ड्रीमलँड-३

Submitted by SharmilaR on 3 May, 2024 - 02:27

ड्रीमलँड-३

अनिश ने सांगितल्या प्रमाणे त्या छोट्याशा प्रवासाला वीस मिनिटे लागली. त्यांची कार एका टुमदार बैठ्या बंगल्यासमोर थांबली. गेट वर घर नंबर होता, ‘ब्लॉक-7, नंबर-24’. बंगल्याच्या कंपाऊंड ला लागून दाट झाडी होती. अंगणात सुरेख हिरवागार लॉन आणी रंगीबेरंगी फूलझाडं होती.

त्यांनी सामान आत घेतलं. तीन बेडरूम हॉल किचनचं सुरेख सजविलेलं घर होतं ते. मागच्या बाजूला भाजीपाला पण लावला होता. पलीकडे पण असच बैठ घर दिसत होतं दाट झाडी असलेलं..

“आता निदान काही महीने तरी.. तुमचा मुक्काम इथेच असेल. घरात तुमच्या गरजेप्रमाणे आवश्यक ते सगळं सामान आहेच, तुमच्या खाण्या पिण्याचं सुद्धा सगळं सामान आहे, इंडियन पद्धतीचं. शिवाय आणखीन काही लागलं, तर मला सांगू शकता. मी येतच जाईन रोज सकाळ, संध्याकाळी.. .. शिवाय माझा नंबर आहेच तुमच्याकडे.. केव्हाही फोन करा.. काहीही लागलं तर..”

“सगळ्या बेडरूम्स मध्ये इथला नकाशा.. शहराची माहिती पुस्तिका आणी जनरल रूल बुक आहे.. उद्यापासून तुमचं ओरिएंटेशन होईल काही दिवस. इथली सगळी माहिती मिळेल तुम्हाला. मग आपण जवळपास फिरायला जाऊ. इथली आसपासची सगळी ठिकाणं मी तुम्हाला दाखविन... मधल्या काळात रौनक च्या शिक्षणाचं पण बघता येईल.” अनिश ने घर दाखवता दाखवता सांगितलं.

सरिकाला ते सुसज्ज किचन एकदम आवडूनच गेलं.. फ्रीजही खाण्या पिण्याच्या पदार्थांनी पूर्ण भरलेला होता. हॉल मध्ये टीव्ही आणी कम्फऱ्टेबल सोफा होता. तिन्ही बेडरूम मध्ये, बेड शेजारी लॅपटॉप ठेवलेले होते. रौनक आनंदून गेला.

“आणी हो, तुम्हाला पण जर कुठे बाहेर जायचं असेल, फिरायला वगैरे.. तर तुम्ही जाऊ शकता. बाहेर जाताना नकाशा बरोबर ठेवा आणी घरचा पत्ता. आणी हो, फक्त ते ईअरफोन बरोबर घ्या. म्हणजे इथे भाषेचा प्रश्न येणार नाही. तसं इथे काही लोकांना इंग्लीश समजतं थोडं फार.. मुलांना तर नक्कीच समजतं. बाय द वे, इथली भाषा ‘पृथविल’ आहे. आणी हो, तुमच्या नेटवर्क चा पासवर्ड ‘ससा’ आहे.” अनिश ने हसत हसत सांगितलं.
“ससा..?” तिघांनीही एकदम विचारलं.
“हो. ससा. समीर चा स. आणी सारिका चा सा. आणी आता मला कळलं, ते रौनक च पण नाव, ससा..” सगळेच हसायला लागले.
***

सकाळी जाग आली, तसा तोंड धुवून रौनक पटकन घराच्या बाहेर आला. ब्रश करायला कसल्यातरी कडवड छोट्या छोट्या काड्या होत्या. रौनक ने घाई घाईने चूळ भरली. तोंड कडवट झालं तरी त्याचे दात मात्र चमकत होते.

अजून जेमतेम उजाडतच होतं. आता पर्यंत घरी आई दहा आवाज द्यायची, तरीही तो उठायचा नाही. पण आज मात्र त्याला स्वत:हून, सकाळी लवकर जाग आली त्याला. मग बिछान्यात लोळण्या पेक्षा तो बाहेरच्या आवारात आला.

कालचा दिवस त्यांनी घरात सामान अन्पॅक करण्यात घालवला. मग जरा वेळ सगळ्या माहिती पुस्तिका चाळण्यात घालवला होता. जेट लॅग चा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून दिवसभर त्या तिघांपैकी कुणीच झोपलं नव्हतं. संध्याकाळी तिघंच थोडं बाहेर जाऊन पाय मोकळे करून आले होते. मग रात्री सगळेच लवकरच झोपले होते.

अंगणात पसरलेल हिरवगार लॉन.. सगळी कडे उमललेली रंगी बेरंगी फूलं.. कंपाऊंडशी असलेले मोठे वृक्ष.. सगळं बघत बघत रौनक मागच्या अंगणात, फळ, भाज्या लावल्या होत्या तिथे आला. आता त्याचं लक्ष कोपऱ्यातल्या छत असलेल्या जागेकडे गेलं. त्या जागेजवळ दोन बाजूंनी कडुनिंबाची चार पाच दाट झाडं दिसत होती. ह्या झाडांमुळेच काल बहुतेक आत काय आहे ते दिसलं नव्हतं. रौनक त्या दिशेने गेला.

तिथे ओपन जीम केलेलं दिसत होतं. तिथे ट्रेडमिल, स्टेशनरी बाईक, क्रॉस ट्रेनर, चेस्ट प्रेसर.. आणी अशीच कितीतरी जीम ची उपकरणं होती. तो बाईक वर जाणारच होता तर पलीकडून आवाज आला, ‘हाय.. !’

आवाज पलीकडच्या कंपाऊंड मधून आला होता. रौनक ने आवाजाच्या दिशेने बघितलं.. तिथे त्याच्याच वयाचा मुलगा स्टेशनरी बाईक वर होता आणी त्याच्या शेजारी एक गोड, त्याच्या पेक्षा थोडी लहान मुलगी ट्रेडमिल वापरत होती. त्यांच्याही ओपन जीम चं डिझाईन इथल्या सारखंच दिसत होतं, कडुनिंबाच्या झाडांनी वेढलेलं.

“हाय.. !” रौनक ने त्या दिशेला जात म्हटलं.

दोन्ही घरामधलं कंपाऊंड म्हणजे आंबा, पेरू.. अशा फळांच्या वृक्षांची रांगच होती. प्रत्येक झाडावर छोट्या आकाराच्या पाट्या होत्या. त्यावर एका आड एक ‘ब्लॉक-7, नंबर-24’, ‘ब्लॉक-7, नंबर-25’ असं पेंट केलेलं होतं. ‘अच्छा! म्हणजे ही झाडं ह्या घराच्या किंवा त्या घराच्या मालकीची आहेत..’

“आय अॅम रॉन.. अँड शी इज बेला.. माय सिस. यू न्यू हियर..?” रॉन एक्झरसाइज करतच बोलत होता.
“येस. आय अॅम रौनक. फ्रॉम इंडिया.. वी केम येसटरडे..” रौनक ने उत्तर दिलं.

एक्झरसाइज थांबवून हात मिळवायला रॉन आणी बेला रौनक च्या दिशेने आले. दोघांचेही डोळे, नजरेत भरण्यासारखे निळे निळे होते. रौनक ने रॉनशी हात मिळवला. रॉन च्या बोटात एक वेगळ्याच प्रकारची काळ्या चकचकीत मटेरियल ची सुरेखशी लाल खड्याची अंगठी होती. गंमत म्हणजे बेला शी त्याने शेक हँड केलं तेव्हा तिच्याही बोटात तसलीच अंगठी होती.

‘ही अंगठी काय ह्यांची फॅमिली ट्रॅडीशन आहे का..?’

“ओ.. यू आर न्यू टु धिस रिंग ऑल्सो देन..” रौनक ची अंगठी वर खिळलेली नजर बघून बेला म्हणाली, “ऑल्मोस्ट एव्रीवन यूज इट.. इट्स द एनर्जी कौंट रिंग..”
“एनर्जी कौंट रिंग..?” रौनक ला तर ही कन्सेप्टच नवीन होती.
“येस. यू सॉ.., जस्ट नाऊ वुई वेअर डूइंग अवर एक्सेरसाइज .. ऑल द जीम ईक्विपमेंटस आर कनेक्टेड टु द होम बॅटरीज.. सो.., एक्सेरसाइज गेट्स कनव्हरटेड इंटू इलेक्टरिसीटी .. मॅक्सिमम इलेक्ट्रिसिटि यूज्ड ईन द हाऊस कम्स फ्रॉम दोज बॅटरीज..” रॉन ने थोडक्यात माहिती दिली.

रौनक करता हे सगळंच खूप नवीन होतं. त्याची उत्सुकता.., आणी रॉन, बेला चा त्याच्या प्रत्येक प्रश्नाला सविस्तर उत्तर देण्याचा उत्साह..

