Being Sentimental.

Submitted by केशवकूल on 19 April, 2024 - 10:58

Being Sentimental.
मी आपला खुशाल सकाळचा चहा नाश्ता करण्यासाठी टपरीवर बसलो होतो. चहावाल्याने रेडिओवर हिंदी सिनेगीत लावलं होतं. मूड एकदम मस्त जमला होता. पण तुम्ही तुमच्या धूनमध्ये आनंदात आहात हे लोकांना आवडत नाही, देव सुद्धा त्यांच्या मदतीला धावतो.
कसं ते पहा.
मी चहाचे घुटके घेत होतो तर “सैय्या बेईमान...” हे गाणं वाजत होतं. तर आलाच तो. चुरगळलेला झब्बा पायजमा, डोळे तारवटलेले. झोप झाली नसणार. माझ्याच शेजारी येऊन बसला. जब गीदड़ की मौत आती है तो वह शहर की ओर भागता है
हे कुणी तरी चुकून लिहीलं असणार. कारण इथे पळायची गरज नव्हती. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्याने मोबाईल काढला. त्याला पाहिजे ते पान समोर आल्यावर.
“एकस्क्युज मी सर, पण हा पत्ता जरा सांगणार का. कवाधरून शोधतो आहे.”
“काय पत्ता आहे?”
“भागो पाटील. गल्ली नंबर तीन. पुणेकर कॉलनी.”
हायला हा तर मलाच शोधतो आहे. भागो सावधान.
“पुणेकर कॉलनी तर हीच आहे. तीन नंबर इथून डाव्या हाताला वळून...”
“अहो तिकडे चार चकरा मारून झाल्या पण भागो पाटील हे नाव कुणीही ऐकलेले नाही”. कसं ऐकणार? गल्लीच चुकीची आहे ना.
“सॉरी, मला पण माहित नाही. चहा घेणार? फोन नंबर आहेना, फोन करायचा...?
“काही उपयोग नाही. स्वीचड ऑफ, एंगेज्ड, आउट ऑफ रेंज अस चाललाय.”
“पैसे भरले नसतील. काय प्रॉब्लेम काय आहे? इतके डेस्परेट झालाय जणू.”
“अहो त्याचा मित्र मरणासन्न पडलाय. सारखी त्याची आठवण काढतोय.”
माझा कोणीही मित्र साध्या पडश्यानपण आजारी नव्हता. सगळे साले ठणठणीत उंडारत होते. वर मी कुणाचेही उसने पैसे घेतले नव्हते. कि त्याने मरतानाही त्याची वसूली करावी.
“काय लोकं असतात एकेक.” मी आपलं काहीतरी बोलायचे म्हणून बोललो.
मी हळूच काढता पाय घेतला. सुटलो म्हणून सुटकेचा श्वास घेतला आणि लांबून घरी जावे असा विचार केला.
समोरून हातात मोबाईल घेऊन इकडेतिकडे पहात एकजण चालला होता. मी चपळाईने त्वरित साईड बदलून दुसऱ्या बाजुला गेलो.
फोन चालू केला. ताबडतोब इनकमिग..
अननोन नंबर होता. फोन बंद करून टाकला. हे लोक आज दिवसभर मला फोन वापरू देणार नाहीत.
आजचा दिवस काही खरा नव्हता. तो जो कोण मरणासन्न होता तो गचकल्या शिवाय माझी सुटका नव्हती.
थोडी झोप लागत होती तर दारावर कुणीतरी धक्के मारत होतं. हे लोक थोडावेळ झोपू पण देत नाहीत. जरा कुठे डोळा लागतोय.
“कोण आहे?” मी धडपडत उठलो. दरवाजा वाचवण्यासाठी तरी उठणे भाग होते. मी दरवाजा उघडला. असाच कोणीतरी रँडम होता.
“कशाला बोंब मारताय? बेल आहे ना.”
“बेल वाजवून वाजवून थकलो. चल तुला न्यायला आलो आहे. सोनटक्के शेवटच्या घटका मोजतोय आणि तू इकडे तंगड्या प्रसरून झोपला आहेस. चल लवकर. जे आहेत त्या कपड्या निशी चल. कशाचाही भरंवसा नाही. आई पण तुझी आठवण काढती आहे.”
“अहो पण सोनटक्के नावाचा माझा कोणीही मित्र नाही.”
“हे पहा भागो, तुला घेऊन येण्याची जबाबदारी माझी आहे. बऱ्या बोलाने येणार आहेस कि नाही?”
त्याची भव्य दिव्य कमावलेली शरीरयष्टी बघून मी नांगी टाकली. म्हटलं एक डाव सोनटक्कयाला बघून तर येऊ.
मला रिक्षात घालून तो आडदांड सोनटक्क्याच्या घरी घेऊन गेला. बासष्ट रुपये भाडं झालं होतं. मी हात वर केले. मी का म्हणून भाडं द्यायचं? त्यानं चुपचाप भाडं दिलं. नंतर तो वसूल करणारच होता म्हणा.
सोसायटीच्या बाहेर थोडी गर्दी होती. हलक्या आवाजात कुजबुज चालली होती.
आम्ही फ्लॅटमध्ये शिरलो. कॉटवर सोनटक्क्या झोपला होता. आमच्या बरोबरचा जो होता तो सोनटक्क्याच्या कानापाशी वाकला आणि म्हणाला, “बबनराव, भागो आला आहे.”
सोनटक्क्याने डोळे उघडून माझ्याकडे क्षीण कटाक्ष टाकला. त्याला जे काय समजायचे ते तो समजला. कुणीतरी विचारले, “बबन, ओळखलस का भागोला?”
त्याच्या डोक्याची हालचाल झाली. त्याचा अर्थ तुम्ही काहीही लावू शकाल.
-मी घोडा मागितला होता. तुम्ही गाढव आणलेत
-भागो? हा भागो? किती बदलला आहेस!
किंवा
-उसने घेतलेले शंभर रुपये परत केव्हा करणार आहेस? मी मेल्यावर?
इत्यादी.

