पंख आणि आकाश

Submitted by शिल्पा गडमडे on 26 April, 2025 - 16:50

राधा ऑफिसातून घरी यायला निघाली होती तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिच्या नवऱ्याचा, समीरचा फोन होता.
‘घरी यायला किती वेळ आहे?’ समीरने विचारले.

असा प्रश्न आला की त्यामागे नेहमीपेक्षा वेगळं कारण असणार हे ती जाणून होती.

‘निघालेच आहे. का रे?’

‘काही नाही.’ समीर म्हणाला. तो ‘काही नाही’ म्हणाला असला तरी त्याच्या आवाजातील अस्वस्थता राधाने ओळखली.
‘काही झालंय का समीर’ राधाने काळजीने पुन्हा विचारले.

‘अगं, मी रमाला शाळेतून घरी घेऊन येत असताना घराजवळच्या झाडाखाली एक चिमणीचं पिल्लू पडलेलं दिसलं. चार पाच दिवसाचंच असावं ते. थरथरत होतं आणि फारशी हालचाल करत नव्हतं. आणि तशीही बाहेर कितीतरी मांजरं फिरत असतात म्हणून आम्ही त्याला घरी घेऊन आलोय.. चिमणीला आम्ही पाणी द्यायचा प्रयत्न करतोय पण अजून काही ती पाणी पित नाहीये. तू घरी आलीस की आपण दुकानातून चिमणीसाठी खाऊ मिळतोय का ते बघूया.’ समीर एका दमात बोलून मोकळा झाला.

राधाला बाप-लेकीचं प्राणी, पक्षीप्रेमी नवीन नव्हतं. चिमणीला घरात आणलं म्हणजे हे दोघंही तिच्याच भोवती घुटमळत असणार आणि काळजी करत असणार हे राधला अनुभवाने माहिती होतं. त्यामुळे राधाने शक्य तेवढ्या लवकर घरी पोहचण्यासाठी घराकडे धाव घेतली.

घरी पोहोचल्यावर राधाने हातातलं सामान एका बाजूला ठेवलं आणि चिमणीला पाहायला गेली. तिच्या लेकीने, रमाने कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये मऊ कापड अंथरून, त्यावर कापूस टाकून चिमणीसाठी मऊ आणि उबदार जागा तयार केली होती. समीर फोनवर म्हणाला होता तसं, चिमणी अगदीच लहान होती. राधाला पाहता क्षणीच जाणवलं.
राधाने तिला पाणी द्यायचा प्रयत्न केला पण चिमणीने काहीच प्रतिसाद दिला नाही.

“चिऊताई चिऊताई दाणा खा, पाणी पी..” हे बालगीत ऐकत मोठे झालो असलो तरी चिमणी नेमकं काय खाते, याची माहिती नव्हती. तिघांनी चिमणीसमोर दाणे ठेवून पहिले पण त्या ठेवलेल्या दाण्यांकडे तिने पहिले देखील नाही. दुकानात खास चिमण्यांसाठी मिळणारं अन्न विकत आणलं त्याचाही काही उपयोग झाला नाही. चिमणीची हालचाल हळूहळू मंदावत चालली होती.

संध्याकाळ झाली होती, सगळ्यांना काळजी वाटू लागली. ‘चिमणीला काही होणार नाही नं’? रमा सारखं आई-बाबाला विचारात होती. संध्याकाळ झाली होती त्यामुळे यावेळी कुठला डॉक्टर उपलब्ध असण्याची शक्यता फार कमी होती.

राधा, रमा, समीर सगळे चिंतेत पडले.

‘चिमणी काहीच खात नाहीये, आता आपण काय करायचं?’ रमाच्या प्रश्नाने समीर आणि राधा दोघांनाही विचारात पाडलं. त्यांनी एकमेकांकडे पहिलं, आता अजून वाट बघून चालणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं. राधाने मोबाईल काढला आणि या वेळेला कुठला प्राणी डॉक्टर उपलब्ध असेल का, याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तिच्या मनात एकच विचार होता-चिमणीला लवकरात लवकर मदत मिळायला हवी नाहीतर चिमणीचा जीव जाण्याची शक्यता होती.

