
प्रस्तावना - https://www.maayboli.com/node/86676
लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही कुठे ना कुठे फिरायला जातो. सुरुवाती सुरुवातीला ऑफिसची सुट्टी खूप आधीपासून प्लॅन करून आठवडाभर कुठे ना कुठे जायचो आम्ही दोघं. एकदा गोव्याला गेलो होतो - बीचवर खूप चाललो - सुझा लोबो नावाच्या एका झकास रेस्टॉरंट मध्ये भरपूर मासे खाल्ले.. एकदा हम्पी - तिथे सुद्धा खूप चाललो होतो तुंगभद्रा नदीच्या शेजारी आणि मग मँगो ट्री मध्ये जेवलो.. आम्हा दोघांनाही चालायला खूप आवडतं आणि दोघेही एक नंबरचे खवय्ये आहोत. त्यामुळे कुठे कुठे फिरलो आणि कुठे काय खाल्लं त्याच्या आठवणी काढायला आम्हाला खूप आवडतं.
सगळ्यात गंमत झाली होती ती आमच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला. त्यावेळी आम्ही मांडू आणि इंदोर अशी ट्रीप केली होती. सकाळी मांडू मध्ये पोचलो तेव्हा कोवळी उन्हं मांडूच्या प्राचीन अवशेषांवर पसरली होती. राणी रूपमतीच्या मंडपावरून दिसणारा माळव्याचा विस्तीर्ण पठार आणि दूरवर दिसणारी नर्मदा नदी, हे दृश्य डोळ्यात साठवून घेताना वेळ कसा गेला हे कळलंच नाही. प्रत्येक पावलागणिक एक नवी कहाणी समोर येत होती, त्या शांत आणि ऐतिहासिक वातावरणात रमून जाऊन आम्ही दिवसभर मांडू फिरलो.
संध्याकाळ जसजशी जवळ येत होती, तसतशी इंदूरच्या दिशेने परतण्याची ओढ लागली. दिवसभरचा थकवा जाणवायला लागला. माझा घसा थोडा धरला आणि माझा आवाजही अगदी बसून गेला होता.
मांडूची शांतता मागे सोडून, आम्ही इंदूरच्या गजबजाटाकडे निघालो. शहरात पोहोचल्यावर, दिवसाच्या थकव्यानंतर काहीतरी चविष्ट खाण्याची फारच इच्छा झाली. प्रशांत पोहाच्या समोरूनच गाडी जायला लागली. लोकांची वर्दळ, तळल्या जाणाऱ्या पदार्थांचा सुगंध आणि जिलेबीच्या कढईतून येणारा तो खास आवाज... ते गरमागरम जिलेबीचे ढिग पाहून तोंडाला पाणी सुटलं. भगव्या रंगाच्या त्या कुरकुरीत आणि रसाळ जिलेब्या पाहताना अशी काही भूक चाळवली! मी प्रमोदला म्हटलं, "चल जिलेबी खाऊ!" आणि तो म्हणाला, "वेडी आहेस का? आज नको! घसा न बसलाय तुझा? अजून आजारी पडशील.." झालं! हे म्हणजे एकदम लग्न मुरलेलं नसल्याचं लक्षण! बायको आधीच दमलेली असताना आणि भूकही कडकडून लागलेली असताना, जिलबी खायला नाही म्हणायचं म्हणजे काय!! मला इतका राग आला, माझा एकदम स्फोटच झाला! आता काहीतरी भांडण काढायचंच होतं - "छे बुवा! काय तू तरी! मी नोकरी करते, माझे माझे पैसे कमावते, तरी मला साधी जिलबी घेऊ देत नाहीस!?". प्रमोद आ करून बघतच बसला क्षणभर! "काही काय बडबडतेस! मी काय पन्नास शंभर रुपये वाचवतोय का जिलबी न घेऊन!" असं झकास कडकडून भांडण झालंय!! दोघेही न जेवता झोपलो मग आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्यांदा जाऊन पोहे आणि जिलेबीवर ताव मारला!
इतक्या वर्षानंतरही दरवर्षी लग्नाच्या वाढदिवसाला काय करायचं आहे ते ठरवताना ही आठवण निघतेच. मग प्रमोदच्या चेहऱ्यावर अगदी तेच "काय तू!" असे हताश भाव उमटतात आणि मी लोटपोट खिदळून घेते!
