बदललेली ती...

Submitted by SharmilaR on 25 April, 2024 - 01:47

बदललेली ती..
बुटकी ती.. काळी ती..
कुरूप ती.. नकोशी ती..
परित्यक्ता ती.. विधवा ती..
असायचीच अशी एखादी ती..
भरलेल्या प्रत्येक कुटुंबात..|

वहात रहायची..
घराचं ओझं निमुटपणे....
झुकलेल्या मानेवर..
अंधाऱ्या कोठीघरातून लेकुरवाळ्या माजघरापर्यंत..
गोळाभर अन्नाच्या बदल्यात..
घरातल्या काळोखात लपवायची..
कधी असलेली.. अन् कधी गेलेली अब्रू.. |
काळ बदलला.. बदलली तीही..
ऐकायला शिकली ..
आक्रोश स्वत:चा.. अन् बदलत गेलं काहीतरी..
बाहेर.. अन् तिच्याही आत.. आत....खोलवर..
दिसत गेली तिरीप बारीकश्या फटीतून..
ऐकू आली किलबिल..
उजाडत होतं कुठेतरी..
मावळत होतं कोठीघर..|
अंधार जोजवणारी तीही मग
झेपावत गेली.. बाहेरच्या धुक्यात..
नाकारून गुलामगिरी..
झुगारून काळोखं जीणं ..
टाकत एक एक पाऊल उजेडाकडे..
चाचपडत.. स्वत:चं अवकाश शोधत..
आता विहरते आहे ती..
तिच्या बुटक्या.. काळ्या.. कुरूप रुपासकट..
सधवेच्या अथवा विधवेच्या ..
जिण्याला म्यान करून..
अन् आपल्या ओझ्यालाच पंख बनवून..|
************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान!
बदलत्या स्त्री चा आश्वासक चेहरा उत्तमरित्या रेखाटलाय आपण..

आक्रोश स्वत:चा.. अन् बदलत गेलं काहीतरी..
बाहेर.. अन् तिच्याही आत.. आत....खोलवर..
दिसत गेली तिरीप बारीकश्या फटीतून..
ऐकू आली किलबिल..
उजाडत होतं कुठेतरी..
मावळत होतं कोठीघर..|
अंधार जोजवणारी तीही मग
झेपावत गेली.. बाहेरच्या धुक्यात..>> आवडलं

छान. मुक्त आकाशात स्वच्छंदपणे, मनाला आवडेल तसे उडणे पूर्णपणे साध्य झाले नाही, पण सुरुवात तरी झाली आहे. हासुद्धा सकारात्मक बदल आहे.