आपली गोष्ट - कोल्ह्याला द्राक्ष आंबट?

Submitted by sugandhi on 10 May, 2025 - 11:17

प्रस्तावना https://www.maayboli.com/node/86676

अस्मि दोन अडीच वर्षाची असताना अगदी बोबड कांदा होती पण तरीही ती सगळ्यांशी सहज बोलत असे. तिच्या लाघवी स्वभावामुळे पाळणाघरातल्या अमिता टीचरशी तिची अगदी पहिल्या दिवसापासून गट्टी जमली होती. रोज संध्याकाळी निघताना अमिता टीचर आम्हाला आज अस्मिने हे कागदी विमान केलं, आज हे चित्र काढलं असं काही ना काही सांगत असे. घरी आल्यावरही माऊ आम्हाला तिच्या शाळेतल्या गमती जमती सांगत असे.
त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी आज सकाळपासूनच अस्मि खुशीत होती. "टीचर शाळेत नव्वी गोष्ट सांगणारे, पप्पेट आणणारे... आई, पप्पेट म्हणजे काय माहीत आहे का तुला? नुसती डॉली असते बरं का! ती हलते, पण टीचरच हलवते ती अगं लांब लांब स्ट्रिंग्स लावून!! गम्मत आहे ना?" उठल्या पासून माऊ ची टकळी चालू होती... संध्याकाळी आज पपेट शो पहायला पालकांनाही बोलावलं होत. आम्ही दोघं पाच मिनिट आधीच पोचलो. अजून पाच दहा आई बाबा आलेले होते. सगळी मुलं मुख्य हॉल मध्ये गोळा झाली होती. मध्यभागी लाल पडदा लावला होता. दोन पडदे सोडून मध्ये पपेट शो ची सोय केली होती. सगळीकडे रंगीबेरंगी पताका लावल्या होत्या. सगळी मुलं अगदी उत्साहाने वाट पाहात होती. त्यांची किलबिल चालू होती.

शेवटी कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यात ताया आणि टीचर ने मिळून मुलांसाठी दोन-तीन गोष्टी सादर केल्या. धमाल चालू होती.
शेवटची गोष्ट होती "कोल्ह्याला द्राक्ष आंबट". द्राक्ष वरच्या बाजूला झुलत होती. कोल्हा म्हणे "आहा! गोड गोड द्राक्ष! आत्ता खातो.." मग तो उड्या मारतो, पण त्याचा हात काही पोहोचत नाही द्राक्षा पर्यंत. मग तो दुसऱ्या बाजूला जाऊन उडी मारून बघतो. तरी द्राक्ष काही मिळत नाहीत. द्राक्ष कधी वाऱ्याने थोडीशी खाली येतात, तो अजून प्रयत्न करतो, पण तरीही द्राक्ष काही त्याला मिळत नाहीत! शेवटी "उड्या मारुनी मारूनी, दमून बिचारा कोल्हा, खाली बसून गेला.." पण तरीही परत उठून लबाड कोल्हा म्हणाला - "जाऊदे!! नकोच आहेत मला द्राक्ष!! आंबटच आहेत.."

गोष्ट संपली. सगळ्या टीचर आणि ताया समोर आल्या. आम्ही टाळ्या वाजवल्या. पण अस्मि एकदम गप्प झाली. "काय ग बाबू ?" मी विचारलं, तर पटकन माझा हात सोडून ती टीचरकडे धावत गेली आणि म्हणाली, "टीचर टीचर, संपली? गोष्ट?" टीचर म्हणाली, "हो बाळा, कसा लबाड होता ना कोल्हा?" पण अस्मि टीचरचा हात धरून स्टेजपाशी गेली. तिथलं द्राक्षाचं आणि कोल्ह्याचं पपेट तिने उचललं, आणि कोल्ह्याला द्राक्ष देऊन ती म्हणाली - "हवी होती ना तुला?" वर टीचरला म्हणे - "तो बोल्ला आंबट, पण पण हवी होती त्याला!" तिच्या चिमुकल्या जीवाला तो कोल्हा लबाड न दिसता, खाऊ मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करूनही खाऊ न मिळालेला कोल्हा दिसला होता. म्हणून तिने तिच्यासाठी त्या गोष्टीचा शेवट बदलला होता!

द्राक्ष आता गोड झाली होती - कोल्ह्यासाठी, आणि आमच्यासाठी सुद्धा!!

Group content visibility: 
Use group defaults

गोड!
परवा एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मी आणि माझी भावजय शेजारी शेजारी गप्पा मारत बसलो होतो. तिची चार वर्षांची नात (म्हणजे माझ्या भाचीची मुलगी ) तिथल्या वेगवेगळ्या कार्यक्रमात खेळत होती. त्यात तिला एक कॅडबरी मिळाली तिने ती धावत येऊन तिच्या आजी जवळ सांभाळायला आणून दिली आणि परत खेळायला गेली.
जरा वेळाने ती परत आली तेव्हा बहुदा तिच्या लक्षात आलं, एवढा वेळ आपल्या आजीने कॅडबरी सांभाळली पण आत्याआजीचं (म्हणजे माझं )काय?
मग तिने आजीच्या हातून ती घेतली आणि मला देत म्हणाली,'आता थोडा वेळ तू सांभाळ '.

Thank you, सगळ्या गोड प्रतिक्रियांसाठी!
Cute किस्सा आहे तुमच्या नातीचा शर्मिला!

Happy गोड