यावर्षी आमचा लग्नाचा वाढदिवस रविवारी होता. त्या शनिवार रविवारी आमच्या लाडक्या रेडवूड नॅशनल पार्क ला गेलो होतो. रेडवूड आणि फर्नच्या हिरवाईत फिरताना शनिवार कसा संपला कळलच नाही. संध्याकाळी हॉटेलला परत जायच्या आधी विजिटर सेंटर ला थांबलो. तिथे समजलं की उद्या सकाळी मोठ्ठी ओहोटी आहे, समुद्र जवळ जवळ दीड किलोमीटर आत जाईल. त्यामुळे सहसा सहजपणे न दिसणारे समुद्रातले शंख शिंपले आणि प्राणी तेव्हा दिसतील. त्यांची माहिती द्यायला सकाळी ७ वाजता एक पार्क रेंजर सुद्धा तिथे येणार होता. हे म्हणजे दुधात साखर! दुसऱ्या दिवशीचा सकाळचा कार्यक्रम नक्की करूनच आम्ही तिथून बाहेर पडलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी जरा घाई घाईनेच आवरून निघालो. समुद्रावर पोहोचलो, तर खरोखरच समुद्र खूपच आत गेलेला होता. आम्ही चालायला लागलो, तसे आतमधल्या दगडांवर चिकटलेले उघड-मिट करणारे, लहान मोठ्या आकाराचे शंख शिंपले दिसले, रंगीबेरंगी स्टार फिश दिसले, पाण्याच्या लाटे बरोबर झुलणारं समुद्रातलं गवत दिसलं.. मध्येच पाण्याच्या छोट्या प्रवाहात सुळसुळणारे इवले इवले मासे सुद्धा दिसले. हिरव्या फुलाप्रमाणे दिसणारे, आपला पाकळ्या लवलवणारे एनीमनी तर मी पहिल्यांदाच पाहिले. समुद्रातला हा खजिना बघता बघता तास दीड तास सहज गेला. पाणी वाढायला लागलं तसं आम्ही बाहेर आलो. सकाळी समुद्राकडे जायला असलेला उतार आता चढ झाला होता, त्यामुळे हळूहळू मध्ये मध्ये थांबून मागचा समुद्र बघत बघत, आम्ही वर आलो.
आता जरा भूक लागायला लागली होती. जाता जाता कॉफीसाठी स्टारबक्स ला थांबायचं ठरलं. पार्किंग लॉट मध्ये गर्दी होती. प्रमोद कॉफी घेऊन येईल आणि मी गाडीत थांबेन असं ठरलं. अस्मि म्हणाली, "बाबा, मला एक ग्रँडे कारमेल मॅकियाटो, ओट मिल्क, कोल्ड, एक्स्ट्रा कारमेल" आणशील का? अद्वयने नेहमीप्रमाणे त्याच्या फेवरेट "हॉट चॉकलेट आणि व्हीप क्रीम" ची फर्माईश केली. तेवढ्यात अस्मिला आठवलं, "बाबा आणि मला नो व्हीप हा! थांब नाहीतर, मी येतेच तुझ्याबरोबर!" पाच दहा मिनिटातच काहीतरी चिवचीवाट करत तिघही कॉफी घेऊन परत आले. प्रमोदने माझ्या हातात कप दिला. एका शब्दानेही हे आण ते आण न सांगता, त्याने मला आवडते तशी परफेक्ट कॉफी आणली होती.
कॉफीचा एक घोट घेऊन जीव सुखावतोय तेवढ्यात प्रमोदचा फोन वाजला. फोन गाडीच्या स्पीकरला कनेक्टेड होता. फोनवर त्याचा मित्र म्हणाला, "हॅपी एनिवर्सरी प्रमोद आणि मनू!" आणि आम्ही सगळे हसायलाच लागलो.. आम्ही दोघांनी एकमेकांना विश केलंच नव्हतं, आज आमची एनिवर्सरी आहे हे विसरलोच होतो दोघही! लग्न म्हणजे वळण घेणारी, पण साखरेच्या पाकात मुरलेली कुरकुरीत, गोड जिलेबी झालं आहे. अशा जिलेबीला, "तू गोड आहेस" असं वेगळं सांगायची गरज पडत नाही, नाही का!!
छान लिहिलंय. आवडलं.
छान लिहिलंय. आवडलं.
छान.
छान.
छान.
छान.
इंदूरमधलं स्फोटक वळण खूपच
इंदूरमधलं स्फोटक वळण खूपच आवडलं. खरंच लग्नानंतर, काही काळानंतर अशी वळणं आठवून मौज वाटते.
आता बाकीच्या गोष्टी वाचते.
छान आहे लेख. मस्त आठवणी.
छान आहे लेख. मस्त आठवणी.
ही छोट्या, intimate कथांची
ही छोट्या, intimate कथांची स्टाइल आवडली.
Food (also coffee) is a universal love language याबद्दल सहमत आहेच.
आवडलं ! सुन्दर !!
आवडलं ! सुन्दर !!
खुपच छान लिहिलय.
खुपच छान लिहिलय.
(No subject)
खूप छान लिहिलं आहे.
खूप छान लिहिलं आहे.
लग्न म्हणजे वळण घेणारी, पण
लग्न म्हणजे वळण घेणारी, पण साखरेच्या पाकात मुरलेली कुरकुरीत, गोड जिलेबी झालं आहे. अशा जिलेबीला, "तू गोड आहेस" असं वेगळं सांगायची गरज पडत नाही, नाही का!!>>>
जिलेबी आवडली.
वा मस्त आवडलय
वा मस्त
आवडलय
मस्त!
मस्त!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.