विरळाच सापडणाऱ्या, ‘चारचौघी’!

Submitted by छन्दिफन्दि on 19 April, 2024 - 21:09

गेल्या शनिवारी सकाळीं अकराचा प्रयोग पाहण्याचा (San Jose ला ) योग आला.
खर तर हे पहिल्यान्दा ९१ साली आलेलं नाटक, तीस वर्षांनी नवीन ताज्या दमाच्या कलाकारांसह परत आणलं तेही स्क्रिप्ट मध्ये कोणताही बदल न करता.

रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, पर्ण पेठे, कादंबरी कदम सगळ्यांचा कसदार अभिनय, इतर तीन पुरुष सहकलाकारांचीही तेव्हढीच उत्तम साथ. चंद्रकांत कुलकर्णींच उत्कृष्ट दिग्दर्शन..
तीन साडेतीन तासांच, तीन अंकी नाटक करणं म्हणजे आताच्या ३० सेकंदाच्या shorts च्या जमान्यात एकदम धाडसी वाटतं खर.. पण ते शिवधनुष्य या मंडळींनी लीलया पेललंय.
इतकं फास्ट, विचार करायला लावणारं, आणि तुम्हाला गुंतवून टाकणार स्क्रिप्ट आहे की नाटक कधी संपत कळतही नाही.
रोहिणी हट्टंगडींचं खूपच कौतुक वाटलं, एका दिवसात त्यांनी दोन प्रयोग केले, एक ११ चा आणि दुसरा संध्याकाळी ६ चा.
या प्रयोगाचं अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे नाटकानंतर चंद्रकांत कुलकर्णीनी प्रेक्षकांबरोबर संवाद साधला. त्यातही त्यांचे, ही कलाकृती ३० वर्षांनी परत आणण्यामागचे विचार कळले.

कथानक अर्थात त्या चौघिंवर केंद्रीत आहे.

आई, रोहिणी हट्टंगडी, शाळेतील मुख्याध्यापिका, तिने काळाच्या पुढे(?) जाऊन निर्णय घेतला आणि एका विवाहित माणसाशी संबंध ठेवले. त्यातून पुढे तीन मुलींना जन्म दिला, त्यांचे पालन पोषण केले. अर्थात हे करत असताना समाजामधून होणाऱ्या टीकेला, विरोधाला समर्थपणे तोंड देत आलीये.

तिची मोठी मुलगी, दिद्या(?)- मुक्ता, प्रोफेसर, जीची पुस्तके मुलांना अभ्यासक्रमाला आहेत. हिच्या नवऱ्याच बाहेर प्रकरण ( तिला आधीपासूनच कल्पना असते ) असल्याचं कळतं आणि ती दोन वर्षांच्या मुलीला नवऱ्याकडे सोडून माहेरी निघून येते. मग तिचा लढा.

दूसरी मुलगी, वैजू - कादंबरी, जी साधी नोकरी करतेय. समोरच राहणाऱ्या एका छान, रुबाबदार(?) तरुणाच्या प्रेमात पडून लग्न केलंय. लग्नानंतर तिच्या लक्षात येत की हा नुसताच दिसायला चांगला आहे पण नोकरीत स्थिरता नाही, धडाडी नाही, पण बड्या घराचा (पोकळ वासा?) असल्यामुळे मिजास खूप जास्त… त्यामुळे तिचा त्याच्यातील रस संपलाय पण घटस्फोट घ्यायला प्रबळ कारण नाही म्हणून त्याच्याबरोबर संसार रेटण्याचा , त्याच मुलं जन्माला घालायचा निर्णय घेतलाय.

सगळ्यात धाकटी, पर्ण पेठे, कॉलेजात शिकात्ये. तिला दोन तरुण / मित्र मनापासून आवडतात. तिला कोण एकट्याशी लग्न न करता दोघांबरोबर एकत्र एकाच घरात रहायचंय.

अशा ह्या फारशा सर्रास न आढळणाऱ्या चार चौघी ३० वर्षांपूर्वी पहिल्यांदा साकारलेल्या.. आणि आताही तशाच आहेत.

या ३० वर्षांमध्ये समाजात काही बदल झाले का ? तेव्हा जे विषय खूप अवघड किंवा समाजमान्य नव्हते ते आता कसे आहेत? परिस्थिती बदललीय का अजून तशीच आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात.

तीस वर्षांपूर्वी ९१ साली जेव्हा हे नाटक आल, तेव्हा माझ्या पिढीच्या मुली शाळेत होत्या. मी हे नाटक तेव्हा बघितल नव्हतं. आणि आज माझ्या चाळिशीत हे नाटक बघितलं तेव्हा त्या चौघी मला कितपत रीलेट झाल्या, पटल्या किंवा आजच्या काळाला ( तीस वर्षांनंतर तरी ) सुसंगत वाटल्या की अजूनही काळाच्या पुढची गोष्ट वाटली? तर त्याच अस आहे..

रोहिणी ताई किंवा आईने विवाहित पुरुषाशी संबंध ठेवले, जे दोन्ही कुटुंबात माहीत आहेत. आपल्या निर्णयासाठी समाजाचा विरोध पत्करून किंवा पर्वा न करता कणखर पणे उभे राहाणे, लढणे हे चांगलं वाटलं. पण ज्या व्यक्ती साठी हे सगळं करतोय ती त्या योग्यतेची आहे का हा विचार बहुदा केला नसावा असे ही वाटले… कारण ती व्यक्ती म्हणजे आबा थोडे नेभळट किंवा निर्णय क्षमतेचा अभाव असणारे किंवा कचखाऊ वाटले.. तर इतक्या अतिसामान्य माणसासाठी तेव्हढी उठाठेव ( किंवा मुळात जरी लग्न करावं वाटलं असतं तरी ) का करावी असा प्रश्न मला पडला.

विद्या, मुक्ता बर्वे,इतकी उच्च विद्या विभूषित. पण जेव्हा नवऱ्याचे बाहेर लफडे आहे हे कळते तेव्हा ती एवढी असहाय्य का फील.करते, तिला तिचा तो पराभव का वाटतो? नवऱ्याने आपल्याला पसंती द्यावी त्याच्या कडून validation मिळावं हा अट्टाहास कशाला?? असे अनेक प्रश्न आजच्या स्त्रीला विद्याकडे बगून नक्कीच पडतील.
दोन वर्षाच्या बाळाला सोडून सहजा सहजी कोणी आई सोडून येऊ शकेल ही गोष्ट आजही पटत नाही.. त्याही पुढे जाऊन नवऱ्याला जबाबदारीची जाणीव करून द्यावी म्हणून बाळाला सहा महिने नवऱ्याकडे आणि सहा महिने स्वत: कडे ठेवण्याचा तिचा प्रस्ताव म्हणजे तर कडी वाटते. शेवटी ते मूल आहे, त्याला भावना आहेत त्याची अशी वाटणी कशी होऊ शकते… मानवी भावना, आई मुलाचं नात किंवा त्याची वीण ही मला वाटतं कालातीत आहे.

कादंबरीला नवरा काहीच कामाचा/ धडाडीचा नाही हे बरच उशिरा कळत.. त्याच्या नोकरीचा पत्ता नसतानाही ती मुलं जन्माला घालायचा निर्णय घेते.. ते पण फार अव्यवहार्य वाटते.
आजची सुजाण स्त्री अशा भोवऱ्यात स्वतःल अडकवेल ही शक्यता दुर्मिळ किंवा शून्य.
पण तसच खर तर आजकाल फक्त पुरुषाची नोकरी (bread winner ) महत्वाची आणि स्त्रीची दुय्यम असे राहिलेले नाही अनेक ठिकाणी ह्याच्या उलट चित्रही दिसते म्हणजे स्त्री मुख्य कमावणारी किंवा कर्तबगार असून नवरा थोडी बॅक सीट घेतो. ते त्यांच्या संगनमताने होत असल्याने अशी स्त्री कादंबरी सारखी react होणार नाही असच काहीस वाटतं.

आता शेवटची विनू, दोन पुरुषांबरोबर एकत्र राहायची कल्पना मला वाटतं प्रगत/ अप्रगत कल्पनेच्या पुढची वाटते.. अतर्क्य वाटते.. ह्यात व्यक्ती म्हणून त्या पुरुषांच्या / किंवा (उलट केस मध्ये दोन स्त्रिया आणि एक पुरुष सताना) स्त्रियांच्या भावना/ मनाचा विचारच होत नाहीये का असं वाटतं राहत.. की फक्त कधीतरी द्रौपदीने केलं ( जे तिनेही मनापासून स्वीकारले नव्हते तिच्यावर लादलेले होते) मग आपण आता का करू नये फक्त ह्या विचाराने असे करणे… अर्थात तिन्ही adults सह संमतीने असे काही करू ही शकतात.. पण मग समाजमान्यता वगैरे कशाला हवी? तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटत ते तुमच्या जबाबदारीवर करावं.. ते स्वातंत्र्य , सीमा रेषा त्यांचं पालन हा सर्वस्वी अशा व्यवस्थेत राहणाऱ्या स्त्री पुरुषांचा प्रश्न किन्वा जबाबदारी आहे..

कथेतील सर्व गोष्टी, पात्र, त्यांचे विचार जरी पटले नाहीत तरी ते नाटक तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते.

आवडलेली वाक्ये:
(रोहिणी हट्टंगडीच्या स्वगतातील, थोडेफार शब्द चुकले असतील पण मतितार्थ असच काहीसं असावा)
एकदा एखादी कृती केली की तिच्या परिणामांची जबाबदारी घ्यायची आणि निभवयाची पण तयारी हवी.
आयुष्यात घेतलेल्या निर्णयाचे मोल किती हे जाणून ते चुकवायची हिमत ठेवायला हवी.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले विश्लेषण केले आहे.
वंदना गुप्ते संचात नाटक आलेलं तेव्हा बऱ्यापैकी चर्चित बनलेलं. चाकोरीबाहेरचं जगणं स्वीकारलेल्या ह्या चौघीजणी बहुतेक लता नार्वेकरांनी प्रेक्षकांसमोर आणलेल्या व त्या निमित्तानं त्यांच्या मुलाखती वगैरे पाहिल्याचं आठवतंय. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शाळकरी वयामुळे तेव्हा आशय समजला नव्हता.
बाकी पर्ण पेठे व्यक्तिरेखेच्या बाबतीतलं विश्लेषण अगदी पटलंच.

छान विश्लेषण..!
नाटकातल्या चार वेगवेगळ्या विचारसरणीच्या स्त्रियांच्या भूमिकेचा , त्यांच्या मतांचा, निर्णयांचा छान आढावा घेतलायं लेखात..!

चांगले विश्लेषण.
मी ही काही महिन्यांपूर्वीच पाहिले हे नाटक.

प्राचीन आणि रुपाली प्रतिसादा बद्दल धन्यवाद!

https://www.facebook.com/groups/CalAA/permalink/10168299432135328/?mibex...

प्रयोगानंतर चंद्रकांत कुलकर्णींनी व्यक्त केलेले मनोगत.. नाटकाची संहिता, प्रयोजन, आणि एकूणच प्रवास यांविषयी...

विश्लेषण छान केले आहेस. खरच बरेच प्रश्न मनात आले.
>>>>>पण तसच खर तर आजकाल फक्त पुरुषाची नोकरी (bread winner ) महत्वाची आणि स्त्रीची दुय्यम ............ react होणार नाही असच काहीस वाटतं.
प्र-ह-चंड पटले!!!! अगदी अगदी झाले.
बाकी नवर्‍याचे व्हॅलिडेशन लागणेआणि ते न मिळाल्याने खंतावणे ही अनेक स्त्रियांची शोकांतिका असावी.