राधाला मोबाईलवर शोधता शोधता एका संस्थेची माहिती दिसली. ती संस्था प्राणी आणि पक्ष्यांना अडचणीतून वाचवण्याचे काम करत होती. तिने तातडीने तिथे दिलेल्या नंबरवर फोन लावला. ‘देवा, कोणीतरी फोन उचलू देत’ असा मनोमन धावा ती करत होती. रिंग गेली आणि पलीकडून आवाज आला.

‘नमस्कार, बर्ड रेस्क्यू सेंटर. आपल्याला काय हवंय?’

राधाने घाईघाईने सगळी परिस्थिती समजावून सांगितली. समीर आणि रमाला खाली पडलेली चिमणी कशी दिसली, अशक्त चिमणीला घरी आणल्यावर खाऊ पिऊ घालण्याचा कसा प्रयत्न केला, चिमणी त्याला कसा प्रतिसाद देत नाहीये ते.. जितक्या लवकर सांगता येईल तितक्या लवकर ती बोलत होती.

पलीकडून आवाज आला, ‘काळजी करू नका, आमच्याकडे असे बरेच पक्षी येत असतात. आम्ही योग्य तऱ्हेने त्यांची काळजी घेतो. फक्त उशीर झाल्यामुळे आता तुमच्याकडे चिमणीला घेण्यासाठी कोणाला पाठवता येणार नाही. तुम्ही आमच्याकडे चिमणी आणून देऊ शकाल का?’

समीर, राधाने लगेच होकार दिला. त्यांनी चिमणीला हलकेच उबदार कपड्याच्या आत ठेवलं आणि गाडीतून ते चिमणीला पोहचवायला निघाले. लहानगी रमा पण सोबत निघाली. गाडीत पूर्ण वेळ ती चिमणीकडे बघत होती.

‘आई चिमणीला काही होणार नाही ना?’ रमा घाबरून विचारत होती.

दुपारी घरी आणलेल्या चिमणीची काळजी घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. पण आता चिमणीच्या मंदावणाऱ्या श्वासाची काळजी तिघांनाही होती.

‘आपण चिमणीला योग्य ठिकाणी नेतोय. काही होणार नाही बाळा’, राधाने थरथरत्या आवाजात रमाला कसाबसा धीर दिला.

थोड्याच वेळात ते त्या संस्थेत पोहोचले. तिथल्या व्यक्तीने चिमणीला अलगद हातात घेतलं, तिची काळजीपूर्वक पाहाणी केली आणि म्हणाले, ‘ही खूप अशक्त झाली आहे. पण आम्ही तिला गरम वातावरणात ठेऊन लवकर बरं करायचा प्रयत्न करू. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही एक दोन दिवसाने फोन करून तिच्या प्रकृतीची चौकशी करू शकता’.
राधा आणि समीरने त्या संस्थेतील व्यक्तीचे मनापासून आभार मानले. रमाने जड मनाने चिमणीचा निरोप घेतला.

गाडीत बसल्यावर, रमाने शांतपणे पेपर काढला आणि चित्र काढायला सुरुवात केली. तिच्या चित्रात एक छोटी चिमणी आणि दूरवर पसरलेलं आकाश दिसत होतं, चिमणीला मुक्तपणे उडण्यासाठी.. रमा चित्र काढण्यात गुंतली होती.
राधाने मोबाईल काढला, त्या संस्थेचा नंबर डायल लिस्टमधून डिलिट केला. ती चिमणी पुन्हा आकाशात उडेल, या रमाच्या चित्रावर तिने विश्वास ठेवायचा ठरवला.

समीर गाडी चालवता चालवता दोघींकडे पाहात होता. दुपारपासून आत्तापर्यंत भावनांची, विचारांची मोठी रोलरकोस्टर राईड झाली होती. त्याने गाडी घराच्या दिशेने वळवली, आणि त्याच्या मनात एक विचार आला– आम्ही तिघं आमच्या घरट्याकडे निघालो आहोत, पण चिमणीला लवकर बरे होऊन तिचं घर, आकाश परत मिळू दे.

@ शिल्पा गडमडे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults