गिरनार यात्रा

Submitted by Ashwini_९९९ on 25 February, 2025 - 02:08

गिरनार यात्रा करून कोणी आल आहे का? मी एप्रिल एंड ला जात आहे...माझ्याबरोबर चे सगळे ऑलरेडी एकदा दोनदा जाऊन आले आहेत... मी त्यात फिजिकली कच्चा लिंबू आहे..कारण व्यायाम काहीच नाही.. १०००० पायऱ्या चढून उतरून येण्या करता जो फिटनेस हवा तो नक्कीच नाही माझ्याकडे...अजून दोन महिने आहेत... काय तयारी करावी लागेल शारीरिक दृष्ट्या?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दहा हजार पायर्‍या चढायच्या.. हे सोप्प नसलं तरी अशक्य मुळीच नाही. तुमच्या कडे दोन महिने आहेत म्हणजे शारिरीक तयारी साठी पुष्कळ वेळ आहे. रोज सकाळी एक तास चालायचा व्यायाम सुरु करा. म्हणजे स्टॅमिना बिल्ट होईल. मी गेलो होतो तेव्हा ६० - ७० वर्षाची जोडपी सुद्धा थांबत थांबत चढाताना बघितली होती. शारिरीक तयारी झाली की मानसिक तयारी आपोआप होते.

मी पहाटे चारला चढायला सुरवात केली होती आणि आरामात मजल दर मजल करत सकाळी सुर्दोयदयाला सात वाजता मंदिरा खाली पोहचलो होतो. येताना उडन खटोला टाळून गिरनारचं सौदर्यं न्याहाळत आरामात एकरा वाजे पर्यण्त उतरलो होतो.

इंद्राने सांगितले आहेच. चालण्याच्या जोडीला राहत्या इमारतीचे ३-४ जीने चढायचा रोज सराव केला तर फिटनेसबरोबर स्वतःचा आत्मविश्वास पण वाढेल. जमल्यास प्राणायाम पण करा (मला त्याचा खूप फायदा झाला होता)

एप्रिलला जाताय तर मी म्हणेन पहाटे २ - २:३० वाजताच चढायला सुरुवात करा, तेंव्हा हवेत थोडा गारवा असेल. वर्दळ तुरळक असली तरी काही काळजी नाही. पण एकदा का सूर्य वरती आला की उन्हाने आणि घामाने खूप जास्त थकायला होतं (एप्रिल आहे त्यामुळे उन्हाळा जाणवेल)

१. शक्यतो वाटेत बसू नका, उभे राहूनच विश्राम करा.
२. सोबत पुरेसं पाणी, एलेक्ट्रल ठेवा (वाटेत पाणी मिळतं पण इतक्या पहाटे बरेच स्टॉल्स बंद असतात)
३. बरोबर आधाराकरता काठी हवीच (ती खाली भाड्याने मिळू शकते - २४ तास)
४. वाटेत काही जण माघारी फिरताना दिसतील पण आपल्याला पादुकांचे दर्शन घ्यायचेच आहे हा चंग बांधायचाच.
५. गुरुपादुका असलेले शिखर दिसायला छोटे दिसते, पण खरी दमछाक तेच करते. ते चढताना बर्‍याचदा "आता पुरे, इतकं आलो ना" असं वाटत राहतं. पण हत्ती गेलेला आहे फक्त शेपूट राहिले आहे असे म्हणायचे आणि चढत रहायचे.
६. बरोबर कुणी असेल तरीही आपली चढाई आपल्या वेगाने करायची. त्यामुळे उगाच पाठी राहिलेल्यांकरता थांबावे लागत नाही आणि पुढे गेलेल्यांना गाठायची दमछाक होत नाही.
७. श्रद्धा असेल तर "मी चढतोय / चढतेय" असे चुकूनही मनात आणायचे नाही. तुमची चढाई खूप सोपी होते त्याने.
८. उतरताना जराही घाई करू नका. मी जरा वेगाने उतरलो तर पायांची पूर्ण वाट लागली होती.

जायचं ठरवलं आहे तर नक्कीच जाल.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार... तीच शंका होती नुसत्या चालण्याच्या प्रॅक्टीस ने होईल का? माझ्या बिल्डिंग ला लिफ्ट नसल्यामुळे तसही ३ मजले चढण उतरण होतच डेली ..पण ते ही हाफ हूफ करत...

