आपली गोष्ट - टमी (व्यक्तिचित्र)

Submitted by sugandhi on 13 May, 2025 - 21:29

प्रस्तावना - https://www.maayboli.com/node/86676

लौकिक अर्थाने टमी दिसायला फारशी सुंदर नाही. तिच्या चेहऱ्यावर एकच बाजूला जरा मोठीच तीट लावल्या सारखी काळी खूण आहे. ती जरा गुबगुबीत आहे. तिचे कान आणि शेपूटही मीमी पेक्षा थोडेसे आखूडच आहेत. पण तिचे डोळे खूप सुंदर आहेत. तिला जणू डोळ्यांनी बोलता येतं. तिचा फार जीव आहे आमच्यावर. दिवसभर मी जिथे वावरत असते, तिथं ती शांतपणे माझ्या मागे मागे फिरत राहते. लहानपणी अद्वय बरोबर ती धाग्याला बांधलेलं खेळणं पकडायला तासंतास खेळत असे. अजूनही तो शाळेतून घरी आला, की घराबाहेर त्याची वाट बघत बसलेली असते. रात्री तो झोपला की कधी कधी जाऊन लाडाने त्याचं डोकंही चाटते.. पण स्वतः झोपायला मात्र माझ्या पायावर येते.

टमी जशी लडिवाळ आहे तशी खूप खोडकरही आहे. आम्ही कोणीही घराबाहेर पडलो, की कुत्र्याने जावं तसं ही आमच्याबरोबर चालायला येते. सकाळच्या घाईच्या वेळेला मुलं शाळेत जायला निघाली ही त्यांच्या मागे लागते. एकदा टमी इतका वेळ त्यांच्या मागे गेली की मला दहा मिनिटांनी फोन आला - "आई ही मागे लागली आहे. जातच नाहीये परत.. तू तिला आता इथून घेऊन जा!"

एखादा मोठा कुत्रा आमच्या अंगणा समोरून नुसता जाताना जरी दिसला, तरी आपण मांजर आहो हे विसरून ही ठमी त्याच्या अंगावर धावून जात असे. एकदा एक मोठ्या कुत्र्याने तिला जरा गुरकावल्यापासून तिची ही खोड तरी मोडली आहे.

कुत्र्यापमाणेच टमी आणि हिप्पो मध्ये सुद्धा काहीसं साम्य आहे. ती हिप्पो सारखी वजनदार तर आहेच आणि हिप्पो सारखंच या खुळ्या मांजराला पाण्यातही खेळायला आवडतं. बाहेर पाऊस पडायला लागला, की ही बाहेर जायचा हट्ट करून बसते. पावसाळी गार हवेत मिमी घरात छान झोपते आणि टमी बाहेर जाऊन शक्य तेवढ्या डबक्यांमध्ये लोळून येते!

बाकी सगळे हे गुण सोडले, तरी कुतूहल हा एक मांजराचा गुण टमी मध्ये पुरेपूर भरलेला आहे. आणि आपलं कुतूहल शमवण्यासाठी ती कधीकधी फारच वेडेपणा करते. कधी शेजाऱ्यांच्या घरामध्ये अडकून पडते, कधी कारच्या ट्रंक मध्ये लपून बसते. काहीच नाही तर बाथरूम मध्ये जाऊन काहीतरी खेळ करता करता चुकून स्वतःला कोंडूनच घेते! पण हिने असला काही खुळेपणा केला, की मिमी फार अस्वस्थ होते. वासावरून का काय कोण जाणे पण तिला टमी कुठे आहे याचा साधारण अंदाज असतो. मग ती जिथे टमी असेल त्यानुसार बाथरूमच्या दाराबाहेर वगैरे बसून कावरे बावरे आवाज काढत राहते. मग आमच्यापैकी कोणीतरी हिरो रेस्क्यूअर बनून दार उघडतो, तर तिथे टमी आपली आरामात काही झालंच नाही अशा थाटात लोळत पडलेली असते!!

टमी आणि मिमी मध्ये काहीसं भावंडांसारखं नातं आहे. टमी तिच्या आई पासून अगदीच लहान असताना सोडवली गेली असावी. शेल्टर मध्ये ती आणि मिमी एकत्र होत्या. मिमी तिच्यापेक्षा थोडी मोठी. त्यामुळे तीच टमीला चाटून पुसून स्वच्छ ठेवत असे. अजूनही कधी टमी झोपली असली तर मिमी लाडाने तिला चाटते. अशावेळी फारच लाडात आली, तर टमीही तिला चाटते, पण नेमकी तिच्या केसांच्या उलट्या दिशेत! त्यामुळे मिमीच्या अंगावरचे सगळे केस उलटे उभे राहतात आणि ती फिस्कारुन पळून जाते. मिमी शांतपणे झोपली असेल तर टमी कधी हलकेच जाऊन तिच्या अंगावर उडी मारेल, तर कधी मिमी जवळ लाडाने लोळून हळूच उंट आणि अरबाची गोष्ट करत मिमीला ढकलून देईल!

मात्र खाऊ खायची वेळ आली, की दोघींना सारखा खाऊ दिला असला तरीही नेहमी शेवटचा घास टमी मिमी साठी सोडून देते. मग मीमी स्वतःचा खाऊ खाऊन टमीने उरवलेला खाऊ सुद्धा खाते. कधी कधी तर टमी मिमी साठी शिकार करून खाऊ घेऊन येते. मग मिमी परत फारच लाडात येते म्हणजे मग टमी परत तिची कळ काढायला मोकळी!

कधी कधी वाटतं प्राणी माणसापेक्षा कमी बुद्धिमान म्हणायचे खरे, पण मग कुठून येत असेल हे शहाणपण - स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे वागतानाही दुसऱ्याला धरून ठेवण्याचं? ते शहाणपण शिकण्यासाठी थोडं थोडं प्राणी व्हायला लागत असेल, तर काय हरकत आहे आपला माणूसपणा थोडासा विसरायला!!

Group content visibility: 
Use group defaults

खूप खूप छान...
टमी पण खूप आवडली...
तिचे आणि मिमी चे नाते खूप छान लिहिले आहे.

Thank you मंडळी, उद्या सकाळी मिमी आणि टमीला तुम्हा सगळ्यांच्या वतीने एक एक एक्स्ट्रा ट्रीट देईन! Happy

काही झालंच नाही अशा थाटात लोळत पडलेली असते!!

^^टमी आणि मिमी मध्ये काहीसं भावंडांसारखं नातं आहे. टमी तिच्या आई पासून अगदीच लहान असताना सोडवली गेली असावी. शेल्टर मध्ये ती आणि मिमी एकत्र होत्या. मिमी तिच्यापेक्षा थोडी मोठी. त्यामुळे तीच टमीला चाटून पुसून स्वच्छ ठेवत असे. ^^
मी हे परत परत वाचतेय. तुम्ही खूप चांगले केलेत की शेल्टर मधून दोघींना पण आणलेत. त्यांना दूर केले नाहीत.

खरं आहे धनवन्ती, मला दोन मांजर हवीच होती - एकमेकांना सोबत म्हणून. आणि त्या दोघींनाही एकमेकींची खूप सवय आहे. एकीला आणून दुसरीला नाही म्हणजे जरा कठीणच झालं असत. वर वर बघता टमीला मिमी ची जास्त गरज लागते. पण मिमी ला सुद्धा सोबत लागतेच, आणि तिचं टमी सोडून कुठल्याही मांजराशी अजिबात पटत नाही. त्यामुळे दोघी एकत्र आहेत ते छान वाटतं - रोज घरी एक फुकट entertainment Happy