उपासना !.. भाग -2

Submitted by Sujata Siddha on 29 April, 2024 - 08:10

https://www.maayboli.com/node/84228 भाग 1
उपासना भाग -२

कशी कोण जाणे ही बातमी कियाराच्या आई वडिलांच्या कानापर्यंत पोहोचली ,आणि अर्थातच व्हायचं तेच झालं , कियारावर त्यांनी खूप बंधनं घालायचा प्रयत्न केला , ती जुमानत नाही म्हटल्यावर मग तिला शिक्षणासाठी परदेशात आपल्या मोठ्या भावाकडे पाठवायची तयारी सुरू केली .पण कियाराही काही कमी नव्हती , तिला परदेशात वैगेरे जायचंच नव्हतं आणि जुलूम सहन करणाऱ्यांपैकी ती नव्हती , तेव्हा अन्याबरोबर प्लॅन करून तिने गुपचूप माझ्या गावी माझ्या घरी पळून यायची तयारी सुरू केली . यातल्या कुठल्याही गोष्टीचा मला पत्ता नव्हता . अन्या तीला पटवून देण्यात यशस्वी झाला होता की तिने जर घरी माय आणि बाबाचं मन जिंकलं तर मी आपोआपच हो म्हणेन .
,मी तेव्हा हॉस्टेल वर राहायचो आणि शनिवार रविवार गावाकडे यायचो . कऱ्हाड जवळ ‘गोटे ‘नावाचं पन्नास -शंभर उम्बऱ्यांचं छोटंसं गाव. नेहेमीप्रमाणे एका शुक्रवारी रात्री गावी गेलो आणि समोर माय शी गप्पा मारत बसलेल्या कियारा ला पाहून धक्काच बसला !.. हि ईथे कशी काय ? ? मग परत वाटलं बरं झालं आली , आता हे विटा मातीचं , कौलं टाकलेलं घर बघून काढता पाय घेईल तर उलटंच झालं , ही पोर , मातीची चूल, सारवलेलं अंगण , दारातलं शेवग्याचं झाड आणि माझी भावंडं यांच्यामध्ये चांगलीच रमून गेली ,हे काय भलतंच ? आता हिला समजवायचे आणि परत पाठवायचे किती कठीण काम , ताबडतोब अन्याला फोन लावला तेव्हा त्याने ही सगळी भानगड सांगितली आणि मी डोक्याला हात लावला . अन्याला झाप झाप झापला तेव्हा म्हणाला आजच्या दिवस राहू दे उद्या तिच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांची माफी मागून तिला सुखरूप पोहोचती करू , ठीक आहे म्हणून मी फोन खाली ठेवला ,पण ताबडतोब तिच्या आई -वडिलांना कळवून टाकले पाहिजे , आता फोन नंबर हिच्याकडेच असणार म्हणून शोधतोय , पण हीचा कुठे पत्ता ? ती आणि माझा धाकटा भाऊ मंग्या कधीच शेतात पसार झाले होते , दिवसभर मंग्या आणि ती कुठे वांगी-टोमॅटो तोड , कुठे नदीत मासे पकड , कुठे रुईच्या फळातला मासा बघ , विहिरीतलं पाणी शेंदून काढ , शेवग्याचा पाला अंगावर उडव ,गोगल गायीला शंखातून बाहेर काढ ,असले काहीबाही खेळत होते , संध्याकाळ झाली तेव्हा तिची ओढणी गुलबाक्षीची फुले , भुईमुगाच्या शेंगा , नागरमोथ्याच्या उकरून काढलेल्या गाठी असा सगळा वानवळा यांनी भरून गेली होती .डेनिम जीन्स आणि टॉप घालून आलेली. तो खराब झाला म्हणून तिने शालूचा विटका पंजाबी ड्रेस प्रेमाने घातला त्यातही ती ‘लै गॉड’ दिसत होती . दिवसभर उन्हात खेळल्यामुळे तिच्या केतकी वर्णावर एका लालसर छटा आलेली होती . मावळत्या सूर्याचे किरण तिच्या मागून पडल्यामुळे सोनेरी केस गालावर ईकडे तिकडे विखुरले होते. जणू स्वर्गातली अप्सरा खाली उतरून माझ्या गरीबाच्या झोपडीत आली की काय असा एक क्षणभर भास झाला. कधी नव्हे ते मी तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी एकटक पाहू लागलो आणि ती लाजली . तिला रागवावे तरी कसे ?
