ड्रीमलँड-२

Submitted by SharmilaR on 3 May, 2024 - 02:18

ड्रीमलँड-२

विमान लँड व्हायला लागलं तसं, पलीकडच्या सीट वरून डोकावून, सारिका बाहेर बघता येईल तितकं बघायला लागली. खिडकीशी रौनक बसला होता. तोही मोठ्या उत्सुकतेने सगळं डोळ्यात साठवत होता. तिच्या उजव्या हाताला समीर बसला होता...

त्या तिघांनाही ह्या नवीन देशाबद्दल प्रचंड उत्सुकता वाटत होती. आज पर्यंत कधीच, त्या तिघांनीही, ‘सेवर्थलँड’ ह्या देशाचं नावही ऐकलं नव्हतं. आणी समीर ला अचानक तिथे कंपनी च्या कामा करता नसतं जावं लागलं.., तर पुढेही कधी ऐकलं नसतं...

पण सगळंच एवढं पटापट घडलं होतं.. की, केव्हा सगळं घर आवरलं.. केव्हा रौनक च्या शाळेचं सगळं बघितलं.. अन् केव्हा एवढी सगळी तयारी केली, इथे येण्याची.., केव्हा आणी कसे सगळ्यांचे निरोप घेतले.. सरिकाला काही काही आठवत नव्हतं. पण ह्या कधीही नं पाहीलेल्या.. नं ऐकलेल्या देशाबद्दल तिलाही उत्सुकता मात्र जबरदस्त होती.

तिने बाहेर खाली बघितलं, विमान ‘पॅराडाईज’ शहराच्या एयरपोर्ट वर लॅंड होत होतं. सगळं कसं आखीव रेखीव दिसत होतं. सगळीकडे हिरवीगार शेते.., थोड्या थोड्या अंतरावर पाण्याची तळी आणी नेटके मोठे रस्ते दिसत होते...

कस्टमस मधून बाहेर येतांना त्यांच्या केबिन बॅगा जर्रा हलक्या झाल्या होत्या. ह्या देशात चालत नसलेलं सामान तिथेच काढून ठेवायला लागलं होतं त्यांना. अर्ध्या तासात, सामान घेऊन ते तिघंही बाहेर आले, तेव्हा त्यांना घ्यायला आलेला माणूस लगेच दिसला. समीर कडे त्याचा फोटो आलाच होता. त्या माणसाकडेही ह्या तिघांचे फोटो आणी माहिती असावी. त्याने लगेच त्यांना ओळखलं.

सगळे जवळ आल्यावर त्याने दोन्ही हात जोडून स्वागत केलं, “नमस्ते.. माय नेम इज अनिश.. वेलकम टू सेवर्थलँड कंट्री. आय विल बी टेकिंग यू टू यॉर हाऊस.. ” त्याचं ते बोलणं, अगदी पाठ केल्यासारखं घोटीव वाटत होतं.. पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र घोटीव नव्हतं.

डीकीत सामान ठेवून तिघंही अनिश बरोबर गाडीत बसले. समीर पुढे अनिश च्या शेजारी बसला होता. गाडीत बसल्याबरोबर अनिश ने त्या तिघांना ईयरफोन दिले. स्वत:च्या कानात पण प्लग घातले. “नाऊ प्लीज यूज दॅट..” खुणेने ईयरफोन कडे बोट दाखवत तो म्हणाला.

प्रत्येकाच्या ईयरफोनला जोडलेला एक अगदी छोटया, आगपेटीच्या आकाराचा टच स्क्रीन होता. त्यावर मेसेज झळकत होता, “प्लीज सिलेक्ट यॉर लॅंगवेज फॉर कम्युनिकेशन”.

सगळ्यांनी आपापल्या स्क्रीन वर क्लिक केलं. जगातल्या जवळपास हजारो भाषांचे पर्याय तिथे दिसत होते तिथे. तिथेच व्हरचुअल कीबोर्ड पण होता, पटापट टाइप करायला. सरिकाला मराठी, हिंदी, इंग्लीश तिन्ही भाषा उत्तम येत होत्या, तरीही तिने ह्या परक्या देशात गंमत म्हणून, मराठी वर क्लिक केलं. तेवढंच जरा जवळच्या.. आपल्या.. माणसाशी बोलल्या सारखं वाटेल.. आणी ‘ऐकुयात तर खरं इथलं मराठी..’. बाकी दोघांनी बहुतेक इंग्लीशच सिलेक्ट केलं असावं.

“आता मी जे बोलेन, ते तुम्हाला तुम्ही सिलेक्ट केलेल्या भाषेत ऐकू येईल. आणी तुम्ही तुमच्या भाषेत बोललात तरी मला, मी सिलेक्ट केलेल्या भाषेत ऐकू येईल.. आणी आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहोत.. त्यामुळे आपल्या सगळ्यांना एकमेकांच बोलणं आपण निवडलेल्या भाषेतच ऐकू येईल. सीटबेल्ट लावलेत नं सगळ्यांनी..?” ईयरफोन मधून अनिश चा आवाज आला.

“अरे व्वा! मला स्पष्ट मराठी ऐकू येतंय की.. तुम्ही मराठी आहात..? तुमचं नाव पण..” अनिशचा तो आवाज ऐकून सारिका इतकी उत्तेजित झाली होती, की अनिशचं आधीचं वाक्य तिच्या लक्षातच आलं नाही.

“नाही. मी मराठी नाही. आणी मला मराठी पण येत नाही. माझ्या आईला हिंदू देवा धर्माबद्दल खूप आकर्षण होतं. म्हणून तिने मला, अनिश हे कृष्णाचं नाव दिलं.” हसत हसत अनिश म्हणाला. आता त्याचा बोलण्याचा टोन सहज वाटत होता. कदाचित त्याची भाषा आणखीन काहीतरी वेगळी असेल. सुरवातीला सगळ्यांना कळावं म्हणून त्याने चार इंग्लीश वाक्य पाठ केली असतील..

“मी जर्मन सिलेक्ट केलंय.. प्रॅक्टिस व्हावी म्हणून...” सीट बेल्ट चेक करत रौनक हळूच म्हणाला.
सरिकाला लक्षात आलं, रौनक ने पाचवी पासून जर्मन लॅंगवेज घेतली होती शाळेत अभ्यासाला.

“साधारण आपण वीस मिनिटात तुमच्या मुक्कामावर पोहचू.. तो पर्यंत अगदी तुम्ही अगदी आरामशीर बसा. तुमच्या ह्या पहिल्या छोट्याशा प्रवासाचा आनंद घ्या.. ” अनिशचा आवाज आला.

सगळे उत्सुकतेने बाहेर बघायला लागले. शहरातले रस्तेखूपच मोठे होते. दोन्ही बाजूंचे रस्ते चार चार लेन मध्ये विभागले होते. पायी चालणार्‍यां करता मोठे फुट पाथ होते. त्या नंतर सायकल च्या लेन्स होत्या आणी मग गाड्यां करता रस्ता. रस्त्याच्या मधोमध हिरवागार हिरवळीचा पट्टा होता आणी त्यावर ठराविक अंतराने मोठ मोठी झाडं लावली होती. फुट पाथ च्या कडेलाही दोन्ही बाजूनी मोठमोठे वृक्ष होते. त्यामुळे पायी चालणारे आपोआपच सावलीतून चालत होते.

सकाळचे नऊ वाजले होते इथे. पाठीवर सॅक लावलेली गोड गोबरी मुले फुटपाथ वर, दोन्ही दिशांनी दिसत होती. कदाचित ही शाळेची वेळ असेल त्यांच्या.. लहान मुलेही आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर दिसत होती. पण त्यांना शाळेत सोडणारे आई बाबा.. हे आपल्याकडे नेहमी दिसणारं दृश्य मात्र दिसत नव्हतं. शाळेच्या स्कूल बसेस.. व्हॅन.. रिक्शाही नाहीत..? . . रस्त्यांवर गाड्यांची गर्दी अजिबातच नव्हती.

सरिकाला एकदम लक्षात आलं, आल्यापासून तिने एकदाही हॉर्न ऐकला नव्हता.

“किती शांत आहे नं हे पॅराडाईज शहर.. एकदाही हॉर्न वाजला नाही ..” ती रौनक ला म्हणाली.
“आमच्या देशातली सगळीच शहरं.., गावं.. अशीच असतात. इतर देशात असतात तसे, इथल्या गाड्यांना हॉर्न नसतात. आणी आमच्या देशात तर, सायकलींना पण घंटा नसते. ” अनिश ने स्वत:हुन माहिती दिली. त्याच्या आवाजात अभिमान डोकावत होता.