“हो, म्हणताहेत. म्हणजे अजून शुद्ध आहे. नाहीतर वेध लागले कि भ्रम लागतो.”
“तुमची फार आठवण काढत होते. बरं झालं तुम्ही आलात. आता सुखानं...”
पेशंटने एका बाजूला मान टाकली. डॉक्टरने घाई करून इंजेक्शन मारले. नाडी बघितली. काही उपयोग नव्हता. प्राणपाखरू उडून गेले होते. का कुणास ठाऊक मी एकदम रिलॅक्स झालो. लवकर सुटका झाली.
"बर. आता पास कोण आणणार?"
"बॉडी खाली घोंगडीवर घ्यायला पाहिजे."
बघता बघता सोनटक्क्या चे "सोनटक्क्या च्या बॉडी"त रुपांतर झाले. शेवटी उरते ती फक्त बॉडी.
"उत्तर कुठली?"
थोडी वादावादी होऊन उत्तर दिशा फिक्स झाली.
सोनटक्क्या च्या आत्म्याचा प्रवास सुरु झाला.

मग रडारड सुरु झाली.
“भागो, आईला भेटून घ्या. सांत्वन करा.
बाहेरच्या खोलीत आई रडत होती. मी खाली जवळ बसलो. म्हणालो, “आई...”
अश्या वेळी काय बोलायचे ते मला समजेना. “आई माझ्याकडे बघ आणि शोक आवर...” मधेच कोणीतरी टपकला आणि आईच्या कानाशी लागला. आईने थोडा वेळ रडू थांबवले. तो गेल्यावर पुन्हा रडण्याचा उमाळा आला.
अर्धा दिवस नाहीतरी वाया गेला होताच. दुपारी मॅटीनीचा शो मिळाला असता. घाई करायला पाहिजे.
हे सगळे आता माझ्या सहनशक्तीच्या बाहेर गेलं. बाहेर मोकळ्या हवेत आल्यावर बरं वाटलं.
“काय गेला का.”
“तुम्ही कुठे असता?”
“म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये. सध्या स्लंप चालला आहे म्हणे?”
“शेअर काढून टाकावे का?”
“हे गव्हरमेंट बदल्या शिवाय...”
जरा बाजूला रस्त्यावर जाऊन सिगारेटचे दोन झुरके घेतले. बरं वाटलं. एक मोकळी रिक्षा चालली होती. थांबवली. कॉलनीत परत आलो. सकाळ पासून काही खाल्ले नव्हते. वडापावच्या स्टालवर जाऊन दोन वडापाव घेतले.
खायला सुरवात करणार तोच मोबाईल नाचवत एकजण जवळ आला.
“एकस्क्युज मी सर, पण हा पत्ता जरा सांगणार का. कवाधरून शोधतो आहे.”
“काय पत्ता आहे?”
“भागो पाटील. गल्ली नंबर तीन. पुणेकर कॉलनी.”
(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोनटक्के, कोकाटे - जाणूनबुजून आहे का?>> नाही. नाही. चूक झाली होती. ती दुरुस्त केली आहे. आभार.
Black comedy, also known as dark comedy, morbid humor, gallows humor, black humor, or dark humor, is a style of comedy that makes light of subject matter that is generally considered taboo, particularly subjects that are normally considered serious or painful to discuss.
कुणीतरी लिहायला पाहिजे होत. ते माझ्या नशिबात आले.

छान आहे...
ज्यांचे दुरान्वयानेही काही नाते नाही असे लोक तर्राट होऊन अशा प्रसंगी ऊर बडवताना पाहिलेत.
सतिश आळेकरांचे "महानिर्वाण" नाटक उत्तम ब्लॅक कॉमेडी आहे.

दसा
आभार.
बघतो "महानिर्वाण" कुठे मिळतंय का.

खूप रंजक झालीय भट्टी..!
बाय द वे... वडापावच्या स्टॉलवर वडापाव घेतले - पर्यंत पोहोचलो अन् तक्षणीच END कसा होणार ह्याचा अंदाज आला आणि तंतोतंत खराही ठरला... Happy