उतराई.....!

Submitted by रूपाली विशे - पाटील on 29 April, 2024 - 11:32

उतराई..!

अंगणात पारिजातकांच्या फुलांचा सडा पडला होता. केशरी देठाची अन् पांढऱ्या पाकळ्यांची मनमोहक फुलं. पाहणाऱ्याला वाटावं, जणू काही ती स्वर्गीय फुलंच असावीत..! त्या फुलांचा जीव मुग्धावणारा सुवास अंगणात दरवळत होता.

सकाळच्या आल्हाददायी वातावरणाची धुंदी मनावर चढलेल्या अलकाबाई पारिजातकांच्या सड्यातून पूजेसाठी फुलं वेचण्यात मग्न झालेल्या. तेवढ्यात कुंपणाचे फाटक उघडल्याचा आवाज झाला आणि त्या भानावर आल्या.

फाटक उघडून नाना आत आले. त्यांच्या सोबतीला एक चार-पाच वर्षाची गोड चिमुकली होती. नानांसोबत तिला पाहुन अलकाबाईंना आश्चर्य वाटले.

" ही ' राजस बाळी ' नवी पाहुणी कोण आहे हो तुमच्यासोबत ..??" त्यांनी नानांना विस्मयाने विचारले.

" ओळख पाहू कोण असेल बरं ...??" नानांनी कौतुक मिश्रित नजरेने सोबतच्या चिमुकलीकडे पाहत अलकाबाईंना प्रतिप्रश्न केला.

" आपल्या रमेश भाऊजींची नात का हो ही ..?" लहानगीचा चेहरा कुतुहलाने न्याहाळत अलकाबाईंनी विचारलं.

अलकाबाईंना वाटले , नानांच्या सोबतीला असणारी लहानगी शेजारच्या रमेश भाऊजींची मुलगी श्रद्धाची लेक असावी. श्रद्धाने लग्नानंतर नवऱ्यासोबत परदेशी संसार मांडला.. तिथेच तिचं बाळंतपण झालं. कदाचित बऱ्याच वर्षाने ती मायदेशी परतली असावी. त्या मनात अंदाज बांधू लागल्या.

" नाही हो आजीबाई, तुमचा अंदाज चुकला बरं का.. !
ही छोटी पाहुणी आपल्या शलाकाची लेक.. आपल्या दोघांची नात..!" चिमुकलीला कडेवर उचलून घेत तिच्या गुलाबी गोबऱ्या गालांचा गोड पापा घेत नानांनी रहस्यभेद केला.

नानांनी रहस्यभेद केला आणि अलकाबाई क्षणभर स्तंभित झाल्या. त्यांच्या डोक्यात प्रश्नांचे मोहोळ उठले.

शलाकाची लेक..??

ती इथे कशी..?

नाना तिला आपल्या घरी का घेऊन आले असावेत बरं...??

खरंच असे प्रश्न आपल्याला पडू शकतात..?? का पडावेत असे प्रश्न आपल्याला..??

त्यांना स्वतःची लाज वाटली. आपल्या डोक्यातून बाहेर पडलेल्या विचारांची, प्रश्नांची त्यांना अतिशय शरम वाटली.

शलाकाची लेक म्हणजे नाना आणि आपली नात नव्हे का ..?? हे घर तिचं आजोळ नाही ...??

शलाका ह्या घराची लेक होती. लाडकी एकुलती एक लेक..!

तिचा हक्क नव्हता का ह्या घरावर , नानांवर, त्यांच्या प्रेमावर, त्यांच्या पितृछायेवर..??

__ आणि आपल्यावर.. ?? आपल्या प्रेमावर...??

क्षणभर ह्या विचारांपाशी त्या घुटमळल्या. त्यांना कोंडल्यासारखं झालं. घश्यातून हुंदका फुटेल की काय अशी भीती त्यांना वाटली. मात्र त्यांनी आपल्या भावनेवर विजय मिळवला. डोळ्यातून टिपं गाळत बसणं नानांना नक्कीच आवडलं नसतं. त्यांनी मोठ्या कष्टांनी डोळ्यांतले अश्रू मागे लोटत डोळ्यांतच जिरवले. दुःखाची खपली निघाल्यागत त्यांना ठुसठुसू लागलं.

खरंतर शलाकाने आपल्याला ' आपलं ' असं कधी मानलंच नाही. किती प्रयत्न केले आपण .. पण नाहीच.. तिच्या मनात आपल्याबद्दल जी अढी बसली ती कायमचीच... अगदी तिच्या अंतापर्यंत... !!

अलकाबाई आणि शलाकाच्या नात्यात निर्माण झालेली दरी दूर करण्यासाठी नानांनी खूप प्रयत्न केले, मात्र हार पत्करण्याशिवाय त्यांच्याही हाती काहीच लागलं नाही.