तासा भराने रौनक घरात शिरला तो नवीनच उल्हास घेऊन. मिळालेली सगळी माहिती केव्हा एकदा आई बाबांना सांगतो, असं त्याला झालं होतं. दुपारी रॉन बेला ला परत भेटायचं आणी त्यांच्या बरोबर बाहेर जायचं आश्वासन ही त्याने देऊन टाकलं होतं. इथे आल्याबरोबर अगदी त्याच्या वयाचा मित्र आणी त्याची गोड बहीण मैत्रीण म्हणून मिळाली ह्याचा खूपच आनंद झाला होता त्याला.

“झालं का तुझं ‘ओरिएंटेशन’? भरपूर गप्पा चालू होत्या तुमच्या..” रौनक घरात आल्या आल्या हसत हसत समीर ने विचारलं.
“कोण रे ती मुलं..? तुझ्याच वयाची दिसताहेत..” सारिकाने विचारलं.

“तो मुलगा रॉन. तो पण आता नाइनथ मध्येच आहे. आणी ती त्याची बहीण बेला. दोन वर्षाने लहान आहे त्याच्यापेक्षा..” रौनक ने सांगीतलं.
“काय.. एवढ्या गप्पा चालू होत्या तुमच्या.. अगदी पहिल्याच भेटीत..तासभर बोललात..?” समीर ने उत्सुकतेने विचारलं.

“अरे बाबा.. तू सगळं ऐकशील ना.. तर तुला कम्माल वाटेल इथल्या एक एक गोष्टी ऐकून.. काय टेक्नॉलॉजी आहे इथली.. अरे.. काय सांगू तुला.. वेडा होशील तू....” रौनक ला बोलायला शब्द सुचत नव्हते.

“अरे.. जरा हळू ! हा घे, आधी चहा घे... आता चहा घेता घेता सावकाश सांग सगळं.. तुला त्या मुलांशी बोलताना बघितलं, म्हणून मघाशी आवाज दिलाच नाही तुला चहाला..” सारिका रौनक समोर चहा ठेवत म्हणाली.

“आधी काल विमानतळावर आपले टुथ ब्रश आणी टुथ पेस्ट का काढून घेतले ते सांगतो, मागे लावलेली ती कडुनिंबाची झाडं आहेत ना, तेच आपले ब्रश आणी पेस्ट.. टुथ ब्रश हे एंनव्हारमेंट फ्रेंडली नाही म्हणून वापरण चालत नाही इथे.. ” रौनकने चहा घ्यायला सुरवात करत सांगितलं.

“अगं.. आणी इथे ‘इलेक्टरिसीटी जेनेरेशन फ्रॉम ह्यूमन एफर्ट्स अँड सेविंग नॅच्युरल रिसोर्सेस’ ह्यावर इतका भर दिला जातो नं..” रौनक अजूनही ‘एक्सायटेड मोड’ मध्येच होता.

“अरे! आपलं मुख्य ओरिएंटेशन ह्याच विषयावर आहे.. आणी हे सगळं जाणून घेण्या करताच तर आलोय आपण इथे.. आता सांग सगळं.. , तुला जमेल तसं.. म्हणजे ओरिएंटेशन च्या आधी आपली ह्या विषयाची तोंडओळख झालेली राहील.. तू पण सगळं ऐक गं, सारिका.. इलेक्टरिसीटी सेविंग आणी जेनेरेशन हे इथे घरी दारी सगळीकडेच असणार आहे.. ” समीर आरामात बसत म्हणाला.

“मुलांची शाळा किंवा क्लास दोन किलोमीटर च्या आत असावी, असा नियम आहे इथला. म्हणजे मुलांनी शिकायला पायी किंवा सायकलनेच जायचं असतं. कुठल्याच वाहना ने त्यांनी शिकायला जाणं अलॉउडच नाहीय. अगदी मेडिकल रीजन असेल तरी पण! मग अशावेळी सायकल ला एक पूल आउट ट्रॉली लावतात मुलांना शाळेत सोडायला..” रौनक सांगायला लागला.

“त्याला आपल्याकडे सायकल रिक्शा म्हणतात. पूर्वी होत्या त्या.. तू नाही बघितल्यास..” सारिका पुटपुटली.
“हो, पण त्यात एक माणूस अनेक माणसांना वाहून न्यायचा.. चित्र बघितलीत मी ती जुन्या पुस्तकात .. आणी कुठल्यातरी एका सिनेमात पण बघितल्या होत्या त्या रिक्शा.. गरीब श्रीमंतीची दरी होती ती.. ह्या सायकल पूल आउट ट्रॉली एक्सेपशनल आहेत. फक्त शाळेच्या अपंग मुलांकरीता.. आणी एका पूल आउट मध्ये एकच मुलगा बसतो..” रौनक म्हणाला.

