चलचित्र परीक्षण : midnight diner

Submitted by ब्लू कोलंबसे on 24 April, 2024 - 01:00

नुकतीच Netflix वरील midnight diner ही series पाहिली.

""डोक्याला फार ताप नको, नायक – नायिकांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यात बुडणे नको, अगदीच उथळ विनोदही नको आणि horror, thriller वगैरे तर अजिबातच नको"", अश्या माझ्या बऱ्याच चाळण्यांमधून, तावून सुलाखून ही मालिका राहिली.

रात्री १२ वाजता सुरू होणारं आणि सकाळी ७ पर्यंत सुरू असलेलं हे जपान मधील एक छोटंसं diner आणि त्यात घडणारे छोटेसे किस्से, असं साधं – सरळ स्वरूप आहे या मालिकेचं. पहिले दोन भाग पाहिल्यावर पुढे कंटाळवाणं होत की काय असं वाटलं, पण खरं सांगायचं तर “रात्री” वर माझं भरपूर, मनापासून प्रेम आहे, त्यामुळे या ' midnight diner ' मध्ये अजून काय लपलंय, ते जाणायला पुढे बघत राहिले आणि त्या कथानकांच्या प्रेमातच पडले.

Diner चा प्रमुख, ज्याला सगळे master म्हणतात, हा ज्याला जे हवे आहे ती dish बनवून देतो, जर त्याच्याकडे त्यासाठीची सामग्री असेल तर. किती मस्त आहे ही संकल्पना. ‘तुला काय हवं ते सांग फक्त, मी देतो करून ते!’ हे ऐकण्यात किती आनंद आहे!! दिवसभर काम करून थकलेल्या कोणालाही हे किती उभारी देत असेल, नाही!

Midnight Diner1.jpeg

पण मग या अशा 'अवेळी' कोणी जात असेल काय या 'diner' मध्ये असा प्रश्न पडतो आणि लवकरच तो फोल होता हे कळत जात. तारुण्यात प्रसिद्ध कॉमिक character चा अभिनय करत ‘असणारा’ आणि आता bar ‘चालवणारी’ कोझुकु इथे येते. जरा ‘वय झालेल्या’ ३ मैत्रिणी लग्नव्यवस्थेला नि एकंदरीत सगळ्या पुरुषांना शिव्या घालायला येतात, तर 'आजकाल घोड्यात काय दम नाही' असे सांगत, घोडे बाजारात सट्टा लावणारा कोमीची येतो. कधी रात्री petrolling करणारा तरुण पोलिस येतो आणि त्याच्या बाजूलाच, रियु, जो की छोटेखानी टोळीचा म्होरक्या आहे, तो शांतपणे आपली साके पीत बसलेला असतो. त्या पोलिसालाही थोडी घ्यावयास सांगतो. दोघे गुण्या गोविंदाने त्या साके चा आनंद घेतात. मग कधी Stripper असलेली मेरिल आपलं काम संपवून येते आणि diner मधले काही लोक ‘आजचा कार्यक्रम उत्तम झाला’, असं मनापासून सांगतात तेव्हा त्याचा आनंदाने स्वीकार करत गरमा गरम ramen वर ताव मारते.

मुख्य प्रवाहातून जरा बाजूला असलेले, असे हे सगळे ‘social misfits’ इथे भेटतात. समाजाने (?) काहीसे नाकारलेले आणि तरीही स्वतःला आहे तसं स्वीकारून, इतर कोणाही सारख धडपडून, चुका करून, त्या सुधारून, आणि जगण्यात नवनवीन रंग भरत ही सगळी माणसं जगत असतात.

एकमेकांची काळजी करणारे, उत्तम खाण्या-पिण्याचा आनंद लुटणारे, जीवनात आलेल्या अनेक कटू अनुभवांचे सार थोडक्यात, मात्र हसत हसत सांगणारे असे हे सगळे लोकं, मनुष्याच्या मूलभूत चांगुलपणावर विश्वास ठेवण्यात बळ देतात, हे नक्की.
सुंदर कथानक, अप्रतिम संगीत आणि बहुविध japanese खाणं, आणि एका वाक्यात पण खोल, विविधरंगी आयुष्याचा अर्थ अनुभवण्यासाठी ही मालिका जरूर पहावी!!!

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

परीक्षण आवडले.
प्लीज तुम्ही अशी परीक्षणे लिहित रहा. आम्ही वाचू.

होय. प्रयत्न करत राहू. @केशवकूल.
तुम्हाला आवडले यातच आनंद. 3 सिझनची ही सिरीज नक्की पहा, एकेक एपिसोड व त्यातील लोक अवलोकन करण्यासारखे आहेत.