" अगं अलका, दारातच काय उभी राहिलीस..? आत तरी ये..!! " नानांच्या हाकेने त्या भानावर आल्या.

" इकडे ये बाळा..!"

अलकाबाईंनी लहानगीला हाक मारत जवळ बोलाविले.

" नाव काय तुझं..?" लहानगीचे हात हातात घेत त्यांनी मायेने विचारपूस केली.

" ओवी ....!"

बोबड्या स्वरातले, दुधावरच्या सायीसारखे लहानगीच्या तोंडचे बोल ऐकून अलकाबाईंना भरून आलं.

त्यांनी तो लहानसा, कोवळा चेहरा नीट निरखून पाहिला.
तेच् चमकदार , काळेभोर डोळे, नाजूक जिवणी , निमुळती हनुवटी .... निरागस अन् निष्पाप चेहरा .. आपल्या आईचं रूप घेऊन जन्मली होती लेक..!

इतकी वर्ष मनात खोलवर दडून बसलेली शलाका तिच्या लेकीच्या रूपाने त्यांच्यासमोर आज उभी होती. त्या अंतःकरणातून पुऱ्या हलल्या होत्या.

लहानग्या ओवीला पाहून बाळ रूपातली शलाका त्यांच्या मनात डोकावू लागली. त्या पार भूतकाळात जाऊन पोहचल्या. शांत जलाशयाचा तळ ढवळला जावा अन् पाण्याचे बुडबुडे वर तरंगत यावेत ... तश्या गतकालीन स्मृती मनाच्या तळकप्प्यातून अलगद वर येऊ लागल्या.

अलकाबाई पेशाने शिक्षिका. घरातल्या जबाबदाऱ्या उरावर घेत, निस्तरत त्यांनी वयाची पस्तिशी कधी ओलांडली तेच त्यांना उमगलं नाही. भावंडांची शिक्षण संपली अन् ती नोकऱ्या, लग्न करून संसाराच्या मार्गाला लागली. असं म्हणतात की, आई - बाप जन्माला पुरत नाहीत. ते अगदी खरंच म्हणावं...! आई-वडील इहलोकीच्या यात्रेवर गेले अन् त्या अगदीच एकट्या पडल्या.

पुढे नोकरीत बदली झाली आणि त्या चंद्रनगरला राहायला आल्या. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून आल्या, त्याच शाळेत नाना मास्तर होते. पुढे ते हेडमास्तर झाले. नानामास्तर म्हणजे शिस्तीने एकदम कडक मात्र आतून अगदी मायाळू आणी परोपकारी व्यक्तीमत्व ...!

शलाका नाना आणि कौमुदिनीची लाडकी लेक.. !

एकट्या राहणाऱ्या अलकाबाईंचे , नाना आणि त्यांच्या कुटूंबियांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. त्या जुळलेल्या नात्यात अपार स्नेह आणि आपुलकी होती.

रखरखत्या वाळवंटात उगवलेल्या अन् पाण्याशिवाय कोमजू पाहणाऱ्या एखाद्या रोपट्यावर अचानक एखादी पावसाची सर येऊन थंडगार शिडकावा व्हावा आणि त्या रोपट्याने पालवीसह तरारून उठावं तसं अलकाबाईंच्या बाबतीत घडलं. आयुष्यात उमेदीचं अन् समाधानाचं नव्याने काहीतरी गवसू पाहतेयं हे त्यांना जाणवलं.

शलाका त्यांची लाडकी विद्यार्थीनी होती. एका प्रेमळ शिक्षिकेत जे गुण असायला हवेत ते सगळे गुण त्यांच्यात भरभरून होते. अलकाबाई म्हणजे शलाकाच्या बालपणातल्या चिमुकल्या विश्वातलं देखणं ' स्वप्नं ' होतं. दोघींचीही छान गट्टी जमली.

अलकाबाईंच्या अडल्या- नडल्याला नाना मास्तर आणि कौमुदिनी नेहमी धावून येत असत.

सारं काही सुरळीत चाललं होतं आणि अचानक कौमुदिनीचं जुनं दुखणं बाहेर उफाळून आलं. नानांनी सगळे दवाखाने पालथे घातले. त्यांनी अगदी वैद्य, हकीम ह्यांचा देखील आसरा घेतला मात्र कौमुदिनीच्या तब्येतीला नावापुरताही गुण आला नाही. घरावर पडलेल्या संकटाच्या छायेने नाना , कौमुदिनी आणि लहानग्या शलाकाची फरफट होऊ लागली.

कौमुदिनीच्या तब्येतीची काळजी घेण्यात व्यग्न झालेल्या नानांचे शाळेकडे, घराकडे, लहानग्या शलाकाकडे दुर्लक्ष होऊ लागले. मात्र नानांवर ओढवलेल्या ह्या संकटात अलकाबाईं देवदूतासारख्या धावून आल्या. पत्नीच्या सेवे - सुश्रृषेत व्यग्न झालेल्या नानांच्या माघारी शाळेची आणि शलाकाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली.

कौमुदिनीची तब्येत वर्षभरात पूर्णपणे ढासळली. तिला स्वतःला जाणवलं की, आपण आता काही दिवसांचेच सोबती आहोत.

अंथरूणावर पडलेल्या कौमुदिनीने एके दुपारी अलका बाईना घरी एकटे बोलावून घेतले.

" बाई, माझ्या माघारी तुम्ही माझ्या शलाकाला आणि नानांना आयुष्यभर प्रेमाने सांभाळा... त्यांना अंतर नका देऊ..!" असं म्हणत तिने अलकाबाईंकडून तसं वदवून घेत वचन घेतलं.

नानांचं आणि कौमुदिनीचं प्रेमाचं, मायेचं घरटं मोडताना पाहुन अलकाबाईंना खूप दुःख होत होतं.. पण नियतीच्या क्रूर इराद्यापुढे सगळेच कठपुतळी ठरले होते.

कौमुदिनी फार दिवस राहिली नाही. अल्पावधीतच तिने जगाचा निरोप घेतला. तिच्या माघारी नाना व शलाका दोघेही एकटे पडले. कौमुदिनीचं उत्तरकार्य पार पडले आणि घरी जमलेले सगळे नातेवाईक आप- आपल्या घरी पांगले. कौमुदिनी शिवाय घर अगदी सुनं - सुनं झालं. आईच्या मायेला मुकलेली लहानगी शलाका बावरून गेली. कणखर असलेले नानामास्तर पत्नीच्या अकाली जाण्याने सोसाट्याच्या वाऱ्यात एखादा भर-भक्कम वृक्ष उन्मळून पडावा तसे कोसळून गेले.

दिवसांमागून दिवस जात होते. नाना आणि शलाकाच्या आयुष्याला एकमेव आधार होता तो फक्त अलकाबाईंचाचं..!

त्यांनीही आपल्या परीने जमेल तसा दोघांना आपुलकी अन् मायेचा आधार दिला. पुढे काही जुन्या- जाणत्या आप्तजनांनी नाना अन् अलकाबाईंना आपलं मैत्रीचं , स्नेहाचं नातं पुढे नेण्याचा सल्ला दिला. दोघांनीही विवाह करावा असं सगळ्यांचं म्हणणं पडलं. नाना आणि अलकाबाईंसाठी खूप अवघड असा हा निर्णय होता. मात्र दोघांनीही एकमेकांना समजून घेत आपलं नातं शलाकासाठी, तिच्या भविष्यासाठी पुढे नेण्याचं ठरवलं.

अलकाबाई मुळच्याच अंगच्या नैसर्गिक समजूतदार. लहानपणापासूनच त्यांची अशी कल्पना झाली होती की समजूतदारपणे, प्रेमाने वागलं की आयुष्यातले बरेचसे प्रश्न सुटतात .. मात्र नानांसोबतचं बऱ्याच काळापासून मैत्रीचं असलेलं नातं पती- पत्नीच्या नात्यात बदललं आणि त्यांच्या समजूतदारपणाच्या कल्पनेला तडा गेला.

दोघांनीही विवाहगाठ बांधली आणि कौमुदिनीच्या माहेरच्या माणसांनी नाना आणि अलकाबाईंच्या नात्याला विरोध करायला सुरु केलं. एरव्ही नानांची आणि शलाकाची कुठलीही विचारपूस न करणाऱ्या कौमुदिनीच्या आईने घरी येऊन अलकाबाईंना नको - नको ते बोल लावले.

" भामटे, तुझ्या ओसाड कपाळावर कुंकू लागावं म्हणून माझ्या निष्पाप लेकीला सवाष्ण मरावं लागलं. तुझीच दृष्ट लागली माझ्या लेकीच्या संसाराला.. भरल्या संसारातून उठली माझी लेक ... नाना आणि तुझं आधीपासूनच सूत जुळलेलं होतं.. जगाला लाख फसवाल तुम्ही दोघं.. पण मला म्हातारीला नाही फसवू शकणार ..!" "

हे असले बिनबुडाचे बेछूट आरोप दोघांवर करत आपल्या लेकीच्या मृत्यूचा त्या शोक करू लागल्या.

अलकाबाई उन्मळून पडल्या. लहान असलेली शलाका कावरीबावरी झाली.. पुढे तिची आजी तिला हट्टाने आजोळी घेऊन गेली. महिनाभराने घरी परतलेल्या शलाकाचा एकंदरीत नूरच पालटला होता. ती अलकाबाईंकडे संशयाने पाहू लागली. त्यांचा तिरस्कार, द्वेष करू लागली. तिने नानांशीही बोलणं टाकलं. घरात विचित्र ताण असलेली शांतता वास करू लागली.

शलाकाच्या आजोळच्या विघ्नसंतोषी नातेवाईकांनी तिच्या मनात अलकाबाई आणि नानांबद्दल विष पेरलं. दोघांच्याही विरोधात तिचे कान फुंकले.

"माझ्या आईला तुझीच दृष्ट लागली आणि ती मरण पावली .. मला कायमचीच सोडून गेली... तुझ्यामुळेच हे सारं घडलं..!"

हे असले विखारी , कडवे बोल शलाकाच्या तोंडून ऐकून अलकाबाई व्यथित झाल्या. शलाकाने रागाने घर सोडलं. आजोळ जवळ केलं. नानांनी तिला मनवण्याचे अथक प्रयत्न केले मात्र तिने नानांसुद्धा बिल्कुल दाद दिली नाही.

शलाकाने नाना आणि अलकाबाईंचे नाव टाकले. ती आजोळी राहू लागली. पुढचं शिक्षण तिथेच राहून तिने पूर्ण केलं. नाना तिला भेटायला तिच्या आजोळी जात. तिच्या पालनपोषणाचा संपूर्ण खर्च अदा करत. तिला घरी परतण्यासाठी गळ घालत. मात्र
अलकाबाईंना आधी घराबाहेर काढलं तरच मी पुन्हा घरी परतेन असा तिचा घोशा सुरु राही. नानांना हे कदापी मान्य नव्हते.

अलकाबाईंचा काहीही दोष नसताना, त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा का बरं द्यावी...?? नाना देखील आपल्या मतांवर ठाम होते.

पुढे नानांना न कळवता आजोळच्या नातेवाईकांनी शलाकाचं लग्न परस्पर जुळवलं. नानांनी विरोध केला मात्र जिथे पोटची, रक्ताची मुलगीच विरोधकांना सामिल होती.. तिथे नानांचं काही एक चाललं नाही. लेकीला आशिर्वाद द्यायला अन् डोक्यावर अक्षता टाकायला नाना लग्नात गेले. बापाचंच काळीज ते...!

शलाकाने कितीही त्यांचा द्वेष, तिरस्कार केला तरीही त्यांच्या पोटातली तिच्या प्रती असलेली आभाळमाया कधीच कमी झाली नसती. अलकाबाईंना शलाकाच्या लग्नाचं निमंत्रण नव्हतं. त्यांच्या कुणाकडून कसल्याही अपेक्षा नव्हत्या. कौमुदिनीचे सगळे दागिने त्यांनी नानांकरवी शलाकाच्या लग्नात तिच्या गळ्यात घातले. आपला रत्नहार जो त्यांनी आपल्या स्व-कमाईतून बचत करून स्वतःसाठी बनवला होता.. तो रत्नहार त्यांनी मोठ्या प्रेमाने शलाकासाठी पाठवला. अलकाबाईंचा रत्नहार घेण्यास शलाकाने नकार दिला. मात्र तिच्या लबाड आजीने तो हार घेण्यास तिला भाग पाडले.

अलकाबाईं जेव्हा कधीही विचार करायच्या, तेव्हा हे सगळं असं का घडलं ते त्यांना कळत नसे. नेहमी शांतपणे, विचारपूर्वक, समजूतदारपणे परिस्थितीतून मार्ग काढणाऱ्या आपण इथे मात्र सपशेल पराभवी ठरलो .. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागे.. हे कडवट सत्य स्वीकारणं त्यांच्या मानी स्वभावाला जड जाऊ लागलं. मनोमनी उमजलेली ही हार त्यांना कासाविस करू लागली.

आपलं काय चुकलं आणि कुठे चुकलं हे त्यांना कधीच समजलं नाही. कौमुदिनीचं जग सोडून जाणं नियतीच्या हातात होतं. नियतीनेच जे योजलं होतं त्याला विरोध करण्याइतकं सामर्थ्य तरी असतं कोणाजवळ..??

अलकाबाईंनी मरणासन्न अवस्थेत असलेल्या कौमुदिनीला वचन दिलं होतं, शलाकाचा प्रेमाने सांभाळ करण्याचं..!

मग..?? ...ते वचन पूर्ण करता आलं का त्यांना..??

असे प्रश्न त्यांना पडले की मग अलकाबाईंना वाटू लागे की, आपण कौमुदिनीच्या वचनाच्या कर्जात बांधले गेले आहोत.. त्या कर्जाची उतराई होणार तरी कशी..?? आयुष्यभर ओझ्यासारखं बाळगलेल्या त्या कर्जाची परतफेड जिवंत असेपर्यंत करायला हवी... मात्र ती करावी तरी कशी..??

