बंद दरवाजे
लाडक्या लेकीचं जयंतराव आणि शामा ताईंनी थाटात लग्न करून दिले, आजी आजोबा, आई बाबा आणि दादा अशा भरलेल्या घरातली मयूरी लग्न होऊन सासरी आली तेव्हा लग्न घर पाहुण्यांनी भरलेल होतं, लग्नासाठी जमलेल्या पाहुण्यांचा हास्य विनोद सुरू होता.
सुरुवातीला त्यांच्यात कावरी बावरी झालेली मयूरी आतून मात्र सुखावली होती, घरात खूप सारे लोकं तिला नेहमीच हवहवेसे वाटायचे, तिच्या घरी आजी आजोबा सोबत राहत असल्यामुळे त्यांना भेटायला सतत कोणी ना कोणी पाहुणे असायचे कधी आत्या, कधी लहान काका तर कधी आजोबांचे भाऊ, तर कधी आजी ची बहीण, शांता आजी, त्यामुळे इथलं पाहुण्यांनी भरलेलं घर बघून ती मनातून खुश झाली.
सगळे घरात होते तेव्हा सैंपाकासाठी बाई होत्या, सासू बाई त्यांना मदत करीत आणि मयूरी तर नवी नवरी होती, तिला तर कुणीच काम करू देत नव्हते.
दोनच दिवसात सगळी मंडळी पांगली, तसे घरात फक्त सासू सासरे, मयूरी आणि सागर एवढेच राहिले, सागर ने नवीन नोकरी धरली होती त्यामुळे त्याला लग्नासाठी म्हणून फक्त आठवडा भरच सुट्टी मिळाली होती. त्यामुळे दोघांना नव्या नोकरीच्या शहरात लगेचच जायचे होते.
सगळे घरात असताना मयूरीच्या सासूबाई सगळ्यांशी खूप छान बोलत, मयूरीला पण काहीच काम पडू देत नव्हत्या, आणि जास्त बोलत पण नव्हत्या. मयूरील वाटले, सगळे आहेत म्हणून त्या तीच्याशी कमी बोलत असतील सगळे गेले की त्या बोलतील, पण नंतरही त्या मयूरीशी फारशा बोलल्या च नाही. त्या घरात तर घरात कुणी कोणाशी काम शिवाय जास्त बोलतच नव्हते. सासरे त्यांच्या पुस्तकांमध्ये, आणि टीव्ही वरील बातम्यांमध्ये च असतं, ते फक्त जेवण्यासाठी आले की मयूरीला 'काय म्हणताय सूनबाई', एवढेच बोलत,
सासूबाई तर सैंपाकघर, त्यांचे बाग काम आणि इतर घर कामात व्यस्त असतं आणि सागर तर घरी उशीरा च येई. त्यामुळे मयूरीला नव्या घरी सारखी आईची, आजीची, आपल्या घराची आठवण येई, पण सांगणार कुणाला, आई ला फोन केला तर ती पण फोन वर जास्त बोलत नसे, बरं, आई ला भेटून येते, असं म्हटले की 'काय काम गं?,' आहे असे सासू बाई विचारीत, एकूण च मयूरी लग्न होऊन नव्या घरात आल्यावर तिथे तीचे मन रमत नव्हते.
त्यातच सागर आणि मयूरी ला आता नव्या नोकरीच्या शहरात जायची तारीख नक्की झाली. मयूरीला वाटले आता आपण नव्या शहरात जाणार, त्या शहरात आपले कुणीच नाही, आपले आई बाबा पण इथेच आहे. म्हणून ती सासू ला म्हणाली, “ आई बाबा तुम्ही ही चला ना आमच्या सोबत.”
“ अगं आत्ताच तर तुमचे लग्न झाले, काही दिवस दोघेच रहा. नंतर आम्ही येऊ कधीतरी.”
असे त्रोटक उत्तर देऊन सासूबाई, आपल्या खोलीत निघून गेल्या, आपली सासू आपल्याशी मोकळेपणाने, आनंदाने बोलत च नाही, म्हणून मयूरी हिरमुसली झाली. तिने सागर ला पण हे सांगितले. तर सागर म्हणतो कसा,
“ अगं तिला अजून तुझी सवय झाली नाही ना”,
“हो, पण म्हणूनच तर मी त्यांना आपल्या सोबत चला म्हणतेय तर त्याला, पण त्या नाही म्हणाल्या.”