“पण किती चांगलं आहे हे! केवढं इंधन वाचतं त्यामुळे.. आपल्याकडे बघ नाही तर.. सकाळचा तासभर आणी मग दुपारी तासभर.. स्कूल बसेस.. रिक्शा.. व्हॅनस.. मुलांचे पेरेंट्स.. रस्त्यावर फक्त तीच गर्दी.. केवढा आवाज.. गोंधळ .. आणी प्रदूषण.. आणी केवढं इंधन वापरल्या जातं ह्यात.. ” समीर म्हणाला.

“आणी शाळा जवळ असली, पण क्लासेस लांब असतील तर..? मग कसं करणार..? आता तुझं पुढंच वर्ष बोर्डाचं आहे.. टयूशन क्लासेस लावायला लागतील..” सारिकाने काळजीने विचारलं.

“अगं तिच तर गंमत आहे.. मुलं इथे एक तर शाळेत जातात, किंवा टयूशन क्लासेस ना! सेकंडरी च्या मुलांना दिवस भरात फक्त चार तासच पेड शिक्षण अलॉउड आहे. आणी प्रायमरी च्या मुलांना तर फक्त तीन तास. अगदी कडक कायदाच आहे तसा.. आणी ती बोर्डाच्या परीक्षेची पण गंमतच आहे. इथे सगळ्या स्टँडर्ड ची परीक्षा बोर्डच घेतं. शिका कुठेही.. पण परीक्षा मात्र बोर्ड घेणार..” रौनक म्हणाला.

“बापरे! पण मग पुढच्या अॅडमिशन चं काय..?” सारिकाने विचारले.

“बोर्डाची परीक्षा महत्वाची आहेच गं.. पण त्याचं वेटेज फिफ्टी परसेंट. बाकीच्या फिफ्टी परसेंट करता ‘नेचर कॉनझरव्हेशन’. आणी त्या करता स्टूडेंट्स काय काय करतात.. तू ऐकच... आणी प्रत्येक स्टुडेंटचं व्यवस्थित रेकॉर्ड असतं बोर्डा कडे..” रौनक सांगत होता.
“बापरे..! पण अवघड आहे नाही.. ? सगळं रेकॉर्ड चेक करणं.. मेंटेन करणं..” सारिका ला अजूनही रौनक च्या मार्कांची काळजी वाटत होती.

“अगं आई.. बोर्डा जवळ प्रत्येकाचं नाव रजिस्टर केलेलं असतं.. अगदी फर्स्ट च्या अॅडमिशन पासून.. मग खूप वेगवेगळ्या मेथड्स वापरतात रेकॉर्ड करायला. आताच मला एक मेथड कळली.. रॉन आणी बेला कडून..”

“ती कोणती..?”

“एनर्जी कौंट रिंग ची. होम जीम मधून ईलेक्टरिसीटी तयार करतात ते. आणी किती युनिट्स जनरेट झाले, ते त्या रिंग मध्ये रजिस्टर होतं.. महित आहे, इलेक्टरिसीटी जनरेट व्हायला लागली नं, की त्या रिंग मधला खडा ग्रीन होतो...” रौनक अगदी डोळे विस्फारुन सांगत होता.

“झालं! म्हणजे पोरं टीव्ही बघत बसणार नाही तर झोप काढणार.. आणी आई बाप जीम मध्ये.. गाळताहेत घाम..” हे अर्थात सारिकाचा अनुभवच बोलणार.

“ते तसं आपल्या कडे होऊ शकलं असतं.. आई बाबा प्रोजेक्ट करतात आणी मार्क्स मुलांना.. पण ह्या लोकांनी ती काळजी घेतलीय.. ही रिंग ज्याने घातलिय त्याला आयडेंटीफाय करते, आणी कोउंट्स त्याच्या नावावर जमा करते.. त्यामुळे नो चान्स.. आणी ईवन सायकल वर पण बॅटरी चार्जिंग करतात. ते सायकल ला ग्रीन बार बघितले होते आपण बघ.. ते सगळं पण काऊंट होत असतं....” हसत हसत रौनक ने सांगितलं.

“व्वा! हे फारच छान आहे. पण आता आवरा.. आपली आजच्या ओरिएंटेशन सेशन ची वेळ होतेय..” समीर म्हणाला..

(क्रमश:)
******************

पुढील भाग:-
https://www.maayboli.com/node/85092
https://www.maayboli.com/node/85093
https://www.maayboli.com/node/85094

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults