आपली गोष्ट - आंबे आणि आठवणी

Submitted by sugandhi on 2 May, 2025 - 21:55

प्रस्तावना https://www.maayboli.com/node/86676

बे एरियात राहायला आलेल्या कुठल्याही महाराष्ट्रीयन माणसाला विचारा की तुम्ही उन्हाळ्यात काय मिस करता भारतातलं? एकच उत्तर असेल - हापूस आंबा! माझं गेलं एक दोन वर्ष मे उन्हाळ्यात भारतात जाऊन झालं नाही. प्रमोद गेला होता, पण माझं आणि मुलांचं हापूस आंबा खायचं खूप दिवस राहून गेलं होतं.

आम्ही इथे आलो तेव्हा माझ्या जवळ जवळ दहा-बारा वर्षांपूर्वी आम्ही हापूस आंबा आणायचा प्रयत्न केला होता. पण आंबे अगदीच खराब निघाले. शेवटी आम्ही असं ठरवलं की प्रत्येक जागेची आपली आपली मजा असते, आपला आपला फळ, खाऊ असतो, त्यामुळे हापूस हा भारतात जाऊनच खायचा. मग हापूस आंबे विकत आणणं थांबवलं होतं.

मात्र यावर्षी काही दिवसांपूर्वी रविवारी प्रमोद एकटाच गेला होता इंडियन स्टोअर मध्ये. त्याला वाटलं परत एकदा प्रयत्न करून बघावा, मिळतील पण चांगले आंबे. आणि खरंच यावर्षी आम्हाला हापुस आंबे मिळाले! मस्त जर्द केसरी रंगाचे, गोड आंबे. सोमवारी संध्याकाळी ऑफिस मधून घरी आलो, आणि दार उघडल्यावर जाणवलं की आंब्याच्या सुरेख वासाने घर भरून गेलं आहे! सुंदर पिकलेला आंबा कापून खाल्ला आणि असं समाधान झालं!

मी कुठच्या कुठे माझ्या लहानपणीच जाऊन पोहोचले. मे महिन्यात आम्ही भावंड कोकणात बाबांच्या गावाला किंवा आजोळी जायचो. आजीच्या घरी माडी वरती आंब्याची अढी घातलेली असायची. तिथे गवताचा आणि आंब्याचा असा मिसळलेला वास असे. बाबा, काका कोणीतरी रोज सकाळी 'आज खायचे हे आंबे' म्हणून सगळ्यात जास्त पिकलेले आंबे एका सुपात काढून ठेवायचे. आणि आम्ही येता जाता ते आंबे फस्त करायचो. जोडीला फणस आणि करवंद पण असायची.

आजोळी सुद्धा आंब्याची चैन होती. तिथल्या अढीमध्ये एक काळ मांजर येऊन बसत असे. तिचं नाव काळुबाई होतं. माझ्या आजीला मात्र ते मुळीच आवडत नसे. माझ्याकडच्या आंब्याच्या पेटीमध्ये गवत नव्हतं आणि मांजरांनाही त्याच्यात फारसा इंटरेस्ट वाटला नाही. पण आंबे संपल्यावर मात्र मांजरं त्या खोक्यात जाऊन बसली!

खूप वर्षांनी मुलं मोठी होतील, खूप दिवसांनी मग कधीतरी त्यांना हापूस आंबे मिळतील, घर आंब्याच्या सुवासाने भरून जाईल आणि त्यांना आठवेल - टमी आणि मिमी आंब्याच्या खोक्यात बसायच्या म्हणून!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छानच.
कोकणातून तिकडे आंबा मागवण्यासाठी एक वेबसाईट होती ती बंद आहे का ?
आंबापोळी मिळते ना तिकडे ? कोकणातले एक जण पाठवतात .

आंबापोळी ऐवजी आंबा पापड ( जेली टाईप दिसतात) बनवून त्याचे रोल्स बनवले कि महिनाभर टिकतात. कच्च्या कैरीचे आणि पाडाचे दोन्हीही बनवता येतात. तिथे आंबे मिळाले तर नक्की ट्राय करा.

Thank you,
इथे दुकानात ते जेली सारखे आंबा पापड मिळतात. पण गंमत म्हणजे आंबा पोळी किंवा साठ म्हणायचं ते मिळत नाही.
ते मी भारतात बाबांना घेऊन ठेवायला सांगते आणि खूप खाते गेले की!
पण या उन्हाळ्यात खऱ्या हापूस आंब्याची मजा चालू आहे!

छान.. लिहित राहा..

गावच्या ओरिजनल चवीचे साठ इथेही सहजी कुठे मिळत नाही.
आंब्याचे फणसाचे दोन्ही आलटून पालटून खायला मजा यायची.

तुमच्या गावच्या आंब्याच्या आठवणी रिलेट झाल्या. एका स्वतंत्र खोलीत गवतभर पसरलेले आंबे आणि त्यातून पिकलेले एका परातीत काढून ठेवायचे आणि येता जाता त्यावर ताव मारायचा.. मी हा अनुभव एकदाच घेतला पण वडील त्यांच्या लहानपणीच्या आठवणीत फार सांगायचे हे.