“मग गाडी चालवतांना इतरांना सावध कसं करायचं..? हॉर्न शिवाय..?” समीर ने आश्चर्याने विचारलं. त्याच्या डोळ्यासमोर आपल्या देशातली रस्त्यावरची गर्दी आली.

आपल्याकडे तर ब्रेक पेक्षा हॉर्नच जास्त वापरतात लोकं. बरीच मुलं तर एक बोट कायम हॉर्न वर ठेवूनच गाडी चालवतात. घरात बेडरूम मध्ये सुद्धा रस्त्यावरचे कर्ण कर्कश्य आवाज येत असतात..

“कुणाला सावध करायच..? आणी का सावध करायच..?” आता अनिश ला आश्चर्य वाटलं, “रस्त्यावर येणारा प्रत्येक जण, सावधच असतो. सगळ्यांना डोळे, कान.. आहेतच की. उलट आपल्यामुळे इतर कुणाला त्रास होणार नाही, ह्याची काळजीच घेतात सगळे. इतरांची जबाबदारीही आपल्यावर आहे, म्हणून सगळेच जपून गाड्या चालवतात...”
“आणी ओवरटेक करतांना..?” समीर ने विचारलं.
“ओवरटेक का करायच..? म्हणजे इथे तसा ओवरटेक चा प्रश्नच येत नाही. कारण कुणीच तसं करत नाही. सगळ्या वाहनांचा वेग ठराविक मर्यादेचा असतोच. अगदीच काही इमरजन्सी व्हेईकल असेल, तरच ड्रायवर मग दोन वेळा हेडलाइट ब्लींक करतो. बाकी प्रत्येकाचं नीट लक्ष असतं, रस्त्यावर आणी रीयर व्यू मिरर मध्ये.. गेल्या कित्येक वर्षात आमच्याकडे एकही अपघात घडलेला नाहीय..” अनिश ने सांगितलं.

सारिका च्या डोक्यात कुठेतरी कळ आली.. क्षणभर तिने डोळे गच्च बंद केले..

“बाबा, पण तू बघितलस का..? केवढे मोकळे रस्ते आहेत.. गाड्या तर जवळपास नाहीच रस्त्यावर...! टू व्हीलर तर नाहीच नाही.. पायी चालणारे आणी सायकल चालवणारेच खूप दिसताहेत.. आणी बघितस का सगळ्या सायकल वाल्यांनी हेल्मेट घातलय.. ” रौनक बाबाला म्हणाला. गाड्या हा त्या दोघांचाही जिवा भावाचा विषय होता!

“तरुण मुलं पण नीट गाड्या चालवतात..?” सारिकाच्या तोंडातून हा प्रश्न का आणी कसा निघाला.., ते तिलाही कळलं नाही. तिला काहीतरी आठवत होतं.. अंधुकसं.. पण काय ते कळत नव्हतं....

“लायसन मिळण्याचं वय तीस आहे येथे. त्यामुळे गाडी चालवणारा सर्वात तरुण वर्ग म्हणजे तिशीचा. फक्त तिशी ते साठी ह्या वयाचेच लोक गाड्या चालवू शकतात. तिशीत तरुण वर्ग जबाबदार झालेला असतो आणी साठीच्या आधी पर्यंत रिफ्लेसेस चांगले असतात माणसाचे...” अनिश ने माहिती दिली.

“किती छान कल्पना आहे..” सारिका पुटपुटली.. ती अजूनही काहीतरी आठवायचा प्रयत्न करत होती.
“तसंही, इथे खासगी गाडी घ्यायची म्हणजे, मागच्या सात पिढ्यांनी खूप कमावून ठेवलं असेल तरच शक्य होतं.. आणी पेट्रोल चे भाव तर चंद्राला भिडलेले असतात... खासगी वाहन फार कमी लोकं वापरतात इथे. शक्य तितकं पायी.. नाही तर सायकल..

शिवाय तिशीपर्यंत सगळ्यांना पायी जाणं.. सायकल वापरणं.. आणी आवश्यक तेव्हाच सार्वजनिक वाहतूक वापरण.. ह्याची इतकी सवय झाली असते.. की कुणी गाडीच्या भानगडीत पडतच नाही. शिवाय त्यामुळे ट्रॅफिक जाम.. पार्किंग प्रॉब्लेम असं काहीच होत नाही इथे.. ” अनिश सांगत होता.