तितक्यात शालू आत आली धावत “कियारा चल ना , घराच्या मागच्या बाजूच्या डोंगरावरच्या करवंदाच्या जाळीतली करवंद खूप गोड आहेत “ असं म्हणून तिच्या हाताला धरून ओढत नेऊ लागली , मागचा डोंगर म्हणजे प्रत्यक्षात छोटी टेकडी च होती ती , त्यामुळे भीती नव्हती ,पण त्या दोघी गेल्या तेव्हा अंधार पडायला थोडाच अवकाश होता , माय ओरडली शालूला की आता तिन्हीसांजेच्या वेळी जाऊ नका ,पण ही ऐकतेय कसली ? गेली तिचा हात धरून पळत समोरच्या डोंगरावर . मी हि कौतुकाने पहात राहिलो . असं वाटलंही नव्हतं की तिला त्या वेळी अडवायला हवं होतं !!!.. . ...
रागावलेली माय चुलीवर भाकऱ्या थापत बडबड करत होती , “ मोट्या घरातली पोर , कशाला नेली तिला आत्ता या येळेला ? काही किरडू बिरडू असतं , काय कळत न्हाई या पोरींना , उद्या काही झालं तर आई-बापाला काय सांगायचं तिच्या ? ..ऐकायचं म्हणून न्हाई अजिबात .. “ ति ची बडबड ऐकत मी चिमणीच्या उजेडात आपला पुस्तक वाचत बसलो होतो , पण कांन आणि डोळे या दोघींच्या वाटेकडे लागले होते . जाऊन आता दोन एक तास झाले होते , मन अस्वस्थ व्हायला लागलं , शेवटी पुस्तक ठेऊन उठलो आणि मागच्या टेकडीवर त्यांना बघायला गेलो , आवाज देत टेकडी वर चढत होतो ,वर गेल्यावर पाहतो तर तिथे कोणाचीही चाहूल लागली नाही , सगळं शांत शांत होतं , टेकडीच्या पलीकडे खाली उतरून शोध घेतला लांबपर्यंत चालत गेलो , दोघीनांही खूप हाका मारल्या , कुठेही काहीही आवाज नव्हता , मन जरा चरकल , परत वर चढून आलो , तेवढ्यात बाबाही आला ,तो ही नुकताच शेतावरून आलेला , फावडं तसंच अंगणात टाकून आला होता , दोघंही जाळीत हाक मारत फिरायला लागलो , मी या टोकाला आणि बाबा त्या टोकाला , अख्खी टेकडी पालथी घातली पण दोघींचा कुठेही पत्ता नव्हता . ‘तसं भ्यायचं काही कारन नाही गड्या , “पोरींना कुनी च्या-पान्याला बालिवलं आसन , गेल्या असतींन दुडक्या मारत ,” बाबा माझी समजूत काढत म्हणाला’ , मीही स्वतः:ला दिलासा देत होतो शालू आणि मंग्या आळीपाळीने या टेकडीवर शेळ्या चरायला येत असत , शालू तर दर रविवारी यायची . गावात कधी कसलीच भीती नव्हती . सगळी माणसं आमच्यासारखीच शेती करून पोट भरणारी , खरंच बाबा म्हणतो तशा चहा-पाण्याला ला गेल्या असतील कुणाकडे तरी . मग टेकडीवरून आम्ही पलीकडल्या बाजूला वस्तीवर जेवढी घरे होती त्या प्रत्येक घरात डोकावून बघितलं . तिन्हीसांजा कधीच होऊन गेल्या आणि आता अंधारलं होतं , सगळी लोकं घरात बसून पिवळ्या बल्ब च्या प्रकाशात काही बाही कामं करत होती . मी आणि बा प्रत्येकाच्या घरात डोकावून बघत होतो , चौकशी करत होतो , खूप अवघडल्यासारखं होत होतं , तितक्यात राधाक्का शेतावरून आल्या ,आणि त्यांनी मुलींना तासभरापूर्वीच पांदीकडे जाताना बघितल्याचं सांगितलं , आता या टेकडीवरून तिथे पांदीकडे कशाला गेल्या असतील ? मी बाबा ला म्हटलो मी जाऊन येतो तु घरी जा , शालुलाच दोन रट्टे लावले पाहिजेत , मनातल्या मनात चरफडत मी पांदीकडे निघालो ....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अच्छा ती गोष्ट! खूपच गॅप पडली हो, मधे..
ती अशी जुळवून घेतली काय? ओक्के..
चांगलं वळण घेतलंय गोष्टीनं. म्हणजे उत्सुकता वाढली आहे..
पुभाप्र... लवकर येऊ द्यात

abuva , manya , SharmilaR, आबा , प्रतिक्रियांबद्दल मनापासून आभारी आहे , या पुढचे भाग शक्यतो लवकर टाकायचा प्रयत्न करते .