त्या विमनस्क अवस्थेत बसून राहत. नाना त्यांची समजूत घालत असत. नानांचा भक्कम आधार होता म्हणून नाहीतर विचार कर-करून वेड लागायची पाळी त्यांच्यावर आली असती.

ह्या स्वतः घडवलेल्या जीवनाविषयीची त्यांची मनातली सारी आसक्ती जणू मेली होती...!

शलाकाचं लग्न झालं. नाना तिच्या सासरी जाऊन जावई व लेकीला भेटून येत.

प्रसाद नानांचा जावई... शलाकाचा पती.. तो मात्र अगदी भला माणूस ..!

शलाकाचा टोकाचा विरोध झिडकारून त्याने नाना आणि अलकाबाईंशी जिव्हाळ्याचं नातं जपलं. त्याच्या वागण्या-बोलण्यात दोघांप्रती नेहमीच आपलेपणाचा ओलावा झिरपत असे.

काही महिन्यांनी शलाका आणि प्रसादच्या आयुष्यात नव्या पाहुण्याची चाहूल लागली. अलकाबाईंना मनापासून आनंद झाला. त्यांना वाटले, शलाकाने आपल्याला आई मानलं असतं तर किती बरं झालं असतं.. आपण तिच्या सख्ख्या आईसारखेचं तिचे सगळे डोहाळे पुरवले असते, कौड-कौतुकाने तिचं पहिलं बाळंतपणं तिच्या माहेरी केलं असतं. मात्र दुर्दैवाने त्यांच्या नशिबात ते भाग्य लिहिलेले नव्हते. परिस्थितीपुढे त्या असहाय्य, हतबल होत्या.

महिने सरले आणि शलाकाचं बाळंतपण जवळ आलं. नाना आणि अलकाबाईंना जराशी धाकधूक वाटू लागली. नाना शलाकाच्या सासरी जाऊन तिला नेहमी भेटून येत. तिची विचारपूस करत.

आई होणं म्हणजे स्त्रीचा पुर्नजन्म ..! जीव जन्माला घालताना त्या प्रसंगी प्रत्येक स्त्रीला आपली आई आपल्या जवळ असावी असं वाटते. अलकाबाईंचा जीव शलाकासाठी तीळ - तीळ तुटत होता.

__आणि अचानक एके दिवशी कुणाच्याही ध्यानीमनी नसलेलं अकल्पित असं घडलं. एके पहाटे घरातला फोन वाजला. नानांनी फोन उचलला आणि नाना जागेवरच पुतळ्यासारखे थिजून उभे राहिले. शलाकाची प्रसूती झाली. तिला मुलगी झाली. मात्र बाळंतपणातल्या गुंतागुंतीमुळे आणि अति - रक्तस्त्राव झाल्याने एक नवा जीव जन्माला घालताना शलाकाने स्वतःचा जीव मात्र गमावला.

फोनवर मिळालेली दुःखद बातमी आली तीच मुळी वावटळीसारखी.. नाना आणि अलकाबाईंना पूर्णपणे मोडून टाकणारी.. बातमी ऐकून दोघेही जागीच थिजून गेले. शोकसागरात बुडाले. त्यांच्यावर ओढवलेल्या दुःखाच्या रेषा गडद झाल्या. दोघेही धावत-पळत दवाखान्यात पोहचले. तिथे आधीच पोहचलेल्या शलाकाच्या आजोळच्या नातेवाईकांनी अलकाबाईना दवाखानाच्या दरवाज्यातूनच शिव्याशाप देत आल्या पावली माघारी पाठवलं. दुःखी , बधीर अंतःकरणाने त्या घरी परतल्या.

" चांडाळणे, का आलीस इथे..?? ... चालती हो इथून.!
तुझीच दृष्ट लागली माझ्या नातीला.. माझी लेक खाल्ली ती खाल्लीस आणि आता तिची लेक पण खाल्लीस तू..?? बाई आहेस की माणसं खाणारी लाव आहेस तू ..? .... चटक लागलीयं तुला सवाष्ण बायकांना खायची... पापिणे, आता पोट काठोकाठ भरलं असेल ना तुझं.. भूक शमली असेल ना तुझी..??"

अलकाबाईंच्या डोक्यात घणाचे घाव बसल्यासारखे शलाकाच्या म्हाताऱ्या आजीचे कडवट, विखारी शब्द घुमत राहत.

काळ - वेळेचं , परिस्थितीचं कुठलंही भान न ठेवता एखादी स्त्री एवढी कठोर, विखारी होऊ शकते.. एवढे कडवट , तलवारीच्या धारेवरचे शब्द उच्चारू शकते..??

