भाग ३ : शारदापीठ

Submitted by माझेमन on 3 April, 2025 - 09:43

(दुरावस्थेतले शारदापीठ १८९३. wikipedia वरून साभार)

तीथवालचे हे मंदिर शारदा यात्रेचा एक बेस कॅम्प असले तरी काश्मीरच्या सांस्कृतिक इतिहासातील ही एक छोटीशी तळटीप होती.

एका वेळी साधारण ५००० विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारे विद्यापीठ ही या विस्तीर्ण परिसराची खरी ओळख होती.

शारदा पीठ ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात अशोकाच्या काळात निर्माण झाले की पहिल्या शतकात कुशाण काळात की सहाव्या
शतकात याबद्दल वाद असतील, पण साधारण आठव्या शतकापर्यंत ते भरभराटीला आले याबद्दल कुणाचेच दुमत नाही. सध्याच्या पाकव्याप्त काश्मीरमधल्या शारदी तालुक्यातील कृष्णगंगा व मधुमती नदीच्या संगमावर स्थापन झालेले हे विद्यापीठ दूरदूरच्या
प्रदेशांतील अभ्यासूंना आकृष्ट करत होते. फक्त भारतच नव्हे तर मध्य आशिया, तिबेट, चीन, सुदूर पश्चिमेकडच्या ग्रीसमधले विद्यार्थी या विद्यापीठात शिकत होते.

कित्येक संस्कृत ग्रंथ, वेद, पुराणे, शास्त्रे व त्यावरचे भाष्य यांचा मोठा संग्रह इथे होता. गुर्जर राजा जयशर्मा याने हेमचंद्र नामक जैन विद्वानाला व्याकरण शुद्ध करायच्या कामी शारदापीठात पाठवले होते. तिथे त्याने व्याकरणाचे ८ संदर्भग्रंथ (पाणिनीकृत
'अष्टाध्यायी'?) अभ्यासले असा उल्लेख आहे. स्वतः पाणिनी गांधार देशाचा. आजच्या अटकेजवळ त्याचे जन्मस्थान असावे असा
अंदाज आहे. पाणिनीच्या अष्टाध्यायीवर महाभाष्य लिहिणारा पतंजलीही इथलाच. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर अभिनवभारती ही टीका लिहिणारा अभिनवगुप्त हाही काश्मीरचाच. ब्रह्मसूत्रावर श्रीहास्य ही टीका लिहिण्यापूर्वी ब्रह्मसूत्राचा सखोल अभ्यास
करण्यासाठी वैष्णव उपासक श्री रामानुज, श्रीरंगमवरून शारदापीठात गेले. दृढबलाने इथेच चरक संहितेचे संपादन केले.

८ व्या ते १२ व्या शतकाच्या दरम्यान अफगाणिस्तान ते हिमाचल प्रदेशापर्यंत पसरलेल्या शारदा लिपीचा उगमही इथलाच.
काश्मीरमध्ये संस्कृत आणि काश्मिरी भाषेसाठी वापरली जाणारी ही लिपी आज लोप पावली असली तरी तिच्यातून उद्गम पावलेली गुरुमुखी व तिबेटी मात्र चांगलीच वापरात आहे. सिंधी व्यापारी चोपडी लिहिण्यासाठी वापरायचे ती हटवणकी/ हटवणकाई लिपी हेही शारदा लिपीचे एक रूप.

बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी कनिष्काने चौथी धम्म परिषद भरवली ती इथेच. चीनला बुद्धधर्माची शिकवण देणारा कुमारजीव आणि चीनमध्ये जाऊन बौद्ध धर्माची पुस्तके तिथल्या भाषेत अनुवाद करणारा बुद्धभद्रही इथलाच.

संगीतरत्नाकर लिहिणाऱ्या शारंग देवचा जन्म काश्मीरचा. इस्लामिक आक्रमणामुळे त्रस्त होऊन त्याचे कुटुंब दक्षिणेत देवगिरीला यादवांच्या आश्रयाला आले.

ह्यू-एन-संगने त्याच्या प्रवासातली २ वर्षे या विद्यापीठात काढली व त्याच्या मते भारतातल्या विविध दर्शनांवर अधिकाराने भाष्य करू शकतील असे विद्वान इथे होते. अल् बरूनीच्या मते प्रभासपाटणच्या सोमनाथाएवढे, स्थानेश्वरच्या विष्णू मंदिराएवढे किंवा
मूलतानच्या सूर्यमंदिराएवढेच याचे महात्म्य होते.
परिणामस्वरूप या मंदिरांसारखीच दुर्गती शारदापीठाच्या नशिबी आली. बाह्य आक्रमणे आणि बुतशिकन हे बिरुद मिरवणारे
राज्यकर्ते असा दुर्दैव योग इथेही कारणीभूत ठरला.

२००५ साली पाकिस्तान-अफगाणिस्तान केंद्रबिंदू असलेल्या भूकंपात शारदापीठाचे अजून नुकसान झाले.
sharda peeth.jpg
(इंटरनेटवरून साभार)

सर्व भाग वाचण्यासाठी इथे क्लीक करा.
भाग १ : प्रस्तावना
भाग २ : नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनि
भाग ३: शारदापीठ
भाग ४: ही वाट दूर जाते
भाग ५: साधना पास
भाग ६: तीर्थबल शारदा मंदिर
भाग ७ : इतनी कुर्बत है तो फिर...
भाग ८: जरा याद करो कुर्बानी
भाग ९: समारोप

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाचतोय.
हा भाग सुद्धा मस्त.
किती थोर इतिहास आहे या जागेला.
आपल्याला त्यातील फार कमी ठाऊक हे दुर्दैव.
मागे मुंबई विद्यापीठात शारदा पीठातील काही काश्मिरी पंडितांनी शारदा लिपी कार्यशाळा आयोजित केली होती. मला इच्छा असूनही कामामुळे जाता आले नाही याची हळहळ वाटते.
माझे जुने वरिष्ठ काश्मिरी पंडित होते, ते फार सढळ हाताने मदत करत या संस्थांना.

@ऋतुराज >>> मला खरं तर या भागाचं नाव शारदा लिपीत टाकायचं होत. पण सेव्हच होईना लेख म्हणून नाईलाजाने देवनागरी केलं. पहिल्या फोटोमधलं ते मोठं अक्षर शारदा लिपीतला ॐ आहे.

यापूर्वी मला गुरुमुखी एक वेगळीच लिपी वाटायची. पण शारदा लिपी पाहिल्यावर अचानक काहीतरी जुना धागा जुळवा असा आनंद झाला. आणि सगळ्यात जास्त आनंद झाला तो हा कनव्हर्टर मिळाल्यावर
https://www.aksharamukha.com/composer
अर्थात लिपीच्या कार्यशाळेला हा पर्याय नाही. पण दुधाची तहान ताकावर भागवू शकतोच.

सुंदर लेखमाला आहे. वाचतोय.

शारदा - गुरुमुखी लिपींतलं साधर्म्य हे निरीक्षण छान.

भांडारकर संस्थेतली महाभारत संशोधित आवृत्ती यासाठी आठव्या शतकातल्या शारदा प्रतीची खूप मोठी मदत झाली आहे.