रात्री दोन तीन ठिकाणी पाण्याची सोय होते.. बाकी दुकानं बंद असतात. उडन खटोलाची सेवा सकाळी ८ ला सुरु होते. पण ती ही पाच हजार पायर्‍या पर्यन्तच आहे. पुढे गुरु शिखरा पर्यन्त चढ - उतार आहे.

एका लयीत चालत राहायचं.. नामस्मरण करत.

पुर्वी १०,००० पायऱ्या चढाव्या लागायच्या, आता रोप वे मुळे (जवळपास) ५००० पायऱ्या कमी चढाव्या लागतात. आणि अगदी १०,००० पायऱ्याही चढायची वेळ आली तरी तुम्ही सवय नसल्यास बरोबरच्यांपेक्षा फारतर थोड्या जास्त वेळात, पण नक्की चढाल...
(मी ३ वेळा पायऱ्या चढुन आणि एकदा रोप वे नी गेलो आहे, बिन्धास्त जा...)

मला गिरनारचा अनुभव नाही पण थोडं फार ट्रेकिंग केलेलं आहे त्यावरुन सांगेन की व्यवस्थित फिट होणारे आणि सपोर्टिव्ह शूज घ्या आणि निघायच्या महिनाभर आधी तरी ते बूट घालून चालणे / चढणे उतरणे अशी प्रॅक्टिस रोज तासभर तरी करा. चढताना आणि उतरताना पावलांवर फार स्ट्रेस येतो.
इतर लोक अनवाणी चढतात , हवाई चपला घालून देखील जातात असे विचार मनात आणू नका. तुमच्या पावलांची काळजी घेणे महत्वाचे !
तुम्हाला शुभेच्छा

मी गेलेले.
दत्तप्रभूना सरेंडर करा आणि सांगा मला यायचं आहे..
त्यापुढे जमले उत्तम नाही जमले तरी उत्तम असा दृष्टिकोन ठेवा. कारण तुम्ही त्यांना सांगितलेलं आहे.

मी कुणालाही चढलेलं आणि अगदी कॉलेज मधला मुलगा ढसाढसा रडताना तिथे पाहिला आहे.
अगदी तरुण , फिट दिसणाऱ्या मुली पण अगदी गुरूशिखराच्या खाली बसून जमणार नाही ह्यापुढे म्हणताना पाहिल्या आहेत.

आणि हेच माझी आई ६७ वर्ष आणि अनेक ज्येष्ठ नागरिक चढताना पाहिले. इट्स मोर ऑफ या माईंड गेम. देव नेईल हा विश्वास ठेवलात तर तो नेतो.

खाली काठी मिळते. ती घ्या नक्की. जास्त ओझ पाठीवर घेऊ नका. आम्ही शेले घेतलेले, पण ते लोकांनी दिलेले पण आमच्या पाठीवर होतें. ते फार ओझे झाले चढताना.
कमीत कमी सामना घ्या.

वाटेत साधारण ५००० पायऱ्यांच्या पुढपर्यंत दुकानं पण आहेत आणि लोक प्रसाद पण वाटतात.
मीठ/सॉल्ट कँपसुल्स ठेवा बरोबर आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन खा. Ors capsules देखील ठेवा.

आम्ही संध्याकाळी चढायला सुरुवात केली. १२ च्या आसपास आम्ही वर होतो.
वर खूप वेळ थांबून दिले नाही (पौर्णिमा होती).
पण सगळी मजा प्रवासात आहे.
काही वेळा मी त्या रात्री त्या टप्प्यात एकटीच होते पण ते बरोबर आहेत ह्याची जाणीव असल्याने मी निर्भय , relax होते!

चढायला सुरुवात करण्यापूर्वी खाली lambe हनुमानजी आहेत त्यांना नारळ फोडून त्यांची प्रार्थना करण्याची प्रथा आहे. पहिल्या पायरीला नमस्कार करून मला न्या म्हणून सांगतात.
स्वामींच छोटस देऊळ आहे, तिथे आशीर्वाद घ्या त्यांचा..

फिजिकली मी आधी वर्षभर व्यायाम करत होते (गिरनार करता नव्हे, फिटनेस करता. ).
दोन महिने आधी २०० जी २५० पायऱ्या एका वेळेस चढू शकायचे आरामात.
पण गिरनार ला जायच्या आधी महिनाभर आजारी पडले आणि एक महिना व्यायाम/पायऱ्या चढण झाले नाही. महिनाभर पाय खूप दुखायचे. गिरनार वरून आल्यावर पाय दुखले नाहीत Happy

गिरनार स्वामी/dattaprabhoonchyaa इच्छेने/कृपेने घडले. प्लॅन जसा क्षणात ठरला/ जसे जाऊन आलो ..

दहा हजार पायर्‍या चढायच्या.. ........ बापरे! इथूनच नमस्कार
हेच माझी आई ६७ वर्ष आणि अनेक ज्येष्ठ नागरिक चढताना पाहिले. ....... नमस्कार.

>> "दहा हजार पायर्‍या चढायच्या.. " >>
आणि उतरायच्याही... 😀

वरती अनेकांनी छान उपयुक्त माहिती दिलेलीच आहे, त्यातले काही महत्वाचे मुद्दे:
>> १. शक्यतो वाटेत बसू नका, उभे राहूनच विश्राम करा. >>
लाख मोलाचा सल्ला आहे हा! वाटेत शंभर वेळा थांबलात तरी काही बिघडत नाही पण चुकुनही कुठे बसु नका, त्याचा फार विपरीत परिणाम होतो. उभ्या उभ्या, काठिच्या आधाराने थोडी विश्रांती घेत चढाई सुरु ठेवा!

>> "३. बरोबर आधाराकरता काठी हवीच" >>
+१ कुठलाही संकोच न बाळगता बरोबर काठी घ्या!

>> "८. उतरताना जराही घाई करू नका. मी जरा वेगाने उतरलो तर पायांची पूर्ण वाट लागली होती." >>
अगदी अगदी... पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा मी पण ही चुक केल्यामुळे पायांची (विषेशतः गुढग्यांची) पार वाट लागली होती!
काही जणांना पायर्‍या चढणे त्रासदायक वाटते, तर काही जणांना उतरणे. मी दुसर्‍या प्रकारात मोडत असल्याने मला उतरायला बरोबरच्यांपेक्षा अधिक वेळ लागतो. इथे एकच डोंगर चढा-उतरायचा नसुन पहिला अंबामाता मंदिराचा, दुसरा गोरक्षनाथ आणि तिसरे दत्त शिखर असे तीन डोंगर चढा-उतरायचे असल्यानेच काय ती दमछाक होते आणि "चढने को तो यूँ ही बदनाम करते हैं लोग, असली तकलीफ तो उतरने मे होती है" ह्या वाक्याची सत्यता पटते 😀

वाटेत तुम्हाला कोणी झिग-झॅग पद्धतीने चढताना दिसले तर तो प्रकारही करुन पहा, कहिजणांना तशा पद्धतीने चढणे सोयीस्कर वाटते, अर्थात भरपुर चढायचे अस्ल्याने तुम्हाला त्यात वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी आणि वेळ मिळत असल्याने जो प्रकार सोयीस्कर वाटेल तो निवडा!

शेवटी -
>> "दहा हजार पायर्‍या चढायच्या.. हे सोप्प नसलं तरी अशक्य मुळीच नाही." >>
+१.
फार काही चालण्याची सवय आणि ट्रेकींग वगैरेची अजिबात आवड नसलेला माझ्यासारखा माणुस तीन वेळा यशस्वीरित्या १०००० पायर्‍या चढु-उतरु शकला त्याप्रमाणे तुम्ही पण त्यात नक्कीच यशस्वी व्हाल ह्याची खात्री बाळगा आणि निश्चिंत मनाने आपली गिरनार यात्रा सुफळ-संपुर्ण करा...
जय गिरनारी 🙏

मी अगदी माधव यांच्याच सूचना लिहायला आले होते.
अगदी आरामात चढा.. आजिबात घाई करू नका. उतरताना knee cap बरोबर असणे गरजेचे. चांगला सपोर्ट मिळतो.
गिरनार यात्रा आहे त्यामुळे योग यावा लागतो. त्यामुळे बिन्धास्त जा.. तुम्हाला बोलावणे आले आहे
उतरताना पायर्‍याही उतरत्या आहेत तेंव्हा काठीचा खरा उपयोग होतो
संपूर्ण पायर्‍या चढणार असलात तर वाटेत काही बाही मिळत रहाते. अंबामाता मंदीराच्या पुढे मात्र काहीच मिळत नाही. शक्यतो फार वजन नेऊ नका. पाणी, उन्हासाठी टोपी, थोडा खाऊ पुरे होते. नॉर्मली रात्री जेवण करून चढतात त्यामुळे पाण्याशिवाय फार काही लागत नाही. सकाळी धुनीपाशी प्रसाद मिळतो त्याने समाधान होते. मग बाकी स्टॉलस असतातच.

कुठलीही चिंता न करता अगदी बिनधास्त जा..चालणे, पायर्‍या चतरणे/ उतरणे याची सवय दिसते आहे त्याचा फायदा होईल. मी कुठल्याही तयारीविना चढले होते तरी चढू शकले.. तुम्हीही पूर्ण कराल यात्रा! अनेक शुभेच्छा !

"दहा हजार पायर्‍या चढायच्या.. हे सोप्प नसलं तरी अशक्य मुळीच नाही." >> +१११

सगळ्यांचेच सल्ले खूप मोलाचे आहेत... शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद... तयारीला सुरवात केली आहे... आता श्री दत्तप्रभूंची इच्छा आणि कृपा.. परत येताना ५००० पायऱ्यानंतर रोप वे ने खाली येणार आहोत.

वय, वजन यानुसार आवश्यक वाटत असल्यास Stress Test करुन घ्या म्हणजे ह्रदयाची क्षमता कळेल, आत्मविश्वास वाढेल.

निश्चिंत मनाने जा.
दररोज चार माळे चढउतार आणि अर्धा तास चालायचा व्यायाम पुरेसा आहे. रात्री चढायला सुरुवात करा. काठी नक्की घ्या. हळूहळू चालत रहा. एका ठिकाणी फार थांबू नका.

सर्वांनी आपापल्या अनुभवानुसार योग्य सल्ले दिले आहेतच.. माझेही थोडे..
१. पादुकांपर्यंत पायी पोहोचायला आधी अंबामता पर्यंत ६००० पायऱ्या चढायच्या मग २००० उतरायच्या आणि परत २००० चढायच्या असा प्रवास आहे. त्यामुळे जाऊन येऊन एकूण १०००० पायऱ्या चढायच्या आणि उतरायच्या आहेत. परतीच्या प्रवासात उतरायचे मन असते त्यामुळे २००० पायऱ्या चढायला त्रासदायक वाटते. पण अधीपासूनच तयारी ठेवलीत तर होऊन जाईल.
२. वर सांगितलेला काठी घ्यायचा सल्ला योग्यच आहे. तरीपण काठीचे लोढणे वाटू लागले, वजन वाटू लागले तर काठी शिवाय चालून पहा. आणि छान चालता येत असेल तर खुशाल बाजूला ठेऊन दया. पायऱ्या खूपच छान आहेत त्यामुळे मला काठी अनावश्यक आणि गैरसोयची वाटली होती.
३. चालण्याचा आणि जिने चढ उतरून कंटाळा आला किंवा वेळ कमी असेल तर बैठका मारा. १० चे ५ सेट मारे पर्यंत तयारी झाली की चिंता नाही.
४. आठवड्यातून एक दिवस व्यायामाला सुट्टी घ्या. चढायच्या आधी दोन दिवस व्यायाम बंद ठेवा.
५. वाट छानच आहे. त्यामुळे महागड्या बुटांची आवश्यकता नाही. साधे टेनिस शूज देखील उत्तम. फक्त नवीन बूट घेतलेतच तर किमान महिनाभर आधी ते वापरायला लागा. पावलांना वापरायच्या बुटांची पक्की सवय आवश्यक.

श्री दत्तप्रभूंच्या कृपेने आणि सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे गिरनार दर्शन अतिशय व्यवस्थित झाले. १०००० पायऱ्या पूर्ण चढून गेले.
जाईपर्यंत बऱ्यापैकी अडचणी आल्या. अगदी निघायच्या आदल्या दिवशी माझं जायचं कन्फर्म झालं. घरच्यांनी पण शेवटपर्यंत माझं तिकीट कॅन्सल केलं नाही..तू येच असच सगळंयाचं म्हणणं होत.
आणि सर्व अतिशय व्यवस्थित पार पडलं... काही अनुभव नक्कीच सांगण्यासारखे आहेत ज्या मुळे दैवी शक्ती वरचा विश्वास दृढ झाला... नक्की सांगते..
तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार!!!!

^^... काही अनुभव नक्कीच सांगण्यासारखे आहेत ज्या मुळे दैवी शक्ती वरचा विश्वास दृढ झाला... नक्की सांगते..^^
नक्की लिहा. वाट पाहत आहे.