उलट-सुलट विचारांनी त्या तळमळत होत्या.. उसासत होत्या.. पुन्हा-पुन्हा अश्रू ढाळत होत्या. त्यादिवशी त्यांनी पोटभरून रडून घेतलं.

कौमुदिनी सारखंच शलाकाचं असं अकाली, अनपेक्षित जाणं त्यांच्यासाठी खूप धक्कादायक होतं. संतापाने आणि दुःखाने आपलं मस्तक आता फुटून जाईल असं त्यांना वाटलं. मनातली खंत वाढली.

शलाकाची आजी म्हणते तसं खरंच आपली दृष्ट लागली असेल का कौमुदिनी आणि शलाकाला..?? दोघींच्या सुखी, समाधानी आयुष्याला.???

छे.. छे..! असं होऊच शकत नाही.

नाना, कौमुदिनी, शलाका, आपण स्वतः सगळेच दैवाच्या खेळातल्या बुद्धीबळाच्या पटावरचे सोंगटे आहोत.. दैव मनुष्याला नुसतंच छळत नाही, त्याला खेळवतं देखील..! ते जसा खेळ खेळणार तसं - तसं आपण खेळवले जाणार.. दैवगतीच्या खेळातला पट उधळून टाकण्याचं सामर्थ्य जगातल्या एकातरी मनुष्य प्राण्याजवळ असेल का..?? कोण तरी त्याला अपवाद असू शकेल..??

नानाच्या कुटुंबाने आणि आपण फक्त एकमेकांना जीव लावला.. त्या नात्यात माया होती, स्नेह, विश्वास होता.. स्वार्थाचा, मतलबाचा कणभरही लवलेश नव्हता त्यात.. मात्र जिथे क्रूर नियतीनेच कौमुदिनी व शलाकाला अल्पायुष्य दिलं... दोघी मायलेकींना आयुष्याचा दोरच तोकडा दिला... त्यात आपला तरी काय दोष ..?? जे घडू नये ते दुर्दैवाने घडलं .. त्याला आपण जबाबदार कसे असू शकतो ..? ?

विचारांच्या आर्वतात अलकाबाई गुरफटून जात.
स्वतः शी मूक संभाषण साधत त्या आपलीच समजूत घालत.

काळ पुढे सरकत होता. शलाकाची मुलगी आईविना वाढत होती. तिच्यावर मायेची पाखर घालायला तिचे वडील, आजी- आजोबा होते. नातीला भेटायला नाना नेहमी जात. त्यांना तिच्यात शलाकाची छबी दिसे. अलकाबाईंनी काळजावर दगड ठेवून अलिप्तता स्वीकारली. मात्र नानांकडे त्या नातीची चौकशी आस्थेने करत असत.

शलाकाला जाऊन दोन वर्ष झाली. प्रसादने दुसरा विवाह केला. तो तरूण होता. त्याच्यापुढे उभं आयुष्य ठाकलेलं. त्यालाही जोडीदाराची गरज होती. आई वेगळ्या लेकीला आईच्या मायेची गरज होती. कुणाचाही विरोध असण्याचं काही एक कारण नव्हतं. प्रसादची दुसरी पत्नी वेदांगी स्वभावाने सुस्वभावी, सालस होती. तिने शलाकाच्या लेकीला मायेने पदरात घेतलं.

वर्षभरात प्रसादला मुलगा झाल्याची बातमी आली. प्रसादचं घरटं चौकोनी झालं. नाना आणि अलकाबाईंना आनंद झाला. प्रसाद जावई नसून आपला मुलगाच आहे असं त्यांना वाटायचे. प्रसादही त्यांच्या निखळ प्रेमास पात्र होता.

आयुष्य जसं चाललं होतं त्यात दोघेही समाधान मानत पुढची वाट चालत होते.

"मास्तरीणबाई , तुमच्याशी जरा बोलायचं होतं..!" नानांनी अलकाबाईंना भूतकाळातून जागं केलं.

लहर आली म्हणजे नाना कधी-कधी अलकाबाईंना मास्तरीणबाई म्हणून हाक मारायचे.

लहानग्या ओवी जवळ बसलेल्या अलकाबाईंनी नजरेने होकार भरला.

" ओवीचा काही वर्षे आपण सांभाळ करूया का..?? " हा प्रश्न विचारताना नाना थोडेसे संभ्रमित झाले. त्यांना वाटले की, भूतकाळातल्या कडवट अनुभवाने होरपळलेल्या अलकाबाई कदाचित या गोष्टीला नकार देतील.

अलकाबाईंना आश्चर्य वाटलं. त्यांनी विस्मयाने नानांकडे पाहिलं.