“मुळात लोकांनी खासगी वाहन वापरू नये, ह्यावर भर असतो आमच्याकडे. एवलेबल असलेल्या नॉन रिनोवेबल एनर्जी सर्वच स्त्रोत जपून वापरतो आम्ही. निसर्गाची शक्य तितकी काळजी घेतली जावी, आणी आहे त्यात भर घालावी हा उद्देश आहे आम्हा सगळ्यांचा. कळेलच तुम्हाला आता सगळं.. ” अनिश ने माहितीत अधिक भर घातली.
‘आपण दहावी झाल्या झाल्या आई बाबांना टू व्हीलर मागायची ठरवली होती.. इथे तर तसं काही शक्य दिसत नाही ते..’ रौनक च्या मनात आलं.
‘आणी आपण.. आपले मित्र.. जाणीव पूर्वक एवढा नैसर्गिक संपत्तीचा विचार कधीच करत नाही..’ ह्याची लाजही वाटली... ‘एनव्हारमेंनट हा विषय फक्त घेतो आपण शंभर मार्कांना..! शिवाय एनव्हारमेंनट ह्या विषयावर सायन्स प्रोजेक्ट केलं.. डीबेट मध्ये त्या विषयावर बोललं.. की बक्षीस हमखास मिळतं..’

बाकी इथे सायकल चालवणारेही आपली सायकल अगदी शिस्तीत चालवत होते. व्यवस्थित हेल्मेट लाऊन. उगाच स्पर्धा दिसत नव्हती कुणात.. प्रत्येक सायकल च्या हँडल वर हिरव्या रंगाचे आडवे बार दिसत होते.

“त्या बस च्या टपावर काय चमकतय..?” रौनक चं लक्ष पलीकडच्या रस्त्यावर धावणाऱ्या बस कडे गेलं, “आपल्या समोरच्या कार वर पण आहे तसच..” आता त्याचं लक्ष समोरच्या कार कडे पण गेलं..
“अरे.. ससा.. एकदम नको धावून .. सगळे प्रश्न आजच संपवणार आहेस का..?” सारिकाने त्याच्या डोक्यावर टपली मारली.
“ससा..? हा..?” अनिश ने विचारलं.
“आम्ही त्याला लाडाने ससा म्हणतो..” समीर ने परस्पर उत्तर दिलं.
अनिश च्या चेहऱ्यावर हसू पसरलं.

“अरे, ते चमकतय ना.., ते आपल्या कार वर पण आहे. तुझं लक्ष नसेल गेलं मगाशी. अतिशय हाय पॉवर सोलार डिस्क आहेत त्या. त्यावर कारच्या बॅटरीज चार्ज होत राहतात. सगळी वाहनं इथे मुख्यत: सोलर एनर्जी वरच चालतात. त्यामुळे पेट्रोल, डिझेल चा वापर अतिशय मर्यादित प्रमाणात होतो... ते ही इमर्जनसी म्हणून.. कधी कधीच.. अॅम्ब्युलेन्स.. पोलिस गाड्या वैगेरे करता...”
“इथे सागळीकडेच दिसेल तुम्हाला.... शक्य तिथे सोलार एनर्जी, विंड एनर्जी, वॉटर एनर्जी आणी आणी ह्यूमन एनर्जी चा वापर केलाय..”

‘ह्यूमन एनर्जी म्हणजे काय..?’ हा प्रश्न मनातच ठेवून गाडीतले तिघंही हे सगळं स्वप्नवत वाटल्याप्रमाणे बाहेर बघत होते. पॅराडाईज शहर हे खरोखर स्वर्गा सारखं भासत होतं.. मोकळे रस्ते.., आवाज नाही.. समोरच्या वाहनाचा आपल्या नाकात भगभग जाणारा धूर नाही.. की धूळ नाही.. रस्त्यावर कुणीही एखादी रेस लावल्यासारखं जात नाहीय.. सगळं कसं शांत चाललंय.. बाकी खरा स्वर्ग कुणी बघितलाय म्हणा.. पण असलाच, तर एवढी शांती.. एवढी हिरवाई.. एवढी शिस्त.. आणी एवढी झाडं, फुलं.. पानं.. नक्की तिथेच असतील..

(क्रमश:)
***
पुढील भाग:-
https://www.maayboli.com/node/85092
https://www.maayboli.com/node/85093
https://www.maayboli.com/node/85094

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults