कैरीचं आंबट गोड पन्हं

Submitted by मनीमोहोर on 20 April, 2024 - 06:38

कैरीचं आंबट गोड पन्हं

चैत्र वैशाख महिन्यात होणारी उन्हाची काहिली आणि थंडगार पन्हं यांचं अगदी जवळच नातं आहे. पूर्वी शेजारी पाजारी सगळ्यांकडे चैत्र गौरीच हळदीकुंकू केलं जायचं आणि वेगवेगळ्या चवीच पन्हं खुप वेळा प्यायला मिळायचं. हल्ली हे हळदी कुंकू फार ठिकाणी होतं नसलं तरी गुढी पाडवा, रामनवमी किंवा एखादा खास रविवार अश्या निमित्ताने अजून ही घरोघरी चैत्रात पन्हं आवर्जून केलं जातं.

लहानपणी उन्हाळा सुरू झाला की लिंब गायबच व्हायची बाजारातून. क्वचित कधी मिळाली तर महाग एकतर असायची आणि वर रस ही नसायचा अजिबात त्यात. उलट उन्हाळ्यात कैऱ्या भरपूर मिळायच्या बाजारात. किंवा आवारात असलेल्या आंब्याच्या खाली पडलेल्या कैऱ्या तर फुकटच मिळत असत. त्यामुळे उन्हाळ्यात लिंबाचं सरबत फारस होत नसे , आई कैरीच पन्हंच करत असे.

तेव्हा असलेल्या साखरेच्या अभूतपूर्व टंचाईमुळे पन्ह्यासाठी साखर वापरणं अशक्य कोटीतली गोष्ट होती. आई पन्हं गुळ घालूनच करत असे. त्यामुळे त्याला नैसर्गिकच केशरी रंग येत असे. चांदीच्या फुलपात्रात ते पिण्यासाठी काढलं की तो रंग आणखीनच चमकून उठे. कधीतरी साखर असली घरात तर कच्च्या कैरीच साखर घालून सरबत ही करत असे आई. ते लिमिटेड असायचं. अर्थात असं सरबत क्वचित् होई त्यामुळे त्याची खुप अपूर्वाई वाटत असे.

पन्हं जनरली माठातल्या पाण्याचंच करत असे आई. किंवा कधी कधी विहिरीच्या ताज्या पाण्याची कळशी खास पन्ह्यासाठी आणली जाई. तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगते , हवा जेव्हा थंड असते तेव्हा विहिरीचं पाणी उबदार असतं आणि हवा जेव्हा गरम असते तेव्हा ते पाणी थंड असतं. उन्हाळ्यात माठातलं पाणी संपलं असेल तर आम्ही जेवायच्या वेळी ताज्या पाण्याची कळशी भरून आणत असू. एकदम चवदार लागत ते पाणी.

लहानपणी फ्रीज आम्ही फक्त चित्रातच बघितला आणि पुस्तकातच वाचला असल्याने बर्फ ही फारच स्वप्नवत गोष्ट होती आमच्यासाठी. हळदी कुंकवाच्या दिवशी मात्र पन्ह्यात घालायला आईस फॅक्टरी मधून बर्फ आणला जाई. लाकडी भुश्यामध्ये लपेटलेला तो बर्फ भावाने सायकल वरून घरी आणला की नुसतं चैतन्य पसरत असे घरात. अर्धा बर्फ तर आम्ही नुसताच खाऊन संपवत असू. तो गारेगार बर्फ चोखत चोखत मिटक्या मारत खाताना जणू स्वर्ग सुख मिळत असे आम्हाला.

आज ही पन्हं केलं की हळदी कुंकवाच्या अनेक आठवणी मनात गर्दी करतात. आईने तिच्या तरुणपणी वर आयसिंगचे पक्षी, घरटे, फुलं अशी सजावट असलेला, कोणीतरी खाऊ म्हणून आणलेला केक एकदा गौरीच्या सजावटीत ठेवला होता. Biggrin Biggrin Biggrin कारण असा केक असू शकतो हेच तिला माहित नव्हते. तिला तो काहीतरी शोपीस वाटला होता आणि म्हणून त्याला त्या वर्षीच्या गौरीच्या सजावटीत मानाचे स्थान मिळाले होते. नंतर काही दिवसांनी जेव्हा समजलं की तो अंड्याचा केक होता तेव्हा आईने कपाळावर हात मारून घेतला होता. आणि आजीने त्या सदगृहस्थांचा उद्धार तर केला होताच पण देवीची क्षमा मागण्यासाठी पाच शुक्रवार ही केले होते. दरवर्षी सजावट करताना ही गोष्ट आई आम्हाला सांगत असे आणि आम्हाला ही ऐकताना दरवर्षी तितकीच मजा येत असे.

थंडगार पन्हं, केळीच्या पानावर दिलेली आंबा डाळ, गौरीची सजावट, आईचं आवडत खस अत्तर, गार गुलाब पाण्याचे अंगावर उडालेले तुषार, दुसऱ्या दिवशी केले जाणारे चटपटीत चणे, ठेवणीतल्या कपड्यात सुंदर दिसणाऱ्या शेजारच्या काकू आणि मैत्रिणी, खुप जणी एकदम आल्या तर सगळ्यांना सगळं देताना होणारी धांदल, मोठ्ठ्या आवाजात रंगलेल्या गप्पा अश्या अनेक आठवणी असल्या तरी सर्वात जास्त लक्षात राहिली आहे ती आई. दिवसभर एवढं काम करून ही ती दमत कशी नसे ह्याच आज आश्चर्य वाटत. तिचा चेहरा अगदी आनंदी आणि उत्साही दिसत असे. अंगावर जरीच फिक्या पिवळ्या रंगाचं लुगडं ( तिचं ठरलेलं होत, संक्रांतीच्या हळदीकुंकवाला काळी साडी आणि चैत्र गौरी च्या फिकी पिवळी ) नाकात नथ, कानात तिची रोजचीच मोत्याची ठसठशीत कुडी , अंबाड्या वर गजरा, कपाळावर छोटंसं कुंकू, गळ्यात हार, मंगळसूत्र घालून सजलेली, उत्साहाने आणि अधिकाराने घरात वावरणारी ती अजून ही स्पष्ट आठवते.

तिच्या परिचयातील नवरा नसलेल्या स्त्रिया, प्रौढ कुमारिका ह्यांना हळदी कुंकवाला न बोलावणे खरे म्हणजे तिला पटत नसे . त्यांनी ही ह्या आनंद सोहळ्याचा भाग व्हावे असे तिला मनापासून वाटत असे. पण इतर सुवासिनींबरोबरच त्यांना ही बोलावण्याची त्या काळी तिची हिम्मत नव्हती. ह्यासाठी तिने काढलेला मधला मार्ग म्हंजे आमच्याकडे हळदी कुंकू बॅचेस मध्ये होई. अश्या स्त्रियांना थोड उशिरा येण्याचं आमंत्रण ती देत असे. आणि त्यांचा ही डाळ, पन्हं , भिजवलेले हरभरे हे सगळ देऊन सन्मान करत असे. रात्री जेवणं झाली की वडील शेजार घरातल्या पुरुष मंडळींना पन्हं घेण्यासाठी बोलावत. रात्री अंगणात बसून डाळ पन्ह्याचा आस्वाद घेत त्यांच्या ही गप्पा रंगत असत.

तेंव्हा ह्यातलं वेगळेपण मला जाणवलं नव्हतं पण आज विचार करता आई किती काळाच्या पुढे पहाणारी, त्यांचा ही किती सह्रदयतेने विचार करणारी होती हे जाणवतं आणि तिच्या बद्दलचा आदर कैक पटीने वाढतो. ती खरं तर एक अगदी सामान्य स्त्री होती पण तिचं हे असामान्यत्व आणि ते निभावून नेण्याचं तिच्याकडे असलेलं धैर्य मला आज जास्तच स्तिमित करतात. तिची तीव्रतेने आठवण येते आणि एवढ्या वर्षा नंतर ही तिच्या आठवणीने गळ्यात हुंदका दाटून येतो.

हेमा वेलणकर

काही वर्षापूर्वी आम्ही हळदी कुंकू केलं होतं चैत्रातलं त्याचा फोटो, भिजवलेले हरभरे सोलून ते वाटीच्या काठात अडकवले आहेत.
IMG_20170408_171531857_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच हृद्य लिहिलंय.
आणि ते ही अगदी सहज गप्पा मारतो तशा टोन मध्ये साधं. कसलाही आविर्भाव विरहित.
पुलेशु!

सेssssम पिंच! फारच रिलेट झालं.....
माझी आई पैसे म्हणजे ऐपतच नव्हती विकत काही न आणता फुलं,कुंड्या, वेल ,कलिंगडाचे काप, ताटलीत रचलेली शेवेची चळत, करंज्यांनी सजावट करायची पाळण्यातल्या गौरी भोवती....
आजच हाऊसकिपींग स्टाफला डाळ पन्ह दिलं. मला कच्च्या कैरीचे पन्हे खूप आवडतं ते अक्षय तृतीयेला करीन...

अमितव, पहिल्या वहिल्या आणि इतक्या गोड प्रतिसाद बद्दल धन्यवाद....
मंजु, वावे, किल्ली मनापासून धन्यवाद ....
आजच हाऊसकिपींग स्टाफला डाळ पन्ह दिलं. >> किती छान ...

आपले लेख नेहमीच त्या वातावरणात घेऊन जातात.
अगदी मनभावन.... आंबा डाळ झाली आहे, पन्हं अजून बाकी आहे. आता या लेखाच्या निमित्ताने होईलच. पन्ह्याचा फोटोही मस्तच.

फार छान लिहिलेत ममो!! लहानपणीच्या खूप आठवणी जाग्या झाल्या . आमच्याकडे आई नोकरी सांभाळून हे सगळे करायची . तुम्ही म्हणता त्याप्रमाणे या बायका कुठून एवढ्या ऊर्जा आणायच्या कुणास ठाऊक ? नोकरी असल्याने रविवारी हळदीकुंकू करायचे . रात्री उशिरा पर्यंत सगळे आवरून सुद्धा सोमवारी उत्साहाने ऑफिस ला जायचे . आता वाटते कसे केले असेल आईने ? येणाऱ्या प्रत्येकाला करंजी, कैरीची डाळ , पन्हे देणे , भिजवलेल्या हरभर्यानी ओटी भरणे , गौरी भोवती आरास करणे , आरास करण्यासाठी मावशी यायची खास ! तिचा हात कलाकुसरीचा होता . कलिंगडाचे कमळ कापणे , फुलांची रांगोळी .. खूप मदत व्हायची. या प्रतिसादाच्या निमित्ताने आज मावशीची आठवण झाली . बरीच वर्षे झाली तिला जाऊन.

खूप छान लिहिलंय..
खूप खूप लिहा...

वरचे सर्व प्रतिसाद पण खूप हृद्य....

खुप छान लिहिलेस गं… अगदी हृद्य आठवणी.

आजच हाऊसकिपींग स्टाफला डाळ पन्ह दिलं. मला कच्च्या कैरीचे पन्हे खूप आवडतं ते अक्षय तृतीयेला करीन... >>>>

दोन्ही पन्ही वेगवेगळी आहेत?

>>> दोन्ही पन्ही वेगवेगळी आहेत?
हो, पन्हं कैरीच्या उकडलेल्या गराचं करतात. गूळ, वेलची, केशर आणि किंचित मिठाची कणी.
कच्च्या कैरीचं ते खरंतर सरबत. Happy

ममोंनी लिहिलेल्यासारखी हळदीकुंकवं, उन्हातून घराच्या सावलीत शिरल्यावर क्षणभर अंधारलेली दृष्टी, ठेवणीतल्या रेंशमी साड्यांची सळसळ, मळहातावर टेकलेल्या चांदीच्या काडीने ओढलेली अत्तराची पुसट रेघ, एखादा टपोर गजरा किंवा फूल, अंगावर गुलाबपाण्याचा शिडकावा, वडाच्या धुवूनपुसून स्वच्छ केलेल्या हिरव्याकंच पानावरची पिवळीधमक आंबेडाळ आणि चांदीच्या वाटीतलं सोनेरी पन्हं, सगळं स्मृतीच्या कुठल्यातरी तळघरातून उसळून वर आलं एकदम!

छान लिहिलं आहे ममो. तुमचं लिखाण नेहमीच आवडतं.

प्रतिसाद पण छान आहेत.

मळहातावर टेकलेल्या चांदीच्या काडीने ओढलेली अत्तराची पुसट रेघ >>> मळहात शब्द किती वर्षांनी ऐकला. विसरलेच होते मी हा शब्द

नेहमीप्रमाणेच छान लिहिलं आहेत ममो.
त्याकाळातल्या बायकांना इतकी एनर्जी कुठून असायची कल्पना नाही पण कदाचित आत्तासारखे स्मार्टफोन्स वगैरे नसल्याने मेंटल बँडविड्थ रहात असेल शिल्लक आणि ह्याच निमित्ताने त्यांचं सोशलायझेशन होणार म्हणूनही येत असेल उत्साह. कल्पना नाही. पण त्यांची जनरेशन वेगळीच होती/आहे.

आमच्या कार्यालयात उन्हाळ्यात पन्हे, आंबेडाळ, चटपटीत चणे आणि हळदीकुंकू एक दिवस असायचे... खूप घरगुती वातावरण असायचं एरवीही कार्यालयात... माणसं सुखदुःख शेअर करत.
तुमच्या लेखाने आठवणी जागवल्या.
तुमची गोड आई आणि घरातलं उत्सवी वातावरण डोळ्यासमोर उभं राहिलं... नुसतं पन्हं, डाळ, चटपटीत चणे नाही तर त्यापलीकडे बरंच काही सांगितलं... खूप सुंदर लेख....

हृद्य लेख.
हळदीकुंकवाचं वर्णन वाचून जी एं ची चैत्र ही कथा आठवली.

छान आठवण.
लहानपणी चैत्रगौरी ची सजावट करायला खूपच मजा यायची.

तेव्हा घरात एक दोनच ठेवणीतल्या साड्या असायच्या. आणि वर्षानुवर्षे त्याच त्या नेसल्या जायच्या. पण खरंच कुणालाच त्यात कसला कमीपणा वाटत नसे.

ऋतुराज, अश्विनी, धनवंती, साधना, sonalisl, अनिंद्य , स्वाती, नताशा, सायो, के अश्विनी, द .सा . भरत, sharmilaR, प्राजक्ता, निर्मल ... सर्वांना धन्यवाद.

साधना, स्वाती ने लिहिलं आहे तेच, उकडून गर काढला की पन्हं आणि कच्ची किसून कुस्करून घेतली की सरबत. पूर्वी पन्ह्यात साखर घालत नसत हल्ली घालतात.

सावलीत शिरल्यावर क्षणभर अंधारलेली दृष्टी, >> स्वाती, परफेक्ट लिहिलं आहेस, हळदी कुंकवाच वर्णन अप्रतिम ... शब्दचित्र च जणू.

अश्विनी ११, किती छान लिहिलं आहे. नोकरी सांभाळून एवढं करणं सोपं नाहीये.
खरं आहे, पूर्वी बायका खुप काम करत असत. माझी आई जेवढं काम करायची त्यापेक्षा मी काम कमी करते, आणि माझी मुलगी माझ्या पेक्षा कमी करते काम. म्हंजे हे मी शारीरिक श्रम म्हणतेय. पण आजच्या मुलींना ही काम खुप असतच, long working hrs, तिथलं टेन्शन, नोकरीची अनिश्चितता, स्पर्धा, commute मध्ये जाणारा वेळ ह्यात त्यांची ताकद खर्ची पडते. दमून भागून साडे आठ नऊ ला घरी येणाऱ्या मुलीला काय घरकाम करण्याचा उत्साह आणि ताकद राहिलं ? असो... सगळी life style च बदलली आहे.

मळहात शब्द किती वर्षांनी ऐकला. विसरलेच होते मी हा शब्द > नताशा मी पण Happy

तेव्हा घरात एक दोनच ठेवणीतल्या साड्या असायच्या. आणि वर्षानुवर्षे त्याच त्या नेसल्या जायच्या. पण खरंच कुणालाच त्यात कसला कमीपणा वाटत नसे. >> SharmilaR , तुम्ही बरोबर नोटीस केलंत , अगदी हाच विचार होता मनात ते लिहिताना.
पण त्यांची जनरेशन वेगळीच होती/आहे. > अनुमोदन सायो

नुसतं पन्हं, डाळ, चटपटीत चणे नाही तर त्यापलीकडे बरंच काही सांगितलं... >> खुप खुप धन्यवाद द. सा. ह्यासाठी.

हळदीकुंकवाचं वर्णन वाचून जी एं ची चैत्र ही कथा आठवली. >> भरत, थँक्यू

सुंदर. ममो, तुुमचे लेख नेहमीच मनाला स्पर्शून जातात. अगदी तंतोतंत वर्णन. डोळ्यासमोर सगळे जिवंंत वातावरण उभे राहीले. आणी आज हे सर्व अनुभवायला मिळत नाही याची हुरहूर लागली.

किती छान लिहिलयं ममो! प्रतिसादही छान. त्या निमित्ताने जुने दिवस आठवले.
स्वाती, मळहात हा शब्द किती वर्षांनी ऐकला!

हेमाताई, तुमचं लिखाण चैत्रगौरीसारखं सुंदर असतं नेहमीच. मध्यभागी मुख्य विषय आणि भोवती आठवणींची आणि किश्श्यांची आरास.

हा लेखही मस्तच.

>> तेव्हा घरात एक दोनच ठेवणीतल्या साड्या असायच्या. आणि वर्षानुवर्षे त्याच त्या नेसल्या जायच्या. पण खरंच कुणालाच त्यात कसला कमीपणा वाटत नसे.>> हो, खरं आहे. कदाचित आजूबाजूचे सगळे सारख्याच परिस्थितीत असल्यामुळे फार अपेक्षा नसाव्यात कुणाच्याच.

ममोंनी लिहिलेल्यासारखी हळदीकुंकवं, उन्हातून घराच्या सावलीत शिरल्यावर क्षणभर अंधारलेली दृष्टी, ठेवणीतल्या रेंशमी साड्यांची सळसळ, मळहातावर टेकलेल्या चांदीच्या काडीने ओढलेली अत्तराची पुसट रेघ, एखादा टपोर गजरा किंवा फूल, अंगावर गुलाबपाण्याचा शिडकावा, वडाच्या धुवूनपुसून स्वच्छ केलेल्या हिरव्याकंच पानावरची पिवळीधमक आंबेडाळ आणि चांदीच्या वाटीतलं सोनेरी पन्हं, सगळं स्मृतीच्या कुठल्यातरी तळघरातून उसळून वर आलं एकदम!>>>>> +1

माझी आई अशीच उत्साही.
मळहात शब्द... किती वर्षांनी!!

मूळ लेख आणि प्रतिसाद दोन्हीसाठी बदाम बदाम बदाम...
मी हल्ली एक कैरी शिजवून त्यात (डोळे मिटून) गूळ घालून (कारण तो तिप्पट/चौपटसुद्धा लागतो कधीकधी), चवीला मीठ घालून आगळ करून ठेवते. मंडळी लागेल तसं करून पितात. वेलचीपूड घालून शाही पन्हं. गूळ असतो म्हणून केशर नाही.

Pages