मयूरीला वाटले सागरचे म्हणणे पण बरोबरच आहे, पण तरीही तिला सासूच्या बोलण्यातून, वागण्यातून काहीतरी खटकत होतेच. कितीतरी वेळ मयूरी विचार करीत राहिली. नक्की काय चालले होते त्यांच्या मनात?
#सुरपाखरू #प्रयोग२०२५
शिवानी बलकुंदी
बंद दरवाजे
भाग दोन
सागर आणि मयूरी चा जाण्याचा दिवस ठरला. विमानाची टिकीटं पण बूक झालीत. दोनच दिवसांनी जायचे होते, त्यामुळे सागरने मयूरी ला समान पॅक करायला सांगितले. गावाला जायचे तर जायच्या आधी आई बाबांना भेटायलाच हवे. सकाळी नाश्ता झाल्यावर ती लगेच छान तयार झाली आणि माहेरी जायला निघाली. सागर ला पण तिने सोबत चलण्याचा आग्रह केला. पण जायच्या आधी काही महत्वाची कामं संपवायची आहेत म्हणून तो सोबत जायला नाही म्हणाला. मयूरी थोडी हिरमुसली झाली. ती आईला भेटून येते म्हणून सासूबाईंना सांगायला गेली. तर त्यांच्या खोलीचे दार बंद होते, बराच वेळ आवाज देऊन पण त्या बाहेर आल्या नाहीत. मयूरी ने त्यांना फोन केला तर त्यांनी फोन पण नाही उचलला. शेवटी तिने त्यांच्या फोन वर मेसेज केला आणि निघाली.
मयूरी एकटीच कॅब करून घरी पोहोचली. गेट मधून आत शिरताच तिला आजोबा झाडांना पाणी घालताना दिसले. त्यांना बघून मयूरीने त्यांना मिठीच मारली, त्यामुळे त्यांच्या हातून पाण्याचा पाइप खाली पडला, आणि दोघेही मस्त ओले झाले, मयूरी तर मोठ्याने हसायलाच लागली, आजोबाही हसू लागले, "साॅरी, आबा" म्हणून म्हणत मयूने त्यांना नमस्कार पण केला.
तिचा आवाज ऐकून आजी बाहेर आली आणि म्हणाली, “काय हे मयूरी तुझं वागणं, आता पोरकटपणा कमी कर जरा.” आजी ला बघताच आज्जीsss असं म्हणून मयूरीने आजीला पण मिठी मारली.
आत घरात जाऊन तिने बाबांना शोधले पण बाबा घरी नव्हते, मग तिचा मोर्चा आई कडे म्हणजे सैंपाक घराकडे वळला.
“आई, बाबा कुठे गेलेत ग?”
“अगं, तू येणार म्हणून तुझ्या आवडीचे रसगुल्ले आणायला गेलेत.”
"काss य? रसगुल्ले?, यीप्पी "
‘मयू, अगं सागर नाही आला?’
“कुठेसं, काम होतं म्हणे, मग मी पण काही आग्रह नाही च् केला”,
आल्या पासून मयूरी ची अखंड काहीना काही, बडबड, गप्पा, टप्पा सुरूच होती, दुपारची जेवणं ही गप्पांमधून आणि हास्य विनोदात पर पडली.
दिवसभर सगळ्यांसोबत मयूरी चा दिवस मज्जेत गेला. आई आणि आजी ने तिला लवकर उठत जा, सैंपाक नीट मनापासून करत जा, अशा एक ना अनेक सूचना केल्या. आजी ने तर तिला घरात रिकामी बसून राहू नको काहीतरी शिक, नोकरी, व्यवसाय कर अशी सक्त ताकीदच दिली. मयू साठी आई ने खूप सारे फराळचे पदार्थ सोबत न्यायला केले होते.
आई बाबांच्या आग्रहवारून मयूरी रात्री तिथेच थांबली. तिने सागर ला पण फोन करून तसे कळवले. सागर ने पण काहीच जास्त न् बोलता ठीक आहे असे म्हणून फोन बंद केला. तिने सासू बाईना पण रात्री मी, आईकडे राहते आहे, असा फक्त मेसेज केला, पण त्यांनी काहीच रीप्लाय केला नाही. मयूरीला तर सगळे गूढ च् वाटत होते. तसे तिने आई ला बोलून ही दाखवले. पण आई त्यावर काहीच बोलली नाही. त्यामुळे मयूरीचे मन अस्वस्थ झाले.
