मुंबईची मुलगी

Submitted by निमिष_सोनार on 3 April, 2025 - 12:08

मुंबईतली रात्र नेहमीच गजबजलेली असते, पण काही वेळा ती निर्जन आणि भयानक सुद्धा वाटू शकते. अशाच एका रात्री, दादरच्या एका अरुंद गल्लीमध्ये एका तरुणाला तीन गुंडांनी गाठलं. त्यांच्या हेतूचा अंदाज येताच तो भीतीने गारठला. मदतीसाठी ओरडण्याचीही त्याला भीती वाटत होती. तो तरुण एक पायाने थोडा लंगडत होता.

तो एक महत्त्वाचा साक्षीदार होता. काही दिवसांपूर्वी त्याने एका गैरकृत्याचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये कैद केला होता. स्थानिक गुंड एका व्यावसायिकाला धमकावत होते. हा व्हिडिओ पोलिसांकडे जाऊ नये, म्हणून गुंड त्याचा पाठलाग करत होते. कधीपासून ते त्याच्या मागावर होते.

तेवढ्यात, समोरून एक स्त्री तिथे आली. जिन्स आणि टीशर्ट अशा पोशाखातली! तिच्या डोळ्यात निडरपणा होता. तिने प्रसंगाचं गांभीर्य लगेचच ओळखलं. तिच्या लक्षात आलं की तो तरुण लंगडतो आहे. त्यामुळे तीन गुंडांशी तो लढू शकणार नाही.

ती धीटपणे पुढे सरसावली आणि मोठ्या आवाजात म्हणाली, "त्याला सोडून द्या."

गुंडांनी हसत तिच्याकडे दुर्लक्ष केलं.

पुढे ती आत्मविश्वासाने त्या तरुणाला म्हणाली, " तू फक्त दूर जाऊन उभा रहा आणि मजा बघ!"

आश्चर्य वाटून तो दूर जाऊन उभा राहिला.

गुंड हसत होते पण त्यांना माहिती नव्हते, की ती महिला एक प्रशिक्षित मार्शल आर्ट्स तज्ञ आहे!

त्यांच्यापैकी एकाने तिच्यावर हात उगारायचा प्रयत्न केला, पण क्षणार्धात त्याच्या मनगटावर तिचा मजबूत वार बसला. तो वेदनेने किंचाळत मागे सरकला. दुसऱ्या गुंडाने चाकू काढून तिच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला, पण ती चपळाईने वळली आणि एका अचूक लाथेने त्याला जमिनीवर लोळवले. तिसऱ्या गुंडाने तिला मागून पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या पोटात जोरदार कोपर बसला आणि तो खाली कोसळला.

तेवढ्यात, पहिला गुंडा पुन्हा उठून तिच्यावर झेपावला, पण तिने चपळाईने त्याचा हात पकडला आणि जोरदार फेकून दिलं. तो धडाम आवाज करत भिंतीवर आदळला. दुसऱ्याने लोखंडी रॉड उचलून तिला मारण्याचा प्रयत्न केला, पण ती वेळेवर झुकली आणि त्याच्या गुडघ्यात जोरदार लाथ घातली. तो विव्हळत खाली कोसळला.

हे पाहून तिसऱ्या गुंडाने पळ काढणं पसंत केलं, पण त्याच्या आधीच त्या स्त्रीने आपल्या बूटाच्या टोकाने त्याच्या पायात लाथ घातली. तो धडपडत पडला आणि पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजू लागले.

काही मिनिटांतच पोलीस तिथे हजर झाले आणि तीनही गुंडांना ताब्यात घेतलं. तो तरुण सुटकेचा निश्वास टाकत पोलिसांना संपूर्ण घटना सांगू लागला. त्याने त्या व्हिडिओबद्दल माहिती दिली, ज्यामुळे गुंडांच्या टोळीचा पर्दाफाश होऊ शकत होता. पोलिसांनी त्या स्त्रीचे आभार मानले.

स्त्रीच्या धाडसाने त्या तरुणाला नवचैतन्य मिळालं. त्याने थरथरत तिचे आभार मानले. ती हसली आणि म्हणाली, "मुंबई फक्त पुरुषांची नाही. इथल्या स्त्रियाही गरज पडल्यास कुणालाही धडा शिकवू शकतात."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

mast

नवीन प्रतिसाद लिहा