" प्रसाद कंपनीकडून तीन वर्षासाठी परदेशी जातोयं. त्याच्यासोबत वेदांगी देखील जाणार आहे. दोन्ही मुलांना तिथे सांभाळायला जड जाईल. मुलगा लहान आहे म्हणून त्याला नेतील दोघेही सोबत. प्रसादची आई आजारी असते म्हणून तो म्हणाला की, नाना तुम्ही ओवीची जबाबदारी घ्याल का तीन वर्षे.. तुम्हांला जमेल का तिला सांभाळायला...?? " नाना म्हणाले.

" मग ..?? ... तुम्ही काय म्हणालात..??" अलकाबाई अधीरतेने म्हणाल्या.

" मी सांगितलं प्रसादला की, अलकाला विचारून सांगतो म्हणून....!"

" त्यात काय विचारायचं मला... तुम्ही होकार द्यायचा ना तिथेच प्रसादला....!"

" तुझी संमती असल्याशिवाय मी कसं हो म्हणणार..??"

" तुम्हांलाही माझ्याबद्दल शंका वाटते...??" अलकाबाई अंमळ दुखऱ्या स्वरात म्हणाल्या.

" तसं नाही ... तरीपण...!." नाना जरासे गडबडले.

नानांना पुढे बोलूही न देता अलकाबाईंनी प्रसादला फोन लावला. ओवीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असल्याचा होकार कळवला.

त्यांनी जाणलं होतं की, कुठेतरी वेदांगीने नकळत दुजेभाव केला होता. पोटच्या मुलाला सोबत नेताना सावत्र लेकीला दुसऱ्यांच्या हाती सोपवताना तिची माया अंशतः कमी झाली होती. कदाचित प्रसादची इच्छा असूनही त्याला लेकीला सोबत घेता येत नसावं.. परिस्थितीपुढे मनुष्य किती हतबल, असहाय्य होतो.. त्यांना प्रसादच्या मनस्थितीची जाणीव झाली. त्या हे देखील ओळखून होत्या की, प्रसादला नाना आणि आपल्यावर पूर्ण विश्वास असणार की, आपल्या लेकीचा सांभाळ आपण इथे नसतानाही आपल्या माघारी मोठ्या प्रेमाने , आस्थेने करतील. दोघेही तिला अंतर देणार नाहीत.

आयुष्याच्या सांजवेळी उमेदीचं , समाधानाचं, आनंदाचं नव्याने काहीतरी गवसू पाहतेयं हे अलकाबाईंना जाणवलं. क्षणात त्या मनाने तरुण झाल्या. आपलं उर्वरित आयुष्य त्या पुढच्या क्षणापासून भरभरून जगणार होत्या. त्यांनी मनात पक्क ठरवलं.

अलकाबाई आता कुणाचीही पर्वा करणार नव्हत्या. कौमुदिनीला दिलेल्या वचनाच्या कर्जातून त्यांची उतराई अजूनही झाली नव्हती. शलाकाला त्यांनी गमावलं होतं.. मात्र आता त्या तसं घडू देणार नव्हत्या. जिवंत असेपर्यंत ओवीचा सांभाळ मोठ्या मायेने त्या करणार होत्या. तिला जीव लावणार होत्या.. कुठेतरी अपूर्णत्वाने ग्रासलेलं त्यांचं मातृत्व त्या पूर्णत्वाकडे नेणार होत्या. पोटातली आभाळमाया आपल्या नातीवर , शलाकाच्या ओवीवर उधळणारं होत्या.

भूतकाळात कौमुदिनीला दिलेल्या वचनातून त्या मुक्त होणार होत्या. आयुष्यभर डोक्यावर बाळगलेल्या तिच्या कर्जाची उतराई करण्याची संधी यावेळेस त्या बिल्कुल सोडणार नव्हत्या.

त्यांनी लहानग्या ओवीला कडेवर उचलून घेत मोठ्या प्रेमाने तिच्या गालावर आपले ओठ टेकवले.

अलकाबाई नानांकडे पाहून प्रसन्नपणे हसल्या.
ते हसणं स्फटिकासारखं होतं... निर्मळ, स्वच्छ..! बऱ्याच काळापासून लुप्त झालेलं ते हास्य पुन्हा एकदा आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावर फुललेलं पाहून नाना अंतःकरणापासून गहिवरले.

__ आणि तिथे अंगणात पारिजातकांच्या फुलांचा जीव मुग्धावणारा सुगंध आसमंतात दरवळू लागला.

__ आत घरात सकाळच्या सोनेरी उन्हाचे कवडसे बरसू लागले. घरातल्या सोनेरी प्रकाशाने दोघांचीही मने न्हाऊन निघाली होती.

समाप्त...!

धन्यवाद..!

©रूपाली विशे - पाटील
rupalivishepatil@gmail.com
__________________________________________
( टिप - सदर कथा काल्पनिक असून कथेचा वास्तविक जीवनाशी कुणाचा काहीही संबंध नाही. )

_________________XXX_________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर
मी मागे पण प्रतिसादात लिहल होत, तुमच्या कथा खरंच छोट्या पडद्यावर साकार व्हाव्या.

कुणी आहे का इथे Netflix, Prime, Zee5 वैगरे वाले

आचार्य, धन्यवाद... तुम्हांला जमेल तेव्हा पूर्ण कथा वाचा..!
विषय फार खोल नाही कथेचा .. थोडासा भावनिक गुंता आहे कथेत..!

मन्या .. हो, मागील कथेवर तुम्ही दिलायं तसा प्रतिसाद..! खूप आभार तुमचे... कथा वाचून प्रोत्साहन देता तुम्ही नेहमी..!

पॅडी... धन्यवाद..!

शर्मिलाजी, लावण्या , केशवकूल धन्यवाद..!

ताई, तुम्ही चांगलच लिहिता. नेहमीच. पण...>>> केशवकूल , अहो... पण... च्या पुढचा अभिप्राय अपूर्ण का ठेवलात.. ?? बिनधास्त लिहा.. काही सूचना असतील तरी लिहा..!

जबरदस्त कथा
काय प्रतिसाद देऊ
निःशब्द झाले आहे

स्वार्थापोटी कोणी कोणाचे कान फुंकतं आणि आयुष्यभर कुरवाळलेले ऋणानुबंध क्षणार्धात तटातट तुटतात...हे दुःख जीवघेणं असतं.
छान विषय आणि त्यावरचं भाष्य...

कदाचित प्रसाद आणि वेदांगी परदेशी गेलेले नसावेत, आणि ओवीची जबाबदारी टाळण्यासाठी वेदांगीने तिला नानांकडे पाठवले असावे . केशवकुल यांच्या "पण" मध्ये कदाचित हेच अभिप्रेत असावे.
पण शलाकाच्या आजीसारख्या लबाड आज्या असे वागून नक्की काय साध्य करत असाव्यात?

अज्ञान बालक , तुमची शंका रास्त आहे मात्र ह्या कथेतरी प्रसाद परदेशी जातोय म्हणून आजी - आजोबांकडे लहानग्या ओवीला सोडून जातोयं.. हे सत्य आहे. आपल्याच पोटच्या लेकरांची जबाबदारी टाळणारी माणसं पाहण्यात आहेत. माझ्या एका मैत्रिणीची ती दहा महिन्यांची असताना आई वारली. वडीलांनी तिच्या सख्ख्या मावशीशी लग्न केलं. मावशी सावत्र आई झाली तरीही तिचा सांभाळ मावशीने आणि वडिलांनी केला नव्हता. ' माय मरो पण मावशी जगो..! ' हि म्हण मला तेव्हा जराही पटली नव्हती. काका- काकूने तिचा सांभाळ करून चांगलं शिक्षण देऊन तिला आर्थिकदृष्ट्या तिच्या पायावर उभं केलं. तिने त्यांनाच आई- वडील मानलं. मला ते तिचे सख्खे आई- वडिल नाहीत असं सांगूनही पटलं नव्हतं.

शलाकाच्या आजीसारख्या लबाड आज्या असे वागून नक्की काय साध्य करत असाव्यात?>>> विकृत आनंद, समाधान.. अजून काय म्हणणार..?

आयुष्यात घडलेल्या घटनांचा, संकटांचा , आपल्या समोरील परिस्थितीचा समंजसपणे स्वीकार करणं बहुतेकांना जड जातं. मग अश्या व्यक्ती त्या घडलेल्या गोष्टींचं खापरं दुसऱ्याच्या डोक्यावर फोडून स्वतःच मानसिक समाधान करून घेऊन जीव शांत करून घेतात.. शलाकाची आजी त्यातलीच एक..!

केशवकुल यांच्या "पण" मध्ये कदाचित हेच अभिप्रेत असावे.>>> माझ्या अंदाजाप्रमाणे त्यांना तसं अभिप्रेत नसावं बहुतेक..!

माझ्या कथेत नात्यांची , मानवी स्वभावाच्या भावनांची गुंतागुंत असते.. पात्रांचे आयुष्य जरा खडतर असते म्हणून कदाचित त्यांनी ' पण' असं लिहिलं असावं..

केशवकूल यांच्या कथा नेहमी मिश्कील , विनोदी, विज्ञानकथा असतात... त्यामुळे त्यांना तसं वाटलं असेल हा माझा अंदाज..! ( केशवकूल, गैरसमज नसावा.. माझा हा अंदाज चुकीचा देखील असू शकतो.. )