उत्तर रात्री कितीतरी वेळांनंतर तिला झोप लागली.
कमशः
#सुरपाखरू #प्रयोग२०२५
शिवानी बलकुंदी
बंद दरवाजे
भाग तीन
दुसऱ्या दिवशी सकाळी मयूरीला सोडायला तीचे आई बाबा दोघेही आले. मयूरी
खूपच खुश होती. नवीन शहरात गेल्यावर नवी जागा, नवे लोक संगळ्यांशी कस जुळवून घ्यायचं या बद्दल आई मयूला सांगत होती. तेवढ्यात घर आलेच आणि बाबांनी गाडी घरासमोर थांबवली. दोघी गाडीतून खाली उतरल्या, मयूरी च्या आईने बांगल्या कडे सहजच बघितले, कोणालाही हेवा वाटावा असा तो टुमदार दोन मजली बंगला होता. शहराच्या श्रीमंत वसाहतीत स्वतंत्र बंगला, खरंच भाग्यवानच् आहे आपली मयू असे त्यांना मनोमन वाटून गेले. कौतुकाने आई ने मयू कडे पहिले.
मयूरी गेट उघडायला पुढे झाली, तिने वरची कडी काढली पण गेट उघडले नाही म्हणून तिने खाली बघितले तर खालची कडी आतून आणि बाहेरून लागली होती. मयूरीने दोन्ही कड्या उघडल्या आणि आत शिरली, पाठोपाठ आई, बाबा पण आत आले.
घराच्या एका बाजूला आंब्याचे मोठे झाड होते, त्याची सावली घरावर पडत असे, आंब्याला छान मोहर आला होता आणि त्याचा सुगंध अंगणात पसरला होता, मयूरीने तो सुगंध श्वासात भरून घेतला. दुसऱ्या बाजूला असलेले चाफा, तगर, कुंदा, गुलाब बघून ती मनोमन सुखावली. अशी बहरलेली झाडं अंगणात असावी असं तिला नेहमी वाटत असे. आंब्याच्या गर्द झाडावर पक्षांचा किलबिलाट सुरू होता, अंगण अनेक शोभिवंत झाडांनी सजले होते.
मयूरीचे लक्ष पार्किंग मध्ये असलेल्या गाड्यांकडे गेले. घरातील सगळ्या गाड्या तिथेच उभ्या होत्या, 'चला, म्हणजे सगळे घरीच आहेत तर,' असे तिला वाटले.
मयूरीने पुढे होऊन मुख्य दरवाजाची बेल वाजवली. पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तिने बऱ्याच् वेळा बेल वाजवली. पण कोणीच दार उघडले नाही.
मयूरी आणि तीचे आई बाबा विचारात पडले. कुठे बरं गेले असतील सगळे? सगळ्या गाड्या तर घरीच आहेत. मयूरीने सागर ला फोन लावला पण फोन स्विच ऑफ होता. म्हणून आईने तिच्या सासू बाईंना फोन लावून पाहिला आणि बाबांनी तिच्या सासऱ्यांना फोन लावला पण कुणाचाच फोन लागत नव्हता.
बंद दरवाजे बघून शेवटी मंडळी परत जायला निघाली. काय बरं झालं असेल?
बाबांनी गाडी सुरू केली, जड पावलांनी मयू आणि तिची आई गाडीत बसल्या, आईचे मयूकडे लक्ष गेले तर तिचा चेहरा रडवेला झाला होता, गाडी सुरू होताच अचानक मयू आईला बिलगून हमसाहमशी रडू लागली, आई च्या ही डोळ्याना धारा लागल्या.
मंडळी घरी परतली, आजीने दार उघडले तशी मयू आज्जी म्हणून आजीच्या गळ्यात पडून रडू लागली. “ काय झाले गं मयू ?” आजी ने विचारले.
मयू काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतीच.
“अगं घराला कुलूप आहे त्यांच्या, आणि काही निरोप ही नाही, फोन पण लागत नाहीये कुणाचाच. काही कळतच नाहीय, काय झाले.” बाबा म्हणाले.
सगळे जण काय झाले असावे अशा काळजीत असतानाच मयूरीच्या फोन ची रिंग वाजते. पलीकडून सागर बोलत असंतो.
“हॅलो मयूरी, अग सगळं एवढ्या पटकन झालं की तुला सांगायच राहूनच गेलं, आणि फोन करायला पण वेळ नाही मिळाला. सॉरी डियर, “
सागर चा आवाज एकूण मयूरी, थोडी सावरली,
“ अरे, पण असं झालं तरी काय?’
“सगळं सांगतो, दुपार पर्यन्त येतोय तिकडे. “
“काही काळजी चं कारण तर नाही ना?”
सागरने त्यावर काहीच उत्तर दिले नाही आणि फोन कट केला.
आई अगदी अधीरतेने “ काय म्हणाला सागर?”
“थोड्या वेळात येतोय इथे, नंतर सांगतो म्हणाला”
थोडा वेळ कोणीच कोणाशी काहीच बोलत नाही. सगळे आपापल्या कामाला निघून जातात.
मयूरी च्या नजरेसमोरून सागर सोबत लग्न ठरल्या पासून च्या सगळ्या घटना एक मागून एक जाऊ लागतात. दोघांनी सोबत केलेली लग्नाची खरेदी, नातेवाईकांना दिलेली आमंत्रणं, प्री वेडिंग शूट, लग्नाचे विधी, सगळं सगळं. ते आठवून मयूरीला आता नेमकं काय होणार काहीच कळतं नव्हतं.
दुपारची जेवणं होतात, सगळे जण आपापल्या खोलीत आराम करायला निघून जातात. मयूरी एकटीच तिच्या खोलीत जाते, आणि विचारात पडते, कालच घरातले सगळे जण किती खुश होते, एकाच दिवसात काय असं झाले, सगळे असे आपापले दारं बंद करून बसले आहेत.
विचार करता करता मयूरीचा डोळा लागतो.
दिवस संपून तिन्हीसांज होते,
मयूरी ला अचानक जाग येते, आणि
एवढ्यात तिला बाहेरील फाटकाचा आवाज येतो, तशी मयूरी धावत दाराकडे जाते तर सागर च् फाटकातून आत येत असंतो.
सागर आत येताच मयूरी मयूरी सागर वर प्रश्नांचा भडिमार करते.
“ काय झालं सागर?” सगळं ठीक आहे नं? आई बाबा कुठेत? घर बंद का होतं?”
“सांगतो, सगळं सांगतो, आधी थोडं पाणी आणतेस का प्यायला?’
#सुरपाखरू #प्रयोग२०२५
शिवानी बलकुंदी
बंद दरवाजे
शेवटचा भाग
सागर बोलू लागला, “ मयूरी सगळे नीट ऐक, काही गैरसमज करून घेऊ नकोस, “
“ पूर्वी आमचा म्हणजे आजोबांचा व्यवसाय होता, त्यांनी तो शून्यातून उभारला होता, आजोबांनी बाबा मोठे झाल्यावर त्यानांही आपल्या व्यवसायातच् काम करायला सांगीतले. बाबांनी खूप कष्टाने तो व्यवसाय वाढवला, आजोबा गेले त्यानंतर बाबांना एवढा मोठा व्यवसाय सांभाळणे कठीण होऊ लागले. म्हणून त्यांनी काही नवीन लोकांना त्यांच्या व्यवसायात भागीदार करूंन घेतलं.” सागर सांगू लागला.
सागर चा आवाज ऐकून एक एक जण बाहेर येऊ लागले
“ बरं मग?, हे तर तुझ्या बाबांनी सांगीतलेच होते की, पूर्वी त्यांचा व्यवसाय होता म्हणून.” बाबा यातून बाहेर येत म्हणाले.
“हो, खरं आहे, बाबांना व्यवसाय वाढवायचा होता म्हणून त्यांनी आपल्या नावाचा व्यवसाय भागीदारी ने सुरू केला त्यासाठी काही प्रॉपर्टी शी संबंधित व्यवहार करायचे होते, त्यावेळी त्यांच्या व्यावसायिक भागीदाराने त्यांचा विश्वास घात केला, आणि त्यांना फसवून, सगळा व्यवसाय आपल्या नावे करून घेतला. शिवाय त्याने, आम्ही व्यवसायासाठी तारण म्हणून दाखवलेलं आमच राहतं घर ही त्याने स्वतः च्या नावे केलं, “
“बापरे हो का? “ आजोबा म्हणाले.
“मग आता ते घर ?” आई म्हणाली.
“तोच तर मोठा प्रॉब्लेम झाला आहे, बाबांच्या सही ची सगळी कागद पत्रे, आता त्यांच्या कडे आहेत. आणि त्यामुळे आता आमचे राहते घर ही त्यांच्या नावाने झाले आहे. आम्हाला कोर्टा कडून एक महिन्या पूर्वीच घर सोडण्याची नोटिस मिळाली होती, पण लग्नासाठी आम्ही त्यांना विनंती केली आणि एक महिन्याची मुदत मागितली, ती त्यांनी मान्य केली.”
“ काय?, हे सगळं तुम्ही आधी काही च् नाही सांगितलं, तुम्ही आम्हाला फसवलं,” मयूरीचे बाबा जोरात ओरडले.
“ मग तुझे आई, बाबा कुठे आहेत आता?, “ आई ने विचारले
“ आज पहाटेच मी त्यांना आमच्या गावी सोनपुर ला सोडायला गेलो होतो, ते ही आधी माझ्या सोबत इकडे येणार होते. पण मीच त्यांना नाही म्हणालो. त्यांना आमच्या गावी सोडून आत्ता मी तीकडूनच येतो आहे, सागर उत्तरला. “
“अच्छा म्हणजे तुमच्या पार्टनर ने तुम्हाला फसवले आणि तुम्ही आम्हाला, छान.” इति बाबा.
“ नाही बाबा आम्ही फसवले नाही, आमचे राहते घर तरी आम्हाला मिळेलच अशी आम्हाला खात्री होती आणि ते मिळावे यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. कालच त्यावर शेवटचा निर्णय झाला, त्यामुळे काल दिवसभर आम्ही सगळे च खूप टेंशन मध्येच होतो, पण निर्णय आमच्या बाजूने नाहीच लागला. “
“ हा सगळा बनाव आहे, तुम्ही खोटं बोलताय” बाबांच्या शब्दांमधून राग व्यक्त होत होता.
“मग आता आमचा ही निर्णय ऐका, तुम्हाला आता या घराचे दरवाजे कायमचे बंद, तुम्ही आम्हाला फसवले, आता आमची मुलगी तुमच्या सोबत कुठेही येणार नाही. ती इथेच राहील” मयूरीचे बाबा गरजले.
“ अहो काय बोलताय हे, आत्ताच पोरीच लग्न झालंय, आणि तुम्ही तिला घरीच ठेऊन घेणार आहात का?, शांत व्हा, थोडा विचार करा.”
“ बाबा, तसेही मी आणि मयूरी, बंगलोरलाच राहणार आहोत, या घरी कधीतरी आलो असंतो, कधी मयूरीला माहेरी यावसं वाटलं तर तुमचं घर आहेच ना. आणि माझी नोकरी, आणि पगार तुम्हाला सांगितल्या प्रमाणे च आहे, आणि तसेही मयूरीने लग्न माझ्याशी केले आहे, घराशी नाही, शिवाय गावाकडे आमची शेती आणि वाडीलोपार्जित घर आहेच.”
“ अच्छा, म्हणजे आता तुम्ही आम्हाला शहाणपण सांगणार का? यापुढे मयूरी कुठेही जाणार नाही ती इथेच राहील या घरात.” बाबा खूप रागारागाने बोलत होते,
मयूरीच्या डोळ्यातून सारखे अश्रु येत होते. आजी च्या तोंडून तर काही शब्द च फुटत नव्हते. आई आणि आजोबाही सागर चे बोलणे अस्वस्थ पणे ऐकत होते.
“ बाबा, तुम्हाला हे सगळं आधी सांगू शकलो नाही, कारण तुमचा नकार येईल अशी भीती वाटत होती. त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो., मला पहिल्या भेटीतच मयूरी खूप आवडली होती, तिला बघितल्यावर हीच माझी बायको व्हावी अशी मी देवाकडे प्रार्थना केली, मयूरीला पण मी आवडलो असेल, असं मला जाणवलं, “ म्हणून मग हा विषय मी जाणून बुजून टाळला, आई मला एक दोन वेळा बोलली होती, तुम्हाला सांगण्यासाठी, पण हिम्मत च् नाही झाली.”
“माझ्यावर विश्वास ठेवा बाबा, मी मयूरी ला काही कमी पडू नाही देणार. माझ्या साठी या एका घराचे दरवाजे बंद झाले असले तरी या ही पेक्षा मोठ्या घराचे दरवाजे मी तिच्या साठी उघडेंन,” मी वचन देतो तुम्हाला, जोवर मी एखादे मोठे घर मयूरी साठी घेणार नाही तोवर तुमच्या घरात पाऊल ही टाकणार नाही. पण तुम्ही तुमच्या मनाचे दरवाजे मात्र माझ्यासाठी कायमचे बंद नका करू, प्लीज, मी विनंती करतो.”
सागर उठतो सगळ्यांना वाकून नमस्कार करतो आणि मयूरी कडे बघून म्हणतो,
“ मयूरी चल, मी तुझं सामान घेऊन आलोय, आपल्या विमानाची ची वेळ झालीय, बाहेर टॅक्सी उभी आहे,.”
मयूरी बाबांकडे बघते, तर तिला त्यांच्या डोळ्यात राग दिसतो, तिच्या तोंडून तर शब्द च् निघत नाही, ती आई कडे बघते, आई मान हलवून होकार देते.”
मयूरी आई ला जाऊन बिलगते, आजी ला आणि आजोबांना नमस्कार करून बाबांना नमस्कार करायला जाते.
“मयू, तू या खोटारड्या माणसा सोबत जातेय?, अग तू इथे राहिली तरी आम्हाला आनंदच आहे, हे घर ही तूझंच आहे. आम्ही अजून विकून खाल्लं नाहीये.” बाबांचा राग शांत होत नव्हता. म्हणून आजी म्हणाली,
“अरे, पोरीचं लग्न लावून दिलं आहे, आता तिला ठरवू दे काय करायच ते, तू उगाच डोक्यात राग घालून घेऊ नकोस.”
“ ज्यांनी सुरुवातच खोटे बोलून केली असेल, त्यांना आपली मुलगी देऊन द्यायची, तुझ्या आई बाबांना सांग आम्हाला आमची मुलगी जड नाही झाली म्हणावं” बाबांचे रागावणे सुरूच होते.
सागर ने हतबल पणे मयूरी कडे बघितले, मयूरीला सागर च्या नजरेतील प्रेम आणि हतबलता दिसली,
“बाबा आम्हाला आशीर्वाद द्या, फ्लाइट वेळ झालीय” मयूरीने बाबांना वाकून नमस्कार केला.
“ बाबा मलाही आशीर्वाद द्या,” सागर ने बाबांना नमस्कार करत म्हटले,
“ बाबा माझ्या घराचे दरवाजे बंद झालेत तर मला जास्त वाईट नाही वाटले, पण तुम्ही मात्र तुमच्या मनाचे दरवाजे आमच्या साठी कधीच बंद करू नका प्लीज,”
रागात असलेल्या बाबांना मयूरी आणि सागर नमस्कार करतात,
ते काहीच न बोलता आपल्या खोलीत जाऊन आतून दार बंद करून घेतात.
मयूरी आईला बिलगते आणि डोळे टिपत सागरचा हात धरून दारातून बाहेर पडते.
फाटकातून बाहेर पडत असताना मयूरी बाबांच्या खोलीच्या दाराकडे बघते, बाबा बंद दाराच्या फटीतूंन मयूरीकडे बघत असताना तिला दिसतात.
समाप्त.
#सुरपाखरू #प्रयोग२०२५
शिवानी बलकुंदी
छान आहे कथा. आवडली. भाषा सोपी
छान आहे कथा. आवडली. भाषा सोपी व सुटसुटीत आहे. कथेचा वेग उत्तम आहे त्यामुळे वाचायला मजा आली.
शेवटी शेवटी भूतकाळातून वर्तमान काळात लिहिले आहे. म्हणजे जातात येतात करतात. ती गेली आले गेले असे हवे होते.
छान, आवडली..
छान, आवडली..
काय सीन झाला असेल अशी उत्कंठा वाटली खरी..
शेवटी योग्य निर्णय घेतला.
वरच्या दोन्ही प्रतिसादांना
वरच्या दोन्ही प्रतिसादांना+१२३
प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.
प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. आपल्या प्रतिक्रिया नवीन लेखनासाठी नक्कीच् उत्साह वाढविणाऱ्य आहेत.
छान, आवडली..
छान, आवडली..
नि.३ धन्यवाद
नि.३ धन्यवाद
नि.३ धन्यवाद
नि.३ धन्यवाद