटोत दिसत असली तरी प्रत्यक्ष तिच्या आत एक द्वंद सुरू होते, तिच्या हसण्यातून जे दिसू शकले नाही ते दिसले, भरलेल्या घरात असूनही ती तिच्या नवऱ्या सोबत आणि सासर च्या लोकांसोबत ती खुश नव्हती त्यामुळे, तिला कुटुंबासोंबत राहणे, असह्य झाले होते, काय करावे नक्की अशी तिची अवस्था आणि मनाची घालमेल सुरू होती.
मग कॅमेरा दुसऱ्या मैत्रिणी वर थांबला तर ती पण वर वर हसताना दिसत असली तरी पण आतून खूप कोलमडलेली होती, नवऱ्या ला झालेला दुर्धर आजार याने ती त्रासून गेली होती, कॅमेराने तिच्या मनातले सगळे विचार तिच्या हसऱ्या चेहऱ्या मागचे भाव फोटोत टीपले होते.
तिसरी मैत्रीण वर वर खूप बिनधास्त दिसत होती पण नवऱ्याच्या अचानक जण्याने आतून हादरलेली होती.
आणि हे काय हा कॅमेरा आता माझ्याकडे फिरलाय आणि हे काय दिसतं आहे?
माझ्या मनातले विचार पण कॅमेरात अगदी स्पष्ट दिसू लागलेत, काय काय दाखवतोय तो मला,
आईचा परवा फोन, “बेटा, काय करते आहेस, भेटायला आली नाहीस, खूप दिवसात,”
“ हो आई येते, लग्न आटोपले की,”
“ काल शाळेत रिजल्ट घ्यायला जायचे होते, नेमकी त्याच वेळी महत्वाची मीटिंग सुरू होती म्हणून नाही जाता आले.”
“रोज सकाळी पायी फिरायला जायचे म्हणते पण घरातली कामे संपवून आणि कामाला येणाऱ्या बायकांच्या वेळा सांभाळून जाणे जमतच नाही.” काय काय दिसतयं कॅमेऱ्यात,
कॅमेरा आणखी थोडा जवळ आला आणि आणखी काहीतरी स्पष्ट दिसू लागले. जरा निरखून बघितले तर लक्षात आले की, अशी किती तरी कामे करायची राहून गेलेली आहेत, अनेक कामे कधी तरी करू म्हणून खोळंबलेली आहेत. अनेक कामांसाठी तर अजून मुहूर्त च लागलेला नाहीये. आणि जी काही कामे केली त्यातली बहुतांश उपचार म्हणून केलेली आहेत. काही कामे जसे देवाची पूजा, स्तोत्र म्हणणे, सैंपाक घरातली इतर कामे व्यवहार म्हणून यांत्रिक पणे केली जात आहेत.
सेल्फी कॅमेरा असे चित्र दाखवीत असताना मी मात्र चांगली दचकले आणि थोडा वेळ कॅमेरा हातात घेऊन डोळे मिटून स्वस्थ बसून राहिले.
रोजचा दिवसभराचा दिनक्रम डोळ्या समोरून जाऊ लागला. कधी तरी वेळ मारून नेलीय, कधी उपचार म्हणून काम केले, याची गोळा बेरीज स्पष्ट दिसू लागली.
यावर कडी म्हणजे, मुलां सोबतचा वेळ पण खूप कामे आहेत म्हणून असाच कामांमधून कसंतरी वेळ काढून घालवताना दिसत होता. हे चित्र मला खूपच अस्वस्थ करून गेले.
तेवढ्यात माझ्या कानावर आईsssss अशी हाक आली आणि मला दचकून जाग आली.
“ आई, अगं केव्हाची आवाज देतेय,”
“ हो का, अगं, लग्न घरचे जेवण थोडे जास्त च झाले होते की काय, म्हणूंन खूपच गाढ झोप लागली होती बहुतेक, थांब आलेच. ”
काय भयंकर स्वप्न पडले होते दुपारचे, असाही सेल्फी कॅमेरा असतो?
#सुरपाखरू #प्रयोग२०२५
शिवानी बलकुंदी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults