“एकटी एकटी घाबरलीस ना?
वाटलंच होत आई
म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही…”
एफएमवर गाणं सुरू होतं. बाहेर एप्रिलचा उन्हाळा भरात होता, तरी एसीच्या हवेत उकाडा निलमपर्यंत पोहोचत नव्हता. गाणं संपेपर्यंत ती डेंटिस्टच्या क्लिनिकजवळ पोहोचली. तिने गाडी पार्क केली आणि घड्याळात पाहिलं- अपॉईंटमेंटला अजून चाळीस मिनिटं होती.
“दातात फिलिंग झालं की भूल उतरेपर्यंत काही खायचं नाही, त्यामुळे त्याआधी मस्त खाऊन या”, नेहमीच्या खेळकरपणाने डॉक्टरांनी तिला मागच्या अपॉईंटमेंटमध्ये सांगितलं होतं. नेमकं आजच सकाळपासून कामाच्या धावपळीत, निलमला दोन घास खायला देखील वेळ मिळाला नव्हता.
ती गाडीतून उतरली, आणि आजूबाजूला बघितलं. समोर एक रेस्टॉरंट होतं. तिने मोबाईल काढून रेस्टॉरंटचे रिव्ह्यूज चेक केले. उपाशीपोटी कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये जाऊन, पश्चाताप करण्यापेक्षा चांगले रिव्ह्यूज असलेलं ठिकाण निवडणं तिला सोयीचं वाटत असे.
उन्हातून चालत ती रेस्टॉरंटमध्ये पोहचली. पाच मिनिटं तळपत्या उन्हात चालल्यामुळे, रेस्टॉरंटच्या गारव्याने ती सुखावली. तिची आवडती इडली आणि कोल्ड कॉफीची ऑर्डर केली.
आसपासच्या टेबलांवर जोडपी, मित्रमंडळी बसलेली होती. सर्वजण कोणा न कोणासोबत आले होते.. तिला सोडून.. फक्त ती एकटी..
तिच्या मनात विचार आला, "काही वर्षांपूर्वीच, असं एकटीने येणं म्हणजे काहीतरी गडबड आहे असं वाटलं असतं."
तिला एका जुन्या प्रसंगाची आठवण झाली. “हि मुलगी एकटीच जेवायला आलीय रेस्टॉरंटमध्ये? मला तर असं एकटं येण्याची कल्पना करणंही अशक्य आहे. एकट्याने यायचं तर सोडाच..” त्याच्यासोबत रेस्टॉरंटमध्ये जेवायला आल्यावर नीलम असं काहीसं बोलली होती.
आणि आज? काही वर्षानी, तिला एकटीला जेवायला यायला अजिबात विचित्र वाटत नव्हतं. आपल्या सोबत असणारा माणूस नेहमी सोबत असेलच याची खात्री देता येत नाही, याची जाणीव तिला गेल्या वर्षांनी दिली होती. कोणी सोबत असलं नसलं तरी, स्वतःसोबत राहणं खूप महत्वाचं आहे, हे तिला समजलं होतं.
पलीकडच्या टेबलाकडे नजर गेली, तेव्हा सत्तरच्या आसपासच्या एक आजीबाई दिसल्या- एकटीनेच जेवताना. त्यांच्या टेबलावर एक उघडलेलं पुस्तक होतं आणि त्या पुस्तकाच्या पानांमध्ये त्या हरवून गेल्या होत्या. त्यांच्या हालचालीत कुठलीच घाई, गडबड नव्हती. ती शांतता त्यांच्या चेहऱ्यावरदेखील झळकत होती.
निलमची नजर तिकडे रेंगाळली. आजीचं लक्ष तिच्याकडे गेल्यावर त्यांनी तिच्याकडे पाहून हलकंसं स्मित केलं.
निलमचं मन तिला विचारत होतं, “एकटी एकटी घाबरलीस ना?”
तिने ठामपणाने “नाही” सांगितलं.
तिच्या मनातून आवाज उमटला
“म्हणूनच तर सोडून तुला लांब गेले नाही…”
डेंटिस्टकडे जायची वेळ झाली.
ती उठली. बिल दिलं, पर्स खांद्यावर अडकवली.
निघताना तिनं त्या आजीला स्मित दिलं. त्या हळूच मान हलवून म्हणाल्या, “छान कॉफी होती, नाही?”
निलम हसली आणि म्हणाली “हो... आणि इथला एकांतही.”
उन्ह अजूनही तीव्र होतं, पण उन्हातून चालताना तिच्या प्रत्येक पावलावर विश्वास ठेवणारी सावली देखील तिच्या सोबत होती.
@ शिल्पा गडमडे
१२ एप्रिल २०२५
छान लिहिले आहे. आवडले.
छान लिहिले आहे. आवडले.
"आपल्या सोबत असणारा माणूस नेहमी सोबत असेलच याची खात्री देता येत नाही." हे वाक्य पोहोचले.
धन्यवाद केशवकूल!
धन्यवाद केशवकूल!
कोणी सोबत असलं नसलं तरी,
कोणी सोबत असलं नसलं तरी, स्वतःसोबत राहणं खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर
छान, अगदी रिलेट करता आलं!
छान, अगदी रिलेट करता आलं!
धन्यवाद Navina, sugandhi
धन्यवाद Navina, sugandhi