शांता शेळके यांची ही कविता जेव्हा आशा भोसले यांच्या स्वरांमधून आपल्याला भेटायला येते तेव्हा स्वप्नातला गाव हे शब्द मनात रुंजी घालतात. दूर जाणारी आणि स्वप्नातल्या गावी नेणारी वाट कशी असेल या बद्दल कुतुहल वाटू लागते, आणि त्या वाटेच्या दिशेने मी विचार करू लागते. त्यावेळी वेगवेगळे बघितलेले रस्ते मला आठवू लागतात आणि नकळत मला त्या प्रत्येक रस्त्याचे, वाटेचे वेगवेगळे पैलू दिसू लागतात. कवितेमधील वाट ही कच्ची पायवाट आहे की डांबरी रस्ता आहे ही जरी कळत नसले तरी आपल्या डोळ्यासमोर ती पायवाट च असावी असे चित्र उभे राहते.
त्यावरून मला असे वाटू लागले की प्रत्येक रस्त्याला, वाटेला त्याचा एक वेगळा असा स्वभाव असतो. आणि तो रस्ता स्वतः च त्याच्या स्वभावाची पावलो पावली आपल्याला ओळख करून देत असतो. जसे की एखाद्या लहान गावाच्या दिशेने मुख्य रस्त्याला लागून जाणारी पायवाट म्हणजे एखादी लाजरी, बुजरी लहान मुलगी च आहे असे वाटते. तर त्याच गावातील मुख्य हमरस्ता मात्र त्या गावचा एखादा नेता किंवा सरपंच वाटून जातो, जो अगदी दिमाखात पुढे पुढे जात असतो.
शहरांमध्ये तर असंख्य रस्त्यांचे जाळे असते. त्यामध्ये पण वेगवेगळे रस्ते असतात जसे की शहरातील मुख्य रस्ते हे एखाद्या श्रीमंत पण गर्विष्ठ माणसासारखे भासतात. पण त्यांना जोडणारे उपरस्ते हे मात्र समजूतदार व्यक्तीसारखे मदतीला नेहमी तत्पर असलेले असे वाटतात. शहरातील गल्ली बोळा या तेथे च खेळणाऱ्या मुलांसारख्या थोड्या खोडकर थोड्या वात्रट अशाच भासतात. शहरांमधील काही रस्त्यांवर जेव्हा अंधार होतो तेव्हा तर तो रस्ता शांत पण गूढ भासतो. ज्याच्या जवळ जायला ही भीती वाटते.
डोंगर दऱ्यांमधून जाणारे रस्ते हे नागमोडी वळणे घेत एक एक डोंगर पर करत जेव्हा आपल्या इच्छित स्थळी पोहचवितात त्यावेळी ते बागडणाऱ्या फुलपाखरांसारखे दिसतात. तर दुरवरच्या रमणीय स्थळाकडे जाताना तेथील रस्ते मला नेहमीच एखाद्या सुंदर तरुणींच्या घोळक्या सारखे हसत खिदळत जाताना दिसतात.
गावागावांना जोडणारे रस्ते विविध प्रकारचे असतात. कधी अगदी अरुंद, कधी बऱ्यापैकी रुंद तर कधी चक्क खडकाळ. अरुंद रस्त्यांना कदाचित पाहुण्यांनी आपल्या कडे यावे असे वाटत असले तरी ते असे म्हणू शकत नाहीत कारण त्यांना संकोच वाटत असावा असे मला उगाच वाटते. तर रुंद रस्ते सगळ्यांना मोठ्या आदराने बोलावतात, या या आम्ही तुमची वाट च बघतो आहे असे तर म्हणत नसावे ना असे वाटते. मामा च्या गावाला जायला हेच तर रस्ते आपल्या सोबत असतात, जणू काही मामाने आपल्याला अगदी सांभाळून आणायला त्यांना सांगून ठेवले आहे. त्यामुळे या रस्त्यांमधे आपलेपणा वाटतो.
खडकाळ रस्त्यांची तर बातच काही न्यारी असावी, त्यांचे रांगडेपण मनाला मोहवितो ही आणि त्यांची तेवढीच भीतीही वाटते. जणू काही एखादा उंच धिप्पाड मल्ल च जणू.
आताचा प्रवास हा तर प्रवाशांना अगदी सुखकर व्हावा म्हणून मोठ मोठाल्या प्रशस्त रस्त्या वरुंन होतो, व आधुनिकतेचा साज लेऊन सज्ज असलेले रस्ते प्रवासासाठी अगदी आतुर असतात, पण त्यामधुन रस्त्यांचा स्वभाव काही ओळखू येत नाही, कदाचित आधुनिकते मुळे रस्त्यांनी त्यांच्या मूळ स्वभावाला मुरड घातली असावी असेच वाटते. शिवाय त्याच्या दोन्ही बाजूस झाडे देखिल कमी झालेली आहेत. त्यामुळे ते आपण बरे नी आपले काम बरे असेच विचार करीत असतील असेच वाटते.
तर अशी ही रस्त्यांची गंमत. या मधील कुठल्याही रस्त्याने मला कायमच खुणावले आहे. कारण तो रास्ता कधीतरी मला माझ्या स्वप्नातल्या गावी घेऊन जाईल होय ना.
#सुपाखरू #प्रयोग २०२५
शिवानी बलकुंदी
ही वाट दूर जाते..
Submitted by शिवानी बलकुंदी on 6 May, 2025 - 04:08
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान लिहिले आहे
छान लिहिले आहे
किस मोड से जाते है
किस मोड से जाते है
कुछ सुस्त कदम रसे कुछ तेज कदम राहें
एक दूरसे आती है .... आके पलटती है
इक राह अकेली सी रुकती है ना चलती है
---------
छान लिहीले आहे.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
सुंदर लिहिलय, मला बालपणी
सुंदर लिहिलय, मला बालपणी गावातल्या शेतातून जाणार्^या वाटा आठवल्या.
काही वाटा दूरवर अज्ञात ठिकाणी नेतात... काही गूढ वाटतात.... तर काही प्रेमळ असतात अन अनवाणी पावलांच्या तळव्याला गुदगुल्या करतात, काही वाटा आई बाबांच्या अन आता हयात नसलेल्या गावी नेतात आणि त्यांच्या बरोबरील प्रवासाची अन सहवासाची आठ्वण करून देतात.
आणि
आणि
The Road Not Taken
ही जिवाला पिसे लावणारी खंत.
@ हरचंद पालव, @केशवकुल,
@ हरचंद पालव, @केशवकुल, @रेव्य@, @नि.३, @सामो तुमच्या प्रतिक्रियां साठी मनः पूर्वक धन्यवाद.
@ सामो इस मोड से जाते है माझे आवडते गाणे आहे.
@ रेव्यु खूप छान प्रतिक्रिया,
@ रेव्यु खूप छान प्रतिक्रिया, धन्यवाद